"सद्यकालीन सामाजिक परिस्थितीचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता पत्रकारिता अधिक जबाबदार होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. वृत्तपत्रांच्या व विशेषतः दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या जाणीवेने काम केले पाहिजे, की आपल्या पत्रकारितेने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरण प्रदुषित होणार नाही. या जबाबदारीचे भान त्यांनी न बाळगल्यास भावी पिढ्या त्यांस कदापि माफ करणार नाहीत. निदान कविवर्य मंगेश पाडगावकर तर त्यांस कधीही क्षमा करणार नाहीत...."

समग्र तंद्री लावून, एकेक शब्द प्रचंड विचारपूर्वक मेळवित, अतिशय गांभीर्याने आमचे लेखनकर्म सुरु होते आणि अचानक, "बाय गो, काय झॅक लिहताय वो तुम्ही बापूराव!" असे कौतुकमयी उद्गार आमच्या कानी पडले.
ही अर्थातच आमची ही.
"काय पल्लेदार लिहिलंय हो तुम्ही! आणि विचारही किती टोकदार! जणू काही अग्रलेखच. अहो, मटा, नाहीतर लोकसत्तेकडंच हा लेख पाठवा तुम्ही. केवढी खळबळ उडेल..." ही भल्तीच खुश झाली होती आमच्या लेखनावर. क्षणभर वाटले, की आता ही आमचे दोन्ही गाल चिमटीत धरून आम्हांस गुगलीवुगलीमुशच करणार! (पण नाही केले... वयपरत्वे चेहरा रखरखीत झालाय. पॉंड्स वापरायला हवे!)

"पण बापूराव, मंगेश पाडगावकरांचं काय मधेच काढलं हे?" तिने विचारले.
तिला असा प्रश्न पडणे साहजिकच होते. वाचन कमी पडते ना! पक्की उपसंपादक शोभते या बाबतीत ती! आमचे मात्र तसे नाही. आम्ही पत्रकार असल्याने आमचा प्रचंड व्यासंग आहे. खूप वाचतो आम्ही. म्हणजे लोकसत्ता, मटा, पुढारी, लोकमत आणि सकाळ! तिने सकाळ तारीख तीन व चार फेब्रुवारी वीसशेदहा, वर्ष सोळावे, अंक सात व आठ वाचला असता, तर तिच्या लक्षात आले असते, की रा. रा. पाडगावकारांचे हे प्रकरण नेमके काय आहे ते.

मुळात या प्रकरणाचे मूळ आहे ते दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये.
खरे तर त्याचे मूळ आहे पाडगावकरांमध्ये.

गेल्या आठवड्यात ते बालकुमार साहित्य संमेलनासाठी संगमनेरला गेले होते. तेथे सहजच बोलता बोलता त्यांनी पद्मपुरस्कारांचा विषय काढला. ते म्हणाले, की मला (पक्षी : पाडगावकरांना) खूप पुरस्कार मिळाले, पण पद्म पुरस्कार नाही मिळाला. ते (पक्षी : पद्म) पुरस्कार कोणाला कसे मिळतात हे मला माहित आहे.
पाडगावकर हे जे काही म्हणाले, त्याचा आमच्या दूरचित्रवाणीच्या पत्रकारांनी केला पराचा कावळा. त्यांनी एकदम बूम मचालेच केले व दिल्या ब्रेकिंग न्यूजा, की पाडगावकरांनी पद्मपुरस्कार न मिळाल्याबद्दल व्यक्त केली खंत.
झाले. दिवसभर या बातम्या चालल्या. त्याने मराठी साहित्यविश्वाच्या इवल्याशा कोपात मोठे वादळ उठले.
मग दिवस संपला. बातम्या संपल्या. वादळही शमले. झाले.
म्हणजे नेहमीप्रमाणेच झाले.
आता हे सर्व आमच्या हिला कसे माहित असणार. कारण की ती ना आना इस देसमे लाडो व नंतर उतरनमध्ये व्यस्त होती. वृत्तवाहिन्याही मनोरंजक असतात हे तिला कुठले कळायला!

पण आम्ही ते सर्व मनःपूर्वक पाहिले होते. ते पाहून आम्हांस एवढेच जाणवले, की वाहिन्यांनी रा. रा. मंगूआजोबांच्या बोलगाण्याचे नाहक रडगाणे केले. त्या बातम्या पाहून कोणासही वाटावे, की जणू काही मंगूअण्णा मला पद्म हवे म्हणून हातपाय झाडत रडत आहेत. वस्तुतः ती सर्व बूमशाकालाकाबूम जादू होती. तीच ही जादू, जी आज शाहरुखखानास भोवते आहे. जी शशी थरूरांस भोवली होती.
आता दूरचित्रवाणीच्या नियमांनुसार एवढ्यावरच हे प्रकरण संपणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. त्याचेही एक मोठे सुरस उपकथानक आहे, जे सुरु होते सकाळच्या पानांवरून.

