वाचकांतील तमाम सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
आज आपणांसमोर आम्ही जे काही दोन शब्द लिहिणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने वाचून घ्याल अशी अपेक्षा आहे. आज आमच्या लिखाणाचा विषय मुंबईतील सकाळनामक विश्वासार्ह वृत्तपत्र व त्यास ग्रासू पाहणारा बौद्धिक राजयक्ष्मा असा आहे.
आता येथे तुम्ही असे म्हणाल, की महामहीम प्राचार्य शिवाजीराव भोसले हे जसे त्याच त्या विषयांवर युगानुयुगे तेच ते बोलत असतात, राजमान्य राजेश्री कुमार केतकर जसे आपल्या पंज्यात सतत विळा-हातोडा घेऊन डाव्यांना तासत व ठोकत असतात, तसेच आम्ही सतत व नेहमी नाकासमोर चालणा-या कुटुंबवत्सल मध्यमवर्गीय पोस्टमास्तरसारखे जे सकाळ पत्र त्यास का बरे चिमटे काढीत असतो? वास्तविक वाचकांतील सूज्ञांच्या हे लक्षात आलेच असेल, की आम्ही कोणत्याही पत्राचे वा च्यानेलचे पक्षपाती नाही. ज्या प्रमाणे (अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राजकीय विश्लेषक, चित्रपट समीक्षक, नागरी प्रश्नांचे अभ्यासक, साहित्याचे जाणकार वगैरे वगैरे जे) रा. रा. हेमंत देसाई यांस सगळेच विषय सारखे, त्याचप्रमाणे आम्हांस सर्वच पत्रे व च्यानेले सारखीच!
असे असताना आज आम्ही पुनः सकाळकडे वळत आहोत, याचे एकमेव कारण म्हणजे आजच्या सकाळपत्राच्या मुंबई टुडे नामक पत्रावळीतील एक अतिथोर वृत्त. या चार पानी पुरवणीतील तिस-या पानावर छापून आलेले हे वृत्त वाचून आम्हांस आज पहिल्यांदा आपणास वाचता येते याचा थोर पश्चाताप झालेला आहे! (एरवीही सकाळच्या वाचनाने सहसा ही भावना अनावर होते हा सर्वत्रांचा अनुभव आहे! परंतु ते असो!) प्रथम तर आम्हांस असे वाटले, की उठावे आणि ते तिसरे पान बंबात घालावे. परंतु सौभाग्यवती आतूनच खेकसल्या, की तसे करू नका. बंब विझेल! सकाळ आहे तो!! तेव्हा तो आजकालचा रूढ झालेला विचार आम्ही सोडून दिला. (परंतु तद् योगे म.म. खोमेनी ते म.म. विनायक मेटे यांच्या पंक्तीत बसण्याचा योग आमच्या हातून गेला!!)
आता नमनास येवढे तेल घातल्यानंतर आपण त्या वृत्ताकडे वळू या. ते संपूर्ण वृत्त येथे उद् धृत करण्याचा आमचा विचार होता. परंतु नंतर ध्यानी आले, की सगळी बातमीच लिहून काढण्यास हा सकाळचा अग्रलेख नाही!! ते वृत्तही तितुके महत्त्वाचे नाही. परंतु त्यात अकलेचे जे काही षटकार आणि चौकार ठोकलेले आहेत, की यंव रे यंव!
त्या वृत्तात चक्क रत्नाकर मतकरी यांचे निधन झाल्याचे म्हटलेले आहे!!
रा. रा. रत्नाकर मतकरी (आकाशातला प्रभू त्यांस दीर्घायुष्य देवो! आमेन!!) हे कोणी नत्थु खैरे नाहीत. ते मराठीतील एक जानेमाने साहित्यिक आहेत. सामाजिक बांधिलकी मानणारे, त्यासाठी चळवळी करणारे व म्हणून दुर्मिळ असे मराठी लेखक आहेत. मराठी वृत्तपत्रांत खर्डेघाशी करणा-या तमाम बोरूबहाद्दरांना त्यांचे किमान नाव माहित असावे, अशी अपेक्षा कोणी धरली, तर ती घोडचूकच काय, साधी टेकसचूकही ठरू नये! ते आजही कार्यरत आहेत, एवढे सामान्य ज्ञान मराठी उपसंपादकांस असावे, ही अपेक्षाही काही फार मोठी नाही. परंतु तरीही मुंबई सकाळमध्ये त्यांचे निधन झाल्याचे छापून आले आहे. बरे ती मुद्राराक्षसाची चूक म्हणावी, स्लीप ऑफ पेन म्हणावे, तर तसेही नाही. कारण की ती संपूर्ण बातमी त्याच अंगाने लिहिलेली आहे. याचा अर्थ ज्याने कोणी ती बातमी लिहिली, ज्याने कोणी ती संपादित केली त्यांच्या अकलेच्या इंद्रियाची तपासणी होणे गरजेचे आहे!
