मित्रांनो,
आज ब-याच दिवसांनी येथे लिहित आहे. विषय जरा वेगळा आहे. गंभीर आहे.
आजच मला एक ई-मेल आला. त्या पत्रामध्ये भारतातील मीडियाबद्दलचा एक लेख दिलेला होता. वर लिहिले होते - अतिशय सुरस लेख. वाचलाच पाहिजे.
मीडियाबद्दलचा लेख होता म्हणून वेळ काढून वाचला.
वाचला आणि थक्क झालो.
डिसइन्फर्मेशनचा उत्तम नमुना कोणास पाहावयाचा असेल, तर हो लेख वाचावा.
कोणत्याही प्रकारचे पुरावे न देता, ठोकूनी देतो ऐसा जे पद्धतीने लिहिलेल्या या लेखात अशी थेअरी मांडलेली आहे, की भारतातील सगळे मोठे मीडिया ग्रुप हे एक तर ख्रिस्ती मिशनरी किंवा मुस्लिम वा कम्युनिस्टांच्या पैशांवर चालत असून, त्यामुळे भारतात सत्याचा गळा दाबला जात आहे.
मित्रांनो,
गोबेल्स प्रचारपद्धतीचा नमुना म्हणून मी या लेखाकडे पाहतो.
येथे मुद्दामच हा लेख देत आहे.... की कळावे, मीडियावर बाहेरून कसे हल्ले होत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------
Who owns the media in India ?
Recent Gujarat election have witnessed unaccountable money paid to media persons of both, print and electronic by Saudi Arabia to discredit Modi and the Hindutva forces, which Media did very faithfully without success.
There are several major publishing groups in India , the most prominent among them being the Times of India Group, the Indian Express Group, the Hindustan Times Group, The Hindu group, the Anandabazar Patrika Group, the Eenadu Group, the Malayalam Manorama Group, the Mathrubhumi group, the Sahara group, the Bhaskar group, and the Dainik Jagran group.
Let us see the ownership of different media agencies.
NDTV: A very popular TV news media is funded by Gospels of Charity in Spain Supports Communism. Recently it has developed a soft corner towards Pakistan because Pakistan President has allowed only this channel to be aired in Pakistan . Indian CEO Prannoy Roy is co-brother of Prakash Karat, General Secretary of the Communist party of India . His wife and Brinda Karat are sisters.
India Today which used to be the only national weekly which supported BJP is now bought by NDTV!! Since then the tone has changed drastically and turned into Hindu bashing.
CNN-IBN: This is 100 percent funded by Southern Baptist Church with its branches in all over the world with HQ in US.. The Church annually allocates $800 million for promotion of its channel. Its Indian head is Rajdeep Sardesai and his wife Sagarika Ghosh.
Times group list:
Times Of India, Mid-Day, Nav-Bharth Times, Stardust, Femina, Vijay Times, Vijaya Karnataka, Times now (24- hour news channel) and many more...
Times Group is owned by Bennet & Coleman. 'World Christian Council¢ does 80 percent of the Funding, and an Englishman and an Italian equally share balance 20 percent. The Italian Robertio Mindo is a close relative of Sonia Gandhi.
Star TV: It is run by an Australian, who is supported by St. Peters Pontifical Church Melbourne.
Hindustan Times: Owned by Birla Group, but hands have changed since Shobana Bhartiya took over. Presently it is working in Collaboration with Times Group.
The Hindu: English daily, started over 125 years has been recently taken over by Joshua Society, Berne , Switzerland .. N. Ram's wife is a Swiss national.
Indian Express: Divided into two groups. The Indian Express and new Indian Express (southern edition) ACTS Christian Ministries have major stake in the Indian Express and latter is still with the Indian counterpart.
Eeenadu: Still to date controlled by an Indian named Ramoji Rao. Ramoji Rao is connected with film industry and owns a huge studio in Andhra Pradesh.
Andhra Jyothi: The Muslim party of Hyderabad known as MIM along with a Congress Minister has purchased this Telugu daily very recently.
The Statesman: It is controlled by Communist Party of India.
Kairali TV: It is controlled by Communist party of India (Marxist)
Mathrubhoomi: Leaders of Muslim League and Communist leaders have major investment.
Asian Age and Deccan Chronicle: Is owned by a Saudi Arabian Company with its chief Editor M.J. Akbar.
> > Gujarat riots which took place in 2002 where Hindus were burnt alive,
> > Rajdeep Sardesai and Bharkha Dutt working for NDTV at that time got around 5 Million Dollars from Saudi Arabia to cover only Muslim victims, which they did very faithfully. Not a single Hindu family was interviewed or shown on TV whose near and dear ones had been burnt alive, it is reported.
Tarun Tejpal of <
PONDER OVER THIS. NOW YOU KNOW WHY EVERY ONE IS AGAINST TRUTH, HOW VERY SAD.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख तुम्ही अनेकांना मेल करा अशी विनंती करण्यात आली आहे.
माझी विनंती आहे, की कृपया प्रचारक बनू नका.
