बने बने, तू कोणताही हट्ट कर. पण हा वृत्तपत्रांच्या कचे-या पाहण्याचा हट्ट नको! का नको म्हणजे? अगं सध्याचं वातावरण कसं आहे... आगमन-निर्गमनाचं! परवा करंदीकरांचा उमेश सहज बेलापुरी जाऊन आला, तर केवढी बोंब झाली! चव्हाणांचा जयंत अप्पा पानवलकरांच्या नुसत्या प्रकृतीची चौकशी करून आला, तर किती अफवा पसरल्या! अशा वेळी तुला भिन्न भिन्न पत्रांची कार्यालये दाखवत फिरलो, तर माझ्या नावाची केवढी बोंबाबोंब होईल. त्या प्रहार आणि महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीच्या दिशेने तर मी सध्या पाहणारसुद्धा नाही! का म्हणजे? बने गद्धे, पत्रकारीतेचा कोर्स करून येवढी मोठी घोडी झालीस, तरी तुला समजत कसं नाही? अगं, या एक तारखेला मटामध्ये मुलाखती आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे पत्रकार तेथे जमा होणार. अशावेळी आपण तिथं असू नये. आणि प्रहारची तर काय भर्ती मोहिमच सुरू आहे. मला तर असं समजलंय, की ते म्हणे लवकरच महालक्ष्मी रेसकोर्सचं मैदान भाड्याने घेणार आहेत.. पत्रकार भर्तीसाठी!....

काय म्हणालीस बने? या दोन सोडून अन्य पत्रांच्या कचे-यांत जावयाचे? ठीक आहे बने!! तू आता अडेलतट्टू वृत्तसंपादकासारखे वागायचेच ठरविले असेल, तर मी बिचारा बातमीदार काय करणार? चल. आपण प्रथम पत्रनगरी नवी मुंबैला जाऊ.... काय म्हणालीस? पत्रनगरी म्हणजे क्काय? किती गं हा अज्ञान-अंध:कार बने! उपसंपादक कुठची!! अगं, तमाम पत्रमालकांनी काही वर्षांपूर्वी दूरदृष्टीने नवी मुंबैतले भूखंड स्वस्तात मिळविले होते. त्यामुळे त्या शहरास आज पत्रनगरीची (अव)कळा आली आहे. बघ ना, एकट्या सानपाड्यात पुढारी, गावकरी, लोकमतची कार्यालये आहेत. झालेच तर नवभारत आणि सामनाचा छापखाना आहे. तिकडं महापे परिसरात लोकसत्ताचे कार्यालय आणि छापखाना आहे. तेथेच नजीक अख्खी टाइम्स सिटी आहे. पुढं पारसिक टेकडीखाली बेलापुरात सकाळचं भलं मोठं भवन आहे. बने चल, आपण सानपाड्यातून सुरूवात करू. त्या भागात टाइम्सचे, सकाळचे काही पत्रकार राहतात. लोकमतचे तर का.सं. राहतात. त्यांना तेवढं चुकवायलं हवं!

बने, हे बघ वाशीचा खाडी पूल ओलांडून सानपाड्यात आलं, की पहिल्यांदाच दिसते ती पुढारीची टोलेजंग इमारत. पण अद्याप पुढारी मुंबईत यायचाय. येतो येतो म्हणून येत नाही त्यालाच तर पुढारी म्हणतात ना! तेव्हा तिथं काही पाहण्यासारखं नाही. त्या इमारतीत म्हणे सध्या काही कुटुंबं राहतात. या इमारतीच्या मागे रेल्वे लाईनला खेटूनच सामनाचा छापखाना आहे. तेथे रात्रीचीच जाग असते. तेथून सरळ पुढं गेलं, की मुंबई-पनवेल महामार्गावर लोकमतची बिल्डिंग आहे. काय म्हणालीस? आतून पाहायची ती इमारत? चल, पण बने, आता एवढ्या सकाळी तिथं अँग्री यंग का. सं. विवेक गिरधारी यांच्याशिवाय कोणीच नसेल गं! काय म्हणालीस? किती काम करतात गिरधारी!! हे बरीक खरं हं! तिथं म्हणे ते एकटेच काम करतात! बाकी कुणाचं काम पटतच नाही त्यांना!! त्यांनी लोकमतचा लेऔट किती छान केलाय नाही!! काय म्हणालीस बने? होय गं. ते लिहितातसुद्धा वेळ मिळेल तेव्हा!! आतासुद्धा कदाचित ते लिहितच असतील किंवा पान लावीत असतील. तेव्हा त्यांना डिस्टर्ब करायला नको. त्यापेक्षा तुला गावकरीचं कार्यालय दाखवतो. लोकसत्तेचं नको! महाप्याला जायचं म्हणजे केवढा त्रास! अगं, तो त्रास नको, म्हणून तर आपले सुधीरकक्का जोगळेकर चक्क त्रासून अमेरिकेला गेले!! त्या पेक्षा गडे आपला गावकरी बरा!!

