नाही! आज आम्ही जास्त काहीही बोलणार नाही.
थेट मुद्दयावरच येणार आहोत.
तर सादर आहेत आमचे मुद्दे -
पाहा आणि...
आणि काय?
काही नाही! काहीही नाही!! काहीसुद्धा नाही!!!




.jpg)
.jpg)
.jpg)
जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगायचीय.
स्टार माझाने भलेही ग्रहणावर खास कार्यक्रम सादर केला.
पण आम्ही जो कार्यक्रम पाहिला तो ग्रहणाविषयीच्या तमाम अंधश्रद्धा खोडून काढणारा होता.
तेव्हा
रा. रा. खांडेकर बंधु स्टारवाले,
तमाम मराठी माणसांच्या वतीने
तुमचे याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आणि हो.
कधी भेटलेच तुम्हांला ते रा. रा. राजदीप सरदेसाई प्रभृती हिंदी च्यानेलवाले, तर त्यांना आमच्या वतीने सांगा -
उघडा डोळे, बघा नीट!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. ३००७०८)
सकाळी सकाळी उठलो.
कराग्रे वसते लक्ष्मी... म्हटले.
परंपरेनुसार लहान व मोठा असे दोन्ही मेंदू हँगोव्हरात गेले होते. तशात दोंदही आठी कॉलमी रिकामे असल्याची तीव्र जाणीव करून देत होते. आता ब्रेकफास्ट घेतल्याशिवाय ही अवस्था दूर होणार नव्हती.
तेवढ्यात आमुच्या सुगृहिणीने स्टुलावर ब्रेकफास्टची थाळी आणून आदळली. (तरी बरें. घरी चतुरंग, मैत्रिण, सखी, मधुरा असले काही विद्रोही वाङ्मय आम्ही आणित नाही. अन्यथा ही थाळी आमुच्या शिरीच आदळायची!!)
चहा आणि चपातीचा ब्रेकफास्ट करीत करीत आम्ही, बघू, टैम्स काय म्हण्तोय आज, असे म्हणत बाजूचा आंग्ल पत्रांचा गठ्ठा चाळू लागलो.
वास्तविक आंग्ल वृत्तपत्रांचा आणि आमचा फार काही संबंध नाही!
हल्ली आम्ही बातमीदारी करीत नसल्याने, पूर्वीप्रमाणे ही पत्रे वाचलीच जात नाहीत. (पूर्वी मात्र नेमाने वाचायचो. सगळेच बातमीदार वाचतात. त्यामुळे आपल्या बीटमध्ये काय चाललेय याची बित्तंबातमी मिळते व मग त्या बातम्यांचा फॉलोअपही बायलाईनसह घेता येतो!) हल्ली मात्र केवळ दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती! (त्यात शरमण्याचे काय कारण? तशी छायाचित्रे तर काय, आजकाल पुढारीतसुद्धा असतात!)
असे असले, तरी आम्ही आवर्जून आंग्ल दैनिके (मंथ एंडच्या तंगीवर अक्सीर इलाज म्हणून) घेतो व घडी मोडण्यापुरती चाळतो! (अखेर वृत्तपत्रे म्हणजे काही धर्मपत्नीस आहेरात मिळालेली माहेरची साडी नाही! की घडी न मोडता तीच साडी फिरवली वन्संकडे आहेर म्हणून!!)
तर येणेप्रकारे आम्ही ही तमाम पत्रे चाळीत असतां, अचानक टैम्सॉफिंडियाने आमुचे लक्ष वेधून घेतले! (सूज्ञ वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल, की आम्ही टैम्सॉफिंडिया म्हणालो. बॉम्बे टाइम्स नव्हे! यावरून आम्ही अगदीच त्यातले नाही, हे सूज्ञांच्या ध्यानीं आले असेलच!! या नावाचीही एक गंमतच आहे. वास्तविक टैम्सॉफिंडियाचे आधीचे नाव बॉम्बे टाइम्सच. नंतर ते अखिल भारतीय झाले व बॉम्बे टाइम्स बॉलिवुडात आकसले! या बॉम्बेकडे मुंबईच्या सेनापतींचा कसा काणाडोळा झाला न कळे! बहुधा बेनेट-कोलमनांचे मन का दुखवा ऐसा सुविचार त्यांनी केला असावा! असो.)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांच्या मनीं आता ऐसा सवाल निर्माण झाला असेल,
की आमच्या सारख्या 'चाळ'क-याचे लक्ष वेधून घेईल ऐसा कोण्ता बरें ऐवज टैम्समध्ये होता?
आपुला रसभंग केल्याबद्द्ल आम्ही क्षमा प्रार्थितो वाचकहो! परंतु तसले काहीही सुरस आणि चमत्कारिक त्यात नव्हते.
(इच्छुकांनी त्याकरीता मटाच्या संकेतस्थळी जावे व त्यांची हिटवृद्धी करावी!)
मंगळवार, दि. २९ जुलै २००८ रोजीच्या या टैम्सॉफिंडियात बंगळुरू, हमदाबादच्या साखळी बॉम्बस्फोटांच्या संदर्भातील सविस्तर बातम्या होत्या. अर्धे मुखपृष्ठ तर त्या बातम्यांचे होतेच, परंतु आतील ४ (अक्षरी चार) पानांमध्येही याच विषयाशी निगडित बातम्या होत्या. या बॉम्बस्फोटमालिकेचा असा एकही पैलू नव्हता, की ज्यास टैम्सने हात घातलेला नव्हता. ते पाहिले आणि आमुच्या लक्षात आले, की आंग्ल दैनिकांची थोरवी नुस्तीच त्यांच्या पृष्ठसंख्येत नसते! एरवी ही पत्रे करतात चावटपणा, परंतु परिपूर्ण बातम्या द्याव्यात त्या त्यांनीच.
आम्ही येणेप्रकारे आमुचे हँगोव्हरग्रस्त दोन्ही मेंदू शिणवित असतां, आमुची तनहाई (की जिच्याशी आम्ही अक्सर बाता मारतो), ती म्हणाली, ही ऐशी चैन आंग्लपत्रांसच जमू शकते. मराठी पत्रांची पृष्ठसंख्या ती केवढीशी... शेळीच्या शेपटासारखी! झाकताही येत नाही आणि वारताही येत नाही! बातम्या छापाव्यात, तो लेखांस जागा पुरत नाही. राजकारण द्यावे, तो मनोरंजनाचा खड्डा पडतो. महाराष्ट्रास हात घालावा तो व्यापार-उद्योग सटकतो. अशात ही चैन कैसी परवडणार?
सवाल रास्त होता. परंतु त्यात इवलीशी गफलत होती.
मराठी पत्रांच्या बातम्यांचे लेखन यात मुळात अवघाचि आनंद ऐसी अवस्था आहे. मराठीत शोधपत्रकारिता हा अपवाद. परिणामी अवघी बातमीदारी पत्रक-कारिता झालेली व तिस निव्वळ 'सूत्र'बद्धतेची कुंठितावस्था आलेली. तशात आपुल्या बातमीत सगळे पैलू यावेत ऐसी आस बातमीदारास लागावी, अशी व्यवस्थाच नाही.
दुसरे म्हणजे बातम्यांची निवड व मांडणी. त्यात तो इकडेतिकडेचोहिकडे आनंदी आनंदच! वृत्तसंपादन नोहे जाणिजे ज्ञानयज्ञ ही भावना यावी, तर सगळेच पाने मांडण्यात व फायरादी कृत्ये करण्यात मग्न! बातम्यांचे संपादन तुम्हीच करा. मुद्रितशोधन तुम्हीच करा. पाने तुम्हीच लावा. दैव बलवत्तर या उपसंपादकांचे, की त्यांस अद्याप अंक तुम्हीच ठोका व रात्रपाळी संपवून तुम्ही चाललाच आहात दादरच्या दिशेने तर जाता जाता ही चार पार्सलेही टाका असा केआरए कोणी दिलेला नाही! एकदा तोही दिला, की उपसंपादकांची वृषभावस्था सफळ संपूर्ण होऊन जाईल!!
ऐशा पर्यावरणी आहे त्याच पानांत टुकीने वृत्तसौंसार करावयाचा म्हटले, तरी जमणार हो कैसे?
पृष्ठक्वांटिटीचे सोडा, पृष्ठक्वालिटीत तरी अशाने कैसी स्पर्धा होणार?
परंतु आमुची मराठी दैनिके मात्र अद्याप आपल्याच ऑंखबंद उल्लूतेत मश्गुल आहेत.
हल्ली नव्या पत्रकारांतील मळी तितुकी मराठीत येत आहे व सुरस-गोड लोक सारे आंग्ल दैनिकांत पळत आहेत.
जुन्या पत्रकारांतील चांगले लोकही आंग्लपत्रांस अथवा च्यानेलांस डोळे घालीत आहेत.
असे करून अखेरीस मराठीत राहिल तो अथांग गाळ!
हे संकट अंगावर आलेले आहे, याचा पत्ताच आमुच्या पत्रव्यवस्थापक वर्गास नाही.
या भांडवलदारी व्यवस्थापकांस इतुका जरी मार्क्सबाबा माहित असेल, तर त्यांच्या हे ध्यानी यावयास हवे, की
या संकटाचे प्रमुख कारण अर्थातच आर्थिक आहे.
महानुभावांनो, मराठी पत्रांमध्ये जरी किमान हमी भावानुसारच रोजंदारी मिळत असली, तरी सर्वत्र तैसे नसते.
एकंदर काय, मराठी पत्रकारितेतील ब्रेनड्रेन थांबून तिची प्रकृती ठीक राहावी असे वाटत असेल, तर पत्रकारांस सोना-चांदी वेतनप्राश द्यावाच लागेल!
नाही तर मराठीच्या भाळी आहेतच
दुष्काळी पत्रे, कुपोषित वृत्ते.
(Posted by - बापू अत्रंगे, दि. 290708)
आज येथे सांगण्यास हरकत नाही, की आमची एक सुप्त आणि गुप्त महत्त्वाकांक्षा आहे!
आम्हांस संपादक व्हायचे आहे!
दिवाळी अंकाचे, कवितेच्या पुस्तकाचे, कुणाच्या तरी गौरवग्रंथाचे वा दिवंगत लेखकाच्या दिवंगत लेखांच्या संग्रहाचेही नाही! वृत्तच्यानेलचे तर नाहीच नाही! (तेथे अग्रलेख कुठे लिहायला मिळतो? शिवाय त्याचा आणखी एक तोटा. वृत्तच्यानेलच्या संपादकास ईवर, झीवर, गेला बाजार सह्याद्रीच्या साडेनवाच्या बातम्यांवर कोण बोलावणार सन्माननीय तञ्ज्ञ म्हणून?)
तेव्हा आम्हांला महाराष्ट्रातील संपादक व्हायचे आहे ते वर्तमानपत्राचे.
एक थोर व परखड व निर्भिड संपादक!
यातील पहिले दोन होणे काही फार अवघड नाही.
पाच-सात वर्षे संपादक राहिले, की कोणीही आपोआपच थोर होऊन जातो!
आमचा बाबल सावंत सलग दोनदा ग्रामपंचायतीला निवडून आला, तर रत्नांग्री टैम्स त्याला दिग्गज म्हणून ओवाळू लागलाय! तसेच हे. माणसं अशी आपोआपच थोर व दिग्गज व मातब्बर होऊन जातात.
परखड होणे हेही तसे सोपेच. वास्तविक ती तर निरी लेखनशैली आहे. पोकळ पवित्रा आहे. एकाची बाजू घ्या. दुस-याला धोपटा. झालाच तुम्ही परखड!
हां, त्या निर्भिडपणाची काठिण्य पातळी बहुतच जास्त आहे.
परंतु हल्ली असतो का कोणी निर्भिड?
मालकाच्या विलायतेत शिकलेल्या व केवळ म्हणूनच स्वतःस मराठीतला मरडॉक समजणा-या मुलग्याने समजा म्हटले, की कोण वाचतो हो तुमचा अग्रलेख व तुम्हांस काय कळते हो अर्थकारणातले, कारण की तुमचा पगार तर फक्त छत्तीस हजार रूपये (भत्ते वेगळे)? तर त्यास ठणकावून सांगेल, असा जगी कोण आहे? विचारी मना तुचि शोधूनि पाहे...
परंतु आजवरीच्या पत्रानुभवातून आमुच्याही ध्यानी एक आले आहे, की निर्भिड संपादकाचे मेरिट अवघडच. परंतु पर्सेंटाईल सूत्रानुसार तुम्हास या लीगमध्ये प्रवेश मिळू शकतो.
आता तुम्ही पुसाल, की हे सूत्र कोणते?
तर ते सोपे आहे.
समजा तुम्ही लोकमतमध्ये आहात. तर तुम्हांस बाबूजी (छोटे-मोठे आदीकरूनि झाडूनि सर्वच) व सोनियाजी या विषयांत पैकीच गुण हवेत! त्यात कसूर झाली, तर कडेलोटच! मग तुम्ही कितीही मनो'भावे' सचिवालयातील कामे करा, कितीही भिडे (एक मात्र जास्तीची पडली का? असूं दे.) घाला, उपेग नाही! मग काही तुमचे कंत्राट रिन्यू होत नाही म्हणून समजा! (राहीताई, आपुला पत्रानुभव काय म्हणतो?)
समजा तुम्ही सकाळमध्ये आहात. तर मात्र तुमचा निःपक्षपातीपणाचा अभ्यास थोरच हवा. म्हणजे समजा तुमच्या आवृत्तीकडे उदाहरणार्थ रा. ब. शरदरावजी पवारसाहेब यांच्याबद्दलची कोणतीही बातमी आली. की तुम्ही निःसंकोच निःपक्षपातीपणे ती पाठविलीच पाहिजे... छापण्यास नव्हे,... पुण्यास! तेथे एकदा का त्या बातमीचा साग्रसंगीत वृत्तस्तोमविधी झाला, की तुम्ही निर्भिड होण्यास मोकळे!!
तर प्रत्येक पत्राचे निर्भिडपणाचे असे भिन्नभिन्न सूत्र असते. ते मुखोद्गत केले, की झालाच तुम्ही संपादक.
आता तुम्ही लटक्या नवलाने विचाराल, की काय? संपादक होण्यास एवढीच अर्हता आवश्यक आहे?
तर आमुच्या निरागस सभ्य स्त्री, पुरूष व अन्य वाचकहो,
आणखीही काही अर्हता लागतेच की आजकालचे संपादक होण्यासाठी.
प्रथम म्हणजे त्यास इव्हेन्टांस जाण्याची एक्स्ट्रा करिक्युलम एक्टिविटी अनिवार्य असते.