(Posted by चांगदेव पाटील, दि. १७. १०. ०८)
सक्काळीसक्काळी दहा वाजता उठून आम्ही ऊन-ऊन चहात खारी बुडवून खात होतो! दोन खारी (किंवा एक गर्रम चपाती) आणि ग्लासभर कषायपेय हे आमच्या आनंदाचे निधान आहे. सकाळी मशेरी लावल्यानंतर हे एवढे मिळाले की मग आपण कोणत्याही जीवनयुद्धास - म्हणजे कचेरीत जाणे वगैरे - अगदी जय्यत तय्यार असतो! हे नसेल तर मात्र जगत् अगदी मिथ्या वाटते! सवय! दुसरे काय? तर असे आम्ही आनंदाच्या डोही सूर मारत चहाची बशी ओठांस लावत असताना लेले आमुच्या खोलीत घुसले.
''काय बापू, अद्याप चहाच चालला आहे वाटतं?'' लेले म्हणाले.
माणसं असे फाल्तूक प्रश्न का बरे करतात? उदाहरणार्थ रूपयाचे संत्र घेताना चारवेळा विचारतात, भैया, मिठा है ना संत्रं? या सवालास तो भैया काय 'नही है' असे उत्तर देईल? नाही म्हणजे, असा प्रश्न विचारताना लोकांचा समज काय असतो तरी काय? त्या भैयास लोक हरिश्चंद्राचा अवतार समजतात, की शबरीचा? पण लोक विचारतात असे प्रश्न.... असो.
''काय लेले, सक्काळीसक्काळी काय काम काढलंत?... वाचकपत्र लिहिलंत वाटतं?''
ही लेलेंची आणखी एक वाईट सवय! दिवसाआड कशावरही वाचकपत्र लिहितात आणि आमच्याकडे आणून देतात कचेरीत देण्यासाठी. माणसाने वाचकपत्र जरूर लिहावे. आमची त्यास ना नाही. पण अशी रतीब घातल्यासारखी लिहायची म्हणजे फारच झाले! बरे त्यास काही विषयाची मर्यादा असावी ना. पण नाही. हे कुत्र्याच्या नसबंदीपासून अणुकरारापर्यंत कशावरही लिहिणार. परवाच लेलेंनी लिव्ह-इन-रिलेशनशिपवर पत्र लिहिले होते. लिव्ह-इन-रिलेशिपवर लेले! स्वतःच्या पत्नीशीही रिलेशन ठेवायला घाबरणारे लेले... पत्र लिहितानासुद्धा त्यांचे हात ओले झाले असतील घामाने! पण त्यांनी पत्र लिहिले आणि आमच्या वृत्तपत्राने ते प्रसिद्धही केले.
''नाही आज पत्र नाही लिहिले... लेख लिहिलाय!'' लेले म्हणाले आणि आमच्या हातातली बशी हिंदकळली.
''लेख?... कशावर?''
''विषय जरा गंभीर आहे... आरोग्याचा.''
''म्हणजे? हिवाळ्यातल्या आजारांवर लिहिलाय की ऑक्टोबर हिटवर? अहो, असे लेख केव्हाच पाडून झालेत सगळ्या पेपरांचे...''
''नाही. विषय जरा वेगळा आहे...''
''कोणता?''
''मूळव्याध!''
बशी निसटलीच आमच्या हातातून!
मान्य, की मूळव्याध हा एक आदरणीय आजार आहे. मुंबईतल्या आगगाड्या, प्रसाधनगृहांच्या भिंती, स्थानकांतील खांब यावरील त्या बवासीर बिनाआपरेशन जड से निकालणा-या जाहिराती पाहिल्यानंतर कुणाचाही समज व्हावा, की मुंबईत बारोमास बवासीरची साथ असावी! पण म्हणून काय त्यावर वृत्तपत्रात लेख लिहायचा?
''अहो लेले, मूळव्याध काय? दुसरा विषय नाही सुचला तुम्हाला लेख लिहायला? काही नाही, तर लिव्ह इन रिलेशनशीप कायद्याच्या प्रस्तावावर लिहायचंत... आजकाल तर कोणीही उठून लिहितंय त्यावर, संस्कृतीरक्षकाचा नाही तर वकिलाचा आव आणून...''
''म्हणजे आमचा आजार तुम्हाला महत्त्वाचा वाटत नाही?.... यावर आम्ही लेख लिहू शकत नाही?'' लेले सात्विक संतापाने, बसण्याची पोझिशन बदलून म्हणाले. त्यांना त्रास होत असावा!
''हे पाहा. तुमचा आजार तुमच्यासाठी महत्त्वाचाच नाही, तर अगदी जीवन-मरणाचा प्रश्न असू शकतो. पण ते वाचकांनी का बरे वाचावे? त्यांना त्यांचे आजार नसतात काय? आणि आजारावर लिहायचंच आहे, तर फ्यामिली डॉक्टरात लिहा.... सकाळची आजारी नसलेली एकमेव पुरवणी आहे ती!''
''असं म्हणताय... असं म्हणताय.... मग हे काय आहे? हे असं छापून आलेलं चालतं तुम्हाला पेपरात?'' हातातील वृत्तपत्र उंच फडकावत लेलेंनी आम्हांस कोड्यात घातले.
''बघू... काय छापून आलंय ते...'' असं म्हणत आम्ही ते पत्र हातात घेतले.