त्याचे असे झाले,
की मंगूअण्णांचे, हे (पक्षी : पद्म) पुरस्कार कसे मिळतात हे मला माहित आहे, या विधानाने कोणास ठाऊक कसा पण अनेकांचा इज्जत पापड मोडला. आमचे पवारांच्या शिवारातले राजकवी व रानकवी रा. रा. ना. धों. महानोर यांना तर या विधानाने बुब्बुळे जळली, जळले चंद्र माझे अशीच काही स्थिती आली. उग्र रागेजले ते. त्या भरात त्यांनी तरातरा वावरात जाऊन रागातल्या कविता लिहायला घेतल्या. पण मग सकाळचे मुख्यसंपादक व साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष रा. रा. उत्तमराव कांबळे त्यांस म्हणाले, की आमच्या येथे आम्ही फक्त विडंबन कविताच प्रसिद्ध करतो. तेव्हा मग कविराजांनी अखेर एक लेख लिहिला व तो सकाळपत्री धाडून दिला.

वाचकहो, काय बरे होते या लेखात?
या लेखाचे शीर्षक होते - लाचावले मन, लागलीसे गोडी
या लेखात महानोरांनी पाडगावकरांवर असूडच ओढले आहेत. त्यांच्या म्हणण्याचा एकतृतीयांश सारांश असा (कंसातील विधाने आम्हां पामरांची) :

पद्मपुरस्कार मिळालेले लोक किती लायक आहेत, हे मला माहित आहे अशी खदखद पाडगावकरांनी व्यक्त केली. (आम्हांस वाटले, या वाक्यावर रा. रा. सैफअली खान प्रतिक्रिया देईल. परंतु ते तर पद्मपुरस्कारप्राप्त महानोरांना लागले! असे का बरे झाले? प्रश्नच आहे.) लोकांनी पाडगावकरांना पद्मपुरस्कार मिळावा म्हणून म्हटलं, तर ते आनंददायी आहे. पण आपणच आपली वखवखलेली भूक अशा पद्धतीने मांडणं हे आपणच आपल्याला खाली आणण्यासारखं, अहंकारी आहे. सामान्य माणसंसुद्धा आज बोलताना शहाणपण ठेवून बोलतात. (मंगूअण्णा, समझदार को इशारा काफी है!) पाडगावकर बोलले ते औचित्याला धरून खासच नाही. हे मला फोन करणा-यांचं, चॅनल्स आणि पेपर्सचं म्हणणं आहे. मला सांगतात, तुम्ही यावर लिहायला हवं बुवा! (ठीक आहे. त्या पेपरांत एक सकाळ आहे हे समजलं. बाकीचे कोण?) साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळवतानासुद्धा पाडगावकरांनी लाचावलेपण (पक्षी : हावरटपणा) केले. इतरांच्या निवडून आलेल्या अध्यक्षपदाला जोगवा व भीक म्हणावी याच्याइतकी घसरण कुणाची मी पाहिली नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पाडगावकर सर्वत्र फिरत राहिले. ऐकायला येत नसलं, तरी मुलाखतकार बोलतात आणि हे तिसरंच सांगताहेत हेही हास्यास्पद रसिकांनी पाहिलं. (हा पाडगावकरांच्या बहिरेपणाचा उल्लेख किती बरे औचित्यपूर्ण!)
पुन्हा यात रा. रा. महानोरांनी, पाडगावकर खूप पैसे मागतात, अतिरिक्त सोयी आणि व्यवस्था (व्यवस्था या शब्दाला कोट घालून त्यातून दुसराच अर्थ निघेल याची योग्य व्यवस्था कविराजांनी केलेली आहे. कविराज, तुम्हांसही पत्रकारितेतील युक्त्या जमतात बरे का!) मागतात, हे आयोजक रसिकांना पेलवत नाही हो, असाही सूर लावलेला आहे, तोही किती बरे औचित्यपूर्ण म्हणावा!!

तर हा एकूणच किती बरे औचित्यपूर्ण लेख मराठी वाङ्मयाच्या इतिहासात शेतक-याचा असूड अर्थात कविराजाचा सूड म्हणून ओळखला जाईल, याबाबत आम्हांस मुळीच शंका नाही! हा लेख पहिल्या पानी अचानक प्रसिद्ध करून सकाळकारांनी मोठीच वाङ्मयसेवा केलेली आहे. कौतिकराव ठाले-पाटील यांनी याची योग्य ती कदर करावी, ही नम्र विनंती. (सांगायची बात म्हणजे, सकाळमध्ये गार्सीयाचा पुनर्जन्म झालेला आहे. त्या गार्सीयाच्याच काय, पण कोणाच्याही लेऔटानुसार लेखात इंट्रोबिंट्रो असावा लागतो. परंतु महानोरांच्या या लेखाला तसा कोणताही आगापीछा नव्हता. शेंडाबुडखा नव्हता. (पाहा). तो असा अधांतरीच अँकरला होता. हे एक नवलच म्हणावयाचे! फार घाईत निर्णय झाला होता काय त्याचा सकाळवाले?)

हे संपूर्ण महाकाव्य आम्ही आमच्या हिला सांगितले. किंतु व्यासंगाअभावी तिला ते समजलेच नाही. ती विचारती झालीच, की पाडगावकर बोलले. महानोरांनी लिहिले. सकाळने छापले. पण मग बापूराव, तुम्ही का म्हणून कातावले?
आत्ता यावर आम्ही काय कपाळ बोलणार?
या सगळ्या प्रकरणावर दस्तुरखुद्द पाडगावकरसुद्धा काही बोलले नाहीत.
सकाळच्या प्रतिनिधीने त्यांना खुलासा विचारला, तर ते म्हणाले, की मी निरुत्तर झालो आहे.
बरोबरच आहे.

