आम्ही लोकसत्ता ब्लॉगर झालो. आमचे लेख लोकसत्तेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. ते जगभरातील लाखो वाचकांनी वाचले. लाखो वाचकांतील शेकडो वाचक त्यावर कॉमेन्टले. आम्ही खूप खूप प्रसिद्ध झालो. मराठी विश्वातील एक आघाडीचे ब्लॉगर म्हणून लोक आम्हांस ओळखू लागले...
रोज रात्री साडेनवाच्या ठोक्याला तोंडावरून गोधडी ओढली रे ओढली, की आम्ही या सुखस्वप्नात रममाण होतो. गेले आठ दिवस दिसते मजला हे स्वप्न नवे!
पण कसले काय आणि फाटक्यात पाय!
लोकसत्ताने मारे जाह्यराती देऊन जाहीर केले, की व्हा लोकसत्ता ब्लॉगर. संकेतस्थळावर ब्लॉग नोंदवा म्हणून एक लिंकपण देऊन ठेवली.
पण ब्लॉग नोंदविणाराने ब्लॉग नोंदवायचा तर कुठे नोंदवायचा?
अजून व अद्याप लोकसत्तेचा ब्लॉगफलाट काही तयार झालेला नाही.
दोन दिवस आम्ही वाट पाहिली.
म्हटले, चुकून पीडब्ल्यूडीकडे हा फलाट बांधण्याचे काम तर दिले नाही ना केतकरांनी (पक्षी - कुमार केतकर, त्रिकालवेधी संपादक, लोकसत्ता)?
अखेर न राहवून आम्ही लोकसत्तातील ब्लॉगर-पत्रकार रा. रा. शेखर जोशींना हल्केच पुसले, की जोशीबुवा, जोशीबुवा, लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?
तेव्हा जोशीबुवांनी आपल्याकडे खूप काम आहे व ठालेपाटलांनंतर आपणांसच समग्र साहित्य व्यवहार सांभाळायचा आहे, अशी वाङ्मयीन पोझ घेतली. आमचा सवाल त्यांच्या कर्णरंध्रापर्यंत पोचलाच नसावा, असे वाटून आम्ही त्यांस पहिलाच प्रश्न दुस-यांदा केला. तर त्यांनी पुन्हा तीच पोझ घेतली.
आता काय करावे, असा खूपखूप विचार करून आम्ही लोकसत्तातील अन्य ब्लॉगर-पत्रकार रा. रा. पंकज भोसले फिल्लमवाले यांच्याकडे गेलो. तर ते नुसतेच लेखामागून लेख लिहित होते. बातम्यांमागून बातम्या लिहित होते. पानांमागून पाने लावीत होते. उरलेल्या वेळात डीव्हीडीमागून डीव्हीडी पाहात होते. (त्यांच्या या लेखनकामाठीचे आमच्या ताईंना केवढे कौतुक! किती रे बाबा लिहितोस, म्हणत मनातल्या मनात सारख्या काळजी करीत असतात!!) रा. रा. भोसलेंचा हा असा लेखनदिग्विजय सुरु. तरीही आम्ही अदबीने त्यांस व्यत्ययिले व युनिकोड मराठीत पुसले, की राजे भोसले, राजे भोसले, लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?
त्यावर त्यांनी आमच्याकडे, आम्ही म्हणजे क्युरियस केस ऑफ मराठी ब्लॉगर आहोत, असा एक किंचितकृपाकटाक्ष टाकला. मग स्लमडॉगमधील अनिल कपूरसारखा चेहरा करीत त्यांनी आम्हांलाच एक कोटीचा सवाल केला, "कसला ब्लॉग?"
आता मुख्य अंकवाले ऑनलाईनवाल्यांना बिनकामाचे समजतात. ऑनलाईनवाल्यांना मुख्य अंकवाले म्हणजे मागासलेले वाटतात. हा वर्गसंघर्ष पेपरोपेपरी असतो. ई-सकाळसम्राट सम्राट फडणीस हे या संघर्षावर एक अख्खी साईट काढू शकतात! पण तरीही ऑनलाईन एडिशनबद्दल एवढीही माहिती नसणे म्हणजे अतिच झाले. तेव्हा आम्ही रा. रा. राजे भोसलेंना लोकसत्तेचा ब्लॉग हे प्रकरण युनिकोड मराठीतून समजावून दिले.
"अच्छा, ते होय," राजे भोसले म्हणाले, "ते ब्लॉगबिग आम्हांला काय माहित नाही. ते तुम्ही विनायक परब यांना विचारा."
माझी बातमी लागली का हो आज पानात, असे विचारत येणा-या ज्युनियर बातमीदाराला पानलावे उपसंपादक ज्या प्रेमाने हुडुत् करतात, तेच सराईत प्रेम राजे भोसलेंच्या या उत्तरात होते!
आता रा. रा. विनायक परब यांना गाठायचे म्हणजे केवढा सिटी वॉक करावा लागणार या कल्पनेनेच आमच्या देही झेंडू फुटला. परंतु योगायोगाने ते कचेरीतच होते. शिवाय कॅम्पस मूडमध्येही होते. ते पाहून आम्ही त्यांस विचारले, की लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?
तर त्यांना धक्काच बसला!
ते उद्गारले, "कधी येणार म्हणजे? सुरु पण झालाय आमचा ब्लॉग."
ते ऐकून मनीं म्हटले, यांची सांगण्यात काही चूक होतेय की आपल्याच कर्णरंध्रांत काही समस्या आहे?
"अहो, तेथे नुसतेच म्हटलेय की ब्लॉग नोंदवा. पण त्यावर क्लिक केले, की आत कॉमेन्टचा फॉर्म येतो!" आम्ही आमचे अवकाशव्यापी दुःख हलके केले.
"मग? त्यालाच तर म्हणतात ब्लॉग! या माध्यमातून आम्ही ब्लॉगचे केवढे मोठे ब्रॅंडिंग करतो आहोत! मराठी वाचकांमध्ये ब्लॉग या माध्यमाबद्दलची जाणीव जागृती करण्याचे केवढे प्रचंड काम यातून होत आहे."
नंतर बराच वेळ त्यांनी आमचे ब्लॉग म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, संगणक म्हणजे काय, लिहिणे म्हणजे काय असे थोरथोर प्रबोधन केले.
बुद्धाला बोधीवृक्षाखाली बुद्धत्त्व प्राप्त झाले. आम्हांस वृत्तांताच्या आधारवडाखाली बुद्धत्त्व आले.
वाटले,
फुकाच आपण स्वतःस ब्लॉगर म्हणवित मिरवित होतो.
अरे मूढबापू, ब्लॉग म्हणजे अखेर असते रे काय?
आपण ज्यास लेख म्हणतो, ते सुद्धा अखेरीस कॉमेन्टच असतात ना!
अरे शतमूर्खा, अखेर अवघे लेखन हेच एक ब्लॉग आहे.
कोणी लेखांस ब्लॉगमधील पोस्ट म्हणते.
कोणी वाचकांच्या पत्रव्यवहारास ब्लॉग म्हणते.
ब्लॉग याने की वेबलॉग या संकल्पनेस एवढे सुंदर, एवढे सरळ, एवढे सोपे रुप कोणी दिले, याच्या शोधात आम्ही सध्या आहोत.
लोकसत्तामधील कोणी याचे उत्तर देईल काय?
(कृपया, उत्तरासाठी या लेखासोबतच्या कॉमेन्ट फॉर्ममध्ये आपला ब्लॉग नोंदवा!!)
(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ मार्च २००९)
कालची गोष्ट.
सक्काळसकाळी नेहमीप्रमाणे एका हाती कषायपेयपात्र, दुज्या हाती पारले जी माने जिनियस बिस्कुटे आणि समोर पेपरांचे चघाळ अशी रवंथसामुग्री घेऊन बसलो होतो.
