हे दिवस वस्तुतः हर्षोल्हासाचे वगैरे नाहीत. रोजगाराची शाश्वती नाही. आपल्याच डेस्कावर इतुके दिन काम करणारा सहकारी. एक दिवस अचानक कुजबुज सुरु होते, की तो गेला! ऐसा कठिण समय पातलेला आहे. तशात वास मारणा-या खोबरेल तेलासारखे वेतन गोठलेले आहे. पत्रोपत्री सार्वत्रिक सुतकपर्व सुरु आहे. अशा काळी कोणास बरे भरली अवनी मोदाने असे वाटले?
परंतु तुम्हांस सांगतो, आमच्या मनीचा मोगॅम्बो सध्या अत्यंत खुश आहे! आमच्या बरगड्यांमध्ये आनंद मावेनासा झालेला आहे! गालफडांमध्ये हसूचे मळे फुलले आहेत!
याचे कारण म्हणजे ब्लॉग!
माय मराठीच्या पत्रदरबारात सध्या जी ब्लॉगची बाग फुलेलेली आहे, ती पाहून आमची छाती सहर्ष फुगली आहे.
तसे पाहता मराठी पत्रकारांचे तंत्र ज्ञान अगाध! अनेकांच्या दृष्टीने संगणक आणि गोदरेजचा टैपरायटर यात फरक असा नाहीच. इंटरनेट म्हणजे तो केवळ सुरस आणि चमत्कारिक साईटा पाहण्याचे माध्यम! परवा म्हणे रा. रा. सुरेश्चंद्र पाध्ये, रा. रा. राजीव साबडे, रा. रा. वसंत भोसले, रा. रा. जयंत महाजन आदी करून सकाळपत्राचे पुष्कळ संपादक (आमच्या लेखात ही सकाळ सारखी सारखी का बरे उजाडते? याकारणें लोक आम्हांस हल्ली सकाळवाला ऐसे चिडवू लागले आहेत!) पुनवडीच्या अप्पा बळवंत चौकात वणवणत होते. कुठल्याशा पुस्तकाच्या शोधात साताठ संपादक ऐसे ते मोठे विलोभनीय दृश्य पाहून कोणी चौकशी केली, की संपादकमहोदयहो, आपण ऐशा कोणत्या बुकाच्या शोधात आहात? तेव्हा रा. रा. जयंत महाजन रागेजून बोलले, की काय हे तुमचं पुणं? आमच्या मराठवाड्यात नवनव्या पुस्तकांचा कायम अनुशेष म्हणून इथं पुण्यात आलो, तर इथल्या बुकभांडारातही पुस्तक मिळेना! आणि म्हणे पुणं तिथं काय उणं! तेव्हा पुसणाराने पुसले, की किंतु तुम्हांस कोणते बुक हवे आहे? त्यावर ते सर्वे म्हणाले, फेसबुक!! साक्षात हिंजवडीनजीकच्या पुनवडीत संगणकसाक्षरतेची अशी परिस्थिती! अर्थात चूक त्यांचीही नाही. सकाळपत्राचे तंत्रप्रेमी (तंत्रप्रेमी म्हणजे तंत्रज्ञानाची आवड असलेले. वास्तुशास्त्र, यज्ञयाग आदी तांत्रिक कर्माची आवड असलेले नव्हे!) मालक रा. रा. अभिजीत पवार यांनी मध्यंतरी एक जीआर काढला होता, की सकाळमधील सर्व पत्रकारू-नारूंनी फेसबुकावर यावे. त्याचा हा परिणाम होता! सकाळमध्ये ऐशी स्थिती तो आमुच्या लोकसत्तेत काही वेगळीच गंमत. परवा लोकसत्तेत (अखेर एकदाचा) युनिकोड दाखल झाला. तेव्हा तो युनिकोड असतो कसा, दिसतो कसा, बोलतो कसा हे याचि डोळां पाहण्याकरीता रा. रा. कुमार केतकर यांच्या केबिनीत पत्रकारूंची ही गर्दी झाली होती! त्यांस वाटले, युनिकोड म्हणजे युनिकॉर्न गेंडाच जणू!!
तर मुद्दा असा, समस्त पत्रसृष्टीत ऐशी व्यापक मंदी असतानाही ब्लॉगचे पिक मात्र जोरात आलेले आहे. ज्यांचा कोणास संशयही आला नसता, अशा पत्रपंडितांनीही धादांत ब्लॉग तयार केले आहेत. तुम्हीच सांगा, 'राज'-मान्य राजेश्री राजू परुळेकर यांचा ब्लॉग असेल, असा संशय तरी तुम्हांस आला होता का? किंवा रा. रा. प्रशांत दीक्षित (स्त्रोत - सकाळ) यांनी ब्लॉगस्थळ तयार केले असेल, असे तुम्हांस स्वप्नी तरी दिसले होते काय? किंतु या दोन्ही पत्रमूर्तींचे ब्लॉग आहेत. झालेच तर म्हाराष्ट्रटैम्सच्या संकेतस्थळी ब्लॉग आहेत. अलिकडेच ई-सकाळने लाली-पावडर-नखपॉलिश लावली! (ते पाहून अनेकांनी ईssssसकाळ म्हटले, तर अनेक त्यावर भाळले!) तर या नव्या मेकपातल्या ई-सकाळमध्येही ब्लॉग आहेत.
पूर्वी कोणी चुकूनमाकून ब्लॉग लिहिण्याचे अत्यंत धाडशी कृत्य केले, की त्याचे हितचिंतक म्हणत, काय, हल्ली हापिसात काम नसतें वाटतें! ब्लॉगिंग म्हणजे रिकामपणाचे उद्योग ऐसाच बहुतांचा समज! किंतु आता दिवस फिरले आहेत. (ई-सकाळवरील कन्वहर्जन्सवाले आमले (पक्षी - रा. रा. रवी आमले) यांचा सचित्र सटिक ब्लॉग पाहून तर नक्कीच वाटावे, की दिवस फिरले आहेत! ते पाहून कोणासही ऐशी जाणीव व्हावी, की म्हणजे काहीही लिहिले की जे काही होते त्याचे नाव ब्लॉग!! असो.) या फिरलेल्या दिवसांचे श्रेय मराठी पत्रसृष्टीपुरते तरी आमचे गुरुवर्य प. पू. विसोबा खेचर यांस द्यायला हवे! पूर्वीही मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज असत. परंतु प. पू. खेचरांच्या लेटअसभंकसमुळे ब्लॉग्ज ही वाचण्याची, चर्चेची चीज असते हे पत्रसृष्टीत मान्य झाले! तेव्हा मराठी पत्रसृष्टीतील ब्लॉग्जच्या लोकप्रियतेचे मोरपीस खेचरांच्या आयाळीतच खोचले पाहिजे! (याबाबतचे सर्व वाद मुंबई न्यायालयाच्या क्षेत्रात येतील, याची समस्तांनी नोंद घ्यावी.)
तथापि आम्हांस वाटते, की अद्यापही खूप ब्लॉग्ज येणे बाकी आहे. परवा हिंदुस्तानटैम्सची कळते-समजतेमधील बातमी वाचली आणि आम्हांस ऐसे हार्दिक वाटले, की मराठीतील कितीएक थोरथोर पत्रपंडितांचे ब्लॉग्ज येणे अद्याप बाकी आहे. हिंदुस्तानटैम्सचे मोजून १५ (अक्षरी पंधरा फक्त.) संपादक ब्लॉग लिहू लागले आहेत. आता पत्रसृष्टीच्या परंपरेनुसार जे इंग्रेजीत येते ते कालांतराने मराठीत आलेच पाहिजे! जसे की आधी इंग्रेजीने पत्रांतील कॉलम कमी केले. मग ते मराठीत आले. इंग्रेजीने पत्रकागदाची लांबीरुंदी कमी केली. ती मराठीत आली. इंग्रेजीने तृतीयपर्णी पत्रकारीता सुरु केली. मराठीने ती डोईवर घेतली. या रीतीरिवाजानुसार आता इंग्रेजी संपादक ब्लॉग्ज लिहितात म्हटल्यावरी, मराठीतील संपादकांनीही ते काम करावयास हवे. यामुळे किमान संपादकांस बाळबोधीत लिहिता येते हे तरी समस्तांस कळेल.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
लौकरच आम्ही यामिषाने काही मराठी एडिटरांस भेटणार आहोत. त्या भेटीचा वृत्तांत आपणांस ब्लॉगवरून सादर करूच...
तोवर बाय बाय.
हॅपी ब्लॉगिंग!
(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ जाने. २००९)
वठलेल्या बाभळीवर हिरवट काटे उगवावेत, गुलमोहराच्या तुकतुकीत फासळ्या हिर्व्या पानांनी लगडून जाव्यात, सामनाची गच्चकाळी पाने प्रहारसारखी सुटसुटीतसुंदर दिसावीत, असे काहीसे आज वृत्तपत्रांच्या कचे-या-कचे-यांतून दिसत आहे. बघा बघा, कितीएकांचे चेहरे आज कसे टवटवीत दिसत आहेत.
प्रत्येक मराठी पत्रात किमान एक तरी 'स्वानंद किरकिरे' (पक्षी - सतत किरकिर करून आनंद मिळविणारा) असतोच! कुंथता हृदय हे, ही त्यांची जन्मखूण! पण आज ते सुद्धा हासताना दिसत आहेत. अनेकांच्या मांड्या-पोट-या दुखत आहेत. कुणी स्वतःबरोबर कचेरीत डोके आणलेले आहे. ते किंचित ठणकत आहे. (मध्यंतरी कुठल्याशा पत्राने हॅंगोव्हरवरील कौटुंबिक उपाय छापले होते. ते वाचले नाहीत, दुसरे काय?)
पण तरीही सगळे छान व मस्त मनोवस्थेत आहेत. मोद विहरला चोहिकडे असेच तंतोतंत वातावरण आहे.