हा बघ बने, हा पाम बीच रोड बरे का! याला खेटूनच ती इमारत दिसतेय ना बुटकीशी... ती गावकरीची! पण नाशिकची मजा इथं नाही बने! या इमारतीला दुरूनच नमस्कार करू या. कारण की आता मुंबईतल्या गावकरीत पाहण्यासारखं काहीच नसतं! सगळंच गावखातं!! तेव्हा बने आपण याच रस्त्याने असेच पुढं जाऊ. मग आपल्याला बेलापूर लागेल. तिथं रात्रीसुद्धा सकाळ असते!

काय हे बने!! मुंटातल्या ढग्गोबाईसारखा ज्योक मारला मी! तेवढाही तुला समजेना!! बने, सावध हो, सावध हो! अशाने एक दिवशी तू नक्की बायकांच्या मराठी पुरवण्यांची संपादिका होशील!
अगं गाढवे, या बेलापूरमध्येच नाही का सकाळची कचेरी!! पण बने, आता तिला कचेरी नाही म्हणायची! आता ते कॉर्पोरेट हापिस झालंय! काय म्हणालीस? कॉर्पोरेट हापिस म्हणजे काय? चल, आपण प्रत्यक्षच पाहू या ते...

हे बघ बने. हे सकाळ भवन. पूर्वी ते असं नव्हतं. आता मात्र त्याचा पुरता जिर्णोद्धार झालाय! मुंबई सकाळ सुधारला म्हणून नाही गं! तिथं आता च्यानेलचं हापिस झालंय ना! बघ, कसं स्टुडिओतल्या सेटसारखं दिसतंय सकाळ भवन! काय म्हणालीस? हे एक्स्ट्रॉसारखे दिसताहेत ते कोण? अगं हळू बोल! ते सकाळचे बाबू पत्रकार आहेत! बिचारे, कसे कानकोंड्यासारखे वावरताहेत! या भवनाच्या दोन मजल्यांवर साम मराठी नावाच्या वाहिनीची कचेरी आणि स्टुड्यो आहे बरे बने. काय म्हणालीस? कुठे पाहिल्यासारखी वाटत नाही ही वाहिनी? आता दिसेल हो... राजसाहेबांनी लक्ष घातलंय ना त्यात! दिसेल तुमच्या केबलवर आता! पण बने, तू शप्पथ वाहा आताच्या आता, की एकदा का ही वाहिनी दिसायला लागली तर तू ती नक्की पाहशील!! अगं मराठी वाहिनी आहे ही. राजसाहेबांनी काय सांगितलं ते ऐकलं नाही का तू स्टार माझावरून? काही तरी बोलू नकोस बने. स्टार माझा हा काही मनसेचा च्यानेल नाही! आता राज ठाकरेंमुळं टीआरपी वाढतो, म्हणून चालवतात ते राज एके राज! आणि साम मराठीच्या लोगोचं म्हणशील, तर तेसुद्धा लावतील ना मराठी लोगो. अगं, आताचा हा लोगो आहे ना इंग्रजी तो चक्क अमेरिकेतून तयार करून आणलाय. आता लोगोची मराठी पाटी करायची, तर त्याला वेळ हा लागणारच ना!.... थांब थांब, बने. चावटपणा करू नकोस. लोगोची मराठी पाटी लावायला ही वाहिनी म्हणजे काय दुकान वा व्यापारी आस्थापना वाटले की काय तुला? बनेल कुठची!!

हा बघ, हा साम मराठीचा न्यूज स्टुड्यो. होय गं बये, बातम्यासुद्धा वाचून ऐकवितात या वाहिनीवरून! पण आपणांस कार्यालय पाहायचंय ना. बघ ना, कसं झॅकपॅक दिसतंय कार्यालय. सगळीकडं नुसत्या काचाच काचा. याला पारदर्शकता म्हणतात बने! हो, हो. मला माहित आहे तुला कसली घाई झालीय ते. सकाळच्या ऐतिहासिक मिटिंगा कुठं होतात हेच तुला पाहायचंय ना? अगं ती व्यवस्था तर सर्वात आधी केलेली असणार बने. ती बघ ती मिटिंगरूम. सकाळचे कर्मचारी तिला पिळखाना असेही संबोधतात!!

काय बने? दिपले ना डोळे तुझे सकाळचं हे साम्राज्य पाहून? आता सकाळ पेपर न वाचता येथून बाहेर पडू या. म्हणजे डोळ्यांवरची झॅकपॅक चव तशीच राहिल!!