पाहतो तो काय, ती राप्र महामंडळाच्या प्रहारची रविवार पुरवणी होती. कोलाज. पहिल्या पानावर रा. रा. सुरेन्द्र हसमनीस (पक्षी - नारायण राणे ज्यांच्या डोंबोलीच्या घरी गेले होते ते) यांचा आपर्ण लेख होता.
''हे म्हणताय होय?... अहो, हा तर महाराष्ट्राच्या आरोग्याचा लेखाजोखा मांडणारा लेख आहे. त्याच्याशी तुमच्या मूळव्याधाचा काय संबंध?''
''आत पाहा... वरवर चाळून प्रतिक्रिया देण्याचा वाईट रोग जडलाय बापू तुम्हांला!'' लेलेंनी तेवढ्यात आम्हांला टोचून घेतलं.
आत पाहतो तो तर तेथेही दस्तुरखुद्द संपादकांचा पानभर लेख!
बापरे... संपादकांचा पानभर लेख!
म्हटले, आपणांस चहा तर चढला नाही ना? हल्लीचे संपादक येवढं लिहू शकतात? आमचा तर अलीकडे संपादक लिहू शकतात यावरील श्रद्धाच उडत चालली आहे! सारखे वाटत राहते, की संपादकांनी लिहिले पाहिजे! आपली ती परंपरा आहे. पण संपादकांनी (सन्माननीय अपवाद वगळता) लिहिलेले वाचले, की सारखे असे वाटू लागते, की यापेक्षा यांनी साडेनवाच्या बातम्यांतच बोललेले बरे!!
रा. रा. आल्हाद गोडबोले यांची नामपताका मिरवणा-या त्या लेखाचे शीर्षक होते - वेशीवरील पताका!
''या लेखाबद्दल म्हणताय का तुम्ही लेले?'' आम्ही पृच्छा केली. ते 'हो' म्हणाले.
अगं बाई अरेच्च्या! नावावरून तर हा लेख पंढरीची वारी, ध्वजदिन वा तत्सम विषयावरील वाटतोय. यात आजारविषयक काय आहे न कळे, असे मनोमनीं म्हणत आम्ही तो लेख वाचू लागलो आणि काय आश्चर्य, आम्ही तो लेख वाचतच गेलो.... काय त्या लेखाची रेंज होती! हिमालयापलीकडच्या चीनमधील बीजिंगमधील ऑलिम्पिकचा उद््घाटन सोहळा ते ठाण्यातलं क्रिटिकेअर हॉस्पिटल व्हाया कॅडबरी जंक्शन, ते माणदेशातल्या दिघंचीतील शिदोबाचं शेत ते ज्ञानेश्वरी ते राणे कुटुंबीयांबरोबरचे सीमोल्लंघन.... एका लेखात काय पल्ला मारलाय रा. रा. गोडबोलेजींनी! हा लेख वाचला आणि त्यातून एक गोष्ट लक्षात आली, की गेल्या दोन-तीन वर्षांत रा. रा. गोडबोलेजींना लोकसत्तेत खूपच त्रास झाला होता! कंपनीने त्यांच्या आरोग्याची किती हेळसांड केली होती! पण आता किनई प्रहारमध्ये काही काळजी नाही! एकंदर लेख मस्त कौटुंबिक जिव्हाळ्याचा, वाचनीय, व्यावहारिक, चिंतनगर्भ, स्मृतिकातरतापूर्ण व विनोदी झाला होता! आमचे तर वाचताना गाल दुखले! लेलेंना त्यात काय वावगे दिसले कुणास ठाऊक?
''चांगला आहे की लेख... रुग्णालयातल्या डॉक्टरांपासून वॉर्डबॉय व मावशी व मामा आदीकरून सर्वांच्या आभारप्रदर्शनाची चौकटसुद्धा आहे त्यात!'' आम्ही म्हणालो.
''तेच तर म्हणतोय मी.... संपादक जर त्यांच्या ऑपरेशनवर असे लिहू शकतात, तर मग आमचेही गेल्या महिन्यात मूळव्याधीचे ऑपरेशन झालेच आहे की! आमच्याकडे तर आभारप्रदर्शनाची मोठी यादीच आहे...नर्सांपासून नातेवाईकांपर्यंतची.... आता आयसीयूत नव्हतं ठेवलं आम्हांला... नारायण राणे नव्हते आले भेटायला आम्हांला... पण अखेर आजार म्हणजे आजार. त्यात भेदभाव करू नका!'' लेलेंनी अगदी समतेचा झेंडाच हाती घेतला.
आता यावर आम्ही काय बोलणार?
आम्ही येवढंच म्हणालो, ''लेले, तुमचे म्हणणे पटतेय आम्हांला. आता असे करा. तुमच्या लेखाचे शीर्षक बदला. हे जे 'वेशीवरला मूळव्याध' शीर्षक दिलेय तुम्ही ते काही तितकेसे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा त्यास 'हसरा मूळव्याध' किंवा 'माझा साक्षात्कारी मूळव्याध' असे काहीतरी छान नाव द्या आणि द्या पाठवून प्रहारच्या पत्त्यावर...
नाही म्हणजे, असा सल्ला देण्याव्यतिरिक्त आपण तरी काय करू शकतो या आजारावर?