नेहमीच्या सवयीने आधी मुंटातील छायाचित्रे पोटभरून पाहून घेतली. मग सकाळचा अग्रलेख वाचला. हल्ली अग्रलेखाबरोबरच सकाळच्या संपादकांनी लिहिलेली (लागले बोवा लिहायला संपादक!... छडी लागे छमछम विद्या येई घमघम!!) निवडणूक वार्तापत्रेही आम्ही आवडीने वाचतो. ती वाचून आम्हांस म्हाराष्ट्राच्या समस्त राजकीय परिस्थितीचे धादांत आकलन होते. कारण की त्यात गेल्या निवडणुकीचा इतिहास व यावेळी हे निवडून नाही आले तर ते निवडून येतील असे खोलखोलसखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण असते. त्याचे परिशिलन केल्यावर आम्ही पुन्हा मटाकडे वळलो. त्यायोगे आम्हांस सभ्यसामना वाचल्याचे पुण्य लाभले. (तुम्हांस सांगतो, तो दिवस आता दूर नाही, की ज्या दिवशी सामनाच्या पहिल्या पानी चौकट छापून येईल, की आमची कोठेही शाखा नाही! बोरिबंदरात तर नाहीच नाही!! असो.)
यानंतर आम्ही लोकसत्ता हाती घेतला आणि आमच्या कानी अचानक पॉंगपॉंग पॉंगपॉंग ऐसा कर्कश्श ध्वनी उमटला. केवढे दचकलो आम्ही! त्या भरात हातातील उष्ण चहा राप्र महामंडळाच्या प्रहारवर सांडला. (तर त्याचे क्षणात कोल्ड ड्रिंक झाले!!)
तुला काय समजते की नाही? कानाजवळ भोंगे कसले वाजवतेस भलत्या वेळी? असे आम्ही रागेजून हिला बोलणार, तर ती तेथे नव्हतीच. मग हा आवाज केला तरी कोणी?
पाहतो तो वेळूच्या बनातून बासरीचे सूर यावेत त्याप्रमाणे लोकसत्तेच्या पानातून हे हॉर्नओकेप्लीज येत होते.
काय बरे हे आक्रीत? असे स्वगत म्हणत आम्ही लोकसत्तेचा पर्णसंभार चाळू लागलो.
आणि लख्खकन् आम्हांस आवाssज कुणाचा? याचा उलगडा झाला.
हा तर आमचे त्रिकालवेधी संपादक रा. रा. कुमार केतकर यांचा हॉर्न!
'गेले काही दिवस मराठी सारस्वतात जे काही चालू आहे त्यावर भाष्य करणे, मत प्रदर्शित करणे, सल्ला देणे म्हणजे त्या कर्कश्श गोंगाटात आपलाही हॉर्न वाजवण्यासारखे आहे...' असे म्हणत रा. रा. केतकर यांनी 'सुशिक्षितांची निर्बुद्धता!' (लोकसत्ता, चोवीस मार्च दोन हजार नऊ) असा हॉर्न मागाहून 'वाहतूक सुरळीत' झाल्यानंतर वाजविला आहे.
या हॉर्नच्या (हॉर्न कसला, ही तर इशारतीची तोफच!!) आवाजाने आमचा जीव मात्र भांड्यात पडला.
आम्हांस आधी तर असे वाटले होते, की रा. रा. केतकर परदेशात जावे, तसे सूक्ष्मात वा मौनातच गेले आहेत!
आमचे (राजी)नामचीन लेखकसूर्य आनंद यादव यांनी तळ्यात-मळ्यात करता करता संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा मसापच्या डोहात टाकला. त्या दिशी आम्हांस वाटले, की समस्त पत्रांतून फटाके फुटणार. झालेही तसेच. परंतु त्यात लोकसत्तेचा आपटबार काही नव्हता. त्या दिशी लोकसत्तेत आनंद यादवांऐवजी लालू यादवांवरचा अग्रलेख. ते पाहून आम्ही मनी म्हटले, अगंबाईअरेच्चा! ही लोकसत्तेच्या न्यूजरॅपची गफलत म्हणावयाची, की रेखाबाईंची नजरचूक? चुकून त्यांनी या यादवांऐवजी त्या यादवांवरचा अग्रलेख तर नाही ना डकवला?
तेव्हा आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणाने लोकसत्तेत चौकशी केली, तर समजले की सध्या केतकरसाहेब औटॉफ महाराष्ट्रा आहेत. म्हणजे नक्कीच, रा. रा. श्रीकांत बोजेवारांना कार्यबाहुल्यामुळे अग्रलेख लिहिण्यास सवड व वेळ मिळाली नसणार आणि नेहमीप्रमाणे पुण्याची लाईन बंद पडलेली असणार. त्या गोंधळात राहून गेला या यादवांवरचा अग्रलेख. मग आम्ही टाईमप्लीज म्हटले आणि दुस-या दिवसाची वाट पाहिली. मग आम्ही तिस-या, चौथ्या, पाचव्या दिवसाची वाट पाहातच राहिलो. परंतु तो अग्रलेख काही आलाच नाही.
म्हटले रा. रा. कुमार केतकर हे काही डांबराला डरणारातले नाहीत!
मग हे ऐसे का बरे झाले असावे?
या संपूर्ण प्रकरणात सोनिया, पवार, स्वयंभू डावे आदींचा सहभाग नसल्याने तर त्यास अनुल्लेखाने डावलले नसेल ना?
गेले चार-पाच दिवस आम्ही आणि आमची तनहाई याच गोष्टीचा सखोल विचार करीत बसलो होतो.
आणि अचानक हे पॉंगपॉंग झाले.
मनी म्हटले, उशीरा आले, योग्य मुक्कामी आले!!
पण आले ते कसे आले, सर्वांच्या कानी सटासट सटके देतच आले.
अग्रलेखाचे शीर्षक (सुशिक्षितांची निर्बुद्धता!) वाचून तर आधी आम्हांस वाटले, केतकरसाहेब आमच्यावरच घसरले की काय?
(आम्ही सुशिक्षित आहोत, याचा दाखला आमच्याकडे आहे. आमच्या बुद्धपणाबाबत मात्र अनेकांचे अनेक समज आहेत!)
किंतु नंतर समजले, की मसापमधील अनेकांसही तसेच वाटत होते.
म्हणजे वार सुस्थळी बसलाय!
म्हणजे चांगले झाले!
तथापि या संपूर्ण लेखातून आम्हांस एवढेच समजले नाही, की
''इतक्या अचाट प्रमाणावर ‘संस्कृतीकरण’ (!) होत असले तरी महाराष्ट्रात इतके सांस्कृतिक अराजक कसे? इतकी सर्वव्यापी निर्बुद्धता कशी? इतकी असहिष्णुता आणि अरसिकता कशी? या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत,'' असे साक्षात कुमार केतकर म्हणत असतील, तर या सवालांच्या उत्तरांकरीता वाचकांनी कुणाकडे जावयाचे? कोण्या एडिटराच्या तोंडाकडे पाहावयाचे?
या समग्र परिस्थितीस जबाबदार कोण?
या समग्र परिस्थितीत समस्त गंभीर वृत्तपत्रांची जबाबदारी काय?
की आम्ही आता आमच्या पेपरवाल्यास मुंबई चौफेर टाकावयास सांगू?
कालपासून आमच्या कानात या विचारांचा हॉर्न सारखा भोंभों करीत आहे.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २५ मार्च २००९)
(लोकसत्तेचा अग्रलेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
वास्तविक मराठीत अशी प्रथा नाही, परंपरा नाही, रीत नाही.
परंतु चांगदेवजी कुठले ऐकायला!
त्यांनी एक कोरडीगंभीर चांगदेवपाटिलकी करून बातमीची उठाठेव केलीच.
अपेक्षेनुसार यावर फार काही प्रतिक्रिया येणार नव्हत्याच.
त्या आल्या नाहीतच.
कारण की आपण सगळे श्रमिक पत्रकार असल्याने आपण बातमी लिहिणार, बातमी तपासणार, पाने लावणार की बातमीच्या संकल्पनेवर कॉमेन्टा टाकत बसणार? काय अन्य व्यवहार नाहीत काय आपणांस?
परंतु चांगदेवजी कुठले समजायला!
