'जे न देखे रवी ते देखे कवी', असे कुणा कवीनेच लिहून ठेवले आहे! याचा अर्थ असा, की कवीला अंधारातल्या भानगडीही कळतात! शिवाय 'कवी द्रष्टा असतो' असे (पुन्हा कवीच) म्हणतात!! पण आमचा यावर सुईच्या अग्रावर बसेल एवढाही विश्वास नाही. बायकोचा चपलाहार आणि पाटल्या मोडून काढलेल्या काव्यसंग्रहाची पहिली एक हजाराची आवृत्ती संपण्यासाठी किती दशके लागतील, हेही ज्याला 'दिसत' नाही, तो कैसा द्रष्टा? त्यांचे भविष्यकथन तर ज्योतिषांप्रमाणेच हमखास चुकते! यावर कोणी 'पुरावा आहे काय?' असे बोमन इराणीच्या आवेशात विचारू शकते. विचारू दे खुशाल! आमच्याकडे अगदी ताजा ताजा पुरावा आहे.
गझलसम्राट व पत्रकार सुरेश भट यांच्या (नवशिके गझलकार हे वाचत असतील, तर त्यांनी कृपया आपल्याच कानाच्या पाळीस स्पर्श करावा. सूचनेवरून - सही. गझलनवाज भीमराव पांचाळे.) 'रंग माझा वेगळा' या संग्रहात तर चक्क 'भविष्य' नावाची गझलच आहे. त्यात ते म्हणतात -
जरी बीळ बीळ कराया पाहते मुजोरी
उद्या श्रेय ज्याचे त्याला लाभणार आहे!
साफ चूक आहे! श्रेय असे कुणालाही 'लाभत' नसते! ते हिसकावून घ्यावे लागते! त्यासाठी भांडावे लागते! त्याची 'इम्पक्ट', 'इफेक्ट', 'परिणाम', 'दणका' अशी जाहिरात करावी लागते! जशी की आमची तमाम पत्रे करतात. (परवा मुंबईत पाऊस सुरू झाला, तर आपण बातमीत इफेक्टचा लोगो टाकायचा का, असे एक उपसंपादक दुस-याला विचारताना आम्ही आमच्या या या कर्णरंध्रांनी ऐकले आहे! का तर म्हणे, पाऊस पडण्याची आवश्यकता अशी बातमी आपण काल छापली आणि आज पाऊस आला म्हणून! तुम्हांस सांगतो, उद्या कोणी सूतिकागृहाचे वृत्त छापून तेथे जन्मणा-या पोरांचे श्रेय घेतले, तरी आम्हांस आता नवल वाटणार नाही!)
सध्या तर या श्रेयावरून लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या दोन प्रतिष्ठित व जनप्रिय वृत्तपत्रांमध्ये चक्क शीतयुद्ध सुरू आहे.
त्याचे असे झाले, की अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने पर्सेंटाईल सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला. दुस-या दिवशी तमाम पत्रांत हे महत्त्वाचे वृत्त प्रसिद्ध झाले. (ही महत्त्वाची बातमी असल्याने अन्य सर्व वृत्तपत्रे ती सविस्तर देतीलच. तेव्हा आपण आपल्याकडील मोलामहागाची जागा का बरे वाया घालवावी, असा परंपरागत सुविचार करून सकाळने मात्र ते वृत्त मोजून ४, अक्षरी चार फक्त, वाक्यांत संपविले व जागा वाचविली!) मात्र महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ताने हे वृत्त देताना, हा निर्णय कसा आपल्यामुळेच घ्यावा लागला असा ढोल पिटला!
मटाने तर आपल्या वृत्तात ठळक चौकटच छापली, की मटाने गेल्या वर्षापासूनच कसा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता व यंदाही पाठपुराव्याचे काम कसे सातत्याने चालू ठेवले होते.
