लहानपणी एक गोष्ट ऐकली होती.
माकडाची. माझंच तोंड लाल असं म्हणणा-या माकडाची.
(तोंडाबाबत पाठभेद आहेत. असू देत.)
गेल्या तीन दिवसांत जेव्हा सगळीकडून अंधारून आले होते,
हताशेने मनामाणसांना घेरले होते,
वांझसंतापाने मस्तक तापले होते,
तेव्हा, एका क्षणी ही गोष्ट अवचट आठवली.
तो क्षण आता आठवत नाही.
पण एवढे स्मरतेय, की त्या वेळी कुठल्याशा च्यानेलवर कुठलासा निवेदक दहशतवादी हल्ल्याची लाईव्ह कॉमेंट्री सांगत होता! आमचाच च्यानेल कसा सर्वप्रथम ब्रेकिंग न्यूज देतो, आमचेच बातमीदार कसे सगळ्यात पुढे आहेत, अशा बढाया मारत होता. आपलेच तोंड लाल कसे हे सांगत होता.
सांगावे, त्याने खुशाल असे सांगावे.
मार्केटिंग की काय म्हणतात ते याहून वेगळे थोडेच असते?
वाटल्यास , भला उसके च्यानेल से तुम्हारा च्यानेल अधिक सफेद असे आम्हीही स्ट्यांपावर लिहून देऊ.
पण तुमच्या लालतोंड्या स्पर्धेत गड्यांनो,
पत्रकारिता, जबाबदारी, सत्य, तथ्य, देशहीत, जनहीत आदी गोष्टी येतात की नाही?
की त्या तुमच्या लेखी इत्यादीच असतात?
गेल्या तीन दिवसांत च्यानेलांच्या प्रतिनिधींनी रात्रीचा दिवस केला, खूप मेहनत घेतली.
त्याबद्दल त्यांना आपण शाबास म्हणू.
पण त्याबरोबर वटवटसावित्रीचे व्रत घेतल्याप्रमाणे त्यांनी अनेकदा जी काही बडबड केली,
बातमीच्या नावाने अनेकदा जी काही दृश्ये दाखविली, जी काही माहिती दिली,
ती नसती दिली तर चांगले झाले असते.
वृत्तपत्रेही या स्पर्धेत फार मागे होती अशातला भाग नाही.
या लेखासोबत आम्ही काही छायाचित्रे देत आहोत.
मित्रांनो, ती पाहा आणि ठरवा की आपणही किती अतिरेक करीत होतो.
ही छायाचित्रे आहेत झी न्यूज आणि झी २४ तास या वाहिन्यांनी केलेल्या पराक्रमाची!
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास झी न्यूजने एक सनसनाटी ब्रेकिंग न्यूज दिली.
नरिमन हाऊसमधून एक दहशतवादी पळाल्याची.
तो कसा पळाला, कुठे पळाला, याचे साग्रसंगीत वर्णन करणारी ती बातमी.
तिचे पुढे काय झाले कुणास ठाऊक? नंतर ती कुठे दिसलीच नाही. पण त्यावेळी ती बातमी वाचून मनाची जी अवस्था झाली, त्याची भरपाई कोण करणार?
त्यानंतर दुपारी दीड ते पावणेदोन पर्यंत झी न्यूज आणि झी २४ तासने जो काही धिंगाणा घातला होता तो अवर्णनीय होता.
सीएसटी, आरबीआय बँक येथे गोळीबार झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा निर्वाळा अन्य वाहिन्या देत असतानाही या झी २४ तासचे संपादक रा. रा. मंदार परब मात्र आपल्या प्रतिपादनावर ठाम होते. तिकडून सकाळच्या बातमीदार श्रीमती मृणालिनी नानिवडेकर त्यांना दूरध्वनीवरून बातमी पुरवित होत्या, की त्यांनी फक्त धावपळ पाहिली. अफवा ऐकल्या. परंतु रा. रा. परब आपले ठामच! आणि हे जेव्हा झी २४ तासवर सुरू होते तेव्हा झी न्यूज मात्र या सगळ्या अफवा असल्याचे सांगत होते. म्हटले, चला, झी न्यूज शहाणे झाले. तर पुढच्या काही मिनिटांत झी न्यूजवर पुन्हा ब्रेकिंग न्यूज - सीएसटीत गोळीबार झाला!
या छायाचित्रांबरोबरच, वृत्तपत्रांच्या बेजबाबदारपणाचा एक नमुना म्हणून आमच्या एका सहयोगी बातमीदाराने पाठविलेले नगरच्या सार्वमतचे मुखपृष्ठही आम्ही येथे देत आहोत. आमचे सहयोगी कळवितात, की त्याचा मथळा वाचून असे वाटते, की जणू मुंबईवर हल्ला झाल्याचा आनंद सार्वमतास झाला आहे.
मित्रांनो, हे पाहा आणि कपाळास हात लावा!
याशिवाय सहयोगी बातमीदार ब्लॉगमध्ये रा. रा. स्वप्नील बापट यांचा याच विषयावरील एक लेख आणि ई-सकाळने प्रसिद्ध केलेल्या मीडियाविषयक प्रतिक्रिया देत आहोत.
त्यातून आपण काही शिकलो तर बरेच आहे.
नाही तर एक दिवस असा येईल, की मायबाप वाचक व प्रेक्षकच आपले तोंड लाल करतील!!
-----------------------------------------------------
वेळ - शुक्रवार, १.३७
वेळ - शुक्रवार, १.३७
वेळ - शुक्रवार, १.३८
वेळ - शुक्रवार, १.३७
वेळ - शुक्रवार, १.४८
आणि हे सार्वमतचे मुखपृष्ठ....
(Posted by चांगदेव पाटील, दि. २९ नोव्हेंबर २००८)

मित्रांनो,
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
तसे आपण अशा बातम्यांना निर्ढावलेलो असतो.
पण ही घटनाच अशी होती, की क्षणभर आपणही हादरून गेलो.
जेवढे हादरलो, तेवढेच चिडलो, संतापलो, दुःखाने पिळवटून गेलो.
पण मीडियाचे प्रतिनिधी म्हणून या क्षणी आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे.
आपल्यावर जबाबदारी आहे जबाबदार पत्रकारितेची.
वाचकांना सत्य, निखळ सत्य तेवढेच देण्याची.
सनसनाटीपणाला बळी न पडण्याची.
तोलून-मापून शब्दशब्द वापरण्याची.
या कठिण समयी शहरातील शांतता टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची.
आपण या परीक्षेतही यशस्वी ठरू या.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांना, शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांना आपणां सर्वांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
आणि
प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून या भ्याड हल्ल्याचे वार्तांकन करणा-या विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना, वृत्तपत्रांच्या बातमीदारांना, छायाचित्रकारांना मनःपूर्वक सलाम!
- ब्लॉगएडिटर
(अर्पणपत्रिका -
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यांचे वृत्तपत्रीय वृत्तांत वाचून पाडलेले हे बोल(भांड)गाणे समस्त मराठी संपादकांच्या साहित्यप्रेमास सादर अर्पण.)
प्रिय पाडगावकर,
पुरस्कार म्हणजे पुरस्कार म्हणजे पुरस्कार असतो
पण जो गर्दीचा यार त्यालाच आठ कॉलमी नमस्कार असतो
तुम्ही असाल कवी मोठे
आम्हांला काय त्याचे?
शब्दांचे धनी मोठे
आम्हांला काय त्याचे?
तुमचा सत्कार आमच्यालेखी दुकॉलमी सोपस्कार असतो
जो गर्दीचा यार त्यालाच आठ कॉलमी नमस्कार असतो
तुमच्या नावाला तशी
सांगा किती पत आहे?
माणसे जमविण्याची अशी
सांगा किती एेपत आहे?
जेथे गर्दी तेथे आम्ही, हा तर स्वच्छ व्यापार असतो
जो गर्दीचा यार त्यालाच आठ कॉलमी नमस्कार असतो
(Posted by अरूंधती पुणेकर, दि. २६ नोव्हेंबर २००८)
----------------------------------------------
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
आजचा हा बातमीदारवरील ७५वा (अक्षरी - पंचाहत्तरावा फक्त)लेख
तुमच्या आजवरच्या अखंड सहनशीलतेला सहर्ष व सानंद अर्पण.
- बापू आत्रंगे व चांगदेव पाटील व अरुंधती पुणेकर व ब्लॉगएडिटर.
बिग बॉसचे काय जाहले,
सारेगमपमध्ये कोणी कोणी सल्ले व आशीर्वाद दिधले,
असंभवमधील पोलिस तपास कुठवरी आला
आदी राष्ट्रीय महत्त्वाच्या 'बातम्या' वाचूनी जाहल्या व आम्ही समाधान पावूनि आमुची नेत्रकमले मिटली! (मिटले म्हणजे तात्पुरते!... लगेच आनंदोत्सव साजरा करू नका!!)
मनीं म्हटले, वृत्तपत्र असावे, तो ऐसे!
आता एकदा मुखपृष्ठी
पंतप्रधानांच्या परदेशयात्रेऐवजी गलगले निघाले...
शेअरबाजाराच्या बुडबुडघागरीऐवजी झीची उलाढाल
अधिका-यांच्या कर्मकथांऐवजी अधिकारी कुटुंबाची रडकथा
अशा शंभर पॉईंटी हेडलायनी झळकल्या की आम्ही डोळे मिटावयास स्वतंत्र व मोकळे!! (मिटावयास म्हणजे यावक्ती कायमचेच!)
मनीं अशी नको नको ती वांझविचारविलसिते सुरू असतानाच आम्ही आतील पानांची चाळवाचाळव करीत होतो.
अचानक व अकस्मात आमुची मर्मग्राही दृष्टी अग्रलेखाच्या कॉलमी गेली.
सवयीने आमुचे चक्षु अग्रलेख वाचू लागले... (व दोन्ही मेंदू अन्य कामांकडे वळले!
इंद्रियांचे ऐसे डिव्हिजन ऑफ लेबर आम्ल व पित्त व जळजळ याकरीता अतिगुणकारी!!)
--------------
तर आम्ही जेहत्ते कालाचे ठायी आमुच्या डोळ्यांनी जो अग्रलेख वाचू लागलो, त्याचे शीर्षक होते -
सारेगमप आणि रशिया
तसे पाहिल्यास सारेगम आणि रशिया यांत काहीही साम्य नाही. सोव्हिएत रशियाचे विभाजन झाले तेव्हा सारेगमपमधील लिटिल चॅम्प्सचा जन्मही झाला नसेल, असंभवची सुलेखा राऊत, आदिनाथ शास्त्री नुकतीच शाळेत जाऊ लागली असेल, गंगाधर टिपरे नुकतेच सेवानिवृत्त झाले असतील. डावे स्वयंभू, अतिरेकी हिंदुत्ववादी आणि शरद पवार यांच्यासारखे तथाकथित राष्ट्रवादी यांना हे समजणे कठिण आहे. परंतु त्यांनी कितीही आदळआपट केली, तरी गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनॉस्त आणि पेरेस्त्रॉयकाची उज्ज्वल क्रांती सुरू केली हे ऐतिहासिक सत्य नाकारणे त्यांना शक्य नाही. सोविएत रशियातील तेव्हाची परिस्थिती आणि आजची अनेक मराठी मालिकांतील परिस्थिती सारखीच आहे. साठच्या दशकात क्युबात चे गवेरा आणि फिडेल कास्त्रोचे पवाडे लोक गात असत. आज महाराष्ट्रीय जनता सारेगमचे पल्लवीत सूर आळवत आहे. सारेगमच्या लोकप्रियतेला आज कोणते परिमाण लावायचे असेल, तर ते सुलेखाच्या किंवा सोनियांच्या लोकप्रियतेचेच लावावे लागेल. भाजपचे मुखंड आणि स्वयंभू डावे यांची अभद्र युती आज हे मान्य करणार नाही. परंतु त्यांनी तसे केल्यास भविष्यात आम्ही जो इतिहासग्रंथ लिहिणार आहोत, तो त्यांना कधीही माफ करणार नाही. असंभव आणि सारेगमपच्या लोकप्रियतेमुळे आज अनेक मराठी वाहिन्यांसमोर सबप्राईमटाइमचे संकट उभे ठाकलेले आहे. सर्व मराठी वाहिन्यांची परिस्थिती गोजिरवाण्या घरातल्या श्यामराव परांजपेंसारखी झालेली आहे. अशा आर्थिक व अन्य संकटांच्या मुकाबल्यासाठी बराक ओबामा यांनी जी योजना आखली आहे, तिला साथ देण्याऐवजी सरकार आदिनाथ शास्त्री यांच्या अटकेचे कारस्थान रचत आहे. वास्तविक हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. बिग बॉसच्या घरातील रहिवाशांचे पलायन आणि आदिनाथ शास्त्रीवर खुनाचे बालंट येणे, त्याच दरम्यान मायकल जॅक्सनने मुस्लिम धर्म स्वीकारणे या एकाच गुंतागुंतीच्या साखळीच्या सुट्या सुट्या कड्या आहेत. मात्र आदिनाथ शास्त्री यांच्या निरपराधित्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी नरेंद्र मोदींकडे जाण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना केव्हाच निर्दोष मानले आहे. मग स्वयंभू डावे आणि अतिरेकी हिंदुत्ववादी काहीही म्हणोत. अखेर सोनिया गांधी यांच्या त्यागाची सरगम आणि लिटल चॅम्प्सची सारेगम यांची मोहिनी येथील जनतेच्या मनावरून उतरणे असंभव आहे.
--------------------
अकस्मात धरणीकंप झाल्यासारखे वाटले! अचानक पर्जन्यवृष्टीही सुरू जाहली!