प्रसारमाध्यमे टीआरपी, खप, याही पलीकडे वैयक्तिक रागलोभ, हितसंबंध, गटबाजी या प्रेरणांनीही व अनेकदा या प्रेरणांनीच कार्यरत असतात, हे जोवर त्यांना उमगणार नाही, तोवर पाडगावकरांना या प्रश्नाचं उत्तर देताच येणार नाही.

(Posted by बापू आत्रंगे, दि. ५ फेब्रुवारी २०१०)

"च्यामारी, त्या अन्वरसायबांनी हे काय झेंगाटच करुन ठेवल्यालं हाये. आता हे आसं पुरस्कार देयाची काय आवश्यकता व्हती काय? कंच्या पक्षानं आजूनपोतर कोन्लातरी पुरस्कार दिल्यालं हायेत काय? मंग हेन्लाच काय ही आवदसा आठावली म्हन्तो मी!... नाय नाय, तुमाला एवडीच हाऊस आसल, तं मी म्हन्तो कराना पत्रकारांना पुरस्कृत. नाय कोन म्हन्तो? सम्द्याच पक्षांचं पुरस्कृत पत्रकार आसत्यात! एम्बेडेड जर्नालिस्ट!! पन हे पत्रकारांना पुरस्कार देयाचं म्हंजे खूळच नव्हं का?... आता पुढचं सारं कोनी निस्तारायचं?... टकलेसायेब, आता तुमी न् हेमराज शहाचं बगा काय आनि कसं करायचं त्ये... मी काय ह्येच्यात नाही..."
ज्येष्ठ शेतीतज्ञ व संपादक रा. रा. सुधीरभाऊ भोंगळे यांची आज एकंदरच वैतागवाडी झाली होती.
त्यांचा मुद्दा तसा रास्तच होता. त्यामुळे त्यांची तणतणही रास्तच होती.

तर त्याचे झाले असे होते, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस जे की तारिक अन्वर साहेब आहेत, ते राष्ट्रवादी संकल्प (मूल्य रु. ३ फक्त) या हिंदी साप्ताहिकाचे संपादकसुद्धा आहेत. (जे हत्ते कालाचे ठायी संपादकाच्या आसनावर आरुढ झालेले असे महापुरुष पाहिले, की तुम्हांस सांगतो वाचकहो, आमच्याही महत्त्वाकांक्षांचे पंख असे फडफडू लागतात!)
तर या तारिकमियॉंनी यंदा आपल्या राष्ट्रवादी संकल्पतर्फे पत्रकारांस पुरस्कार देण्याचा संकल्प केला व तडीसही नेला व रा. रा. दिनकर रायकर (संपादक, लोकमत), रा. रा. पद्मभूषण देशपांडे (कार्यकारी संपादक (नियोजित), मुंबै सकाळ), प्रकाश जोशी (टैम्सॉफिंडिया) आदी काही मातब्बरांस पुरस्कार जाहीर केले.

त्याची बातमी वाचून म-हाटी पत्रसृष्टीत मोठीच खळबळ उडाली.
अनेकांस नवल वाटले, अनेकांस हसू फुटले, तर अनेकांचे उदरशूल उठले.
म्हणजे नेहमीप्रमाणेच झाले!
अर्थात कोणास काहीही वाटो, तारिकमियॉं व आमचे मन जाणते, की हे पुरस्कार धादांत राजकारणविरहित आहेत!
अगर वैसा नही होता, तो तुम सांगो, दिनकरभाऊको मिलता क्या राष्ट्रवादीका पुरस्कार? वो लोकमतमे है. हौर लोकमत याने के कांग्रेसका पेपर ऐसा लोग बोलते है. फिर भी उनको दिया के नही राष्ट्रवादीने पुरस्कार? फिर? उसमे कायका आया राजकारन? क्यूं मियॉं, बराबर बोला ना?
उलट त्यात काही असेलच, तर निखळ, नितळ काव्य आहे!
पद्मभूषण देशपांडे यांस साक्षात् छगनराव भुजबळजी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पुरस्कार मिळणार, यात काव्य नाही? आहेच!!

पण सुधीरभाऊ तणतणत होते, ते त्यामुळेच.
म्हणजे रायकरादींना पुरस्कार दिले म्हणून नव्हे!
तर पुरस्कार दिले म्हणून!!
कारण की अखेर प्रश्न पत्रकारितेच्या मूल्यांचा होता, धोरणांचा होता.
नाही म्हटले, तरी सुधीरभाऊंवरील सकाळ शाळेचे संस्कार अजूनही कायम आहेत व त्या संस्कारांनुसार पत्रकार हा निःपक्षपातीच असला पाहिजे. म्हणजे खरे तर दिसला पाहिजे! (तो वास्तविक निःपक्षपाती असला, तर पंचाईतच! उद्या तो राष्ट्रवादीच्या विरोधात बातम्या द्यायचा, म्हणजे झाली का पंचाईत!!) तेव्हा पत्रकारावर असे पक्षीय पुरस्काराचे ठप्पे मारता कामा नयेत.
बरे त्यात आणखी एक उपपंचाईत म्हणजे, सुधीरभाऊ पडले राष्ट्रवादीच्या मराठी मासिकाचे संपादक. उद्या त्यांच्यावर गावागावातनं दबाव यायचा, आम्हालाबी पुरस्कार द्या म्हणून. हे असे गावगन्ना पुरस्कार द्यायचे हे काय इस्त्राईलची टूर काढण्याइतके सोपे आहे का?