झाले!! हे वाचले आणि तिकडे अख्खा एक्स्प्रेस टॉवर रागाने थरथरला! बोरीबंदरच्या म्हातारीची ही जुर्रत! आमचे श्रेय लाटते? दुस-याच दिवशीच्या अंकात लोकसत्ताने ठळक टायपात चौकट छापली. मटाने एक वर्षाचा हवाला दिला होता. लोकसत्ताने म्हटले, आम्ही तर चार वर्षांपासूनच ही मागणी करीत होतो. मटाने म्हटले, आम्ही यंदाही त्याचा पाठपुरावा करत होतो. लोकसत्ताने म्हटले, आम्ही दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला याबाबत बातम्या प्रसिद्ध करत होतो. यंदा तर लोकसत्ताच्या प्रतिनिधीने शालेय शिक्षण विभागाच्या सचिव आणि अन्य अधिका-यांना भेटून या सूत्राचे प्रात्यक्षिक दाखविले होते.
आता असे असेल, तर श्रेय नक्की कोणाचे?
आम्हांस वाटते, की यावर एक उच्चस्तरीय समिती नेमावी. तिने लोकसत्ता आणि मटात याबाबत आलेल्या बातम्यांचे प्रमाण मोजावे. त्यास अन्य वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांच्या प्रमाणाने भागावे. आणि त्यावरून कोणाचे किती टक्के श्रेय हे ठरवावे!
बघा बोवा, आमचे हे पर्सेंटाईल सूत्र मान्य होते का?
(Posted by बापू अत्रंगे, दि. ३००६०८)
मुंबापुरीतील मराठी पत्रसृष्टीत सध्या एकच कुजबूज सुरू आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच सवाल आहे.
तसे प्रश्न म्हणाल तर अनेक आहेत.
म्हणजे पुढारीची मुंबई आवृत्ती नक्की कोणत्या शतकात सुरू होणार? नवशक्ती बंद आहे की सुरू आहे? मुंबईतून गावकरी निघतो म्हणजे नेमके काय होते? मटाच्या संपादकपदाची माळ अखेर कुणाच्या गळ्यात पडणार? ईटीव्ही मराठीला दिल्ली प्रतिनिधी कधी लाभणार? ज्याची मुलाखत घ्यायची त्याने आपले पैसे बुडविले आहेत, अशा राग-जोशात प्रश्न विचारणे आयबीएन-वागळे कधी बंद करणार?
हे झाले काही सनातन (आणि म्हणूनच दहशतवादी!) प्रश्न!
असेच काही तत्कालिक प्रश्नही आहेत. उदाहरणार्थ मराठीत नवीन कोणते च्यानेल सुरू होणार? सकाळचा च्यानेल कधी हवेत (पक्षी - ऑन एअर) जाणार? डांबराचे कंत्राटदार व थोर न्याशनालिस्ट नेते विनायकराव मेटे यांना अटक कधी होणार? (खरेच कधी होणार अटक? आम्ही तर मेटेंच्या अटकेसाठी आता गांधीगिरीच करण्याच्या विचारात आहोत. रोज आबांना पोस्टाने एक वेलदोडा पाठवायचा! नाही म्हणजे, किती दिवस लोकसत्तेत त्याच त्या बातम्या आणि वाचकपत्रे वाचायची? गेट वेल सून आबा! मेटेंना अटक करा....आणि आमची सुटका करा!)
मात्र सध्या जो प्रश्न ऑन एअर आहे, तो याहून खूपच भिन्न व वेगळा आहे.
आमचे पत्रपंडित ज्याला-त्याला विचारत आहेत, लघुसंदेश (पक्षी - एसेमेस) पाठवित आहेत -
'चित्रलेखाचा ताजा अंक वाचलात का?'
प्रथम हा सवाल आमच्या कानी पडला, तेव्हा आम्हाला अक्षरशः गलबलून आले!
वाटले, विचारणा-या पत्रबंधुची आलाबलाच घ्यावी! एका पत्रकाराने दुस-या पत्रकाराला - काही वाचलेत का - असा प्रश्न विचारावा, असा योग असा रोज रोज का येतो! पण आम्ही तो मोह आवरला.
आता तुम्हांस वाटेल, की चित्रलेखाचा ताजा अंक वाचलात का, हा तर अगदीच सपक, उथळ व पुचाट प्रश्न झाला! तुम्ही पाँचवी पास से तेज असाल, तर या प्रश्नावर तुम्ही लाख-दोन लाख रूपये (एलटीए व बोनससह) तर सहजीच कमवाल!