(Posted by बापू अत्रंगे, दि. १७.१०.०८)
आम्ही पत्रकार असतो म्हणजे आम्हांला सगळं माहित असतं.
सगळं म्हणजे सगळं म्हणजे सगळंच!
अगदी विलासराव राणेंबद्दल खासगीत काय म्हणतात,
पवारांचं आणि राज ठाकरेंचं आतून काय गुळपीठ आहे,
मुंडेंनी मेटेंना कधी डोळा घातला,
भुजबळांचं नेमकं काय चाललंय,
झालंच तर शाहरूखचं आणि अमिताभचं कशामुळं वाजलं,
सलमान अजून ऐश्वर्यासाठी कसा झुरतो,
अजून सांगायचं तर,
राप्र महामंडळाच्या राणेंचं आणि लोकमतच्या दर्डांचं कसं वाजलं,
प्रहारमध्ये पवारांच्या पेपरातली माणसं का घेत नाहीत...
अशी सगळी गुजं माहित असतात आम्हां पत्रकारांना.
(म्हणजे आम्ही तसं समजतो.)
म्हणजे आम्ही तसे बिग बॉसच की नाही बाप्पा!
(म्हणजे आम्ही तसं मानतो.)
आता यातही एक खुबी असतेच. आमच्याकडची ही माहिती धादांत सत्य असतेच असं काही नाही. आम्ही सांगतो मात्र असं, की जणू काही आताच विलासरावांशी कानगोष्ट करून आलोय!
तुम्हांला अंदाजच घ्यायचा असेल, तर भेटा वा लिहा कोणत्याही पत्रकाराला किंवा मग समक्ष एकदा येऊनच जा ना विधीमंडळ वार्ताहर संघात.
एकंदर आम्ही पत्रकार असतो म्हणजे आम्हांला सगळं माहित असतं, म्हटल्यावर कोण जातो कशाची खात्री करून घ्यायला?
मग रा. रा. शरद पवारांना सांगावं लागतं, की वृत्तपत्रांची विश्वासार्हता धोक्यात येतेय... लोक टेबलन्यूजा करतात वगैरे आणि इत्यादि.
हे असे कोणी म्हणालं, की लोकसत्ताला वाटतं, ते मटासाठी म्हणालेत. मटाला वाटतं, की हू केअर्स! लोकमतला वाटतं, ते सकाळसाठी म्हणालेत व सकाळला वाटतं, की ते जगातल्या यच्चयावत पेपरांसाठी म्हणालेत! म्हणजे सर्वे सुखिनः सन्तु!! कोणाच्या अंगाला काही लागतच नाही...
एकदा आम्ही असं मानायला लागलो, की
या विशाल ब्रह्मांडात आमच्यासारखे हुशार आम्हीच व बाकी सर्व अडाणी, कारण की आम्ही तो बातमीदार!
या सर्व जगात अक्कल ती आमच्याच खात्यात व बाकी सगळे मूर्ख, कारण की आम्ही तो संपादक!
या अखिल आकाशगंगेत आम्हीच सर्वज्ञानी व बाकी अवघे यूसलेस, कारण की आम्ही तो मालक!
की मग वाचकहो, तुमच्या हाती राहतं काय?
आम्ही जे छापणार तेच तुम्ही गोड मानून घ्यायचं, खरं समजून घ्यायचं.
उदाहरणार्थ लोकमतने म्हटलं, की जन-गण-मन हे जगातलं सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत असल्याचं युनेस्कोने जाहीर केलं आहे, तर ते सत्यवचन मानण्याखेरीज तुम्हांकडे अन्य काही पर्याय असतो का?
नसतोच.
परंतु खरी गोष्ट अशी की इंटरनेटवर ई-मेलच्या माध्यमातून अशी अफवांची पिकं बारोमास निघतच असतात, त्यातलंच हे एक बातमीचं रोपटं होतं. भारतीय राष्ट्रगीताला असा कोणताही पुरस्कार वगैरे मिळालेला नाही. (दस्तुरखुद्द बापूने युनेस्कोच्या साईटवर जाऊन त्याची खात्री केलेली आहे. कारण की हाच मेल पंधरा रोजामागे बापूच्या इनबॉक्सीही पडला होता. अधिक माहितीसाठी वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांनी या पत्त्यावर जावे - http://www.hoax-slayer.com/best-national-anthem-unesco.shtml)
तथापि लोकमतमध्ये कोणा पत्रकारास हा ई-मेल आला. त्याने आपल्या अंगभूत आगाऊ आत्मविश्वासाच्या जोरावर त्यावर विश्वास ठेवला. आलेल्या वृत्ताची खात्री करण्याची आवश्यकताच काय राव! सुबोध मराठीत ते वृत्त भाषांतरित केलं आणि दणकून छापलं. वाचकांची दिशाभूल केली. पण त्याची पर्वा कवण व काये म्हणोनि करणार? (मागे एकदा गोव्यात झालं होतं नाझी-गेट. तेव्हा तरी कोणी सॉरी म्हटलं?)