इकडे राष्ट्रवादी कार्यालयात सुधीरभाऊंची अशी त-हा, तर तिकडे कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाई, सपा, बसपामध्ये वेगळाच गोंधळ सुरु होता. सगळ्या पक्षांवर सकाळपासून जनमताचा (म्हणजे पत्रकारांचाच! जनमत म्हणजे दुसरे कोणाचे मत असते?) दबाब वाढत चालला होता. पक्षीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करा, या मागणीने जोर धरला होता.
ती मागणीही तशी रास्तच होती.
इतकी वर्षे पक्षाची तळी उचलून धरल्यानंतर पुरस्काराचे खोबरे नको मिळायला?
आम्ही म्हणतो, मिळायलाच हवे. काय हरकत आहे?
असो.

या मागणीचे काय होईल ते काही आम्हांस माहित नाही.
पण काय सांगावे, पुढे-मागे पक्षीय पुरस्कारांचे जाहीर पेवही फुटेल!!

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
तसे झालेच, तर अंधारातले उजेडात आले एवढेच आपण म्हणायचे. दुसरे काय?

(Posted by बापू आत्रंगे, ४ फेब्रु. २०१०)

आम्ही आज दिनदर्शिकेचे शेवटचे पान उलटले.
मराठी शुभेच्छांचे मेल केले.
ट्विटरवर ट्विट केले.
मित्र-मैत्रिणींना एसेमेस केले.
(आलेले एसेमेस अथपासून इतिपर्यंत वाचू म्हटले, पण ते कोण करतो? आम्हांलाही नाही जमले!)
हे आवर्जून सांगावयास हवे, की काही जणांचे आम्ही तोंडीसुद्धा नववर्षाभिनंदन केले!
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चित्रपट नट-नट्यांचे रेकॉर्ड डान्सचे कार्यक्रम पाहिले.
हे सगळे केले.
व येणेप्रकारे साल दोन हजार नऊ संपले.

कसे गेले हे वर्ष?
ठीकच म्हणायचे. खरे तर चांगलेच.
(नाही तरी गेलेला काळ कालांतराने छानच वाटतो.)
या वर्षाची सुरुवात तर अजूनही स्मरते आहे.
पत्रसृष्टीचा तो सुवर्णकाळच होता जणू.
नवी पत्रे, नव्या वाहिन्या आल्या होत्या.
पत्रकारू-नारुंना बाजारात भाव होता.
वेतनाचा निर्देशांक उंच उंच फडफडत होता.

पण मध्येच मंदीबाईचा फेरा आला आणि सगळेच रोडावले.
वेतनचिठ्ठ्या आकसल्या, नोक-या धोक्यात आल्या.
जे गेल्यास गतप्रभ झणी होतील तारांगणे, असे वाटत होते
अशा भल्या भल्यांनाही नारळ मिळाले.
त्यात सुमारांचे फावले.
तरीही मीडियाचक्र सुरुच राहिले.
रोजची वृत्तपत्रे निघतच राहिली,
चॅनेले दळणे दळतच राहिली...
(कुणाच्या काचाही फुटत राहिल्या...!)

कुणी म्हटले, बिघडले काहीच नाही.
आणि असे म्हणता म्हणता
वृत्तपत्र कार्यालयांची वृत्तविक्री केंद्रे कधी झाली
ते कुणाला कळलेच नाही.

वास्तविक आमच्यातला हा ऐब जुनाटच,
पण निवडणुकीचे आभाळ आले
आणि नैतिकतेला पोखरणारा आमचा ढोंगदमा
बघता बघता उफाळून आला.

या वर्षाने आमचे हे आजारपण वेशीवर टांगले.
बरे झाले,
हे झाले ते बरेच झाले...
आमचे नागवेपण आम्हांस कचकचून कळून आले.

आता वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
नव्या वर्षात नवे कपडे शिवायचा संकल्प करू या!
मित्रांनो,
नव्या वर्षात जरा कपडे घालूनच फिरू या!!
तथास्तु.

(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ डिसें. २००९)

शुभेच्छा!

आपणांस, आपल्या कुटुंबीयांस व इष्ट मित्र-मैत्रिणींस नव वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
येणारे सगळे दिवस आपणांस सॉलिड सुखाचे, गच्च समाधानाचे आणि रसरशीत आनंदाचे जावोत!!
- बापू आत्रंगे, चांगदेव पाटील, अरुंधती पुणेकर
आणि समस्त ए-सिडिक कम्युनिकेशन्स परिवार.

