आपणांस आतापर्यंत कळाले किंवा समजले असेलच,
की ए-सिडिक कम्युनिकेशन्सच्या कारभा-यांनी हे काही तरी नवीन प्रकर्ण काढले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार कळते-समजते हे मराठीतील पहिलेच मीडियाविषयक ब्लॉगपत्र आहे.
वस्तुतः ते पहिले असो वा दुसरे, वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांस त्याचे काही घेणेदेणे आहे का? ते किमान वाचनीय आदी असो म्हणजे झाले, एवढेच त्यांचे लय-नाही-मागणं असणार!

तर कळते-समजते तसे वाचनीयबिचनीय आहे का, याचे सखोल परिशिलन केल्यानंतर आमच्या लक्षात आले, की यात मराठी मीडियाच्या अनादीअनंत विश्वातल्या छोट्या-मोठ्या बातम्या आहेत. (हे म्हणजे काही तरीच हं! मीडियातल्या बातम्यांसाठी येथे येण्याची काय गरज? मग प्रेसरूम, पत्रकारसंघ आणि कचेरीतील कॅंटिने ही व्यासपीठे कशासाठी असतात?... ठीक आहे. हेही असू दे.) याशिवाय येथे विविध वृत्तपत्रांच्या लिंक्स, काही महत्त्वाच्या पत्रांतील एडिटर व अन्यांचे लेख, काही पत्रपंडित व अन्यांच्या लेखांच्या लिंक्स, झालेच तर मराठी पत्रकारांच्या ब्लॉग्जचे दुवे असा माहितीचा लिंक्सरोड आहे.

एकंदर समस्त मराठी पत्रकारांस उपयुक्तबिपयुक्त असे काही तरी हे कळते-समजते दिसते आहे.
बघा तुम्हांस कसे वाटते ते?

आणि blogeditor.acidic@gmail.com या पत्त्यावर त्याबद्दल जरूर कळवा. येथे contact me नावाचे एक बटण आहे. तेथूनही तुम्हांस आमच्याशी संपर्क साधता येईल.
(आणि मित्रहो, तशीच काही माहिती असेल ना, तर या पत्त्यावरून आमच्या कानातही सांगत जा. कळते-समजतेय ना?)

(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ डिसें. २००८)

पूर्व क्षितिजावर उषेच्या गालावरील लाली हलकेच पुसत रविकिरणे उदयमान होत आहेत. हिरव्याकंच वृक्षराजीतून खगबाळांचा कर्णरम्य कलकलाट सुरू झाला आहे. परंतु शहर मात्र अद्याप गुलाबी थंडीची दुलई लपेटून छान लोळत पडले आहे. तशी शहरातल्या वाटांना क्षणाचीही उसंत नसते. ऋतु कोणताही असो, त्यांना वाहावेच लागते. आजही सगळ्या वाटा कुडकुडत-गारठत चालल्याच आहेत. पहाटवेळी पडलेल्या दवबिंदूंमुळे डांबरी सडका कशा छान लकाकत आहेत. जणू त्यांनी आपल्या चेह-यावर पॉंड्स कोल्ड क्रिमच लावलेली आहे...

मनातल्या मनात असा आत्यंतिक रविवारपुर्वणीगर्भ ललित विचार करीत आम्ही चाललो होतो. (दर सोमवारी सकाळी आमचे असेच होते! हा पुर्वण्यांचा दवणे-असर! दहासाडेदहापर्यंत तो आपसूक ओसरतो.) तर सकाळसक्काळी आम्ही असे लोकरीची बंडी, नवीकोरी कानपट्टी (किं. २२ रु. फक्त. कॅम्पात स्वस्तात मिळतें!) व हाती तंगूसची पिशवी असा जामानिजा करून चितळे दुधाची पिशवी, तीन अंडी व विब्ज ब्रेडचा छोटा पुडा आणण्याकरीता निघालो होतो. तर सोसायटीच्या गेटावरच रा. रा. अनंतराव दीक्षित (पक्षी - संपादक (विकास), लोकमत) यांचे सुदर्शन झाले. त्यांस पाहिले अन् आमची नयनकमलदले विस्फारली! बुब्बुलबैदूल कपाळी गेले! मनीं म्हटले, एवढ्या मरणाच्या थंडीत या गृहस्थांस अवघ्या सदरा आणि पाटलोणीवर बाहेर पडवते तरी कसे? लोकरीची बंडी नाही, तर किमान सकाळमध्ये असताना शिवलेला कोट तरी घालावयाचा.

त्यांस सनविवि करून आम्ही काळजीयुक्त स्वरात म्हटले, राव, या वयात व अशा थंडीत प्रकृतीची अशी हेळसांड बरी नव्हें.
त्यावर ते म्हणाले, थंडी? कसली थंडी? आम्हांस तर अगदी उबदार वाटते आहे!
ते विपरित वचन ेएकून आम्हांस तर धक्काच बसला. मागे एकदा सकाळच्या दिवाळी अंकासाठी अनंतरावांनी चक्क सोनाली बेंद्रे या अभिनेत्रीची (की दुसरी कोणी होती? आमच्याही मेंदूचा असा अधूनमधून गजनी होतो!) मुलाखत घेतली होती. तेव्हाही आम्हांस असाच धक्का बसला होता.
म्हटले, अहो बाहेर एवढी थंडी पडलीये... एकदोन दिवसांत लोकसत्तेत शेकोट्यांची छायाचित्रेही सालाबादप्रमाणे प्रसिद्ध होतील. आणि तुम्ही म्हणता, उबदार वाटतेय!
त्यावर ते आमच्याकडे पाहून तुच्छतेने हसले (डिट्टो कुवळेकर!) व म्हणाले, तुम्ही लोकमत वाचत नाही असे दिसते!
वास्तविक तसे काही नाही. आम्ही ज्या आत्मियतेने आज का आनंद वाचतो, त्याच जिव्हाळ्याने लोकमतही वाचतो. (का वाचतो?... कोणी, कोणी विचारले हे?... नक्कीच रा. रा. महावीरभाई असावेत!) पण लोकमतचा आणि उबेचा काय संबंध?
अनंतराव म्हणाले, अहो, आजची बातमी वाचली नाही का तुम्ही? लोकमतवर वाचकांच्या उबदार शुभेच्छांचा वर्षाव!

आणि अचानक आमचा सीएफसी लॅम्प पेटला!
कालच्या रविवारी पुण्यनगरीत लोकमतचा दशवार्षिक सोहळा झाला.
म्हणजे पुण्यातला लोकमत दहा वर्षांचा झाला!

आता कोणत्याही पत्राचा वर्धापनदिन असला, की कायद्यानुसार किमान पान-सुपारीचा कार्यक्रम तरी ठेवावाच लागतो. पुणे सकाळच्या आवारात पान-तंबाखू खाण्यास सक्त मनाई आहे. (डॅश हुकुमावरून.) किंतु तेथेही वार्षिक पान-सुपारी होतेच! या नियमानुसारच लोकमतने आपल्या कार्यालयी वर्धापनदिनाचा कार्येक्रम ठेवला होता. तेथे निमंत्रितांसाठी पोटपुजेची व्यवस्थाही होती. (यास म्हणतात मराठवाड्याचे संस्कार!)

स्वतः विजयभाऊ (पक्षी - विजय बाविस्कर, संपादक, लोकमत) या सर्व दिनदिनदिवाळीवर (व हिज हायनेस ऋषीबाबूजी दर्डाजी यांचेकडे) जातीने लक्ष ठेऊन होते! रा. रा. केके (पक्षी - किशोरपंत कुलकर्णी, संपादक, लोकमत इंटरनेट) यांचेही बारीक लक्ष होते... विजयभाऊंकडे! या कार्यक्रमात एकदा तर आम्ही रा. रा. केके यांना चक्क बारीकसे हसताना पाहिले. (आज नेटवरील बातम्यांच्या मोजणीचे काम नसल्याने तर ते खुश नसतील?) असो.