दुसरे म्हणजे त्यास वितरण, विपणन, कचेरी व्यवस्थापन वजा राजकारण यात गती असणे मस्ट असते.
तिसरे म्हणजे त्यास मराठी लिहिता आले पाहिजे!
(अर्थात नंतर हा विषय ऑप्शनलाच टाकायचा असतो. लिहिता येते, एवढे पुरे! लिहिलेच पाहिजे असे काही नाही!!)
चौथे म्हणजे, खुर्चीवर बसताच आपण म्हणजे विचारवंत, ज्ञानसागर, विद्यानिधी, यच्चयावत्सद्गुणसंपन्न व त्यायोगे कचेरीत तमाम उपसंपादकांपेक्षा अधिक कळते असा भ्रम होणे अत्यावश्यक.
तर मत्प्रिय सभ्य स्त्री, पुरूष व अन्य वाचकहो,
आज आम्हांस येथे ही आनंदवार्ता सांगण्यास आनंद होत आहे,
की आमुच्या या देहामध्ये या सर्व अर्हता चेळूनचेळून भरलेल्या आहेत!
तेव्हा आता आम्हांस फक्त संपादक होणे आहे!
आता आमच्या नावावर पीआरबीचा तारा झळकणे आहे!!
(एकच तारा डोक्यावर आणि डोक्यामध्ये अंधार... हा आमचा एक दरिद्रीविनोद (पक्षी - पी. जे.) बरे का! असो.)
दुःखाची बाब म्हणजे, आम्हांस हा साक्षात्कार किंचित उशीराने झाला.
अन्यथा पनवेलपती रा. ब. रामशेठ ठाकूर यांचा 'रामप्रहर' रा. रा. मधुकररावजी भावे (लोकमतरिटर्न) यांच्या हाती गेला नसता.
मालवणमहिपती रा. ब. नारायणदादा राणे यांचा 'प्रहार' रा. रा. आल्हादजी गोडबोले (व्दारा लोकसत्ता) यांच्या मधुरहस्ती जाण्याची चिन्हेच निर्माण झाली नसती.
परंतु आमच्याही नावाचे पत्र कधी तरी कुठे तरी निघेलच की!
म्हणतात ना, पत्री पत्री लिहिलेले असते संपादकाचे नाम!
(Posted by चांगदेव पाटील (शब्दांकन - बापू अत्रंगे), दि. २३०७०८)
गेले कित्येक तास आम्ही धृतराष्ट्रश्री आणि रा. रा. मनोहर जोशी झालो होतो!
म्हणजे डोळ्यांसमोर सतत अंधार आणि त्यात इतस्ततः फिरणारे अमिबासम आकार एवढेच होते! आणि 'गिळायला चला', 'अंघोळीला पाणी उतरलंय', असे काही स्वहितकारक ध्वनीसमुच्चय ऐकू येणे वगळल्यास आम्ही कानांनी ठार बहिरे झालो होतो!
हे कशाने झाले, हे काही आकळेना! म्हटले श्री फ्यामिली डाक्टरकडे जावे. पण मनीं विचार केला, की श्री फ्यामिली डाक्टरकडे गेल्यास, ते सांगणार संतुलन काजळ डोळ्यांत, संतुलन तेलाचा पिचू कानात आणि संतुलन काढा घशात घाला! त्याने मेंदूची वातप्रकृती आणि खिशाचे संतुलन बिघडणार! त्यापेक्षा साधासोपा बिनश्री डाक्टर परवडला. तेथे निदान शँपलच्या गोळ्या अन् खुब्यावरील टोचकाम एवढ्यावरच सूटू! तर त्या बिनश्री डाक्टरने सांगितले, की पाच मिनिटे उशीर झाला असता, तर काही खरे नव्हते! (तुम्हांस सांगतो, आम्ही आणखी पाचशे मिनिटे उशीराने जरी त्या वैद्याकडे गेलो असतो, तरी त्याने आम्हांस हेच सांगितले असते!.. बहुधा डाक्टरांचे घड्याळ भिन्न असावे!) त्यास विचारले, आमचा हा धृतराष्ट्रश्री आणि मनोहरश्री कशाने झाला? तेव्हा आमच्या डोळ्यांत पाहात तो धन्वंतरी वदला, हे कमी करा (सूज्ञांस हे म्हणजे काय ते सांगणे नको!) आणि जास्त टीव्ही पाहू नका!
ते ऐकले आणि मनीं म्हटले, इश्!
हे तो सर्वस्वी असंभव!
आमची चित्रवाणी आराधना तर... दिवसामागूनी रात्र चालते सकाळ संध्याकाळ!
तेव्हा हे तो परफेक्ट असंभवच!!
आता हेच पाहा ना. आयबीएन-वागळेवरील वागले की जाहिरात पाहून पाहून लोक पकले. (वास्तविक रा. रा. निखिलजी यांचे तसे आम्हीही भक्तच. त्यांचेच का, आम्ही तर मीनाताई, कर्णिकसाहेब या सा-यांचेच भक्त आहोत. जे आवडे ताई-दादांना तेच आवडे प्रेक्षकांना, हे आमचेही ठाम मत आहे. परंतु रा. रा. वागळे म्हणजे काही रा. रा. बच्चन नाहीत! दर्शक तर रा. रा. बच्चन यांनाही पकले!) पण आम्ही नाही पकलो!
उद्या समजा रा. रा. वागळेंनी सकाळ-दुपार-संध्याकाळच्या बातम्या सांगितल्या, सलाम महाराष्ट्रात तेच पाहुणे म्हणून आले आणि ग्रेट भेटमध्ये त्यांनीच त्यांची मुलाखत घेतली, तरीही आम्ही आनंदाने त्याचा आस्वाद घेऊ.
अहो, वागले की जाहिरातच काय आम्ही तर झी मराठीवरचे एशियन स्काय शॉपसुद्धा सोडत नाही!
आणि म्हणे जास्त टीव्ही पाहू नका.
चित्रवाणी पाहायची नाही, मग या जगात पाहायचे ते काय?
खरेखुरे वास्तव जग?
हो, हे बरिक खरे की परवा आम्ही जरा अधिकच डोळे ताणून व कान फाडून चित्रवाणी पाहिली.
सकाळी जे चिटकलो ते रात्रीच उठलो.
करणार काय, कॉन्फिडन्स मोशनचा मामला होता ना!
(पूर्वी कालिजात असताना मॉम आणि डॅड गावी कण्कव्लीस गेले, की आम्ही रात्री भाड्याने व्हिडिओ आणून, मित्रांसवे एका मागून एक, एका मागून एक क्ष चित्रपटांच्या क्यासेटी पाहायचो. तो रम्य अनुभव यावेळी कामी आला!)
पण तुम्हांस सांगतो, हा अनुभव काही भिन्नच होता. असे वाटत होते, असे वाटत होते, की आपण एकसमयावच्छेदेकरून सर्वश्री डेव्हिड धवन, प्रियदर्शन, रामू वर्मा, करण जोहर, झालेच तर केदार शिंदे प्रभृतींचे चित्रपटच पाहात आहोत!
आता आम्हांस जेवढी आंग्लभाषा येते, तेवढीच राष्ट्रभाषा. त्यामुळे आमची सर्व मदार होती ती मायमराठी च्यानेलवर. (प्लीज नोट. 'मी मराठी' नव्हे! आम्हांस तर या नावाचा एखादा च्यानेल आहे, हे तो विकला जाईपर्यंत माहितही नव्हते. आमचा असा समज, की तो 'मी मराठी' या गाण्याचा अल्बमच आहे!! ) आम्ही आपले आल्टूनपाल्टून आयबीएन-वागळे आणि स्टार माझा हेच च्यानेल पाहात होतो त्यादिशी!
आयबीएन-वागळे हे मराठीतील खरोखरीचे वेगळे च्यानेल आहे, हे त्यादिशी चांगलेच ध्यानी आले. आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे रा. रा. वागळे! (ते जाहिरातींचे विसरा हो!)
विश्वासदर्शक ठरावावरील भाषणांचे तत्काल विश्लेषण हे आयबीएन-वागळेचे वैशिष्टय होते.
सकाळचे माजी संपादक ह.भ.प. अनंतबुवा दीक्षित, विदर्भभूषण रा. रा. सुरेशचंद्र द्वादशीवार असे महाराष्ट्रातले जानेमाने व (खरोखरीचे) संपादक आणि साक्षात् महाराष्ट्र वाचस्पती निखिलराव वागळे यांनी जो चर्चेचा फड भरविला होता, तो धादांत उद्बोधक होता. तशी आमच्या सह्याद्रीवरही महाचर्चा होत असे! पण ती बोवा फारच सपट!
स्टार माझाने मात्र आमची थोरच निराशा केली! आम्हांस आपले असे वाटते, की बहुधा स्टार माझाचा असा समज झाला असावा, की लोकसभा हे एक चेंडूफळीचे मैदान असून, तेथे चर्चेचा वीस-वीस (पक्षी - ट्वेंटी-ट्वेंटी. विसविशीत नव्हे!) सामना होणार आहे. परिणामी झाले काय, की त्या कोण बाई, स्वतःस बाळ ज. पंडित समजून चक्क धावते समालोचनच करीत सुटल्या! आणि त्यात त्यांचे ते अनुभवसंपृक्त, पांडित्यजड, विद्वत्तापूर्ण सहातवारे भाषाप्रभुत्व! वायफळांचा मळा म्हणजे काय हे त्यादिशी आमच्या संपूर्ण ध्यानी आले! नंतर नंतर बहुधा त्यांच्याही कंठास कोरड पडली असावी किंवा त्यांस वृथा वटवटीचा कंटाळा आला असावा व त्या न्यूज प्रोड्युसरांसमवेत कषायपेयपानास गेल्या असाव्यात. कारण बहुत काळ स्टार माझावरील अँकरणी गायब होऊन आपली लोकसभेतील भाषणेच नुस्ती सुरु होती! स्टारची बालवाडी अद्याप संपलेली नाही, हेच खरे!
--------------------------------------------------------------------
परंतु त्या दिवसातील खरी चंमतग मात्र वेगळीच होती.
विश्वासदर्शक ठरावावरील इलेक्ट्रॉनिक मतदान झाले. त्यात युपीएला विरोधकांपेक्षा जास्त मते पडल्याचे लोकसभेतील इलेक्ट्रॉनिक फलकावर झळकले आणि इकडे आमच्या आयबीएन आणि स्टारने आव देखा ना ताव, सरळ जाहीर करून टाकले, की सरकार जिंकले! स्टारने पडदाभर बॅनरच झळकावला, की सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.
तिकडे लोकसभेतही पंतप्रधानांच्या अभिनंदनाची चाटुगिरी सुरू झाली.
आणि काही वेळांतच स्पष्ट झाले, की मतगणना अभी बाकी है!
तुम्हांस सांगतो, त्या क्षणी, अगदी त्या क्षणी जाऊन आयबीएन-वागळे आणि स्टार माझावरील प्रोड्युसरांचे चेहरे व मुखवटे पाहण्याची तीव्र उबळ आमच्या मनी दाटून आली होती!
आमची कण्कव्लीची आजीबाय नेहमी म्हणायची,
मेंल्या xxx, अति घाई मसनात नेई!
या च्यानेलवाल्यांना कोणी असे तीन फुल्यांसह अनुभवाचे बोल सुनावणारी आजीबाय नाही काय?
(Posted by बापू अत्रंगे, दि. 240708)
परवा सहजच राजगडी गेलो!
मनीं विचार ऐसा, की अबुआरी निर्दालकयुपीबिहारी मराठीसंकटहारी तेजतर्रार राजसाहेब ठाकरे (इच्छुक पत्रकारांनी येथे - यांचा विजय असो - असा जयघोष करण्यास हरकत नाही! राजसाहेब लौकरच, म्हणजे एकदा 'मराठा' हे नाव मिळाले, की दैनिक काढणार आहेत. तेव्हा आतापासूनच सवय असलेली बरी! नोकरी मागताना कामी येईल!!) यांची भेट घेऊन त्यांचे समांतर सरकारचे बांधकाम कुठवर आले हे पाहावे. जमल्यास त्यांच्या जेम्स व बॉण्डचे क्षेमकुशल पुसावे. (ही राजसाहेबांच्या लाडक्या श्वानसाहेबांची नावे. मात्र हल्ली राजसाहेब त्यांना जनू व बांडे या नावानेच यू यू करतात म्हणे! हे बरीक राजसाहेबांचे आम्हांस खूप खूप आवडते. आधी धादांत केले, मग पत्रपरिषदेत सांगितले!!)
तर मनीं ऐसा सद्हेतू व सदिच्छा घेऊनि आम्ही राजगडी पोचलो, तो काय नवल! साहेबमजकूर चक्क कामात व्यस्त. मेजावर बसूनि लेखनकामाठी चाललेली. आम्हांस पाहताच तीनदा नाकावरून हात फिरवूनि, एकदा अंगठा व तर्जनीच्या योगे ओठांच्या कडा पुसूनि व एकदा डोळ्यांवरील चाळीशी तर्जनीने सारखी करूनि त्यांनी आमच्याकडे पाहिले. समोर बसण्याची खूण केली व पुन्हा मेजावरील तावावरूनि त्यांची झरणी फिरू लागली. मेजाभोवती पडलेले कागदाचे बोळे पाहूनि आम्ही मनीं म्हटले, बहुधा साहेब महाराष्ट्र नवनिर्माणाचा राहिलेला गृहपाठ पूर्ण करीत असावेत! त्यात आपला भोचक व्यत्यय कशास? तेव्हा आम्ही उठू लागलो, तो मानही वर न करता राजसाहेब वदले, "च्यायला, आलात काय, निघालात काय? हे काय पेपरचं ऑफिस आहे काय? बसा!"
आमचे काय -
बसा म्हणाले बसलो...
(शायर कै. वसंत बापट असे कुठे कुठे आठवतात नाही! नाहीतर हल्ली काय, साले सगळेच बापट! - हीसुद्धा अर्थातच नारायणरावांची उसनवारी! असो.)
तेवढ्यात साहेबांनी कंटाळून समोरील कागदाचा चुरगाळून बोळा केला. "च्यायला! आज काय भट्टी लागत नाय. तुम्ही पत्रकार लोक कसे लिहिता हो रोज रोज एवढं?"
"त्यात काही विशेष नसते! जमून जाते ते... शिवाय आमचा रोजचा अभ्यास असतो, वाचन-मनन-चिंतन असते..." मनीं म्हटले, आपण थापा मारतोय हे तर साहेबांच्या ध्यानी नाही ना येणार? पण नाही आले. ते आपल्याच विचारात मग्न होते.
