राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतातला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला. आणि म्हणाला, राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटते. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. ऐक...

आर्यावर्तात पत्रनगर नामक एक विशाल नगरी होती. तेथे सम्राट पत्रवणिक राज्य करीत असत. सम्राट पत्रवणिक हे महान पराक्रमी होते. परंतु मनुष्य कितीही पराक्रमी असला, तरी युद्धात त्याचेही नुकसान होतेच. शत्रुपत्रांच्या नित्य स्वा-यांमुळे पत्रनगर साम्राज्याच्या वर्धापन व रिटेन कार्यात खूपच खर्च होत होता. त्या कारणें पत्रनगरच्या खजिन्यावर ताण येत होता. सम्राट पत्रवणिक यांना त्याचीच मोठी चिंता असे. त्या चिंतेने त्यांच्या जिव्हेस अस्थीभ्रंश विकार झाला होता. या विकारात मनुष्यप्राण्याचा जिव्हेवरील ताबा सुटतो व ती अद्वातद्वा चालते.

सम्राट पत्रवणिक यांच्या दरबारात का.सं.दत्त नामक प्रधान होते. का.सं.दत्त हे चौदा कला व चौसष्ट विद्यांमध्ये पारंगत होते, असे त्यांचे स्वमत होते! परंतु ते वस्तुतः व्यवस्थापनकलाकुशल होते. त्या कारणें पत्रनगरच्या कारभाराचा रथ ते उत्तमरीत्या हाकत होते. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे पत्रनगरचे प्रजाजन व पत्रश्रेष्ठी मनोमन कुढत दिनक्रमण करीत होते. का.सं.दत्त यांना एकच दुःख होते. ते म्हणजे सम्राट मीडियादत्त यांचा जिव्हाविकार. त्या विकाराचा फटका कासंदत्त यांना नित्य बसे. त्या कारणे ते मनोमन दुःखी असत. परंतु मासाखेरीस मिळणारे द्रव्य पाहून ते आपले दुःख प्राशन करून घेत असत. असा एकूण काळ चालला होता. ऋतुंमागून ऋतू चालले होते.

एकदा वसंत ऋतु सरता सरता सर्व मासांमध्ये उत्तम असा निवडणूक मास दाखल झाला. पत्रनगरच नव्हे तर अन्य राज्ये व साम्राज्ये यांतही हा मास हर्षोल्हासाने साजरा करतात. कोणी त्यास रणांगण नामे साजरे करते, तर कोणी त्यास कुरुक्षेत्र म्हणते, तर कोणी त्यास पॉवरप्ले म्हणते. एका पत्रराज्यात तर त्यास आयपीएल नामेही संबोधिले जाते. याच मासारंभी एके दिवशी प्रातःकाली का.सं.दत्त आपल्या कचेरीमहालातील अंतःपुरात बसले होते. एकाग्रचित्ताने ते साम्राज्यातून आलेले अहवालपठण करीत होते. अचानक त्यांच्या भालप्रदेशावर आठ्यांचे जाळे पसरले. भृकुटी वक्र झाली. त्यांनी तत्त्काल मेजावरील दूरध्वनीसंयंत्र हाती घेतले व त्यावरील कळफलकावरून काही क्रमांक दाबले.
दूरध्वनीसंचातून काही काळ होले होले हवा चालती है ऐसे हवामानगीत ऐकू येऊ लागले. किंचित कालाने त्यातून हॅलो असा भित्रट ध्वनी आला. तो ऐकताच कासंदत्त आपल्या व्यवस्थापनकुशल स्वरात म्हणाले, "वृत्तदास, मी का.सं.दत्त बोलतोय."
"हां सर?"
"अहो वृत्तदास, अमुक मतदारसंघातून किती वीर द्वंद्वास उतरले आहेत?"
"द्वादश, सर. परंतु खरे द्वंद्व दोनच योद्ध्यांमध्ये आहे. सत्तामित्र व अर्थकेतू अशी त्यांची नावे आहेत."
"होय ना? परंतु आपल्या पत्री केवल सत्तामित्र यांचेच वृत्त दिसते आहे." का.सं.दत्त संतापून विचारते झाले.
त्यावर वृत्तदास म्हणाला, "होय सर. सत्तामित्र यांच्याशी आपण संधी केली आहे. तसे मला सूचित करण्यात आले होते."
सत्तामित्र यांच्याशी सदरील संधीकरार का.सं.दत्त यांच्याच व्यवस्थापनकौशल्यामुळे जाहला होता. त्या करारामुळे साम्राज्याच्या खजिन्यात पंचदश लक्ष सुवर्णमुद्रांची भर पडणार होती.
"होय, परंतु वृत्तदास, याचा अर्थ असा नाही, की अर्थकेतू यांची वृत्ते देणे नाही. त्यांचीही वृत्ते दिसली पाहिजेत."
"होय सर," वृत्तदास म्हणाला, "आजपासून तसे करतो."
"हे पाहा, एकदम तसे करू नका. प्रथम त्यांच्यासमवेत संधीकरार करा. त्यांची पॅकेजक्षमता समजून घ्या. पत्रनगरची सेवा करण्याची ही संधी तुम्हांस मिळते आहे, हे तुमचे केवढे सौभाग्य आहे वृत्तदास!"
का.सं.दत्त यांच्या या विधानाने वृत्तदास यांच्या उदरी विशाल खड्डा पडला. परंतु मासाखेरीस मिळणारे द्रव्य पाहून त्यांनीही तो खड्डा भरून काढला.

येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, की हे राजा, सत्तामित्र व अर्थकेतू यांच्यात द्वंद्वयुद्ध होणार असताना व सत्तामित्र यांची वृत्ते आपल्या पत्री प्रसिद्ध होत असतानाही का.सं.दत्त यांनी अर्थकेतू यांचीही वृत्ते प्रसिद्ध करण्याचा आग्रह का धरला? त्या मुळे सत्तामित्र यांच्यावर अन्याय होणार नाही का? तसेच अर्थकेतू यांच्याशीही संधीकरार करण्याची आज्ञा ऐकताच वृत्तदास यांच्या उदरात खड्डा कशामुळे पडला? या प्रश्नांची उत्तरे ठावूक असूनही दिले नाहीस, तर हे राजा, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावरती लोळू लागतील!

ते ऐकताच विक्रमादित्याने आपले मौन सोडले व तो सांगू लागला, हे वेताळा, का.सं.दत्त हे पत्रसंपादक असून, त्यांचे पत्र हे मोठे विश्वासार्ह असल्याचे या कथेतून प्रतित होते. विश्वासार्हता हा मोठा सद्गुण आहे. तो कमावण्यास खूप काळ लागतो. गमावण्यास क्षणही पुरेसा असतो. ही विश्वासार्हता निष्पक्षपातीपणातून येत असते. सत्तामित्र याच्याशी पत्राची संधी होती. त्या कारणे त्याची वृत्ते छापून येत होती. व त्या बदल्यात पत्रनगरीच्या खजिन्यात पंचदश लक्ष सुवर्णमुद्रा जमा झाल्या होत्या. परंतु त्यामुळे अर्थकेतू याच्यावर अन्याय होत होता. तो दूर करण्याकरीता व निष्पक्षपातीपणा टिकविण्यासाठीच का.सं.दत्त यांनी अर्थकेतू याच्याशीही संधी करण्याची आज्ञा वृत्तदासास दिली. त्यामुळे दोघांस समान न्याय मिळून, पत्रनगरची विश्वासार्हता टिकून त्याचबरोबर खजिन्यात भरही पडणार होती. म्हणून का.सं.दत्त यांचा आग्रह रास्तच आहे. मात्र पत्रनगरच्या खजिन्यात भर पडली तरच आपणांस मासाखेरीस द्रव्यलाभ होईल हे वृत्तदासास त्याच्या अविद्येमुळे समजले नाही. शिवाय तो -हस्वदृष्टीचा होता. पत्रनगरच्या लाभाऐवजी त्यास आपला स्वार्थ दिसत होता. त्याच्या उदरी खड्डा पडला यातून, वृत्तदास आधीच अर्थकेतू यांस जाऊन भेटला होता, हे स्पष्ट होते.