बने, आता हट्ट पुरे हं. म्हणे कचेरी पाहिली आता संपादक पाहायचेत. काय वेड लागले का तुला? कुठून आणू तुला संपादक दाखवायला? अगं ऐक बने माझं. त्यापेक्षा मी तुला गुलबकावलीचं फूल आणून देतो गं. काय म्हणतेस, तुला खराखुरा संपादकच पाहायचाय? ठीक आहे, बने. मस्कापॉलिसी आता बस कर. दाखवतो तुला संपादक. पण त्यासाठी आपल्याला नरिमन पॉइंटला जावं लागेल गं. उद्या गेलो, तर चालेल ना बने? चल, उद्याच जाऊ....

(Posted by चांगदेव पाटील, ता. २९ ऑगस्ट २००८)

आमुच्या पवित्र मराठी मीडियामध्ये हल्ली एक प्रथा फार म्हणजे अतीच बोकाळली आहे. दिवस घालण्याची! आधीच आपल्याकडे पवित्र हिंदू सण प्रचंडच. पुन्हा त्या प्रत्येक सणाचे फेस्टिव्हलीकरण झालेले! एकूणच हे इतके वाढले आहे, की हंडी फोडण्याऐवजी सलामीलाच महत्त्व आलेले! जसे की दैनिकांत संपादनाऐवजी पाने लावण्यास महत्त्व आलेले! एकंदर हा आजार सार्वत्रिकच!! तर ते असो. मुद्दा असा, की एकीकडे हे असे चिवित्र चालेलेले, तर दुसरीकडे ग्रेगोरियन कॅलेंडरातला कंचाबी दिवस मोकळा जाऊ न देता तो साजरा करायचाच हा छंद आपणांस झालेला! याने कोणासही अशी शंका यावी, की उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय बवासीर दिन वा तत्सम दिनाचा लेख आपण छापला नाही, तर आपल्या पवित्र पत्रपितरांना मुक्तीच मिळणार नाही, असा काही समज तर आपुल्या संपादकांचा झालेला नाही ना?

अर्थात कोणी कोणत्या दिवसास लेखांचे पिंड पाडायचे, हा ज्या-त्या पत्राचा प्रश्न! आम्हांस त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही. आमुचे म्हणणे इतकेच, की या मुळे वृत्तपत्रांस गोदाघाटाची कळा आलेली आहे व पत्रकारांस पिंडक्या भटांची, हे दिसावयास वाईट दिसते!! तर हेही असो.

आता आमुच्यासारखा अ-संपादक, न-अधिकारी व ज्याच्या पूज्य पिताश्रींनी दूरदृष्टी दाखवून तेव्हाच एखादे दैनिक सुरू केले नाही, अशा फाल्तू मानवप्राण्याने काहीही म्हटले, तरी वृत्तपत्रे का दिवस घालण्याचे थांबवणार आहेत? आणि समजा उदाहरणार्थ सकाळने असे दिवस घालण्याचे थांबविलेच, तर मग त्यांच्या वार्षिक नियोजनाचे काय होणार? रा. रा. साबडेंचे काय होणार? सकाळचे सोडा, कारण तो सकाळ आहे!! पण लोकसत्ताची तर चंमतगच असते!! तेथे एकाच विषयाच्या बातम्या गोळा करून त्यांचे दिवस साजरे करण्याची एक आगळीच परंपरा आहे! चार अपघात झाले. झाला दिवस अपघाताचा! दोन विजय मिळाले. झाला दिवस विजयाचा! तर ते वाचून लोकसत्ताच्या संग्राहक व समन्वयवादी वृत्तीबद्दल आम्हांस मोठाच अचंबा वाटतो! आता ही वृत्ती अन्य छोट्या-छोट्या वृत्तपत्रांतही शिरली असल्याचे पाहून तर आम्हांस एकेक दिवस संपूर्ण अचंब्याचाच जातो!! असो.

पण दिवस मनविण्यात मटाइतुके पटाईत अन्य कोणी नाही, असा आमचा एक समज आहे. आमच्या तर कानी असे आले आहे, की मटामधील मटाईत यापुढे २६ ऑगस्ट हा दिवस जागतिक दिलगिरी दिन म्हणून साजरा करणार आहेत!! हे ऐकले तेव्हा आमच्या जनुकजात भोचक स्वभावामुळे आम्हांस प्रश्न पडला, की १४ फेब्रुवारी रोजी असतोच की एक जागतिक 'दिल'-गिरी दिन!! परंतु मग आमुचे सान-थोर असे दोन्ही मेंदू झिजविल्यानंतर आमुच्या असे ध्यानी आले, की ती दिल-गिरी वेगळी! ही दिलगिरी वेगळी!! येथे दिलगिरीचा अर्थ काहीसा क्षमस्वच्या अंगाने जातो!!