ही तपासणीची गरज जेव्हा आम्ही आमुच्या एका सकाळवासी सन्मित्रास बोलून दाखविली, तेव्हा तो जे म्हणाला ते मोठे मार्मिक होते! तो म्हणाला, की त्याची काही एक आवश्यकता नाही! कारण की येवढ्या पैशात (पक्षी - वेतनात) येवढीच अक्कल येते. ती अधिक हवी असेल, तर सकाळनेच नव्हे, तर तमाम मराठी पत्रांनी येथून पुढे अकलेनुसार दाम मोजण्याची तयारी करावी! अन्यथा आज सकाळमध्ये जो आजार दिसतोय, त्याचा संसर्ग सर्वत्रांस होण्यास वेळ लागणार नाही.
हे गंभीर आहे!
खूप खूप गंभीर आहे!
मुंबई सकाळमध्ये आता यावर रीतसर खुलासा प्रसिद्ध होईल. (म्हणजे आम्हांला बुवा तसे वाटते!) परंतु त्या खुलाश्याने मतकरी यांच्या कुटुंबीयांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कशी होणार? शिवाय मुंबई सकाळची थेंबाने गेली ती हौदाने कशी भरून येणार?
प्रश्नच आहे.
पुन्हा एकदा रा. रा. रत्नाकर मतकरी आणि मुंबई सकाळ यांस उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करून आम्ही आमचे हे लेखन थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. २४.०९.०८)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
गोष्ट खाजगी व गुप्त व गोपनीय आहे. कोणास समजल्यास आमचा अत्राम झाल्याशिवाय राहणार नाही! हातकड्याच पडतील! तेव्हा कृपया कोणास सांगू नका! (ज्यांना अशा प्रत्येक गोष्टी संपादकांच्या कानावर घातल्याशिवाय आपली पत्रकारिता सार्थकी लागल्याचे समाधान लाभत नाही, त्या काडीकर्त्यांनी कृपया संपादकांच्या केबिनमध्ये शिरण्यापूर्वी आमची लेखी वा तोंडी परवानगी घ्यावी, ही विनंती!!)
तर मित्रहो, आमच्या हाती एक अत्यंत स्फोटक असा पेपर (पुढारी नव्हे! तसले फोटो छापल्याने पेपर काय लगेच स्फोटक होतो की काय? काय तरीच गा तुमचं!) लागलेला आहे. हा पेपर म्हणजे एक प्रश्नपत्रिका आहे!
ही प्रश्नपत्रिका आमच्या हाती कशी आली, त्यात कसले प्रश्न आहेत, असे सवाल, प्रहारमध्ये आपल्याकडचं कोणकोण चाललंय, आज मटामध्ये कोणकोण जाऊन आलं, या गहन प्रश्नांप्रमाणेच तुमच्या मनी नक्कीच रूंजी घालत असतील. परंतु त्याचे उत्तर देण्यापूर्वी या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी तुम्हांस सांगतो. (रा. रा. कुमार केतकरांचे लेख नेहमी वाचल्याचा हा परिणाम! हल्ली आम्ही काहीही बोलायला लागलो, की सुरवात करतो ते भूतकाळातूनच!! मग निम्म्यावर चालू वर्तमानात येतो आणि शेवटी भविष्याचा वेध घेतो!!)
तर त्याचे असे झाले, की परवा एल्फिन्स्टनच्या पुलावरून पायी चाललो होतो. (गैरसमज नसावा. इंडिया बुल्स कंपाऊंड कोठे आहे, हेही आम्हास ठावके नाही!) जाता जाता क्षुधाशांतीकरीता एका चणेशिंगदाण्यावाल्याकडून बंद्या रूपयाचे शिंगदाणे घेतले. (खिसे अवर्षणप्रवण असताना शिंग इज किंग! येरवी आपण जंबो वडापावशिवाय अन्य काही खात नाही!! स्साला, आखीर एवढे पैसे काय शेवटी वर घेऊन जायचेत!!) तेथेच पदपथावर उभे राहून सगळे शिंगदाणे तळहाती ओतले. दोन्ही हातांनी ते हळुवार चोळले. मग त्यांवर हळूवार फुंकर मारली. सगळी सालपटे उडाल्यावर ते स्वच्छ-सुंदर शेंगदाणे पुन्हा कागदी नळीत शिस्तीत ठेवले आणि मग एकेक दाणा तोंडात टाकत आम्ही परळ स्थानकाच्या दिशेने निघालो. फलाटावर येईपर्यंत सगळे दाणे संपले होते आणि हाती फक्त ती कागदाची नळकांडी राहिली होती. इंडिकेटरमध्ये पाहिले. ठाणा लोकलला तब्बल २० मिनिटे होती. तेव्हा सहजच हातातील ती नळकांडी उलगडून वाचू लागलो. आणि काय सांगू, केवढ्यांदा दचकलो आम्ही!