या लेखाचीही एक गंमतच झाली. आमच्या एका अनामवीरास वाटले की हा लेख वाहिन्यांवर आक्षेप घेणाराच आहे. त्यामुळे आमचे चांगदेवजी चांगलेच खट्टू वगैरे झाले. त्या भरात त्यांनी आणखी एक कोरडागंभीर लेख लिहिला.
यावेळी मात्र ती चांगदेवपाटिलकी आम्ही सहयोगी बातमीदारवर देत आहोत. तेथे (झालीच तर) या विषयावर आपण चर्चाबिर्चा करू यात. नाहीतर आपले चाललेलेच आहे बातम्या देणे, बातम्या तपासणे, पाने लावणे वगैरे आणि इत्यादी.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २२ मार्च २००९)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
आम्ही हाडाचे पत्रकार नसलो, तरी बातमी हा आमच्या चर्वणाचा एक विषय आहे.
आपण हे पाहतोच आहोत की अलीकडे वाहिन्यांमुळे वृत्तपत्रांची मोठी कुचंबणा झाली आहे.
शिळ्या, वाहिन्यांनी चघळलेल्या बातम्या देणे हे काही वृत्तपत्रांतील लोकांना फार आवडते असे नाही.
आता यावर काही उपाय आहे का?
आम्हांस हे माहित आहे, की आपल्यांतील अनेकांना हा प्रश्न सतावतो आहे. अनेकांनी यावर आपल्या परीने उत्तरे शोधली आहेत. अनेक जण यावर सातत्याने बोलत आहेत.
आमच्या चांगदेव पाटलांनीही यासंदर्भात काही मुद्दे मांडले आहेत.
आजच्या दिवशी अंमळ गंभीर होऊन आपण त्यांचा विचार करूया. (एरवी मग आपली भंकस चालूच असते की!)
तेव्हा वाचा - बदलती बातमी
आपली मते आणि प्रतिक्रिया जरूर पाठवा.
बदलती बातमी
- चांगदेव पाटील
दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्यांची स्पर्धा तर स्पष्टच दिसते आहे. पण त्या स्पर्धेला तोंड कसे द्यायचे, कोणत्या हत्यारांनी लढायचे याचा अंदाज काही येत नाही, असे काहीसे मराठी वृत्तपत्रांचे झाल्याचे दिसत असून, त्यामुळे एकंदरीतच सर्व वृत्तपत्रे कुचंबल्यासारखी दिसत आहेत.
वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा करायची म्हणजे वृत्तवाहिन्यांसारखेच दिसायचे असा काहीसा गैरसमज काही वृत्तपत्र-चालकांचा व संपादकांचा झाल्याचे दिसत आहे. वृत्तपत्रे रंगीत झाली, त्यात मोठमोठी रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध होऊ लागली हे तांत्रिक प्रगतीमुळे झाले हे मान्यच. परंतु असे करण्याची निकड आली ती वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेमुळेच. हे केवळ दृश्यात्मकतेपुरतेच मर्यादित राहिले असे नव्हे. पहिल्या पानावरील बातम्यांच्या निवडीपर्यंत हा परिणाम झालेला आहे. अन्यथा, आरुषी हत्याप्रकरणासारखी बातमी एरवी मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर कधीही येऊ शकली नसती. खड्ड्यात पडलेल्या प्रिन्सच्या बातमीचे उदाहरण तर या संदर्भात कायम लक्षात राहण्यासारखे आहे. ब्रेकिंग न्यूज या प्रकाराने तर मराठी वृत्तपत्रांतील ताजेपणाच हरवून गेला आहे.
दूरचित्रवाणी आणि त्याचबरोबर इंटरनेट ही माध्यमे प्रचंड डायनॅमिक आहेत. हे या माध्यमांचे एक बलस्थान आहे. कोणतीही बातमी घडताक्षणी ती वाचक-प्रेक्षकांसमोर आणण्याची या माध्यमांची क्षमता, दर चोवीस तासांनी अपडेट होणारी वृत्तपत्रे कधीही गाठू शकणार नाहीत.
वृत्तवाहिन्यांनी दिवसभर एखाद्या बातमीचे दोहन करून त्या घटनेचा चोथा केल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी तमाम वृत्तपत्रांनी ती मुख्य बातमी म्हणून मुखपृष्ठावर छापावी, यात काय अर्थ आहे तो त्या संपादकांनाच ठाऊक. पण हा वाचकाच्या वेळेचा, पैशाचा, वृत्तपत्रांच्या किमती कागदाचा अपव्यय आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते पत्रकारिता या व्यवसायाच्या विपरीत आहे.
यावर आमचे काही मित्र असा युक्तिवाद करतात, की असे जर असेल, तर मग वाचक क्रिकेटच्या बातम्या कशा रस घेऊन वाचतात?
बरोबरच आहे. आदल्या दिवशी क्रिकेटचा सामना पाहिल्यानंतर दुस-या दिवशी तेच लोक क्रिकेटच्या बातम्याही आवर्जून वाचतात. पण कशासाठी? तो सामना कोणी जिंकला हे जाणून घेण्यासाठी? त्या सामन्यात किती धावा झाल्या याची माहिती घेण्यासाठी? वाचक वाचतात ते पुनःप्रत्ययाच्या आनंदासाठी, त्या सामन्याच्या रसग्रहणासाठी. हेच इतरही अशाच काही बातम्यांच्याबाबतीत घडते. वृत्तपत्रे अजाणता ते देतात, म्हणून लोक वाचतात.
आणि यातच खरे तर वृत्तपत्रांच्या सुटकेचा मार्ग आहे. बातमी पुढची बातमी. आज घडलेल्या बातम्या आजच वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट देतील. तुम्ही उद्या त्या बातमीच्या पुढची बातमी देऊ शकता. त्या बातमीमागची बातमी सांगू शकता. बातमीचे विश्लेषण करू शकता. विश्लेषण हा तर खास वृत्तपत्रांचा आणि वेबसाईट्सचा प्रांत होऊ शकतो.
चलत् चित्र हे वृत्तवाहिन्यांचे बलस्थान आहे, तसीच ती त्यांची कमजोरीही आहे. ज्या बातम्यांमध्ये व्हिडिओची शक्यता नाही, अशा बातम्या वृत्तवाहिन्यांसाठी अयोग्यच ठरतात. त्या दिल्या जात नाहीत, असे नाही. पूर्वी - खरे तर आजही - आपली सह्याद्री वाहिनी अशाच बातम्या देते. अनेकदा अशा कोरड्या बातम्या देण्याशिवाय वृत्तवाहिन्यांना गत्यंतर नसते. पण तो त्यांचा नाईलाजाचा भाग असतो. आणि म्हणूनच याचा लाभ वृत्तपत्रे घेऊ शकतात. जेथे वृत्तवाहिन्या जाऊ शकत नाहीत, तेथे वृत्तपत्रे जाऊ शकतात.
खरे तर यात नवे काहीच नाही. आपल्या मराठी वृत्तपत्रांना याची जाणीव नाही, असेही नाही. लोकसत्ता आणि काही प्रमाणात सकाळ या वृत्तपत्रांना हे चांगलेच समजले आहे. याचा अर्थ लोकसत्ता किंवा सकाळ मध्ये नेहमीच्या, वाहिन्यांनी चघळलेल्या बातम्या येत नाहीत असा नाही. पण अनेकदा ही वृत्तपत्रे त्याही पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. पुणे सकाळमधील काही पत्रकार मित्रांशी बोलल्यानंतर, त्यांनी एक संस्था म्हणून याचा खूपच विचार केलेला आहे, हे दिसले. 'एटी पर्सेंट डिफरन्ट' हे कार्यसूत्र म्हणून सकाळने स्वीकारले आहे. याचा अर्थ अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांहून ऎंशी टक्के वेगळा मजकूर सकाळ देणार. तसे सदा होत नाही आणि तेथे अनेक चांगल्या कल्पनांचा अंमलबजावणीच्या पातळीवर विचका केला जातो, हा भाग अलाहिदा. पण त्यांचा प्रयत्न तरी तो असतो.