वास्तविक मटामध्ये अलीकडे दिलगिरी नावाचे सदरच सुरू झाले आहे की काय असे वाटावे, अशी स्थिती आहे. (पण याबाबतही मटा वेगळाच! अन्य काही पत्रांचा (सकाळसकाळी येथे आम्ही कोणाचे नाव घेणार नाही!!) तर पब्लिकची मेमरी खूपच कमी केबीची असते यावर अतोनात विश्वास!! तेव्हा दिलगिरी मागण्याचा प्रश्नच येत नाही!) असे अवघे असताना, मटामध्ये वेगळा दिलगिरी दिन साजरा करण्याचा निर्णय का बरें झाला असावा, असे वाचकांतील सभ्य स्त्री, पुरूष व अन्यांस वाटत असेल. तर त्यामागे मोठा इतिहास आहे. (आणि भूगोलही!)

एकविसाव्या शतकातील आठव्या सालातील ऑगस्ट मासाच्या २६ तारखेला असे काही घडले, की त्यामुळे मटाने हा दिवस जागतिक दिलगिरी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्या दिनांकाच्या आदल्या तारखेस वार रविवार होता. आता रविवार म्हटले, की सवयीने वृत्तपत्रे पुरवण्या काढतात व त्या नेहमीपेक्षा जादा दर लावून वाचकांस विकतात. (संपादकवगैरे, तसेच ओळखीच्या मंडळींच्या लिखाणाची सोय यात लावता येते, हे पुरवण्यांचे वैशिष्ट्य!! पृष्ठसंख्येचा विचार करता वाचकांनाही त्या परवडतात!! असो.) तर मटामध्ये सवयीने दर रविवारी संवाद नावाची एक पुरवणी काढण्यात येते.

२५ ऑगस्ट २००८, वार रविवारच्या संवाद पुरवणीत रा. रा. अशोकअप्पा पानवलकर यांचा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. या लेखामध्ये संवाद पुरवणी लावणा-या मंडळींनी भारताचा एक नकाशा छापला. नकाशा मोठा सेक्युलर होता. भगव्या रंगात हिरवा गोल असा. पण नेमका त्या नकाशाने अवघा घोळ झाला! मटाच्या हातून साधासुधा नव्हे, चक्क देशद्रोहाचा गुन्हा झाला!! आता तुम्ही विचाराल की सेक्युलर नकाशा छापणे हा का गुन्हा आहे? तो गुन्हा नाही. पण पाकिस्तानने प्रसृत केलेला भारताचा बोडका (पक्षी - आझाद काश्मीर नसलेला) नकाशा छापणे हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा मटाने केला! अनावधानाने झाला!!

आता एवढी प्रचंड चूक झाल्यावर ओघानेच दिलगिरी मागणे आले. बरे ही दिलगिरीसुद्धा साधी-सुधी नव्हे, तर पहिल्या पानावर भारताचा भारतीय नकाशा छापून व्यक्त केलेली!! तेणेप्रकारे मटाने दिलगिरी व्यक्त केली. तो ऐतिहासिक दिवस होता २५ ऑगस्टचा!!

म्हणून या दिवशी मटामध्ये जागतिक दिलगिरी दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी कुजकट अफवा आहे!! ते खरे असो वा खोटे - किंबहुना ते असत्यच आहे - पण आम्ही म्हणतो, काय हरकत आहे?
नाही, नाही. काय हरकत काय आहे?
सगळ्या वृत्तपत्रांनी मिळून एखाद्या दिवशी तमाम वाचकांकडे दिलगिरी व्यक्त करावी!!
सांगून टाकावे, की मायबाप वाचकहो, आम्ही वर्षभर पेपरात एवढ्या चुका केल्या आहेत, की आमच्यासमोर नापास होण्याशिवाय गत्यंतरच नाही!! एक तुम्ही परीक्षक आहात धृतराष्ट्राच्या वंशातले म्हणून वाचता तरी आमचा पेपर!!

(Posted by बापू अत्रंगे, चांगदेव पाटील, दि. २६ ऑगस्ट २००८)

(ता. क. - ही बातमीदारची पन्नासावी पोस्ट! करू यात का हा दिवस साजरा? जरूर कळवा. एकंदरच बातमीदारचे स्वरूप, यातील लेखांचा दर्जा(???) याबाबत तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या कॉमेन्टींच्या प्रतिक्षेत - ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई)

आनंदी आनंद गडे...
आज आनंदी आनंद झाला...
आनंदाचे डोही आनंद तरंग...