पाहतो, तो उशास आमुची एफेम हाती जलपात्र घेऊनी करदावत उभी!
"तरी तुम्हांस सांगते, सकाळच्या वेळी अग्रलेख वाचत जाऊ नका म्हणून... खुशाल घोरायला लागता..."
आम्ही मुकाट्याने वृत्तपत्राची घडी केली व तांब्या तोंडास लावला!
मनीं म्हटले, एकूणच कुणाच्याही मुखास कोरड पडावी ऐसी परिस्थिती निर्माण जाहली आहे! वृत्तपत्रांत किरकोळांची क्रांती सुरु झालेली आहे!!
वाचकहो, बाबांनो,
सावध ऐका रे पुढल्या हाका...
(Posted by बापू आत्रंगे, दि. २३ नोव्हेंबर २००८)
आम्हांस अजिबात कळत नाही, की लोक सकाळसक्काळी उठून हसायसाठी बागेतबिगेत का जातात?
म्हणजे बागेत जावे. जरुर जावे. (घरात श्वान असेल, तर जाणे आवश्यकच बनते!) पण तेथे जाऊन कारणाविना खोखोखिखिखुखु करू नये!
आमुच्या लहान्पणी आम्ही असे विनाकारण दात काढले, की आमचा बापूस म्हणायचा, क्कॅय, ठाण्यास जाणे आहे कॅय?
आता हे हास्यक्लब पाहिले, की वाटते हल्ली ठाण्यास जाण्याकरीता आवश्यक असलेली लक्षणे बदलली असावीत!
असो.
तर येवढ्या प्रस्तावनेनंतर मूळ मुद्दयाकडे येण्यास हरकत नसावी.
मुद्दा असा, की आम्ही लाफ्टरक्लबात जाण्याऐवजी सकाळसक्काळी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करतो!
त्यामुळे आम्हांस हासण्यासाठी स्वतंत्र धडपड करावीच लागत नाही!
आता तुम्ही म्हणाल, की हे कसे काय बोवा?
तर काही जुनी उदाहरणे देऊन हा मुद्दा विषद करतो.
खूप वर्षांपूर्वी सकाळच्या नगर आवृत्तीत आम्ही एक वृत्त वाचले होते.
ऊस उत्पादक शेतक-यांना घालण्यात आलेली झोनबंदी सरकारने उठविली होती, अशी ती बातमी होती. आणि तिचा मथळा होता -
राहुरीच्या शेतक-यांना ऊस कोठेही घालण्यास परवानगी!
मथळा वाचला आणि संपादकांच्या खुर्चीत प. पू. दादासाहेब कोंडके बसल्याचा भास झाला!!
अशीच एक मजेशीर बातमी वाचल्याचे अजूनही स्मरते. बातमीतला अन्य मजकूरही पुसट झालाय. पण त्यातील चंमतग मात्र अद्याप लक्षात आहे.
बातमी अशी होती, की दक्षिणेतल्या कुठल्याशा शहरातील, बहुधा चैन्ने किंबा बेंगळुरू असावे, दूरध्वनी यंत्रणा बंद पडली होती. ते कशाने, तर म्हणे त्या दूरध्वनी केंद्रातील कुठल्याशा यंत्रणेत ढेकूण शिरले होते! ढेकणांमुळे दूरध्वनी बंद पडले!
वृत्तपत्र प्रतिष्ठित होते. पण मग त्याने अशी संध्यानंदी बातमी का बरे दिली असावी?
आम्ही जरा चौकशी केली, तेव्हा समजले, एजन्सीवरून आलेल्या इंग्रजी बातमीत, यंत्रणेतील 'बग्ज'मुळे दूरध्वनी बंद पडले, असे म्हटलेले होते. बातमीचे भाषांतर करणा-या उपसंपादकास 'बग' म्हणजे काय ते ठाऊक नव्हते. त्याने शब्दकोश पाहिला. त्यात बगचा एक अर्थ ढेकूण असा होता. हा अर्थ त्या उपसंपादकास अधिक जवळचा वाटला असावा!!
असेच एकदा मुंबै लोकमतची मुख्य बातमी वाचत असताना आमुच्या दृष्टीस एक वाक्य पडले. काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी पकडलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या शस्त्रसाठ्याबरोबरच काही मासिकेही सापडली! म्हटले, व्वा! अशी वाचनाची आवड असावी!! पण ते दहशतवादी कोणती मासिके वाचत होते? निश्चितच सा. सकाळ, लोकप्रभा असे काही नसणार! अधिक माहितीसाठी आम्ही त्या उपसंपादकासच विचारले, की बंधू रे, त्या मूळ इंग्रजी बातमीत मासिकांची नावे वगैरे दिली होती काय? तर तो म्हणाला, छे हो. फार डिटेलमधी नव्हती ती बातमी! नुसत्याच एकेफॉर्टीसेव्हन रायफली सापडल्या आणि काही मॅगेझीन्स सापडली असे म्हटले होते!!
आमुच्या त्या मित्राने मॅगेझीन्सचे अचूक भाषांतर मासिके असे केले होते!!
अशा बातम्या, असे उपसंपादक!
आता हे लोकसत्तेतीलच उपसंपादक घ्या! रात्रपाळीत त्यांच्या प्रमुखाने त्यांना वृत्तसंस्थेची एक बातमी दिली. अर्जंट ट्रान्स्लेट करा, म्हणाले. ते उपसंपादक उत्साहाने कामाला लागले. बराच वेळ झाला, तरी त्यांची आपली भाषांतराची झटापट सुरुच होती. रात्रपाळी प्रमुखाने पाहिले, तर हे महामहीम बराच वेळ शब्दकोशात काहीतरी धुंडाळत आहेत. त्याने विचारले, की बाबा रे, कोणत्या शब्दाचा अर्थ हवाय आपणांस? उपसंपादक म्हणाला, हा काय हा शब्द. सापडतच नाहीये... कसली डिक्शनरी आहे ही! प्रमुखाने तो शब्द पाहिला आणि तडक वृत्तसंपादकांकडे गेला. त्यांना म्हणाला, कसली माणसं भरलीत तुम्ही? अहो, तो रेगन या शब्दाचा अर्थ शोधतोय डिक्शनरीत!! त्याला रोनाल्ड रेगन माहित नाहीये!!
आता हे उपसंपादक लोकसत्तेत नाहीत. लोकसत्ता सोडून त्यांना बरीच वर्षे झाली. आता ते मोठे जनसंपर्क अधिकारी आहेत!!
पण याहून धम्माल किस्सा आहे तो पुणे सकाळमधला.
मॅडोनाच्या पुतळ्यामधून अश्रू येत असल्याची ती यूएनआयची बातमी होती. (तारीख २२ जून १९९५)
'सिव्हितावेचिआ, ता. २१ (यूएनआय) - (हे गाव कोथरूडच्या कुठेशी आलं हो उपसंपादक?) पॉप गायिका मॅडोना सध्या वादाच्या भोव-यात नाही. (म्हणजे काय तिने रोज भोव-यात गटांगळ्या खाव्यात काय?) त्यामुळे तिला फारशी प्रसिद्धीही मिळत नाही. (हे कशावरनं ताडलं हो तुम्ही, उपसंपादक? पुणे सकाळमध्ये बाईंचं नाव छापून आलं नव्हतं का येवढ्यात?) मात्र तिच्या पुतळ्याला इटलीमध्ये सध्या बरीच प्रसिद्धी मिळत आहे. या पुतळ्यातील मॅडोना रडते, एवढेच नव्हे, तर ती मानही वळवते, असे वृत्त येथील 'इल मेसागेरो' या रोमन दैनिकाने दिले आहे.'
बातमी वाचली आणि मनाशी म्हटले, प्रभो त्या उपसंपादकाला माफ कर. तो काय भाषांतर करतो हे त्याचे त्यालाही माहित नाही!
खरे तर त्या उपसंपादकाचीही काही चूक नव्हती. तो बिचारा पडला सदाशिवपेठेतला. त्याने कुठेतरी चोरून पॉपस्टार मॅडोनाची चित्रे पाहिलेली. ख्रिस्ताच्या मातेला मॅडोना म्हणतात हे बाटगं ज्ञान त्याला कोठून असणार?
पण या बातमीने खरी करमणूक झाली ती पुणे सकाळच्या संपादकीय पानावर हे हातभर लांब स्फुट छापून आले ते वाचून! ती तारीख होती १० जुलै १९९५.
त्यात मात्र मॅडोना म्हणजे येशूची आई असे आले होते!
यावरही कडी म्हणजे मॅडोनाच्या या पुतळ्यातून अश्रूबिश्रू येत आहेत हे त्याआधी तब्बल तीन महिने आपला वार्ताहरने छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते!
म्हणजे बघा, किती कर्मणूक!!
असे पेपर, असे किस्से!!
आता असे इन्फोटेन्मेंट असल्यावर कोण जाईल मरायला (वा हसायला) बागेत?
आम्ही आपले घरीच पेपर वाचत बसतो!
तुम्हीही वाचतच असाल ना पेपर?
मग कळवा की तुमच्याकडील अशा छान छान गोष्टी.
पत्ता ठावकी आहे ना?
blogeditor.acidic@gmail.com
(मॅडोनाच्या बातमीची कात्रणे अरुंधती पुणेकर यांनी उपलब्ध करून दिली. त्यांचे आभार.)
(Posted by बापू आत्रंगे, दि. १९ नोव्हेंबर २००८)
भारतीय टपालखात्याच्या अजबगजब कारभारामुळे कुणा वाचकाने लोकसत्तेस पाठविलेले पत्र चुकून आमच्या पत्त्यावर आले. आता लोकसत्तेस रोज एवढी पोतेभर पत्रे येतात. (आणि यात अतिशयोक्ती नाही! अन्य पत्रांनी वाईट वाटून घेऊ नये.) त्यात या पत्राची दखल घेतली जाईलच असे नाही, असे वाटल्याने आम्हीच ते येथे प्रसिद्ध करीत आहोत. कारण की पत्र मोठेच उद््बोधक आहे!!
अलीकडेच रा. रा. बापू आत्रंगे यांनी लोकसत्तेच्या मुखपृष्ठाच्या किरकोळीकरणाबद्दल लिहिले होते. त्या वाक्याच्या स्मृतींना हे वाचकपत्र धादांत अर्पण...
------------------------------------------
प्रिय संपादक,
लोकसत्ता, मुंबई
विषय - लोकमानस या सदराकरीता लेख.
महोदय,
मी आपल्या पेपरचा खूप वर्षांपासूनचा वाचक आहे. आमच्या नगरसेविकेने आमच्या वॉर्डात एक पेपरचे वाचनालय सुरू केले आहे. ते आता बंद पडले. पण तेथील सगळे पेपर आता शाखेत पडतात. मी तेथे जाऊन तुमचा पेपर रोज वाचतो. मला तुमचे सगळे लेख खूप आवडतात. मी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंतचे सगळे अग्रलेख आवडीने वाचतो. बातम्यासुद्धा वाचतो.
तुमचा पेपर वाचून आम्हांस खूप नवीन नवीन माहिती मिळते. ती माहिती खूप उपयोगी असते. काही दिवसांपूर्वी तुम्ही सारेगमची हेडलाईन छापली होती.
ती आम्हांला खूप आवडली कारण की आम्हांला ती मालिका खूप आवडते. आमच्या घरातील सगळेच जण ती मालिका पाहतात. गायिका लता मंगेशकर यांनी मुलांना आर्शिवाद दिला ते आम्हांला खूप आवडले. कारण की लता मंगेशकर यांच्या कॅसेटी आम्ही आवडीने ऐकतो व त्यांची गाणीसुद्धा ऐकतो. आम्हांला लता मंगेशकरांचे बाबा आणि बाळ हे सुद्धा आवडतात. त्या लहान लहान गायकांना भेटल्या ही बातमी खूप महत्वाची आहे, असे आमच्या खात्यात सगळेच म्हणाले. मी गोदरेज कंपनीत शिक्युरिटीत आहे. माझ्या कुटुंबाने सारेगमला आरया आंबेकरला चार एसेमेस पाठविले आहेत. तसेच आजची बिग बॉसची बातमीपण आम्हांला खूप आवडली. आम्ही ती मालिकापण पाहतो. पण त्याच्यापेक्षा आम्हाला चार दिवस सासूचे ही मालिका खूप आवडते. तिची हेडलाईन तुम्ही कधी छापणार याची वाट आम्ही पाहतो आहोत.
बिग बॉसच्या घरातील भाडेकरू पळून गेले हा सिक्युरिटीला मोठा धक्का आहे. सिक्युरिटी टाईट पायजे होती. आमच्या कंपनीत सिक्युरिटी एकदम कडक आहे. (कृपया हे वाक्य काटू नका. महत्वाचे आहे.)संपूर्ण देशातील सिक्युरिटीचे कसे बारा वाजले आहेत, हे तुमच्या बातमीमुळे सगळ्यांना कळले. देशाला दहशतवादाचा धोका आहे, हे पण बिग बॉसच्या बातमीमुळे कळले. याच्यावर तुम्ही एक सणसणीत अग्रलेख लिहा. काहीकाही मालिका लई लांबवित्यात. त्याच्यावरपण बातमी करायला जमली तर पाहा, कारण की त्याच्यामुळे मालिकांतला इंटरेस संपून जातो. हे समाजासाठी चांगले नाही.
चार दिवस सासूचेमधील मुख्यमंत्री कसे पण वागतात. एकदा त्यांचीपण बातमी छापा. तसेच असंभव सुलेखाला अटक झाल्यावर तिची नार्को चाचणी करण्याची गरज आहे, अशीपण बातमी छापा. ते फार महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक खुन उघडकीस येतील.