"पण एवढे काय लिखाण चालले आहे?" आम्ही भोचकपणे विचारले.
"विशेष काही नाही... लोकसत्ताला एक खरमरीत पत्र लिहितोय."
आता साहेब अधुनमधून पेपरांमध्ये वाचकपत्रे लिहित असतात हे आम्हांस ज्ञात होते. परंतु हा व्यवसाय त्यांनी एवढा मनावर घेतला असेल असे काही आम्हांस वाटले नव्हते.
मनीं म्हटले, चला, म्हणजे मराठीतील घुगे, गावडे, परब, भाटे आदी नेहमीच्या यशस्वी वाचकपत्रकारांच्या मांदियाळीत आणखी एक थोर नाव दाखल होणार तर! चांगले आहे. नाही तरी आता तीच ती पत्रलेखकांची नावे वाचून मुंबैतील वाचकांनाही कंटाळा येऊ लागलेला आहे. शिवाय आजकाल चार पत्रे छापूनि आणली की पत्रकार म्हणूनि मिरवताही येते. शिवाय शंभरेक पत्रे छापूनि आली की त्यांचा ग्रंथही काढता येतो. त्याच्या प्रकाशनास संपादक मिळाला - (आणि तो मिळतोच! हल्ली संपादक काय कुठेही जातात! साडेनवाच्या बातम्यांमध्ये सुद्धा! या सह्याद्रीवरील साडेनवाच्या बातम्यांत एकदा आपलीही छबी झळकावी अशी आमुचीही महत्त्वाकांक्षा आहे. खोटे कशास बोला? तेथे जावोनि आले की गाढवाचा सुद्धा तञ्ज्ञ गोपाळशेट होतो म्हणतात!) - तर प्रकाशनाला संपादक मिळाला, की त्याच्या दैनिकात आपल्या या पत्रलेखसंग्रहाचे परिक्षणही विनासायास छापूनि येते व शिवाय लेखक म्हणूनिही मिरविता येते. तर ऐसा नफ्याचा हा व्यवसाय. साहेबांनी या व्यवसायात उडी घेऊन मराठी माणूस व्यवसाय-धंद्यात मागे नाही याचा आदर्शच घालून दिला म्हणाना!
"लोकसत्तेस किम् कारणेन पत्र?" आम्ही एक बारकासा स्टिंग सवाल केला.
"महत्त्वाचे कारण आहे. त्या द्रुतगती गटाने आपली एक कचेरी थेट मुंबईबाहेर हाकलली!..."
"द्रुतगती गट?"
"म्हणजे एक्स्प्रेस ग्रुप हो! च्यायला, अत्रंगे नाव सांगता आणि तुम्हाला साधे मराठी कळू नये?" साहेब कडाडले.
"पण त्यावर तुम्ही काय म्हणून लिहिता आहात पत्र?"
"मग लिहायला नको पत्र? आज लोकप्रभा महाप्याला हलवली, उद्या लोकरंग आणि चतुरंग हलवतील. अरे काय चाललंय काय? मुंबईतील मराठी पत्रं मुंबईबाहेर जातातच कशी?"
"पण एक्स्प्रेस टॉवरमध्ये जागा कमी पडत होती. आमचे प्रवीणभाई काय मसालेदार टोकदार लिहितात! पण त्यांना चक्क उभ्याउभ्या तथ्यांश लिहावा लागत होता म्हणतात! आता तथ्यांश म्हणजे फार फार तर वीसेक ओळींचा मामला, म्हणून बरे! ते बोजेवारांसारखे तीन-चार फुल आणि एक-दोन हाफ लेख दरसाल दरमहा दरआठवडा लिहित असते, तर त्यांच्या पायांचे काय झाले असते? एक फुल एक हाफ नसते झाले?"
"पण मग पडदा - म्हणजे तुमचा तो स्क्रीन का नाही हलविला त्यांनी? आधीच मुंबईतला मराठी वृत्तपत्रांचा टक्का कमी होत चाललाय... जो उठतो तो नवी मुंबैला पळतो. सकाळ गेला, लोकमत गेला, पुढारी, गावकरी तिथंच आहे, सामन्याचा, लोकसत्तेचा छापखाना आहेच..."
"बरोबर आहे... स्वस्तात भूखंड मिळाले, म्हणून गेले. गिरगाव-पार्ल्यातला मराठी टक्का डोंबोली-बदलापूरला गेला, तसंच हे."
"पण आम्ही हे चालवून घेणार नाही. निदान लोकप्रभेचे कार्यालय तरी मुंबईतच हवे..."
"ते का?"
"का म्हणजे, उद्या आमच्या राजूने (पक्षी - संवादकार व सामचे सल्लागार व 'राज'गुरू राजू परुळेकर) एखादा लेख लिहिला मनसेधर्मावर, तर तो द्यायला आम्ही काय एवढ्या लांब जायचे काय? काय तरीच काय?"
"हां. हे रास्त आहे. शिवाय प्रवीणभाईंनाही किती त्रास पडणार एवढ्या लांब जाण्याचा. इथे कसे होते, ढिंग म्हणत टांग टाकली की आलात कचेरीत! शिवाय तेलाची महर्गता किती झालीय... तुम्ही लिहाच पत्र." ऐसे म्हणोनि आम्ही तेथून काढता पाय घेतला. मनीं म्हटले, एक बरे झाले, की साहेबांसी अद्याप एक्स्प्रेस टॉवरमधली जम्माडीजम्मत समजलेली नाही. ती समजते, तर तुम्हांस सांगतो, निश्चित दादरमधल्या भैयांच्या चार-दोन टॅक्स्या फुटल्या असत्या!!! (हे म्हणे मनसेचे धोरणच आहे. काहीही झाले, की हाण भैयाला. परवा तर एका मनसैनिकाचा सुपुत्र दहावीत नापास झाला. तर त्याने बाहेर जाऊन एका भैयाला मारले! पोरगा नापास होतो म्हणजे काय!!)
तर ती जम्माडीजम्मत वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, तुम्हांसही कदाचित माहित नसावी.
खूपच थोर गंमत आहे ती.
म्हणजे फार्फार वर्षांपूर्वी इये मराठी पत्रांचिये नगरी माधवराव गडकरी नामे एक थोर्थोर संपादक होवोनि गेले. गडकरी म्हणजे काय, अगदी चौफेर गडकरी!! एकदा त्यांच्या झरणीने कागदावर तांडव सुरु केले, की तिकडे सचिवालयी रिश्टर स्केलावर दोन ते सहा तीव्रतेचे धरणीकंप होत असत! ऐसा दबदबा!! तर हे रा. रा. गडकरी अनेक वर्षे लोकसत्तेचेही किल्लेदार होते. तें समयी ते एक्स्प्रेस टॉवरमध्ये जेथे बसत असत, जेथे त्यांची झरणी कधी धारानृत्य, कधी तांडवनृत्य करीत असे, त्याच ठिकाणी सध्या रोज रात्री धनिक-वणिक बाया व बापे येवोनि ढणाणा डिस्को करीत असतात. रा. रा. माधवराव जेथे बसायचे त्या ठिकाणी सध्या एक पब सुरू आहे. (पबब! काय हा कालमहिमा!!) अर्थात यात किती तथ्यांश ते लोकप्रभावालेच जाणे!!
आता आम्ही आणि आमची तनहाई याच गोष्टी करतोय, की उद्या समजा रा. रा. कुमारजी केतकर डावीकडून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या केबिनीच्या ठिकाणी काय बरे सुरू होईल? वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, तुमच्याकडे आहे या प्रश्नाचे उत्तर?
(Posted by बापू अत्रंगे, दि. २३०७०८)
संपादकीय विभागाची मिटिंग सुरू होती. (आता तुम्ही म्हणाल, की बापू, यात काय विशेष! नाशिकक्षेत्री गोदातटी जसे कोणत्याही क्षणी कोणाचे तरी श्राद्ध सुरूच असते, तद्वत सकाळपत्रीं कोणत्याही क्षणी कोणाचा तरी मिटिंगविधी सुरूच असतो!) तथापि प्रस्तुत मिटिंग काही निराळीच होती.
वातावरणात नेहमीची खुसफुस नव्हती. कुजबुज नव्हती. बुजबुज नव्हती. कोणीतरी कुणाबद्दल तरी नेहमीप्रमाणे कुरकुरत नव्हते. निंदानालस्ती, टीकाटिपण्णीच्या लघुसंदेशांचे चलनवलन ठप्प होते. सगळे शांतशांत होते. (अगदी पोपटराव गोपाळपंतसुद्धा!) जणू काही सर्वांचीच वाचा गेली होती! किंवा जणू सर्वांनीच साम मराठीवरील बातमीपत्र पाहिले होते!!
का.सं. नवनीतशेठ देशपांडे यांचा चेहरा तर दुबार पेरणीही वाया गेलेल्या कर्जबाजारी कास्तकाराप्रमाणे दिसत होता! ओठांवरील नेहमीचे तुच्छहास्य लोपले होते! (व ही अनहोनी पाहून नवे उपसंपादक मात्र चकीतचकीत झाले होते!) बैठकीतील नेहमीची आन्हिके उरकल्यानंतर शेठ नवनीत यांनी घसा साफ केला, आपले जाकिट सारखे केले आणि मार्गदर्शनास सुरूवात केली.
"आज एक अत्यंत मह्त्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे....''
सर्वांच्याच छातीत चर्र झाले! यंदा पीएमएस नाही की काय? (म्हणतात ना, पत्रकारांची धाव पीएमएसपर्यंतच!!)
"... उद्यापासून अंकात दहा मिनिटांत हे पान प्रसिद्ध होणार नाही! ते स्थगित करण्यात आले आहे..." शेठ नवनीतशेठ यांनी हे वाक्य उच्चारले मात्र आणि त्यांच्या घशात हुंदकाच दाटून आला...
वास्तविक या मिटिंगमध्ये काही तरी वेगळे घडणार अशी आशंका सर्वांच्याच मनी होती. (पत्रकारांचे नाक अशा बाबतींत भल्तेच तीक्ष्ण! बुधवारातल्या कचेरीत कॅंटिनसदृश जी वास्तू आहे तिच्यात कोणता विशेष खाद्यपदार्थ रांधलेला आहे, रा. रा. प्रदीपकुमार खिरेसाहेब यांनी (होय तेच ते! सीटीसी नामक बैठकीत आंग्ल भाषेत ईनोद सांगतात व त्यामुळे सर्वांस हसावेच लागते, तेच ते!) कोणाच्या वाटीत वेतनवाढीची खीर वाढली आहे, कोणत्या पत्रकारपरिषदेत विशेष भेटी गाठीस पडण्याची शक्यता आहे यासम अनेकानेक गोष्टींचा गंध त्यांना आधीच कसा येतो, हे एक कोडेच आहे! असो.) असे असले तरी आजच्या बैठकीत इतकी दुःखद वार्ता कानी येईल असे मात्र कुणाच्याही ध्यानी-मनीं नव्हते. त्यामुळे अखिल बैठक हादरून गेली. पानशेतचे धरण फुटले असा हाहाकार माजला...
परंतु गेलेल्या गोष्टीबद्दल इतका शोक करणे योग्य नव्हे व म्यानेजमेन्टच्या निर्णयाने आपणांस दुःख झाले आहे हे वृत्त चौथ्या मजल्यावर गेल्यास ते आपल्या वेतनचिठ्ठीस अहितकारक ठरेल याचे भान ज्येष्ठांनी आणून दिल्याने सर्वांनीच आपला शोक आवरता घेतला व दहा मिनिटांत मिटिंग संपवून काही कामास लागले व बाकीचे कँटिनकडे वळले...
इकडे ही बैठक सुरू असताना वरच्या मजल्यावर पत्रअभियंते रा. रा. अमितकुमार 'टेक' टेकाळे (Tech-ale!!) शून्यविमनस्कपणे आपल्या अंकारुढ (पक्षी - ल्यापटॉप) संगणकाच्या पडद्याकडे पाहात बसले होते. अशा समयी नेमके काय करावे याचे टेम्प्लेट अनुपलब्ध असल्याने त्यांची काहीशी पंचाईत झाली होती! व त्यामुळे ते पारंपरिक पद्धतीनेच दुःखात होते. अखेर न राहवून त्यांनी संगणकावर गणकयंत्र सुरू करून हिशोबास हात घातला. - सकाळच्या वीस पानांसाठी वृत्तमांडणीकार प. पू. गार्सिया यांस नगद पाच कोट रु. दिले, तर एक पान बंद केल्याने त्यातील किती रु. फुकाचि गेले?...
रा. रा. अमितकुमार 'टेक' टेकाळे हे असे अंकगणितास झोंबलेले असताना विपणन, जाहिरात, वितरण आदी खात्यांमध्ये मात्र मोद दाटला चोहिकडे असे उत्फुल्ल विजयी वातावरण होते! काहींनी तर वितरण-जाहिरात-विपणन एकीचा विजय असो! गारसिया, चले जाव! अशा घोषणाही चोरून दिल्या म्हणतात!
एकंदर दहा मिनिटांत हे पान खुडून अंकावरती चार पानी लाईफस्टाईल पुरवणीचे कलम करून सारेच धुंदफुंद झाले होते!
(परुळेकरांची ही पुण्याईच, की अद्याप सकाळपत्री विघटित अवशेषरुपे का होईना पण संपादक ही संकल्पना आहे! अन्यथा यांनी अवघा अंकच दहा मिनिटांत वाचून फेकण्याच्या लायकीचा केला असता!)
-------------------------------------------------------------------------------
तर आता हा सर्व माहोल पाहिल्यानंतर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांच्या मनीं असा सवाल फुटला असेलच, की ये दहा मिनिट क्या है ये दहा मिनिट?
तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
सकाळने पत्रमांडणीकार प.पू. गार्सियाकृत नूतन मांडणीचा जो अंगिकार केला, त्यात दहा मिनिटांत नामक पानाचाही अंतर्भाव होता. 'जागर'णकार महामहोपाध्याय आनंदजी आगाशे यांनी तत्समयी ही मांडणी व हे पान यांबाबतचे अत्यंत प्रासादिक विवेचन केले होते. महामहोपाध्याय म्हणाले होते, त्याचा एकतृतीयांश सारांश असा की -
जेहत्ते कालाचे ठायी अनेक ग्राहकांच्या गेही रामप्रहरी सकाळपत्र येते. या सुग्राहकांतील अनेक लोक हे पत्र तयाची पत्रावळ होईपर्यंत (जाहिराती नामक फोलपटे पाखडोनि) वाचतात. प्रंतु ऐसे काही अभागीही आहेत, की जयांसी ते पत्र वाचण्याची सवड न सापडते. प्रंतु सकाळपत्र हे वाचकनामक ग्राहकांप्रती बांधिल आहे व निःपक्षपाती व विश्वासार्ह आहे व तें कारणें वाचकनामक ग्राहकास रोजचे वर्तमान कळविणे हे तयासे परमकर्तव्य आहे. म्हणोनि महाराजा, सकाळपत्री जे काही वाचनीय आहे ते सर्व जिस्टरूपे वाचकनामक ग्राहकास देण्याचे मिषे हे पान देण्याचे ठरविणेंत आले. सुप्रभाती कषायपेयपान करणेंत वाचकनामक ग्राहकाचा जेवढा कालापव्यय होतो, तेवढ्याच काळात हे पान वाचूनि व्हावे ऐसी कल्पना. म्हणूनि याचे बारसे दहा मिनिटांत ऐसे केलें.