लोकसत्ताने वृत्तलेखनाच्या पद्धतीत जाणीवपूर्वक की अजाणता ते माहित नाही, पण खूपच बदल केला असल्याचे दिसून येते. सविस्तर बातमी हे लोकसत्ताचे वैशिष्ट्य. पण आता तेथे वृत्तलेखांनाही पहिल्या पानावर जागा दिली जाते. सकाळमध्ये नेमके याच्या उलट. वाचकांजवळ वेळ नाही म्हणून दहा मिनिटांत बातम्यांसारखा प्रयोग केल्यानंतर पुन्हा बाकीच्या बातम्या त्रोटक, कमी शब्दांतच दिल्या जाव्यात हा सकाळचा हट्ट समजण्यापलीकडचा आहे.
बातमी ही पवित्र असते, त्यामुळे त्यात मते येता कामा नयेत, हा पत्रकारितेचा पहिला पाठ. पण लोकसत्ताने आता त्याकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. व त्यात काही गैर आहे, असे मानण्याचे कारण नाही. तुमची बातमी देण्यातील एकाधिकारशाही संपल्यानंतर व खरे तर इतर साधनांमुळे ते तुमच्या अस्तित्वाचे मुलभूत प्रयोजनच न उरल्यानंतर, बातमीचे पावित्र्य या गोष्टीला काही अर्थच उरत नाही.
वाचकाला कोरडी बातमी द्या व त्याला तिचा अन्वयार्थ लावू द्या, असे सांगणारे एक स्कूल पत्रकारितेत अद्याप आहे. वाचकाला तितका वेळ आहे आणि त्याची तितकी समज आहे, हे या स्कूलने कोठेतरी गृहीत धरलेले असते. परंतु आता परिस्थिती पालटली आहे. वाचक सूज्ञ आहे आणि त्याच्याकडे खरेच वेळ नाही. त्यामुळे बातमीत मते आली, तर त्याला ती हवीच आहेत. ती मते त्याला पटली नाही, तर ती तो फेकून देऊ शकतो अथवा वृत्तपत्रच बदलू शकतो. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वाचकाची वृत्तपत्राप्रती जी निष्ठा असते, ती बातम्यांमुळे ठरत नाही. ती ठरते ती त्या वृत्तपत्राच्या धोरणांमुळे, मतांमुळे. हे धोरण, हे मत बातमीत आल्यास त्यामुळे बातमीचा विनयभंग होतो असे समजण्याचे कारण नाही.
वृत्तपत्रांना वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेत ठाम टिकायचे असेल, तर अशा बदलांचा अंगिकार करावाच लागेल.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २० मार्च २००९)
बोला पुंडलिकावरदा हारि विट्टल
श्रीज्ञानदेवतुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!
तर मंडळी, तुकोबारायांचा एक द्रिष्टांत आहे. महाराज म्हन्तात -
बोल बोलता सोपे वाटे...
पण करणी करता....?
अगदी बरोबर.
महाराज सांगतात - करणी करता टीर कापे!
मंडळी तुम्ही म्हणाल, की बुवांनी मधूनच कुठून हा अभंग उचलला आहे. पन त्याला येक कारन आहे. ते कारन म्हंजे आमची पेपरवाली मंडळी.
या पेपरवाल्या मंडळींनी आज आमच्या आनंदराव यादवबुवांबद्दल अग्रलेख छापले आहेत.
आता आपल्यासारखी मंडळी आणि ही पेपरवाली मंडळी यांच्यात हा मोठाच फरक आहे मंडळी. आपण म्हंजे काला आक्षर भैस बराबर. दोन शब्द लिहायचे म्हटले तरी आपल्याला केवढा कंटाळा! तुकोबा म्हंतात -
काय करू मज नागविले आळसे
बहुत या सोसे पीडा केली...
पन या पेपरवाल्या मंडळींनी असा आळस करून चालत नाही. रोजच्या रोज अग्रलेख लिहावाच लागतो. म्हनून मंडळी, ते अग्रलेख लिहितात!
तर हे अग्रलेख म्हंजे कसे?
कागदी लिहिली नावाची साकर
चाटिता मधुर केवी लागे
बोलाचीच कढी बोलाचाची भात
जेऊनियां तृप्त कोण जाला
बोला पुंडलिकावरदा हारिविट्टल श्री ज्ञानदेवतुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!
तर मंडळी, आजच्या या अग्रलेखांचा विषय आहे आनंदबुवा यादवांचा राजीनामा. या मान्सानं तुकोबामावलींबद्दल पुस्तक लिहिलं. त्याच्यात महाराजांबद्दल काहीच्याबाही लिहिलं. म्हटल्यावर वारकरी मंडळी काय गप्प बसतात? आमचे सामनावाले साहेब लिहितात -
"कादंबरीला आकर्षक नाव द्यायचे आणि तुकोबारायांसारख्या सच्छील चारित्र्याच्या परोपकारी संतावर संशोधनाच्या नावाखाली लक्षात येतील न येतील असे शिंतोडे उडवायचे. पुन्हा सारे काही आपल्या साहित्यिक कर्तृत्वामुळे खपून जाईल या भ्रमात वावरायचे. या वृत्तीला वारकरी मंडळींनी एक सणसणीत तडाखा दिला आहे."
आता आपन वारकरी म्हंजे कसे? तर मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास. पण कुठवर, तर भले असू तिथवर. तुकोबा मावली म्हंतात -
भले तरि देऊं गांडीची लंगोटी
नाठ्याळा चि गांठी देऊं माथा....
मायबापाहूनी बहु मायावंत
करू घातपात शत्रुहूनि
सामनावाल्या साहेबांना हे असेच वारकरी पायजेल हायेत. पण तरीसुद्धा सामनावाले म्हणतात - "मुळात वारकरी मंडळींनी विषय तुटेपर्यंत ताणण्याची गरज नव्हती. एखादा आपली चूक कबूल करून शरण आल्यास त्याला अभय द्यावे हीसुद्धा संतांचीच शिकवणूक."
हे बाकी सोळा आने बरोबरहे. आमच्या नारायणरावांचा प्रहारसुद्धा हेच म्हणतो. "या प्रकरणाने वारक-यांच्या सहिष्णुतेचे पितळही उघडे पडले आहे. तुकाराम महाराजांना छळणा-यांनाही त्यांनी माफ केले होते, याचा विचार वारक-यांनी करणे गरजेचे होते."
अगदी सत्यवचन. भागवत संप्रदाय सांगतो - दयाक्षमाशांती तेथे देवाची वसती!
पण हे सामनावाले एकीकडे वारक-यांनी अतिरेक केला असंही म्हणतात, "संत तुकारामांचे मन आकाशाएवढे मोठे होते. कुणाच्या लिहिण्याने, बोलण्याने संत तुकारामांना किंवा त्यांच्या विचारांना खुजेपणा येत नाही", असंही म्हणतात आणि तिथंच म्हणतात, की "संतांवर, हिंदू देवदेवतांवर, श्रद्धास्थानांवर ज्यावेळी आघात होतात त्यावेळी उसळून उठाल तर तुम्ही खरे धर्मरक्षक. निदान यापुढे तरी ही काळजी घ्या."
सामनावाल्यांची ही अशी वैचारिक डबलढोलकी कशामुळं झाली असेल मंडळी?
तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय
कारण कमाईविण नाही....
पण मंडळी आमच्या लोकमतवाल्यांनी याला चांगलं उत्तर दिलं आहे.
लोकमतवाले म्हंतात - "तुमच्या श्रद्धास्थानांची चिकित्सा होऊ दे, आमची दैवते मात्र तिच्यापासून दूर राहू दे, ही राजकारणातली वृत्ती याही क्षेत्रात अवतरली आहे काय? की रामदासाची चिकित्सा करा, जमले तर त्याच्यावर टीकाही करा, आमच्या संतांना मात्र हात लावू नका असे एकारलेपण साहित्यानेही आता अंगिकारले आहे?"
मंडळी, या राजकारणाने आपल्या वारक-यांच्या फडातसुद्धा शिरकाव केला आहे. वारक-यांमध्येसुद्धा आता पुढारी घुसले आहेत. परंतु मंडळी, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने.