मला तुमचे अग्रलेख खूप आवडतात. म्हणून कृपया माझे हे पत्र पहिल्या पानावर ठळक बातमी म्हणून छापणे, ही विनंती.
चुकलं माकलं माफ करा. थोडं लिहिलं जास्त समजा.
कळावे,
तुमचा नम्र वाचक.
(Posted by चांगदेव पाटील, दि. १८ नोव्हेंबर २००८)
"शरद पवार हे काही फार मोठे नेते आहेत, असे मी मानत नाही. पण तरीही त्यांचा तो कोट महत्त्वाचा आहे!"
आमुचा दिल्लीकर परमपत्रकारमित्र नेहमीच असे बॉम्ब फोडत असतो. (काय करणार? असते एखाद्याच्या जीभेवर अमोनियम नायट्रेट!) परंतु हा बॉम्ब म्हणजे जरा अतिच डेसिबलचा होता! म.म. शरद पवार हे फार मोठे नेते नाहीत, असे रा. रा. कुमार केतकर यांनी म्हणणे वेगळे आणि आमुच्या या परमस्नेह्याने म्हणणे वेगळे! तेव्हा आम्ही त्याला भिडलोच. म्हणालो, "इलेक्शन अजून लांबच आहे, तोच त्वां चांडाळाने सुपारी घेतली की काय?"
आरोप गंभीर होता. पण आमुचा परमस्नेही गडबडला नाही. (आरोप कोणताही असो. आपण एनीटाईम अपिलात जाऊ शकतो, हे त्याला बीसीसीआयच्या अनुभवातून पक्के माहित असणार!) आमुच्यासमोर सकाळचा एक जुना अंक टाकत तो सौम्यस्मीत करीत म्हणाला, "पवार हे जर एवढे मोठे नेते असते, तर त्यांच्यावरील फौजदारी गुन्ह्याची बातमी सकाळने अशी दुकॉलमात लावली असती काय?"
त्यावर आम्ही गप्प बसलो!
तो खीखीखीखी करून हसला!
आम्ही म्हणालो, "पण असे म्हणतात, की सकाळचा आणि शरद पवारांचा काही म्हणता काही संबंध नाही!"
त्यावर तो खीखीखीखीखुखुखुखु करून हसला!
मग आम्ही तो विषय सोडून दिला!!
मग म्हणालो, "आपण त्यांच्या कोटसंबंधाने काहीतरी म्हणत होतात."
तो म्हणाला, "होय. त्यांचा तो कोट महत्त्वाचा आहे असे मी म्हणालो."
"पण आम्हांस वाटते, की त्यांच्या कोटपेक्षा राणेंचे कोट अधिक चांगले असतात!" आमुच्या मुखातून जणू रा. रा. सुरेंद्र हसमनीस (द्वारा - प्रहार) हेच बोलत होते!
"मी त्यांच्या अंगातील कोटविषयी नव्हे, तर त्यांच्या उद््गारांविषयी बोलतोय!" परमस्नेही म्हणाला.
"अस्सं अस्सं!" अनेकदा बातमीदार सांगतो त्या विषयातील अणूमात्र ज्ञान नसताना, जणू बीकॉमला तोच विषय घेऊन आपण नापास झालो होतो, असे दाखविण्याची संपादकीय हुंहुं-कला आम्हास आता छानच ज्ञात झालेली आहे!!
"परप्रांतीयांच्या रक्षणासाठी आम्ही छातीचा कोट करू असे शरद पवार म्हणाले होते..."
"बरोबर आहे... त्यांच्या छातीच्या कोटाचा कोट राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे!" आम्ही आमचे राजकीय ज्ञान व कोटीबाजपणा पाजळला. (पण तो खीखीखीखी करून हसला नाही! आयबेन-मीखिलवरील रा. रा. सुभाषचंद्र शिर्के, रा. रा. युवराज मोहिते यांची राजकीय विश्लेषणेही तो अशाच गांभीर्याने ऐकून घेतो! असो!!)
"पण या कोटमागचं खरं कारण तुला माहित आहे का?" चष्म्याच्या काचा पुसत त्याने पुसले.
"आता राजकारणाशिवाय दुसरं काय कारण असणार?" उत्तर माहित नसले, की प्रतिप्रश्न करणे हा लाज वाचविण्याचा उत्तम मार्ग असतो.
"तसं नाहीये ते... पवारांच्या या राजकारणामागं आहे ते पत्रकारण!!" मित्राने पुन्हा बॉम्ब फोडला.
"म्हणजे?"
"सांगतो... शरदराव हा जो छातीचा कोट बांधायला निघालेत तो आहे दिल्लीतल्या मराठी पत्रकारांसाठी!"
आम्ही अगदी फ्लॅट! पार भुईसपाट!! आमचा हा मित्र हे असले आरडीएक्स आणतो तरी कुठून?
"अरे, कसं शक्य आहे?"
"सांगतो... काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे..." आमुचा परमपत्रकारस्नेही आम्हांस कथा सांगू लागला....
--------------------------------------------------
कट टू फ्लॅशबॅक.
रविवार. दिल्लीतील समस्त बाबूंच्या सुटीचा दुसरा दिवस! (येथे रविवारची सुटी शनिवारीच सुरू होते.) हा दिवस बाबूलोक आपापल्या वर्गवारीनुसार साजरा करतात. कुणी घरातच बसून टीव्हीसमोर पराठे खातात, तर कुणी गुरगाव, नॉयडात जाऊन संडे सेलिब्रेट करतात. पण या रविवारी बरीचशी दिल्ली नव्या दिल्लीत होती. खरे तर रस्त्यावर होती. धावत होती. दिल्लीत मॅरेथॉन स्पर्धा सुरु होती. (दिल्लीतील पत्रांसाठी संडे हो गया रन डे! अशा हेडिंगांची सोय झाली होती!)
त्याच दुपारी दुसरीकडे, नेमके सांगायचे, तर लोधी इस्टेटमध्ये एक गोपनीय म्यारेथॉन सुरु होती! खरे तर ती म्यारेथॉन नव्हती. ती होती खाणेथॉन... जेवणावळ हो! मराठी पत्रकारांसाठीचे गावजेवण! यालाच अ. भा. मराठी महामंडळाच्या ठरावानुसार संमेलन असेही म्हणतात!
लोधी इस्टेटच्या बंगला नंबर एकच्या अंगणात ही अंगतपंगत आयोजित करण्यात आली होती.
किम् कारणेन करण्यात आला होता हा उद्योग?
काय होता त्याचा उद्देश?
त्याचे असे होते, की दिल्लीतील मराठी पत्रकारे म्हणजे मराठी वार्ताहरांतील वर्णव्यवस्थेतील सर्वोच्चवर्ण! (दिल्लीखालोखाल मुंबई! की मग बाकीचे अवघे शूद्र!! ... म्हणजे असा या उच्चवर्णीयांचा समज. वास्तविक अवघी पत्रकारिताच वैश्यवर्णीय झालेली असताना उगा कोणी नाकाने कांदे सोलू नयेत! किंतु कोण कोणास हे सांगणार? असो.) तर दिल्लीतील मराठी पत्रकार म्हणजे स्वयंघोषित स्वतंत्र संस्थाने! कधीकधी बातम्यांचे आदानप्रदानार्थ कोणी एकत्र येईल तेवढे आणि तेवढ्यापुरतेच! एवढी दिवाळी झाली, तरी याच्या चकल्या त्याच्या मुखी लागल्या नाहीत, की त्याचे कळीचे लाडू याने कुरतडले नाहीत. रा. रा. राज ठाकरे प्रकरण घडले तेव्हा वाटले होते, की मंडळी आता तरी एकत्र येतील. पण नाही!
त्याकरीता महाराष्ट्र सदनावर हल्लाच व्हावा लागला!
ज्या दिल्लीचे तख्त मराठ्यांनी फोडले, त्याच दिल्लीत मराठ्यांचे तख्त जे की महाराष्ट्र सदन ते फोडण्यात आले आणि दिल्लीतील म-हाटी पत्रकारांचे रक्त तापले! (तापलेच्या ऐवजी गोठले असाही एक पाठभेद आहे म्हणतात! तोच अधिक योग्य असावा असे जाणकारांचे मत आहे!) काही सळसळत्या रक्ताचे तरूण व स्वतःस तरूण समजणारे व कॉंग्रेसचे बिट पाहणारे असे काही पत्रकार अस्वस्थ झाले. महाराष्ट्र सदन, अ.भा. कॉंग्रेसची वार्तापरिषद असे जेथे भेटतील तेथे या म-हाटी पत्रकारांच्या गोपनीय व स्टँडिंग मिटिंगा होऊ लागल्या. मराठा तितुका मेळवावा, असे रामदासी संदेश घुमू लागले. आणि मग योजना ठरली, डाव आखण्यात आला, संकेत ठरले. तमाम दिल्ली ज्या दिवशी धावत असेल, त्या दिवशी तमाम म-हाटी पत्रकारांनी एकत्र यायचे! भेटून करायचे काय, यावर बराच खल झाला. कोणी म्हणाले, की आपण रायरेश्वराची पिंड आणून मराठा एकीकरणाची शपथ घेऊ या!! अखेर असा मार्ग निघाला, की भेटून काय करावयाचे यावर भेटल्यानंतरच विचार करावा!!
झाले! सगळे ठरले! पण भेटायचे कोठे?
महाराष्ट्रातील खासदार, मंत्री यांचेकडे नको. कारण की त्यांचेकडे गेल्यास, कोणी मानो न मानो, पण आपण म-हाटी असल्याचा अभिमान एकदमच मान टाकतो, असा अनुभव. एकूण काय स्थळाचे काही ठरेना!! (पत्रकारांना स्थळांचा मोठाच प्रॉब्लेम बुवा!!)
परंतु ऐनवेळी महाराष्ट्राच्या मदतीला गोवा धावून आला.
गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या बंगल्यात (खरे तर अंगणात!) सर्वांनी एकत्र यायचे असे ठरले.
आता अशा शुभकार्यात कोणी तरी एक नारायण हवाच!
प्रशांतकुमार रामदासी यांनी लोकमताचा अंदाज घेतला.
आणखी कोणी 'पुढार'पणा केला आणि सूत्रे हलू लागली.
मोबाईलवरून एसेमेसरूपी खलिते रवाना झाले. कोणी कोणास आवतण द्यावयाचे हे व्यक्तिगणिक ठरले होते. त्यानुसार सर्व निमंत्रणे गेली, की आमचे येथे श्री (व श्रीपाद) कृपेकरून म-हाटी पत्रकारांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले असून, आपण एकेकट्याने (गोळ्यामेळ्याने येणे पत्रकारांस शोभत नाही आणि दुसरी बाब म्हणजे कोणाच्या डोळ्यावर यावयास नको!) बंगला नं. १, लोधी इस्टेट येथे इंडियन स्टँ. टा.नुसार दुपारी सहभोजनाकरीता यावे!
स्नेहसंमेलनाकरीता टळटळीत दुपारची वेळ म्हणजे मुंबैतील पत्रकारांना रात्री नऊ वाजता ग्लासभर दूध घेतल्यासारखे वाटले असणार! परंतु वो दिल्ली है दोस्तों! रात्री आठनंतर सहकुटुंब पार्टीकरीता जाणे हे तेथे निषिद्ध आहे!
तर योजनेनुसार तो दिवस उजाडला. ती दुपार उजाडली. आणि नाईकांच्या बंगल्याच्या हिर्व्यागार अंगणात हळूहळू चोरपावलाने पत्रकारे जमू लागली. मग हळूहळू दोन-तीन, दोन-तीन जणांचे गट एकेक कोपरा धरून गप्पा मारू लागले. त्यातून या गटाचा त्या गटाशी मुळीच संबंध नाही, असे अत्यंत स्नेहमयी वातावरण सर्वत्र पसरले. कोणी अंगणात डोकावलेच, तर त्यास तेथे मराठी पत्रकारे जमली आहेत, याची शंकाही येऊ नये या योजनेचा तो भाग असावा!
प्रांगणाच्या एका कोप-यातून दालमखनी, चपात्या, गुलाबजामून असा सुग्रासी सुवास तरळत होता. आल्यानंतर साडेसहा ते सात मिनिटे वाट पाहून सगळे स्नेहभोजनाकडे वळले. एकेक जण स्नेहाने येत होता. स्नेहाने जेवत होता. स्नेहाने निघून जात होता. तेवढ्यात अनंतराव बागाईतकर आले, तेव्हा म्हटले, की त्यांचे प्रमोशनबद्दल अभिनंदन करावे. वास्तविक त्यास खूपच उशीर झालेला आहे, परंतु बेटर लेट दैन नेव्हर, असा सुविचार करून आम्ही त्यांच्याकडे वळलो, तो ते हळूच येऊन, हसून, जेवून, अच्छा म्हणून कधीचेच निघून गेले होते! म्हटले, निदान ते आले तरी होते. आमुचे महामहीम सूर्यभट्टजी, महामहीम चावकेजी आलेच नाहीत, त्याचे काय!!
(दिल्लीकर मराठी भाषिक पत्रकारे त्यांच्याकडे अद्याप परप्रांतीय असल्यासारखे का पाहतात, या प्रश्नाच्या उत्तरातच, ते का बरे आले नसतील, या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे, असे नंतर आम्हांस सांगण्यात आले. असो!)
तर अशाप्रकारे दिल्लीकर मराठी पत्रकारांच्या हितसंवर्धनाच्या व्यापक दृष्टीने आयोजित केलेले स्नेहसंमेलन त्या टळटळीत दुपारी एका तासात आटोपले! या संमेलनाचे फलीत म्हणजे परतताना सर्वांच्या जीव्हेवर रेंगाळत असलेली गुलाबजामुनची मिठीमिठी टेस्ट!! ती चव उतरली तेव्हा बहुतेकांच्या ध्यानी आले, की आपण तो फक्त भोजनभाऊच ठरलो. आपल्या मराठी अस्मितेच्या रक्षणाचं सगळं राहूनच गेलं!!