तर ही राष्ट्रगीताची बातमी चुकीची आहे, खोटी आहे, याची जाणीव हा लेख वाचल्यानंतर व पुरेशी खात्री केल्यानंतर जेव्हा होईल, तेव्हा लोकमत जनगणमनांस सॉरी म्हणेल, असे तुम्हांस वाटत असेल, तर तुम्ही हाती कर्णा घेऊन दवंडी द्यायला हरकत नाही, की तुम्ही भाबडे आहात!!
तर एकंदर मुद्दा असा, की आमच्याकडे खूप काही माहिती येत असते, पण ती गाळून घेण्याची चाळणीच आम्ही भंगारात विकली आहे.
कॉर्पोरेट कचे-यांत म्हणे अशा जुन्या उपकरणांना जागा नसते!
आणि शिवाय ते आहेच, की -
आम्ही पत्रकार असतो म्हणजे आम्हांला सगळं माहित असतं.
सगळं म्हणजे सगळं म्हणजे सगळंच!
(Posted by बापू अत्रंगे, दि. १४.१०.०८)
आमचा असा दावा आहे, की मराठी वृत्तपत्रांतील पत्रकारांना इंग्रजी येतेच येते!
शिवाय इंग्रजी वृत्तपत्रांतील मराठी पत्रकारांनासुद्धा इंग्रजी येते म्हणजे येतेच!
तेव्हा आपण मराठी माणसे इंग्रजीत काही कमी नाहीत, हे आपोआपच सिद्ध होते. त्यासाठी काही तुम्हांस महामहीम दिलीप पाडगावकर किंवा राजदीप सर्देसाय किंवा शोभा डे किंवा शांताबाई गोखले यांजकडे जाण्याची गरज नाही. किंबहुना मि. बिलिफ गॉडकर (पक्षी ः रा. रा. विश्वास देवकर) यांच्याकडेही जाण्याची गरज नाही. (खरे तर त्यांच्याकडे जाऊच नये! उगाच मोकळ्या केसात त्यांच्या का जीवाला गुंतवावे? आम्हांस तर त्यांच्याकडे गेले, की अगदी तल्लफच येते विचारण्याची, की आपके लंबे-घने बालों का राज क्या है? पण आम्हांस तेवढे पक्के इंग्रजी येत नाही ना त्यांच्यासारखे! खरे तर मिस्टर गॉडकर साम मराठीचे काम इंग्रजीत पाहात असताना, ती वाहिनी अजूनही (आहे, साम सुरू आहे!... साम सुरू, प्रोग्रामिंग बंद असे काहीसे तेथे चालू असल्याचे समजते.) मराठीत कशी निघते याचेच आम्हांस सखेदाश्चर्य वाटते!)
आता मराठी पत्रकारांना येवढे प्रचंड इंग्रजी येत असताना, आमच्या मनी प्रश्न असा उभा राहतो, की मग मराठी लोकांनी काढलेली, चालविलेली इंग्रजी पत्रे का बरे चालत नाहीत?
आम्हांस ठाऊक आहे, की यावर नागपुरातून व पुण्यातून तीव्र आक्षेप येतील व विचारले जाईल, की नागपुरात लोटा आणि पुण्यात सटा निघतो हे आपणांस ठावे नाही काय? पण ते काय निघणे झाले? गेल्या गणपतीत पुण्यात जाऊन आलो. तेव्हा बहुउत्सुकतेने सटा हाती घेऊन पाहिला. इंग्रजीतला केसरी वाटला!! (वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांच्या माहितीसाठी - केसरी अद्याप निघतो बरे का!... आपल्या नवशक्तीप्रमाणे!!) एकंदर काय, तर मराठी लोकांनी काढलेली इंग्रजी पत्रे काही चालत नाहीत. किंबहुना बंदच पडतात. मुंबईत तर अगदी रा. रा. नानासाहेब परुळेकरांपासून ही परंपरा आहे!
...आणि नाही म्हटले, तरी आपण मराठी माणसे धादांत परंपराप्रियच! (मराठीचा मुद्दासुद्धा आपण साठ वर्षांच्या परंपरेनेच लावून धरलेला आहे!) त्यामुळे परंपराभंगाचे पातक आपण कसे करणार! राप्र महामंडळाचे रा. रा. नारायणराव राणे यांच्या युवा या इंग्रजी पत्रानेही ही परंपरा टिकविली आहे! (त्याबद्दल राप्र महामंडळाचे अभिनंदन करावे काय? जाऊ दे... रा. रा. रोखठोक राऊत बाळासाहेबांनी लिहिलेल्या अग्रलेखातून आज ना उद्या त्यांचे अभिनंदन करतीलच!!) तर सांगण्याचा मु्द्दा असा, की युवा या इंग्रजी पत्रास टाळे ठोकण्यात आले असून, तेथील काहींचे पुनर्वसन प्रहारपत्री करण्यात आले आहे, तर अनेकांस खास कोंकणी नारळ देऊन विस्थापित करण्यात आले आहे!
आता तुम्ही विचाराल, की युवा का बरे बंद पडला? (खरे तर हा काय प्रश्न आहे? बाजरीची भाकरी आणि भेंडीची भाजी अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये बांधून दिली म्हणून काय त्याला कोणी डॉमिनोज पिझ्झा म्हणेल?) परंतु रीतीनुसार अशा प्रश्नांची तीन कारणे सांगावीच लागतात. तर ती अशी -
एक. चालत नव्हता!