महाराष्ट्र टाइम्सवाल्या साहेबांनीसुदिक हीच शंका घेतलेली आहे. मंडळी, ते काय सांगतात ऐका - "ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेखाचा वाद ज्या टोकापर्यंत ताणला गेला, त्यावरून वारकरी संप्रदायावर प्रभाव असलेल्या वारकरी पुढा-यांच्या भावनांचा अन्य हेतूंसाठी वापर करण्यात आला काय, अशी शंका येते."
मटावाले साहेब पुढं काय म्हंतात - "यादव यांनी हे पुस्तक मागे घेतले, वारकऱ्यांची देहूला जाऊन माफीही मागितली. तेथे यादव यांनी धक्काबुक्कीला तोंड दिले. वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेला धक्का लावणारीच ही घटना होती. यानंतर वास्तविक वादाचा मूळ मुद्दाच संपला होता. या कादंबरीशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला त्यानंतरही लक्ष्य करणे अनाकलनीयच होते. त्यामुळेच त्यामागील 'बोलविते धनी' कोणी वेगळे आहेत काय या चर्चेला वाव मिळाला आहे."
मटाचा हा अग्रलेख, मंडळी तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घालनारा आहे. मटावाले साहेब म्हंतात - "आविष्कार स्वातंत्र्य अनिर्बंध नाही हे खरेच आहे. एखादे लेखन हे भावना दुखावण्याच्याच हेतूने बेदरकारपणे केले गेले असेल, तर कायद्याच्या मार्गाने अशा लेखनाला आळा घालणे हा सुसंस्कृत समाजापुढील पर्याय आहे. दुसरा पर्याय, असे लेखन अनुल्लेखाने मारणे हा आहे. दुदैैर्वाने आज या पर्यायांपेक्षा, समाजगटाला चिथावून दडपण आणण्याचा मार्ग रूढ झाला आहे. त्यामुळे बेजबाबदार लेखकांना जरब बसेलही, पण त्याबरोबर सर्जनशीलताही कुंठित होईल."
सकाळवाल्या साहेबांनीसुद्धा असाच मुद्दा मांडलाय. "त्यांच्यातर्फे (वारक-यांतर्फे) सेन्सॉरशीपची कल्पनाही पुढे येऊ लागली. अमुक माणसाला तमुक लिहायचे असेल, तर त्याने अमुकाची परवानगी घेतली पाहिजे, असे काही उतावीळवीर बोलू लागले. त्यातूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वाट लागत होती."
पण आता त्यांचं ऐकनार कोन?
तुकोबांचंसुद्धा ऐकलं नाही या मंडळींनी. महाराज म्हंतात -
किती सांगो तरी नाईकती बटकीचे
पुढे सिंदळीचे रडतील...
तेव्हा त्यांच्याबद्दल आपन काय म्हणणार?
बोला - पुंडलिकावरदा हारिविट्टल.....
मंडळी सकाळवाल्या साहेबांनी वारक-यांच्या कपाळी विचारांचा टाळ घातला. पण त्यांनी आमच्या यादवबुवांनाही सोडलं नाही. ते म्हणतात - "ज्यांनी ते (म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य) टिकवून ठेवायचे ते डॉ. यादवही क्षमायाचनेचा मार्ग शोधत होते." प्रहारवाले साहेबसुद्दा लिहून जातात - "यादवही दोषास पात्र आहेत. ते कोणत्याच मुद्दयावर ठाम राहिले नाहीत." लोकमतवाल्या साहेबांनी तर यादवबुवांना सडकूनच काढलंय. मटावाले म्हंतात - "आनंद यादव यांना ज्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे मराठी साहित्यिकांचीच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेचीही मान लाजेने खाली गेली आहे." पण आमच्या लोकमतवाल्या साहेबांचा काहीतरी वेगळाच राग आहे. ते म्हंतात - "आपले पुस्तक मागे घेण्याची घोषणा करून त्यांनी (यादवबुवांनी) आपल्या आयुष्यभराच्या वाङ्मयीन मिळकतीवरच पाणी सोडले.... त्यांच्यावर विश्वास ठेवणा-या सगळ्या लेखक-कवींना आणि चाहत्या भक्तांना त्यांनी निराधार केले.... आपला शब्द आणि त्यातील सत्य याविषयीची खात्री नसणा-यांनी लिहायचे तरी कशाला?..."
सवाल मोठा रोकडा आहे.
पण आमच्या ऐक्यवाल्या साहेबांनी परस्परच त्याचं उत्तर दिलं आहे. ऐक्यातले साहेब म्हंतात - "मेणबत्त्या घेऊन विचार स्वातंत्र्याचा प्रकाश पाडणारे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी सुध्दा अंधारात गुडूप झाले होते. कुणी काही म्हटले तरी, यादव यांच्या पाठीशी एकही साहित्य संस्था, महामंडळ उभे राहिले नाही. यादव एकाकी पडले. महाराष्ट्र आणि मराठी साहित्य संमेलनाच्या भवितव्याचा, मराठी रसिकांचा विचार करून त्यांनी अत्यंत शांतपणे आपल्या अध्यक्षपदाचा रा जीनामा दिला. त्यांनी राजीनामा देऊन पलायनवादी मार्गाचा स्वीकार केल्याची टीका करणाऱ्या, उपटसुंभ साहित्यिकांची दातखिळी गेले दोन महिने का बसली होती?"
उपटसुंभ साहित्यिकांचीच कशाला? सगळ्या पेपरवाल्या साहेबांची दातखिळसुद्धा दोन महिने अशीच बसली होती. या पेपरवाल्या मंडळींची एवढी गोची झाली होती, मंडळी की त्यांना कोणाची बाजू घ्यावी हेच उमगत नव्हतं. म्हणून ते गप्प होते. आणि आता सगळे मिळून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने पुंडलिकावरदा करीत आहेत. आनंदबुवा तुम्हाराच चुक्या असं म्हनत आहेत. अशा लोकांसाठीच तर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेलेत -
बोल बोलता सोपे वाटे
करणी करता टीर कापे....
आमच्या लोकसत्ताचं बघा. त्या साहेबांनी काही बोललंच नाही!
एकंदर या वादंगाच्या डोहात आमच्या पेपरवाल्यांचाही थोडा बुका सांडलाच मंडळी.
बोल पुंडलिकावरदा हारिविट्टल श्री ज्ञानदेवतुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १९ मार्च २००९)
अप्पा अंदाजपत्रकावरून शेवटचा हात फिरवित होते. 'रुपया असा आला, रुपया असा गेला' याचे इन्फोग्राफिक मात्र त्यांना काही केल्या जमत नव्हते. कसे जमणार? एक तर आलेल्या रुपयात कपात झाली होती आणि रुपया हा हा म्हणता अस्सा जात होता... अखेर वैतागून त्यांनी हातातील एक्सेलशिट बाजूस भिरकावून दिले आणि मटामध्ये डोके घातले.
"अप्पा, फिडल म्हंजे काय वो?"
अचानक आलेल्या या प्रश्नाने ते दचकलेच. या पप्पूला काही काळवेळच नाही. इथे वर्तमान धोक्यात आलेय आणि हा इतिहास उगाळतोय!
"एवढं पण तुला माहित नाही?... ते एक वाद्य असतं."
"ते तं काय मम्मीला पण माहिताय... पण वाद्य म्हंजे नेमकं कसं?"
"मोतमावलीच्या जत्रेत घेतली होती ना तुला, त्या पिपाणीसारखंच काहीतरी असतं बघ ते..," अप्पा पत्रधर्मास जागून मोघमपणे बोलते झाले.
"पिपाणीसारखं नसतं काय ते.... पत्र्याच्या डब्यासारखं असतं." पप्पू संपादकाच्या आत्मविश्वासाने म्हणाला.
"अरे डब्यासारखं कसं असेल ते?"
"मग? त्याशिवाय का ते होळीत वाजवतात?"
"होळीत? फिडल होळीत वाजवतात?... कोणत्या मुर्खाने सांगितलं तुला?"
"मम्मीनं! तीच म्हणाली, ते फिडल की काय ते रोममध्ये होळीत वाजवतात म्हणून..."