एकंदर दहा मिनिटांत म्हणजे काय? तर सकाळच्या वृत्तगोदामाचे शोकेस! हवे तर दुकानी या, हवे तर खिडकीखरेदी (पक्षी - कडकी असताना करावयाची असते ती खरेदी... विंडो शॉपिंग!) करा!
अत्यंत सुंदर व नाविन्यपूर्ण व वाचकाभिमुख कल्पना!
तथापि बोरे गोड असली तरी अन्य कोणी उष्टावल्याशिवाय चाखायचीही नाहीत, अशी सकाळपत्राची परंपरा! तिस या पानाने तडा गेला.
झाले! सर्व सनातनी उखडले.
मनोमन त्यांनी हजारवेळा हे पान ओंकारेश्वरावर नेले!
संगमावर बुडविले!
एका वरिष्ठ पत्रकाराला तर अलका चौकात पीएमटीखाली हे पान फेकून देताना आम्ही या या डोळ्यांनी पाहिले!! अखेर या सर्वांची दुरिच्छा कामी आली. एका चांगल्या कल्पनेचा बळी गेला.
नीट राबवली असती, तर ही कल्पनाही फळली फुलली असती. तूर्तास ती स्थगित करण्यात आली आहे.
एकदा अन्य कुणा वृत्तपत्राने ती सुरू केली, की मग सकाळपत्रामध्ये ती पुनरपी रुजू होईल!
तूर्तास आपण या पानास दहा मिनिटे काहीही न वाचता श्रद्धांजली वाहू या....
(Posted by बापू अत्रंगे, दि. १८०७०८)
२९ जूनच्या 'सकाळ' मध्ये पृष्ठ क्र. २ वर तळात प्रसिद्ध झालेली बातमी वाचली आणि आमचे डोळेच विस्फारले! बातमी महत्त्वाची होती. दुस-या महायुद्धात बारा हजार ज्यू लोकांच्या हत्याकांडास जबाबदार असलेल्या एका नाझी अधिका-याला गोव्यात अटक करण्यात आली होती. जर्मन गुप्तचर संस्थेने भारतीय गृहखात्याच्या मदतीने हे ऑपरेशन पार पाडले, अशी ती बातमी होती. (सकाळने बातमीत जर्मन ऐवजी बर्लिनची गुप्तचर संस्था असा उल्लेख केला आहे!)
बातमी वाचताच आठवली ती मोसादने आईकमनला पकडले ती घटना. त्या घटनेसारखाच हा प्रकार होता. फरक एवढाच, की ही कारवाई मोसादने नव्हे, तर पेरुस नार्कपने केली होती. हा तपशील वाचल्यानंतर एक शंका किंचित काळ चमकून गेलीच, की जर्मन गुप्तचर संस्था ही अशी नाझी-शिकार कधीपासून करू लागली?
त्यानंतर मनात आले, की सकाळच्या डेस्कने ही बातमी बिनमहत्त्वाचे मानल्या जाणा-या दोन नंबर पानावर आणि तेही तळात का बरे लावली असावी? त्यांना या वृत्ताचे मूल्यच समजले नाही की शुद्ध निष्काळजीपणा? आम्हांला ही दुसरीच शक्यता अधिक वाटली. कारण ती बातमी वाचल्यानंतर एक लक्षात येत होते, की तिच्यावर सपासप कात्री चालविलेली आहे, अर्धवटपणे ती छापलेली आहे. त्यामुळे त्या बातमीचा सोर्स काय आहे, हेच नेमके समजत नव्हते. त्या बातमीत 'बाचबाबत प्रश्नचिन्ह' या मथळ्याची एक चौकट होती. पण तीही अर्धवटच. त्यात म्हटले होते, की 'पकडलेली व्यक्ती नेमकी बाचच (नाझी अधिकारी योहान बाच) आहे का, याविषयी आज खातरजमा करण्यात येत होती. रात्री उशीरापर्यंत तो बाचच आहे याविषयी खात्रीशीरपणे सांगण्यास अधिकृत सूत्रांनी नकार दिला.' म्हणजे सकाळचा (किंवा गोमन्तकचा) बातमीदार २८ जून रोजी या बातमीवर काम करीत होता. पण तो कुठे खातरजमा करीत होता, अधिकृत सूत्रे कोणती याविषयी त्यात संदिग्धताच होती. आणि अशी संदिग्धता ठेवूनच ती बातमी प्रसिद्धीस देण्यात आली होती!
खरे तर या बातमीची खातरजमा कोठेही होण्यासारखी नव्हती. या बातमीला कोणतेही अधिकृत सूत्र दुजोरा देऊ शकणार नव्हते. कारण ही बातमी तद्दन खोटी होती, बनावट होती!
ही बातमी म्हणजे एक बनाव होता! विशिष्ट हेतूंनी केलेला बनाव!!
हा बनाव केला होता गोव्यातील पत्रकारांच्या एका गटाने. हे पत्रकार पेनप्रिक्स नावाचा ब्लॉग चालवितात. बातमीदार मुंबईत जे काम करीत आहे, तेच काम हे पेनप्रिक्स गोव्यात इंग्रजीतून करत आहेत. आजकाल 'ठोकूनी देतो ऐसा जे' या पद्धतीने जी पत्रकारिता चाललेली आहे, तिचा पर्दाफाश करणे हा या बनावाचा हेतू होता. आणि खेदाची गोष्ट म्हणजे पेनप्रिक्सचा हा हेतू पुरेपूर साध्य झाला. टाइम्स ऑफ इंडिया, टेलिग्राफ, हेरल्ड, गोमन्तक टाइम्स, गोमन्तक, सकाळ यांसारख्या बड्या बड्या, विश्वासार्हतेचा टेंभा मिरवणा-या दैनिकांनी पेनप्रिक्सने रचलेली कथा सरळ बातमी म्हणून प्रसिद्ध केली. तेवढ्यावरच यातील काही दैनिके थांबली नाहीत, तर त्यातील काहींनी त्या कथेस आपल्या पदरची मीठमिरचीही लावली! एका वृत्तपत्राच्या बातमीदारांनी तर या पत्रकावरून आलेल्या बातमीला बायलाईनही घेतली! (मुंबईतील पत्रकारांना यात विशेष असे काही वाटणार नाही! सध्या ती येथे सर्वसाधारण प्रथा आहे! लाखो लोक मैदान व दूरचित्रवाणीवरून जो क्रिकेटचा सामना पाहतात, त्याच्या बातमीलाही बायलाईन घेतली जाते, तेथे अन्यांची काय कथा!!)
(गोव्यातील वृत्तपत्रांनी ही बातमी कशी दिली व मुळातच पेनप्रिक्सने ही बातमी कशी तयार केली याची साद्यंत गंमत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
ही बातमी मुंबईत सकाळने प्रसिद्ध केली. त्यानंतर एक-दोन दिवसांतच ती खोटी असल्याचे उघडकीस आले. ही माहिती आपण वाचकांना देणे लागतो, असे काही सकाळच्या संपादकांना वाटले नाही! वास्तविक अशा प्रकारच्या बातमीबाबत तर कोणत्याही परिस्थितीत खुलासा होणे गरजेचे होते. परंतु तसे करण्याची आवश्यकता सकाळला भासली नाही! सकाळच्या सामाजिक बांधिलकी आदी गोष्टींमध्ये बहुधा हे येत नसावे!!
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी (६ जुलै रोजी) सकाळच्या सप्तरंग नामक रविवार पुरवणीच्या मलपृष्ठावर या बातमीबाबतचा एक लेख प्रसिद्ध झाला.
'विश्वासार्हतेला नख लावून साधले तरी काय?' अशा मथळ्याचा हा लेख होता. गोमंतकचे संजय ढवळीकर यांनी तो लिहिला होता. या लेखाचा सर्व रोख गिरे तो भी टांग उपर अशा प्रकारचा होता. ढवळीकरांच्या या लेखाचा जो इंट्रो आहे, तो पाहण्यासारखा आहे. त्यात म्हटले आहे, की "आधुनिक तंत्राच्या साह्याने (म्हणजे ई-मेल वगैरे) काही उच्छृंखल पत्रकारांनी (मीडियातील सावळागोंधळ, अनैतिकता, चुका वेशीवर टांगणारे ते उच्छृंखल?) हा कट (हे म्हणजे काही तरी राष्ट्रद्रोही कृत्यच होते, अशा थाटात ढवळीकरांनी कट हा शब्द वापरला आहे.) रचल्याचे स्पष्ट झाले." पुढे ढवळीकरांचा सवाल आहे, की "कशासाठी होता हा बनाव? (व पुढच्याच वाक्यातील प्रश्नात ते आपल्या या प्रश्नाचे उत्तर देतात, की) माध्यमांची, वाचकांची फसवणूक करून कोणी काय साधले?"
या बनावाने वाचकांची फसवणूक झालीच आहे. पण ती कोणी केली? पेनप्रिक्स पत्रकारांनी की या सर्व दैनिकांनी? पेनप्रिक्स या ब्लॉगवर ढवळीकरांच्या या लेखालाही सविस्तर उत्तर देण्यात आले आहे. ते जरूर वाचावे.
आमचा सवाल एवढाच आहे, की कोणीतरी माध्यमांची फसवणूक केली, त्यातून वाचकांची फसवणूक झाली... तेव्हा ही माध्यमे (उदाहरणार्थ मुंबईतील सकाळ दैनिक) या फसवणुकीबद्दल वाचकांची माफी मागणार आहेत की नाही?
पण आम्हांस अनुभवाने हे माहित आहे, की तसे काही होणार नाही!
व्यावसायिकता व नैतिकता व विश्वासार्हता या फक्त साप्ताहिक बैठकीत बोलण्याच्याच गोष्टी राहिल्या आहेत. निदान आमच्या वेळी बैठकीत त्यांची चर्चा तरी होत असे. आता ती तरी होते की नाही कोण जाणे?
(Posted by - चांगदेव पाटील, दि. १५०७०८)
वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्यहो,
आज तुम्हांस मी दोन सुभाषिते सांगणार आहे, जी की तुम्ही तुमच्या पीओपीवर लिहून ठेवावीत.
(परवडेल त्यांनी अक्षरमानव व मार्केटगुरू अशोकदादा पालव, व्दारा लोकसत्ता यांस आड्डर द्यावी. ब्रशने अक्षरे काढून हवी असतील, तर जास्त दर पडेल. केरसुणी, खराटा वा तत्सम वस्तूंनी अक्षरे रंगवून हवी असतील, तर कन्सेशन मिळेल!... मस्करी नाही! पालवसर आहेतच असे प्रयोगशील!! फार फार वर्षांपूर्वीची, म्हणजे जेव्हा हास्यरंग पुस्तिका स्वरुपात (व बरा) निघायचा, तेव्हाची गोष्ट आहे. हास्यरंगमध्ये आपले हाहाहा हास्यसम्राट कवी अशोकराव नायगावकर (खरे तर होयगावकरच!) यांची कविता(?!!) क्यालिग्राफी करून छापू असा बूट पटकथा लेखक, कादंबरीकार, लेखक, कवि, चित्रपट समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार (हुश्श!) श्रीकांतजी बोजेवार यांनी काढला, तर आमचे हे अक्षरमानव हट्टच धरून बसले, की कविता अधिक प्रत्ययकारी दिसावी म्हणून ब्रशऐवजी नायगावकरांच्या मिशाच हव्यात!!.... नायगावकरांनी त्यानंतर काही दिवसांतच हास्यरंगमध्ये लिहिणे थांबविले म्हणतात! असो.)
तर ही सुभाषिते अशी आहेत -
१. झूट बोले कौवा काटे!
व
२. झूट बोल कौवा काटे!!
(कोणतीही गोष्ट ठासून सांगायची असल्यास द्विरुक्ती उत्तम! अलीकडच्या उपसंपादकांना हा नियम तेवढा उत्तम पाठ! सीएसटी स्थानक, ट्रॅफिक जाममुळे वाहतूक कोंडी, टाडा कायदा, सह्याद्री पर्वत यांप्रकारचे शब्दप्रयोग येतात ते अशा वैयाकरणी उपसंपादकांमुळेच!)
आता तुम्ही पुसाल, की ही सुभाषिते का बरें ध्यानी ठेवावयाची? (सकाळमधील समस्त बाबूंनो, हा तुमच्या केआरएचा भाग नाही! पण बाबांनो, सगळ्याच गोष्टी केआरएमध्ये मोजायच्या नसतात. जीवनात काही गोष्टी या करण्याच्या म्हणूनही असतात!! असो.)
तर नेहमी सत्य बोलावे, हे सांगण्यास काही निमित्ताची गरज आहे असे आम्हांस वाटत नाही! (परवा मटात टॉयलेट ट्रॅजेडी झाली! त्यास कोणते निमित्त होते?.... पण आता या निमित्ताने आम्ही सांगूनच टाकतो, की मटाने मुंबईतील व प्रामुख्याने रेल्वे स्थानकांतील महिलांच्या टॉयलेटची दुरवस्था वेशीवर टांगल्याने ज्यांनी कोणी नाक मुठीत धरून शोक केला, त्यांनी तो खुशाल करावा! आम्हांस मटाची ही पत्रकारिता मनःपूत भावली! तृतीयपानी पत्रकारिता पुन्हा आपल्या स्थानी परततेय याचीच जणू द्वाही व ग्वाही या वृत्तांताने दिली असे आम्हास वाटते!... आता आमच्या वाटण्याला कोण हिंग लावतो म्हणा! पण असो.)
तर नेहमी सत्य बोलावे, हे सांगण्यास काही निमित्ताची गरज नसली, तरी वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्यहो, आमचे सुहृद महेशकुमार माचकर यांचे सत्याचे प्रयोग वाचल्यानंतर आम्हांस वाटले की तमाम मराठी पत्रकारांनी महेशकुमारांचाच कित्ता गिरविण्याची वेळ आलेली आहे! (तसे झालेच, तर अत्यंत अनावस्था प्रसंग ओढवतील याची नम्र जाणीव आम्हांस आहे!)