"सर, जय म्हाराष्ट्र."
'जय म्हाराष्ट्र' हा महाराष्ट्रातील नमस्काराचा सध्या लयास जाण्याच्या मार्गावर असलेला एक प्रकार आहे. तो आम्ही केला. आमचा आवाज कानी पडताच सरांनी वर पाहिले व त्यांच्या चेह-यावर एकदम स्मिताचे ताटवेच फुलले.

"अरे या या या... अलभ्य लाभ, अलभ्य लाभ... आज आमची कशी आठवण झाली?... या या बसा..."
सरांच्या या स्वागताने आम्ही आश्चर्यचकितच झालो.

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, तुम्हांस सांगतो -
एकवेळ महामहिम डॉ. अरुण टिकेकर यांच्या हातात सिगारेटच्या नळकांडीऐवजी बांबूची बासरी दिसली असती, नाशिकचे पत्रपंडित रा. रा. उत्तमराव कांबळे एखाद्या कनिष्ठ सहका-याचे म्हणणे समजुतीने ऐकून घेत असल्याचे दिसले असते, मटानायक रा. रा. अप्पा तथा अशोकजी पानवलकर यांनी मुंटाकडे पाहून समाधानाने मान डोलावल्याचे दिसले असते, तरी आमचे रिश्टर स्केल ढिम्म हलले नसते!
पण सरांनी आमचे असे भरभरून स्वागत करावे?
आमच्या दोन्ही मेंदूत एकसमयावच्छेदेकरून भूकंप झाल्यासारखे आम्हांस वाटले.
हे म्हणजे वाघाच्या गुहेतून डरकाळीऐवजी मऊशार म्यांऊ ऐकू यावे, तसे झाले.
मनीं म्हटले, आपण चुकीच्या जागी तर नाही ना आलो?
पण तसे काही नव्हते. सरांबद्दलचे आमचेच समज गैर होते! कोण म्हणतो सर उद्धट व गर्विष्ठ आहेत?

"काय चहा घेणार की कॉफी? त्या पेक्षा असं करा, आधी शिववडाच घ्या...," असे म्हणत त्यांनी परस्पर शिववडा आणि कॉफीची ऑर्डरही दिली.

मनीं म्हटले, बापरे! आपल्यासारख्या य:कश्चित व अनोळखी मनुष्यप्राण्याचे येथे इतक्या अगत्याने व आत्मियतेने व उत्साहाने हार्दिक स्वागत होते, तर ओळखीच्यांचे कसे होत असेल? हा म्हणजे मोठाच धक्का होता. ही वृत्तपत्राच्या कार्यालयातील संपादकाची केबिन आहे की भूकंपप्रवण क्षेत्र?

"बोला, काय काम काढलेत?... काही समस्या आहेत का? बिल्डरने त्रास दिलाय, पोलिस छळ करताहेत...? नाही म्हणजे, तसे काही असेल, तर सॉरी हं! त्याचे काय आहे हल्ली आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्याचे बंद केलेय ना..."
हे बोलताना सरांच्या चेह-यावर तंतोतंत वेदनेचे भाव दिसत होते. कदाचित हा आमचा दृष्टिदोषही असेल, पण त्यांच्या चष्म्याआडच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळल्याचेही आम्हांस दिसले.

"सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्याचे बंद केलेय?".. आम्ही विचारायचे म्हणून विचारले.
ही लकब आम्ही रा. रा. निखिल वागळे यांच्याकडून ढापली आहे. समोरचा जे बोलतो, त्यातील अखेरचे वाक्य आपण उचलायचे आणि लगेच आपले बोलणे सुरू करायचे. (असो. येथे निखिल वागळेंचे नाव मनातल्या मनातही उच्चारणे नको. उगाच काचा फुटायच्या! सरांना त्या नावाची ऍलर्जी आहे!)

"हो ना. बंद करावे लागले. लोकांच्या समस्यांतली सच्चाई मांडायची, तर तेवढा वेळ हवा ना. हल्ली नाही हो तेवढा वेळ मिळत," सर म्हणाले.

सरांचे हे बरीक खरे होते. वेळ! सर म्हणजे पक्के पंक्चुअल! अग्रलेख देणार असतील, तर मग सर लोकसभेत असो वा अमेरिकेत. ठरल्यावेळी तो देणार म्हणजे देणारच. रविवारच्या सदराचेही असेच. वादळ येवो, भूकंप येवो, पूर येवो की निवडणुकीत पक्षाचा पार धुव्वा उडो... डेडलाईन कधी चुकणार नाही.

"खरे आहे तुमचे. एवढा व्याप आहे तुमचा. संपादन करायचे, लोकांचे प्रतिनिधित्वही करायचे आणि वर लेखनही करायचे म्हणजे तारेवरची कसरतच ती!" आम्ही सरांच्या दुःखाप्रती सहानुभूती दर्शविली. अशावेळी आपल्याकडे दाखवण्यासारखे अन्य काय असते हो!

"पण ही कसरत करावीच लागते!" सरांनी एक तथ्य व्यक्त केले.
हे बोलताना त्यांचे मन भूतकाळात गेल्यासारखे दिसत होते. बहुधा अलीकडेच आपण मराठी माणसांविषयी लिहिलेला लेख व नंतर त्यातील मते फिरवण्यासाठी करावी लागणारी कसरत त्यांस दृगोचर होत असावी.