राजाच्या या उत्तराने वेताळ खुश झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
त्याच्या बाजूलाच वृत्तपत्रांची विश्वासार्हता व निष्पक्षपातीपणाही लोंबकळत होता!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २९ एप्रिल २००९)

ढापू बाई ढापू
गं ढापू बाई ढापू
एक बातमी ढापू
गं दोन लेख ढापू
कुणाला कळतंय?
दे ठोकून... छापू

हे पारंपरिक वृत्तपत्रीय लोकगीत असल्याचे सर्वश्रुत आहेच. वृत्तपत्रांचा लेलेकृत इतिहास निव्वळ चाळला, तरी अनेक श्रीयुतांनी हे गीत आळवल्याचे आपणांस दिसून येईल. आणि समस्तांस हे ज्ञातच आहे, की मराठी माणूस म्हटला की तो परंपराप्रिय असतोच. त्या कारणें समकालिन मराठी पत्रविश्वातही हे ढापू गीत ऐकावयास खासच मिळते. ज्याची सुरम्य उदाहरणे नेहमीच आपणांसमोर फडफडत असतात.

त्यातील एक ताजे टवटवीत तरल उदाहरण येथे उद्धृत करण्यायोग्य आहे.
ते वृत्त होते आमदारनिवासातील. एका मंत्र्याच्या पाहुणीस मंत्रीपत्नीने रात्रीच्या समयी चौदावे रत्न दाखविले, अशी ती रा. रा. सुकृत खांडेकरकृत सुरस व चमत्कारिक बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती. (वाचली होती ना तुम्ही ती बातमी... अगदी शेवटच्या पूर्णविरामापर्यंत? चवीचवीने?... तिचे पारायण करताना, भाव दाटले मनी अनामिक असे विचित्रसे काही होऊन आमच्याही नाडीचे ठोके वाढले होते!) तर तीच बातमी दुस-या दिवशी अन्य काही पत्रांमध्येही झळकली. शेमटूशेम. माशीटूमाशी. ते पाहून आम्ही मनोमनी म्हटले, असू देत. ढापू देत. अशी माहिती सर्व पत्रांच्या वाचकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने लोक असे काही वाचून काळजी तरी घेत जातील. तात्पर्य काय, तर ढापणाराने असा विवेक व तारतम्य ठेवून बातमी ढापली, तर कुणाची काही तक्रार असण्याचे कारण नाही.

वस्तुतः वृत्तढापूगिरी ही जशी कला आहे, तसेच ते एक शास्त्र आहे. ते ठाऊक असलेला बातमीदार कधीही लोकप्रिय व स्वस्त इंग्रजी दैनिकांतील बातमी ढापत नाही. तो विचार करतो, की टैम्सॉफिंडिया वा एचटीमधील बातमी ढापणे म्हणजे सीसीटीव्हीक्यामे-यासमोर उभे राहून चोरी करण्यासारखे आहे. ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठीच करायचे, तर मग हिंदु, इकॉनॉनिक्स टाइम्स आदी जड पत्रेच का घेऊ नयेत? फ्री प्रेस इंड्या असेल तर अतिउत्तम. (ते मोठे जादुई वृत्तपत्र आहे. असते, पण दिसत नाही!)

ढापूगिरी कलाप्रांतात महामाहिर असलेले बातमीदार कधीही बातमी जशीच्या तशी ढापत नाहीत. ते बातमीचा फॉलोअप देतात! त्यात अर्थातच थोडी जास्त अंगमेहनत असते. पण ती अनेकदा सार्थकीही लागू शकते. कारण की अशा बातमीत बायलाईन मिळण्याची अंगभूत सोय असते.

हे सर्व वाचल्यानंतर आपणांस या कला व शास्त्रात काहीच काठिण्यपातळी नाही, असे वाटू शकेल. पण वाचकांतील पत्रकार हो, येथे फसगत होण्याची शक्यता असते. जशी ती सकाळमधील एका उपसंपादकाची झाली. ती कथाही मोठी मनोरंजक व ज्ञानवर्धक आहे.