आमच्या पुण्यातल्या सेलेब्रिटींचे एक आहे. बोलाविले, की येतात! (या पेठेतून त्या पेठेत तर जायचे असते! शिवाय अशा कार्यक्रमांत आहेराची भानगड नसते!!) तर अशा अनेक सेलेब्रिटीज (त्यात आम्ही आलोच!) या कार्यक्रमास आल्या होत्या. (सूचना - लोकमतच्या उपसंपादकांकडे ज्यांनी आपली नावे नोंदविली आहेत, त्यांना त्यांची नावे मंगळवारच्या अंकात वाचावयास मिळतील. यासंदर्भात कृपया पत्रव्यवहार करू नये!) शिवाय लोकमत सखीमंचचे वनिता मंडळ, बालमंचचे बालवाचक आणि काही नुसतेच वाचक असे सर्व होतेच.

तर या सर्व वाचकांनी येताना शुभेच्छाही आणल्या होत्या. त्यांच्या स्नेहशेकोटीमुळेच तेथील वातावरण उबदार झाले होते. एवढे उबदार, की सिमला हाऊसही चक्रावून गेले! त्यांना वाटले, पुण्यात ग्लोबल वॉर्मिंग सुरु झाले की काय?
एकंदर अनंतरावांना यंदाचा हिवाळा जाणवणारच नाही, असे दिसतेय.

अनंतरावांना कळवायला हवे, की महावीरभाई जोंधळेंनाही पूर्वी कधी तरी असेच काहीसे उबदार उबदार वाटत होते!!

(Posted by अरुंधती पुणेकर, बापू आत्रंगे, दि. २९ डिसें. २००८)

आम्हांस हे सांगितलेच पाहिजे, की सध्या जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी असे सर्वत्र दिसणारे व्यायामपटू व हौशी नाभिक श्रीयुत आमीर खान आणि आम्ही यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत.
आमीर खान हे हिरो आहेत.
आम्हीही गेलाबाजार देशद्रोहीतल्या हिरोसारखे दिसतोच!
आमीर खान हे लेखक आहेत. ते ब्लॉग आणि बॉडीवर लिहितात.
आम्हीही ब्लॉगवर लिहितो. बॉडीवरही लिहायचो! (बॉडीवर शेवटचे लिहिले होते, ते बीकॉमला इकोच्या पेपरावेळी! पण त्याची स्मृती येथे कशाला?)
स्मृतीवरून स्मरले. आयुष्यमान आमीर खान यांना म्हणे पंधरा मिनिटांतील गोष्टीच लक्षात राहतात.
आमची याददाश्तही त्याच वळणावर आहे! पंधरा मिनिटांपलीकडचे काही आमच्या ध्यानीच राहात नाही.
तर आमच्या मेमरी चिपमध्ये हा असा भयंकर इलेक्ट्रॉनिक लोचा असल्यामुळे दर वर्षी वर्षाअखेरीस आमची प्रचंड गोची होते.

आता वर्ष अखेर म्हटले की आपल्यासारख्या हाडाच्या पत्रकारांस कसले वेध लागतात?
फुकटच्या डाय-या आणि कॅलेंडरांचे हे तर झालेच! शिल्लक रजा संपवायच्या असतात, हेही अध्याहृतच आहे. परंतु यावेळी आपणांस वेध लागतात ते वार्षिक सिंहावलोकनाचे.
की गेल्या वर्षभरात जगभरात काय काय व का का झाले?
हल्ली समस्त पत्रांची पर्णसंख्या रोडावली असल्याने पूर्वीसारखे आढावे छापून येत नाहीत. (शिवाय हल्ली वर्तमानपत्रांची दिशाही बदलली आहे. वर्तमान व भूतपेक्षा त्यांस भविष्याची काळजी असते. (पाहा अगर वाचा - लोकप्रभेचा भविष्य विशेषांक.) समस्त पत्रांस सद्यकाली बातमीपुढचीच बातमी हवी असते! च्यानेलांनी काय दशा केलीये नाही पत्रसृष्टीची?!)
अर्थात वृत्तवाहिन्यांनी ही कमतरता चांगलीच भरून काढली आहे. (त्यांस वेळ भरून काढावयाचा असतो ना!)

आता अशा बिकट परिस्थितीत आपणच का बरे सन २००८चे श्राद्ध घालू नये, असा एक सुविचार आमच्या मनी उत्पन्न झाला. तत्काळ आम्ही आमुची बॉलपॉईंट लेखणी परजली. कचेरीतून आणलेले पॅड सरसावले. परंतु हाय रे कर्मा! आमुचे इंटेल इनसाईड कामच करेना! (संगणकाचे बरे असते. तो बूट-रिबूट करता येतो. मेंदू बंद पडला, तर काय त्यावर बूट हाणायचे?) अखेर दोन्ही मेंदूंना एकसमयावच्छेदेकरून ताण दिला आणि मग आमच्या चर्मचक्षूंसमोर २००८ची काही स्मृतीचित्रे तरळू लागली.

या वर्षाची सुरुवात तर मोठी डौलात झाली होती. स्टार माझा नुकताच दुडुदुडू करू लागला होता. आयबीएन-लोकमतची वटवटवाणी सुरु झाली होती. सकाळचे च्यानेल येणार अशी गंमतचर्चा शतकानुशतके महाराष्ट्र भूमीत चालू होती. ती सुफळसंपूर्ण होणार हे याच वर्षारंभी नक्की झाले होते. मराठीपत्राच्या जुळवाजुळवीत राप्र महामंडळाचे महसूलअधिकारी मग्न होते. समस्त पत्रकारूंना वाढीव पगाराची स्वप्ने पडत होती. कधी नव्हे ते पत्रकारुनारूंना सुगीचे दिन आले होते. एवढी सुगी, की ज्यांची दुग्धदंतपंक्तीही अद्याप पडावयाची आहे, अशा गार्डनफ्रेश पत्रकारुंनाही मासिक वीसबावीस हजार रुप्यकाणी मिळू लागले होते. जुन्याजाणत्या (पक्षी - बनचुक्या) जहामर्द पत्रपंडितांची तर समग्र मॅरेथॉन पळापळ सुरू होती. ज्यांस बाहेरपत्री कोणीही पुसत नव्हते, असे पत्रशाळीग्राम पत्रनिष्ठेचा ध्वज उंच धरा रे, अशी चाटूगीते गात होते. (यातही काही जण शहाणे निघाले. त्यांनी नुसतीच पत्रांतराची हूल देऊन आपले बिढार भरले!)

पत्रसृष्टीत असे आनंदवनभुवन पातले असता, धबाबा वेतन मिळे अशी स्थिती असता जान्युअरीतल्या एका मंगल सकाळी भलाथोरला प्रताप घडला! सकाळ संस्थेने हाहा म्हणता ग्लोबलझेप घेतली. सकाळचे आयजीए नामक आंतरराष्ट्रीय त्रेमासिक बाजारी आले. त्याचे ते रुपाने देखणे रंगाने चिकणे आंतरराष्ट्रीय रूपडे पाहून आम्हांस तर अगदी अभिजीतंमया असेच वाटले! २००८मध्ये सकाळने आणखीही काही नियतकालिके बाजारात आणली. (असे म्हणतात खरे! कोणास दिसली, तर क्रिपया आमुच्या पत्त्यावर संपर्क करें.)

२००८ सालातील यादगार घटना म्हणजे साम च्यानेल आणि प्रहार पत्राचे आगमन. या वर्षमध्यास साम वाहिनी अखेर सुरु झाली. (हुश्श!) हे साम्राज्य अत्यंत वेगळे व भिन्न असल्याच्या तुता-या सकाळमधून फुंकल्या गेल्या. म्हणून अगाध उत्सुकतेने आम्ही आमचा सतरा इंची दूरचित्रवाणी संच लावून सहकुटुंब सहपरिवार बसलो. पण हाय रे कर्मा! तो च्यानेल म्हणजे अवघाच नानीच्या नानाची टांग निघाला! मनीं आले, साम म्हणजे साक्षात् दंडच! (अद्याप अनेकांच्या दूरचित्रवाणी संचावर हा च्यानेल दिसत नाही असे म्हणतात. तर तसे काहीही नाही. प्रेक्षकहो, केबल च्यानेलाजैसा दिसे तोची साम ओळखावा!)