पण सभ्य स्त्री-पुरुषहो, प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही!
चित्रलेखाचा ताजा अंक वाचलात का, याचा अर्थ चित्रलेखाच्या ताज्या अंकातील 'मर्मभेद' हे सागर राजहंस यांचे सदर वाचले का, असा असतो. आणि त्यांचे सदर वाचले का, याचा अर्थ त्या सदरातील 'सकाळचा छिद्रान्वेष' ही चौकट वाचली का, असा असतो! (कारण की एरवी चित्रलेखा वाचायचा, तर मग त्यापेक्षा सरळ शिवधर्माचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री आह साळुंखे यांच्या पोथ्याच का बरे वाचू नयेत?)
तर 'सकाळचा छिद्रान्वेष' नावाची ही चौकट सध्या मराठी पत्रसृष्टीच्या विचार(!)विश्वात घुमत आहे. तिचा टीआरपी एवढा, की पत्रकारांसाठीच्या कुरूप आयोगाची बातमीही तिच्यापुढे फिकी पडली! (एरवी कुरूप आयोगाने जानेवारी आठ पासून हंगामी वेतनवाढ द्यावी, अशी जी सुरूपसुंदर शिफारस केली आहे, ती ऐकताच येथे महिनाभर आधीच गटारी साजरी झाली असती!) अर्थात सकाळ या वृत्तपत्राची जनप्रियताच एवढी आहे (सकाळ हे पत्रकारांचे एम्प्लॉयमेंट एक्चेंज केंद्र आहे अथवा तेथे सारखीच भरती सुरू असते म्हणून नव्हे, याची कृपया नोंद घ्यावी!) की त्याबाबत कोठेही खुट्ट वाजले अथवा कोणी काही लिहिले अथवा सकाळनेच काही छापले की त्याची लगेच चर्चा सुरू होते. आणि येथे तर सागर राजहंसांनी आपला नीर-क्षीर विवेक मानससरोवरात बुडवून सकाळची छिद्रेच आपल्या साप्ताहिक चव्हाट्यावर मांडली! (रा. रा. राजहंसजी, या बाबतीत तुमचे-आमचे जमले बरे का! छिद्रे तर सगळ्यांच्याच बनियनला असतात. पण लोकांचे सदरे वर करून ती गावाला दाखवायचा छंद जपणारे तुमच्या-आमच्यासारखे मात्र विरळच! द्या टाळी!!)
आता तुम्ही विचाराल, की बापू सकाळचा छिद्रान्वेष म्हणजे नेमके काय आहे? (चावट कुठले! दुस-याच्या बनियनची छिद्रे पाहायची ही कोण उत्सुकता म्हणतो मी!!)
तर राजहंसांच्या काकदृष्टीला एक पुस्तिका पडली. 'सकाळ रामदासी ब्राह्मणांच्या विळख्यात' असे तिचे शीर्षक. ही पुस्तिका (पुस्तिका कसली? हा तर बुकलेटबॉम्बच!) पुण्यातल्या सचिन भानुदास गोडांबे आणि किशोर साहेबराव कडू या दोन युवकांनी लिहिली आहे. तिचा सुगम परिचय राजहंसांनी आपल्या वाचकांना करून दिला आहे.