दोन. नारायणाची इच्छा!
आणि
तीन. त्याचे नाव!
हे क्रमांक तीनचे कारण अतिशय महत्त्वाचे आहे. शेक्सपियर काहीही म्हणो. पण काही काही नावे अशी असतात, की ती नाहीच चालत! युवा हे त्यातलेच एक नाव. काही वर्षांपूर्वी युवा सकाळ नावाचे एक पत्र बाजारात आले होते. त्याचाही असाच अपमृत्यु झाला! युवा, तरूण या नावातच अंशतः समस्या असावी! म्हणजे बघा ना, तरूण भारतची आजची अवस्था! मुंबई तरूण भारत तर केव्हाच चचला! आता म्हणे तो केवळ तेथील पत्रकारांच्याच लक्षात आहे. एकदा प्रॉव्हिडंट फंडाचे सगळे पैसे मिळाले, की मग तेही त्यास विसरतील!! असो.
तर सांगण्याची गोष्ट अशी, की आपणा मराठी लोकांना इंग्रजी पत्र ध़ड चालवता येत नाही, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले.
युवा पत्र बंद पडले.
युवा गेला, प्रहार झाला!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ११.१०.०८)
सकाळी साडेनवाच्या सुमारास उठलो. चादरीची घडी घालून चटई गुंडाळीतच होतो, तोच आठवले, की आज दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा... म्हणजे आज राप्र महामंडळाचे (पक्षी - राणे प्रकाशन आणि आल्हाद, मुकेश, सुरेंद्र, राहूल, शैलेंद्र आणि मंडळ) नवेकोरेकरकरीत पत्र जे प्रहार ते डेपोडेपोंतून, स्टॉलस्टॉलवरूनी अवतरणार आहे.
याचे स्मरण झाल्याबरोबर नाईट पायजम्याच्या खिशातून एक डॉलर काढून चिरंजीवास विज्ञापिले, की आपणास फारसा त्रास होणार नसेल, तर प्रहारचा अंक आम्हांस आणून देण्याची कृपा कराल काय? (हल्ली त्याच्याशी बोलताना आम्हांस आम्ही स्वतःच्या भाड्याच्या घरातच परप्रांतीय असल्याचा भास होतो! काही बोलायला गेलो, की तो राजसाहेबांच्या भाषणाचा रिंगटोन लावतो!!) तर त्यावर चिरंजिव खेकसले, एक डॉलर काय देताय? प्रहार म्हणजे काय स्कीममधला सकाळ वा लोकमत आहे काय? त्याचे घोषवाक्य माहिताय का काय आहे ते? आमचे जीके पहिल्यापासून उपसंपादकांइतके! तेव्हा तोच म्हणाला, अहो, जसे लोकसत्ताचे लोकमान्य लोकशक्ती, मटाचे पत्र नव्हे मित्र, सकाळचे कुटुंबातील सर्वांसाठी, तसे प्रहारचे स्लोगन काय आहे माहिताय? पेपर नव्हे चॉपर!! हे ऐकून आम्ही हादरलोच. स्लोगन असे तर पत्र कसे असेल?
पण तब्बल दोन रुपये मोजून घेतलेला प्रहार पाहिला आणि आमुचा जीव भांड्यात पडला!
हे वृत्तपत्र म्हणजे अगदीच वृत्तपत्र होते!
खरे तर हा दिवाळी अंकाचा वृत्तपत्रीय अविष्कारच म्हणावयास हवा! आयुष्यातले सीमोल्लंघन, मुंबईने मला काय दिले?, दहा वर्षांनंतरची मुंबई असे परिसंवादी विषय म्हटल्यावर हा पेपर नव्हे पुरवणी असाच भ्रम कुणासही होईल!!
परंतु कोणत्याही दैनिकाचा पहिला अंक असाच असतो. शुभेच्छांकित. गोडगोड. प्रहार तरी त्यास अपवाद कसा असेल?
मात्र एक मान्य करावयास हवे, की गरीबांचा गार्सिया म्हणून ज्यांचे नाव आज समस्त पत्रसृष्टीत गाजते आहे त्या रा. रा. प्रदीप म्हापसेकरांनी अंक छान सजविला आहे. टंक चांगला आहे. मांडणी चांगली आहे.
कन्टेन्टचे म्हणाल, तर मुख्य बातमी रा. रा. उद्धव ठाकरे यांना ठोकणारी आहे म्हटल्यावर त्यात सारे आलेच. विलासरावांवर वृत्त, वृत्तांत, लेख, स्फुट असे काही स्फुटनिक सोडले असते, तर आणखी मौज आली असती. परंतु ते काय, आता होतच राहील!
नामदार सल्लागार संपादक नारायणराव राणे यांचे स-सही मनोगत प्रहारच्या मुखपृष्ठी 'हा प्रहार आपल्यासाठीच!' या शीर्षकाने प्रसिद्धीस पावले आहे. त्यात त्यांनी हे पत्र काढण्यामागील आपल्या प्रेरणा विषद केल्या आहेत. तो समग्र लेख वाचून आम्ही भारावलोच. या एका लेखाच्या प्रहाराने रा. रा. राणे यांनी आपल्या तमाम टीकाकारांची पेकाटे मोडली आहेत. या लेखातून रा. रा. राणे यांनी दाखवून दिले आहे, की लेख-बिख काय, आपण ते लिहू शकतो!