चर्चगेट स्थानकावर उतरलो आणि अचानक या पारंपरीक मोदगीतांचे अस्फुट ध्वनी आमच्या कानाच्या केसांशी चाळा करू लागले... चर्चगेटाच्या पंजाबसिंधुगुजरात आणि द्राविडउत्कलवंग पर्यावरणी ही म-हाटी हर्षगाणी? कानी तनिष्ठिका घालून जोरजोराने हलवून आम्ही खात्री केली! ध्वनीलहरी आकाशवाणीच्या इमारतीकडून नव्हे, तर चक्क अरबी सागरावरून विहरत येत होत्या? तिकडे कोणी बरे या ध्वनिमुद्रिका लावल्या असाव्यात, असा विचार करून आम्ही आमुचे सान-थोर मेंदू शिणवतच होतो, तोच डोईस साईबाबाछाप शुभ्र वस्त्र, त्याखाली थोडीशी रा. रा. अनिल थत्ते व काहीशी रा. रा. विश्वास देवकर छाप केशभूषा, नाक व ओठांच्या मध्ये नायगावकरी मिशांचे घोस, असा ऐवज धारण करणारा एक शुभ्रवेशधारी पुरुषपुंगव आमुच्या समोर येऊन उभा ठाकला! मघाशी कानी करंगळी घातल्याचा हा परिणाम! परंतु आम्ही पाटलोणीस करंगळी पुसत, त्यास मानेनेच शुद्ध नकार दिला. आमुच्यासमोर आता एकच गूढसमस्या पिंगा घालत होती - ही मराठी गाणी कोठून येत आहेत? जणू त्या ध्वनीने आमुच्यावर फूँक मारली होती!!

आमुच्या जनुकांतच भोचक उत्सुकता! ती कोठून आम्हांस स्वस्थ बसू देईल? पदपथावरील शिंगदाणेवाल्याकडून बंद्या रुपयाचे शिंगदाणे घेतले व जणू खारवलेले काजूच खात आहोत अशा अविर्भावात आम्ही त्या ध्वनीच्या रोखाने चेपल्या घासू लागलो! आता स्वर अधिकाधिक स्पष्ट होत चालले होते... होता होता आम्ही एक्स्प्रेस टॉवरनजिक आलो आणि अवघेच स्पष्ट झाले!!

पाहतो तो काय लोकसत्तेच्या कार्यालयातून हे सहर्षसंगीत पाझरत होते! लोकसत्तेमध्ये आनंदसोहळा सुरू होता!! याचा सार्थ व सटीप मतलब तो काय?

मनीं म्हटले, रा. रा. आल्हाद गोडबोले, रा. रा. सुरेंद्र हसमनीस, रा. रा. राहुल बोरगावकर, रा. रा. शैलेन्द्र शिर्के प्रभृती लोकसत्तेतून गेल्या, म्हणूनी तर हा आनंदोत्सव साजरा होत नाही ना? परंतु तसे नसावे! कारण कीं, प्रहारपत्री तर त्यांचे चांगभले असेच झाले आहे!! मग मनीं आले, गुन्हे पत्रकारितेतील 'दादा' रामशेठ पवार येत्या ३० तारखेस लोकसत्तेच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत, म्हणून तर हर्षोल्हास नसावा ना? पण तसेही अजिबात नसावे!! गुन्हे पत्रकारितेतील जुन्या पिढीचा हा मितभाषी व अजातशत्रू (लोकसत्तेत त्यांना हे कसे बुवा जमले!) दुवा! त्यांच्या जाण्याने कोणी आनंदी कसे होईल? (आता त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होणार आहे, ती कशी भरून काढायची या विचाराने रा. रा. सुधीरकक्का जोगळेकर, रा. रा. दत्ता पंचवाघादी प्रभृती उलट चिंतातुरच झाल्या आहेत, असे समजते. ही पोकळी भरून काढून गुन्हेपत्रकारीतेचा 'विकास' साधण्याकरीता नवी मुंबईची मदत घेतली जाणार असल्याचेही समजते. रा. रा. कुमारजी केतकर (एनआरआय एडिटर, लोकसत्ता) स्पेनहून परतताच याबाबत काय तो निर्णय होईल. तोवर आपण अफवांचे पीक काढू या!!

असे जर आहे, तर मग भरली लोकसत्ता-अवनी मोदाने अशी स्थिती कशाने आली आहे? आम्हांस काही उमजेना!! तेव्हा मनीं म्हटले, आता लोकसत्तेच्या कचेरीत गेल्याशिवाय गत्यंतर नाही! येणेप्रकारे विचार करून आम्ही कचेरीत गेलो मात्र. तेथील वातावरण पाहून आम्ही चक्क थक्कथक्क झालो!!