सत्य सांगतो वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्यहो, पण महेशकुमार माचकर यांचा सोमवारच्या मुंटातील 'बायकांचा डबा' हा लेख वाचून दस्तुरखुद्दांस अगदी गदगदूनच आले! जणू काही स्व. मुकेशने त्यांना प्रस्तुत लेख लिहिण्याआधी 'सजन रे झूट मत बोलो, खुदा के पास जाना है' अशी शपथच दिली होती! किती निरागसतेने, किती सहजतेने त्यांनी आपले वास्तवदर्शी अनुभव कथन केले आहेत! बायकांच्या डब्याकडे 'तृतीय नेत्रा'ने पाहून त्याविषयीशी इत्यंभूत माहिती बाळगणे व ती आडपडदा न ठेवता, तटस्थपणे मांडणे यास थोरच छाती हवी!! एरवी बायकांच्या डब्याबद्दल बोलतं का कोणी? (फक्त पाहतात!)
महेशकुमारांनी या लेखात व्हिडिओ कोच नामक संकल्पनेची खूपच त्रोटक माहिती दिली आहे. परंतु जी माहिती दिली आहे, तीही मोठी प्रक्षोभकच आहे! अनेक पत्रकार त्या उल्लेखाने संतप्त झाल्याचे समजते! असे असले, तरी सायंकाळी व्हिडिओ कोचमध्ये एकही पत्रकार नव्हता, असे रिपोर्ट आहेत! हवे तर माचकरांनी आपले सर्वव्यापी, सर्वसंचारी, सर्वज्ञानी प्रवीण बातमीदार कामास लावावेत व माहिती मागवावी! त्या मुळ्ये पाच मिनिटांत रेल्वेच्या जीएमपासून प्रवासी संघटनेच्या सेक्रेटरीपर्यंत सर्वांच्या कोट्ससह बातमी हातात पडेल!! (मटामध्ये तर अशी बोलवा आहे, की प्रवीणभाईंनी पत्रकारितेत येण्यापूर्वीपासूनच असे बरेसचे कोट जमा करून ठेवलेले आहेत! अफवा तर अशीही आहे, की ते विविध अहवालांवरून बातम्या देतात. आणि समजा अहवाल नाहीच मिळाले, तर बातम्यांबरोबर तेही लिहून टाकतात! हाय काय अन् नाय काय!! असो.)
महेशकुमारांनी या लेखात एक वैश्विक सत्य मांडलेले आहे. ते लिहितात - "हा डबा नुसता असा पाहून समजत नाही हो! (आत न शिरता) जाणून घ्यावा लागतो." वास्तविक हा एक अत्यंत अध्यात्मिक विचारच महेशकुमारांनी येथे मांडलेला आहे. कोणतीही गोष्ट नुसती अशी पाहून समजत नाही! ती जाणून घ्यावी लागते, तेही त्या गोष्टीच्या आत न शिरता! (पण महेशकुमार, आमचे अनेक पत्रबंधू गेल्या कित्येक वर्षांपासून तुमचे हे अध्यात्म गिरवित आहेत हो. कोणतीही गोष्ट ते पाहात नाहीत. केवळ जाणून घेतात.... तेही आत न शिरता... केवळ फोनवरून! आमच्या राजकीय पत्रकारितेत तर हा अध्यात्मिक ट्रेंड चांगलाच स्थिरावला आहे! तर हेही असो.) बायकांच्या डब्याबद्दलची ही जाणीवजागृती महेशकुमारांनी कोणत्या साधनेने केली याचा खुलासा झाला असता, तर बरें झाले असते!
या लेखात आम्हांस मोहविले ते महेशकुमारांच्या विनयशील शैलीने.
ते लिहितात - "बायकांच्या डब्याविषयी जसजशी माहिती मिळत जाते, तसतसं लक्षात येत जातं... बायकांप्रमाणेच बायकांचा डबा हा विषयही आपल्यासाठी अनादिअनंत काळ अनाकलनीयच राहणार आहे." बरोबरच आहे! बायकांच्या डब्यात शिरल्यानंतर एकादी बाई द्रौपदी का होते व एखादी बाई दुःशासनाच्या भूमिकेत शिरून तिची ओल्या हळदीची साडी का फेडते, हे आकळणे प्रत्यक्ष कृष्ण परमात्म्यालाही तसे अवघडच!!
एकंदरीत पुरुषाच्या थर्ड आयमधून दिसलेला बायकांचा डबा मोठाच धक्कादायक होता! आता एखाद्या महिला पत्रकाराने महेशकुमारांचा हा सत्याचा प्रयोग पुढे चालवावा... व पुरुषांच्या डब्यावर महिलांच्या डब्यातून क्ष-किरण असा एखादा वास्तवदर्शी व सत्य लेख लिहावा! म्हणजे सत्याचीही फिटम्फाट झाली!!
(ता. क. - महेशकुमार हे नाव चुकलेले नाही, याची वाचकांतील सभ्य स्त्री-पुरूष व अन्यांनी नोंद घ्यावी! थर्ड आय असणारा मुकेश कसा बरे असेल? तो महेशच!!)
(Posted by बापू अत्रंगे, दि. १४ जुलै २००८)
आम्हांला तर असे वाटले होते, की आता या स्टार न्यूज व आजतक व आयबीएन सेव्हन व इंड्या टीव्ही आदी वृत्तगिरण्यांतील सनसनीखेज नांगर-पत्रकार किमान चार दिवस तरी पडद्यावर आपले श्रीमुख दाखविणार नाहीत!
म्हणजे बुवा आमच्याकडे आहे अशी पद्धत, की केलेली चूक उघडकीस आली की आम्हांला शरम येते व मग आम्ही आमुचे श्रीमुख की ज्याला सभ्य मराठीत थोबाड या सर्वनामाने ओळखिले जाते, ते शक्यतो कुणास न दिसेल याची काळजी घेतो! परंतु अशी पद्धत बहुधा वृत्तगिरण्यांमध्ये नसावी! अन्यथा 'तलवार'ने कापलेले नाक घेऊन कोण कशास पडद्यावर येईल? पण ते आले...
सिकंदर-ए-च्यानेल राजदीप शेक्युलर सर्देसाई स्ट्रायकर शोधत आले... हॅहॅ हॅंसी के बादशहा प्रभु चावला हास्यलाळ घोटत आले (कोणत्याही बाईमाणसाची, उदा. कु. राखी सावंत यांसारख्या भगिनींची मुलाखत घेताना हा थोर एडिटर एवढा एडा का होतो हे बरीक कोडेच आहे!)... इंड्या टीव्ही नामक दृकश्राव्य संध्यानंदचे शहेनशाह-ए-सनसनी रजत शर्मा आपले पेटंट सुतक पांघरून आले...
सगळे खुशाल आले, बिनदिक्कत आले...
असे आले, की जणू काहीच नाही झाले...
पण काहीच कसे नाही झाले?
त्या तलवार नामक धन्वंतरीची इज्जत गेली.
त्याच्या मृत कन्येच्या अब्रुचे धिंडवडे निघाले.
त्याला आपल्याच मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली गजाआड जावे लागले.
आणि हे सगळे पोलिसांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी झाले.
पण त्याहून जास्त वृत्तगिरण्यांच्या टीआर्पीच्या हव्यासापायी झाले!
टीआर्पी लाभला, पण व्हाट अबौट विश्वासार्हता?
की ती नकोच आहे कुणाला?
वारांगनेस पातिव्रत्य, तशी मीडियाला विश्वासार्हता असे तर नाही ना झाले अलीकडे?
आणि मत्प्रिय वृत्तपत्रकार भावाबहिणींनो,
आपणही नाक उंचावून चालण्याचे तर काहीच कारण नाही!
यापूर्वी अशा अनेक तलवारी आपल्या निस्पृह, निर्भिड व विश्वासार्ह नाकांवरून चाललेल्या आहेत!
मायला, म्हणजे आपण सारेच शुर्पणखा!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. १२०७०८)
वृत्त देतात ती वृत्तपत्रे म्हटल्यावर महाराष्ट्रात तर अनेक वृत्तपत्रे आहेत असे म्हणता येते असे कोणी म्हणेल; तर लगेच एक प्रश्न उभा राहतो की अवघा महाराष्ट्र कवेत घेईल असे एखादे वृत्तपत्र आपल्या येथे आहे काय; कारण की जी जी म्हणून वृत्तपत्रे आपण पाहतो ती ती वृत्तपत्रे जशी की लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, सामना इत्यादी तर एकूणच प्रादेशिकतेकडे अधिकाधिक झुकल्याचे आपणांस दिसून येते; याचा अर्थ असा, की आज महाराष्ट्रात राष्ट्रीय तर सोडाच; परंतु राज्यस्तरीय असेही दैनिक नसून, आहेत त्या फक्त आवृत्त्या!
यावर कोणीही मग असा सवाल करील, की ही वृत्तपत्रे आवृत्त्या स्वरूपातच प्रकाशित होत असल्याने महाराष्ट्राचे कंपार्टमेन्ट पडले असून, विदर्भात काय चालले आहे ते कोकणात कळण्यास मार्ग नाही व कोकणात काय चालले आहे ते खान्देशास कळण्यास मार्ग नाही व मुंबई हे तर एक बेटच असून वृत्तपत्रांनीही त्यास तसेच मानलेले दिसते व त्यामुळे महाराष्ट्राच्या एखाद्या भागात काही खास असे घडल्याशिवाय त्याची खबरबात मुंबईला कधी मिळतच नाही किंवा जेव्हा मिळते तेव्हा खूपच उशीर झालेला असतो व त्यामुळे एकूणच सामाजिक व सांस्कृतिक तुटलेपण बळावले असून, हल्ली तर मराठी संस्कृती म्हटल्यावर दहिहंडी आणि गणेशोत्सव एवढेच आठवते व मराठी लोकगीत म्हणून अमराठी लोक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील वास्तवदर्शी कार्यक्रमांमध्ये वर ढगाला लागले कळ हे कडबोळे गीत गातात म्हटल्यावर महाराष्ट्राचे संयुक्तपण कोठे राहिले?
तथापि शिक्षणाच्या सोयी, रोजगाराची साधने, राजकीय प्रक्रियेतील वाढता सहभाग यांयोगे येथील माणसांच्या उंचावलेल्या अपेक्षा व बहुजनांस त्यायोगे लागलेली नागरसंस्कृतीकरणाची ओढ यामुळे वाचक नावाच्या घटितास आपले वृत्तपत्रात अस्तित्व असावे असे जे वाटू लागले व त्याचा जो दबाव वृत्तपत्रांवर येऊ लागला त्यातून वृत्तपत्रांना विविध भागांस व वाचकांस न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्या आवृत्त्या काढण्याची आवश्यकता निर्माण झाली की ज्यामुळे वृत्तपत्रांचे राष्ट्रीय स्वरूप हरवल्यासारखे झाले.
आता ही जी वृत्तपत्रीय गोची आहे तिचे काय करायचे व या कॅच ट्वेंटी परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हा मोठाच प्रश्न मराठी मीडियास भेडसावणार असून, मराठी वृत्तवाहिन्यांना तर यामुळे मोठीच तारेवरील कसरत करावी लागत आहे कारण की जर आपण उदाहरणार्थ ग्रामीण महाराष्ट्राच्या बातम्या ग्रामीण ग्राहकांकरीता देणार असू तर मग शहरी ग्राहक काय म्हणून आपल्या वृत्तवाहिनीवर त्या काळात थांबतील अशी ही अडचण प्रत्येक वाहिनीला तर भेडसावतच आहे व यातून कदाचित वाहिन्यांचेही आवृत्तीकरण होऊन, त्या त्या भागात ती ती वाहिनी जशी की आजतक मुंबई आजतक दिल्ली अशी दाखवावी लागेल आणि त्यामुळे वाहिन्यांचेही आजचे राष्ट्रीय स्वरूप नाहीसे होऊन त्यात्या पूर्ण प्रादेशिक बनतील.
अशावेळी मित्रानो, पंजाबसिंधुगुजरातमराठाद्राविडउत्कलवंग हे सर्व एक या भावनेचे काय होईल कारण की आताच आपल्याला येथे मुंबईत असल्यानंतर मराठवाड्यात पावसाने किती गंभीर समस्या निर्माण केली आहे याचा चटकाच बसत नाही... महाराष्ट्रात टंचाईसदृश परिस्थिती आहे अशी बातमी आल्याखेरीज....
काही आहे उतारा यावर?
(Posted by चांगदेव पाटील, दि. 100708)
गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमच्या या या डोळ्यांनी पाहतोय, की मराठी मिडियात जणू पळण्याची साथच आलेली आहे. आम्हांस जो जो पत्रकारबंधु आणि जी जी पत्रकारभगिनी भेटते ती ती व तो तो आपली पळण्याच्या सरावात दंगच!
तेव्हा आम्ही मनीं म्हटले, की काम व कर्तव्य यांपासून पळावयाचे तर त्याचा सराव करण्याचे कुणासच काही कारण नाही! ते पळणे तर आमुच्या डीऑक्सीरायबोन्युक्लिईक आम्लातच कोरलेले! तेव्हा ही पळण्याची प्रॅक्टिस काही वेगळ्याच मिषाने चाललेली दिसते आहे. कां की कोणी आपल्या कचेरीपासून लोअर परळ अथवा उर्ध्व वरळीपर्यंत धावण्याचा सराव करते आहे, कोणी थेट अंधेरी वा विक्रोळीपर्यंतची धाव घेते आहे, कोणी नुसतेच इकडून-तिकडे, तर कोणी जागच्या जागीच पळत आहे, कोणी केवळ पळण्याची हूल देऊन आहे तेथेच पाय रोवीत आहे...
हे पाहून आमचा लहान व मोठा मेंदू अगदीच पळेनासा झाला, की लोक असे का बरें करीत आहेत? तेव्हा वाटले, की पत्रकारसंघाने मुंबई पत्रकार म्यारॅथॉन असा काही इव्हेन्ट तर नाही ना आयोजिला? पण मनीं म्हटले, पत्रकारसंघास एवढे कुठले सुचायला? (पत्रकारसंघाच्या पुरस्कारविजेत्यांची नुसती नावे पाहिली तरी त्यांच्या सुचण्याची धाव कुठपर्यंत आहे हे दिसते!)