काय आहे या पुस्तिकेत? आम्हांला माहित नाही! कारण की गेल्या चार-पाच महिन्यांपासून ही पुस्तिका आमदार निवासातील दुकानात (आता काही जण म्हणतात, की आमदार निवास हेच एक दुकान आहे! पण हे दुकान वेगळे.)... तर या दुकानात ही पुस्तिका विक्रीला उपलब्ध आहे. परंतु विकत घेऊन वाचण्यीची प्रथा आमच्यात नसल्याने आम्ही अद्याप ती वाचलेली नाही. पण राजहंस सांगतात, त्यावरून या पुस्तिकेत असे म्हटले आहे, की "(सकाळ) या दैनिकाची मालकी पवारांची असली, तरी खरी सूत्रं ब्राह्मण्यवादी लोकांच्या हातात आहेत." या पुस्तिकेत सकाळमधील काही बातम्यांची कात्रणे छापून त्यात हा ब्राह्मण्यवाद कसा दिसतो याचे संदर्भासह स्पष्टिकरण दिलेले आहे. हे सर्व सांगताना राजहंस लिहितात -
"सकाळ दिवसेंदिवस अधिक व्यापक होत आहे. मात्र हा समूह मोठा असला, तरी त्याची दृष्टी व्यापक नाही, असा काहींचा आक्षेप आहे. विजय कुवळेकर संपादक असल्यापासूनचा हा आक्षेप आहे. याच संदर्भात अक्षर या (आयबीएन वागळेकृत) वार्षिकात १९९७ मध्ये बिनचेह-याचा सकाळ या शीर्षकाचा (लेखक - राजेंद्र साठे, ईटीव्हीवाले) एक लेख प्रसिद्ध झाला होता. सकाळला कोणताही वैचारिक, सामाजिक चेहरा नाही, असा त्या लेखाचा मथितार्थ होता. त्या लेखाचा लगेचच असा इष्ट परिणाम झाला नाही. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत सकाळच्या महाराष्ट्रभरातल्या संपादकरावांची पाठवणी झाली. (च्यामारी, राजेंद्रराव, तुमच्या लेखाने केवढी मोठी क्रांती झाली आणि तुम्हालासुद्धा त्याची खबर नसावी! काय हे!!) मध्यंतरी सकाळमध्ये अजितदादा पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांचा काळ त्या आक्षेपांना उत्तर देणारा होता. (उत्तरादाखल त्यांनी मुंबई सकाळमधून मा. राधाकृष्ण नार्वेकर आणि मा. सोमनाथ पाटील यांना दूर करून, संपादकपदी मा. अनिल टाकळकर व वृत्तसंपादकपदी मा. मधु कांबळे यांना नेमल्याची सुरस कथा आजही सकाळमधे सांगितली जाते.) मात्र काही काळाने पाटील या बाजूला गेल्या. सध्या सकाळचं नेतृत्व प्रतापराव पवार यांचे पुत्र अभिजीत पवार यांच्याकडे आहे. त्यांनी अडीच वर्षांपूर्वी नव्या युगाचा सकाळ बनवण्याचा संकल्प सोडला. दिमतीला घेतले, आनंदराव आगाशे आणि प्रदीपकुमार खिरे. त्यांनी सकाळमध्ये अनेक बदल केले. मात्र हा बदल अनेकांना रूचलेला नाही. विशेषतः महाराष्ट्रात सध्या ज्या बहुजनवादी विचारांचा बोलबाला आहे. त्यांना हे बदल रुचलेले नाहीत. मालकी पवारांची मात्र वर्चस्व ब्राह्मणवादी लोकांचे, असं त्यांचं म्हणणं आहे."
हे सर्व वाचल्यानंतर या बुकलेटबॉम्बमध्ये जिलेटिनच्या नसून, उदबत्तीच्या कांड्या आहेत हे तर आपले जनस्थानभूषण उत्तमराव कांबळे हे सुद्धा सांगतिल. कारण की, ब्राह्मण आले की ब्राह्मण्यवाद आला हे खूपच सोपे समिकरण झाले! खरे तर राजहंसांचा हा चारा आणि कडू व गोडांबे यांचा खट्टामिठा मारा वाचल्यानंतर आम्ही आत्यंतिक गोंधळूनच गेलो आहोत. आम्ही आजवर असे ऐकून होतो, की सकाळला कोणतेही धोरण नाही! पण येथे तर कडू-गोडांबे म्हणत आहेत, की सकाळ ब्राह्मण्यवादी आहे! मग यातील खरे ते काय? हा एक नवाच वाद झाला म्हणायचा! (यावर पुस्तिका लिहावी काय?)
परंतु सकाळने आपली ही बदनामी फारच गांभीर्याने घेतली आहे. कडू-गोडांबे यांच्या विरोधात सकाळने केस केली आहे. पण आरोप ठेवला सकाळचा लोगो अनाधिकाराने वापरल्याचा! त्यावरून पोलिसांनी त्यांना अटकही केली होती.