"पण काही म्हणा सर, तुमच्या लेखनातील धार मात्र अद्याप कायम आहे."
"त्याचाच त्रास होतो हो हल्ली."
"हो, ब-याच केसेस लागल्या असतील नाही!"
आम्ही पुन्हा सरांच्या दुःखाप्रती सहानुभूती दर्शविली. या बदनामीच्या केसेस म्हणजे सिंदबादच्या पाठीवरच्या म्हातारीसारख्या असतात. उतरता उतरत नाहीत! संपादकाची खुर्ची जाते, पण केसेस मात्र राहतात!!

"केसेसचे काही नाही हो इतके. पण लोक आमच्या भाषेला नावे ठेवतात, त्याचा मोठा त्रास होतो. पण लिहावे लागते ना तसे. आता आम्हांलाही ते सगळे पटतेच असे नाही..."
"काय म्हणता काय सर? तुम्हांला तुमची तशी भाषा आवडत नाही?" आम्ही तीनताड उडायचे तेवढे राहिलो होतो!
"कुणाला आवडेल हो? असे शिवराळ, अभद्र लिहायचे, लोकांच्या आडनावांची मोडतोड करून घाणेरडी नावे ठेवायची, आपल्याच व्यवसायबंधूंना नतद्रष्ट, पोटावळे, गांडुळे, साप अशी शिविगाळ करायची, हे का वृत्तपत्रीय लेखनाला शोभेलसे आहे? काही तरी सभ्यतेच्या मर्यादा पाहिजेतच ना लेखनाला? तुम्हांला सांगतो, शिवरायांच्या काळात कोणी असं लिहिलं असतं, तर महाराजांनी हात कलम केले असते त्या कलमनवीसाचे!..." ऍसबेस्टॉसच्या पत्र्यावर ताडताड गारा पडाव्यात तसे सर बोलत होते.
आणि आम्ही धक्का बसण्यापलीकडे गेलो होतो!

तुम्हांस सांगतो -
उद्या रोहिडेश्वराच्या पिंडीवर उजव्या हाताची करंगळी कापून तमाम पत्रमालक व संपादकांनी शपथ जरी घेतली ना, की पेपर खपो वा न खपो, पत्रकारितेचे पॅकेज करून विकणार नाही, तरी आता यापुढे आम्हांस धक्का बसणार नाही!!

सरांच्या ताडताड गारा अजून कोसळतच होत्या, "एकवेळ अशी भाषा ठीक आहे... पण कुणाला माफिया म्हणायचे, कुणाला गद्दार म्हणायचे, कुणाला राष्ट्रद्रोही म्हणायचे... हे योग्य आहे का? नाही, मला सांगा तुम्ही, आपण न्यायाधीश का आहोत?"

आतापावेतो आमच्या सान व थोर अशा दोन्ही मेंदूची शंभर शकले होऊन आमच्याच पायाशी पडली आहेत, असा भास आम्हांस होवू लागला होता.
आम्ही काही समजण्याच्या पलीकडे गेलो होतो.

"पण सर, तुमच्या लेखनात तर हे सगळे असेच असते ना! मग?"
"तेच तर सांगतोय मी. लिहावं लागतं हो... पेपर चालवायचाय, पक्ष चालवायचाय, लिहावं लागतं असं. आता आम्ही काही खुन्नस ठेवून नाही लिहित... पण लिहावं लागतं..."
"पण एवढा त्रास होत असेल, तर तुम्ही दुसरे शब्द का वापरत नाही? म्हणजे उदाहरणार्थ हे बघा, या येथे लिहिलेय, वटवटवागळे, हे पाहा, येथे लिहिलेय, ना-या... याऐवजी जरा वेगळे शब्द नसते का वापरता आले?"
"येतील ना वापरता! वापरता येतील ना! तुम्ही सुचवा! कोणते शब्द वापरु?"
सरांनी ताडकन् विचारले व आमची वाचाच गेली.

सरांची ही नेहमीचीच सवय. एखाद्या उपसंपादकाने एखाद्या शब्दावर आक्षेप घेतला, की सर लगेच म्हणणार, ठीक आहे. तुम्ही सुचवा!
आता सरांना कोण कशाला सुचवायला जाईल?
नाही म्हणजे, आपण कितीही भाषाप्रभू असलो, साक्षात् संपादक असलो, (खुलासा : मराठीतील प्रत्येक संपादक हा भाषाप्रभू असतो, असा त्यांचा समज असतो, म्हणून येथे येणेप्रकारे उल्लेख केला आहे. - संपादक)... तर, आपण कितीही भाषाप्रभू असलो, साक्षात् संपादक असलो, तरी वटवटवागळे या शब्दाला कोणता सभ्य प्रतिशब्द देणार हो?

आम्ही गप्पच राहिलो.
तेव्हा सरच म्हणाले, "असे आहे सगळे. आमच्या भाषेला सगळे नावे ठेवतात. परंतु या शब्दांना प्रतिशब्द सुचवा म्हटले, की गप्प बसतात. खरेतर या शब्दांना प्रतिशब्द गुद्दा हाच असू शकतो. पण तो वापरला तरी लोक आम्हांस नावे ठेवतात. अशा परिस्थितीत आमच्यासारख्या रोखठोक पत्रकाराने लिहायचे तरी कसे मग?"