राप्र महामंडळाच्या प्रहारनेही असाच अपेक्षाभंग केला. वाटले होते, हे पत्र म्हणजे झणझणीत कोंबडीवडा असेल. किंतु तो तर धादांत दहीवडा निघाला. राण्यांचो पेपर राण्यांचो वाटलाच नाही! बातम्यांच्या अंगाने लोकसत्ता आणि लेखांच्या अंगाने तळवलकर-केतकरांच्या कालखंडातला मटा असा काहीचा आजच्या कालखंडातला प्रहार आम्हांस मात्र भावून गेला. झकास बॅकपेज, झकास पुरवण्या. राण्यांचो पेपर म्हटल्यावर त्यांच्या लाललाल बातम्या असणारच. पण बाकीच्या बातम्याही झकास. शिवाय गंमत म्हणजे जाहिराती फारशा नाहीत. (त्यातच राणे आता कॅबिनेटातही नाहीत. देवा रवळेश्वरा, प्रहार असाच लहानगा राहूं दे रे म्हाराजा! त्येका युवा होऊ देऊ नको रे म्हाराजा!)

तर या सालात असे सर्व काही सुमंगल घडत असतानाच, अवचट काळ फिरला! चांदी गेली, मंदी आली!
ही मंदी आता काय काय गुल खिलवते, हे २००९ मध्ये दिसेलच. पण आताच कॉस्टकटिंग आणि कर्माचारीकटिंगला सुरुवात झाली आहे. बहुतेक पत्रांमध्ये कंत्राटांचे नूतनीकरण थांबले आहे. अनेक पत्रकारू जात्यात आहेत, बाकीचे बरेच सुपात येणार आहेत.

परंतु अवघेच काही काळेकुट्ट नाही.
एकीकडे अनेक पत्रांस ओहोटी लागली असताना, लोकमतमध्ये मात्र भर्ती आहे.
तेथे पत्रकारुनारूंची भरती करण्यात येत आहे. (लोकमत चिरायु होवो! बाबूजी आप आगे बढो, हम तुम्हारे पेपरमें आते हैं!)
२००८च्या अखेरीस आलेली ही एकमेव चांगली बातमी!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २६ डिसेंबर २००८)

आम्हांस आता बोललेच पाहिजे!
(हे उद्गार आयबीएन-वागळेंच्या 'आजचा सवाल' मधील चर्चकांच्या मनातील नसून, दस्तुरखुद्द आमचेच आहेत!
आम्हीच बोलत आहोत, की आम्हास आता बोललेच पाहिजे!)
बोरीबंदरच्या बुढ्ढीचे कारभारी म्हणत आले, की वृत्तपत्रास संपादकाची आवश्यकता ती काय?
तेव्हा आम्ही काही बोललो होतो का? नव्हतो बोललो!
म्हटले, मालक आहेत! असेच बोलणार!
(शिवाय काही मालक काही संपादक युसलेस असल्याचे म्हणतात, तेव्हा ते काही संपादक वेतनचिठ्ठीकडे पाहून तो कार्ल्याचा काढा नेसकॉफी असल्यासारखा पितातच ना घटाघटा! करते का कोणी वर तोंड? तेव्हा आपण तरी कशास मुखवाफ दवडा?)

आता तर महाराष्ट्र टाइम्सने रा. रा. समीरशेठ जैनांची थेरी (पक्षी - वृत्तपत्रास संपादकाची आवश्यकता ती काय?) सिद्ध करण्याचा उद्योग चालविला आहे! वास्तविक व वस्तुतः मत्प्रिय रा. रा. अप्पा पानवलकर मटाची बारा इंजिनांची लोकल झक्कझुकूझुकू चालवित आहेत! (रा. रा. हेमंत देसाईमोशाय याबाबत काहीही म्हणोत, आपण तिकडे कशास लक्ष द्या?) तर त्यांस (पक्षी - रा. रा. अप्पांस, देसाईमोशायांस नव्हे!) कप्तानकी देण्यास काय हरकत आहे? रा. रा. 'कुमार' केतकरांनंतर रा. रा. भारत'कुमार' संपादक होतात, मग त्याच लॉजिकने केत'कर' यांच्यानंतर पानवल'कर' संपूर्ण संपादक का बरे होऊ नयेत? पण नाही होत! तरीही आम्ही (व रा. रा. साबडे) काही बोललो नव्हतो?
म्हटले, जाऊ दे! अप्पा संपूर्ण संपादक झाले तर त्यांना उगा खास्दारबिस्दार व्हावे लागेल! त्याआधी त्यांस रा. रा. उद्धवजींना मटासन्मान द्यावा लागेल, शाखेशाखेवर जावे लागेल! एवढी दगदग त्यांना सोसवणार आहे का?

परंतु आता आम्हास आमची दातखिळी उचकटलीच पाहिजे!
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
आता आम्हांस हे सांगितलेच पाहिजे, की बोरीबंदरच्या बुढ्ढीने आता समग्र ताळतंत्र सोडले आहे! बुढ्ढी हपापल्यासारखी वागू लागली आहे!
त्या भरात तिने पत्रे व च्यानेलादीकरून समस्तांस एक नोटीस बजावली आहे.
त्या नोटीशीचा मजमून असा, की आमुच्या छायाचित्रकाराने काढलेले कसाब या दहशतवाद्याचे छायाचित्र आपण आमुच्या परवानगीशिवाय प्रसिद्ध केले. त्याची भरपाई म्हणून आपण आम्हांस १०,००,००० रु. (अक्षरी दहा लक्ष फक्त) द्यावेत. मेहरबानास जाहीर व्हावे. आपले - टाइम्स सिंडिकेशन. (चुभूद्याघ्या!)

आता तुम्ही अत्यंत कायदाप्रेमी असल्याने तुम्ही पुसाल, की बापू, यात त्यांची काय बरे चूक?
कॉपीराईट कायद्याच्या लॉनुसार ज्या अर्थी टाइम्सच्या छायाचित्रकाराने काढलेली छायाचित्रे ही टाइम्सच्या मालकीची आहेत, त्याअर्थी ती अन्य कोणी टाइम्सच्या परवानगीशिवाय वापरल्यास तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. अन्य पत्रे व च्यानेले यांनी कसाबचे टाइम्सकृत छायाचित्र वापरताना टाइम्सचे किमान सौजन्य अदा करावयास हवे होते. परंतु आमुच्या माहितीनुसार अनेक च्यानेलांनी सुरुवातीचे किमान दोन दिवस कसाबचे ते मतिमंद मुलासारखे दिसणारे छायाचित्र वापरताना सौजन्य मटा असे म्हटले होते. अन्य काही पत्रांमध्ये हे सौजन्य दिसले नाही, त्यांनी त्याची ऐशीतैशी केली, हेही तितुकेच सत्य! (किंतु यातही खुबी अशी, की अनेक पत्रांनी कसाबची ती वादग्रस्त तसबिर वापरली, ती एपी वा एएफपीच्या संकेतस्थळावरून! तेथे टाइम्सला श्रेय देण्याचा प्रश्नच नाही!)

आता हा झाला कायद्याचा लॉ!
परंतु आम्ही जातीचे अडाणी असल्याने आमच्या भोळ्याभाबड्या अंतर्मनास असे वाटते, की येवढी गर्हणीय कसाबकरणी करणा-या सैतानाच्या छायाचित्रातून कोणी चार पैसे कमावू नयेत! आमुच्या अंतर्मनास ते अतिशय व अत्यंत अनैतिक गमते!
(आणि टाइम्स सिंडिकेशनवाले भाऊ, उद्या जर तो कसाब आला व म्हणू लागला, की मेरा फोटू निकालके तुम लोगां माल कमाता, तो उसका आधा पैसा मेरेकूबी देना मांगता. क्यूं की आखीर वो तो मेराच फोटू है ना! तर मग तुम्ही काय करणार? कायद्याच्या लॉने त्यास पैसे देणार?)