ती एप्रिल फूलची गोष्ट आहे.
(माहितीसाठी - दरवर्षी १ एप्रिल रोजी एप्रिल फूल असतो.)
तर त्या दिवशी लोक एकमेकांस एप्रिल फूल करतात. अनेक वृत्तपत्रे त्या दिवशी थोडीशी चंमतग करतात. एखादी भन्नाट बातमी देतात, की वाचकांस क्षणभर भिरभिरल्यासम व्हावे. चाणाक्ष वाचक मात्र अशा बातम्यांना फसत नाहीत. ते अशा बातम्या वाचतात. ओठांच्या कोप-यातल्या कोप-यात कणभर हसतात. आणि मग ती बातमी विसरून जातात. (हे अर्थात सरासरी सगळ्याच बातम्यांबाबत होत असते. शिवाय आता वाचकांस एप्रिलफूल बातम्यांत फारसा रसही राहिलेला नाही. इंड्या टीव्ही व आयबीएनसेव्हन व सामना व पुण्यनगरी असताना त्यात कुणास काय नाविन्य वाटेल? असो.)

तर गेल्या एक एप्रिलला महाराष्ट्र टाइम्सच्या पोटातील मुंबई टाइम्स पुरवणीने अशीच एक गंमत केली. त्यांनी चक्क भार्गवी चिरमुले ही आपली मराठी अभिनेत्री थेट बॉण्डपटात झळकणार अशी बातमी प्रसिद्ध केली. या वृत्तातच 'सविस्तर बातमी वाचा पान तीनवर' अशी जोडणीही देण्यात आली होती. पान तीनवर स्वच्छपणे 'एप्रिल फूल बनाया' असे छापले होते. थोडीशी गंमत. दुसरे काय!

पण ही गंमत पुणे सकाळच्या त्या कुण्या ढापूकलाशास्त्रात प्रवीण नसलेल्या उपसंपादकाच्या डोक्यावरून गेली. अगदी तीनताड गेली.
त्यास बिचा-यास खरेच वाटले, की आपल्या भार्गवीताई खरोखरीच बॉण्डपटात काम करणार आहेत. (जेम्स बॉण्डला एक धाकटी बहिण असते. ती लहानपणीच बिछ़डलेली असते. मग एकदा अतिरेक्यांचा माग काढत बॉण्ड ऐन गणपतीत पुण्यात येतो. आणि सिटी पोस्टाजवळ नेमकी त्याला ही धाकटी बहिण सापडते. तीच आपली भार्गवीताई, असा काहीसा त्या उपसंपादकाचा समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
ही गुडन्यूज आपल्याही, म्हणजे सकाळच्या लक्षलक्ष वाचकांना कळावी म्हणून त्याने हळूच मटाची ती एक एप्रिलची बातमी उचलली व सरळ सकाळच्या पुणे (ग्रामीण) आवृत्तीत नऊ एप्रिलला प्रसिद्ध करून टाकली. (नऊ एप्रिलला प्रसिद्ध केल्यामुळे ती बातमी आपोआपच एप्रिल फूलची होत नाही, असाही त्या उपसंपादकाचा समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुण्यात कसल्याच शक्यता नाकारता येत नाहीत!)

तात्पर्य काय, तर माणूस ढापूकलेत किमान मॅट्रिकपास तरी पाहिजे! नाही तर बिचा-या त्या सकाळच्या उपसंपादकासारखे होते. आपण तर एप्रिल फूल बनतोच, पण वाचकांनाही शेंडी लावून जातो. (खोटे नाही हे. पुराव्यादाखल सकाळच्या संकेतस्थळावर त्या बातमीखाली प्रसिद्ध झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पाहा. काही जणांनी तर आपल्या मराठी बाण्यास जागून भार्गवीचे खूप खूप अभिनंदन केले आहे!)