सकाळच्या बनियनची ही सर्व छिद्रे बोटे घालून मोठी केल्यानंतर आपले सागरजी राजहंस आरामात पंख फडकवून हळूच सांगतात, की "मात्र पुस्तिकेतील काही आक्षेपांची छाननी व्हावी." वर पुन्ही मान उंच करून असेही सांगतात, की "कडू-गोडांबे यांच्या मागे कोण आहे, हेही शोधायला हवं."
हे सागरजी पूर्वी सकाळमध्ये अग्रलेख लिहित असत काय?
शोधायला हवं!
(Posted by बापू अत्रंगे, दि.290608)
"पेपर वाच्ताय जनू..."
"ह्हो!"
"आज लई पोरांचं फोटू आल्याती..."
"ह्हो!!"
"काय पह्यलं आल्यात काय परीक्षेत?"
"हो!... दहावीचा निकाल लागलाय..."
"आसं का? मंग बरंहे!... पन आता काय सम्द्यंच निकाल द्याया लागलं काय हे पेपरवालं?"
"नाही हो... फक्त दहावी आणि बारावीचा देतात..."
"आस्सं? आनि ते का? धावी-बारावी लई आवघड अस्ती काय? ब्यालिस्टरकीची परीक्षा म्हनावं का काय याला?"
"तसं नाही हो ते... पण महत्त्वाच्या परीक्षा असतात या!... विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असते या परीक्षांच्या निकालावर!"
"आनि मंग डाक्टर, इंजिनेरच्या परीक्षांचं नस्तं काय तसं? आनि सातवी-आठवीच्या परीक्षा? त्येच्यावर नस्तं का भवितव्य?"
"नाही, नाही... त्याही परीक्षा महत्त्वाच्याच असतात! पण या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरते. म्हणून त्या जादा महत्त्वाच्या..."
"म्हंजी बाकीच्या परीक्षा काय दिशा-बिशा दावित नाय म्हना की! पंधरावीची परीक्षा दिली की ईद्यार्थी दिशाहीन व्हतो की काय?"
"असं मी म्हटलंय का?"
"नाय नाय, दादा! चिडू नगा वो! पेपरात ह्याच परीक्षांचं कौतिक आलंया म्हनून मला आपलं अडान्याला वाटलं तसं!"
"तसं नाही हो... तसे या परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आता तर गुणवत्तायादीसुद्धा काढत नाहीत..."
"गुनवत्ता यादी?"
"हो म्हणजे परीक्षेत पहिल्या पन्नासात आलेल्यांचे क्रमांक असतात ते...."
"आस्सं आस्सं! परीक्षा पास केली चांगल्या गुणांनी की ती गुणवत्ता आसं गणित हाय तर हे..."
"नाही नाही... तसंही काही नाही... गुणांचा आणि गुणवत्तेचा तसा नेहमीच संबंध असतो असं काही नाही! आज लोकसत्ताच्या अग्रलेखातच म्हटलेय तसं... छान अग्रलेख आहे..."
"आर्रतिच्या! मंग वो? परीक्षेचा आनि गुनवत्तेचा संबंध असलच याची गॅरंटी नाय म्हन्तात का हे लोकसत्तावाले?"
"हो.. हल्ली तर गुण कसे मिळवायचे त्याचे कारखानेच चालतात..."
"काय सांगता काय?"
"हो... पॅटर्न म्हणतात त्याला... लातूर पॅटर्न, दहाड पॅटर्न, सकाळ पॅटर्न..."
"हे नवंच झेंगाट हाय म्हना की!.. पन मंग आसं असल तर मंग हे पेपरवाले का बरं एवढं कौतिकानं छापून आनत्यात?"
"ते तसेच असते हो... पेपरवाले छापतात म्हणून लोकांना वाटते या परीक्षा महत्त्वाच्या आणि लोकांना या परीक्षा महत्त्वाच्या वाटतात म्हणून पेपरवाले छापतात!.. सगळे पेपर तर हल्ली खास दहावीचा अभ्यास नावाचे सदर सुद्धा चालवतात!"