हे देवदुर्लभ दृश्य पाहून आम्ही तर अपार चक्रावून गेलो.
चौकशीअंती समजले, की हा दोन दिवसांच्या सुटीचा परिणाम आहे.
तसे पाहता आमच्या लोकसत्तेत, मटा ऑनलाईनीत एरवीही सप्ताहातून दोन दिवस सुटी असते. फायडेविक! तेव्हा त्यांना या सुटीचे काय कौतिक, असे कोणा संशयात्म्यास वाटेल. तथापि ही सुटी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याची दोन कारणे आहेत. अ) त्यातील एक दिवस समस्त पत्रकारांस सुटी होती. ब) वाचकांसाठी ही सुटी नव्हे, सुटका होती!
बातमीदाराचे बायलाईनकडे, उपसंपादकाचे आपल्याच पानात अधिक जाहिराती पडाव्यात, याकडे जसे लक्ष लागलेले असते, अगदी तसेच समस्त पत्रकारू-नारूंचे या सुटीकडे गत काही महिन्यांपासून ध्यान लागलेले होते. नोव्हेंबर-डिसेंबरात ठाण्याचे सोमणशास्त्री परंपरेनुसार समस्त पत्रांस पुढील सालातील सुट्यांचे पंचांग धाडतात. तेव्हाच अनेकांनी ही ऐतवारास जोडून आलेली गणतंत्रदिनाची सुटी मार्क करून ठेवली होती. कितीएकांनी तेव्हापासूनच या सुटीतील वेवस्थेचे नियोजन सुरु केले होते. विशेष म्हणजे प्रत्येक पत्राची अशा प्रकारच्या नियोजनाची एक पिढीजात पद्धत असते. लोकसत्तेत 'गोट'शोधमोहिम सुरु होते. सामनात उच्च पातळीवरून रिसॉर्टादींची वेवस्था केली जाते. मटा-सकाळादी पत्रांतून वर्गणीची चर्चा सुरू होते. अगदीच कडेलोट म्हणजे माथेरान, अलिबाग, वसई आदीकरूनच्या तीर्थस्थानांतील बातमीदारांशी संपर्क प्रस्थापित केला जातो. गत काही दिवस सर्वत्र हे सुरु होते.
आणि पाहता पाहता कालनिर्णयानुसार ऐतवारीच हा ऐतवार उजाडला
आणि काय सांगू महाराजा, समग्र शहर पत्रकारमुक्त झाले!
ऐतवारी सकाळीच कितीएकांनी इष्ट मित्रमैत्रिणींसह शहराबाहेर प्रस्थान ठेवले. कोणी पाणथळ प्रदेश गाठले, कुणी रानेवने गाठली, कुणी विश्रामस्थळे जवळ केली. आम्हांस आमच्या जन्मजात भोचकणातून नेमके कोण नेमके कोठे गेले याची जी गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून प्रहार, सकाळादीकरून पत्रांचे पत्रकार घोळक्याने गेले. कर्नाळा येथे रा. रा. नीलेश राणे यांची शेतीवाडी आहे. तेथे जाऊन प्रहारकरांनी कास्तकारी केली. सकाळचे बातमीदार बंधुभगिनी बदलापुर मुक्कामी गेले होते. तेथे त्यांनी जलक्रीडा केली. त्यांतील जे लिटिल च्याम्प होते, त्यांनी यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता वगैरे गीते म्हणत कंठाची साफसफाई केली. गंमत म्हणजे अगदी शनिवारपर्येंत मटाकरांचेही बारवी-बदलापुरी जाण्याचे घाटत होते. परंतु ते तिकडे गेलेच नाहीत. सकाळकर तिकडे जाणार हे बहुधा त्यांना समजले असावे! मटा, लोकसत्तादीकरून पत्रांतील पत्रकारू एरवीही स्वयंभू स्वतंत्र बाण्याचे असल्याने त्यांतील कितीएकांनी एकेकट्यानेच संचलन केले. यातही आमच्यासारखे काही जण होते, की ज्यांनी ही समस्त सुटी आपल्या गोधडीतच लपेटली. ती मंडळी खरी थोर!
तर अशाप्रकारे ओली व सुकी क्रीडा करून समस्तजन सोमवारी सायंकाळी वा रात्री स्वगेही परतले. सध्या या पौषसहलीचा आनंद पोटात त्यांच्या माईना अशी अवस्था आहे. तोच मोद समस्तांच्या चेह-यावर दिसत आहे.
आता आणखी काही दिवस त्याचेच कवित्व ठिकठिकाणी ऐकावयास मिळेल.
लोकांनी ते सांगण्यास आमची काही हरकत नाही. सांगावेच. निदान आम्हांस तरी सांगावे!
फक्त या पौषसहलीवर कोणी लेखबिख लिहू नयेत, एवढीच प्रार्थना.
ही पुरवण्यांच्या मलपृष्ठावरील प्रवासवर्णने आम्हांस मनःपूर्वक वात आणतात!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २७ जाने. २००९)
आत्ताच 'तारतम्य' वाचून आल्यासारखे सगळ्यांचे चेहरे दिसत होते. गंभीर. चिंताक्रांत. प्रत्येक जण आपल्याच विचारात मग्न होता. वाचक हो, कसला बरे विचार करीत असतील ते? महाराष्ट्रातील उदारमतवादी परंपरेला कोणते बरे ग्रहण लागले, असा का विचार करीत असतील ते? काय सांगावे? कदाचित दुसरा काय विचार करतोय याचाच विचार ते करीत असतील? दोन पत्रकार एकत्र आले की हेच घडते! येथे तर मराठी पत्रकुलातील अनेक कुलपती एकत्र आले होते.
वाचक हो, मराठीतील अनेक संपादक असे एकत्र बसून विचार करत आहेत, हे दृश्य पाहून आम्ही अगदी मोहरून गेलो. मनीं हरिभाऊ गोखल्यांची कविता उमटली - ये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा!
वाचक हो, मराठी आजी-माजी संपादक एकत्र येऊन विचार करीत आहेत. परंतु हा दुर्मिळदुर्घट कर्मयोग ते का बरे करीत आहेत, हे आपण तेथेच जाऊन जाणून घेऊ या.
वाचक हो, दैवाची गती न्यारी असते! या गतीमुळेच हरिभाऊंच्या 'गड आला पण सिंह गेला' मधील कमलकुमारी उदेभानास ओळखू शकली नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्हीही या संपादकांस ओळखू शकलो नाही. कारण की आम्ही तर पडलो अदनासे पत्रबारगिर. आम्हांस लेखणीची तरवार चालविणा-या आजी-माजी पत्रसेनानायकांची कोठून बरे ओळख असणार. तेव्हा वाचक हो, आपण अंदाजानेच त्यांची ओळख लावून घेऊ या. ती ओळख योग्य असेलच असे नाही. तरी पण चला तर...
-------------------------------------------------------------
ते पहा, ते संपादक बोलत आहेत. बोलत आहेत. बोलतच आहेत.
"वृत्तपत्रांवर पूर्वीपासूनच हल्ले होत आहेत. माझ्यावर तर अनेकदा हल्ले झाले. परंतु मी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे राऊत आहेत. मी त्यांच्याकडे वळणारच आहे. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक..." असे म्हणत त्यांनी पाण्याचा पेला ओठांस लावला. बोलून बोलून त्यांचा घसा दुखला असावा. घसा दुखत असला, तरी ते निश्चितच कुमार केतकर नव्हते. (घसा बसल्याने ते बैठकीला आले नव्हते.) तेव्हा वाचक हो, ते नक्कीच मीखिल वागळे (पक्षी - निखिल वागळे) असणार. त्यांनी ब्रेक घेतला म्हणून निश्वास नका टाकू! ते लगेच परत येणार आहेत!
"महाराष्ट्रात न्यायमूर्ती रानडेंनी रुजवलेली उदारमतवादाची परंपरा लुप्त होत चालली आहे, असा याचा अर्थ असला, तरी वृत्तपत्रांनीही आपली जबाबदारी ओळखून वागणे सद्यपरिस्थितीत आवश्यक आहे, असे आमचे ठाम मत आहे." हे डॉक्टर टिकेकरच. न्या. रानडे, उदारमतवाद, सद्यस्थिती हे सगळे आले म्हणजे ते डॉक्टर टिकेकरच असणार.
"पण मुद्दा असा आहे, की वृत्तपत्रांनी कुणावर अशी टिका करावीच का? त्यांना अन्य विषय नाहीत का? पुण्यातला बीआरटीचा प्रश्न केवढा गंभीर आहे! त्यावर लिहावे... आमचा जागर हल्ली बंद आहे. पण आम्ही लवकरच सप्तरंगमध्ये सदर सुरु करणार आहोत..." आनंदरावांशिवाय हे दुसरे कोण बोलणार? गेली दोन वर्षे ते सदर लिहिण्याचा विचार करीत असल्याची पुण्यात अफवा आहे.
"हे पाहा, नवाकाळने जे लिहायचे ते लिहिले. पण म्हणून त्यांच्यावर हल्ला व्हावा? ही लोकशाही आहे की मोगलाई? विचारांचा मुकाबला विचारानेच झाला पाहिजे. वृत्तपत्रस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे." संजय राऊत हे म्हणाले मात्र. बैठकीत एकदम सन्नाटाच पसरला. वागळेंना तर ठसकाच लागला. त्यांच्या डोळ्यांसमोर महानगरच्या फुटलेल्या काचांचे ढीग उभे राहिले!
"परंतु लिहिताना सभ्यतेचे काही नियम पाळायला हवेत की नकोत? सुपारीबाज लिहिल्यानंतर कोणी चिडले, तर त्याची जबाबदारी कोणाची?" हा प्रहार आल्हाद गोडबोलेंचा. हे बोलताना त्यांना एकदम ऍसिडिटी वाढल्यासारखे वाटले! मग ते शांत झाले.