सरांची ही समस्या रास्तच होती!
आम्हांला ती तंतोतंत पटली आणि आम्ही ठरविले, भले ही अवघ्या विश्वाने सरांच्या व त्यांच्या वृत्तपत्रातील भाषेला नावे ठेवली, तरी आपण मात्र तसे कदापि करायचे नाही!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २९ डिसें. २००९)

आम्ही एक सर्वसामान्य अदनासे पत्रकारु आहोत!
आता रा. रा. रोखठोककार संजयजी राऊत आम्हांस पोटावळे, बोरुबहाद्दर आदी नामविशेषांनी संबोधतात. परंतु तो भाग वेगळा!
अखेरीस नावे ठेवणारास काय, ते कशासही नावे ठेवतात! काही काही पत्रकारू नाही का संजयजींना हल्ली केवळ ठोककार म्हणून संबोधतात?
आणि आम्हांस सांगा, पोटावळे वा बोरुबहाद्दर असणे हा काय ताजीरातेहिंद दफा तीनसोदोचा गुन्हा आहे काय?
तेव्हा आम्ही एक सर्वसामान्य, वेतनचिठ्ठीवर जगणारे पत्रकारु आहोत हे मान्य करताना आम्हांस कोणत्याही दर्जाची लाज वाटत नाही.
किंतु याचा अर्थ असा नव्हे, की आम्हांस मान व कणा नाही!
(आता त्यांस जरा स्पॉंडिलायटीस झालेला आहे. मान कोठेही तुकते, कणा कोठेही वाकतो, परंतु त्यासच नव्हे का व्यावसायिकता म्हणतात टैम्सवाले?)

तर मुद्दा असा, की आम्हांसही स्वाभिमान आहे. भले आम्ही केवळ पत्रक-कारू असो, भले आम्ही केवळ पानलावे असू, परंतु तरीही आमच्या व्यवसायाबद्दल आम्हांस पुरेपूर आदर आहे. आणि म्हणूनच रा. रा. विजयराव कुवळेकरांच्या भाषणाने आमच्या तळपायीची आग मस्तकास गेली आहे.
पायीच्या नखापासून मस्तकीच्या शिखेपर्यंत आम्ही संतापाने गदगदलो आहोत.
म्हणे ज्यास लिहिता येत नाही, तो संपादक होतो!
रा. रा. विजयराव, तुमच्या या एका विधानाने आम्ही किती दुखावलो आहोत याचा तुम्हांस आपला काही अंदाज? (विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही, असे आमुचे खरे गझलनवाज सुरेशभट्ट म्हणाले होते, ते अशावेळी किती खरे वाटते नाही? सकाळमध्ये याची साक्ष देणारे अनेक पत्रकारू अजूनही आहेत! अजूनही म्हणजे आत्ता या क्षणापर्यंत तरी. पुढच्या क्षणी ते असतील की नाही, याचा भरोसा देण्यास आम्ही बांधील नाही, याची क्रिपया नोंद घ्यावी.)

वस्तुतः रा. रा. विजयराव हे जुनेजाणते पत्रकार. सकाळसारख्या मातब्बर (म्हणजे तेव्हाच्या.... जेव्हा कुवळेकर होते तेव्हाच्या... जेव्हा संपादक हे युसलेस नव्हते तेव्हाच्या...) संस्थेचे ते मुख्य संपादक होते. आता ते पुणे विभागीय माहिती आयुक्त आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठांना अशी जीभ उचलून टाळ्याला लावणे हे शोभले का? कोणत्या माहितीनिशी ते असे बोलले? कोणत्या अधिकारात ते असे बोलले?
आम्ही तर म्हणतो, ते माहितीच्या अनाधिकारातच बोलले!
अन्यथा त्यांनी हे सिद्ध करून द्यावे, की ज्यास लिहिता येत नाही, तो संपादक होतो.

आम्ही त्यांस अनावृत व खुले आव्हान देतो, की त्यांनी हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाविल्यास आम्ही वाट्टेल ते करण्यास तय्यार आहोत.
हवे, तर आम्ही आत्ता येथे स्टैंपपेपरावर लिहून देण्यास तय्यार आहोत, की लिहिता न येणारा संपादक या महाराष्ट्रदेशी कोठेही आढळून आल्यास, आम्ही एक वर्ष, म्हणजे तब्बल ३६५ दिवस (सीएल धरून) कोणत्याही पत्रकार परिषदेत अन्नावर तुटून पडणार नाही, नवर्षाच्या डाय-या व क्यालेंडरांसाठी वखवख करणार नाही, गिफ्टांसाठी पीआर लोकांच्या मागे लागणार नाही, संस्थेच्या कोणत्याही (उदा. रद्दीविक्री, भूखंड ते पुस्तकखरेदी आदी) वेव्हारात कमिशन खाणार नाही!

किंतु व परंतु आम्हांस हे पक्के व ठाम माहित आहे, की मराठी वृत्तपत्रांतील एकूणेक संपादकास लिहिता येते!
हे आम्ही कोठल्याही ऐकीव व सांगोवांगी माहितीवरून बोलत नाही आहोत, याची खात्री बाळगा. कारण, की अनेक संपादकांच्या खमिसाच्या खिशास पेन असल्याचे आम्ही आमुच्या या या चर्मचक्षुंनी पाहिलेले आहे!
आणि म्हणतातच ना, यत्र पेन तत्र लेखन! मग?