"म्हंजी आमची वस्तीशाळा तशी ही पेपरशाळाच म्हना की!.. पन काय उपेग व्हतो का पोरास्नी, का नुस्तीच रद्दीत भर?"
"आता ते काही सांगता येणार नाही... पण निकाल लागला की येतं कधी कधी छापून - हे आमचंच यश! होत असेल हो काही तरी परिणाम. दहावीचा अभ्यास दिला की खप तर नक्कीच वाढत असेल."
"म्हंजी ह्यो खपाचा पॅटर्न हाये असं बेलाशक म्हना की! निकालाचं आसं ढोल बडवून परीक्षेचं महत्त्व वाढवायचं आनि मंग परीक्षा लई महत्त्वाची म्हनून पेपरातनं शाळा चालवायची!.. बरी शाळा करताय! चालू द्या, चालू द्या!.. चालू द्या हो पेपरवाले... चालू द्या... तुकोबामावलीनं म्हन्लेलंच हाये -
सर्प भुलोन गुंतला नादाss
गारुडिये फांदा घातलासे..."
(Posted by बापू अत्रंगे, दि. २८०६०८)
आम्हांस मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांचे नेहमीच नवल वाटत आलेले आहे.
म्हणजे पाण्यात राहून न भिजण्याची कला त्यांना इतकी कशी अवगत आहे!
म्हणजे बघा,
ते मध्यंतरी 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' म्हणून काही तरी आंदोलन वगैरे झाले होते ना, तेव्हापासून मुंबई हे शहर महाराष्ट्र नावाच्या राज्यात आहे! आता महाराष्ट्र राज्य म्हटले, की त्याची राजभाषा मराठी ही भाषा असणारच, कारण की येथे राहणारे अनेक लोक त्या भाषेतच बोलतात!
हे जे मराठी बोलणारे लोक आहेत, त्यातील अनेक लोक मुंबईत राहतात. आता हे मुंबईत राहणारे लोक काय करतात, तर ते लाजत मराठी बोलतात व गणपती उत्सव साजरा करतात व गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांच्यातील मुली व बायका नऊवारी लुगडे नेसून स्कूटरवर बसतात व मुले व बापे कुर्ता-पायजमा घालून व पांढरी टोपी घालून समस्त मराठी संस्कृतीचे जतन करतात!
आता हे लोक जर एवढ्या थोर प्रमाणात मराठी असतात, हे जर आम्हांला व तुम्हांला माहित आहे, तर ते येथील इंग्रजी वृत्तपत्रांना माहित नसेल काय?
आम्ही सांगतो, निश्चितच माहित असणार! कारण की यातील अनेक मराठी लोक तर थेट इंग्रजी वृत्तपत्रांतच काम करतात. शिवाय अनेक मराठी लोकांना एबीसीडीसुद्धा चांगली येते व ते ती म्हणून मराठी बोलणारांकडे तुच्छतेने पाहात इंग्रजी वृत्तपत्रेच वाचित असतात! अनेकांच्या टूबीएचकेच नव्हे तर वनबीएचकेमध्येसुद्धा पेपरवाला मराठी पो-या इंग्रजी वृत्तपत्रच (पाच आणे प्रती नग!) टाकत असतो!
मुद्दा असा, की मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांच्या वाचकांत मराठी वाचकांचे प्रमाण अजिबात नगण्य नाही! मग मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांत मराठी माणूस नगण्य का? मराठीपण एवढे अवतीभोवती असताना इंग्रजी वृत्तपत्रांना त्याची साधी भनकही का बरे असत नाही?
उदाहरणार्थ आजचा, भारतीय सौर ४ आषाढ शके १९३०, बुधवार २५ जून २००८चा टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्स पाहा. मराठी जगतात सध्या ज्या मुद्दयावरून खडखडाट चालू आहे, त्याची या वृत्तपत्रांना खबरही नाही!