आपल्या वाट्यास आलेल्या पानावर नेमकी फुलपेज जाहिरात आल्यावरी होतो तशा आनंदाने सगळी सबएडिटरे मोहरली होती. एखाद्या वार्ताहराची बातमी समूळ छाटल्यावर होतो तशा छुप्या सुखाने चिंब चिंब झाली होती... रा. रा. रवींद्र बिवलकरांना तर त्यांच्या वाहनविषयक सदरास जणू कोणी वाचकच मिळाला आहे, असा शंभर सीसीचा आनंद झाला होता! रा. रा. विनायक परबांना एकाच अंकी चार-चार सिद्धहस्त बायलायनी आल्यासम सुख प्राप्त झाले होते! मुंबई वृत्तांताच्या ओझ्याखाली आकंठ दबलेले रा. रा. प्रसाद रावकर (यांचे उपनाम कामकर असावे असा आमचा समज आहे!) हेही खास वेळ काढून किंचितसे हसत होते!! हे दृश्य पाहिल्यावर मात्र आमुच्या बुब्बुळगोट्या भालप्रदेशीच सरकल्या!! इतका कसला आनंद!!

हे पुसण्याकरीता आम्ही आमचे सन्मित्र तंबी दुराई यांच्याकडे वळलो. तर ते आपली रविवारची अडीचकी (पक्षी - दोन फुल-एक हाफ) लिहित होते. आपल्या चांगल्या पटकथेच्या डोक्यात दिग्दर्शक व निर्मात्याने मिळून धोंडे घातल्याची तहान-व्याकुळता त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. परंतु आमच्या जनुकभूत भोचक उत्सुकतेने आम्ही त्यांना पुसलेच, की हे प्रभो, या अवनीवर हा आनंद व हर्ष का बरे दाटून राहिला आहे?
तेव्हा ते म्हणाले, की बापूराव, स्थलांतर ही गोष्ट अतिशय वाईट! महाराष्ट्रातील स्थलांतरीतांचे हाल आज कुत्रेही खात नाही! कोयनेपासून नर्मदेपर्यंत हीच अवस्था आहे! या विषयावर मी लवकरच एक सिनेमा लिहिणार आहे!
तेव्हा आम्ही म्हटले, तंबीजी, त्याचा येथे काय संबंध?
त्यावर ते म्हणाले, संबंध आहे तर! लोकसत्तेचे स्थलांतर महापे येथे होण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु कचेरीतील पत्रकास्तकारांच्या लोकमान्य लोकशक्तीमुळे हा घाट पाण्यात बुडाला आहे! महापे गमन कॅन्सल झाले आहे!! त्या कारणें आमुचे समस्त पत्रबंधु मोदीत झाले आहेत...

त्यावर आम्ही मनीं म्हटले, एकंदर हे असे प्रकरण आहे तर! महापेस जाणे रद्द झाल्याने समस्तांस महा-पे लाभल्याचा आनंद झाला आहे!! (या पुढे प्रहारमधील दामदुप्पट वेतन म्हणजे किस झाड की पत्ती!)

लोकसत्तेचे स्थलांतर होता होता राहिले! यामुळे निदान आता तरी तेथील समस्तांस स्थलांतरीत होणे म्हणजे काय, त्याचे दु:ख कसे असते, याची जाणीव होईल! महीमहीम मेधाजी पाटकर यांनी आता निश्चिंत होण्यास हरकत नाही!! लोकसत्तेतील त्यांच्यावरील टीकेची धार निदान आता तरी कमी होईल! आमेन!!

(Posted by बापू अत्रंगे, दि. २३ ऑगस्ट २००८)

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरूष व अन्यहो,
आपणांस बापूचा शिसानविवि!

बापू अत्रंगे यांचे काही बरेवाईट तर झाले ना?
चांगदेव पाटील कोठे निघोनि तर गेले नाहीत ना?
येणेप्रकारची चिंतायुक्त (व कधी कधी सहर्ष) विचारणा गेल्या काही दिवसांत होत होती...
कोणी कोणी तर म्हणाले, की बापू अत्रंगे प्रहारपत्री (पत्र नव्हे, कोंकणमित्र!) दाखल झाल्याकारणें गप्पसे जाहले आहेत! (जैसे की खुद्द रा. रा. दादा! परवा म्हणे ते मालवणात गुणगुणत होते - काही बोलायचे आहे, पण मायXX काही बोलणार नाही!! दिल्लीच्या दारावरी शक्ती तोलणार नाही!!)

कोणी कोणी म्हणाले, प्रहारमधे कसले घेतात बापूला! तेथे एक तर तुमच्या माथी लोकसत्तेचा स्ट्यांप लागतो किंवा माणूस असंतुष्ट लागतो! प्रहारचे संपादक (मायxx, ह्यो एक पद कायमचो! बाकीच्यांचो काय भरोसा नाय!!) रा. रा. नारायणदादा राणे यांसी असंतुष्टांचा भारी कळवळो!!