मान्य की, सध्या खराब टाइम्स सुरू आहे!
जगभरात मंदी आहे!
एकंदरच हल्ली वृत्तपत्रांच्या रद्दीचे भाव कमी झाल्याने आम्हांसही समजले आहे, की सध्या जगभरात मंदीची लाट आली आहे. (रा. रा. प्रसाद केरकर (पक्षी - लोकसत्तेचे अमर्त्यसेन) यांस पान लावण्याकरीता स्वस्तातला उपसंपादक घावेना, म्हणजे बघा, ही लाट केवढी मोठी आहे!) या मंदीचा तडाखा समस्त वृत्तपत्रे व च्यानेलादीकरून सर्वांसच बसला आहे. यावर उपाय म्हणून अनेकांनी कॉस्टकटिंग, कॉस्टशेव्हिंग असे क्षौरकर्म करण्यास प्रारंभ केला आहे! राप्र महामंडळाने प्रहारच्या इमारतीखाली युवाचा बळी दिला. (आणि आता महसूल आटल्यावर, प्रहारवर हार चढणार की काय, या चिंतेने अवघे इंड्याबुल्सवासी त्रस्त आहेत म्हणतात!) तिकडे सकाळ टाइम्सने दिल्लीत कर्मचारीकटिंग केले. (कर्मचारी कपातीच्या या शल्यचिकित्सेस आयुर्वेदात साम-उपचार असे म्हणतात!) काही पत्रांनी पर्णभार कमी केला. बोरीबंदरच्या बुढ्ढीलाही मंदीची थंडी लागलीच असणार! त्याशिवाय का मटाच्या कुशीत मुंटा गेला? परंतु याचा अर्थ असा नाही ना, की सैतानांच्या छायाचित्रांचा व्यापार करावा? व्यापारधंद्यासाठी अन्य मार्ग मोकळे आहेतच की!

तेव्हा अन्य पत्रे व च्यानेलादीकरून समस्तांस आमची साष्टांग नम्र विनंती आहे, की त्यांनी कायद्याच्या लॉचा समग्र किस काढून टाइम्सला या प्रकरणी सुयोग्य उत्तर द्यावे. (ते ते देतीलच म्हणा! दहा लाख म्हणजे काय कमी पैसे झाले? पण आपण आपले म्हणून ठेवलेले बरे! उद्या कोणी न्यायालयातबियालयात गेले तर आपण आपले म्हणायला मोकळे, की बातमीदार इफेक्ट वा बातमीदार इंम्पॅक्ट वा बातमीदारच्या लेखाचा परिणाम!!)

अखेर काय आहे,
म्हातारी मेल्याचे दुःख नाही हो,
टाइम्स सोकावतो!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २३ डिसेंबर २००८)

आपणांस तंगी नेहमीचीच!
त्यात आता ही आर्थिक मंदी.
म्हटल्यावर म्हटले,
परिस्थिती भल्तीच वंगाळ पातली आहे!
दशदिशांना कपातीचे वारे वाहते आहे.
पगाराला कात्री लागते आहे.
पेपरांचे काय आणि च्यानेलांचे काय
बुडत्यांचे चाललेत खोलात पाय
असे वंगाळ वंगाळ झाले आहे!

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
एकंदरितच देशकालस्थिती अशी चिंताजनक नसती व आम्हांस वेतन कपातीचे वा चाकरी गमावण्याचे भय नसते, तर आत्ता... आत्ता याक्षणी आम्ही पुनवडीतील अल्का चौकात ईसकाळच्या अभिनंदनाचा सप्तरंगी फ्लेक्स लावला असता!
किमानपक्षी बुधवारात जाऊन करवीरभूषण रा. रा. सम्राटदा फडणीस (पक्षी - ईसंपादक, ईसकाळ) यांस एक कटिंग चहा पाजून वर खैनीची चिमूट दिली असती!

आता तुम्ही विचाराल, की बापू, एकीकडे वृत्तपत्रांची पाने कमी झालेली आणि दुसरीकडे रद्दीचा भाव उतरलेला अशी चहूबाजूंनी आर्थिक कोंडी झाली असताना, कुणास चहा पाजण्याचा अविचार तुम्हांस सुचतो तरी कसा? असा काय बेहद्द आनंदीआनंदगडे तुम्हांस झाला आहे?

तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
ही खुषीचीच बाब आहे.
तुम्हांस ठाऊक असेलच, की एकीकडे 'साम्राज्या'चा पाय खचलेला आहे!
(खुषीची बाब ही नाही! )
त्यास कॉस्टकटिंगची लिपापोती सुरू आहे! (हीसुद्धा नाही!)
अशा बिकट परिस्थितीत ईसकाळने काही जाहिरातींवर बंदी घातली आहे!
खुषीची बाब आहे ती ही!
पैसा जाय पर प्रेस्टिज न जाय ही पत्रकुलाची रीत, हा पत्रकुलाचा धर्म!
ईसकाळ त्यास डोळे खुले ठेवून जागला आहे!

सकाळ पत्रास तुम्ही काहीही म्हणा... (तसे आपण म्हणतोच! सोडतो की काय? म्हणावयाचे असे तेथेच तर असते!!)
तर सकाळला तुम्ही काहीही म्हणा, किंतु काही सालांमागे सकाळने जोशींच्या गुटख्याच्या दुभत्या जाहिरातींवर बंदी घातली होती,
या सकाळच्या स्वच्छसंस्कृत धाडसास दाद ही दिलीच पाहिजे, की वाह सकाळ!!
आता तोच कित्ता ईसकाळने गिरविला आहे. ईसकाळने गुगलद्वारे प्रसारीत केल्या जाणा-या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
कारण?
त्या जाहिरातींमध्ये काही तरी आक्षेपार्ह आढळले!
(आक्षेपार्ह म्हटल्याबरोबर आमुच्या अंगभूत भोचक स्वभावाने फणा काढला! चौकशी करता समजले, की गेले दोन दिवस ई-सकाळवर अर्धनग्न ललनांची छायाचित्रे असलेल्या एस्कॉर्ट सर्व्हिसच्या जाहिराती प्रकाशित होत होत्या! पण त्या पुण्यात म्हणे दिसल्याच नाहीत! दुर्दैव, दुसरे काय!!)

सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळातही ईसकाळने आक्षेपार्ह जाहिराती बंद करून त्यापासून मिळणा-या धनराशीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, याकरीता ईसकाळचे अभिनंदन करणे वा ईसंपादक रा. रा. सम्राट 'कायत्रास' फडणीस यांस कटिंग चहा पाजणे आम्हांस भागच आहे.

तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
एवढे दोन शब्द बोलून आम्ही आपली रजा घेतो.
आमची मटा ऑनलाईनवरील सेक्स न्यूज व न्यूड व्हर्जिन मेरी प्ले बॉयवर ही बातमी वाचण्याची वेळ झाली आहे!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. १५ डिसेंबर २००८)

तें आणि हें  

(आता तुम्ही विचाराल, की बापू, हे ते आणि हे म्हणजे काय? तर अनेकांस हे ज्ञात असेलच, की लेखक मोशायांकडे दीपावलीचेही कंत्राट वगैरे असते. गुदस्ता त्यांनी तेथे एक परिसंवाद घेतला होता. यंदाही घेतला आहे व या परिसंवादाचे शीर्षक आहे - ते आणि हे. तेव्हा आम्ही सुविचार केला, की लोक काय काय उचलतात, तर आपणही हे शीर्षक का बरे उचलू नये? लेखक मोशायांसंबंधीच्या लेखास त्यांचेच शीर्षक किती सार्थ ठरेल!! तर या ठिकाणी आपण ते म्हणजे हिंटातील शर्माजींचा लेख आणि हे म्हणजे लेखक मोशायांचा लेख असे धरून चालू या.)

तें -
As a nation, we may ‘talk Inglis, walk Inglis and laugh Inglis’, but when it comes to reading books, most of us tend not to do so in the ‘phunny language’. In the coveted communion between author and reader, Hindi rules.
If nothing else, the numbers nail the case. Just the top three authors of Hindi pulp together sell more than 15 lakh copies a year. Each of them annually churns out between 2 to 10 books, each of which sells between 50,000 and 2 lakh copies. In comparison, any English language title that has sold 5,000 copies is termed a bestseller, even if the number is achieved over a couple of years.

हें -
'भारतात आज आपण भले talk Inglis, walk Inglis and laugh Inglis सुरू असलं तरी या Phunny language पेक्षा हिंदी वाङ्.मय अधिक वाचलं जातं. हिंदीतल्या टॉप तीन लेखकांची वर्षात १५ लाख पुस्तकं खपतात. ही झाली खपाऊ पुस्तकं म्हणजे पल्प फिक्शन. प्रत्येक लेखक वर्षाला पाचदहा पुस्तके पाडतो. प्रत्येक पुस्तक ५० हजार ते २ लाख इतकं विकलं जातं. उलट इंग्लिशमध्ये ५००० प्रती गेल्या, तरी आपल्याकडं ख्रिसमस साजरा केला जातो. शिवाय या प्रती संपायला काही वर्षं लागली तरी, तरी आनंद तेवढाच!'