तर येणेप्रकारे स्नेहसंमेलनाचे सूप वाजले!
होता होता, त्याची खबर म.म. शरद पवार यांच्या कानी गेलीच!
त्यावर साहेबांनी विचार केला.
की महाराष्ट्र सदन झाले. ते निभाऊन नेले.
पण एखादे मराठी पत्रकार फुटले, तर निभावणे कठीण होईल.
आणि मग त्यांनी लगेचच आपुल्या राष्ट्रवादी सैनिकांना ऑर्डर दिली.
स्कॉड, बाहे मुडेंगा दाहिने मुडके पिछे मूड!!
ती कोणालाच समजली नाही.
जाणत्या राजांनी परिस्थिती जाणली आणि मग प्रत्यक्ष आपणच छातीच्या कोटाचे बांधकाम सुरू केले!
परप्रांतीयांना आम्ही मुंबईत संरक्षण देऊ असे सांगून त्यांनी दिल्लीकरांवर मराठी पत्रकारांच्या रक्षणाची जबाबदारी लादली!
याला म्हणतात, पवारनीती!
आता कोण म्हणेल, की साहेब मराठी पत्रकारांकडे तुच्छतेने पाहतात!!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १७ नोव्हेंबर २००८)
आम्हांस तीव्र धक्का बसलेला आहे!
तीव्र म्हणजे किती तीव्र? तुमचा आपला एक अंदाज?
तुम्हांस सांगतो,
समजा अगदी अचानक व अकस्मात रा. रा. प्रसाद कामकर (पक्षी - मुंबैवृत्तांतचे हर्क्युलस) यांच्या ध्यानी आले, की बातम्या, बातमीदार व जाहिराती यांची एकसमयावच्छेदेकरोनि टंचाईस्थिती निर्माण झाली आहे, अशावेळी त्यांच्या कामसू मनास केवढा मोठा धक्का बसेल?
समजा राजेश्री प्राजक्ताताई कदमबाई (आता या कोण म्हणोनि विचारू नका. यांस हल्ली एटीएसही वचकून असते.... असे त्यांचे स्वतःचे मत आहे! खरे खोटे त्याच जाणे! आपण काही याबाबतीत त्यांची नार्को टेस्ट घेतलेली नाही!), तर समजा राजेश्री प्राजक्ताताई कदमबाई यांनी आपली बातमी शीर्षक, इट्रो अशी सांग्रसंगीत लिहून उपसंपादकास सादर अर्पण केली, तर त्या बिच्चा-या उपसंपादकाच्या काळजास केवढा मोठा धक्का बसेल?
समजा रा. रा. कैलास'मास्तर' कोरडे (परिवहन खाते सांभाळणारे बातमीदार आणि कंडक्टर यांस आमच्यात मास्तरच म्हणतात!) यांनी रा. रा. फडकेकृत शुद्धलेखनाची यथेच्छ निर्माळ धुलाई करून आपली कॉपी (कॉपी म्हणजे बातमी. ही अनेकदा अन्य वृत्तपत्राच्या अन्य वार्ताहराकडून घेतलेली असते, म्हणून तीस कॉपी म्हणतात ऐसे नाही!) परमशुद्ध लिहिली, तर रा. रा. अनिलरावजी कुलकर्णी (मुख्यउपसंपादक, लोकसत्ता) यांच्या ज्येष्ठ मनास केवढा धक्का बसेल?
किंवा
समजा रा. रा. अतुलशेठ माने (वरिष्ठ उपसंपादक, लोकसत्ताच) असे उद््गारले, की आज किनई आपणांस ओपेडपृष्ठाचा गहन कंटाळा आला असून, आपण किनई आज पीटीआयच्या १० (अक्षरी दहा फक्त) बातम्यांचे भाषांतरच करणार, तर ते ऐकोनि रा. रा. दत्ता पंचवाघ यांच्या मनास केवढा रोलरकोस्टरी धक्का बसेल?
तर हे सगळे धक्के घ्या. त्यास लोकसत्तेतील काम करणा-या रिपोर्टरांच्या संख्येने गुणा, उपसंपादकांच्या संख्येने भागा.
याचे जे उत्तर येईल तेवढ्या रिश्टर स्केलचा धक्का आम्हांस बसला आहे, हे समजून जा.
आता तुम्ही पुसाल, की बापू एवढा धक्का बसण्याचे कारण तरी काय?
म्हणजे मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना? 'लोकमट्टा'चा (पक्षी - राप्र महामंडळाचा प्रहार! जो बातम्यांच्या अंगाने लोकसत्तासारखा आणि फीचरच्या अंगाने मटासारखा निघतो!!) खप तर वाढला नाही ना? साम या आयुर्वेदिकवाहिनीचा टीआरपी तर वाढला नाही ना? मग आम्हांस एवढा धक्का बसण्याचे कारण तरी काय?
तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
या धक्क्यास कारण होते, एक स्वप्न! (अगदी 'कालरातीलासपानपडलेसपनातआलातुम्हीन्बाईमीगडबडले' टाईपचे स्वप्न!!) त्यात आम्हांस आम्हीच दिसत होतो! (धक्क्याचे कारण हे नव्हे! नाही म्हटले तरी आम्ही अजूनही हिरोसारखे दिसतो! परवाच आमची कन्या आमच्या सौ.ला म्हणत होती, की मम्मी आपले पप्पा देशद्रोहीतल्या हिरोसारखे दिसतात नाही!) धक्कादायक होते, ते आम्ही चक्क पॉईंटातल्या लोकसत्ता कचेरीत होतो! लोकसत्ताचा सर्व्हर परंपरेनुसार बंद पडला होता. (संपादकीय विभाग व माहितीतंत्रज्ञान विभाग यांतील परस्परसंबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने व्यवस्थापनाने केलेली ही संगणकीय तरतूद असल्याची बोलवा आहे!) या योजनेनुसारच सर्व्हर बंद असल्याने अन्य काहीच काम उरले नव्हते, परिणामी समस्त रिकामी उपसंपादके आपला पिढीजात कर्मयोग, जो की भिंतीस तुंबड्या लावणे, तो करीत होती. आणि काय सांगू महाराजा... विषय आमचाच होता!!
"आयलाफुल्याफुल्या, हा बापू आहे तरी कोण?"
"अरे सकाळमधला आहे रे कुणीतरी...."
"हो बरोब्बर काल केसकर असं लिहिलं होतं... आपल्यातला असता तर केरकर असं लिहिलं असतं!"
"सकाळसोडून बाकीच्या विषयी लिहिताना वरवरचं असतं बघ नेहमी.... अंधारात मारलेले बाण असतात नुसते.... बरोब्बर लागतात इतकंच!"
"मला वाटतं टोक्या, नाय तर आपल्यातलाच कोणतरी असावा!"
"नाय रे... शुअर सक्काळमधलाच हा!!"
आमुच्याविषयीचा हा पायाभूत आयडेंटीक्रायसिस ऐकून आमुची अवघी कर्णरंध्रे निवतच होती, तो तिकडे वृत्तांती रा. रा. प्रशांतबुवा केणी यांचा मैदानीदंगा सुरु झाला होती. यावेळी विषय सर्व्हरबंदीचा होता. बुवांच्या सुरेल यमकी गीतास अवघेच दाद देत होते... उलटलेल्या साक्षीदारावर सरकारी वकिल भडकावा, तसे रा. रा. अजितराव गोगटे संतापले होते. "माझा संगणक चालू नाही, माझं अकाऊंट चालू नाही. मी बातमी देणार नाही," अशा टिळकीबाण्याने ते पंचवाघांच्या गुहेकडे (पक्षी - केबिन) किंचित पाहात डरकाळी फोडत होते. रा. रा. संदीप प्रधानजी वातावरणाचा ताप अधिकच वाढवत होते...
अचानक त्या गोंधळातून आमच्या कानी विठ्ठलविठ्ठलची भक्तीमय धून आली.... रा. रा. रवींद्र बिवलकर जागेवर नसतानाही त्यांची ही शंभरसीसी रिंगटोन ऐकू येणे यास चमत्कार म्हणावयाचे, की तिकडे साथी समरभाऊ खडस 'पप्पूकान्टडान्साला'वर समाजवादी हुर्रहुर्रदांडिया करीत होते हा चमत्कार म्हणावयाचा, हे काही आम्हांस कळेना! या अथांग गोंधळात रा. रा. रवींद्रराजे पांचाळजी आपुल्या दरबारी नवरत्नांस चुचकारिण्याचे रेफ्रीकार्य करोनी राहिले होते... (पूर्वी क्रीडाखात्यात असतानाची ही पंचगिरीची सवय!) परंतु आता तयांस कोण आणिक कोठूनी दाद देणार? (रा. रा. रवीजी, स्पोर्टसमध्ये आपण तेव्हा काय क्रीडा करायचो नाही!!)
एकीकडे ही अशी विधानसभा सुरू असताना, रा. रा. संदीपभाई आचार्य आपुल्या मेजावर बातम्यांशी मुष्टियुद्ध करीत बसले होते! (भाई पूर्वीचे पट्टीचे बॉक्सर! तसे ते फारफार वर्षांपूर्वी ट्युबलायटी खाण्याचे अचाट प्रयोगही करीत असत! ट्युबलायटीच्या खुराकावर मुष्टियुद्धातील सुवर्णपदके जिंकणारा योद्धा आमच्या पाहण्यात तरी अन्य कोणी नाही!) भाई अगदी घरचे काम करीत असल्याप्रमाणे कागदावर वृत्तलेखन करीत होते. (सर्व्हर ठीक होईल तेव्हा होईल, वेळ नको दडवायला, हा त्यामागील विचार.) त्यांस पुसले, तर ते म्हणाले, की राज की बात है! आम्ही ओळखले, की म्हणजे भाई राजच्या कालच्या बातमीचा फॉलोअप किंवा राजच्या परवाच्या राहिलेल्या बातमीतल्या डेव्हलपमेंट्स आणि राजची लोकसत्तेला आणि त्यांनाही मिळालेली खास मुलाखत कागदावर उतरवीत असणार. पुन्हा 'कुजबुज'मध्ये 'चला राज ठाकरे राज ठाकरे खेळुया'सारखा नवा पीस लिहिण्याचाही विचार त्यांच्या मनी असणारच. भाईंचे हे असे चाललेले, तर रा. रा. शेखर जोशी मोजणी कारकूनासारखे दिवाळी अंक मोजत बसलेले. साभार पोच देण्याचे महत्कार्य त्यांच्या खांद्यावर होते ना.
तिकडे उपसंपादकांच्या डेस्कावर पाहतो तो काय, तेथे 'शांतता, एरंडेलप्राशन सुरू आहे!' असा पांरपरिक चिडिचुप्प कार्येक्रम सुरू!! आपणांस काही ऐकूच येत नाही, असा मनोहरी पवित्रा घेऊन समस्त बसलेले. डेस्कावरील रा. रा. चर्चिल येण्यास अद्याप प्रचंड वेळ होता.
या गोंधळात अर्थतज्ञ रा. रा. प्रसादशेठ केरकर दूरध्वनीवरून कोणा पीआरला सांगत होते, की प्रसाद केरकर आत्ताच घरी गेलेत! सचिन रोहेकर पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेत! तुम्ही उद्या फोन करा! त्यांचा हा तटस्थपणा पाहोनी आम्ही तर भारावूनच गेलो. म्हटले प्रसादभाऊ असे काय कामात आहेत? तर काय आश्चेर्य! शेरेखानऐवजी ते बातमीदारवर होते! वाचता वाचता अचानक ते खवळले. "बघा, बघा... मी सांगत नव्हतो ती म्हस आहे म्हणून... पण तुम्ही लोकांनी ऐकलं नाही. आता नाव माझंच खराब झालं की नाही!" एका म्हशीमुळे प्रसादभाऊंच्या रागाचा सेन्सेक्स एवढा वर का गेला, असा विचार करीत होतो, तोच सर्व्हर चालू झाला... मशीन रिस्टार्ट करून लॉगीन व्हा, असा संदेश संगणक अभियंत्याने दिला आणि...
आणि आमचा स्वप्नभंग झाला!
-----------------------------------------------------
जागे झालो आणि वाटले, लोकसत्तेच्या मुखपृष्ठाचे अलीकडे अलीकडे जे काही किरकोळीकरण झाले आहे, त्यास या एका बालदिनी आपण अनुभवलेली ही समग्र परिस्थिती तर कारणीभूत नाही ना?
(Posted by बापू आत्रंगे, दि. १४ नोव्हेंबर २००८)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
तुम्हीच फाडा तुमचा पेपर
अशी हाक आम्ही दिली होती.
त्यास प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली आहे.
आपले मित्र व 'सहयोगी बातमीदार'रा. रा. नंदू यांनी त्यांचा एक मीडियाविषयक लेख आपल्याकडे पाठविला आहे.
लेखाचे नाव आहे - हिंदी वाहिन्यांची नौटंकी.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
बातमीदारचे नेहमीचे लेखक रा. रा. बापू आत्रंगे, चांगदेव पाटील आणि तुम्ही इतक्या प्रेमाने व मायेने ज्यांचे स्वागत केले त्या आमुच्या अरुंधतीवहिनी पुणेकर यांचे लेखन 'बातमीदार' ब्लॉगवर असेल. आणि सहयोगी बातमीदारांचे लेखन 'सहयोगी बातमीदार' या सहयोगी ब्लॉगवर असेल.