वास्तविक प्रहारमधे जावे असें आमुच्याही मनी खूपखूप आले होते... आमचे सुहृद रा. रा. सुरेन्द्र हसमनीस (ज्यांच्या डोंबोलीच्या घरी साक्षात् नारायणराव अवतरले होते!) यांचा थोर वशीला आमुच्या गाठी असतांना तर आम्हांस ते अजिबात शक्य होते! शिवाय चेंबूरातल्या शाखेत काही काळ आम्हीही गेलो आहोत... फुकटचे पेपर वाचण्यासाठी! तेव्हा प्रहार काही आमुच्याकरीता दुर्गम नव्हता! पुन्हा वेतनाचाही काही प्रश्न नाही! तेथे म्हणे एकास दोन असे धनधोरण!! ते ऐकोनी तर मराठी पत्रसृष्टीस ऐशी स्थिती जाहली, की माणसांना लाळेरी लावण्याची वेळ आली! आता तेथे ऐसा मालवणी खाजा लाभत असतां, आमुच्यासारखे हावरे फिल्डर तेथे का बरें फिल्डिंग लावू गेले नाहीत, असा भोचक सवाल तुमच्या मनीं आलाच असेल!
तर त्याचे काय जाहले, की आम्हांस आतली एक गुजगोष्ट समजली. ती म्हणजे, तेथे प्रत्येकास दर दोन महिन्यांनी राजीनामा देणे बंधनकारक असणार आहे! (सवयीचा नियम होतो तो असा!!) बरे येणेप्रकारे राजीनामा देण्यासही आमुची ना नाही, परंतु सर्वांच्याच नशिबी सोनियांसारख्या श्रेष्ठी थोड्याच येतात? स्वीकारला राजीनामा, तर फट् म्हणता ब्रह्महत्या होवूनी जावयाची!! पण ज्यांस हे भय नाही व ज्यांस आवतण आलेले आहे, त्यांनी अगत्याने भारतीय बैल (पक्षी - इंडिया बुल) कंपाऊंडी जाऊन यावे! काय भरवसा, त्यांसही लोटोलॉटरी लागेल!! (आम्ही काही चुकीचे तर बोलत नाही ना शैलूशेठ?) असो.

मध्यंतरी पत्रजगती अशीही चर्चा होती, की बापू थेट साम्राज्यात गेले!

वाचकांतील ज्या सभ्य स्त्री, पुरूष आणि अन्यांना साम्राज्य म्हणजे काय हे ज्ञात नाही, त्यांच्यासाठी हा खुलासा -
साम मराठी नावाची एक नवी कोरी वाहिनी वाचकांचे प्रबोधन आणि (जमल्यास) मनोरंजन करण्यासाठी (अखेर एकदाची) अवतरली आहे! (रा. रा. संजीवकुमार लाटकर मल्टीमीडियावाले, पाहताय ना?)
ही चोवीस तास चालणारी वाहिनी आहे.
सध्या ती सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंतच दिसते!
रात्री अकरालाच तिच्यावर पाटी येते - आता आपली भेट सकाळी सहा वाजता!
(काय? जुने दूरदर्शनचे दिवस आठवले की नाही? या वाहिनीवर अशाच प्रकारे ऐतिहासिक परंपरांची जपणूक केली जाणार आहे! वाहिनी सकाळची आहे ना!!)
तर मंडळी सकाळी सहा ते रात्री अकरा या काळात ती साम असते...
बाकीच्या वेळेत ती सामसुम असते!

आता तुमच्या मनी या सवालाची सहजच पैदास झाली असेल, की एरवी साम असताना या च्यानेलवरून काय-काय प्रक्षेपित केले जाते?
तर हा च्यानेल अतिशय वेगळा असल्याचा घोष उद्‌घाटनप्रसंगीच रा. रा. श्रेयस तळपदे यांनी सनई-चौघडे वाजवून केलेला आहे! आम्ही असे अभागी, की नेमके तो कार्यक्रम पाहतानाच झोपलो! तिकडे तळपदेसाहेब महाराष्ट्रातील चौदा रत्नांचा परिचय करून देत होते आणि आम्ही इकडे घोरत होतो... (आमच्या डॅडना हल्ली आम्ही सक्तीने साम टीव्हीच पाहावयास लावतो!... निद्रानाशावर गुणकारी!!)

तर साम मराठीचे वेगळेपण येथून जे सुरू होते, ते सुरूच होते. वेगळीच आहे ही वाहिनी! येवढी वेगळी वाहिनी आम्ही ई-टीव्ही मराठीशिवाय दुसरी कोणती पाहिली नाही! (दोन्ही च्यानेलांच्या वेगळेपणातसुद्धा काय साम्य आहे!!)