तें -
But then, look at how the Hindi novels are sold: printed on low-grade paper, wrapped in a cover that’s cheap both financially and aesthetically...
...Yet, each of the reigning trinity — Surender Mohan Pathak, Ved Prakash Sharma, and Anil Mohan — says that theirs is, in fact, a shrinking market. Yes, they capture eyeballs with boombastic titles — Biwi Ka Nasha and Hatya Ek Suhagan Ki, to name just two stars in an expanding galaxy — but they might as well forget about any-decibel marketing from their publishers, a list topped by Raja Pocket Books, Radha Pocket Books, Ravi Pocket Books and Tulsi Paper Books. (One should, however, note that a recent plastic-wrapped release from one such factory promised to have currency notes ranging Rs 100-1,000 tucked between the pages.)
Such stray efforts at hardsell notwithstanding, sales are falling.

हें -
कमी दर्जाच्या कागदावर छापलेली ही स्वस्त व भडक पुस्तकं सुरिंदर मोहन पाठक, वेदप्रकाश शर्मा व अनिल मोहन हे सध्याचे लोकप्रिय हिंदी लेखक. 'बिबी का नशा', 'हत्या', 'एक सुहागन की' अशी कादंबरीची नावं. (येथे पहिल्या वाक्यात एका पूर्णविरामाच्या अभावाने घोळ झालाय. दुस-या वाक्यात हत्या एक सुहागनकी या एका कादंबरीच्या दोन कादंब-या झाल्यात! हा हंत हंत! ललितमध्येही अशा वृत्तपत्रीय चुका व्हाव्यात?!) राजा पॉकेट बुक, राधा पॉकेट बुक्स, रवी पॉकेट बुक्स, तुलसी पेपर बुक्स ही प्रकाशकांची नावं. (की प्रकाशनसंस्थांची?) एका प्रकाशकाने तर तुमच्या पुस्तकात १०० ते १००० रुपयांच्या नोटा सापडतील, असं आमिष दाखवलं होतं! म्हणजे चक्क वाचण्यासाठी लाच... मात्र स्वस्त किंमत, बटबटीत रंग, जबरदस्त मार्केटिंग एवढं सगळे असूनही, पूर्वीच्या मानाने हिंदी बुकांची विक्री घटली आहे.

तें -
...Sharma, whose 159th book was released recently. Mohan, author of 180 titles, thinks self-help books are the main competition for Hindi pulp....
Sharma is busy these days shuttling between Meerut and Mumbai, where his main job is to ‘fix’ the meandering plotlines of television drama.
Pathak hit the headlines when a bank robber confessed he was inspired by one of the author’s 267 books, Zameer Ka Qaidi. “There were dozens of OB vans parked in front of my house after the criminal made the confession... I got scared that I may be booked by the police,” says the soft-spoken author....

हें -
वेदप्रकाश शर्मांचं नुकतंच १५९वं, मोहन यांचं १८०वं पुस्तक बाजारात आलं. पण पुस्तकं वेगाने हालत नाहीत. कारण सेल्फहेल्प पुस्तक, उपयुक्त पुस्तकं जास्त जातात..... हिंदीतले हे लोकप्रिय लेखक टीव्हीकडे वळले आहेत. उदाहरणार्थ शर्मा मीरतचे. पण ते नेहमी मुंबईत चकरा मारून टीव्ही सीरीयलमध्ये एपिसोड लिहीत असतात. पाठक यांचं 'जमीर की कैदी' हे २६७वं पुस्तक. एका बँक दरोडेखोराने कबुलीजबाबात सांगितले की, पाठकांची ही कादंबरी वाचूनच दरोडा टाकणअयाची मी प्रेरणा घेतली. त्यानंतर चॅनेलवाल्यांनी बाईट घेण्यासाठी पाठकजींच्या घराभोवती गराडा घातला.

लेखक मोशायांच्या 'ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठी'ची ही वानगी.
हिंदुस्तान टाइम्सच्या त्या पानात मनोज शर्मा यांनी सुरेंद्र मोहन पाठक (लेखक मोशाय लिहितात तसे सुरिंदर नव्हे!), वेदप्रकाश शर्मा व अनिल मोहन यांच्या मुलाखतीही दिलेल्या आहेत. या मुलाखतींतील माहिती, लेखकांचे उद्गार (पक्षी - कोट) हे 'ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठी' करून लेखक मोशायांनी आपल्या लेखातील साधारणतः दोन पाने सजविली आहेत! बरे, हे कोट्सही असे काही झोकात दिले आहेत, की आमच्यासाऱख्या येरूमोरूंना वाटावे, पाठकजी नुकतेच शिवडीस येऊन गेले असावेत! (लेखकमोशायांनी हे मुद्दाम केले, असे आम्ही म्हणणार नाही. परंतु ते 'ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठी'च्या नादात आपसूकच साधून गेले!)

लेखक मोशायांचा लेख म्हणजे काही एवढाच नाही. त्यात नंतर English Authors (इंग्रेजी लेखक), Books (पुस्तके) यांची छानछान information (माहिती) दिलेली आहे, हे सांगणेही आम्ही आमची duty (कर्तव्य) समजतो. असो.

व्वा!
जमू लागले की आम्हांसही 'ट्रान्स्लेशन इन्टू गुड्ड मराठी'!
रा. रा. अशोकजी कोठावळे, ललितचा पुढील दिवाळी अंक तुम्ही केव्हा काढणार आहात?

(Posted by बापू आत्रंगे, दि. ११ डिसेंबर २००८)


म्हणजे आपल्या थोर व महान भारतीय संस्कृतीत असे मानले जाते, की अवघेच तर व्यासोच्छिष्टम आहे!
महर्षि व्यासांनी लिहिल्यानंतर कोण काय नवी क्रिएटिव्हिटी दाखविणार अथवा कोण चौथ्या नवतेचे दिवे लावणार? (चौथी नवता - संदर्भासाठी भेटा अगर वाचा - रा. रा. श्रीधर तिळवे, द्वारा अभिधानंतर. वि. सू. - नंतर (म्हणजे अभिधानंतर) झालेल्या परिणामांस बातमीदार जबाबदार असणार नाही! वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर मेडिक्लेम करावा!)

तर ही व्यासोच्छिष्टमची थेरी एकंदरच पत्रसृष्टीस अथांग लागू ठरली आहे! हे याचे वृत्त, ही याची बातमी अशी अवघी थेरे या एका थेरीने मोडीत काढली आहेत! कोणत्याही वृत्तपत्रातील बातमी घ्या, ती फिरवा, ट्रान्सलेट इन्टू गुड्ड मराठी करा आणि आणा बायलायनीने छापून! कोण कोणास पुसते?

काल किंवा परवा ललित (दिवाळी २००८, नोव्हेंबर-डिसेंबर) च्या अंकातील 'किताबें कुछ कहना चाहती है...' हा रा. रा. हेमंत देसाई यांचा लेख वाचत असताना मात्र आमुच्या मनीं असे कोणतेही विचार नव्हते! आमच्या मनीं तत्क्षणी एकच स्वच्छ असूयाभाव होता, की आर्थिक मंदीच्या काळातही देसाई मोशायांच्या लेखनाचा कुटिरोद्योग किती फळलेला आहे! कोणताही दिवाळी अंक चाळा. देसाई मोशाय तेथे आहेतच. बरे दिवाळी म्हणून सोडून दिले! (दिवाळीत काय कोणीही लिहिते! अंकाच्या संपादकाशी घसट असली म्हणजे दहावीचे निबंधसुद्धा छापून येतात!!) तरी एरवीही देसाई मोशाय सदरे फाडीतच असतात! सकाळ आता घरचेच पत्र! त्यामुळे तेथे कोणत्या वारी, कोणत्या विषयावर देसाई मोशायांचा गेलाबाजार अर्धे पृष्ठ तरी लेख येईल याचा काही नेम राहिलेला नाही! बरे सकाळचाच लेख किंचित फिरविला, की झाला महानगरातला लेख तयार!... तर असे असीम पोटदुखीयुक्त विदग्ध विचार त्या वेळी आमच्या मनीं मळमळत होते!