आम्हांस खात्री आहे, की तुमचे संपादक एकवेळ बातमीदार वाचणार नाहीत, पण तुमच्या या नव्या ब्लॉगचे नक्कीच पारायण करतील.
- ब्लॉगएडिटर
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो,
जर तुम्ही वृत्तपत्र अथवा च्यानेल अथवा तत्सम क्षेत्रात काम करीत असाल (किंवा नसाल, म्हणजे केवळ पाट्याच टाकीत असाल), तर हे आवाहन तुमच्यासाठी आहे.
आता आम्हांस हे तर ठाऊकच आहे, की आपुल्या मीडियानामक प्रकरणात पडद्याआड खूपच काहीबाही घडत असते. एखादे वृत्त वृत्तपत्रांत छापोनि आल्यानंतर व च्यानेलांत प्रक्षेपून झाल्यानंतर आपुल्या लकाक्कन लक्षात येते की च्यामारी इसमे तो बहुत लोच्या हुएला है. मग आपण प्रेसक्लब वा तदर्थ तीर्थ-क्षेत्री जावूनि वगैरे त्यावर रीतसर चर्चासत्रे व परिसंवाद वगैरे घेतो व झालेल्या लोच्याचे पोस्टमार्टेम करतो. त्यास पेपरवाल्यांच्या भाषेत पेपर फाडणे वा खोडणे असे म्हणतात, ते आपण करतो.
तर समजा हेच आपण बातमीदारवर केले तर?
तेव्हा वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो, आम्ही तुम्हांस येते आवाहन करीत आहोत, की तुम्हीच फाडा तुमचा वा इतरांचा पेपर वा च्यानेल आणि कळवा आम्हांस.
आपण ते सर्व बातमीदारच्या माध्यमातून जगासमोर आणू.
(आता त्यातून काय होईल? तर एकतर टाईमपास होईलच आणि झालेच तर मीडियातील फाल्तूकगिरीला थोडातरी आळा बसेल! एवढे झाले तरी मोप झाले!!)
तर मित्रहो, होऊनच जाऊ द्या.
कॉमेन्टांऐवजी थेट पोस्टच लिहा.
आपले लेख, वृत्त, वृत्तांत, संबंधित छायाचित्रे वा नुसतीच माहिती
blogeditor.acidic@gmail.com
या पत्त्यावर धाडून द्या.
(मजकूर युनिकोडात लिहिलेला असेल, तर झॅकच!
मात्र तो उखाळ्यापाखाळ्यामुक्त असावा.
आम्ही तो पाखडून घेऊच....शिवाय तुम्ही म्हणाल, तर त्याचे संपादनही करू.
आणि आम्हांस गोपनियतेची अगदी रामारक्ताची शपथ आहेच, बरे का!!)
आपले,
बापू अत्रंगे, चांगदेव पाटील, अरुंधती पुणेकर
आणि
ब्लॉगएडिटर,
ए-सिडिक कम्युनिकेशन्स
(प्रिय वाचकमित्रहो, आजपासून बातमीदार परिवारात एक नवीन सदस्य दाखल होत आहे. अरुंधती पुणेकर असे त्यांचे नाव असून, गेली काही वर्षे त्या पत्रसृष्टीत कार्यरत आहेत. आपण त्यांचे स्वागतच कराल, अशी खात्री आहे. सादर आहे त्यांचा बातमीदारमधील पहिलावहिला लेख... अश्शी वाहिनी सुरेख बाई... - ब्लॉगएडिटर, बातमीदार)
-------------------------------------------------------------------------------------------------------
मित्रांनो,
आज अगदी वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचंय. बातमीदारच्या स्पिरिटपेक्षा हे वेगळं आहे.
यात वृत्तपत्रे वा वृत्तवाहिन्यांविषयीची बातमीदारवर नेहमी येणारी टीका टिपण्णी नाही.
मला येथे नाईन-एक्सएम या वाहिनीबद्दलची काही माहिती आपणाशी शेअर करावयाची आहे.
नाईन-एक्सएम ही केवळ हिंदी चित्रपटसंगीताला वाहिलेली वाहिनी आहे. एक वर्षापूर्वी ही वाहिनी आली, तेव्हा वाटले होते की एमटीव्ही किंवा व्हीटीव्ही यांसारखीच ही वाहिनी असेल. परंतु चित्रपट संगीतविषयक वाहिनी असूनही ती या वाहिन्यांपेक्षा खूपच वेगळी आहे हे काही दिवसांतच लक्षात आले. आणि या वेगळेपणामुळेच ही वाहिनी आज या दोन्ही वाहिन्यांच्या कित्येक मैल पुढे आहे. (जीआरपी पर्सेंटमध्ये नाईन एक्स एम एमटीव्हीपेक्षा ३०० टक्क्यांनी पुढे आहे. आणि गेल्या आठ आठवड्यापासून १५ ते २४ या वयोगटाच्या प्रेक्षकवर्गात ती सर्व वाहिन्यांत बाराव्या स्थानावर आहे.)या वाहिनीला हे यश कसे मिळाले, हे पाहिले की मग आपल्या तथाकथित मराठी जीईसी म्हणजेच मनोरंजन वाहिन्यांच्या दारिद्रयाची कारणे लक्षात येतात.
एकदा चित्रपट संगीतविषयक वाहिनी काढायचे ठरल्यानंतर पूर्णतः तशीच वाहिनी काढणे, हा नाईन एक्सएमच्या यशाचा फंडा आहे. एमटीव्ही वा व्हीटीव्ही याही संगीतविषयक वाहिन्या आहेत. पण त्या पूर्णतः संगीताला वाहिलेल्या नाहीत. त्यावर इतरही अनेक कार्यक्रम दाखविले जातात. नाईन एक्सएमने मात्र त्यात तडजोड केली नाही. संगीत म्हणजे संगीतच! दुसरी गोष्ट म्हणजे या वाहिनीने व्हीजे नावाच्या पाचकळ प्रकारावर पूर्णतः काट मारली. आपल्याकडे गाण्यांच्या कार्यक्रमात निवेदन अगदी अपरिहार्यच झालेले आहे. पण त्याची खरोखरच आवश्यकता असते काय? हे व्हीजे काही तरी ललित वगैरे शब्दबंबाळ निवेदन करत असतात किंवा तथाकथित इनोद वगैरे करीत असतात. परंतु तो शुद्ध अडसर असतो. प्रेक्षकांच्या सहनशीलतेची ती परीक्षा असते. नाईनएक्सएमचे हेड विकास वर्मा यांनी, हे असले काही आपल्याकडे असणार नाही, हे आधीच ठरवून टाकले होते. त्याऐवजी त्यांनी नव्या चित्रपटांतील (प्रामुख्याने २००२-२००३ नंतरच्या चित्रपटांतील) केवळ गाजलेली गाणी दाखविण्यास सुरूवात केली. तीही संपूर्ण. प्रोमोटाईप ६० सेकंदाची नव्हेत. हे तरूण प्रेक्षकांना भावले.
व्हीजेंच्या ऐवजी त्यांनी काही कार्टून कॅरॅक्टर्स आणली. 'बकवास बंद कर'मधील बडे आणि छोटे, भिगी बिल्ली, 'बिटल नट्स'मधील शेरोशायरी करणारे तरूण ही कॅरॅक्टर्स आजच्या तरूणांना आपली वाटणारी ठरली. फाल्तू टाईमपास हा या सर्व कार्यक्रमांचा लसावि होता. तो तरूणाईला भावला.
विकास वर्मा यांनी दुसरी गोष्ट केली म्हणजे, त्यांनी या वाहिनीच्या जाहिरातीसाठी कोठेही पोस्टर्स-बॅनर्स लावली नाहीत. यामागील त्यांची कारणमिमांसा अशी होती, की आजच्या तरूण पिढीला कोणी काही सांगितलेले आवडत नाही. कोणी पाहा सांगितले म्हणून ते वाहिनी पाहणार नाहीत. त्यांना चॅनल सर्फ करताना ही वाहिनी दिसणारच आहे. ती आवडली तर ते पाहतीलच, असे वर्मा यांना वाटत होते. त्यांचे ते वाटणे किती बरोबर होते, ते आपण पाहतोच आहोत.
मुद्दा असा, की चित्रपट संगीताला वाहिलेल्या अन्य वाहिन्या असताना, त्यात त्यांनी ही आणखी एक वाहिनी आणली. परंतु त्यात त्यांनी वेगळेपणा ठेवला. नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरूनच ती वाहिनी नेली नाही. परंपरांना तिलांजली दिली. आणि यश मिळविले.
मराठीतील मनोरंजन वाहिन्यांचे कर्तेधर्ते असे कधी करतील? एकाने गाण्यांचा कार्यक्रम आणला, की सह्याद्रीपासून सगळे तसे कार्यक्रम आणणार. एकाने नृत्याचा कार्यक्रम आणला, की सह्याद्रीपासून सगळे त्याचे अनुकरण करणार. हे कुठवर चालणार? मराठीत ओरिजनल असं काहीच का घडत नाही? असे तर नाही ना, की टीव्ही या माध्यमाचा आणि ओरिजिनॅलिटीचा काहीच संबंध नाही, असा आपल्या मराठी वाहिनीकारांचा समज आहे!
(Posted by अरुंधती पुणेकर, दि. १२ नोव्हें. २००८)
"मम्मी, माझं जॉग्रफीचं बुक पाहिलंस का गं?" रा. रा. रवि आमले (द्वारा कन्व्हर्जन्स, मुंबई सकाळ) यांची शाळकरी कन्या विचारीत होती.
"अगं ते काय, पप्पा वाचत बसलेत.... आता मेलं या वयात चौथीचा भूगोल वाचताहेत..." मम्मी म्हणाली.
"पप्पा, तुम्ही दुसरं बुक वाचा ना. मला जॉग्रफीचा होमवर्क करायचाय."
"हां बाळा, एवढा धडा पाठ झाला ना, की लगेच देतो." रा. रा. आमले म्हणाले आणि पुन्हा वाचन अपडेट करू लागले.
---------------------------------------------------------
"अहो, उठा, अभ्यास करायचाय ना?" रा. रा. जयवंत चव्हाण (मुंबई सकाळचे मुख्य उपसंपादक) यांची पत्नी त्यांना गदागदा हलवित म्हणाली.
"पाच मिन्टं... मग उठतो." रा. रा. चव्हाण अद्याप रात्रपाळीच्या झोपेचे 'ईएमआय'च भरत होते.
"पाच मिन्टं पाच मिन्टं करीत तास झाला.. आता उठा. अभ्यासाला लागा.... मग नापास झाला, की बसाल ओरडत...."
नापाशीचं नाव काढताच रा. रा. चव्हाण तटकन् उठून बसले आणि त्यांना उशाखालून पाचवीचं सामान्य विज्ञान काढलं.
------------------------------------------------------------
रा. रा. भूषण देशपांडे (मुंबई सकाळचे मुख्य वार्ताहर) यांच्याकडे आणखी वेगळीच परिस्थिती होती.
ते खुर्चीवर मांडी घालून मोठमोठ्याने घोकत बसले होते...
'महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे नाव छगन भुजबळ हे होय..... महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे नाव छगन भुजबळ हे होय.....'
आत वहिनी त्यांच्यासाठी बदामाची खीर करीत होत्या. बदामाने स्मरणशक्तीही वाढते आणि अशी खीर केल्याने दिवाळीत मिळालेला सुकामेवाही संपून जातो.
---------------------------------------------------------------
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
हे एपिसोड वाचून तुमचा गोंधळ झाला असेल ना?
आमचाही झाला! लोकसत्ताच्या रविवार वृत्तांतमध्ये (दि. ९ नोव्हें.) रा. रा. प्रसाद केरकरांच्या शेअरबाजारविषयक बातमीत छापलेला जाफराबादी म्हशीचा क्लोजअप पाहून जेवढा गोंधळ झाला नाही, तेवढा गोंधळ आमचा हे सर्व पाहून झाला!
बरे, उपरोक्त तीन पत्रकारांनीच अशी अभ्यासूवृत्ती धारण केली म्हणावे, तर तसेही नव्हे. मुंबई सकाळमधील सर्वच पत्रकारे शाळेतील इतिहास व भूगोल व नागरिकशास्त्र व सामान्य विज्ञानाची पुस्तके वाचताना प्रत्यही दिसत आहेत. ही साथ इतुकी जोरदार फैलावली आहे, की हल्ली सकाळची पत्रकारे दिसताच ठाणे व डोंबिवलीतील पालकवर्ग तर आपल्या मुलांची दप्तरे लपवून ठेवू लागली आहेत. पत्रकारपरिषदेत गिफ्ट मागितल्यासारखी पुस्तके मागून नेतात आणि परत आणून देत नाहीत!
तेव्हा हे समस्त काय चालले आहे, याचे समग्र स्टिंगॉपरेशन करावे म्हणून आम्ही आमचे परमस्नेही रा. रा. हेमंतकुमार जुवेकर (पक्षी - संडे टुडेतील सँडी व मुंबई सकाळचे सहसंपादक) यांना सविनय पुसले, की मित्रवर्य, हे समस्तांत काय चालले आहे? हा दैनिक सामनाच्या प्रखर अग्रलेखाचा तर परिणाम नाही ना?