पण त्यातही सामचे वेगळेपण म्हणजे काही औरच! त्याचे वर्णन करण्याकरीता आमुच्याकडे वेगळे शब्द नाहीत!!
या वाहिनीवरील बातम्या म्हणजे तर वेगळेपणाची परीसीमाच!
साक्षात् दूरचित्रवाणीवरील नभोवाणीच! (बहुधा म्हणूनच सामवर पूर्वाश्रमीच्या रेडिओ जॉकी विशाखाबाई टिकले यांचे सुदर्शन होते!) बरे हे बातमीपत्रही कसे? तर संथ वाहते मुठामाई! (निद्रानाशावर गुणकारी!!) बातमी संपता संपत नाही!
गतजन्मीच्या आमुच्या पुण्यप्रभावामुळे आम्हांस नेमकी जाग आली, ती या उद्‌घाटनाच्या बातमीपत्रावेळी!
मंडळी, काय सांगू तुम्हांस?
रा. रा. सागर गोखले बातम्या वाचत होते... (सागर म्हणजे हाडाचा अँकर! कोट-बिट घातल्यावर चांगला भरलेला वाटतो!) वाचत होते... वाचतच होते....
पहिलीच बातमी होती ती शिवरायांचा सिंधुदुर्ग कैसा अंधारात आहे व राजांचे मंदिर कैसे अनास्थेच्या तिमीरात आहे त्याची! ही बातमी एवढा वेळ चालली की त्या अवधीत ते मंदिर नव्याने बांधून झाले असते!!

ते काहीही असो, पंधरा ऑगस्ट हा दिवस यापुढे एक ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रजेच्या ध्यानी राहणार आहे. कारण की त्या दिवशी हे नवे हळूवार साम्राज्य जन्मास आले!

परंतु आम्ही ऐसे कर्मदरिद्री की या साम्राज्यातही आम्हांस जागा लाभली नाही! आम्ही हैदराबाद रिटर्न नाही ना!!

मग आम्ही नेमके गेलो होतो ते कोण देशी?

आधी चांगदेव पाटलांचे सांगतो....
ते बिचारे अजूनही एका नव्या पत्राच्या बाळंतपणात गुंतले आहेत.

आणि आम्ही...?

अनेकांना प्रहारमध्ये दामदुप्पट मिळाले. सकाळमध्ये अनेकांना चांगला पर्‌फॉर्मन्स बोनस मिळाला.
अशा बातम्या आल्या आणि आमुच्या क्रॉनिक पोटदुखीचा ज्वालामुखी खवळला! आम्लता वाढली!! आमुच्या सानथोर अशा दोन्ही मेंदूपुढे अंधारी आली! या आजारपणामुळे काही लिहावेसे वाटेनासे झाले...


आता मात्र लाव्हा खाली बसला आहे.
जरा बरे वाटू लागले आहे.
तेव्हा आता नियमित भेटू या....

आपला सन्मित्र,
बापू अत्रंगे

(Posted by बापू अत्रंगे, दि. २० ऑगस्ट २००८)

च्यानेलांना लागलेल्या ग्रहणाचे थेट प्रसारण काल आम्ही केले.
आज प्रतेक्ष ग्रहणाचा दिवस.
त्यामुळे बहुतेक सर्व हिंदी च्यानेले अगदी चवताळल्यागत जाहली.
या ग्रहण काळात या च्यानेलकारांच्या अकलेची महिषी कोठे चरावयास गेली होती न कळे!
अन्यथा या च्यानेलकारांनी आधीच श्रद्धांध लोकांना ग्रहणाची भोकाडी करून दाविती नसती!
कालपासून या लोकांनी इतका भयाचा माहोल तयार केला होता, की नंतर नंतर तर अति जाहले अन् हसू आले असेच झाले असेल आपुल्या जन्तेलाही!!
यात अपवाद होत्या आंग्ल वृत्तवाहिन्या आणि झी न्यूजसारखी एखाद-दुजी हिंदी वाहिनी आणि आपुल्या आयबीएन-वागळे, झी २४ तासादी म-हाटी वाहिन्या!

दरम्यान,
स्टार माझाचे काल केलेले कौतुक आज मागे घेत असल्याचे आमुच्या चांगदेव पाटलांनी कळविले आहे.
काल शहाण्या बाळासारखी वागणारी ही बालवाडी
आज टुकार हिंदी च्यानेलांची शेपटी धरून फिरत होती!

तर सादर करीत आहोत हिंदी च्यानेलकारांच्या अकेलेची ही प्रातिनिधिक दिवाळचित्रे -















(Posted by बापू अत्रंगे, दि. ०१०८०७)