"राऊतसाहेब, ते सगळं जाऊ द्या... पण त्या हल्ल्यानंतर तुम्ही नवाकाळमध्ये नेमके कशासाठी गेला होता हो?" जीभेच्या टोकाने पानपरागचा कण उडवित प्रवीण टोकेकर यांनी सहज विचारले. परंतु वाचक हो, टोकेकरांची सहजताही कधीच सहज नसते. याची कल्पना राऊतांना पुढे येणार होती.
"कशासाठी म्हणजे?" राऊत.
"नाही म्हणजे, तुम्ही हल्ला झाला म्हणून निळूभाऊंच्या समाचाराला गेला होता, की या हल्ल्यातून शिवसैनिकांना काही शिकता येईल का हे पाहायला गेला होता?... नाही म्हणजे नेमका तथ्यांश काय तुमच्या भेटीचा?"
यावर राऊत काही तरी रोखठोक बोलणारच होते, तोच दुस-या राऊतांनी म्हणजे भारतकुमारांनी आपला दृष्टिकोन मांडला.
ते म्हणाले, "मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने अद्याप कोणत्याही वृत्तपत्रावर हल्ला केलेला नाही...." मग बराच वेळ ते उद्धवजींवर बोलले. अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती असे सगळे विषय बोलून झाल्याची खात्री झाल्यावर ते थांबले. मग पहिल्या राऊतांना बोलायला काही विषयच राहिला नाही!
"हे पाहा, नवाकाळने अग्रलेख लिहिला. परंतु त्यानंतर राणे यांनी रडीचा डाव खेळला असे आमचे स्पष्ट मत आहे." वागळे म्हणाले व यावर प्रेक्षकांचा काही कौल आला आहे का, हे आपल्या (म्हणजे टीव्ही एटिनच्या) ब्लॅकबेरीवर पाहू लागले.
"रडीचा डाव म्हणजे? बोलायचे ते स्पष्ट बोला." गोडबोले उसळले. उसळणे भागच होते त्यांना!
"मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे. परंतु शिरिष पारकरांशिवाय मला असं कोणीही म्हणालेलं नाही. स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही एक्सएक्सला घाबरत नाही... हा शुद्ध एक्सएक्सएक्स आरोप झाला.." वागळे तडतड बोलू लागले. त्यांना वाटले, 'आजचा सवाल'च सुरु आहे.
"अहो गोडबोले, मी सांगतो रडीचा डाव म्हणजे काय ते... भाऊंनी अग्रलेख लिहिला. त्याला राणेंच्या समर्थकांनी उत्तर दिलं. म्हणजे फिट्टमफाट झाली. पण त्यानंतरही राणेंनी प्रहारमध्ये लेख लिहिला. हा रडीचा डाव नाही काय?" टोकेकर पानपरागची पुडी फोडत म्हणाले. तेव्हा त्यांच्या डोळ्यांत नेहमीचे मिश्किल हास्य होते.
"ही सर्व उदारमतवादी परंपरेच्या अस्ताची लक्षणे आहेत..." डॉक्टर सारखे आपल्याच निदानाकडे येत होते.
"अहो पण वृत्तपत्रांनीही लिहिताना काही भान राखले पाहिजे ना..." पुन्हा गोडबोले बोलले. त्यांना बोलणे भाग होते!
"काय भान राखायचे? हे सगळे राजकीय नेते त्याच लायकीचे आहेत... आणि वृत्तपत्रेसुद्धा. आमच्यावर हल्ला झाला तेव्हा आले होते कोणी?"
"एकदा भारतभरातले संपादक आले होते ना तुमच्या पाठीशी उभं राहायला? इथं नवाकाळवर हल्ला झाला तेव्हा त्यांना भेटायला दीडच संपादक गेले होते... एक संजय राऊत. हे पूर्ण संपादक आणि राज ठाकरे हे अर्धे संपादक! त्यांचा पेपर अजून निघायचाय ना!!" टोकेकर. त्यांच्यातल्या ब्रिटिश नंदीची शिंगे अशी अधूनमधून दिसतात.
"अहो, पण आपल्या चर्चेचा मूळ मुद्दा काय आहे?" दिनकर रायकरांनी तोंडातली जांभई आतच जिरवत विचारले. अनेक संपादकांप्रमाणेच तेही आतापर्यंत गप्पगप्पच होते.
"काय आहे मूळ मुद्दा?" वागळेंनी विचारले.
"मूळ मुद्दा... काय आहे तो?" राऊतांचा रोखठोक सवाल.
"हो हो... काय आहे मूळ मुद्दा?" भारतकुमारांच्या दाढीआडही प्रश्नचिन्ह होते.
वाचक हो, बहुधा सगळेच मूळ मुद्दा विसरले होते.
"हे पाहा, वृत्तपत्रांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध करून, सरकारने त्याविरोधात ठोस कारवाई करावी व हल्लेखोरांना शिक्षा करावी अशी मागणी करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत, असा माझा समज आहे." एका दमात एवढे मोठे वाक्य डॉक्टरच म्हणू व लिहू शकतात.
"ठिक आहे. करा निषेध." राऊत म्हणाले व राऊतांनी त्यास अनुमोदन दिले. हल्ल्यामागे काही शिवसैनिक नव्हते. तेव्हा निषेधास काहीच हरकत नव्हती.
"पण वृत्तपत्रांच्या भाषेचे काय?" टोकेकरांनी मध्येच पिन मारली.
"बरोबर आहे. सुपारीबाज भाषेत लिहिणारांचाही निषेध केला पाहिजे." गोडबोले म्हणाले. म्हणणे भागच होते!
"ठिक आहे. आपण असा ठराव करू या, की अभद्र, असभ्य भाषेत अग्रलेख वा बातम्या, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी छायाचित्रे वा व्यंगचित्रे प्रसिद्ध करणा-या वृत्तपत्रांचा आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणा-यांचा आम्ही निषेध करीत आहोत." हातातील धुम्रकांडीचा जोरदार झुरका घेत डॉक्टर म्हणाले. एक कागद घेऊन त्यांनी आपल्या सुवाच्चसुंदर अक्षरात हा निषेधाचा मसुदा लिहून काढला.
"चला, तर मग यावर करा सह्या..." असे म्हणत त्यांनी वर पाहिले.
पाहतात तो काय?
सगळे संपादक गायब!
-------------------------------------------------
वाचक हो, आता त्या खोलीमध्ये फक्त डॉक्टर टिकेकर, आनंद आगाशे आणि सिगारेटचा धूर उरला होता!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २४ जाने. २००९)
कळते-समजते मध्ये वाचा -
अखेर मुंबईत पुढारी येतोय!
आपला सिनेमास्कोप वर्षाचा झाला
वर्ल्ड न्यूजपेपर कॉंग्रेसलाही मंदीचा फटका
याशिवाय आणखी बातम्या
आणि खास लेखांच्या लिंक्स...
------------------------------------------
निवेदन
गेले काही दिवस बापू आत्रंगे यांचे लेखन बातमीदारमध्ये प्रसिद्ध होऊ शकले नाही, याबद्दल क्षमस्व.
पण आपल्या नेहमीच्या शैलीत बापू उद्यापासून बातमीदारवर दाखल होत आहेत.
- ब्लॉगएडिटर
रात्र थोडी आणि सोंगे फार असे काहीसे आमचे झाले आहे.
म्हणजे अजून खूप म्हणजे खूपच कामे करावयाची आहेत.
पहिल्या छूट गरम कपड्यांची व्यवस्था करायची आहे. जुन्या स्वेटरास भोके पडली आहेत. हात आखूड झाले आहेत. तेव्हा नवे स्वेटर घेणे भागच आहे. खरे तर आमचे परममित्र जे की प्रवीणभाई टोकेकर (पक्षी - ब्रिटिश नंदी व संपादक, लोकप्रभा) यांच्यासारखे रोम्यांटिक जाकिटच हवे! त्याचा फायदा म्हणजे त्याला खिसे असतात. त्यामुळे पानपरागच्या पुड्या व सोडावयाच्या पुड्या ठेवण्याची सोय होते! किंतु मंदीत लोकरीची बंडीसुद्धा चालू शकेल.
कानटोपी घ्यावी का? पण नकोच. त्याने उगाच मनी वयस्करता दाटून येते. रा. रा. गोपाळराव पटवर्धन (पक्षी - सकाळचे जुनेजाणते अभिजात सल्लागार) हेसुद्धा कानटोपी वापरत नाहीत. तेव्हा आपली मफलर बरी. तिच्यावर जरा नक्षी वगैरे असेल तर उत्तम.
हाथरूण-पांघरूण, न गोठणारे तेल, दाढीची पाती, अमृतांजनाची बाटली, डायरी, बॉलपेनच्या नळ्या, दम्याचे औषध असे सटरफटर सामानही याद राखून घ्यावयास हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक ब्याग. ती अर्थातच उसनी आणायची. एकदा केतकरांकडे फेरी मारावयास हवी.
आता तुम्ही मटातले असाल, तर विचाराल, की बापू कोठे वसईतल्या रिसॉर्टवर निघालात की काय?
सकाळमधले असाल, तर विचाराल, की बापू, पुन्हा सीटीसी की काय?
आणि पत्रकारुनारूतले नसाल, तर मनी म्हणाल, की बरोबर आहे! सरकारने पत्रकारांचे दौरे पुन्हा सुरु करण्याची घोषणा केल्याबरोबर बापू लागले तयारीला!!
परंतु वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो, दौराधिराज विजयराव नाईकांची (हल्लीचा पत्ता - लॉसेंजलिस, यूएसे) शप्पथ घेऊन सांगतो, तसे काहीही नसून, महाबळेश्वर येथे होणा-या साहित्य संमेलनास (काही चावट लोक यास साहित्य हनिमून म्हणतात!) आपखुशीने व स्वखर्चाने जाण्याचे आम्ही योजले आहे. सध्या त्याचीच तद्दन तयारी सुरु आहे.