तेव्हा आम्हीं मनीं, याची माहिती क्रीडा खात्याशिवाय कोणाकडे बरे असेल? असे म्हणत क्रीडा पत्रकारितेतील शरद पवार महामहीम प्रल्हादसाहेब सावंत यांस दूरध्वनी केला, तर ते पीएमटीच्या बसवाहकाच्या मार्दवाने म्हणाले, की असल्या फालतू प्रश्नांची उत्तरे देण्यास आमच्याकडे वेळ नाही! तेव्हा आम्ही मनीं म्हटले, आपलेच चुकले! आपण दूरध्वनीवरून त्यांना आपली ओळखच नीट दिली नाही. त्यांना आपण म्हणजे पैलवान वा कबडीपटू वा खोखोपटू असे कोणी फालतूच वाटलो असणार! पण आता काय उपेग! वेळ गेली होती.
तेव्हा आम्ही थेट स्टारपत्रकार विजयकुमार साळवी यांना दूरध्वनी केला. तर समजलें, की ते चायनीज भेळीचा आस्वाद घेत आहेत. तेव्हा आम्हांस त्यांच्या दूरदृष्टीचे फारच कौतुक वाटले! म्हटले, आतापासूनच विजयकुमार बीजिंग ऑलिम्पिकची एवढी तयारी करीत आहेत, हे खासच स्तुत्य आहे! आम्ही त्यांस चीनदौ-याकरीता आगाऊच शुभेच्छा दिल्या. (व अन्य कुणास चायनीज खाऊच देऊ नका, म्हणजे मग आपला मार्ग सुकर, असा एक अनुभवी अनाहूत सल्लाही दिला!)
आता आमच्या या कूटप्रश्नाचे एकवीस अपेक्षित कुणाकडे बरे गावेल, असा विचारच करीत होतो, तो समोर काही उंचसे, पोलवॉल्ट जैसे उभे ठाकले! पाहतो तो सकाळपत्राचे आजीवआधारस्तंभ संजयपंत घारपुरे! त्यांस, बहुतेक पत्रकार असे का बरे पळण्याचा सराव करीत आहेत, असे पुसता, ते म्हणाले (व त्यातले जे आम्हांस समजले ते असे), की आजकाल तेसुद्धा पळण्याचा सराव करीत आहेत! तें का बरें, असे पुसता ते म्हणाले, की अनेक मराठी पत्रकारमित्रही असाच सराव करीत आहेत! (बातमी लिहून संपली तरी ती कशाची होती, याचा तप्पास लागू न देण्याची कला संजयपंतांनी कोठूनी बरें हस्तगत केली असावी?) तेव्हा त्यांस पुन्हा विचारले, की तें का बरें? तेव्हा कोठे त्यांनी, संजीवनी विद्येचे गुप्त मंत्रच सांगत आहोत, अशा स्वरात सांगितले, की मराठी जगतात आणखी काही मराठी वाहिन्या अवतरत आहेत!
हे ऐकताच बोरीबंदरचे ते स्थानक आम्हांस बोधीवृक्षासमच भासले! आमचे दोन्ही मेंदू एकदम लकाकले!... मनीं म्हटले, एकूण असे आहे तर! म्हणूनच जो तो पळण्याचा सराव करीत आहे तर!
परंतु महामहोपाध्याय कुमारजी केतकर यांनी महामहीम शरश्चंद्ररावजी पवारसाहेब यांजवर जाता-येता शब्दतोफा डागाव्यात यांत जसे काही नवल नाही, रावबहादूर भारतकुमार राऊतसाहेब यांच्या 'दृष्टिकोना'तून महाराष्ट्र टाइम्स हा जयमहाराष्ट्र टाइम्स असावा, यांत जसे काही विशेष नाही, तद्वत मराठी पत्रकारांनी लोकल बदलावी तशी कंपनी बदलावी यातही आता काही नवेपण राहिलेले नाही! पूर्वी कोणी साधे वृत्तपत्र बदलले तरी त्याची मुखपृष्ठवार्ता होई. आता लोकमतचे सारे उपसंपादक मिळून नवी मुंबई सकाळ काढताहेत (व त्यामुळे लोकमत सुधारला व गिरधारी (पक्षी - कार्यकारी संपादक, लोकमत, सानपाडा) यांच्या करंगळीवरील भार प्रचंडच हलका झाला, असे म्हटले जाते!), तरी त्याची कुणास दखलही नाही!! आजकाल तर नव्या च्यानेलचा, नव्या इंग्रजी पत्राचा सुवास लागताच अनेक मराठी पत्रकारांचे पाय बसल्या खुर्चीवर सळसळू लागतात. अर्थात त्यातील काही जातात, काही जातोजातो म्हणत वेतनचिठ्ठी फुगवून घेऊन राहतात, काही जातात व परत येतात! परंतु पळापळ मात्र होतेच!!
तर पळापळीचे हे चक्र पुन्हा कशामुळे फिरू लागले, या गुह्याचा शोध घेतला असता समजलें, की लवकरच रिलायन्ससारख्या काही बडया कंपन्या 'कर्लो च्यानेल मुठ्ठीमे' म्हणत मायमराठीत उतरत आहेत! शिवाय ई-टीव्ही मराठीची अखंड वृत्तगिरणीही सुरू होणार आहे!
ई-टीव्ही मराठी ही खरी बहाद्दरच वाहिनी म्हणावयास हवी! गतवर्षी साम मराठी या सकाळ समूहाच्या विलक्षण वाहिनीसाठी भरती झाली, तेव्हा म्हणे हैद्राबादेहून खास मेलगाडी सोडावी लागली होती!! अवघी रामोजी सिटी सकाळ भवनी रिकामी झाली! अशी दुःस्थिती असतानाही ई-टीव्ही मराठी चौबीस कलाक बातम्या देण्याचे म्हणतो, तेव्हा वाटते, ही मेलगाडी हलण्याचीच वाट पाहात होते की काय - हे रामोजी!! ये लोगां जाने दो.. फिर हम आच्चा मराठी नूजच्यानेल निकालेंगे!! शुद्ध मराठीत - गेले ते कावळे, राहिले ते मावळे!! परंतु ते तसे नसावे!! का की, अलीकडे हैद्राबादेहून 'या चिमण्यांनो परत फिरा रे' अशी आळवणी सुरू असल्याचे समजते. (सामसम्राट संजयजी दाबके, प्लीज नोट!)
चौबीस घंटे वृत्तघाणा फिरवायचा म्हटले, की तो कोलू फिरविण्यासाठी तेवढी माणसे लागणारच! आमच्या मराठी पत्रकारांना च्यानेलमधले एवढे कळतेच! आणि म्हणूनच सध्या अनेकांचा पळण्याचा सराव सुरू आहे! माणसं रेडी आहेत, स्टेडी आहेत, रा. रा. राजेंद्रबाबू साठेंनी एकदा पुस्तकातून नजर काढून 'गो' असे पुटपुटण्याचा अवकाश, की हीss मॅरेथॉन सुरू होईल!!
आणि समजा रिलायन्सचा च्यानेल उद्या आलाच मराठीत तर....?
मायला, नॅनो आताच बुक करून ठेवावी काय!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. १००७०८)
सायंकाळी कचेरीतून स्वगेही(च) परतलो, तर मीडिया कॉलनीच्या कट्ट्यावर लहान-लहान मुले खेळता-खेळता गप्पा मारत बसली होती. मनीं म्हटले हे तर कचेरीसारखेच झाले! काम करता करता गप्पा मारणे वगैरे हे तर खास कचेरी कल्चर! मुले किती अनुकरणशील असतात नाही!.... मराठी पत्रांसारखी!!
आता कोणी गप्पा मारत असेल, तर त्या न ऐकणे हे काही आमुच्या अंगभूत भोचकपणास शोभे ना! तेव्हा आम्ही त्यांच्या परिसंवादाकडे कान दिला व शांतचित्ताने त्यांचे दोन शब्द ऐकू लागलो...
--------------------------
"आयला काय शॉलेट मजा आली आज! भेंडी एकदम धम्माल!!" स्टार माझा म्हणत होता.
"ये काय झालं रे? काय झालं? मलापन सांग ना"... झी २४ तास म्हणाला.
"अरे काय शॉलेट मजा माह्यताय! ते बाबा हायेत ना बाबा... राजीनामा दिला त्यांनी!" स्टारने डोळे उघडत नीट बघत सांगितले. धर्मरावबाबा आत्रामांच्या राजीनाम्याबद्दल तो सांगत होता. आजकाल मुलांनाही राजकारणातले किती कळते व त्यांना त्यात किती रस असतो, हे पाहून आम्ही मनोमनीं गहिवरलोच.
त्यावर आयबीएन मोठ्या तो-यात म्हणाला, "हॅ! मग त्यात काय मजा? तुला माहिताहे? काहींची आमदारकी जाते... काहींची मंत्रीपदे जातात... पण आमचे लक्ष असते स्ट्रायकरवरती..." आम्ही मनीं म्हटले, मुलांच्या मनावर जाहिरातींचा किती परिणाम होतो नाही!
"हां भौ. याच्याकं ना खरोखरचा स्टायकर हाये भौ... केवडा मोटा है माह्यते? हे एवsssडा मोटा!!" लोकमतच्या डोळ्यांत थोर कौतुकाची भावना होती.
"ये पन कुनामुळं राजीनामा दिला माह्यताय का?... तुला माह्यताय?.... तुला माह्यताय?... अर्रे, माझामुळं दिला! - स्टार छाती काढून याला-त्याला विचारीत म्हणाला. त्याला 'माझ्यामुळं' असे म्हणायचे असावे, पण 'माझा'मुळे असे म्हणाला!
आम्ही मनीं म्हटले, आजकाल या मुलांच्या मराठीचे काही खरे नाही! आम्हांला स्टारची परवाची जम्माडीगम्मत स्मरली. विंदा करंदीकर आहेत ना ते मुलांचे फार लाडके! कसल्या कसल्या पिशीमावशीच्या टेरर बालकविता लिहितात ना! तेव्हा एका स्टार सुकन्येने त्यांना फोन केला आणि विचारलं, 'काका काका, ते कौतिकराव काका ना अमेरिकेत संमेलन घेणारेत माह्याताय?' आता विंदा मुलखाचे कोंकणी! ते म्हणाले, 'त्याला म्हणावं दक्षिण ध्रुवावर घे!' तर स्टार सुकन्येला कळेनाच काही! तिला वाटलं असावं, दक्षिण ध्रुवावर संमेलन घेतलं, तर आपले प्रकाशक काका कसे जाणार तिथं? तिथं फक्त पेंग्विन प्रकाशनालाच प्रवेश असणार! तेव्हा तिने गालाचा फुगा करून विचारलं, 'पन विंदाकाका, अमेरिकेला का नको संमेलन घ्यायला, सांगा ना...' त्यावर विंदा उखडलेच. त्यांनी सरळ फोनच आपटला! आता त्यात त्या सुकन्येची काय चूक? मुलांना कधी समजतो का उपहास आणि वक्रोक्ती? पण हे विंदांना कोण सांगणार! तर अशी ती जम्माडीगम्मत!!
तिकडं सकाळने आपलं पुणेरी नाक उडवलं. "हॅ!! मराठी प्रमाणभाषासुद्धा बोलता येत नाही साधी! आणि म्हणे माझामुळे! ये तुमाला माहिताहे बाबा कुणामुळे गेले? याच्यामुळे नाही काही! माझ्यामुळे गेले!"
आम्ही मनीं म्हटले, की वास्तविक सकाळ अशा टारगट वादात पडत नाही! खरे तर कोणत्याच वादात पडत नाही! पण हल्ली सकाळचेही मुंबईत काही तरी बिनसले आहे. बहुधा ग जीवनसत्वाची बाधा झाली असावी! त्यामुळे तोही 'इफेक्ट' मिरवित फिरू लागला आहे! परवा तर सकाळने जम्माडीगम्मतच केली. मटात बातमी आली होती, की किशोर नांदलस्कर नावाचे नट घर नसल्याने देवळात झोपतात. त्यावरून सकाळने बातमी केली, की नांदलस्कर घर नसल्याने देवळात झोपतात! मग मुख्यमंत्र्यांनी नांदलस्करांना घर दिले. तेव्हा सकाळने जणू ते आपणच सकाळ रिलिफ फंडातून दिलेय अशी बातमी छापली! अशी ती जम्माडीगम्मत!
"च्यलेss... भेंडी! काय पन बोलू नको!" स्टारने बंबैया आवाज दिला. राजची भाषणे लावून लावून स्टारसुद्धा 'जहर कसे उगलायचे' ते शिकला वाटते! "बाबांच्या बातम्या कुनी दिल्या होत्या माह्यताय? भेंडी, सतत देत होतो आपन बातम्या."
"ए हा स्टारुल्या खोटारडा असणं शक्य आहे की नाही रे! सर्वप्रथम मीच दिली होती की नाही बातमी. ते बघ, पहिल्या पानावर छापली होती. गार्सिया काकांच्या लेआऊटमधे..." सकाळ सौम्यपणे म्हणाला.
"तुला आऊट करू का आता?... खोटा बोलायचं काम नाय!" स्टार रागावला.
तेवढ्यात आयबीएनने लोकमतची साक्ष काढली, "पन आमीसुद्धा बातमी दिली होती, होय की नाय रे?"
"आमीपन दिली होती." लोकसत्ता हळूच म्हणाला (कारण की पहिल्या दिवशी त्याची बातमी चुकली होती!) आणि निघून गेला.
"आमीपन दिली होती. आणि एकदाच नाही काही. वारंवार." मटा म्हणाला आणि लोकसत्ताला खुन्नस म्हणून तोही निघून गेला! तेव्हा लोकसत्ता लांबूनच ओरडला, "आमीपन दिली होती.... वारंवार." आम्ही मनीं म्हटले, यांच्या खुन्नसचे पर्सेंटाईल हल्ली वाढतच चालले आहे! शोचनीय आहे!!
"ये बाईंना सांगेन हां तुजं नाव मी!" सकाळ रडवेला होत चिडून म्हणाला. "पहिली बातमी आमीच दिली होती. आमचाच नंबर पयला!!"
"च्यलेss भेंडी!... कायपन बोलू नको." स्टारने पुन्हा दम दिला.
"ये मई बोलूं क्या? ये सकाळ कब्बी झूट नई बोलेगा." ईटीव्ही हैद्राबादीने सकाळची बाजू घेतली.
"भेंडी मग काय आमी खोटा बोल्तो काय? दाखवू काय आम्चा टीआर्पी?" स्टार आता भांडणालाच आला.
"ये भांडायचं नाय आपन!!... आनि ना, याचा टीआर्पी ना मेट्रोतच ज्यादा हाय माह्यतेय?" झी २४ तासने समजावणीचा सूर काढतानाच स्टारला एक चिमुकचिमटासुद्धा काढला.