आता यावर सकाळ काही खुलासा-बिलासा करणार का? असा प्रश्न मात्र तुम्ही विचारू नये.
असे प्रश्न अग्रलेखांसारखेच असतात. भाकड!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २७ एप्रिल २००९)

विद्या-अर्थीमित्र हो,
आज आपण येथे संगणकावरील माहितीच्या महाजालाची उपयुक्तता व गुगलपूर्व व गुगलोत्तर कालखंड या विषयीची माहिती घेणार आहोत.
इसवीसनाच्या विसाव्या शतकातील गुगलपूर्व कालखंडात मराठी पत्रसृष्टीतील अनेक अत्यंत थोरथोर माणसे (उदाहरणार्थ ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्स गोविंदराव तळवलकर, माजी संपादक, सांज लोकसत्ता व परिक्रमाकार लता राजे मॅडम, माननीय ज्येष्ठ पत्रकार विजयराव साळुंखे इत्यादी व वगैरे) परदेशातील घटना-घडामोडींबद्दल लिहित असत. गुगलपूर्व काळात असे लिहिणे सोपे नव्हते! त्यात तुडुंब बौद्धिक व दैहिक कष्ट होते. (एशियाटिक मध्ये जा, ब्रिटिश काऊन्सिलात जा... वाचत बसा, नोट्स काढा.... केवढा तो कुटाणा!)

आज मात्र संगणकावरील माहितीच्या महाजालामुळे ते कित्तीकित्ती सोपे झाले आहे. इतके की आजकाल कोणीही, म्हणजे गेलाबाजार सकाळचे कन्वर्जन्सबळी रवी आमले हेसुद्धा कचेरीत बसून विश्ववेध वगैरे घेऊ शकतात. यात अतिशयोक्ती वाटत असेल, तर प्रहारचे अमर्त्यसेन रा. रा. राहुल बोरगावकर अथवा लोकसत्तेचे मिनीकेतकर रा. रा. संजय आवटे यांना विचारा! (तेही असाच विश्ववेध घेतात!)

तर मुद्दा असा, की इतिहासातील गुगलपूर्व कालखंडात एकंदरच परदेशी घडामोडींबद्दल लिहिणे किती तरी अवघड व कठिण होते. आता मात्र तसे काही राहिलेले नाही.
आता महाराष्ट्र बॅंकेत बचत खाते असले-नसले तरी काही बिघडत नाही, तुम्ही खुश्शाल स्विस बॅंकेवर लिहू शकता! लिहू शकता म्हणजे काय? लिहिलेच आहे आमच्या अरविंद व्यं. गोखले (द्वारा लोकसत्ता, पुणे) यांनी. गेल्याच्या गेल्या रविवारच्या (१२ एप्रिल) लोकरंगात त्यांचा स्विस बॅंकेची 'भाकड'कथा हा अत्यंत माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व विद्वत्तापूर्ण लेख प्रसिद्ध झाला आहे. (गोखलेसरांचे बॅंकेत - स्विस नव्हे, पुण्यातल्या - खाते आहे याची कृपया नोंद घ्यावी. गैरसमज नको!)

तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, संगणकावरील माहितीच्या महाजालाच्या आधारे आपण परदेशी घटना-घडामोडींवर छानसुंदर लेख लिहू शकतो, हे आपण येथवर पाहिले. तेव्हा पाठ्यपुस्तकबाह्य उपक्रम म्हणून आपण या उन्हाळ्याच्या सुटीत असा एखादा लेख पाडावा.

तथापि तत्पूर्वी आपणांस गोखलेकृत भाषांतरमालाही अभ्यासावी लागणार आहे. त्याकरीता आपण स्विस बॅंकेची भाकडकथा हा लेख आणि हाऊ स्टफ वर्क्स या संकेतस्थळावरील एक लेख यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.

अभ्यासाच्या सोयीकरीता प्रथम आपण हाऊ स्टफ वर्क्स या संकेतस्थळावरील लेखातील काही इंग्रेजी वाक्ये घेऊ. तुम्ही मनातल्या मनात त्यांचे ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मर्राठी करा. ते झाले की लगेच स्विस बॅंकेची भाकडकथा या लेखातील वाक्यांशी ते ताडून पाहा. त्यायोगे आपणांस आपले भाषांतर योग्य की चुकीचे ते समजेल. तर आपण आता आपल्या भाषांतर कार्यशाळेस सुरुवात करू या. -
---------------------------------------------------------------------
हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
­Swiss bank accounts aren't just for millionaires, criminals or government officials trying to hide ill-gotten wealth, or celebrities protecting their assets from former spouses. They're available to anyone and lots of average people have Swiss bank accounts.

गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
स्विस बँकेत पैसे ठेवणारे केवळ कोटय़धीश, अब्जाधीश असतात असे नाही, तर बऱ्याचदा ते अब्ज-अब्जाधीश असतात. यात गुन्हेगार, अनेक देशांतले राजकारणी आणि ‘सेलिब्रेटिज’ही असतात. त्यात असंख्य अभिनेते, चित्रपट अभिनेत्री आदींचा समावेश असतो. हॉलिवूडमधल्या अनेक नट-नटय़ांचे पैसे या बँकांमध्ये आहेत. त्यामागे हेतू असा सांगण्यात येतो की, उद्या जर जोडीदाराबरोबर जमले नाही आणि घटस्फोट घ्यायची वेळ आली तर आपले सर्वच पैसे त्याच्याबरोबर वा तिच्याबरोबर जाऊ नयेत, यासाठी त्यांनी घेतलेली ती खबरदारी असते.

हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्य -
People who live in countries with unstable governments and banks in particular often turn to Swiss banks because of their security and privacy.

गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
ज्या देशांमध्ये नेहमीच अस्थिर सरकारे आहेत, अशा देशांचे राजकारणी तसेच श्रीमंत उद्योगपती यांनीही आपली अमाप संपत्ती स्विस बँकांमध्ये ठेवल्याचे सांगितले जाते.

हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Walk into the wrong Swiss bank and you'll be quickly escorted out and pointed in the direction of the bank you "should" be entering. What just happened? You've just walked into a "private" bank rather than a "retail" bank.

गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
तुम्ही कोणत्याही स्विस बॅंकेत प्रवेश केलात आणि ती जर तुमची बँक नसेल, तर तुम्हाला अतिशय सौम्य शब्दांत समजावून देऊन बाहेर काढले जाते आणि तुमची योग्य बँक तुमच्या निदर्शनास आणून देण्यात येते. ‘रिटेल’ बँकेऐवजी तुम्ही खासगी बँकेत शिरल्याचा तो परिणाम असतो.

हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Private banking refers to services provided by banks to private individuals with exceptionally large assets to work with. It's called "private" because customers receive a much more personal level of service than in mass-market retail banking. This historically exclusive service has been reserved for those with liquid assets over $1 million, although accepted deposits as low as $50,000 are not unheard of these days.

गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
दुसऱ्या प्रकारात तुम्हाला जरा खास वागणूक देण्यात येते. तर आधीच्या प्रकारात तुमच्याकडे फुटकळ ग्राहक म्हणूनच पाहिले जाते. थोडक्यात- खासगी बँकेत तुम्हाला खास दर्जाची वागणूक दिली जाते. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमची पाश्र्वभूमी कोणती आहे, असे प्रश्न तिथे विचारले जात नाहीत. दहा लाख डॉलरपेक्षा अधिक रक्कम ठेवणाऱ्यांना त्याहून चांगली- म्हणजे अतिखास वागणूक दिली जाते. एखादा ५० हजार डॉलर खासगी स्विस बँकेत ठेवायला गेलाय, असे सहसा होत नाही. ‘रिटेल’ बँकेत मात्र हा ‘बाजार’ चालतो. ही पारंपरिक बँकिंग पद्धती तिथे आजही आहे. तिथेही किमान दहा हजार डॉलरपासून पुढच्याच रकमा घेतल्या जातात.

हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Swiss law forbids bankers to disclose the existence of your account or any other information about it without your consent . in Switzerland, if a banker divulges information about a bank account without permission, immediate prosecution is begun by the Swiss public attorney. Bankers face up to six months in prison and a fine of up to 50,000 Swiss francs. The only exceptions to the Swiss banking privacy rule are criminal activities such as drug trafficking, insider trading or organized crime,

गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
‘स्विस बँक व्हेराईन’ (Schweizerischer Bankverein ) म्हणजेच स्विस बँक कॉर्पोरेशन ही अनेक बँकांची संघटना तुमच्या पैशाची व्यवस्थित काळजी घेते. या बँका तुमचा पैसा व तुमचे खाते क्रमांक गुप्त ठेवायला बांधील असतात. स्विस कायद्यानुसार या बँकांना ही गुप्तता सर्वाधिक महत्त्वाची वाटते. तुमच्या परवानगीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्या बँक खात्याविषयी कुणाला माहिती पुरवलीच, तर त्याला स्विस कायद्यान्वये अनेक महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा पैसा गंभीर गुन्ह्य़ांतला, मादक पदार्थाच्या व्यापारातला किंवा शस्त्रास्त्रांच्या विक्रीतून मिळवल्याचे सिद्ध झाल्यास अशी माहिती या कायद्याला अपवाद ठरते.

------------------------------------------------------------------

तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, आपण गोखलेकृत भाषांतरमालेचा अभ्यास येथे केला. या लेखावरून आपणांस ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मर्राठीचे महत्त्व निश्चितच लक्षात आले असेल. तेव्हा व्हा तय्यार, लिहा लेख आणि द्या झाले लोकसत्तेकडे पाठवून. कुणाला कळतेय कुठून ट्रान्स्लेट केलेय ते! कसें? (उगा रा. रा. प्रशांत दीक्षितांप्रमाणे तळटीपेत संदर्भ वा स्त्रोत देण्याची काय गरज व आवश्यकता आहे?)

(Posted by बापू आत्रंगे, दि. १७ एप्रिल २००९)

(हाऊ स्टफ वर्क्समधील लेखाची लिंक आमच्याकडे पाठविणा-या पत्रकाराचे आभार. त्यांच्या विनंतीवरून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)

उपास सोडला!  

हॅ!
गत पंधराएक दिवस अगदी हॅ म्हणजे हॅ गेले... निवडणूक वार्तापत्रांसारखे... पोकळ!
यास कारण आमची ही.

म्हणाली :
कशाला लिव्हता हो तुम्ही ते लेखबिख?.... आणि लिहायचं तं जरा चांगलं तरी लिहायचं! एरवी बरे, संपादकांचा लेखबिख छापून आल्यावर, वाचायच्या आधी एक्स्लंट आर्टिकल म्हणून एसेमेस करता! मग इथंच का तुमचा पेन असा आडव्यात शिरतो?... सारखं आपलं याला-त्याला नावं ठेवायची आणि याच्या-त्याच्या चुका शोधायच्या!... आता एक तरी पेपर ठेवलाय का तुम्ही बाकी? उद्या सकाळच्या नाय तं लोकसत्तेच्या दारी उभारायची वेळ आली, तर करतील का ते तुम्हांला रिसेप्शनपाशी तरी उभं?... दिवस कसे रिसेशनचे आहेत. पण यांना आहे का त्याचं काही??!
एवढी करदावली, एवढी करदावली, की त्या दिशी आम्ही शपथच खाल्ली रामारक्ताची, की बस्स, आजपासून ब्लॉगबिग बंद. लेखबिख बंद. पूर्ण लेखनसंन्यास. हाताची घडी तोंडावर बोट!

वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, किती कसोशीने पाळली आम्ही ही मुस्कटदाबी!
अवतीभवती इतकी गंमत चाललीय निवडणुकीची, की प्रत्येक पत्रात एकेक विनोदी सदर सुरु झाले आहे. (नाही हो, आम्ही निवडणूक वार्तापत्रांबद्दल बोलत नाही आहोत! तुमचा तसा समज होणे रास्त असले, तरी येथे आपण ख-याखु-या इनोदी सदरांबद्दल बोलत आहोत.) परंतु तरीही आम्ही आपले गप्पगप्पच राहिलो!