आता तुम्ही पुसाल, की साहित्याचा आणि तुमचा संबंध काय?
अरे व्वा! साहित्याशी संबंध असण्याचा येथे संबंधच काय?
आमचे विजयकुमार बांदल (पक्षी - ज्येष्ठ गुन्हेवार्ताहर, निवृत्त.) पत्रकारसंघात गुन्हेवार्तांकनाची शाळा चालवतात. उद्या या न्यायाने तुम्ही त्यांना विचाराल, की तुमचा आणि गुन्ह्यांचा संबंध काय? (वृत्तपत्रांना कृषिउत्पन्न बाजारपेठेतील बाजारभाव पाठविण्याची पत्रकारिता ते करतात, यास तुम्ही गुन्हा म्हणणार असाल, तर मात्र प्रश्नच मिटला!!)
मुळात साहित्य संमेलनास जाण्याकरीता साहित्याशी संबंध असणे यांसारख्या अर्हतांची तंतोतंत आवश्यकता असते, असे काही आमचे मत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मराठी शारदेच्या दरबारातील एक रसिक वाचक म्हणून आम्ही महाबळेश्वरी साहित्येश्वरांना भेटण्यासाठी जाणार आहोत!
होय आम्ही हे अभिमानाने सांगतो, की आम्ही मराठी साहित्याचे रसिक वाचक आहोत!
नुसते वाचकच नाही, तर आम्ही सांस्कृतिक पत्रकारही आहोत.
अत्रे कट्ट्यावरील भाषणापासून नक्षत्रांचे देणेपर्यंतच्या कार्यक्रमांचे वृत्तांकन करणे, कोणी निवर्तले की अन्य साहित्यिकांच्या प्रतिक्रिया घेणे, कुणास पारितोषिक वा पुरस्कार प्राप्त झाला, की त्यांच्या पुस्तके व पुरस्कारांची यादी तयार करून छापण्यास देणे म्हणजे जी एकूण मराठी सांस्कृतिक पत्रकारिता(!!), ती आम्ही इमाने-इतबारे केली आहे. झालेच तर दिवाळी अंकांचा परिचय, पुस्तक परिक्षण अशी महत्त्वपूर्ण साहित्यिक कामेही आम्ही केली आहेत. (यासंदर्भात तुम्ही नीलाताई उपाध्ये (पक्षी - ज्येष्ठ सांस्कृतिक प्रतिनिधी, मटा, निवृत्त.) यांची अक्षरसाक्ष काढू शकता. त्या आम्हांस ओळखतात. एका पत्रकारपरिषदेत आम्ही दोघांनी मिळून एकाच प्लेटीतले बटाट्याचे वेफर संपविले होते!!)
वाचनाचे म्हणाल, तर आमचे वाचन प्रचंड आहे. वृत्तपत्रांत साहित्यविषयक जेजे येते तेते आम्ही नेमाने वाचतो.
म्हणजे बघा, लोकसत्तेच्या लोकरंगातला एक पानी साहित्यरंग आम्ही वाचतो. त्यायोगे आम्हांस एका पुस्तकाचा परिचय होतो. एका पुस्तकाच्या ब्लर्बवरील मजकूर समजतो.
सकाळच्या सप्तरंगातला एक पानी साहित्यरंग आम्ही वाचतो. त्यायोगे आम्हांस सात-आठ पुस्तकांचा एकसमयावच्छेदेकरून परिचय होतो. एका पुस्तकास १७० शब्द (अक्षरी एकशे सत्तर फक्त. चुभूद्याघ्या.) म्हणजे साहित्याचा केवढा मोठा गौरव तो!
प्रहारमधले शेवटचे पान आम्ही वाचतो. त्या मध्यंतरातला इंग्रेजी बुकमार्क तर आम्हांस थेट वैश्विक साहित्याशी नेऊन धादांत भिडवतो.
मटा, सामना, लोकमत यांतून दर ऐतवारी आम्हांस अशीच भरगच्च साहित्यमेजवानी मिळते.
तुम्हांस सांगतो, आमची वृत्तपत्रे ही जी साप्ताहिक भरगच्च साहित्यसेवा करीत असतात, ती पाहून कधी कधी आमचा कंठ दाटून येतो! साहित्यशारदेचा हा एक पानी पत्रीयदरबार म्हणजे महाराष्ट्रीय साहित्यपरंपरेच्या शिरपेचातील लखलखते सुवर्णपत्रच आहे!!
हे पाहून आम्हांस पुर्वीच्या मैफलची, साहित्यमेट्रोची अजिबात याद येत नाही. मैफल तर केव्हाच उठून गेली. उरला तो सबगोलंकारी संवाद. साहित्यमेट्रोचेही तेच. पूर्वी डॉक्टरसाहेबांनी (पक्षी - डॉ. अरुण टिकेकर, ज्येष्ठ संपादक, निवृत्त) सकाळमध्ये असताना ही साहित्यिक पुरवणी सुरु केली होती. काही दिवसांनी डॉक्टरसाहेब सकाळमधून गेले. मग ती पुरवणीही निवर्तली. पण पुरवण्या गेल्या म्हणून काय झाले, साहित्याप्रती वृत्तपत्रांची जी समग्र जबाबदारी आहे ती तर कायमच आहे!!
या जबाबदारीच्या जाणीवनेच आम्ही साहित्यसंमेलनाला जाणार आहोत.
तेथे यंदा थंडी असेल, पण तरीही दोन-तीन दिवस मस्त साहित्यिकटैमपास होणार हे नक्की!!
शिवाय सिद्धेश्वराच्या जत्रेप्रमाणेच या जत्रेच्या बातम्या दिल्या,
की साहित्यिक जबाबदारी पार पडल्याचे समाधानही मिळेल.
वृत्तपत्रांस आणखी काय हवे असते?
(Posted by बापू आत्रंगे, दि. १८ जाने. २००९)
ते पाहा... ते पाहा....
महामहिम अशोकराव चव्हाण (पक्षी - मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) कसे गुपचुपचाप उत्तर महाराष्ट्री निघाले आहेत...
अंहं. विलासरावांपासून तोंड लपवून नाही निघालेत ते! असेच चाललेत. पण कुणासही सुगावा लागू न देता.
आता कशासाठी चालले आहेत म्हणे! जनस्थान पुरस्कारानिमित्ताने नाधोंना (पक्षी - माजी आमदार, विधान परिषद. अशोकरावांसाठी एवढी आणि एवढीच ओळख पुरेशी आहे!) भेटण्याकरीता का ते चालले आहेत? तसेही नसावे. अशोकराव आधी स्वतःचे स्थान पाहतील की जनस्थान? मग जात आहेत तरी कशासाठी?
सांगतो, सांगतो... परंतु आम्ही जे सांगतो आहोत तो डेटा चुकूनही नारायणराव, गडकरी, विलासराव प्रभृतींच्या हाती जाता कामा नये हं... तेव्हा रा. रा. रविकिरण देशमुख, रा. रा. प्रताप आसबे, रा. रा. सुरेंद्र हसमनीस, रा. रा. पद्मभूषण देशपांडे आणि रा. रा. प्रतापराव थोरात हे वगळून अन्यांनो, इकडे कान करा...
म.म.मु. अशोकराव चव्हाण हे उत्तर महाराष्ट्री, म्हणजे नेमके सांगावयाचे तर नाशकातील सातपुरात रा. रा. उत्तमराव कांबळे यांच्याकडे चालले आहेत.
कशासाठी म्हणजे? तुम्हांस काय वाटले पुस्तक प्रकाशन आहे तेथे? उत्तमराव दिवसाला एक पुस्तक लिहितील हो! स्वागताध्यक्षाची डायरी, एसेनेनची डायरी, नियोजनाच्या डायरीची डायरी... नववर्षी भेट मिळालेली प्रत्येक डायरी लिहून त्याचे पुस्तक काढतील ते. किंतु म.म. मुख्यमंत्र्यांना वेळ पाहिजे ना प्रकाशनाला जाण्याइतका. वेगळ्याच कामासाठी निघालेत अशोकराव.
साधी-सुधी भेट नसणार आहे ती.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
ती बिंब-प्रतिबिंबाची भेट असणार आहे!
ऊन-सावलीची भेट असणार आहे!
होय, या भेटीत मुख्यमंत्री आपल्या शॅडोला गळामिठी घालणार आहेत. या हृदयाचे गूज त्या हृदयी घालणार आहेत. चार युक्तीच्या गोष्टी समजून घेणार आहेत. अनुभवाचे बोल ऐकणार आहेत. एसेनेनचे अहवाल वाचून महाराष्ट्राचे प्रश्न समजून घेणार आहेत.
काय म्हणालात?
शाडू माहिती आहे... कारण की हल्ली तर बरेचसे संपादक शाडूचेच असतात... पण ही शॅडोची भानगड काय आहे?
किती हो तुम्ही अज्ञानअंधकारी!
तुम्हांस हेही माहित नसावे ना, की जनस्थानभूषण पत्रपंडित एसेनेनसम्राट राजमान्य राजेश्री उत्तमराव कांबळे हे या उभ्या महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री आहेत!
आम्ही कोणत्याही प्रकारचे नशापाणी न करता, स्वतःच्या अक्कलहुशारीने, कोणत्याही दबावाविना, पूर्ण शुद्धीने हे येथे घोषित करीत आहोत, की रा. रा. उत्तमराव कांबळे हे महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री आहेत! (जानुआरीच्या प्रथम सप्ताहीच बहुधा त्यांनी आपल्या केबिनीत बसून एकट्यानेच स्वतःस पद व गोपनीयतेची शपथ दिली म्हणतात. आता अशा शपथविधीत काय 'आनंद' असणार?... नव्हताच, असे सांगणारे सांगतात!)