"पन आमच्या पाठपुराव्यामुळंच बाबा गेला! कोनपन हे सांगेल!" स्टार पूर्वपदावर आला.
"कोनपन कसं सांगेल रे? तुमी तर कुण्णाकुण्णाला दिसतपन नाय!" आयबीएनने जीभ काढून त्याला चिडवलं.
"पन आम्हीच ती बातमी सर्वप्रथम दिली!!" सकाळ म्हणाला.
"आनि ना, आमी लावून धरली." लोकसत्ता लांबूनच ओरडला. मग मटाही लांबूनच हेच ओरडला!
"नाय, आमीच दिली." स्टार म्हणाला.
"आम्हीच दिली."
"आमीच दिली."
"आम्ही."
"आमी."
बराच वेळ हा पोरखेळ चालला होता. मग आम्ही कंटाळलो.
मनीं म्हटले, बातमी आधी कोणी दिली याला एका मर्यादेनंतर खरेच काही अर्थ असतो का?
आणि अशी बातम्यांमुळे कुणाची मंत्रिपदे वगैरे जात असतात हे तरी खरे आहे काय?
बातम्यांमुळे ना पदे जातात, ना बातम्यांमुळे पदे टिकतात!
अशा बातम्या म्हणजे असतात, सत्ताकारणाच्या दातेरी यंत्रातला साधासा लिव्हर!
सत्ताक्रीडापटू या लिव्हरवर हात ठेवून असतात. वेळ येताच खेचतात!
मग आपण म्हणतो, बातमीमुळे पद गेले (वा वाचले)!
तसे असते खरोखर, तर एवढ्या बातम्या येऊनही रा. रा. विनायकराव मेटे, रा. रा. वसंतराव पुरके अजून लाल दिव्यांच्या अंब्यासिडरांतून फिरत असते काय?
पण मीडिया कॉलनीतल्या पोरखेळाला काय? तो चालतोच...
-------------------------------------------------
स्वगेही आलो. रिमोट माझा हाती घेतला. डोळे उघडले. नीट बघितले.
तर स्टार माझावर स्वढोल पिटणे सुरूच होते!
आम्ही मनीं म्हटले, झाका डोळे, झोपा नीट!!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ०८०७०८)
रविवारी अप्पा (पक्षी : अशोकराव पानवलकर, मटावाले) अंमळ (म्हणजे तब्बल तेरा मिनिटे) उशीरानेच उठले. सकाळची (वृत्तपत्र नव्हे) नित्यकर्मे थोड्याशा निवांतपणेच उरकली. मग कषायपेयाचा कोप हाती घेऊन त्यांनी वृत्तपत्रांचे चघाळ समोर घेतले. कोचावर पाय दुमडून पहिल्याछूट त्यांनी नाकावरील चष्म्याने मटा स्कॅन केला. मग वाचला. एक दोन-ठिकाणी त्यांना चहाचा घोट कडवट लागला. आपल्या रॉममध्ये त्यांनी तो एरर मेसेज सेव्ह केला. मग चाळीशी बोटाने मागे-पुढे करून त्यांनी लोकसत्ता हाती घेतला. समग्र लोकसत्ता ब्राऊज केल्यावर त्यांनी हॅ असे केले आणि मग लोकरंगची फाईल ओपन केली. पान १ - केतकरांचा पानभर लेख व तीन जाहिराती. नंतर वाचू... (जाहिराती नव्हे, लेख.) पान २ - नेहमीचीच सदरे. नंतर पाहू... पान ३ - रत्नाकर मतकरींचा लेख. मतकरींना मटा आठवला नाही काय? आपल्या रॉममध्ये त्यांनी एक भली मोठी वर्डफाईल सेव्ह केली! या पानावर तंबी दुराई आहेच.. आणि हे काय खाली? मुकुंद टाकसाळेंचा लेख!...
पुण्याच्या अखिल मराठी सिक्युरिटी प्रेसमधला (पक्षी - टांकसाळीतला) तो तरोताजा विनोदी लेख अप्पांनी नुसत्या चाळीशीने स्कॅन केला आणि त्यांच्या गोलगो-या चेह-यावर एक तुकतुकीत हसू उमटले!.. आता मरा! विनोदी लेख आणि तोही साहित्य संमेलनावर छापताहेत लेकाचे... आता छापा म्हणावं दिलगिरी!!
------------------------------------------------------------------------------------
हारिस शेख द्वारा मटा ऑनलाईन एट इंडियाटाईम्स डॉट कॉम रात्रपाळीवरून नुकतेच परतत होते. डोळ्यांत निद्रादेवीचे तांडव सुरू होते. पापण्यांवर झोप सारखी अपलोड होत होती. झुकझुक आगीनगाडी जणू आपल्यासाठी खडखड अंगाईच गात आहे, असा भास त्यांना होत होता. आता आपले स्थानक येईल, असे म्हणत ते जागे राहण्याचा अटोकाट प्रयत्न करीत होते. तेवढ्यात त्यांच्या बाजूच्या सहप्रवाशाने त्यांना विनंती केली - सीधा बैठो ना भाई! तेव्हा हारिसभाऊच्या लक्षात आले, की अरे आपण तर झोपलोच होतो! मग ते उठलेच.
आता झोप यायलाच नको, म्हणून त्यांनी ब्यागेतून वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बाहेर काढल्या. मटा-संवाद तर रात्री साईटवर अपलोड करतानाच पाहिला होता. तेव्हा त्यांनी मुंबै सकाळची सप्तरंग पुरवणी हाती घेतली. व्वा! मुख्य लेख विनयजी सहस्रबुद्धेंचा आहे. आघाडीचे राजकारण की राजकारणाची आघाडी? पहिली काही वाक्ये वाचताच त्यांच्या ध्यानी आले, की हा लेख शय्यासोबतीस बरा आहे! तेव्हा त्यांनी लोकरंग उघडला. मुख्य लेख केतकरसाहेबांचा. हा जागेपणीच वाचावा, असे म्हणत त्यांनी पान उघडले आणि त्यांच्या नजरेस बरोब्बर टाकसाळेंचा लेख पडला... 'हॅलो हॅलोला हलकट उत्तर'!
हारिसभाऊ वाचू लागले, आणि त्यांना ते सर्व काही अगदी ओळखीचे वाटू लागले! अगदी अस्साच लेख आपण कुठेतरी वाचला होता! आणि एकदम त्यांना आठवले, अरे गेल्या रविवारी मटामध्ये आपणच तर तो लेख लिहिला होता. - साहित्य संमेलनाची ट्वेंटी-२०! अगदी हीच इस्टाईल, असाच संवाद, पात्रे वेगळी, पण विषय तोच...
मग एकदम त्यांना खट्टू खट्टू वाटले! डायना गायीची (संदर्भ - डायना, लेखक हारिस शेख, गत ऐतवारची संवाद पुरवणी) याद आली की जशी व्याकुळता त्यांच्या डोळ्यांत तरळते, तोच भाव, तीच व्याकुळता त्यांच्या डोळ्यांत पुन्हा उतरली! त्यांना वाटले आता आपल्याला पुन्हा झोप येणार! मग ते सावरून, विचार करीत बसले.... किती विनोदी संवादी लेख लिहिला होता आपण! संपादकांनी दिलगिरी छापायची काही गरज होती का? पण छापली. सगळा विनोद किरकिरा केला...
हारिसभाऊंना वाटले, डायनाच्या गळ्यात गळा घालून मनसोक्त.......... झोपावे!!
-----------------------------------------------------------------------------------
आता आम्हांला विचाराल, तर हारिसभाऊंच्या लेखाहून मटाची ती दिलगिरीच मोठी बहारदार-गंमतदार होती!
आम्ही तर म्हणतो, गेल्या दहा हजार वर्षांत कोणी अशी दिलगिरी व्यक्त केली नव्हती!
"महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार दि. २९ जूनच्या अंकात खासबात या पानावर साहित्य संमेलनाची ट्वेंटी-२० हा हारिस शेख यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. तो उपरोधिक आणि काल्पनिक संभाषणावर आधारित होता. परंतु ते संभाषण प्रत्यक्षात झाल्याचे बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळे व कौतुकराव ठाले-पाटील आणि संबंधितांना वाटले. हा लेख छापण्यामागे देवकुळे अथवा संबंधित यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तरीही त्यांना मनस्ताप झाला, याबद्दल महाराष्ट्र टाइम्स दिलगिरी व्यक्त करीत आहे. - संपादक"
-----------------------------------------------------------------------------------
म्हणजे त्याचे झाले काय, की हारिसभाऊंनी जो गमतीजमतीने लेख लिहिला, त्यातला विनोद-उपहास देवकुळे व संबंधितांना समजलाच नाही! त्यांचे जाऊ दे. त्यांचा आणि मराठीचा संबंध बहुधा शाळेतच सुटला असावा! पण आमचे कवतिक-ए-साहित्य कौतिकराव ठाले-पाटिल व संबंधितांनाही मराठी विनोद कळावा ना! (कवतिकराव या टायमाला एखांदा इनोदी लेखकुच अध्यक्ष करा बरं! म्हंजी मंग तुमचा आन् इनोदाचा कायबी संबंध नाही असं कुनी म्हनायला नकु!! नाय तर मंग देवकुळे आनि संबंधितांना सांगून इनोद समजायचे एखांदे सॉफ्टवेरच इकसित करून घ्या ना पटदिशी!! )
असे असले तरीही आम्हांला कवतिकराव व देवकुळे व संबंधितांच्या कल्पनाशक्तीचे मात्र भारीच कवतिक वाटते! (हा आमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा परिणाम! असाच विचार केला, की मग अमेरिकेतील संमेलनामुळे मराठी भाषा एकाच फटक्यात ग्लोबल होईल असेसुद्धा वाटू लागते!) कवतिक अशासाठी, की त्यांना त्यांचे जे काल्पनिक संभाषण होते, तेच प्रत्यक्षात झाल्याचे वाटले!!
आमच्या बे एरियातल्या बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काल्पनिक संभाषण प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या अमेरिकेतल्या यूएसमध्ये हा हलकल्लोळ झाला!! अवघे एनआरएम (परबजी मटाऑनलाईनवाले, एनआरएम म्हणजे नॉन रिडर्स मराठी असेच ना?) खवळले! आधीच दि.पुं.नी संमेलनाला नाट लावलेली! पुन्हा देवकुळेविरुद्ध राक्षसकुळे हा जुना वाद होताच! तो खदखदत होताच. त्यात ही प्रत्यक्षातल्या काल्पनिक संभाषणाची मिर्चि पडली! लोकांना ठसकायला काय एवढे कारण पुरे!! अखेर मनःस्तापून देवकुळे आणि संबंधितांनी अप्पा पानवलकरांना आयएस़डी लावला! म्हटले, कम व्हाट मे... दिलगिरी छापाच. त्यासाठी काही फंड-बिंड, जागा-बिगा लागेल त्याची सगळी व्यवस्था इथं अमेरिकेतून करू आपण!!
आता थेट अमेरिका खंडातूनच आयएसडी आला म्हटल्यावर अप्पा तरी काय करणार? त्यांनी दुस-याच दिवशी तातडीने ही दिलगिरी छापून टाकली! म्हणजे कसं, अमेरिकेतून आयएसडी आलाय ना!! शिवाय न केलेल्या चुकीबद्दल दिलगिरी मागितली, तर त्यात आपलाच मोठेपणा नाही का?
----------------------------------------------------------------------------------
झाले ते झाले!!
आता लोकसत्ताची बारी आहे दिलगिरीची.
त्यांनी एकदा वि. भा. देशपांडे आणि संबंधित, निखिल वागळे आणि संबंधित, डॉक्टर लेले आणि संबंधित यांची साग्रसंगीत दिलगिरी व्यक्त केली, की आपण सारे मराठी विनोदाच्या नावे अंघोळ करण्यास मोकळे होऊ!!
हवे तर त्यानंतर विनायकराव मेटे, छगनजी भुजबळ, नारायणराव राणे, बाळासाहेब ठाकरे यांपैकी कोणीही एकाच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनात एक परिसंवाद ठेवता येईल -
मराठी साहित्यातील विनोदाची परंपरा का खंडित झाली?
(Posted by बापू अत्रंगे, दि. ०६०७०८)
नवी मुंबै सकाळ पत्राच्या अब्जावधी मराठी वाचकांस कळविण्यास आम्हांस अत्यंत हर्ष होत आहे, की
लाखो वाचकांसाठी ज्ञानाची पाणपोई (स्मरा - समग्र सोळा पानी सकाळ), रुग्णाईतांसाठी घरचा वैद्य (स्मरा - फ्यामिली डॉक्टर), पर्यटकांसाठी टूरिस्ट कंपनी (स्मरा - भारतदर्शन स्पर्धा), सुगृहिणींसाठी सुमहिला सुमंडळ (जावूनी याचि डोळा पाहाच - मुक्तांगण सुमहिला सुमंडळ) ऐश्या नाना भूमिका बजावणा-या सकाळ पत्राने आता आपुल्या अब्जावधी मराठी वाचकांकरीता एक नूतननवी भूमिका अंगिकारली आहे!
अर्थात तैसी सप्तरंगी जाहिरात सकाळने अद्याप केलेली नाही, परंतु आजचे सकाळ पत्र ज्यांनी दहा मिनिटांहून अधिक काळ वाचला असेल, त्या आमच्यासारख्या अब्जावधी सुज्ञ वाचकांच्या हे तत्काल ध्यानी आले असेल, की सकाळ आता प्रज्ञाशोधक झालेला आहे!
आजवर सकाळने का कमी कार्यक्रम केले आहेत?