आता अखिल भारतीय पातळीवरचे मराठी साहित्य संमेलन - ज्याविषयी प्रत्येक मराठी माणसास काही तरी मत (भले त्यास महामंडळाने मत दिलेले नसो!) आहे, आस्था (वा विद्रोही संताप) आहे - ते इंग्रजी वृत्तपत्रांना दखल घेण्याच्या लायकीचे वाटत नाही, असे कोणी आम्हांस कृपया सांगू नये! कारण की इंग्रजी वृत्तपत्रे एरवी कशाकशाची दखल घेतात, याची अक्षरी व छायाचित्रात्मक माहिती आम्हांस व तुम्हांस चांगलीच आहे!
पण तरीही आजच्या टाइम्स (इंडिया आणि हिंदुस्तान) मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या वादंगाबाबत अवाक्षरही आलेले नाही!
हां, त्यांनी एक मात्र आवर्जून केले.
मुंबई महापालिकेचा कारभार यापुढे केवळ मराठीत होणार, हा प्रस्ताव कसा चर्चा वगैरे न करता मंजूर करण्यात आला याची बातमी आज सविस्तर व व्यवस्थित प्रसिद्ध केली.
तेव्हा आम्हांला एकच प्रश्न पडला आहे, की मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांना पाण्यात राहून न भिजण्याची कला कशी बरे अवगत झाली असावी?
(Posted by चांगदेव पाटील, दि. २५०६०८)
म्या म्हनले, भाऊ बापूराव आता आपन सारे लोग याखेपी चाल्लोच चाल्लो युएसेला!
आता सायाची एक तकलिब आहे पारपत्राची... पन समजा कौतिकराव ठाले पाटलाईले पटवले अन् त्याच्यावाल्या खिशातल्या सत्तर लोकांईच्या यादीत आपल्यावाली नाममुद्रा कोरून घेत्ली, की आपन सायाचे बिनधास की रामदास पोच्लोच पोच्लो युएसात!...
येणेप्रकारे सक्काळी-सक्काळी हाथरूणावर डोईखाली दोन्ही हात घेऊन, सिलिंगाकडे दृष्टी लावून आम्ही स्वप्न-सोलोल्युकीत मग्न होतो... (अशी घनगर्द आनंददायी स्वप्ने आम्ही आमुच्या मायबोलीतच पाहतो... काऊन की अलीकळे मायबोलीला पुन्या-बंबईकळे व्हाया मकरंद अनासपुरे भारीच महत्त्व आलेले! शिवाय या मायबोलीमुळे ठाले पाटलाईले कळले, की आपुन तं त्याईचे शीवभाऊच... तं मग आपुल्यावाले काम झालेच झाले समजा! एक तुमच्यावाला काय अंदाज?)
पण युएसेतल्या लोकांचे मराठी जितके भयंकर सुंदर तितकीच आमुची मायबोली भयंकर सुंदर... चार वाक्यांच्यापुढे अवघी बोंब! तेव्हा आता पुढे काही मायबोलीची सेवा होणे अशक्य असल्याचा अंदाज येऊन आम्ही डोईखालची हाताची चुंबळ सोडवली आणि पेपराईच्या गठ्ठ्याला हात घातला... पेपरे वाचू लागलो अन् अचानक बुचवाला सोडा कोणी सप्कन मुखावर टाकावा तसे आम्हांस झाले...
पेपरवाल्यांना भल्या गोष्टीचे कौतिक असे ते नाहीच! मिळून सा-या जणांनी अमेरिकेत साहित्य संमेलनाच्या निर्णाविरोधात मतदान केले! कोणी बातम्या छापल्या, कोणी वाचकपत्रे आणि अवघ्यांनी अग्रलेख. आमची स्वप्नपूर्ती होऊच द्यायची नाही, असा जणू सगळ्या एडिटरांनी मिळून कटच शिजविला!