आम्ही हे जाणतो, की ही माहिती भल्तीच उत्तेजक आहे. ही माहिती समजताच उभ्या महाराष्ट्रात राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक खळबळीची त्सुनामी येणार आहे. मंत्रालय हादरून जाणार आहे. शेअरबाजार व्होलाटाईल होणार आहे. परंतु आज ना उद्या एखाद्या सरकारी अहवालात ही माहिती आलीच असती. आणि एकदा अहवालात आली म्हटल्यावर, त्याच्यावरून तंतोतंत बायलाईन स्टोरी करायला एसेनेनला कितीसा वेळ लागतो?
आता तुम्ही पुसाल, की अनेकांच्या शॅडोलाही अज्ञात असलेले हे शॅडोवृत्त (यात आम्ही रा. रा. दिनेश गुणे (पक्षी - एसेनेनचे मुंबई प्रमुख) यांना गृहित धरलेले नाही. त्यांना सग्गळे माहित असते. फक्त ते मृणालताई नानिवडेकरांना सांगत नाहीत!) आम्हांस कोठून समजले? तर त्याचीही एक कथा आहे.
अगदी नेमके सांगायचे, तर जानुआरीतला असाच कोणता तरी दिवस होता. आम्ही असेच ५९५ बुधवार पेठेत गेलो होतो. तेव्हा मनीं म्हटले, सकाळभवनी आलोच आहोत, तर राज्यातील भारनियमनाच्या प्रश्नाची सुटका कुठवर आली आहे याची चौकशी तरी करावी. तेव्हा आम्ही रा. रा. यमाजी मालकर (पक्षी - संपादक, सकाळ) यांच्या केबिनी गेलो.
त्यांस लाल सलाम केला.
मालकरांचे लक्षच नव्हते.
तेव्हा दरवाजावर टकटक केले.
मालकरांचे लक्षच नव्हते.
तेव्हा आम्ही मोठ्ठ्याने इन्किलाब झिंदाबादचे नारे दिले.
चुकून 'नामांतर झालेच पाहिजे' अशी घोषणासुद्धा दिली.
मग सेवादलातली आठवतील तेवढी गाणी म्हटली.
पण त्यांचा काही प्रतिसादच नाही.
मनीं म्हटले, त्या पेटत्या दिवसांवर खुशहालीचे पाणी पडलेले दिसतेय! अरेरे!!
अखेरीस आम्ही मोठ्याने सीटीसी, व्हीसी, केआरे, गार्सिया असे काही चित्रविचित्र आवाज काढले.
त्याबरोब्बर साहेबांनी वर पाहिले!
आम्हांस या, या, असे म्हणत त्यांनी हातातील स्क्रूड्रायव्हर कम टेस्टर खमिसाच्या खिशात टाकला.
म्हटले, हे काय?
ते म्हणाले, काही नाही. कपॅसिटरवर लेख लिहिलाय. प्रुफं तपासत होतो.
म्हटले, व्वा. जोरात काम चाललेय.
ते म्हणाले, हे तर काहीच नाही. हा फक्त बारा अँपियरचा लेख आहे. यानंतर लवकरच मी एक ४४० व्होल्टचा लेख लिहिणार आहे.
म्हटले, व्वा व्वा. सरकारला धक्का देण्याचा विचार दिसतोय.
ते म्हणाले, एक जबाबदार शॅडो वीजमंत्री म्हणून आम्हांला ते केलेच पाहिजे. या सरकारमध्ये लोडशेडिंग दूर करण्याची कपॅसिटीच नाही.
शॅडो वीजमंत्री? पण तुम्ही तर संपादक आहात ना? बरे तुम्ही तर अशोकरावांना सकाळनायक असा पुरस्कारही नाही दिलात. मग तुम्ही मंत्री कसे काय झालात?
त्यावर मालकरसर डोळे बारीक करून दाढीतल्या दाढीत अत्यंत मृदुमुलायम हसले.
म्हणाले, आमचा पेपर सगळ्यांच्या एवढा पुढे आहे, की आज आमच्याकडे संपूर्ण मंत्रालय तयार आहे. आम्ही शॅडो मंत्रिमंडळाची नियुक्ती केलीय. सगळेच संपादक कॅबिनेट मंत्री झालेत. असोसिएट एडिटर राज्यमंत्री. तो आमचा डेस्क पाहिलात? उपसंपादक पानं लावताहेत तिथं. तिथला बोर्ड पाहिलात. काय लिहिलंय त्यावर?
आम्ही पाहिले. त्यावर कक्ष अधिकारी असे लिहिलेले होते! तेथे बाजूलाच एक शिपाई उभा होता. तो पट्टेवाला असावा!
आमच्या चेह-यावर अज्ञानाचा भारनियमनी अंधकार पाहून तेच पुढे म्हणाले, आम्ही प्रत्येक संपादकमंत्र्याकडे एकेक खाते दिले आहे.
म्हणजे खातेवाटपही झाले का तुमचे?
हो. मी वीजमंत्री आहे. म्हणजे यापुढे मी फक्त महाराष्ट्रातील ऊर्जा प्रश्नाचा अभ्यास करणार. मग वर्षातून एक दोन वेळा त्यावर अग्रलेख लिहिण्याची वेळ आली, की मीच तो अग्रलेख लिहिणार. समजा रस्त्याचा प्रश्न आला, की त्यावर आमचे सार्वजनिक बांधकाममंत्री लिहिणार..
अच्छा. हे असे आहे तर! चांगले आहे! पण समजा पत्रकारितेचा प्रश्न आला तर? वृत्तपत्रातील कामगारकपातीचा प्रश्न आला तर?
त्यावर ते काहीच बोलले नाहीत!
मग आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणे विचारले, बाकी मग कोणाकोणाकडे कोणकोणती खाती आहेत?
ते म्हणाले, त्यासाठी तुम्हांला उत्तमरावांना भेटावे लागेल. ते आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीच खातेवाटप केले आहे. म्हणजे संपादकांना मंत्रीपदं दिलीत. वृत्तसंपादकांकडे सचिवपदं सोपवलीत... असं बरंच काही त्यांनी केलंय... खूप कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत ते. सारखे अहवाल मागत असतात! पक्षश्रेष्ठींचा पाठिंबाही त्यांना आहे.
आम्ही म्हणालो, व्वा व्वा!
वृत्तपत्रे सरकार पाडत असतात, सरकार आणत असतात, हे आम्ही पाहिले होते, ऐकले होते.
सकाळ हे अखिल ब्रह्मांडातील पहिलेच वृत्तपत्र असावे, की ज्याने स्वतःचेच सरकार स्थापन केले आहे.
व्वा व्वा! वाहव्वा!! हे तर तंतोतंत सामराज्यच!!
सकाळभवनाच्या बाहेर पडताना आम्ही पाहिले,
त्या मजबूत इमारतीवर कशाची तरी भली मोठी शॅडो पडली होती.
कशाची असावी ती?
(Posted by बापू आत्रंगे, दि. १४ जाने. २००९)
पडू आजारी ही मौज वाटे भारी वगैरे कवितेत ठिक असते. परंतु आपली (आधीचीच तोळामासा) प्रकृती जेव्हा बिघडते, तेव्हा काय काय मौज येते, हे ज्याचे त्यास ठावे! आमुच्या वाचकांनी मात्र आमचा आजार भल्ताच एन्जॉय केला. आमच्याकडे पोचविण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवरून ते भलेच कळत-समजत होते. एक वाचक (वाचक कसला, जन्माचा वैरीच तो!) तर आमचाच चहा फुरकावत आम्हांस सांगत होता, की बापू, तुम्ही कश्शाची म्हणजे कश्शाची काळजी करू नका! बातमीदार 'आता' चांगला निघतोय!!...
आमच्या आजारावर कोणा बन्या बेरकी वाचकाने स्टिंगॉपरेशनही केले म्हणे!
(म्हणून आम्ही कोणा पत्रकारास घरी नेत नाही! घरी नेले, की त्यांच्या अंगात जणू आदेशभाऊ बांदेकरच संचारतात. इतका वैनी-वैनी म्हणून पाघळ लावतात, की कालांतराने आपणांस शंका यावी, की आपली बायको ही आपली बायको नसून आपली वहिनी आहे!) असो.
आम्ही लौकर बरे व्हावे यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी वाचक देव पाण्यात बुडवून बसले होते, असा भ्रम व्हावा इतके काही आम्ही तापग्रस्त नव्हतो! पण ज्या थोड्याफार वाचकांनी, पत्रकारांनी आम्हांस शुभेच्छा दिल्या, त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत! (आजारपणातून उठल्यावर माणूस किती भाऊक होतो नाही!!) हेही असो.
या सुटीच्या प्रदीर्घ कालखंडातही आम्ही वृत्तपत्रे वाचतच होतो. (तुम्हांस सांगतो, बालपणी कधी तरी पायाखाली हा कागद येतो आणि त्याच्याशी आपले जे नाते जडते ते कायमचे! फरक येवढाच पडतो, की पायाखालचा कागद हातात येतो!!) वृत्तपत्रांचे वाचन-मनन-चिंतन हे आमचे आनंदसाधन आहे. (शिवाय त्यातच आमचे वेतन सामावले आहे!) परंतु वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो, गेल्या काही दिवसांतील विविध वृत्तपत्रे वाचताना आम्हांस कमालीचा त्रास होत होता...