तेव्हा रा. रा. जुवेकर म्हणाले, हल्ली आम्ही दैनिकाचे काम पाहात नाही व फक्त सप्तरंग पुरवणीचे काम पाहातो व त्यामुळे आम्हांस दैनिकात काय चालते हे ठाऊक असण्याचे, तसेच अन्यच काय, खुद्द आमच्या दैनिकाचे अग्रलेख वाचण्याचेही काहीच कारण नाही. आम्हांस फक्त रा. रा. दिवाकर गंधे (पक्षी - हिंदी गाण्यांचे श्रद्धांजलीकार) यांच्याबद्दल काही सूक्ष्म माहिती हवी असेल तर विचारा. कारण की अलीकडेच आम्ही आमच्या दैनिकातर्फे त्यांचा हॅपी बर्थ डे साजरा केला होता. हे भाग्य तर आमच्याकडे खुद्द व प्रत्यक्ष म.म. नानासाहेब परुळेकरांसही (आकाशातला प्रभू त्यांच्या आत्म्यास शांती देवो! आमेन!!) मिळत नाही.
तेव्हा आम्ही त्यांस संदर्भासह स्पष्टिकरण दिले, की सामनात म.म. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे रा. रा. संजयसाहेब राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखात, आजकालच्या दांडकेधारी पत्रकारांना (पक्षी - च्यानेलमधील बूमधारी ब्रह्मज्ञानी बाळांना) महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल व संस्कृतीही माहित नसल्याचे संशोधन मांडले होते. ते तर सकाळच्या पत्रकारांच्या निःपक्षपाती व कुटुंबवत्सल मनास लागले नाही ना? मग ते असा शाळेतला राहून गेलेला अभ्यास पूर्ण करण्याच्या मागे का बरे लागले आहेत?
तेव्हा रा. रा. जुवेकर म्हणाले, की अच्छा, ते होय!... त्याचे काय आहे, की सध्या सकाळमध्ये पत्रकारांची परीक्षा घेतली जाते ना, त्याची तयारी करताहेत सगळे.
तेव्हा आम्ही पुसले, की नव्याने कंत्राटावर येणारांची परीक्षा सगळीच पत्रे घेतात. मटात सुद्धा घेतात. अजून त्यांना सुचले नाही म्हणून. नाही तर आपल्याच पेपरांची एकवीस अपेक्षिते त्यांना छापून बाजारात आणली असती एवढ्यात - मटा गाईड म्हणून! सकाळनेही सकाळ पॅटर्नअंतर्गत हे करावयास हरकत नाही. नाही चालले, तर बंद करता येईल!
तेव्हा रा. रा. जुवेकर वदले, की ते तसे नाही. ही परीक्षा जुन्याच पत्रकारांसाठी आहे. त्यांचे ज्ञान मोजण्यासाठी हा खास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे सकाळच्या दर्जा व विश्वासार्हतेत व खपात वाढच होईल.
तेव्हा आम्ही म्हणालो, की हे छान आहे! अलीकडे अनेक पत्रकार काहीही मोठमोठे ग्रंथ वगैरे वाचतात. काही जण तर लिहितातसुद्धा. त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेतलीच पाहिजे.... सुंदरच उपक्रम आहे. एवढा सुंदर, की लवकरच यावर रा. रा. हेरंब कुलकर्णी हे निश्चितच लिहितील!... पत्रकारांना विचारायचे म्हणजे भल्तेच अवघड व कठीण प्रश्न विचारले असतील नाही पेपरात?
तेव्हा रा. रा. जुवेकर अभिमानाने म्हणाले, तर! खूप मोठी काठिण्यपातळी होती! पेपरच तसा सेट केला होता! सेट परीक्षेसारखा!... सकाळमधील पत्रकारांचा हा ज्ञानशांती पेपरयज्ञ यापुढेही चालूच राहणार आहे!
तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
हे सर्व प्रश्न पाहिल्यानंतर आमच्या ध्यानी आले, की सकाळचा दर्जा प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे एवढा वर्धिष्णु का आहे!
सकाळ वृत्तपत्र समुहाने आपल्या मुंबईतील पत्रकारांच्या ज्ञानाची खोली तपासण्यासाठी जो पेपर काढला होता, त्यातील हे काही नमुनेदार प्रश्न -
१) रायगड जिल्ह्यात किती तालुके आहेत?
२) ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?
३) ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?
४) आरती प्रभू यांचे खरे नाव काय?
५) अंबरनाथमधील प्रसिद्ध कारखाना कोणता?
६) पेण तालुक्यातील स्वयंसेवी संस्थेचे नाव सांगा.
-----------------------------------------------
सकाळच्या या अभिनव उपक्रमाचे आपण सर्वांनी स्वागतच केले पाहिजे.
सकाळचे पेपरसेटर आणि परिक्षार्थी या सर्वांना आमच्या शतशः शुभेच्छा!
-------------------------------------------------
(ता. क. - आमच्या चाळीमध्ये रायगड जिल्हा परिषदेतील एक सेवानिवृत्त शिक्षक तिसरी व चौथीच्या मुलांची शिकवणी घेतात. पत्रकारांसाठी शिक्षणशुल्कात काही सवलत देण्याचे त्यांना मान्य केले आहे. सकाळमधील इच्छुकांनी कृपया संपर्क साधावा.)
(Posted by बापू आत्रंगे, दि. ११ नोव्हें. २००८)
रात्रीची वेळ होती. आकाश निरभ्र होते. वातावरणात कुंद गारवा होता. मधूनच झाडांची सळसळ ऐकू येत होती. दूरवरून एखाद्या वाहनाचा आवाज रात्रीच्या नीरवतेला छेद देई. ते सोडले तर बाकी सर्वत्र एक गूढ शांतता होती. सकाळ भवनच्या आवारातही साम-सुम होती.
गेटवरील वॉचमनने घड्याळात पाहिले. ते बंद होते.
मग त्याने टीव्हीवर साम चॅनल लावला. तो चालू होता. त्यावर रिपिट टेलिकास्ट सुरू होते. त्यावरून वेळ कळणे शक्य नव्हते. ते नेहमीच सुरू असते. साम सुम करून तो आपल्या जाग्यावर परत आला...
काळ आपल्या गतीने धावत होता. रात्र सरत चालली होती....
अचानक सकाळभवनच्या प्रवेशद्वारावर एक सफेद कार कर्रकर्र करीत येऊन थांबली. काही क्षण तसेच गेले आणि अचानक अतिशय जोरात पीप-पीप असा कर्णकटू ध्वनी वॉचमनच्या कर्णरंध्रांवर येऊन आदळला. त्या क्षणी अभावितपणे त्याचा हात एका बटणावर गेला आणि गेटचा दरवाजा कर्र कर्र करीत सरकू लागला.
कार सुळकन् आत आली. कर्रकर्र आवाज न करता कारचे दरवाजे उघडले. आतून तीन व्यक्ती अतिशय सावधपणे बाहेर आल्या. तिघांच्याही हातात काही नव्हते. त्यांनी काळे कपडे घातलेले नव्हते. त्यांच्या बुटांचे सोल रबराचे नव्हते. त्यांच्या हातात टॉर्चही नव्हती.
आधीच ठरविल्याप्रमाणे तिघांनीही सकाळभवनच्या स्वागतकक्षात प्रवेश केला. तेथे मिट्ट अंधार होता. आधीच कोणीतरी सगळे दिवे मालविले होते. (कॉस्टकटिंग!) त्या तिघांपैकी तिघांच्याही हातात एक लहानसे यंत्र होते. त्यावरील एक बारीकसे बटण दाबताच त्यातून हलकीशी प्रकाशशलाका बाहेर आली. त्या उजेडात ते लिफ्टपर्यंत आले. परंतु लिफ्टही बंद होती. (कॉस्टकटिंग!) बाजूच्या जिन्यावरून ते वर जाऊ लागले. चौथ्याच पायरीवर ते आले, तेवढ्यात तिघांपैकी एकाच्या हातातील त्या लहान यंत्रातून टिवटिव टिवटिव असा ध्वनी येऊ लागला. त्याने एक क्षण त्या यंत्राकडे पाहिले आणि लगेच त्यावरील लहानसे बटण दाबून तो आवाज बंद केला. (येरवी या यंत्राला मोबाईल म्हणतात! पण ही रहस्यकथा असल्याने तसे म्हणता येत नाही!!)
सकाळभवनच्या एका मजल्यावर ते तिघे आले. आत एका कोप-यात एकच दिवा सुरू होता. (कॉस्टकटिंग!) तेथे रात्रपाळीचे संपादक, छापई कामगार असे काही लोक टीव्ही पाहात बसले होते. त्यांना पाहताच ते तिघेही स्तब्ध झाले.
तिघांपैकी एक जण कुजबुजला, कोणता चॅनल पाहताहेत ते?
दुसरा म्हणाला, आवाज बंद करून पाहताहेत... सामच्या बातम्या असणार!
लगेच पहिला म्हणाला, मग हरकत नाही. पाच-दहा मिनिटांतच झोपतील सारे!!
कोणताही आवाज न करता ते तिघेजण हळूच एका मिटिंग रुममध्ये गेले. एक छोटासा झिरोचा बल्ब त्यांनी लावला. त्याचा प्रकाश मिटिंगरूमच्या बाहेर जाणार नाही, याची खात्री त्यांनी केली. तिघांनी प्रत्येकी एकेक खुर्ची ओढली व त्यावर ते बसले.
तिघांपैकी एक व्यक्ती म्हणाली, अतिशय महत्त्वाची कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे.... या एका वाक्यानंतर सुमारे पंधरा मिनिटे तिने अत्यंत हळू आवाजात मान हलवत नेहमीचेच भाषण केले. मग ती व्यक्ती म्हणाली, एचआर पॉलिसीनुसार आपल्याला पेपर काढायचा आहे. त्यासाठीच आपण आज ही गुप्त बैठक घेत आहोत.
त्यावर दुसरी व्यक्ती हळूच कोणालाच ऐकू जाणार नाही अशा आवाजात म्हणाली, पण आतापर्यंत आपण नेहमीच एचआर पॉलिसीनुसार पेपर काढत आलो आहोत ना?
तिसरी व्यक्ती म्हणाली, असे म्हणणे शक्य आहे. परंतु वस्तुतः आपला आणि पॉलिसीचा तसा काही संबंध नसतो!
पहिली व्यक्ती म्हणाली, पेपर म्हणजे आपला रोजचा पेपर नाही हो. त्यात आपण रोजच नापास होतो. आपल्याला उपसंपादकांची परीक्षा घ्यायचीय. त्यांना किती येते ते पाहण्यासाठी...
दुसरी व्यक्ती म्हणाली, त्यांना कंत्राटावर घेण्याआधी पाहिले नव्हते का?
पहिली व्यक्ती म्हणाली, ही सेट परीक्षा आहे. उपसंपादक पंधरावीस वर्षे सेट झाल्यावर घ्यायची...
तिसरी व्यक्ती म्हणाली, पण परीक्षा घेतल्याने त्यांचेच भले होणार आहे. ते अपटूडेट राहतील. पेपरातील चुका कमी होतील. आणि मग आपण स्पर्धकांना कुठच्या कुठे मागे टाकून देऊ...
पहिली व्यक्ती म्हणाली, चला तर मग. आपण अत्यंत विचारपूर्वक असा पेपर काढू या...
आणि मग ते तिघेही गहनगूढ विचारात बुडाले. विविध विषय, राजकीय-आर्थिक-सामाजिक-कौटुंबीक समस्या व प्रश्न याविषयीचे आपले समग्र ज्ञान पणाला लावून त्यांनी काही प्रश्न तयार केले. सगळ्यांचे प्रश्न एकत्र करून एक पेपर तयार केला.
अतिशय रहस्यमय असा तो पेपर होता. जगातील आतापर्यंतच्या सर्व पेपरांहून वेगळा. जगात शंभर मार्कांचे, पंनास मार्कांचे, पंचवीस, वीस, दहा मार्कांचे पेपर सर्वांनी पाहिले असतील. पण हा रहस्यमय पेपर चोवीस मार्कांचा होता.
पेपर काढून होताच त्यांनी तो अतिशय गुप्तपणे आपल्याजवळ ठेवला. झिरोचा बल्ब विझविला. आणि आले तसेच, कोणताही आवाज न करता, कोणालाही कळू न देता ते निघून गेले.
ते गेले तेव्हाही रात्रीचीच वेळ होती. आकाश निरभ्रच होते. वातावरणात कुंद गारवाच होता. सर्वत्र एक गूढ शांतताच होती. सकाळ भवनच्या आवारातही साम-सुमच होती....
अशी एखादी पेपरसेटिंगची बैठक आपल्या येथे झाली होती, याचा सकाळभवनमध्ये अजून कोणालाही पत्ता नाही. ते तिघे जण कोण याची माहितीही कोणालाच नाही. आमच्या माहितीनुसार त्या तिघांनाही अशी एखादी बैठक झाली होती की काय, याची माहिती नाही!
सर्व काही अत्यंत गूढ आहे...
------------------------------------
परवा आमच्या कानी ही गूढ कथा आली आणि ती ऐकून आमची सँडो बनियान घामाने अगदी ओलीचिंबच झाली!
सकाळच्या दिवाळी अंकासाठी म्हणे ही कथा लिहिली होती. तो दिवाळी अंक दिवाळे अंकासारखा निघाल्यामुळे ही कथा तशीच प्रसिद्धीविन्मुख राहिली! परंतु यातही एक गूढ रहस्य दडलेले आहे.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो, आपली हृदये सांभाळून वाचा...
(वैधानिक इशारा - ज्यांना हृदयविकार, रक्तदाब, अॅसिडिटी, सांधेदुखी, अपचन असे आजार असतील, त्यांनी कृपया पुढील मजकूर वाचू नये. वाचून कोणास धक्का बसला वा आला, तर त्यास पीआरबी कायद्यानुसार आम्ही जबाबदार नाही!)
तर या रहस्यकथेतील अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे कथेतला तो पेपर प्रत्यक्षात, अगदी वास्तवात झाला!