नवोदितांचा ऑर्केस्ट्रा, मिसेस ठाणे (की ठाणे महिलाश्री) ऐसी कोणतीशी स्पर्धा, प्रश्नमंजुषा (यात गणेशाची दोन नावे सांगा, यांसारखे अवजड यक्षप्रश्न विचारून वाचकांना ज्ञानार्जनासाठी प्रवृत्त केले जात असे, अशी नोंद आहे.) ऐसे अत्यंत कल्पक इव्हेन्ट भरवून ते सकाळ पत्राने यशस्वीरीत्या साजरे करून टाकलेले आहेत! दर इव्हेन्टला दरवेळी नूतननवा कलावंत! (यांस सकाळमध्ये सेलेब्रिटी म्हणतात! बालवाचकांनो, सेलेब्रिटी म्हणजे ज्या मनुष्यप्राण्यास बोलावून सकाळ आपले कार्यक्रम सेलिब्रेट करतो तो! समजले ना?) आज परिस्थिती ऐशी आहे, की सकाळमध्ये कार्यक्रमानिमित्ते गेला नाही, ऐसा एक कलाकार (वा कलावती) या थोर मराठी चित्रपट-नाट्य-मालिकासृष्टीत उरलेला नाही! हल्ली तर म्हणे, समस्त मराठी कलाकार सकाळचे इव्हेन्ट कॅलेन्डर पाहोनीच प्रोड्युसरांस डेट्स देतात! न जाणो सकाळच्या एखाद्या कार्यालयातील एखाद्या केबिनचा वर्धापनदिन असायचा आणि आपण आपले फालतू शूटिंगमध्ये व्यस्त असायचो! नकोच तो घोळ!! (तशी आणखीही एक बोलवा आहे, की सकाळचे माध्यमप्रतिनिधी, बायलाईन-शिरोमणी संतोषकुमार भिंगार्डेजी यांना पाहताच, टॉमला पाहूनी जेरीची जैसी पळापळ होते, तैशी कलाकारांची पळापळ होते! कार्यक्रमांस येण्याची गळ घालूनी जेरीसच आणतात संतोषकुमार!)
आता एवढे सगळे कलाकार 'सकाळ भवनी' येतात (!) म्हटल्यावर, त्यांच्या अंगभूत गुणांना उजाळा देणे नको? अखेर मराठीतील अब्जावधी कलाकार हे सकाळचेच एकनिष्ठ वाचक ना! त्यांच्यासाठी स्कीम न आखावी, तर सकाळच्या निर्भिड, निःपक्षपाती, जनहितकारी, विधायक इत्यादि पत्रकारितेस बट्टा लागला ऐसे नाही होणार?
तर सकाळच्या अब्जावधी मराठी वाचकहो,
तुम्हांस कळविण्यास आम्हांस अत्यंत आनंद होत आहे, की
कलाकारांच्या गुणांना कशाचेतरी कोंदण बसविण्याचे सोनारकाम सकाळने सुरू केले असून, थोर नटसम्राट पंढरीनाथ कांबळे यांच्यापासून या स्कीमला प्रारंभ झाला आहे. (समस्त नट-नट्यांनो, त्वरा करा. ऑफर कोंदण असेपर्यंतच!)
त्याचे ऐसे झाले, की सकाळने आपल्या अब्जावधी वाचकांच्या अनुभवकक्षा रुंदावण्याच्या सद्हेतूने आपल्या पर्यटनविकास योजनेंतर्गत (कोण तो छिद्रान्वेषी, खपवृद्धी योजनेंतर्गत म्हणतोय?) जी भारतदर्शन स्पर्धा भरविली होती, त्या स्पर्धेची सोडत काल सकाळच्या अत्याधुनिक कार्यालयात झाली!
(अद्याप पाहिले नाही तुम्ही सकाळचे अत्याधुनिक कार्यालय? किती तुम्ही अभागी? सध्या तर सकाळच्या प्रत्येक श्रमिक व अश्रमिक पत्रकारांच्या मुखी केवळ या कार्यालय स्तुतीचाच सामवेद आहे! काय त्याचे इंटेरिअर, काय त्यातील केबिनी आणि क्युबिकले, काय त्यांच्या काचा.... (कचेरीमध्ये काचा गं!) अहाहा अहाहा!! समग्र कार्पोरेटच!! (कचेरी कार्पोरेट असते की कार्यपद्धती? आम्ही जरा संभ्रमात आहोत! पण ते असो!) आमचा तर ऐसा मशवरा आहे, की सकाळने 'कार्यालय दर्शन' ऐसा इव्हेन्ट ठेवण्यासही काही हरकत नाही! हवे तर सकाळचे वर्गणीदार व्हा व सामचे स्टुड्योही पाहा ऐसी काही स्कीमही ठेवावी!!)
तर या स्पर्धासोडतीसाठी पाचारण केले होते, नन अदर दॅन नटसम्राट पंढरीनाथ कांबळे (ऊर्फ पॅडी), नटसम्राट किशोर नांदलस्कर आणि अभिनयसम्राज्ञी मृणाल देशपांडे यांना!
हे पॅडी कोण हे तुम्हांस ज्ञात आहे ना? सकाळने त्यांचा परिचय करून दिला आहे - "विनोद हे त्याचं अंगभूत लक्षण. त्यामुळे तो समोर असला, की हास्याचे तरंग उठणारच. " या वर्णनावर जाऊ नका, तो काही विदुषक नाहीये सर्कशीतला! गंगुबाई नॉन मॅट्रिक नावाच्या एका अभिजात मालिकेत त्याने जो अजोड अभिनय अविष्कार दाखविला आहे, तो वर्णन करण्यास शब्द नाहीत आमच्याकडे! धादांत चार्ली चॅप्लीन! (चॅप्लिनसर, आय एम सोरी हं!!) किशोर नांदलस्कर यांना तर आपण ओळखतच असाल! आणि मृणालताई देशपांडे... (यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पटताच, कळवितो.)
आता तुम्ही म्हणाल, की यात काये विशेष? सकाळ म्हटल्यावर तेथे ऐसे दिग्गज कलाकार असणारच! रास्त आहे तुमचे म्हणणे. तथापि या कार्यक्रमात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे घडले. त्याचे ऐसे झाले, की कार्यक्रम सुरू झाला. मान्यवरांची ज्ञानबोधक व्याख्याने झाली. सोडत निघाली. सकाळच्या वृत्तानुसार, "या तिघांनी सकाळच्या लाखो वाचकांतून ३४१ भाग्यविधात्यांचे भाग्य उघडले." (भाग्यविधात्यांचे भाग्य उघडणारे हे तिघे भाग्यवानच म्हणायचे!) झाले. आता पुढे काय? एवढे थोर कलाकार कार्यालयी आले म्हटल्यावर त्यांना कायी ऐसेची सोडावे? मग काय गप्पांची मैफलच सुरू झाली. पॅडीने गप्पांच्या ओघात "तो विनोदी नट असला तरीही त्याला गंभीर गाणी ऐकायला आवडतात, हेही निःसंकोचपणे सांगितले." (संकोचू नका, सकाळच्या वृत्तात असेच म्हटले आहे!) आता पॅडीनेच आपले गुपित असे चारचौघात सांगितल्यावर मग काय सकाळचे पत्रकार ऐकतात काय? त्यांनी निःसंकोचपणे त्यास गीतगायनाची फर्माईश केली! आणि काय सांगू महाराजा, जे हत्ती कालाचे ठायी पॅडी चक्क गायला! सुरात गायला, मनमोकळे गायला! गज्जल म्हटली त्याने ः न झटको जुल्फ से पानी! त्याच्या विनोदाला बसलेले हे स्वरांचे कोंदण पाहून आम्ही तर पाणीपाणी झालो! सकाळचे "सारेच मंत्रमुग्ध होऊन त्याच्या या आगळ्यावेगळ्या रुपाकडे पाहात" राहिले... मग त्याने या समस्त कानसेनांप्रती आणखी गज्जलांजली अर्पण केली. ती ऐकून पुन्हा सारे मंत्रमुग्ध झाले... (गुलाम अलीसाहब बंदे को मुआफ करें!)
सकाळगंधर्व पं. पॅडीमहाराज गंगुबाईवाले यांची महेफिल अशी उत्तरोत्तर रंगतच गेली....
पण आम्हांस या मैफलीपेक्षा कवतिक आहे, ते सकाळने एका प्रज्ञावंताचा शोध लावला त्याचे! विनोद आणि नाचात अडकून पडलेल्या एका कलावंतातील महागायक सकाळ पत्राने आपल्या अब्जावधी वाचकांसमोर आणला आहे. सकाळचे हे ऋणकोंदण मराठी संगीतविश्व कधीही विस्मरणार नाही, याची आम्हांस हार्दिक खात्री आहे! सकाळने या प्रज्ञाशोधासारख्या अतिमहत्त्वाच्या विषयावरील सविस्तर अँकरस्टोरी प्रसिद्ध केल्याबद्दल सकाळच्या सर्व संपादकांचे आम्ही शतशः आभारी आहोत!
(Posted by बापू अत्रंगे, दि. ०४०७०८)
आशुतोष गोवारीकरने स्टोरी थोडी जरी फिरवली असती ना, तरी जोधा-अकबर हिट गेला असता!...
किंवा
सचिनने ना आता रिटायरच व्हायला पायजेल! अरे, साधा बॉल नाय अडवता येत ब्याटीने...
किंवा
हे सगळं विलासरावांचंच नाटक आहे! त्यांनी बरोब्बर मोका साधून राणेंची कन्नी कापली!...
अशा चर्चेसाठी थोर काही अर्हता लागते असे तुम्हांस कोणी सांगितले? वास्तविक राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट हे अखंड विश्वातले असे तीनच विषय आहेत, की ज्यावर कोणीही काहीही कुठेही कितीही बोलू शकते!
आणि तुम्ही जर शाळेत वगैरे नीट मराठी शिकला असाल आणि मराठीच्या पेपरातील निबंधात तुम्हाला किमान सात गुण पडत असतील, तर मग तर तुम्ही या बीटचे पत्रकारसुद्धा होऊ शकता!
शकता काय? होताच!!
म्हणजे आम्ही व्यवस्थित निरिक्षण करतोय, की पत्रकारितेत येणा-या प्रत्येक नवीन रिक्रुटाला एक तर नट-नट्यांवर लिहायचे असते किंवा क्रीडा खात्यात ब्याटिंग करायची असते! राजकीय बीटचे तिकिट तसे एकदम कोणी मागत नाही! (आणि समजा कोणी मागितले, तरी बीटश्रेष्ठी बरे त्याला आपल्या मतदारसंघात उभे राहू देतील? बजेट अधिवेशनात मिळणारी ब्याग आणि दर पावसाळ्यात फुकट मिळणा-या छत्रीवर असे बरे कोणी पाणी सोडील!) पण मला राजकारणावर लिहायचे आहे, असे म्हणणारा एक शिकाऊ पत्रकार परवा आम्हांला भेटलाच!!
या सर्वांत आम्हांस क्रीडा खात्यातील पत्रकारांची मात्र छानच पोटदुखीयुक्त चंमतग वाटते! लहान मुले जितक्या सहजतेने डब्बा ऐसपैस खेळतात, तितक्या निरागस सहजतेने ही मंडळी क्रीडा पत्रकारितेचा खेळ करीत असतात! हातात पान एक! मलपृष्ठ! कधी कधी दोन! ट्रान्सलेट इन टू गुड्ड मराठी केले की बातम्या तयार! त्याच्या लगो-या रचल्या की हे मोकळे!
संपादक वगैरे होणारी मंडळी ही तशी बैठीच असल्याने त्यांनी आव आणला तरी त्यांना खेळातले काही कळत नाही, हे या क्रीडा पत्रकारांना बरोब्बरच समजलेले असते. त्यामुळे त्यांच्या खात्याला कोणताही स्वातंत्र्यलढा असा उभारावाच लागत नाही! हे आपले बॉर्न फ्री!!
आमचे बाळसाहेब करमरकर गेल्यानंतर मराठी क्रीडा पत्रकारितेचं मैदान घुमविणारा कोणी गावलाच नाही मराठी पत्रांना. मराठीत करमरकर साहेब आणि इंग्रजीत बॉबी तल्यारखान! आणखी के. एन. प्रभूंचे नाव घेतले की मग सारे स्टेडियम रिकामे!
हल्ली तर आमचे हे खेळगडी इतके पोकळबाबू झाले आहेत, की साध्या क्रिकेट म्याचचे विश्लेषण करण्याच्या फंदातसुद्धा ते पडत नाहीत! थेट समालोचनच करतात! तेही कसे? तर एकदम रामायणातील युद्धकांडच सुरू! "धोनीच्या धुरंधरांनी क्रिकेटच्या कुरूक्षेत्रावर उतरताच आपल्या भात्यातील बाण काढून लंका दहनाला सुरूवात केली..." अरे काय युद्धवार्तांकन करताय काय? तुम्ही जशी हापिसच्या खर्चाने कचेरीतल्या टीव्हीवर ती म्याच पाहिली, तशीच ती आम्ही रजा काढून आमच्या घरी पाहिलीय ना? मग? कोणी चौकार मारला व कोणी फलंदाजी केली हे पुन्हा कशास सांगता? त्या म्याचची, खेळाची खुबी काही सांगणार की नाही? बरे, क्रिकेटचे सोडा! कबड्डी, खोखो, मल्लखांबादी मैदानी खेळ यांप्रती तरी काही बोलणार की नाही? यातील काही ज्ञान नसेल, तर लहानपणी डब्बाऐसपैस, रंगणीचिली, रस्सीखेच, आबाधुबी, काचकवड्या असे तरी काही खेळला असाल की नाही? मग त्याबाबत तरी काही विद्वत्तेने लिहा!! नुसतीच सामन्यांची वृत्ते प्रसिद्ध केली म्हणजे का झाली क्रीडा पत्रकारिता?
परंतु सध्या तरी हा असाच खेळ सुरू आहे... आंधळ्या कोशिंबिरीचा!
करमरकर साहेब पाहताय ना?
आज आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकारिता दिन आहे, हे सुद्धा आमच्या मराठी पत्रकारांना माहित नाही! चौ-यांशी वर्षांमागे आजच्याच दिवशी प्यारिस ऑलिम्पिंकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेची स्थापना झाली होती.
पण हे माहित असायचे काही कारणच नाही...
क्रीडा पत्रकारिता राहिलीय कुठे त्यांच्यात?
तुका म्हणे आता, राहिलो स्पोर्ट्स बीटपुरता!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. 020708)
मागील लेख
-
▼
2008
-
▼
July
- ग्रहण!!
- मराठी पत्रांतील ब्रेनड्रेनवर क्ष किरण
- (सांप्रतचा) संपादक होणे आहे!
- अजि म्या विश्वासठराव पाहिला...
- पबब! काय ही गंमत!!
- दहा मिनिटांची शोकसभा!
- गोव्यातील नाझीगेट व वृत्तपत्रांचे वस्त्रहरण!
- महेशकुमार यांचे सत्याचे प्रयोग!!
- आपण सारे शुर्पणखा!!
- विचारार्थ सहा गंभीर वाक्ये...
- पळा पळा... कोण च्यानेलमध्ये पळे तो...
- मीडिया कॉलनीतील मुले भांडतात, त्याची गोष्ट...
- दास्तॉं-ए-दिलगिरी!
- सकाळगंधर्व पं. पॅडीमहाराज गंगुबाईवाले व सकाळपत्राच...
- क्रीडा पत्रकारांना आमचाही 'दुसरा'!
-
▼
July
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