वास्तविक आम्ही इंड्या टीव्ही पाहू शकतो. साम मराठीवरील बातम्या ऐकू शकतो. (काही नतद्रष्ट सामला सकाळचा प्रभात असे म्हणतात! दुष्ट कुठचे! संजीवजी लाटकर, त्यांना किनई आपण पांडव कार्यक्रम पाहायला लावू हं!) आम्ही आयबीएन-वागळेवरचा आजचा सवालही आमच्या रडारवर घेऊ शकतो. परवा तर आम्ही, कोणी पाहात नाही असे पाहून, लोकमतचा अग्रलेखही वाचून काढला! (त्यात एवढे दचकायचे काय गडे? याच उत्साहाने आम्ही रा. रा. इरगोंडा पाटील यांची पुस्तकेही वाचतो म्हटले!) तर हे सांगण्याचा उद्देश इतुकाच, की तुम्हांस आमच्या दोन्ही मेंदूंच्या दणकटपणाचा अंदाज यावा! पण मित्रहो, गेल्या काही दिवसांतील विविध वृत्तपत्रांतील त्या त्या बातम्या वाचून आम्ही कमालिचे व्यथित झालो. आमचे आजारपण बळावले!
किंबहुना त्यासाठीच ही सर्व वृत्तपत्रे जाणीवपूर्वक व मुद्दामहून तशा बातम्या देत होती, असा आमचा स्पष्ट व उघड आरोप आहे.
आज काय म्हणे, या पत्रकारास पुरस्कार! उद्या काय म्हणे, त्या संपादकास पुरस्कार!...
किती किती चघळायच्या आम्ही जिलोसिलच्या गोळ्या?
किती किती वेळा प्यायचे आम्ही थंडथंड दूध?
काही लिमिट?
मुंबई मराठी पत्रकारसंघ वगैरेंचे पुरस्कार जाऊ देत. तिकडे काही आपली ओळख-पाळख नाही! पण राज्य शासन तर आमचेच ना? किंतु तिकडे पोंबुर्ल्यात दर्पण पुरस्कारांचा रमणा वाटला, तर त्यातही आमचे नाव नसावे? वृत्तपत्रांत प्रदीर्घ काळ असल्यावर हातून काही तरी लिहून होतेच ना! मग त्या निकषात आम्ही काय बसत नव्हतो का? बरे नसेल लिहिले आम्ही काही! नसेल लिहिला एकही शब्द! त्याबाबतीत आम्ही चालविला असेल पुण्यनगरीचे पुण्यश्र्लोक संपादक मुरलीधरशेठ शिंगोटे यांचा वारसा! पण ज्या संपादकीय पुण्याईने त्यांस बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाला, तेवढीही पुण्याई आमच्या गाठी असू नये? हाय हाय!! तिकडे दिल्लीत बघा. पाहा, सुरेखा टाकसाळबाईंना नोकरीत इतका काळ घालून निवृत्त झाल्यावर मिळालाच ना रु. १०,००० चा (अक्षरी दहा हजार फक्त) पुरस्कार!
तुम्हांस सांगतो, आता आम्ही तंतोतंत निर्धारच केला आहे. शेंडी तुटो वा पारंबी, पण आमच्या भिंतीवरल्या फळीवर पुरस्काराचा पेला आलाच पाहिजे. आमच्या ट्रंकेत पुरस्काराची शाल पडलीच पाहिजे. पुरस्काराच्या नारळाचे खोबरे आमच्या दाती अडकलेच पाहिजे. (त्यासाठी काय दोन-अडिचशे रुपये खर्च आला तरी बेहत्तर!)
या एवढ्या आजारातून आम्ही खडखडीत बरे झालो, की त्याच मोहिमेवर निघणार आहोत.
जरा त्या तालुका पत्रकारसंघांचे पत्ते आम्हाला कोणी देईल काय?
पत्रलेखकसंघांचे असले तरी चालतील.
राव, तेवढे कराच तुम्ही आमच्यासाठी...
(Posted by बापू आत्रंगे, दि. १३ जाने. २००९)
'सकाळ'च्या विशिष्ट अशा कौटुंबिक जिव्हाळ्याच्या निःपक्षपाती 'शैली'मुळे एखाद्या सुंदरशा बातमीचे कसे भजे होते, याचा एक नितांत सुंदर नमुना रविवारच्या (दि. ११ जाने.) अंकात पाहायला मिळाला.
पुण्यात झालेल्या 'वसंतोत्सव' या कार्यक्रमात शनिवारी झी मराठीवरील 'आयडिया सारेगमप'च्या 'लिटल चॅम्प्स'चा परफॉर्मन्स झाला. (प्रतिथयश गायकांनी वाईट वाटून घेऊ नये, परंतु या बालगायकांचा परफॉर्मन्स हेच यंदाच्या 'वसंतोत्सवा'चे खरे आकर्षण होते!) या मुलांनी उभ्या महाराष्ट्राला 'येड' लावलेय. लहानांपासून थोरांपर्यंत आणि शास्त्रीय संगीताच्या कानसेनांपासून पॉप संगीताच्या दिवाण्यांपर्यंत सर्व जण यांचे अक्षरशः 'फॅन' झाले आहेत. यात काहींचा अपवाद असेल, काही यांना 'बालकामगार' म्हणून हिणवतही असतील, परंतु यांनी महाराष्ट्राला वेड लावलंय ही गोष्ट खोटी मात्र नक्कीच नाही. असो. तर अशा या मुलांनी 'वसंतोत्सव' गाजवला. त्यांचा परफॉर्मन्स खूप रंगला, हे न्यूज चॅनेल्सवर दिसले.
ज्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला नाही, त्याची टीव्ही न्यूजही मिस केली, अशा पुणेकरांना या कार्यक्रमाची 'बहारदार' बातमी 'सकाळ'मध्ये वाचावयास मिळाली. स्वर्गस्थ नानासाहेब परुळेकरांची शप्पथ घेऊन सांगतो, 'सकाळ'ने त्या बातमीचे अक्षरशः भजे केले... तेही ताजे म्हणून विकले जाणारे शिळेपाके भजे! बातमी वाचल्यानंतर घडलेला प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे, असे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी शिकवले होते. पण 'सकाळ'ची बातमी वाचली आणि डोळ्यांसमोर वसंतोत्सवाऐवजी सुतकोत्सवी प्रसंग उभा राहिला! बातमीतील एक परिच्छेद केवळ गाण्यांच्या यादीने भरलेला होता. (गाणी आणि वाणसामान यात फरक असतो हे बहुधा त्या सकाळच्या लिटिल चॅम्पला ज्ञात नसावे!) कार्यक्रमात नाना पाटेकरने जी धमाल उडवून दिली, त्याचा तर साधा उल्लेखही नव्हता.
हीच बातमी 'लोकसत्ते'त वाचली, तेव्हा लक्षात आले की, हा कार्यक्रम किती रंगतदार झाला होता! या 'लिटल चॅम्प्स'सोबत धमाल करताना नाना पाटेकरचा फोटो आणि 'नानाचा ठेका अन् लिटल चॅम्प्सचा धमाका' असा आकर्षक मथळा पाहूनच मन त्या बातमीकडे वळले. याउलट 'सकाळ'मध्ये अत्यंत कोरडा असा फोटो आणि प्रचंड गोंधळात टाकणारे रुक्ष हेडिंग. (बहारदार सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध, वसंतोत्सवातील आकर्षणः बालगायकांनीही मने जिंकली!) यामुळे त्या बातमीवर एक क्षणसुद्धा थांबावेसे वाटले नाही. बरे, बातमीच्या लीडमध्ये बालगायकांचे वर्णन आणि हेडिंग बहारदार सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध? हा काय प्रकार? सकाळमध्ये सध्या बातमीदार, उपसंपादकांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे कळते-समजते. कदाचित या प्रशिक्षणानंतर तरी त्यांच्या बातम्यांमध्ये फरक पडावा! आमेन!!
(Posted by चांगदेव पाटील २.०, दि. १२ जाने. २००९)
(इमेज मोठी करण्यासाठी तिच्यावर क्लिक करा.)
राजमान्य राजेश्री बापू आत्रंगे हे ब-यापैकी बरे झाले आहेत. लवकरच ते बातमीदारच्या सेवेत दाखल होत आहेत. या दरम्यान, अनेकांनी ईमेल आणि कॉमेन्टच्या माध्यमातून त्यांची चौकशी केली. बापूंना नेमका आजार काय झाला असावा, याबाबतही सध्या चर्चा सुरु असल्याचे कळते. बन्या बेरके यांचा असा दावा आहे, की त्यांना तो आजार नेमका समजलेला आहे. सादर करीत आहोत बन्या बेरके यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन...
वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई)
आमच्या ब्लॉगएडिटरांचा फोन आला, की बापू आजारी आहेत, तेव्हा तूच एखादा लेख दे बातमीदारसाठी. ते ऐकल्यावर माझ्या पोटात खड्डाच पडला. मागे एकदा नाईन एक्स एम या वाहिनीवर लेख लिहिला होता. तेव्हा वाचकांनी त्याचे जे काही स्वागत केले होते ते माझ्या चांगलेच लक्षात होते. आधी मी नकोच म्हणाले. पण एडिटरसर कसले ऐकतात!
अखेर मी लिहायला बसले. परंतु विषयच सुचेना. तेवढ्यात, मागे एकदा बापू पुण्यात आले असताना त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा आठवल्या. कशावरून तरी वृत्तपत्रांच्या नावांवर आमच्या चर्चेची गाडी घसरली होती. त्यावेळी बापूंनी काही मनोरंजक माहिती दिली होती.
मराठीतली सुरुवातीची वृत्तपत्रे ही एतद्देशियांतील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठीच अवतरली होती. त्यामुळे तेव्हाच्या वर्तमानपत्रांची नावे ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानसिंधु, प्रभाकर, अरुणोदय, सूर्योदय, किरण, तमांतक अशी असत. केसरी, प्रतोद, दीनबंधू, शिवाजी, हिंदू पंच या वर्तमानपत्रांच्या नावांतूनच ती राजकीय वा सामाजिक सुधारणेच्या हेतूंनी प्रेरित असल्याचे स्पष्ट होते.