"मग असेल बुवा तसं." अप्पा म्यानेजमेन्ट आणि मम्मी यांच्याशी कधीही आर्गुमेन्ट करीत नाहीत. "पण पप्पू, खरा इतिहास काय आहे माहिते का तुला? अरे त्या रोमची होळी पेटली होती ना तेव्हा तो निरो आपल्या राजवाड्यात फिडल वाजवत बसल होता."
"निरो म्हंजे काय?"
"नीरो म्हणजे... मालक होता तो!"
अप्पांना या क्षणी का कोण जाणे, पण एकदम आपल्या छोट्या मालकाची आठवण आली. त्याच्या रंगलेल्या होळी पार्टीची आठवण आली. त्या पार्टीच्या फोटो गॅलरीची आठवण आली. इंडियत कुठल्या संकेतस्थळी बरे आपणांस त्या छायाचित्रांची नेटभेट झाली होती?.... मग त्यांना आर्थिक मंदीची आठवण झाली. त्यांनंतर त्यांना कपातलेले कर्मचारी आणि झालेली वेतनकपात यांची आठवण आली. अप्पा म्हणजे जणू आठवणींचे झाड झाले!
या आठवणी झटकण्यासाठी त्यांनी आपले मस्तक गदागदा हलविले.
त्या झटक्याने त्यांच्या हातातील मटा गळून पडला.
"अहो, आज हापिसला जायचंय की नाय? किती वाजले बघा..."
मुदपाकखान्यातून हाक आली, तसे अप्पांनी अभावितपणे हातातील रिस्टवॉचात पाहिले... आणि त्यांचे डोळेच विस्फारले.
रिस्टवॉचातले काटे गायब झाले होते.
त्या तबकडीत त्यांना अवघा रिसेशन टाइम्स दिसत होता!...
रिसेशन टाइम्स आणि त्या काळात होळीच्या पार्टीत फिडल वाजवणारा निरो!!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १८ मार्च २००९)
(होळीनिमित्ताने केलेले हे बुरा न मानो होली है परंपरेतील लेखन वास्तविक कालच प्रसिद्ध व्हायला हवे होते. किंतु शिळ्या पोळीप्रमाणे कधी कधी शिळा लेखही अधिक चवदार लागतो, असे आम्हीच कुठेतरी म्हटले आहे. त्या एका विधानाच्या आधारावर येथे हा कालचा लेख आज प्रसिद्ध करण्याची जुर्रत करीत आहोत. - बापू)
---------------------------------
बॅक्ग्राऊंडला समग्र होळीगीते ढणढणत आहेत. सप्तरंग, लोकरंग, नवरंग अशी भिन्नभिन्न रंगउधळण सुरु आहे.
वातावरणाने जणू मुंबैटाईम्सचा लेऔटच ल्याला आहे. काव्यशास्त्रविनोदाच्या पिचका-या उडत आहेत. मागील बाजूस एका टेबलावर कसलेसे पात्र आहे. त्यात कसलेसे सफेद द्रव्य आहे. (क्यामेरामन, तो तेवढा भाग तेवढा ब्लर करून टाका!) सगळ्यांचे चेहरे रंगाने एवढे माखलेले आहेत, की इतरांस काय, त्यांचे त्यांनाही ते ओळखू येत नाहीत. परिणामी त्यांची ओळख अंदाजानेच लावणे क्रमप्राप्त आहे. (चू.भू.द्या.घ्या.)
आता आपणांस प्रश्न व सवाल पडला असेल, की हे कशाचे वर्णन आहे? व ते काय म्हणून दिले आहे?
तर मुंबैतील समस्त पेपरांस होळीची कचेरीबंद सुटी असते. (वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या एकजुटीची विजय असो!) हा दुर्मिळ वार्षिक योग साधून यंदा संपादक परिषदेने संपादकांची होळी (यात कुठलाही श्लेष नाही याची कृपया नोंद घ्यावी!) आयोजित केली होती, त्या रंगोत्सवाची ध्वनीचित्रफीत नुकतीच आपल्या हाती आली आहे. (होळीचे आयोजन संपादक परिषदेचे होते म्हटल्यावर ती प्रायोजित असणार हे काय वेगळे व स्वतंत्र सांगावयास हवे? होळीतल्या एकेका गोवरीपासून आगपेटीच्या काडीपर्यंत व गुलाल-बुक्क्यापासून प्लास्टिकच्या पिचकारीपर्यंत एकेक गोष्ट व वस्तू तेथे प्रायोजित होती. होलिकोत्सवाचे श्रीफल तेवढे संपादक परिषदेच्या मालकीचे होते! त्यातही वदंता अशी, की तो नारळ संपादक परिषदेने सत्काराचे साटेलोटे करून कमाविलेला होता! सत्य-असत्य रा. रा. यशवंत पाध्ये जाणे!!)
या फेस्टिव्हलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास बहुतेक सगळे संपादक दस्तुरखुद्द उपस्थित होते. यात कोणासही नवल व आश्चर्य वाटेल. परंतु लक्षात घ्या, या कार्यक्रमाचे आयोजक आहेत - संपादक परिषद! (होय, होय, तीच संपादक परिषद, की जी संपादकांस प्रायोजित पुरस्कार देते. मंदीच्या काळात या पुरस्कारांचे मूल्य व मोल अधिकच वाढलेले आहे मित्रहो!) तेव्हा आता अधिक काळनाश न करता आपण पाहू या, या शिमगोत्सवातील नेहमीच्या यशस्वी संपादकांच्या रंगपंचमीचे संपादित अंश...
ते पाहा,
होळीचे ढोलताशेझांजनगारे जोरजोरात वाजत असताना एका कोप-यात काही जण घोळक्याने उभे आहेत. इसवीसन तीन हजार नऊमध्ये जगभरातला शिमगोत्सव कसा असेल, याचा त्रिकालवेध ते घेत आहेत व तेथे रा. रा. प्रवीण टोकेकर ते रा. रा. संजय आवटे सदृश चेहरे दिसत आहेत म्हटल्यावर, तो नक्कीच केतकरपीठाचा सत्संग असणार! पण तेथे रा. रा. कुमार केतकर दिसत नाहीत. ते कोठे आहेत?
ते पाहा, दिसले. कुमार केतकर. आपल्या फाऊंटन पेनचे टोपण उघडून त्यांनी सपकन् कोणाच्या तरी पाठीवर काळ्या शाईचा सपकारा मारला! कोण बरे असेल ते? पाठीमागून तरी ते रा. रा. अरुण टिकेकर वाटताहेत. त्यांनी पवारांच्या भाषणांचे संपादन केले, त्याची तर ही सजा नव्हे?
रा. रा. डॉक्टर मात्र अत्यंत तारतम्याने रंग उडवित आहेत. वास्तविक ते रंग उडवित आहेत असे म्हणणे हे मोठेच उदारमतवादी विधान झाले. सिगारेटची राख झटकावी, तसे ते रंग झटकीत आहेत! पिचकारी रंगाची असो, की मतांची, हातात पेपर असल्याशिवाय त्याचा परिणाम होत नाही, हे त्यांस जाणवले असेल का?
डॉक्टरांप्रमाणेच रा. रा. अशोकराव पानवलकर (पक्षी - अप्पा) हेही अत्यंत धीरगंभीरपणे रंग खेळत आहेत. आपल्या कनिष्ठाच्या कधी गाली, तर कधी पाठीवरी ते रंगचपराक वा रंगथाप मारत आहेत.
बघा, बघा, त्यांनी आपल्या एका कंत्राटी सहका-याच्या अंगावर अचानक रंग टाकला. पण त्याबरोबर तो बिच्चारा एवढा दचकला व टरकला व घाबरला की त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले! त्याने घाईघाईने अप्पांनी कोणता रंग टाकलाय ते पाहिले. रंग पिंक स्लिपसारखा नव्हता! तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला!
अप्पांच्या रंगपंचमीतही एक सराईतपणा दिसतो आहे. मटाचा प्लास्टिक इमल्शन काढून त्यास टिकावू रंग देण्याचा नेटका उद्योग त्यांनी अलीकडे सुरु केल्याचे सांगणारे सांगतात. त्यातून तर त्यांस ही रंगसफाई साधली नसेल?