लोकसत्तेने या निवडणुकीपायी त्यांचा फाय-डे-वीक पुन्हा सहा दिवसांवर आणला. खरे तर निवडणूक हा नुस्ता बहाणा बरे का! फाय-डे-वीक केला, तर पत्रकारे फोर-डे-वीक एवढेच काम करू लागली म्हटल्यावर एचारवाले तरी काय करणार? हे एक जाऊ द्या. पण आमचे सुहृद संजय आवटे यांची मधल्या काळात नागपुरी बदली झाली. या बदलीच्या गुंज की गुंज सगळ्या पुण्यात उमटली. आमच्याही मोबाईली काही लघुसंदेश आले. ते शुद्ध इंग्रेजीत होते. त्यामुळे आम्हांस काही उमजले नाहीत. पण त्यात केतकर, संघ, वाद, राष्ट्रवादी असे काही काही परिचयातले शब्द होते. मलबार टेकडीवर जाऊन त्यांचा अर्थ लावून घ्यावा असे आम्हांस खूप खूप वाटले. पण तरीही आम्ही आपले चुप्पचुप्पच राहिलो!

गेले कितीएक दिवस फुडारीकडे आम्ही व औरंगाबादचे बाबूजी डोळे लावून बसलेलो. पण त्यांची आपली केवळ तारीख पे तारीख, तारीख पे तारीख! आणि तिकडे सकाळच्या कागदाचा खर्च मात्र वाढत चाललेला! फुडारीने नीट व व्यवस्थितपणे एकच तारीख दिली असती, की आम्ही अमुकअमुक दिनांकी मुंबय मुक्कामी येनार हाय वो ढुमढुमढुम.... तर सकाळला त्या तारखेच्या आधी दोन दिवस पाने परसता आली नसती का? आता बिचारे कधीपासून चार पाने एक्स्ट्राची देत आहेत. ती पाने लावण्यात मनुष्यबळाचा केवढा अपव्यय! हे अतिरिक्त काम नसते, तर बिचा-यांस शिरगणतीकरीता अधिक वेळ देता आला असता. होय वो होय. सकाळची पत्रकारे हल्ली जनगणनेच्या कामात व्यस्त आहेत. परवाच आम्ही एका बातमीदारास रंगेहात पकडला पालिकेत. हवी तर बातमी नका देऊ हो, पण एवढा एक फॉर्म भरा हो, अशी गयावया करीत होता. बिच्चारा! रेशनिंग कारकून वाटला आम्हांस त्याक्षणी तो! परंतु तरीही आम्ही हुप्पचुप्पगप्पच बसलो!

काही दिवसांपूर्वी मटाचे डेपुटी एडिटर प्रकाश अकोलकर यांस सावाना (पक्षी : सार्वजनिक वाचनालय, नाशिक) तर्फे यंदाचा बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर पुरस्कार देण्यात आला. यासारखी गोष्ट अनुल्लेखाने मारण्याची प्रथा आमच्यात आहे. त्या प्रथेचे पालन करावयाचे होते. ते एक राहून गेले. अकोलकरांना मिळालेला हा पुरस्कार सात हजाराचा होता. त्यात तेवढेच पैसे टाकून त्यांनी ती रक्कम सावानाला परत केली. तुम्हांस सांगतो, काही वर्षांपूर्वी भांडुपच्या बाल गणेश क्रीडा मंडळ रजिस्टर्डने आम्हांस गुलाबपुष्प देऊन आमचा भव्य सत्कार केला होता. ते गुलाबाचे फूल किती कसोशीने सांभाळून आम्ही घरी आणले होते. तीन दिवस स्टीलच्या ग्लासात ते होते. आणि येथे अकोलकर मिळालेले पैसेसुद्धा घरी नेत नाहीत! याचा एकच अर्थ संभवतो. मटात मंदीबिंदी काही नाही! परंतु मटातील बहुतांची अंतरे काही वेगळेच सांगत आहेत. खरे तर त्यांना मनःपूर्वक नीट सांगताही येत नाहीये आणि मनःपूर्वक सहनही होत नाहीये. आम्हांस लाख वाटले, की उठावे, साबडेंना भेटावे, नानलांना विचारावे व मग निचितीने लिहावे. परंतु तरीही आम्ही हुप्पचुप्पगप्पगप्पच राहिलो!

परंतु किती काळ आम्ही असे मौनमुके राहणार?
किती काळ ही जठरातील एसिडिटी सहन करणार?
आता आम्हांस बोललेच पाहिजे. उपास सोडलाच पाहिजे!
आजपासून सोडला उपास!

(Posted by बापू आत्रंगे, दि. १९ एप्रिल २००९)