आजकालच्या जिल्हा किंवा तालुका पातळीवरील वर्तमानपत्रांची नावे पाहिली, की वाटावे ही वर्तमानपत्रे टाइम्स किंवा एक्स्प्रेसचीच भावंडे आहेत. बहुतेक पेपर एकतर वडगाव टाइम्स किंवा येडगाव एक्स्प्रेस असतात! बहुधा पेपर आणि कॉपी यांचे काहीतरी सनातन नाते असावे! टाइम्स या शब्दाचेच पाहा. वृत्तपत्र मालकांचे त्यावर काय प्रेम आहे न कळे! ब्रिटनमधल्या टाइम्सच्या नावाची कॉपी भारतातल्या टाइम्सने मारली. परंतु या भारतीय टाइम्सच्या नावाची मोहिनी आपल्या मराठीतल्या वृत्तपत्रकारांवरही मोठीच पडल्याचे दिसते. मराठीत १८६४ मध्ये शिवरामपंत परांजपे यांनी काळ हे वर्तमानपत्र काढले. त्याचे नाव हे तर टाइम्सचे शब्दशः भाषांतरच होते. केसरीतून बाहेर पडलेल्या नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नवाकाळ हे वर्तमानपत्र सुरू केले. शिवरामपंतांचा काळ, तर कृष्णाजीपंतांचा नवाकाळ! लंडनचा टाइम्स हा खाडिलकरांचा आदर्शच होता. उजव्या बाजूच्या पानावर अग्रलेख छापण्याची पद्धत नवाकाळने टाइम्सवरूनच उचलली होती. नावात काळ असलेले आणखी एक प्रसिद्ध दैनिक आहे. सकाळ.
सकाळ दैनिकाचे नाव हे त्याच्या मालकांनी, म्हणजे नानासाहेब परुळेकर यांनी ठेवले असले, तरी ते त्यांना सुचलेले नाव नाही. पुण्यात दैनिक सुरु करण्याची तयारी झाल्यावर या दैनिकाचे नाव काय असावे, यासाठी त्यांनी एक वाचकस्पर्धा घेतली होती. त्याची जाहिरात केसरीत प्रसिद्ध केली. हा प्रयोग अभिनव होता. त्यामुळे त्याची टिंगलही झाली, परंतु वाचकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. रा. के. लेलेंच्या इतिहासानुसार १२३२ जणांनी स्पर्धेत भाग घेतला. चार हजार नावे सुचविली. त्यातली काही अगदी मासलेवाईक होती. संजय, ओम, हार्ट ऑफ पूना, शिंग, कोकिळ, चंडोळ, राजहंस अशी काही नावे होती. काशिनाथ लक्ष्मण भिडे या विद्यार्थ्याने सकाळ हे नवा सुचविले होते. त्याला दीडशे रुपयांचे बक्षीस मिळाले. धुळ्याचे वकील भास्कर विनायक परांजपे यांच्या उद्या या नावाला ५० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. येथे प्रश्न असा पडतो, की सकाळ हेच नाव का निवडण्यात आले? बापू आत्रंगेंच्या मते, नावात काळ असल्यानेच हे नाव स्वीकारण्यात आले. याशिवाय त्याला दुसरे उत्तर व कारण नाही. टाइम्स हे वृत्तपत्र तेव्हाही गाजत होते, शिवाय पुणेकरांच्या मनात शिवरामपंतांच्या काळची स्मृती अजून जागृत होती. म्हणूनच सकाळ हे नाव परुळेकरांनी नक्की केले असावे. सकाळनंतर पुण्यात त्रिकाळ नावाचे वर्तमानपत्रही निघाले होते. सकाळमधून बाहेर पडलेल्या शिवराम लक्ष्मण करंदीकर यांनी ते काढले होते. तेव्हाच्या सकाळपेक्षा ते अधिक भारदस्त होते, परंतु सरकारी रोषाला बळी पडून ते बंद पडले. आज सकाळ, नवाकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स ही 'टाइम्स-दर्शक' नावाची वर्तमानपत्रे सुरु आहेत.
नावाची अशीच गंमत तरुण भारत या पत्राबाबत आहे. तरुण भारत हे संघविचाराचे वर्तमानपत्र. म्हणजे महात्मा गांधींचे विचार त्यांना मान्य नाहीत. परंतु या वर्तमानपत्राचे नाव मात्र गांधीजींच्या यंग इंडियाचे सरळसरळ भाषांतर आहे! आज यात विरोधाभासातून निर्माण होणारी गंमत दिसत असली, तरी तरुण भारतचा जन्म मुळी कॉंग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्यासाठीच झाला होता. कट्टर स्वराज्य पक्षातर्फे हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु करण्यात आले होते. १९४४ मध्ये ते दैनिक झाले आणि १९४९ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेले.
गांधीजींच्या यंग इंडियाचा आदर्श घेऊन जसे तरूण भारत निघाले, तशीच मराठीत तरुण महाराष्ट्र, तरुण मराठा, तरुण गोवा ही वर्तमानपत्रेही निघाली होती.
टाइम्स हे नाव धारण केलेले अगदी अलीकडचे वर्तमानपत्र म्हणजे सकाळ टाइम्स. हे नावच मोठे गमतीदार आहे. कारण त्यात काळ आहे आणि टाइम्सही!
यावर बापूंनी मोठी मार्मिक टिपण्णी केली होती. त्यांनी विचारले होते, की याचे मराठी भाषांतर सकाळचा काळ असे होऊ शकते काय?
भाषातज्ञ आणि पत्रकारांनी (कारण ते सगळ्याच विषयांतील तज्ञ असतात म्हणे!) याबाबत खुलासा करावा.
(Posted by अरुंधती पुणेकर, दि. १० जाने. २००९)
मित्रहो,
राजमान्य राजेश्री बापू आत्रंगे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे ते ब्लॉगपोस्ट लिहू शकले नाहीत. आणखी दोन दिवस तरी त्यांचा लेख येण्याची शक्यता नाही. ते लिहू लागताच एसएमएस अॅलर्टवर रजिस्टर झालेल्या वाचकांना तसा एसएमएस येईलच.
कळते-समजते आणि सहयोगी बातमीदार हे ब्लॉग मात्र नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.
आपण सगळेच बापूंना गेट वेल सून म्हणूयात.
धन्यवाद.
आपला,
ब्लॉगएडिटर,
ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई
दोन हजार नऊ उजाडले!
जुनी सदरे बंद झाली. (वाचक सुटले!) नवी सदरे सुरु झाली. (सदरकारू आनंदले!... मंदीत तेवढीच चांदी!!) काही सदरे जुन्या पानावरून नव्या पानावर आली. (भोग! दुसरे काय?)
नवे साल म्हटले, की पत्रांचे लेऔटही कात टाकतात. सालाबादप्रमाणे तेही झाले.
लोकसत्तेने लेऔटमूर्ती रानडेंच्या भयाने आपले रुपडे किंचित सुटसुटीत करण्याचा प्रयोग केला. (आणखीही काही प्रयोग केले. म्हणजे असे, की बातम्यांची हेडिंगे महत्त्वाची असतात, हे वाचकांस कळावे म्हणून ती कधी अधोरेखीत केली! तर मथळे दिल्यानंतर उपमथळ्यांत जागा का वाया घालवायची, असे म्हणून कधी त्यांच्यावर काट मारली! एकंदर चालू आहे... लोकसत्तेची रानडे इन्स्टिट्युट ऑफ पेज डिझाईनिंग चालू आहे!!) महाराष्ट्र टाइम्सने यंदा किरकोळ डागडुजीवरच निभावून नेले. (हा मंदीचा परिणाम म्हणावा का? एकूणच रिसेशनचे सेशन बेनेट-कोलमनी जरा लौकरच सुरू झाल्याचे दिसतेय!) चालू वर्षात लोकमतचा लेऔटही तसाच, खडाच्या खडाच आहे! (आता नवा लेऔट-मास्तर भरताहेत. तेव्हा होतीलच बदल म्हणा. पण तसा त्याचाही काही भरोसा नाही. मागे मारे रा. रा. प्रदीप म्हापसेकर (पक्षी - गरिबांचे गार्सिया) यांच्याहाती पाने दिली होती. पण त्यांचाही विवेक काही तेथे चालला नाही!) लेऔट म्हटल्यावर सकाळला विसरून कसे चालेल? (सकाळचे पानवालेही विसरत नाहीत! रोजच्या रोज आठवणीने गार्सियाचे श्राद्ध घालतात!) पण यंदा सकाळचा तो पंचकोटी लेऔटही मागील पानावरून पुढे चालू आहे. (बहुधा पाच कोटी पाने लागल्याशिवाय हे कंटिन्युएशन थांबणार नाही!)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो, वृत्तपत्रांच्या कार्यालयी सालाबादप्रमाणेच सर्व काही सुरू असल्याचे पाहून तुम्हांस वाटेल, की मीडियामंडली क्षेम आहे. परंतु हाय रे कर्मा! तसे काही नाही. मीडीयाच्या पर्णसूची प्रदेशात सध्या मंदीचा शिशिर ऋतू आहे. सध्याची पत्रापत्रांतील पानगळ पाहून तुमच्या ते ध्यानी आले असेलच. (नसेल, तर महिनाअखेरीस रद्दी विकल्यावर येईलच! तेव्हा रद्दीवाल्याने काटा मारला असे म्हणू नका. इकडे पेपरवाल्यांनी पानांना फाटा मारलाय!) परंतु ही मंदी केवळ पानझडीवरच थांबलेली नाही. तिने आता पत्रकारू व नारूंचा घास घेण्यास प्रारंभ केला आहे. तोटा कमी करायचा, म्हणून पाच-दहा हजार रुपये पगारवाले कंत्राटी कर्मचारी कमी केले जात आहेत. किंतु असे दात कोरून कोणाचे पोट भरले आहे? तेव्हा राजे हो, सावध असा. नाईट रिसेसनची आहे!! (सावध असून तरी काय करणार म्हणा? 'जेटमध्ये कर्मचारी कपात' असे वृत्त लिहा म्हटले की लिहायचे व जा म्हटले की जायचे, येवढेच तर आता पत्रकारुंच्या हाती असते!... पत्रकारूंच्या संघटना तर काय?... आता उरल्या निवडणुकीपुरत्या! असो.)