सकाळभवनच्या त्याच इमारतीत उपसंपादकांची ती सेट परीक्षा झाली!!
हे समजले आणि आमचा अगदी असंभवमधला 'दीनानाथ शास्त्री' झाला! मान डगामगा डगमगू लागली. हाता-पायाला कापरे भरले....
------------------------------------------
आता आम्हांला हे कसे समजले, त्याचीही एक कथाच आहे. काही गूढ, अनाकलनीय अशा घटनांच्या एपिसोडिक तुकड्यांतून आम्हांला हे सर्व उलगडत गेले.
काय होत्या या घटना? त्यांचा अर्थ आम्हांस लागला का? हे गूढ संपूर्णतः उलगडण्यात आम्हांस यश आले का? परीक्षेचा तो पेपर आमच्या हाती लागला का?
वाचा आफ्टर द ब्रेक!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १० नोव्हें. २००८)
गेल्या काही दिवसांपासून टीव्ही चॅनल्सच्या पडद्यावर महाराष्ट्र बदनामीची जणू स्पर्धाच चालली आहे. ज्यांना महाराष्ट्र माहीत नाही, ज्यांना येथील प्रश्नांची जाण नाही, इतिहास-भूगोलाचे ज्ञान नाही अशी पोरेटोरे हातात कॅमेरे आणि दांडुके घेऊन एखाद्या जाळपोळीचे चित्रण दिवसभर दाखवितात. हा काय धंदा आहे? आम्ही तर याला पत्रकारिता मानायला तयार नाही.
- सामना, ४ नोव्हेंबर २००८
मीडियाबाबत तर बोलायलाच नको. आपल्या हातात दांडके आले म्हणजे आपण ब्रह्मदेवच झालो, आपल्याला हवे ते आणि हवे तसे आपण घडवू अशीच यांची धारणा असते. ज्यांना राज्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती यांचे थोडेही ज्ञान नाही असे हे उथळ आणि उठवळ पत्रकार आपल्या वाहिनीचा टीआरपी कसा वाढेल याच्याच चिंतेत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून निष्पक्ष बातम्यांची अपेक्षा करणेही मूर्खपणाचे ठरेल.
- प्रहार, ५ नोव्हेंबर २००८
सामना आणि प्रहारच्या अग्रलेखांतील ही वाक्ये वाचल्यानंतर आता आजची वृत्तवाहिन्यांची पत्रकारिता या विषयावर आम्ही अधिक काही बोलायलाच हवे काय? मित्र हो, आता तुम्ही बोला!
(ता. क. - सामना आणि प्रहारची भाषा आणि विचार हे इतके मिळते-जुळते आहेत, हे पाहिल्यानंतर आमच्या बापूंना अगदी गहिवरूनच आले!)
(Posted by चांगदेव पाटील, ता. ८ नोव्हें. २००८)
चिंचपोकळी वा तत्सम कुठलेही स्थानक. वेळ रात्री सात-आठ वा नऊचीही.
फडताळं बंद करून पेपरस्टॉलवाला नुकताच गेला होता. आत अंधारात पेपरचे गठ्ठे निवांत पडले होते. आता उद्या दुपारी सर्क्युलेशनची पोरं रिटर्न न्यायला येतील, तेव्हाच काय ती त्यांची हालचाल होणार होती. आतल्या अंधाराला डोळे सरावल्यानंतर छोट्या गठ्ठ्याने इकडं-तिकडं पाहिलं. दिवसभर बाहेर चक्क्याच्या श्रीखंडासारखी टांगलेली मासिकं-साप्ताहिकं बाजूलाच लोळत पडली होती. त्यातल्या काही फिल्मी मासिकांची किंचित फडफड सुरू होती. त्या मासिकांबद्दलच्या करूणेने छोट्या गठ्ठ्याचं मन भरून आलं. महिना-महिना अशी चिमट्याची फाशी सहन करायची! खाली फळीवर आडवं झालं, तर येणा-या जाणा-यांची चाळवाचाळव सहन करायची! पानं दुमडून हुळहुळी होणार नाहीत तर काय! आज आपल्याकडे झंडू बामची जाहिरात असती, तर त्यांना दाखवली तरी असती! छोट्या गठ्ठ्याला वाटलं, बरं झालं आपण मासिक नाही आहोत. रोजचा पेपर काही कुणी स्टॉलवर चाळून पाहात नाही! थेट विकतच घेतात! पण सकाळचे सगळेच पेपर विकले जातात असंही नाही. त्या तिकडं एका कडेला मोठा गठ्ठा अग्रलेखाच्या पानासारखं तोंड करून बसला होता.
छोट्या गठ्ठ्याने त्याच्याकडं पाहिलं. तर तो (नेहमीप्रमाणे) याच्याकडंच पाहात होता. दोघांची नजरानजर झाली, तसं मोठ्याने विचारलं, "काय, आज झोप नाही येत वाटतं!"
छोटा म्हणाला, "आज झोपेचं नाव काढू नका! या सोळा पानांत मावणार नाही, येवढा आनंद झालाय मला!"
मोठ्याने विचारलं, "का बरं? अग्रलेख गाजला वाटतं आज तुमच्याकडचा!"
छोटा म्हणाला, "हॅ! अग्रलेखाचं काय घेऊन बसलात! तो तर नेहमीच गाजतो! आता एखाद्या अग्रलेखाने डांबरहल्ला वगैरे झाला, तरच आनंद होतो आम्हाला!!"
ते ऐकून मोठा आणखीच खिन्न झाला. आपल्याकडं कधीतरी असा झणझणीत अग्रलेख छापून यावा आणि आपण सगळ्यांपुढे ताठ स्तंभाने उभे राहावे, हे त्याचं पेपरच्या जन्मापासूनचं स्वप्न होतं! पण छे! नवनवे पेपरसुद्धा हल्ली डिंगा मारतात, की मेरे पास अग्रलेख है, खप है, वाचक है, दर्जा है... तुम्हारे पास क्या है? आपण किती काळ एवढंच सांगणार, की 'मेरे पास खूप वर्ष की परंपरा है'? मोठ्या गठ्ठ्याला आणखीच खिन्न-खिन्न वाटलं.
छोटा म्हणाला, "अहो झोपलात की काय? मग बातमी चुकल्यासारखे गप्प का?"
मोठा म्हणाला, "नाही, म्हणजे एवढा आनंद कसला झालाय तुला?"
छोटा म्हणाला, "म्हणजे तुम्हाला माहित नाही? अहो, आज आमच्याकडं केवढी 'दाह'क बातमी आहे! रामविजयाची!"
मोठा मनाशीच म्हणाला, एखादी एक्स्क्ल्युजिव्ह बातमी आली म्हणून काही एवढं फडफडायला नको! नाही तरी आता एक-दोन दिवसांत तीच बातमी अगदी बायलाईनने आपल्याकडं येणारच आहे! काय पण नखरा!
"कोणती रे दाहक बातमी?... आणि हा रामविजय कशाचा?"
छोटा म्हणाला, "छे. एवढे दिवस मुंबईत आहात. पण तुम्हांला मुंबईत काय चाललंय हे पण समजत नाही! रामविजय म्हणजे आमचा परब हो... रामविजय परब. लोकप्रभेतला. म्हणजे तसा आमचाच. दाढी, इनशर्ट, दादरच्या मठात झोपून नुकताच उठल्यासारखा खर्जातला आवाज! ओळखत नाही त्यांना तुम्ही? अहो, तो समर्थ पत्रकार आहे. समर्थ नाटककार आहे. समर्थ पटकथाकार आहे. समर्थ कविताकार आहे. झालंच तर आता समर्थ दिग्दर्शकसुद्धा आहे! अवघी स्वामी समर्थांची कृपा! आणि दाह हा त्यांचा मराठी चित्रपट. सबकुछ रामविजय. कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन सगळं त्यांचंच. शिवाय नुसत्या कथानकावरून या चित्रपटाची निवड न्यू यॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालीय! मला तर आज असं वाटतंय, असं वाटतंय, की अवघ्या अंगाची पुडी करावी आणि त्यातून पेढे वाटावेत!!"
ते ऐकून मोठ्या गठ्ठयाला आणखीच खिन्न-खिन्न-खिन्न वाटलं. शिंचे, यांच्याकडचे पत्रकार चित्रपट लिहितात! आणि आपल्याकडे? चित्रपट परीक्षणसुद्धा साच्यातून काढल्यासारखं असतं! उघडपणे तो एवढंच म्हणाला, "व्वा व्वा! आमचं अभिनंदन सांगा त्यांना!!"
आणि मग मोठ्या गठ्ठ्याने सरळ आपल्याच पानांत डोके घालून नेहमीप्रमाणे शहामृगी पोझ घेतली!
ते पाहून मग छोटा गठ्ठाही गप्प बसला.
स्टॉलमधील अंधार अधिकच गडद झाला.
-------------------------------------------------------------------------------
इतका वेळ स्मार्ट गठ्ठा परंपरेप्रमाणे आपल्याच धुंदीत होता. नेटिव्ह, बिगर स्मार्ट पत्रांकडे लक्ष देणं हे त्याच्या स्मार्टनेसमध्ये बसत नव्हतं! आपल्याच पानांतील सुंदर ललनांची छायाचित्रे न्याहाळत तो बसला होता. तेवढ्यात छोटा गठ्ठा आणि मोठा गठ्ठा चित्रपटाविषयी काही तरी बोलत आहेत, हे त्याच्या कानी पडलं. तसा तो, प्रेसक्लबमधे पत्रकार दुस-या टेबलवरील संभाषण ज्या कौशल्याने ऐकतात त्या कौशल्याने त्यांचं बोलणं ऐकू लागला.
रामविजय परब यांचा चित्रपट न्यू यॉर्क फेस्टिव्हलला गेला आहे, हे ऐकून त्याला काय म्हणावे हेच सुचेना! त्याने इकडंतिकडं पाहिलं. बाजूला नवखा गठ्ठा आपल्याच शब्दांची धार तपासत बसला होता. त्याच्या कानाशी लागत स्मार्ट गठ्ठा म्हणाला, "या छोट्या गठ्ठ्याच्या पत्रकारांना मिळतो बरा वेळ हे सगळं करायला!..."
तसा नवखा गठ्ठा म्हणाला, "हो ना... मलाही आश्चर्य वाटतंय.... आमच्याकडंच मागे पानभर छापून आलं होतं, की तिकडं अगदी अॅसिडिटी होईपर्यंत काम करावं लागतं म्हणून... आणि मग हे कसं काय बरं जमतं त्या पत्रकारांना?"
"हो ना. प्रश्नच आहे!"
"परबांचं सोडा.... ते साप्ताहिकात असतात... पण श्रीकांत बोजेवारांनीसुद्धा लिहिला होता एक पिक्चर... तहान नावाचा..."
"काय सांगता? दिसला नाही कुठं तो?"
"पडला..."
स्मार्ट गठ्ठ्याला पत्रकारसुलभ बरं वाटलं.
"बोजेवारांना जमलं नाही का लिहायला? त्यांना म्हणावं, कशाला नसत्या फंदात पडता?"
"तसं नाहीये ते... बोजेवारांनी लिहिला होता मस्तच... पण निर्माता-दिग्दर्शकाने वाट लावल्यावर लेखक करणार तरी काय?!"
"असं असं!"
"चांगल्या बातमीची उपसंपादक वाट लावतात ना, तसं झालं त्यांच्या पटकथेचं! आता सगळ्याच क्षेत्रात हेच चाललंय! पेपरांत तर हल्ली बातम्यांचीच काय, माणसांची सुद्धा वाट लावतात..."
स्मार्ट गठ्ठा कसनुसा हसला. "खरं आहे..."
"पण बोजेवारांचं बघा ना, एक फुल दोन हाफ लिहायचं, बिरबल-बादशहा लिहायचं, अग्रलेख लिहायचं... हे झालं कचेरीतलं काम. मग घरी जाऊन कादंब-या लिहायच्या, पटकथा लिहायच्या, दिवाळी अंकासाठी कथा लिहायच्या... अरे काय माणूस आहे का टाईपरायटर?" नवखा गठ्ठा पत्रकार-अ-सुलभ कौतुकाने म्हणाला.
"पण आमच्याकडेही असे लिहिते हात आहेत हं!"
"आणि आमच्याकडे सुद्धा!"
मग त्यांनी स्वकौतुक अध्याय लावला...
-----------------------------------------------------------------------------------
त्यांच्या या गप्पा छोटा गठ्ठा गुपचूप ऐकत होता.
त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती.
त्यांच्या या गप्पा मोठा गठ्ठाही गुपचूप ऐकत होता.
त्याला आणखीच खिन्न-खिन्न-खिन्न-खिन्न वाटत होतं.
त्याला वाटलं, आपण कागद आहोत म्हणून... पेन असतो, तर आपणच काही तरी लिहिलं असतं!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ७ नोव्हें. २००८)
अरे कोण आहे रे तिकडे?
सनई-चौघडे लावा!
ढोल-ताशे वाजवा!
नगारे बडवा!
बुरूजांवरल्या तोफांना बत्ती द्या!
रात्री दहाच्या आत फटाके फोडा!
हत्तीवरून साखर वाटा!
(साखरेची आड्डर लातुरच्या कारखान्याला द्या!)
काय म्हणालात? का म्हणून?
अरे अडाण्यांनो, कुठे फेडाल रे ही ई-निरक्षरता?
अरे, का म्हणून काय पुसता?
ते पाहा, ते पाहा,
महाराष्ट्राच्या ई-पावलांनी विश्वाचा उंबरठा ओलांडला आहे!
(साक्षात् मुख्यमंत्र्यांचाच हा आदेश होता ना!)