मटातील सहका-यांपासून सावध अंतर राखून कोणी एक व्यक्ती फिरताना दिसत आहे. पांढरीफेक सुरवार, पांढराफेक कुर्ता. डोईस कोल्हापुरी फेटा. उंच कपाळी गुलालाचा उभा टिळा. छातीवर हात जोडून येत्या-जात्यास पुढारी-छाप नमस्कार. रा. रा. संजीव साबडे तर नव्हेत हे? आता ऐन होळीत, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी असे गाणे गुणगुणत कोणी अत्तराचा फाया हुंगत चालले असेल, तर त्याची अन्य काय बरे ओळख असेल? साबडेच असावेत ते. स्वप्नपूर्तीच्या आनंदरंगात ते इतके न्हाऊन गेले आहेत, की इतरांना रंग लावण्याचेही भान त्यांना उरलेले नाही. पण समजा त्यांनी रंग टाकले, तरी ते पक्के बसणारच नाहीत, याची काळजी घेण्यासाठी सकाळ आणि लोकमतने पूर्ण सज्जता केली आहे. याची कल्पना त्यांस असेल काय?
अरेच्चा! ती चंमतग पाहा... तिकडे तिकडे... आली का तुमच्या रडारवर? येतेय का ऐकू?
"आज माझ्या या पृथ्वीवर माझ्या आकाशाखाली माझ्या जमिनीवर ही माझी होळी माझे लोक साजरे करीत आहेत. माझ्या या पारंपरिक सणामध्ये मी आणलेले माझे रंग मीच उडविणार आहे. माझी रंगाची पिचकारी माझ्या डाव्या हातात आहे. माझ्या उजव्या बाजूला मी माझ्या मी मी मी...."
तर वाचक हो, हा आजचा सवाल!
काय असेल बरे त्यांचे नाव? नक्कीच मीखिल! कोणावर बरे त्यांनी नेम धरलाय? शिरिष पारकर (संपादक, पा. महाराष्ट्र माझा, मुखपत्र, मनसे) यांच्यावर तर नव्हे? (परंतु ते असे कोणावरही पिचकारी टाकू शकतात. उद्या त्यांच्यासमोर दगड आणून बसविला, तरी ते त्यालाही पिचकारतील, की 'तुम्हाला असे वाटत नाही का, की तुम्ही रस्त्यावर येथे तेथे पडता त्यामुळे सर्वच पक्षांच्या गुंडांना दगडफेक करण्यास प्रोत्साहन मिळते?'... ते कुणालाही बोलण्याची संधी न देऊन निरुत्तर करू शकतात!!) पुढची निवडणूक लक्षात घेऊन ते बहुधा येथे पिचकारीची प्रॅक्टिस करण्यासाठी आले असावेत!
रंगपंचमी आता अगदी रंगात आली आहे. प्रत्येक संपादक दुस-याकडे पाहून न पाहिल्यासारखे करीत रंग खेळत आहे. संजय राऊत हे मात्र त्यात दिसत नाहीत. त्यात नाहीत म्हणजे नक्कीच ते एखाद्या च्यानेलास बाईट देत असणार. अगदी बरोब्बर. ते पाहा, ते तिकडे एका च्यानेलबाळास एक होलिकागीत ऐकवित आहेत. 'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज घड्याळाचा काटाही रुतावा हा पवारगेम आहे...' ते ऐकून रा. रा. आल्हाद गोडबोले यांच्या हातातील रंगास मात्र उकळ्या फुटत होत्या! या रंगाचा पिचुकप्रहार कोणावर करावा, हे विचारण्यासाठी, ते पाहा, त्यांनी बंगल्यावर फोन लावला आहे.
त्यांचा फोन सुरु असतानाच रा. रा. उत्तमराव कांबळे (पक्षी - महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री) तेथे हजर झाले. ते सकाळचे सर्व्हेसर्वा. त्यामुळे त्यांच्यासमवेत ३६ बातमीदारांची फौज होतीच. आल्याक्षणी त्यांनी घड्याळात पाहिले. मग बातमीदारांची मिटिंग घेतली व लोक टमरेलाने रंग उडवितात की पिचकारीने याच्या सर्वेक्षणाला बसल्याजागी सुरुवात केली! हल्ली त्यांचा सर्वेक्षणावर मोठा जोर. त्याचबरोबर हल्ली सर्व कामे घड्याळाबरहुकूम करण्यावरही त्यांचा कटाक्ष, असे सांगणारे सांगतात. कामकाळवेळेचे गणित बरोब्बर व सुयोग्य जमल्यामुळेच त्यांचे 'पुण्यावर स्वारी' हे नवे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे, असेही सांगणारे सांगतात!
होळी आता बरीच रंगबिरंगी झाली आहे. बाकीच्या संपादकांचे चेहरे तर अंदाजानेही ओळखणे कठीण झाले आहे.
निवडणुकीच्या काळात होळी आली की असेच होते. भूमिका व चेहरे इतके बदलतात, की हेच का ते, असा प्रश्न पडावा.
तेव्हा आता त्या फंदात आपणां जनसामान्यांनी न पडलेलेच बरे...
त्यांचे हे असे रंग त्यांनाच लखलाभ होवोत.
गड्यांनो, आपणांसाठी आपले सीएमवायकेच बरे!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १२ मार्च २००९)
![]() |
| ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी घेतलेली नाशुआ टेलिग्राफचे बातमीदार मायकल ब्रिंडले यांची मुलाखत वाचा कळते-समजतेवर. |
(आजची (वास्तविक रोजचीच) समस्त पत्रे पाहून आम्हांस एक प्राचीन कहाणी आठवली. आपल्या प्राचीन लोककहाण्यांमध्ये जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान भरलेले असते असे आमच्या सरोजिनीआज्जी बाबर म्हणायच्या. ते खरेच आहे. कारण की या कहाणीत आम्हांस आजच्या वृत्तजीवनाचे समग्र सार पाहावयास मिळाले. वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो, सादर आहे हर (पक्षी - प्रत्येक) वारची कहाणी.)