रा. रा. कुवळेकरांना हे तत्त्व मान्य नसेल, तर आपण तमाम संपादकांची लेखी परीक्षा घेऊ शकतो. तसा अनेक संपादकांस पेपर सोडविण्याचा वा पेपर सोडण्याचा अनुभव आहेच. तेव्हा त्यांस पेपर देणे काही कठीण जाणार नाही. हवे तर त्यांच्यासाठी प्रश्नपत्रिका काढण्याची जबाबदारी आपण संपादक परिषदेकडे देऊ या. (म्हणजे मग आमच्या यशवंतराव, मधुकररावादी ज्येष्ठांना संपादक परिषदेवर काही तरी जबाबदारी आल्याचे व वर्षात पुरस्कार देण्यापलीकडे काही तरी काम केल्याचे समाधान मिळेल. शिवाय फोटु काढण्याची एक संधीही लाभेल!)

वस्तुतः हा व्याप व उपद्व्याप करण्याचे काहीही कारण नाही. आमचे हे बोलणे अनेकांना पत्रमालकाच्या ढंगाचे वाटेल! परंतु आम्ही म्हणतो तेच खरे आहे! संपादकांना लिहिता येते (पूर्णविराम!)
रा. रा. कुमार केतकर, रा. रा. अशोक पानवलकर, रा. रा. भारतकुमार राऊत, रा. रा. संजय राऊत यांसारख्या संपादकांचे सोडून द्या. त्यांस अन्य उद्योग नसल्याने ते लेखनकामाठी करतात, असे म्हणता येईल. परंतु अन्य उद्योगी संपादकही लिहितात. ते अहवाल लिहितात, ते हिशेब लिहितात (कशाचे म्हणजे? पेड न्यूजचे नव्हे. ते काम संपादकांचे नाही. वाह्यात प्रश्न विचारु नका.), ते मेमो लिहितात, ते नोटिसा लिहितात, धनादेशावर सह्या लिहितात. (आम्ही तर एका संपादकीय बैठकीत एका संपादकांस बाराखडी लिहिताना पाहिलेले आहे! नंतर समजले, की ते सही करण्याची प्रॅक्टिस करीत होते!)
असे असताना, कुवळेकरजी, तुम्हांला आणखी कोणते लेखन अपेक्षित आहे?
संपादकांनी काय केवळ सदरलेख व अग्रलेखच लिहावेत असे तुम्हांस वाटते काय?
त्यात किती धोका आहे हे तुम्हांस माहित नाही काय?
सर्वात मोठा धोका, म्हणजे त्यासाठी वाचावे लागते हो!

(उगा स्मरले म्हणून सांगतो, मध्यंतरी आमुचे सुहृद रा. रा. विवेकजी गिरधारी यांनी, आपली असावी बातमीदारीची प्रॅक्टिस, रोज रोज काय पानेच लावायची, असे म्हणत एक विवेकनिष्ठ बातमी दिली होती. तर शिवसेनाप्रमुख केवढे तापले त्यांच्यावर. असे असताना, कोणता संपादक देईल बरे विवेकजींप्रमाणे वस्तुनिष्ठ व निःपक्षपाती बातमी? कोणता संपादक करील बरे वस्तुनिष्ठ व निःपक्षपाती लेखन?)
पण तरीही संपादक लिहितातच.

तेव्हा रा. रा. कुवळेकरजी तुमचा हा आरोप तंतोतंत निकालात निघालेला आहे.
आता तुम्ही आम्हांस एवढेच सांगा, की तुम्ही जे म्हणालात, की -
"ज्याला लिहिता येत नाही, तो संपादक होतो, त्याला पुरस्कारही मिळतो. उद्या तो साहित्य संमेलनाचा अध्यक्षही होऊ शकतो."
हे नेमके कोणास उद्देशून होते?

यातील एक मुद्दा तर आधीच उडालाय. पुरस्काराबाबतचे तुमचे म्हणणे पटू शकते. आम्हांसही नेहमीच असे वाटत आले आहे, की हल्ली कोणालाही पुरस्कार मिळतो! (या एका मतामुळेच तर आमुच्या काचकपाटात जिलोसिल व पुदिन्याच्या गोळ्यांनी कायमचे ठाण मांडलेले आहे.)

पण उद्या तो साहित्य संमेलनाचा अध्यक्षही होऊ शकतो, हे रा. रा. कुवळेकरजी तुम्ही कोणाबद्दल म्हटले आहे?
हे म्हणताना तुमच्या नजरेसमोर नेमका कोणाचा चेहरा व मुखवटा होता?
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणी आतापासूनच फिल्डिंग लावलेली आहे की काय?

रा. रा. कुवळेकरजी,
आम्हांस माहितीच्या कोणत्या अधिकारात या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल बरे?

(Posted by बापू आत्रंगे, दि. २२ डिसें. २००९)

कळते-समजतेवर वाचा रा. रा. विजय कुवळेकर यांच्या त्या भाषणाची बातमी.