अवघ्या वेबविश्वात महातेजाचा लखलखाट पसरला आहे!
सगळीकडे कसा अवघा महाक्लिकक्लिकाट चालला आहे!
कारण.... कारण....
महान्यूजने लाखाचा उंबरठा ओलांडला आहे!
'लाख'मोलाचा टप्पा ओलांडला आहे!
आज (बुधवार, तारीख पाच नोव्हेंवर दोन हजार आठ) महान्यूजला लाखाव्या वाचकाने भेट दिली आहे!!
मुंबईपासून शांघायपर्यंत, सोलापूरपासून सिंगापूरपर्यंत, लातूर पासून लंडनपर्यंत आणि परभणीपासून जर्मनीपर्यंत लक्षावधी नेटीझन्सनी महान्यूजला भेट दिली आहे! (माहिती स्त्रोत - श्रद्धाताई बेलसरे-खारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, वेब, महान्यूज, महाराष्ट्र सरकारचा उपक्रम.... श्रद्धाताई, फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या लेखातील हे एक वाक्य आम्ही येथे पुनर्मुद्रित केले आहे. धन्यवाद!)
मंडळी, साधी गोष्ट नाही ही!
आता लोकराज्य पाच लाखावर गेले म्हणून महान्यूजही लाखावर जावी, असा आग्रह तर धरता येत नाही ना समस्त भाऊसाहेब तलाठ्यांकडे! हे इंटरनेट आहे. येथे ज्याचे मन चाहील तोच येईल. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या सरकारी पोर्टलला लोक येऊन भेट देतात हीच केवढी ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट आहे! आणि येथे तर अवघ्या ४८ (अक्षरी अठ्ठेचाळीस फक्त) दिवसांत लाखभर लोकांनी या पोर्टलवर क्लिक केले! हे म्हणजे अगदी वाहव्वाच!!
वाहव्वा - श्रद्धाताईंची, वाहव्वा - मनीषाताईंची,
वाहव्वा - या सरकारी असूनही स्मार्ट दिसणा-या आणि दफ्तर दिरंगाई न करता वेळच्या वेळी अपडेट होणा-या या पोर्टलसाठी खपणा-या समस्त जनांची!
थोडीशी वाहव्वा - यास मल्टीमीडियाचीही.
कारण की त्यांनीच ही साईट बांधून दिली!
हे यास मल्टीमीडियावाले म्हणजे कोण ओळखलेत का?
नाही?
अहो, हे तर रा. रा. संजीवकुमार लाटकर 'जयमहाराष्ट्र'वाले!
सध्याचा पत्ता - द्वारा साम मराठी, सकाळ भवन, बेलापूर, नवी मुंबई.
कायमचा पत्ता - सध्यातरी साम मराठी!!
असो.
महान्यूज या महापोर्टलला आमच्या महाशुभेच्छा!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ५ नोव्हेंबर, २००८)
महामहीम केंद्रीय शेतकीमंत्री शरदश्चंद्रजीसाहेब पवारसाहेब (ऊर्फ साहेब) यांनी रा. रा. अँग्रीयंग'राज' ठाकरे - (परवा मटात राजराखण - राजला अवतरण चिन्ह - हा शब्द वाचला आणि आमुचे दोन्ही चक्षु अगदी निवनिवनिवले! तेव्हापासून आम्ही अगदी विलासरावांसारखी प्रतिज्ञाच केली, की 'राज' कुठेही दिसो, त्याला अवतरण चिन्हात टाकल्याशिवाय सोडायचे नाही!)... तर आम्ही सांगत होतो, की म.म. शरद पवार यांनी रा. रा. अंग्रीयंगराज ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून जी पुढे उडी घेतली, त्याबद्दल आम्हांस त्यांचे फुल ना फुलाचा हार घालून अभिनंदन करावेसे वाटत आहे.
आता तुम्ही विचाराल, की साहेबांनी (पक्षी - पवार) साहेबांच्या (पक्षी - ठाकरे) पावलावर पाऊल ठेवले म्हणजे नेमके काय केले? तर ते समजून घेण्यासाठी आपणांस थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल....
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आझमगडचे आबू आणि 'राज'गडचे 'राज' यांचे शब्दयुद्ध सुरू होते. त्यावेळी मनसेच्या शूर सैनिकांनी खास च्यानेलांकरीता एका टॅक्सीच्या काचा फोडण्याचा शॉट दिला होता. मग वाहिन्यांनी त्या शॉटचे अगदी दळूबाईदळू केले. आता च्यानेलेच ती. त्यांना तेवढ्यावर कसे थांबता येईल? म्हणून मग त्यांनी 'राज'गडचे 'राज' यांनाही भरडण्यास घेतले.
झाले! अँग्रीयंग'राज' संतापले! त्यांनी पत्रकारपरिषद बोलावली. पण त्यात त्यांनी एक गंमत केली. म्हणाले, आम्ही बोलणार ते फक्त मराठीवाल्यांशीच! बाकीच्यांना नो एंट्री!
वास्तविक 'राज'साहेबांनी तसे करावयास नको होते, असे आमचे पर्सनल व वैयक्तिक मत आहे. कारण की त्यात च्यानेलवाल्यांची काहीही चूक नव्हती. चूक त्यांच्या श्रवणयंत्राची होती. 'राज' देव म्हणाले, की त्यांना दानव असे ऐकू यायचे! मग काय बरे करणार ते? (बरे, हे काही हिंदी-इंग्रजी च्यानेलवाल्यांबाबतच होते, असे नाही! मराठीतही ज्या च्यानेलांची श्रवणयंत्रे दिल्लीमेड आहेत, त्यांनाही तसेच काही ऐकू येते. त्यातही काही मराठी च्यानेलांची श्रवणयंत्रे तर अश्शी वेगळी आहेत, की त्यांना स्वतःशिवाय कुणाचीही खास बातमी-ठाम मत ऐकू येत नाही! असो.)
तर मुद्दा असा, की अँग्रीयंग'राज' यांनी, वेडेविद्रे बोलतात, विकृतविकृत सांगतात, आपली बदनामी करतात, 'राज के गुंडे' असे म्हणतात म्हणून हिंदी-इंग्रजी च्यानेलांशी बोलणेच तोडले होते. आता काही महिन्यांनी म.म. शरदश्चंद्रजीसाहेब पवारसाहेब यांनीही नेमके हेच केले आहे. (इसकू कैते है मिलीभगत! आयबीएनशेव्हनवा, तुम्हारा ध्यान किधर है भैया?) परवा मुंबैत राष्ट्रवादी नगरसेवकांच्या बैठकीनंतर साहेबांनी मीडियाशी अगदी गट्टीफूच केली. म्हणाले, "मीडियाशी बोलण्याची माझी इच्छा नाही. मीडियाने ज्या पद्धतीने महाराष्ट्राची बदनामी चालविली आहे, ते योग्य नाही."
अँग्रीयंग'राज' यांनी फक्त हिंदी-इंग्रजी मीडियाला अट्टीकट्टी बारबट्टी, बारा महिने बोलू नको, लिंबाचा पाला तोडू नको असे म्हटले होते. (आणि सहा महिन्यांच्या आत बट्टी घेतली होती!) परंतु म.म. साहेबांनी त्याही पुढे जाऊन समस्त मीडियालाच हुडूत् केले! (या पूर्वी म.म. साहेब फक्त मराठी पत्रकारांनाच हुडूत् करीत असत. आता त्यांनी यातही समाजवाद आणण्याचा निर्णय घेण्यासंबंधी विचार केला, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे!! असो.)
यात खरी चंमतग मात्र वेगळीच आहे.
म.म. पवारसाहेबांच्या या मराठीबाण्याची बातमी आम्ही अत्यानंदाने आमच्या एफेमला सांगितली. तर ती म्हणाली, हुडूत्! अशा बहिष्काराने काय होणार आहे? च्यानेलवाल्यांना काय, काहीही दळायचेच असते! तुम्ही बोलला तरी बातमी, नाही बोलला तरी बातमी! खरं तर बातमीच पाहिजे असंही काही नाही!
तिचे ते बोल ऐकून आम्ही चमकलोच!
नंतर मनीं म्हटले, सामान्य नागरिकांमध्येही बातमी व एकूणच पत्रकारितेविषयी किती सजगता निर्माण झाली आहे! निदान याचे तरी श्रेय आपण समस्त च्यानेलांस देण्यास हरकत नाही!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ३ नोव्हे. २००८)
आम्ही धादांत कन्फ्युज झालो आहोत!
आम्हांस काही कळेनासे झाले आहे!
समजेनासे व उमजेनासे झाले आहे!!
वस्तुतः आमुची ही अवस्था तशी नित्याचीच. प्रातःकाली उठल्यापासून रात्री साडेनवास सतरंजीस पाठ लावीपर्यंत आमचे हे असेच असते. परंतु येसमयी ते जरा अधिकच जाहले आहे.
अधिकच म्हणजे इतुके, की आम्हांस वाहिनी आणि पार्टी यांतील फरकच कळेनासा झाला आहे!
आम्हांस वाटते, की कॉंग्रेस हा पक्ष आहे. तसेच एनसीपी व बीजेपी व एमएनएस हेही पक्ष आहेत.
इथपर्यंत सारे कसे व्यवस्थित व ठिकठाक आहे.
परंतु अलीकडे-अलीकडे आम्हांस सारखे वाटते, की आयबीएन हाही असाच एक पक्षच आहे!
बरे हे नुसते वाटण्यावर थांबावे, की नाही?
म्हणजे अनेक गोष्टी कशा आपण नुसत्याच वाटण्यावरच थांबवतो....
म्हणजे उदाहरणार्थ 'मनसेची बडवेगिरी' (सौजन्य - मटा) असे अभिरुचीहीन मथळे प्रसिद्ध होऊ नयेत, चुकून अग्रलेख तर बातमी म्हणून छापला नाही ना, असा संभ्रम आम्हां पामरांस पडू नये (सौ. लोकसत्ता), अग्रलेखाच्या जागेत बातम्या येऊ नयेत (सौ. - सकाळ), लोकांना बातम्या वाचण्यास मिळाव्यात, लेआऊट नव्हे (सौ. लोकमत) असे आपणांस खूप वाटते. परंतु आपण त्यावर कुरकुरण्याशिवाय काही करू शकतो का?
याच प्रमाणे आयबीएन हा पक्ष आहे हे फक्त वाटण्यावरच थांबावे ना!
पण नाही.
आम्हांस तर अलीकडे तशी खात्रीच पटू लागलेली आहे.
की,
आयबीएन हा एक धादांत पक्ष असून,
रा. रा. मीखिल वागळे (पक्षी - ज्यांना पत्रकारितेत तीस वर्षे झाली आहेत ते) व रा. रा. आशुतोष (पक्षी - आयबीएन सेव्हनचे पोलिटिकल एडिटर) हे त्याचे अध्यक्ष आहेत.
नव्हे, नव्हे, ते तसेच असले पाहिजे!
अन्यथा, मुलाखत घेताना कोणी हे विसरले असते का, की आपणच मुलाखत घेत आहोत व आपण फक्त प्रश्न विचारावयाचे असतात व वाद घालावयाचा नसतो, कारण की आपण (तीस वर्षांचा, म्हणजे आमच्या सबंध वयाएवढा अनुभव असलेले) पत्रकार आहोत?
अन्यथा, राजकीय विश्लेषण करताना कोणी हे विसरले असते का, की आपण गांभिर्याने विश्लेषण करावयाचे असते व भाषण द्यावयाचे नसते?
अन्यथा, अन्यांवर टीकेचा भडिमार करताना व अन्य हे कसे लोकशाहीवादी नाहीत व घटनाद्रोही आहेत असे हुकमी म्हणताना, कोणास आपल्याच हिंदी वाहिनीभगिनीवरूनी चाललेले 'भैया मोरे टीआरपीके बंधन निभाना...' हे गीत ऐकू आले नसते का?
तेव्हा आम्हांस वाटते ते खरेच असावे, असा आमचा आपला एक समज आहे.
तुम्हांस काय वाटते?
(Posted by बापू अत्रंगे, दि. १ नोव्हें. २००८)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांसाठी पुरक वाचन - रा. रा. राज ठाकरे यांना रा. रा. राजदीप सर्देसाई यांचे पत्र हे पत्र वाचले आणि काय सांगू, आम्ही पुन्हा क्न्फ्युजून गेलो. वाटले, आयबीएन सेव्हन चालविणारे राजदीप आणि हे पत्रलेखक राजदीप वेगळे तर नाहीत? अन्यथा त्यांचे लिहायचे आणि बोलायचे दात वेगळे कसे दिसले असते बरे?
मागील लेख
-
▼
2008
-
▼
November
- आम्ही वृत्त-अतिरेकी!
- मित्रांनो, जबाबदारी वाढलीय!
- प्रिय पाडगावकर,
- किरकोळांची क्रांती!!
- ताज्या पत्रकारांसाठी छान छान गोष्टी
- एक वाचकपत्र
- दिल्लीतील पत्रकारांचे संमेलन आणि पवारांचा कोट
- लोकसत्ता वृत्तांत अर्थात लोकसत्तातील बालदिनाची स्व...
- सहयोगी बातमीदार
- तुम्हीच 'फाडा' तुमचा पेपर!
- अश्शी वाहिनी सुरेख बाई...
- सकाळचा 'पेपर' (एपिसोड दुसरा)
- सकाळची गूढरहस्यकथा (एपिसोड पहिला)
- मीडियाच्या नावाने...
- एक फूल दोन हाफ!
- 'महान्यूज'ची महान्यूज!
- म.म. पवारसाहेब च्यानेलांवर बहिष्कार टाकतात, त्याची...
- आयबीएन नावाची पार्टी
-
▼
November
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