एक होतं नगर. तेथे होता एक पेपर. पेपरला होता संपादक. संपादक मोठा हुशार. रोज हापिसात जाई. धनादेशी सह्या करी. मस्टरे तपासी. बातम्या पाही. बैठका घेई. कार्येक्रमी जाई. भाषणे करी. उद््घाटने करी. कचेरीतल्या प्रजेला मेमो देई. मालकापुढे म्यांऊ करी. संपादक कधी कधी लेखही लिही. रोज रोज ही कामे करी. एकटाच जीव. थकून जाई. एक दिवशी काय झाले, त्याने सगळी कामे केली. कामे करून खूप थकला. तेव्हा त्याने विचार केला. संध्याकाळी सदनिकेस गेला. सदनिकेत होती त्याची बायको. तिला मोठे नवल वाटले. एरवी येतात रात्री आठला. आज सहाला कसे आले. आले घालून चहा केला. संपादकांच्या हाती दिला. काळजीने पुसले, का हो राव, बरे नाही का. संपादक बुद्धिनिष्ठ म्हणाले, निवडणूका लागल्यात. जबाबदारी पडते. सगळ्यांस कामास लावावे लागते जाहिरातींच्या. म्हणून थोडा शिणलो. लवकर घरी आलो. असे म्हणून संपादक सोफ्यावर विसावला. चहा घेतला. नास्ता घेतला. मग रात्री अंमळ भोजन केले. जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या. मग तो पलंगी गेला. पलंगासमोर होता टीव्ही. संपादकाने टीव्ही लावला. त्यावर लावली वृत्तवाहिनी. वृत्तवाहिनीवर होती बातमी. बातमी होती कोंबडीची. चार आण्याची कोंबडी तिला रुपयाचा मसाला. संपादकाने बुद्धिनिष्ठ विचार केला. म्हणाला, ही कसली फालतूची बातमी. मग त्याने लावली दुसरी वृत्तवाहिनी. तिच्यावरपण हीच बातमी. मग त्याने लावली आणखी दुसरी वृत्तवाहिनी. तिच्यावरपण हीच बातमी. सगळ्या वाहिन्या लावून पाहिल्या. सगळीकडे कोंबडीचीच बातमी. चार आण्याची कोंबडी तिला रुपयाचा मसाला. संपादक विचारात पडला. ही मोठीच महत्त्वाची बातमी. मग त्याने काय केले. बुद्धिनिष्ठ निर्णय घेतला. कचेरीला दूरध्वनी केला. कचेरीत होता चिफ्सब. संपादक म्हणाला, चिफ्सब चिफ्सब, आज काय विशेष? चिफ्सब म्हणाला, विशेष असं काही नाही. अमुक अमुक बातमी आहे अन् तमुक तमुक बातमी आहे. संपादक भडकला. कोंबडीची बातमी माहित नाही. कामे करता की हजामत करता. मग तो चिफ्सबला म्हणाला, कोंबडीची बातमी कुठंय. चिफ्सब गडबडला. चिफ्सब गोंधळला. म्हणाला, तशी बातमी आली नाही. संपादक म्हणाला, एवढं समजत नाही साधं. उद्या पहिल्या पानी सगळीकडे येईल. बातमी करून घ्या. पहिल्या पानी मोठी करा. चिफ्सब सटपटला. मग सावरला. टीव्हीवरून बातमी केली. चार आण्याची कोंबडी रुपयाचा मसाला. त्यात पदरचा मसाला घातला. काही कोट घातले. काही बॅक्ग्राउंड घातले. बातमी सजवली-धजवली. पहिल्या पानी छापली. दुस-या दिवशी गंमत झाली. सगळ्या पेपरांत तीच बातमी. संपादक खुश झाला. चिफ्सब खुश झाला. वितरणवाले खुश झाले. सगळ्या वृत्तवाहिन्यासुद्धा खुश झाल्या. त्यांना आज हुश्श वाटले. काल त्यांना वाटले चार आण्याची बातमी तिला रुपयाचा मसाला घातला. आपण हे काय केले. आज त्यांना वाटले, सगळ्यांनीच बातमी लावली. म्हणजे बातमी मेजर होती. तेव्हापासून वृत्तनगरीत हीच रीत झाली. वाहिन्या चार आण्याच्या कोंबडीला कितीही रुपयाचा मसाला घालू लागल्या. पहिल्या पानाच्या बातम्या वाहिन्याच ठरवू लागल्या. प्रजेला मसालेदार बातम्या मिळू लागल्या. वाहिन्यांचा टीआरपी वाढला. पेपरांचा खप वाढला. सगळा आनंदीआनंद झाला. अशी ही हरवारची कहाणी दहा पानी सुफळसंपूर्ण.
(Posted by बापू आत्रंगे, दि. ०७ मार्च २००९)
अर्थशास्त्रात आम्हांस अजिबात गती नाही.
वास्तविक समग्र शास्त्रांची निर्मिती आमुच्या डोक्यावरून जाण्याकरीताच झालेली आहे. परंतु त्यातही आकड्यांचा खेळ आम्हांस मुळीच कळत नाही.
(तुम्हांस सांगतो, या आकड्यांनी आमुच्या जीवनप्रवाहात एवढे अनर्थ केले आहेत, की केवळ त्यांमुळे आम्हांस पुनवडीतील एका वृत्तपत्रातील नोकरी गमवावी लागली होती! त्याचा इतिहास असा, की एके प्रभाती आम्ही कचेरीत आलो. तर तेथे ही बोंबाबोंब सुरू, की ओपनचा आकडा चुकला! एकवेळ अंकाची तारीख चुकली, चालले असते! सिनेमाच्या दोन जाहिराती कमी गेल्या असत्या, चालले असते! पण आकड्यात चूक? तोबा तोबा! आता रात्री दूरध्वनीवरून आम्हीच ते कल्याणकारी आकडे घेतलेले असल्याने आमच्या नोकरीस आकडी येणार हे ठरलेलेच होते! हल्ली त्या वृत्तपत्रात आकडे येतात की नाही माहित नाही. बरेच दिवस अमृततुल्यात गेलो नाही ना!!)
तर मुद्दा असा, की ज्यांना हे अर्थशास्त्र समजते, ते अमर्त्य वेगळे! आम्ही आपले मर्त्य असल्याने आम्हांस साधे ग्यानबाचे अर्थशास्त्रही समजत नाही.
तर आमुच्या या अज्ञानाचा अंधकार इतुका घनगर्द असल्यामुळे झालेय काय, की सांप्रती वृत्तपत्रसृष्टीत जे काही अनर्थ सुरु आहेत त्यांचा ताळमेळच आम्हांस लागत नाही.
आता तुम्ही पुसाल, की आम्ही कोणत्या अनर्थांबद्दल बोलत आहोत?
आम्ही बोलत आहोत, खर्चकपातीबद्दल.
आम्ही बोलत आहोत, नोकरकपातीबद्दल.
आम्ही बोलत आहोत, पर्णसंख्याकपातीबद्दल.
आम्ही बोलत आहोत, वृत्तपत्रांच्या कचे-यांतून वाहत असलेल्या असुरक्षिततेच्या प्रदुषित हवेबद्दल.
एकीकडे बोरीबंदरपासून बेलापूरपर्यंतच्या समस्त वृत्तवाहिन्या व पत्रकचे-यांतून अशी गुदमर सुरु असताना, दुसरीकडे म्यानेजमेन्ट नामक अपौरुषेय व्यवस्थेचे सगळे कसे सुशेगात सुरु आहे, याचाच आम्हांस अपूर्व अचंबा वाटतो आहे.
त्याहून नवल वाटते आहे ते हे, की ही आर्थिक मंदीची आकाबाई काही नेमक्याच पत्रांमध्ये कशी काय बोवा घुसली?
कारण की चित्रपट तर असा दिसतो आहे, की लोकमत, पुढारी, देशोन्नतीसम पत्रे 'आली निवडणूक पर्वणी' असे गातगात आस्तेकदम विस्तारत चालली आहेत. त्यांस का आर्थिक मंदी माहित नाही? त्यांस का कागदाचे वाढलेले भाव ज्ञात नाहीत? त्यांच्या जाहिरातींचे कॉलम-सेंटिमीटक का बरे आकसले नाहीत?
हे झाले पत्रांचे. आता च्यानेलांचे बघा. गेलाबाजार दीड-दोनशे नवी च्यानेले म्हणे परवानगीच्या रांगेत उभी आहेत.
या पत्र व च्यानेलांमध्ये नोकर भरती सुरु असताना, अन्यांनाच का बरे ओहोटी लागली आहे?
हे असे तर नाही ना, की ज्या ठिकाणी ओहोटी लागलेली आहे, त्या ठिकाणच्या व्यवस्थेतच काही खोट होती?
आम्हांस काहीच कळेनासे झाले आहे.
आमचे म्हणणे इतकेच, की म्यानेजमेन्टल चुकांमुळे नोकर कपात सुरु असेल, तर ते शंभरवेळा चूक आहे. अशा वेळी कोणास एकदम नोकरीवरून काढून रस्त्यावर आणण्याऐवजी प्रथम ओबामासूत्र (पक्षी - वरिष्ठांच्या खादाडीत कपात) अवलंबिले तर ते योग्य ठरेल.
अर्थात जर कोणी मंदीची संधीच साधून कर्मचा-यांस कमी करीत असेल, तर मग त्यांस आपल्यासारखे अन्यायाविरोधात लढणारे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सदा संघर्षरत असणारे निर्भिड पत्रकार तरी काय करणार म्हणा!
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
आधीच आम्ही कबूल केले आहे, की आम्हांस अर्थशास्त्रात शून्य गती आहे.
तेव्हा आमचे उपरोक्त विचार योग्य आहेत की अयोग्य, हे आता तुम्हीच सांगायचे आहे.
(वैधानिक इशारा - क्रिपया लिखते समय अपनी नोकरीं का खयाल करें.)
(Posted by बापू आत्रंगे, दि. ४ मार्च २००९)
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com