एकीकडे मंदीच्या अशा घनघनमाला नभी दाटलेल्या असतानाच, दुसरीकडे मीडियावर, त्यातही प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडियावर सगळीकडून टीकेची गारपिट होत आहे. बिचा-यांना बूम्बाबोम्ब करायचीही चोरी! आमच्या रा. रा. रवींद्र आंबेकरांनी (पक्षी - अध्यक्ष महाराज, च्यानेलवाल्यांची संघटना) लोकसत्तेत लोकमानस व्यक्त केले. ते म्हणाले, की पेपरवाल्यांना च्यानेलवाल्यांबद्दल आकस आहे. झाले! वाचकांनीच त्यांचा परस्पर बाईट घेतला! रा. रा. निखिल वागळे (पक्षी - मी-खिल वागळे, संपादक, आयबीएन-लोकमत) यांनी तर तमाम पत्रसंपादकांवर दुगाण्या झाडल्या. (सतत आयबीएन-लोकमत पाहिल्याचा हा परिणाम! भाषा केवढी सुधारलीय आमची!!) त्यांचा समाचार सर्वांनी अनुल्लेखाने व आम्ही उल्लेख करून घेतला! हे कोठे होत नाही, तोच पत्रांतून च्यानेलांवर लेख-कडाबिनींचा मारा सुरु झाला. आम्हांस अजूनही स्मरते, की मुंबई सकाळमध्ये याच विषयावर रा. रा. डॉ. समीरण वाळवेकर, रवी आमले आणि वैशाली चिटणीस मजकूरांचे टीकालेख एकाच पानात छापून आले होते. वाळवेकर, चिटणीस प्रभृतींचे समजू शकते. त्यांनी कधीकाळी बूम हाती धरलेला आहे. परंतु रा. रा. आमले यांचे काय? आमच्या माहितीनुसार टीव्ही दिसतो कसा आननी, हेही त्यांनी पाहिले नसावे! परंतु आपण ज्या गावी गेलोही नाही, त्या गावाचा नकाशा काढणे, यालाच तर पत्रकारिता म्हणतात!!) बहुधा या टीकास्वयंवरामुळेच च्यानेलांचे कारभारी गावोगावी टीकाहरण यात्रा काढताना दिसत आहेत. परवा कोल्हापुरात रा. रा. साठे, खांडेकरादी कारभारी एकाच मंचावर परिसंवादून आले. मुंबैत मॅजेस्टिक गप्पांमध्येही च्यानेलांवरील टीकाखंडणाचा कार्यक्रम होत आहे. त्यात पुन्हा खांडेकर, आंबेकरादी कारभारी आहेतच. त्यांच्या या खंडण-खोरीस आमच्या शुभेच्छा!
तर अशा झाकोळलेल्या पर्यावरणात पत्रकार दिन, की ज्यास अवघ्या मीडियामंडलात पत्रपोळा म्हणून ओळखले जाते, तो आपल्यासमोर मान खाली घालून उभा ठाकला आहे. या दिवसाचे श्राद्धही पत्रांपत्रांत नियोजनानुसार घातले जाईलच. पत्रपोळ्यानिमित्ताचे कार्येक्रमही होतील. बेगडे, हिंगोळ वगैरेंनी सजावटही केली जाईल. सरकारी जीआरनुसार दर्पण पुरस्कारांचे वितरण केले जाईल किंवा ते प्रदान केले जातील. (म्हणजे दिले जातील!) राजधानी दिल्लीत तर समस्त मराठी पत्रकारांस महाराष्ट्र सदनी सरकारी खर्चाने पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जाणार आहे!
अशावेळी वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
एक पत्रकार म्हणून आम्ही एवढेच करणार आहोत, की
बातमी लागली नाही वा कापली म्हणून चिडचिड करणा-या बातमीदारांना,
पानात जाहिराती जास्त, आता एवढ्या बातम्या कशा लावू म्हणणा-या उपसंपादकांना,
हल्ली दुर्मिळ झालेले तेल डोळ्यांत घालून शब्दांमाजी काळेगोरे निवडणा-या मुद्रितशोधकांच्या एन्डेजर्ड जमातीला,
ऊन-वारा-पाऊस-पाणी-खाणे-पिणे-जाग-झोप कश्शाचीही पर्वा न करता बूमचकाट पळणा-या च्यानेलांच्या बातमीदारांना,
स्टुड्योच्या खोलखोल एकांतात बोलबोलबोल बोलत वेळेची बावडी भरणा-या तमाम अँकरांना,
कॅमेरामनांना, फोटोग्राफरांना, सगळ्यांनाच,
आम्ही मनातल्या मनात एक कडक सॅल्यूट ठोकणार आहोत!!
शेवटी काम करणा-या श्रमिकांना देण्यासारखे आपल्या हाती दुसरे असते तरी काय?
कसें?
(Posted by बापू आत्रंगे, दि. ५ जाने. २००९)
नवे वर्ष उजाडले. मोरुच्या बापसाने लाथ घालून मोरूला मोबाईलवरून उठविले. कारण मोरूने आपल्या बापसालाही हॅप्पी न्यू इयरचा एसेमेस पाठविला होता! (आता तुम्ही विचाराल, हे हॅप्पी न्यू इयरचे एसेमेस म्हणजे काय? तर ज्यांचा मजमून सहसा कोणीही वाचत नाही व ज्यावरील फक्त प्रेषकाचे नावच वाचले जाते त्यांस हॅप्पी न्यू इयरचे एसेमेस असे म्हणतात.) आपल्या इष्ट मित्र-मैत्रिणी व कचे-यांतील साहेबादीकरून सर्व लोकांस असंख्य एसेमेस पाठविण्याचे सत्कर्म पूर्ण झालेले असल्याने मोरूही उठला व त्याने समोर पडलेले वृत्तपत्र डोळ्यांसमोर धरले.
"डॅडी..." मोरूने बापसास हाक मारली.
बापूस खजिल झाला! डॅडी हे संबोधन ऐकल्यानंतर तो बिचारा नेहमीच खजिल होतो.
मोरु विचारत होता, "नव्या वर्षाचे संकल्प म्हणजे काय हो?..."
येथून पुढे आम्ही त्यांचे संभाषण अजिबात ऐकले नाही.
नव्या वर्षांचे संकल्प या विषयावर कोट्यवधी लेखकूंनी परार्धवेळा इतके काही विनोदी इत्यादी लिहिलेले आहे, की आता तसले काही लिखाण दिसले तरी स्वतःचे डोळे फोडून टाकावेत असा संकल्प मनी येतो! नवे वर्ष उजाडल्यावर लोकांना संकल्प दांडिया का खेळावासा वाटतो, हे आम्हांस तरी कोडेच आहे. पण लोक करतात संकल्प! सर्वसामान्यांचे सोडून द्या, (त्यांचे नेहमीच सोडून द्यायचे असते!), पण आमची आतली खबर अशी आहे, की काही जानेमाने पत्रउस्तादसुद्धा डायरीबियरीत गुपचूप संकल्प लिहून ठेवतात!
तर अशीच काही गोपनीय संकल्पचित्रे आम्हांस अलीकडे पाहावयास मिळाली. (जशी मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रे रा. रा. नितीनभौंना मिळाली... आमच्याकडेही काही 'राणे' असतातच म्हटलं!) बहुजनहिताय बहुजनसुखाय ती संकल्पचित्रे येथे सादर करीत आहोत. -
रा. रा. कुमार केतकर (लोकसत्ता) -
लोकरंगमधील भाकिताच्या लेखांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तेव्हा आठवड्याचे भविष्यही आता मीच लिहिन असे म्हणतो!
रा. रा. आनंद आगाशे (सकाळ) -
कोणत्याही विषयावर कोणालाही रिपोर्ट तयार करण्यास सांगणार नाही. सांगितले, तर तो रिपोर्टाचा मेल स्वतःच्या डोळ्यांनी वाचीन!
रा. रा. भारतकुमार राऊत (टाइम्स ग्रुप) -
या वर्षापासून पुन्हा पत्रकारिता करीन! गेल्या काही वर्षांपासून मनातच राहिलेला हा संकल्प यंदा मार्गी लावीन!!
रा. रा. संजय राऊत (सामना) -
संपादक म्हणजे पक्षप्रवक्ता की पक्षप्रवक्ता म्हणजे संपादक हा गुंता यंदा मायबाप पत्रकारितेच्या साक्षीने सोडवीन!
रा. रा. अशोक पानवलकर (मटा) -
खुलासा - यंदा आम्ही कोणताही संकल्प केलेला नाही, याबद्दल 'दिलगिर' आहोत!
रा. रा. प्रकाश कुलकर्णी (नवशक्ती) -
अंक काढीतच राहीन... काढीतच राहीन... काढीतच राहीन... शेवटी म्हटलेच आहे ना - कर्मण्येवाधिकारस्ते!
रा. रा. संजीव लाटकर (साम मराठी) -
फक्त सहा महिने.... सहा महिन्यांत सामला जगातील नंबर एकचा चॅनेल बनवीन!
रा. रा. आल्हाद गोडबोले (प्रहार) -
एसिडिटी वाढू देणार नाही... वाढली की मग त्यावर पुन्हा लेख लिहावा लागेल!
रा. रा. यमाजी मालकर (सकाळ) -
सतत कपॅसिटरवर लेख लिहून महाराष्ट्र भारनियमनमुक्त करीन!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २ जानेवारी २००९)
मागील लेख
-
▼
2009
-
▼
January
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
▼
January
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