एल्फिन्स्टनच्या ब्रीजवर मिळालेल्या त्या कागदावर चक्क एक प्रश्नपत्रिका छापलेली होती. 'चीफसब, सहसंपादक व कार्यकारी संपादक पदासाठी' असे त्यावर स्पष्ट लिहिलेले होते. तारीख पाहिली तर ती उद्याची होती. म्हणजे, एक दिवस आधीच आमच्या हाती हा पेपर लागलेला!
खरे तर आम्ही तो पेपर तेथेच फेकून देणार होतो. परंतु मग शांत चित्ताने व दोन्ही मेंदूंनी विचार केल्यावर आम्हांस असे सुचले, की का न जनहितार्थ आपण हा पेपर प्रसिद्ध करावा? आपल्या वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांतील जे कोणी परीक्षार्थी असतील त्यांना त्याचा लाभच होईल. तेव्हा गड्यांनो, तुम्हांस राम रक्ताची शप्पथ आहे. (सुटली!!) हे कोणास सांगू नका! प्रश्न वाचा. चार जाणत्या माणसांकडून उत्तरे लिहून घ्या. आणि उत्तीर्ण व्हा!
तर गुपचूप सादर करीत आहे त्या प्रश्नपत्रिकेतील काही महत्त्वाचे प्रश्न -
१. भारताचे पंतप्रधान कोण?
२. महाराष्ट्रातील चार वृत्तपत्र मालकांची नावे सांगा.
३. शोधपत्रकारिता म्हणजे काय? तिचा वापर करून आपण सध्या काम करीत असलेल्या वृत्तपत्राच्या खपाचे खरे आकडे शोधून लिहा.
४. एक ते वीसपर्यंतचे आकडे अंकात लिहून दाखवा.
५. बक्षीस योजनांमुळे अंकाचा खप वाढल्यास त्याचे बक्षीस नेमके कोणास द्यावे?
६. प्रहारच्या संपादकांचे उपनाम गोडबोले असेल, तर दैनिक सुसंवाद, साप्ताहिक मांडवली यांसारख्या नियतकालिकांच्या संपादकांचे उपनाम काय असावे?
७. सह्याद्रीवरील साडेनऊच्या बातम्यांचे आमंत्रण येण्यासाठी त्या वाहिनीवरील किती व कोणत्या कार्यक्रमांच्या बातम्या दरमहा प्रसिद्ध कराव्या लागतात?
८. रा. रा. हेमंत देसाई लिहू शकत नाहीत, असा किमान एक विषय सांगा.
९. 'मी माझा'चे लेखक कोण? चंद्रशेखर गोखले की 'मि'खिल वागळे?
१०. सकाळच्या अग्रलेखाचे मराठीत भाषांतर करा.
११. श्रावण क्विन स्पर्धेनंतर मटा भाद्रपदात भादवा किंग स्पर्धा घेणार आहे, हे खरे आहे काय?
१२. आपण अलीकडे वाचलेल्या पुस्तकाचे नाव लिहा. (कालमर्यादा - पाच वर्षे. तत्पूर्वी वाचलेले पुस्तक ग्राह्य धरले जाणार नाही. पुस्तकामध्ये आरतीसंग्रहाचा समावेश नसावा.)
१३. नवशिके पत्रकार आणि संपादक यांचे वेतन एकाच पातळीवर आणून सकाळने समाजवादी क्रांती केली आहे. संदर्भासह स्पष्टिकरण द्या.
१४. एकाच वाहिनीसाठी किमान किती सल्लागार असावेत? रा. रा. राजू परूळेकर व रा. रा. संजीवकुमार लाटकर यांच्या मुलाखती घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहा.
१५. पुढील व्यक्तींचे श्राद्ध आपण आपल्या वृत्तपत्रातून कसे घालत आहात? सविस्तर लिहा. - बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर. (सकाळमधील पत्रकारांसाठी पर्याय - नानासाहेब परूळेकर).
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
आपणांसही आपल्याकडील चणेशेंगदाण्याच्या पुडीत असे काही प्रश्न आढळल्यास जरूर कळविणे.
(Posted by चांगदेव पाटील, दि. १ सप्टें. २००८)
मागील लेख
-
►
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
The Economic Times and ET NOW Code of Conduct - *Introduction:* What We Stand For As a brand, The Economic Times / ET Now (hereinafter referred to as ET) draws its power and influence from two things: 1...4 months ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