सदरहू लेखाच्या पहिल्या परिच्छेदात लेखक मोशायांनी हल्ली लोक कसे वाचतात याचे वर्तमान सोदाहरण सांगितले आहे. बरे नुसते लोकच नव्हे, बरे का. लेखक मोशाय स्वतःही वाचतात! त्यांच्या तरूणपणाची एक आठवण आहे. पुण्यात शाळा-कॉलेजात असताना ते सायकलच्या हँडलवर डावीकडे पुस्तक ठेवून चणे खात पायडल मारीत जात असत! (नवशिक्या लेखकांनो, पाहा. थोर लेखक एका वाक्यात किती माहिती देऊन जातात! या एका वाक्यातून आपणांस काय समजले? तर लेखक मोशाय तरूणपणी पुण्यात होते. ते शाळा-कॉलेजात जात होते. त्यांच्याकडे सायकल होती. ती त्यांना चालविता येत होती. सायकल चालविताना एकाच वेळी सायकल चालविणे, चणे खाणे व हॅंडलवर पुस्तक ठेवणे एवढ्या कला त्यांना ज्ञात होत्या! नंतर त्यांनी सुवेगा ही मोपेड घेतली. ही माहिती मात्र दुस-या वाक्यात येते! असो.)

तर लेखक मोशाय म्हणतात 'मुद्दा वाचनवेडाचा आहे.' चांगले आहे! पण तो मुद्दा या एका परिच्छेदातच का बरे संपतो? या वाक्यानंतरचे पुढचेच वाक्य आहे - 'यंदा मॅनबुकरसाठी दोन भारतीय लेखक अंतिम यादीत आले.' (तेव्हा खरा मुद्दा वाचनवेडाचा नसून वाचनउडीचा आहे, असे उगाच वाटून गेले!) तर या उडीमध्ये ते भाषिक लेखकांना चांगलेच सुनावतात, की 'इंग्रजीतलं कोण वाचतंय? त्यांना गरीबांचे प्रश्न कुठले समजायला! असला पारंपरिक उर्मटपणा भाषिक लेखकांनी आता सोडून द्यायला हवा.' ही झापाझापी करून झाली की मग लेखक मोशाय हिंदी पट्ट्यात उडी मारतात.

लेखक मोशाय लिहितात - 'भारतात आज आपण भले talk Inglis, walk Inglis and laugh Inglis सुरू असलं तरी या Phunny language पेक्षा हिंदी वाङ्.मय अधिक वाचलं जातं. हिंदीतल्या टॉप तीन लेखकांची वर्षात १५ लाख पुस्तकं खपतात. ही झाली खपाऊ पुस्तकं म्हणजे पल्प फिक्शन. प्रत्येक लेखक वर्षाला पाचदहा पुस्तके पाडतो. (हे म्हणजे लेखांसारखेच झाले की!) प्रत्येक पुस्तक ५० हजार ते २ लाख इतकं विकलं जातं. उलट इंग्लिशमध्ये ५००० प्रती गेल्या, तरी आपल्याकडं ख्रिसमस साजरा केला जातो. शिवाय या प्रती संपायला काही वर्षं लागली तरी, तरी आनंद तेवढाच!'

हा परिच्छेद वाचला मात्र आणि आमच्या मनीं टुण्णकन् आले, की अगबाईअरेच्चा, हे तर आपण यापूर्वीच कुठे तरी वाचलेले आहे! कुठे बरे? कुठे बरे? दोन्ही मेंदू बराच काळ झिजविल्यानंतर ते स्मरले आणि आमच्या मनी टुण्णकन् आले, की अरेबापरे, हे तर आपण यापूर्वीच वाचलेले आहे...हिंटामध्ये! (तुम्हांस काय सांगू वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, त्या क्षणी आम्हांस आनंदे गहिवरून आले! स्वस्तात मिळतो म्हणून हिंदुस्तान टाइम्स लावला, याचा आम्हांस व आम्हांसम कितीयेकांस कसाकसा शुभलाभ होत आहे, हे पाहून आम्हांस कित्तीकित्ती आनंद झाला!)

तर हिंदुस्तान टाइम्सच्या रविवार, दिनांक सात सप्टेंबर दोनहजारआठच्या अंकामध्ये 'पल्पवाला' शीर्षकाचा मनोज शर्मा यांचा एक पूर्ण पानभर लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख हाताशी घेऊनच लेखक मोशायांनी आपली लेखवस्तु सजविल्याचे दिसते आहे. हे म्हणजे शर्माजींनी रचिला पाया, मोशाये केलासे कळस, असे काहीसे झाले!!
अर्थात हे सर्व वाचनवेडातूनच घडले असणार हे नक्की! अन्यथा लेखकमोशायांनी त्या मनोज शर्मांचे सौजन्य जाहिर करण्याचे सौजन्य नसते प्रकट केले? (येथे आम्हांस उगाचच याद येते ती रा. रा. प्रशांत दीक्षित यांची. लेखाअंती आपले स्त्रोत नमूद करणारे ते पहिले व एकमेव मराठी श्रमिक पत्रकार होत! हे विनोबांचे संस्कार! त्यांस आमुचा जय जगत्!)

मेंदूतील परार्ध पेशींचे मातेरे झालेले असतानाही आम्हांस हा नोबेल शोध लागल्यानंतर मात्र आमुच्या या नश्वर देहात म. म. माधव मनोहरच (पक्षी - नाट्यसृष्टीतील पीएसआय समीक्षक) अथवा म. म. य. दि. फडकेच (पक्षी - साहित्य-समाजक्षेत्रीचे डिटेक्टिव्ह संशोधक) संचारले व आम्ही अतिउत्साहाने ललितातील त्या पानांच्या शिरा काढू लागलो! (पानांच्या शिरा काढणे या प्रयोगाचे सौजन्य - म. म. पी. एल. देशपांडे. सांगून ठेवलेले बरे! कसें?) आणि काय सांगू वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, आम्हांस तर अशी वाक्या मागून वाक्येच सापडू लागली.

ती वाक्ये आम्ही पुढील पोस्टी सादर करणार आहोत. या योगे वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांस इंग्रेजी लेख ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठी कसा करावा याचे सहजज्ञान होईल, अशी आमची विनम्र खात्री आहे.
तथास्तु!

(Posted by बापू आत्रंगे, दि. १० डिसेंबर २००८)

तुम्हांस म्हणूनी सांगतो,
आम्हांस भयाण आजार झालेला आहे! बहुधा मेंदूचाच! असे वाटते, कोणत्याही क्षणी मेंदूला हार्टअटॅक येणार!
कदाचित हा पाठकणा किंवा पोटाचाही विकार असू शकतो!
काहीच कळेनासे व समजेनासे झाले आहे!
आजाराची लक्षणेही काही वेगळीच दिसताहेत!

कालची किंवा परवाचीच गोष्ट. कुणीसे (मुद्दामहून) सांगितले, की सकाळमधील कर्मचा-यांस वेतन आयोगानुसार तीस टक्के हंगामी वाढ लागू झाली. ते ऐकले मात्र, आमुच्या डाव्या कुशीत आंत्रपुच्छाच्या उजवीकडे सुसाट कळ निघाली! बर्निंग पेन!!

आमच्या चर्मचक्षुंचेही काही सत्य राहिलेले नाही! पाच मिनिटे सामना वाचला, की नेत्र कायमचे मिटावेत असे काहीसे नतद्रष्ट वाटू लागते! परवा तर लोकसत्ता वाचता वाचता आमचे डोळे पांढरेफटक झाले! (नंतर ध्यानी आले, की डोळे पांढरे झाले नव्हते, तर लोकसत्तात व्हाईट स्पेस किंचित जास्तच सुटली होती! लोकसत्तेतल्या रानडे इन्स्टिट्युटचा हा प्रभाव!)

आता डोळ्यांचाच विषय निघाला, म्हणून सांगतो, हल्ली ना आम्हांस सगळे काही आधीच वाचले आहे असे भासआभास होऊ लागले आहेत! (म्हणजे काही काही पत्रकारांना बघा, सगळे काही आधीच माहित असते! मराठीत तर एक संपादक असे आहेत, की त्यांच्या कोशात 'माहित आहे' हा एकच शब्द आहे! अन्य शब्द नसल्याने ते लिहितातही मोजकेच! शाळकरी निबंधासारखे!!)