(रा. रा. राणे यांचा हा लेख वाचल्यानंतर आमच्या मनीं वेगळेच भय उत्पन्न झाले आहे. एकीकडे चार वाक्ये सरळ लिहिता न येणा-या (म्हणजे यूसलेस! बरोबर ना, अभिजीतराव?) संपादकांची संख्या वाढत चालली असताना, दुसरीकडे आमचे राजकारणी मात्र थेट अग्रलेखच लिहू लागले आहेत, जसे की म. म. शरदराव पवार, म. म. नारायण राणे. ही काही योग्य लक्षणे नाहीत!! याचा अर्थ एकच, की पत्रकारिता क्षेत्रापुरती तरी प्रौढशिक्षण मोहिम राबविण्याची नितांत आवश्यकता आहे!! असो.)
रा. रा. राणे यांना फाईली वाचण्याचा आणि त्यावर सही करण्याचा काय तो अनुभव! त्यांच्याकडे कसली आली संपादकपदाची पात्रता असे अनेकांना वाटत होते. (अजूनही वाटते. वास्तविक असे वाटण्याचे काहीच कारण नाही. फाईली वाचता येणे, रिपोर्ट तयार करता येणे, नोटिसा काढता येणे येवढी(च) पात्रताही आजकाल पुरेशी ठरते!) परंतु रा. रा. राणे यांनी या लेखातून स्पष्ट केले आहे, की आज त्यांच्यामध्ये वृत्तपत्र काढण्याची क्षमता, ते चालवण्याची पात्रता आणि लिहिण्याची गुणवत्ता आहे! आणि त्याचे सर्व श्रेय मा. हिंहुस बाळासाहेब ठाकरे यांचे आहे! याचा अर्थ स्पष्ट आहे, की राणे हे पत्रकारीतेच्या ठाकरे स्कूलचे विद्यार्थी आहेत! कोणत्या वृत्तपत्रास प्रहारचा सामना करावा लागणार आहे हे यातून लक्षात येतेय ना?
एकंदर आमची कोणाशीही स्पर्धा नाही, असे रा. रा. राणे, रा. रा. गोडबोले यांनी कितीही गोडीत सांगितले असले, तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार हा प्रश्नच आहे. (रा. रा. राणे यांच्या या आश्वासनामुळे मुंबई सकाळ आणि लोकमतला मात्र चांगलाच दिलासा मिळाला असणार. प्रहारची काळजी करण्याचे आपणांस काही कारण नाही, असे खास बैठका घेऊन ते सांगत होते म्हणे! आकाशातला बाप्पा, त्यांची निद्रा अशीच अबाधित ठेवो!!)
प्रहारपत्राचे असे मनोमनीं वरकड परिशिलन करून आम्ही आज बातम्यांसाठी लोकसत्ता, मटा, लोकमतादी वृत्तपत्रे हाती घेतली. उद्याचे काय, ते उद्या पाहू.
तोवर प्रहारचे सल्लागार संपादक नारायणराव राणे, संपादक आल्हाद वासुदेव गोडबोले, निवासी संपादक मुकेश माचकर आणि तमाम राप्र महामंडळास विजयादशमीच्या शुभेच्छा.
प्रहार हे खरे वृत्तपत्र होवो, ही सद् ईच्छा!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ०९.१०.०८)
कोण म्हणतो बापू कान्ट डान्स साला?
बापू आज नाचनाचनाचतो आहे...
प्रभूदेवाचं वारं अंगात आल्यासारखं करतो आहे. पतंगाचा मांजा खेचतो आहे. मधेच थिरकतो आहे, मुरकतो आहे, लचकतो आहे...
बांदेकरभावोजींच्या दांडियात लोक कसे वरातीतल्यासारखे नाचतात, तसा नाचतो आहे.
कुणाला दिसणार नाही ते. कारण तो मनातल्या मनात नाचतो आहे! पण बापू नाचतो आहे!!
आता तुम्ही विचाराल, की बापूसारख्या धादांत किरकि-याने नृत्य करावे असे काय बरे घडले आहे?
तसे गेल्या काही दिवसांत बरेच काही घडले आहे.
उदाहरणार्थ लोकसत्तासारख्या गंभीर वृत्तपत्रानेही मस्त बापूगिरी सुरू केली आहे. (संदर्भासाठी पाहा अथवा वाचा - रंगा रावकृत वा-यावरची वरात. हे रंगा राव म्हणजे तंबी दुराई यांचे कोन, याचे उत्तर क्लोन असे आहे, असे म्हणतात. बोजेवारांकडे पृच्छा करावी का?)
उदाहरणार्थ भरतखंडातल्या तमाम वृत्तवाहिन्यांनी स्वतःच स्वतःचा काटा मोडला आहे! अर्थात स्टिंग कारवायांवर निर्बंध घालण्याचे ठरवले आहे. (पण याने काय होणार? आम्ही काही झालं तरी बातम्याच दाखवू अशी रामारक्ताची शपथ या वृत्तवाहिन्या घेतील, तेव्हा खरं!!)