आता आमचे म्हणजे कसे, की आम्हांस बालपणापासून वाचनाची अथांग आवड!
(ती आमच्या संभाषण व वर्तन व लेखन व शुद्धलेखन यातून प्रतीत होत नसेल, तर तो आमुचा विनय समजावा! पत्रकारितेत एक रा. रा. राजू काळे (द्वारा म.टा.) सोडले, तर आमुच्याइतके विनयी अन्य कोणी नाही, असे आम्ही गर्वाने सांगू शकतो!!... अन्यथा येथे मस्तकी हवा जाण्यास वेळ तो कितीसा लागतो?... आणि हवेचे काय - ती रिकाम्या जागी वेगाने घुसते! असो.)

तर आम्हांस वाचनात अत्यंत रुची असल्याने आम्ही सतत व नेहमी (काहीबाही) वाचतच असतो. त्यामुळे तर हे होत नसावे? समजण्यास काही मार्ग व रस्ता नाही!!

म्हणजे बघा, अगदी कालची किंवा परवाचीच गोष्ट. नेहमीप्रमाणे स्वगृही आलो. डाळ व भाताचा कूकर लावला. कषायपेय प्यावे असा सुविचार करीत होतो, तोच सौभाग्यवती पातल्या. सँडले काढता काढता त्यांनी पृच्छा केली. स्वैपाकाचं काय? आम्ही विनयाने सांगितले, की डाळ-भात लावलाय, तर काय भडकल्या त्या! तत्क्षणी आम्हांस वाटले, की अगंबाईअरेच्चा! डाळ-भातावरून बाईचे भडकणे, हे तर आपण याआधीच कुठेतरी वाचले आहे! कुठे बरे? हां, मटामध्ये. ओबेरॉयवरील हल्ल्याचे वृत्तांकन करून करून बरखाबाई थकल्या होत्या. त्यांना भूक लागली होती. त्या वेळी त्यांच्या मदतीला प्रोड्युसरे, रिपोर्टरे अशी चांगली पाच-सहा माणसे होती. पण ती तरी कुठून आणणार बाईंसाठी थाळा? ओबेरॉयमधले रेस्तरॉं तर बंद! पण मलिका-ए-रिपोर्टरांचा चर-खा बंद पडणे प्रोड्युसरास परवडणारे नव्हते. म्हणून त्याने बरीच पायपीट करून कसाबसा डाळ-भाताचा इंतजाम केला. पण डाळ-भात खायला बाई म्हणजे काय डोंबोलीच्या वार्ताहर वाटल्या काय? त्या भडकल्या!! परंतु तरीही समस्त मीडियावर उपकार म्हणून त्या जेवल्या! अहाहा! काय तो नजारा होता! लोक गोळ्या खात होते आणि बाई भाताचे गोळे!! तर असे आमचे होते! प्रत्येक घटना आधीच पाहिलेली, प्रत्येक लेख आधीच वाचलेला असल्याचे आम्हांस वाटते व भासते.

म्हणजे बघा, अगदी कालची किंवा परवाचीच गोष्ट.
ललित नामक दिवाळी अंक आम्ही कचेरीतून आणला.
दिवाळी अंकांची आम्ही सहसा चाळवाचाळवच करतो! तद््नुसार आम्ही ललित चाळत होतो. तो त्यात आम्हांस आमच्या एका थोर व्यवसायबंधुंचा लेख दिसला. (हेही आमच्या आजाराचे एक (अव)लक्षण! दिवाळी अंकात कोणा पत्रकारांचा लेख पाहिला की आमच्या अंगाची लाहीलाही झालीच म्हणून समजा! अशा वेळी वाटते, थेट उठावे आणि त्या संपादकास गदागदा हलवून विचारावे, चांडाळानूं, किती गटबाजी व वशिलेबाजी कराल? आम्ही काय लिहू शकत नाही काय? अरे, मानधनाचे ३०० रु. (अक्षरी तिनशे फक्त) न घेताही आम्ही लिहू! पण कुणाला चांगले लिखाणच नको आहे! जाऊ दे. आपले थोडेच नुकसान होतेय. हानी होतीय ती मराठी भाषा-साहित्य-संस्कृती व इतिहासाची!! असो... हल्ली आम्हांस असा मळमळीचा त्रासही होतो!!)

तर आमुच्या थोर व्यवसायबंधुंचा लेख दिसला. आम्ही तो चाळावयास घेतला आणि काय सांगू वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो!
त्या लेखातील उतारेच्या उतारे आधी कुठे तरी वाचल्याचा भास-आभास आम्हांस होऊ लागला!
म्हटले, छे!
एवढे मोठे लेखकराव ते, ते असे कसे करतील?
म्हणून ते उतारे पुन्हा वाचले, पुनःपुन्हा वाचले, पुनःपुनःपुन्हा वाचले.
आणि अचानक आमच्या मस्तकी लखकन् एक शब्द चमकून गेला.
वाङ््मयचौर्य!!

तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
तो लेख, ते उतारे, ते थोर पत्रकार आणि आम्हांस आलेला ललितअनुभव हे सर्व आपण पाहू या
ब्रेक के बाद!
कुठेही जाऊ नका. आम्ही लवकरच परतू पुढच्या पोस्टसह.
तोवर तुम्ही विचार करा - कोणी बरे केली असेल ती उचल?

(Posted by बापू आत्रंगे, दि. ८ डिसेंबर २००८)

वटवटवागळे!  

आयबीएन-लोकमत ही वाहिनी म्हणजे लोकमत कमी आणि वागळेमत जास्त! आपलं महानगरमधून निखिल (हल्ली त्यांना काही वात्रट लोक मीखिल असेही म्हणतात!) वागळेंनी स्थलांतर केले. त्यामुळे त्यांचे वाचक हल्ली आयबीएन-लोकमतवर महानगर ऐकण्यासाठी येतात! या वाहिनीवर बुधवारी रात्री आजचा सवाल या नावाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा मथळा आजचा आरोप असाच असावयास हवा होता. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दहशतवादी हल्ल्याचे जे कव्हरेज केले त्यात अतिरेक केला होता काय, असा आजचा सवाल होता. वास्तविक इलेक्ट्रॉनिक माध्यमे नेहमीच अतिरेक करतात काय, हा रोजचाच सवाल आहे. आणि त्याचे उत्तर बव्हंशी होय असेच आहे. प्रिंट मीडियातून यावर नेहमीच टीकेची झोड उठविली जाते. (प्रिंट मीडियाचीसुद्धा ही नेहमीचीच खोड! आपले ठेवावे झाकून आणि दुस-याचे पाहावे वाकून! पण ते असो.) वटवटवागळे आणि त्यांच्या दुनियेस अर्थातच प्रिंट मीडियाचे हे म्हणणे मान्य नाही. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमातून वागळे की अदालत (आणि अदावतसुद्धा!) भरविली आणि त्यात प्रिंट मीडियाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. या सुनावणीला दस्तुरखुद्द वटवटवागळे, आयबीएन-लोकमतचे वृत्तसंपादक मंदार फणसे (कोटबिट घातल्यावर हे बरिक ग-यासारखे गोड दिसतात!), टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ संपादक प्रफुल्ल मारपकवार, तसेच एमआयटी महाविद्यालयाचे संचालक दीपक आपटे हे उपस्थित होते. (पैकी दीपक आपटे यांचे सततचे सुहास्य पाहिल्यावर वाटले, की ते या कार्यक्रमात सुसहर्ष सुसहभागी झाले असावेत! आणि प्रफुल्ल मारपकवार यांचे बोलणे ऐकल्यावर वाटले, की ते आपले भाषण पाठ करून आले असावेत!)

या कार्यक्रमाच्या प्रारंभीच टीव्ही एटीन गटातर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पाहा प्रथमच आमच्या चॅनेलवर असे त्यात कोठेही म्हटलेले नव्हते!

यानंतर मग वागळेंनी प्रिंट मीडियावर आरोपांचा पहिला चिखलगोळा फेकला. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी जीव धोक्यात घालून बातमीदारी केली, तरीही हे सर्व टीआरपीसाठी चालले आहे असे म्हटले गेले, हे योग्य आहे काय, असा त्यांचा आजचा पहिला सवाल होता. हा सवाल झाल्यावर ते म्हणाले, आता मी वळतो दीपक आपटे यांच्याकडे. (मी वळतो, मी ब्रेक घेतो, मी विचारतो या वटवटीमुळेच अनेक प्रेक्षक मी दुसरा चॅनेल लावतो, असे म्हणतात म्हणे!) आपटे हे तमाम मराठी प्रेक्षकांचे प्रतिनिधी होते. त्यांना आपली बाजू नीट मांडता आली नसली, तरी त्यांनी चेह-यावरचे हास्यदीप विझवू दिले नाही. याबद्दल त्यांना हाहाहाहास्यवीरच म्हणावयास हवे. नंतर या प्रश्नाचे उत्तर वागळेंनीच देऊन टाकले, की टीआरपीसाठी नव्हे, तर संपादकिय जबाबदारीने आम्ही हे केले!