उदाहरणार्थ सध्याच्या आर्थिक-राजकीय-सामाजिक उलथापलाथीच्या काळातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न जो 'आजचा रंग कोणता?' त्याचे समग्र व सचित्र उत्तर देऊन महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला उत्तेजन देण्याचे धोरण महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्रागतिक वृत्तपत्राने स्वीकारले आहे. (या धोरणामुळे विदर्भातील कापूसउत्पादक शेतकरी आत्महत्यांपासून परावृत्त होत असल्याच्या बातम्या अद्याप कशा बरे आल्या नाहीत? आम्ही त्यांची राह देखून राहिलो आहोत बाप्पा!)
झालेच तर, उदाहरणार्थ तिकडे पुण्यपत्तनी पत्रकारांच्या मेळाव्यात पत्रकारांच्या मनोरंजनार्थ पवार-मुंडे-राणे यांचा लाफ्टर शोसुद्धा झाला. (पत्रकारे खूप हसली म्हणे तेव्हा!)
मनोरंजनावरून आठवले.
सकाळ वृत्तपत्रसमुहाने आपले एक नवे धाडसी प्रॉडक्ट जे प्रीमियर, ते बाजारात लॉंच केले आहे.
[आता तुम्ही विचाराल, की प्रीमियर हे काय आहे? तर हे एक अत्यंत वेगळे फिल्मी मासिक आहे. (सकाळचे सारेच वेगळे! जशी की साम मराठी ही वाहिनी! तिच्या वेगळेपणाच्या संपादकीय जाहिराती वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्यांच्या लक्षात असतीलच!) चित्रपट-दूरचित्रवाणी-नभोवाणी या माध्यमांबद्दल लोकांना आजकाल काही म्हणता काही माहिती मिळत नाही. ती निदान महिन्याच्या उशीराने का होईना मिळावी व वाचकांस नवे कोणते चित्रपट येत आहेत व त्यात कोण-कोण काम करीत आहे व मालिकांच्या पुढच्या भागात काय होणार आहे, तसेच कलाकारांची प्रश्नोत्तरी व गॉसिपे हे अवघे ज्ञान महिनाभराने मिळावे या अत्यंत उदात्त विचाराने सकाळने हा कौटुंबिक मासिक प्रपंच सुरू केला आहे. या मासिकामुळे लवकरच तमाम वृत्तवाहिन्यांवरील चित्रपटविषयक दैनंदिन कार्यक्रम व चित्रपटविषयक वाहिन्या बंद पडणार ही काळ्या दगडावरची रेघ! फार काय, 'स्क्रीन'च्या अनुभवसंपन्न संपादिकेनेही याचा धसका घेतला आहे म्हणे! (लोक अतिथी संपादक म्हणून हिरो-हिरॉईन आणतात. स्क्रीनचे मात्र वेगळेच बाबा! असो.)]
पुन्हा येत्या काळात नेकनामदार-संपादक नारायणराव राणे यांचा प्रहार पत्र मराठी वृत्तपत्रसृष्टीत दाखल व्हताहां. (प्रहारच्या प्रकाशनाक रा. रा. शरश्चंद्रजी पवार यांका खास आवताण आणि प्रहारमधी मात्र सकाळच्या पत्रकारांका बंदी, ह्यां काय गौडबंगाल हा त्या आमका काय कळना नाय!)
तर असे अवघे घडत असल्यामुळे तर बापू नृत्यरंगी रंगला आहे की काय, असे तुम्हांस वाटणे साहजिकच आहे.
पण माय ब्रदर्स अँड सिस्टर्स,
आम्ही नाचतो आहोत, ते आम्हांस कुरुपातील सौंदर्याचा बोध झाल्याने.
कुरुप आयोगाने आमच्या कमवेतन आयुष्यात सौंदर्याचे घट रिते केल्याने.
कुरूप आयोगाच्या शिफारशींमुळे आमच्या वेतनचिठ्ठीत तब्बल तीस टक्के अंतरिम वाढ होणार असल्याने.
पगार वाढतोय आमचा! आहात कुठे!!
गरिबी के दिन बिते रे भैया अब सुख आयो रे....
तेव्हा नाचो रे नाचो....
ते पाहा, ते पाहा
सगळी वेतन बोर्डावरची मोजकी पत्रकारे कशी नाचताहेत.
पण एक सांगू?
आता आम्हांस नाही वाटत, की हा बोर्ड फार काळ टिकेल.
अनेकांचे कंत्राटीकरण झालेच आहे. उरलेल्यांचेही आता पटकन होईल.
एकदा समस्त वृत्तसृष्टीचे कंत्राटीकरण झाले, की मग आमुचे तमाम व्यवस्थापकीय संपादक-संचालक जे की मालकच असतील, ते जगभरातील शोषितांच्या नावे अग्रलेख लिहिण्यास मोकळे!!
तोवर आम्ही नाचतोच आहोत... शक्यतो तुम्हीही नाचा.
(Posted by - बापू अत्रंगे, दि. ०४.१०.०८)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