वागळेंची ही अखंड वटवट (अखंड म्हणावयाचे कारण म्हणजे, ब्रेकमध्येही ते ब्रेक घेत नाहीत. तेथेही त्यांचे मॉडेलिंग सुरुच असते!) चालू असताना त्यांचे सहकारी मंदार फणसे हेही त्यांना बक(बक)अप करीत होते. फणसेदादांनी तर यावेळी काटेच बाहेर काढले! प्रिंट मीडियातील पत्रकार पोटदुखीतून असे आरोप करतात काय, या वटवटपृच्छेवर ते म्हणाले, की असूयेतून असे आरोप केले जातात! ही असूया कसली हे मात्र त्यांस माहित नव्हते! पुढे तर त्यांनी वृत्तपत्रांवर बेजबाबदारपणाचाही आरोप केला. वृत्तपत्रेही बेजबाबदारपणे लिहितात. वाहिन्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांची शहानिशा करीत नाहीत. वाहिन्यांच्या संपादकांचे कोट घेत नाहीत. टीव्ही चॅनेल्स पाहून निर्णय घेण्याइतके अतिरेकी मूर्ख नाहीत. टेलिव्हिजन हे कॉम्प्लिकेटेड मीडियम आहे. ते इव्हॉल्व्ह होत आहे. चॅनेल्सनीही अनेकदा (?) जबाबदारीने पत्रकारिता केलेली आहे, असे आपले इतक्या वर्षांचे अनुभवाचे बाल-बोल ऐकवून फणसे यांनी चॅनेल्सप्रतिनिधींना खूष करून टाकले. याच संदर्भात वागळे यांनी आणखी एक चिखलगोळा फेकला. ते दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी स्वतःकडे निर्देश करीत म्हणाले, की आम्ही (पक्षी - चॅनेल्सचे पत्रकार. वागळे हे हल्ला आटोपून गेल्यावर बाहेर पडले होते.) जीव धोक्यात घालून पत्रकारिता करतो. यावेळी वृत्तपत्रांचे - एखादा अपवाद वगळता - संपादक कुठेही बाहेर पडले नव्हते. जीव धोक्यात घालून पत्रकारिता केली या एकाच मुद्दयावर वागळे इतका भर देत होते, की वाटले, या पत्रकारांच्या हातात बूमऐवजी बंदुकाच होत्या! व एकेक गोळी झाडल्यावर ते दहशतवाद्यांना विचारीत होते, की अब आपको कैसा लग रहा है?

युद्धाचे रिपोर्टिंग करताना, ते कालांतराने करावयाचे असते, चालू ऑपरेशन्स दाखवायची नसतात, असा सुमुद्दा दीपक आपटे यांनी
सुहास्य सुवदनाने मांडला. त्यावर इंडियन आर्मी ही कालबाह्य झालेली आर्मी आहे. त्यांना युद्धाचे रिपोर्टिंग कसे करावे हे माहित नाही, असा आक्षेप मी घेतला तर? असा सवाल करून वटवटवागळे यांनी जी जबाबदार पत्रकारिता केली त्याला तर तोडच नव्हती! दहशतवादी टीव्ही चॅनेल्स पाहून निर्णय घेतात, हे म्हणणे बाळबोधपणाचे आहे, असे म्हणताना ते निखिलखिलून हसले! दहशतवाद्यांची बोट येऊ दिली ही आमची चूक झाली असे नौदलाने कबूल केले. मग नौदल मीडियावर कशी टीका करू शकते, हा त्यांचा सवाल तर अफलातून असाच होता! इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका करणे म्हणजे राजकारण्यांच्या हातातील हस्तक बनणे, हा जावईशोधही वागळे यांनी यावेळी लावला. एकंदरच त्यांचे मी-खिल हे नाव सार्थ ठरू लागले आहे!

या सर्व धुलिकावंदनात प्रेक्षकांनी मात्र गंमत आणली.
पहिल्या ब्रेकच्या वेळी दाखविलेल्या मतचाचणीत ८३ टक्के प्रेक्षक म्हणाले, की होय, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अतिरेक केला!
दुस-यावेळी प्रेक्षकांचे हेच प्रमाण होते.
कार्यक्रम आटोपताना मात्र प्रेक्षकांचे हे प्रमाण ८४ टक्क्यांवर गेले!
आम्हांस वाटते, हा वाढलेला एक टक्का मीखिल वागळेंच्या वाट्याचा असावा !!

(Posted by चांगदेव पाटील, दि. ४ डिसेंबर २००८)

"टिंग्याsss, ये टिंग्यव..."
"वव !"
"आरं, सकाळसक्काळी काय चाललंय तुहं?"
"काय नाय वला! जरा हॉरिझॉन्टल एक्स्पान्शनचा इचार करतोय..."
"म्हंजे रं काय? आन् दादाला सांगातलं का? का तुहं एकट्याचंच चाललंय?"
"सांगातलंय वला! आन् दादाला काय कळतंय?... आपल्या वावरात जोमानं शाळू पिकाया पायजे का नको? चांगला शाळू पिकला का मंग आपल्या चितंग्याला किती वैरन मिळल खायाला..."
"पन कसा पिकल शाळू?"
"त्येचाच तं इचार करतोय ना मी..."
"मंग मी पन करतो तुह्यासंग इचार... चाल, आपन शीटीशी घेऊ."
"काय नगं शीटीशी. नुसत्याच बैठका... बीनजोराच्या..."
"मंग रं?"
"आरं, काय नाय वला. म्या सम्दं ठरिवलंय. मान्संबी बघून ठेवल्यात."
"मान्सं काह्याला?"
"काह्याला म्हंजे. आपला शाळू पिकल. मंग त्याचं लई पैसं येतील. मंग आपुन एक्स्पान्शन करू. आनखी याक वावार इकात घेऊ. तिथं शाळू पेरू. मग त्योबी लई झ्याक पिकल. मंग आपुन आनखी एक वावार इकात घेऊ. मंग तिथं शाळू पेरू.... आसं करून करून आपुन शाळूसम्राट होऊ!... तं तेच्यासाठी किती मान्सं लागतील? मंग आईन टायमाला मिळत्याल का मान्सं. तव्हा आताच बघून ठेवल्यात..."
"तिच्यामायला तिच्या! टिंग्या, लई भारी रे!! काय प्लॅन हाय तुह्यावाला... चाल आपुन त्याची पीपीटी करून दादाला दावू..."

आता तुम्ही विचाराल,
की टिंग्याने आणि त्याच्या मोठ्या भावाने योजना तर खूप छान केली.
मग पिकला का त्यांचा शाळू?
घेतल्या का त्यांनी शेतजमिनी?
झाले का ते शाळूसम्राट?

तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
टिंग्या - पार्ट टूचे पुढचे कथानक आम्हास ज्ञात नाही!

आम्हांस एवढेच माहित आहे, की
सकाळ टाइम्सने आपला दिल्लीतील कारभार आटोपला आहे.
तेथे साठेक माणसे नेमण्यात आली होती.
त्यांच्या हाती श्रीफल ठेवण्यात आले आहे.
आता ती पत्रकारे न्यायालयी जाणार आहेत.
काल, सोमवारी तर त्यांनी दिल्लीतील प्रतापभवनी निदर्शनेही केली.
त्यात दिल्लीतील अन्य पत्रांतील पत्रकारेही सामील झाली होती.
(आणि त्यावेळी दिल्लीतील रा. रा. अनंत बागाईतकर आदी सकाळची पत्रकारे आपली पत गेली कोठे या शोधात होती!)
इकडे सकाळ टाइम्सचा पर्णभारही कमी करण्यात येणार आहे म्हणे.
किंतु त्यास सकाळ टाइम्सचे कारभारी तरी काय करणार म्हणा!
त्यांचा शाळू पिकलाच नाही!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २ डिसेंबर २००८)