(येथे आमची एक शंका - समजा कौतिकराव ठाले पाटलांनी असे जाहिर केले असते, की प्रत्येक पेपरातले दोन इसम आम्ही मोफत नेऊ क्यालिफोर्नियाला, तर काय असाच विरोधाचा कलकलाट झाला असता काय? मा. संपादक, आपल्या दैनिकातील साहित्य विभाग पाहणा-या - म्हणजे असा काही विभाग तुमच्याकडे असेल, तर - त्या पत्रकार बंधु वा भगिनीस स्मरून व पुसून या शंकेचे निरसन करावे! संपादकसायेब, या एका बाबतीत तर आम्ही, बडी बेगमसाहिबाच्या दरबारातला पैजेचा विडा अफझुलखानाने जितक्या आत्मविश्वासाने उचलला नसेल, तितक्या आत्मविश्वासाने पैजेवर सांगू शकतो, की मोफत प्रवास अशी सुविधा असताना तुम्ही विरोध केला असता, तर या साहित्य-पत्रकारांनी कचेरीतल्या कचेरीत समांतर पेपर काढून, तिथे विद्रोही संपादक बसवला असता!)
महाराष्ट्र टाइम्सने तरी विरोध करायला नको पायजे होता. या संमेलनाच्या निमित्ताने मटाला बे एरिया साहित्य विशेषांक काढून ग्लोबल होता आले असते! लोकसत्ता तर केव्हाच अमेरिकेत पोचलाय... सकाळसुद्धा ग्लोबल टू लोकल की लोकल टू ग्लोबल की ग्लोबल टू ग्लोबल की लोकल टू ग्लोबल की सगळा मिळून ग्लोकल असा काहीतरी झालाय...! म्हणजे तशा जाह्यराती लोकलमध्ये वाचावयास मिळतात! (त्या वाचून प्रथम तर आम्हांस असाच भ्रम झाला होता, की मध्य रेल्वेने सीबीडी बेलापूर स्थानकाचे नाव बदलून ग्लोबल असे केले की काय? लोकल टू ग्लोबल! प्लाटफॉर्म नंबर चारसे जानेवाली लोकल नौ डिब्बों की चार छप्पन की ग्लोबल गाडी है. यह गाडी सिर्फ ग्लोबल स्थानकपरही रुकेगी...!) आता अशा रितीने सारे काही ग्लोबल होत असताना मटाने मराठी संमेलन ग्लोबल होण्यास का बरे मोडता घालावा? पण त्यांना मोडता घालण्याकरीता नेमका घालमोड्या दादा आठवला!
लोकसत्तेचेही तेच! म्हणे 'का धरिला परदेस....?' बरे भाषा पुन्हा अवतरली शिवशाहीचीच... तोच उपरोध, तीच वक्रोक्ती! उद्या साहित्य महामंडळात कोणी मेटकरी निघाला म्हणजे? अर्थात हे साहित्यिक मेटकरी दरवाजावर डांबर टाकणार ते शब्दांचेच असणार! आणि अलीकडे एकंदरच साहित्यप्रांतीही शब्दांना चाट्या रोगाची बाधा झालेली असल्याने तेही तसे सोंडकिडे लागलेल्या गव्हासारखे पोकळ झाले आहेत! त्यामुळे ते शब्दडांबर धुवून जाण्यास काही वेळ लागणार नाही! तेवढाच श्रीमती शारदाबाईंचा त्रास वाचला!!
पण आम्ही म्हणतो, केतकरांनी अमेरिकावारीला विरोध करण्याची ही डांगे लाईन का बरे धरावी? ते स्वतः मात्र जाणार... पाकिस्तानला जाणार, अमेरिकेला जाणार! आणि ठाले पाटील आणि आम्ही ठरविले जाण्याचे तर त्याला मात्र विरोध करणार! शरदरावांच्या कानी ही पत्रकारिता घालावयास हवी! पुढे कधी-मधी गेस्ट-एडिटात त्यांना लिहिता येईल! आणि नाहीच सुसंधी मिळाली (एडिटर होणे काय आणि पंतप्रधान होणे काय - संधी मिळणे खूपच दुरापास्त हो!), तर राष्ट्रवादीचे मुखपत्र (सकाळ नव्हे!) आहेच की! असो.
तर या केतकरांना एकदा अग्रलेख कसा लिहावा हे सांगायलाच हवे!
कसा हवा अग्रलेख?
निःपक्षपाती, सर्वसमावेशक, विधायक, समाजहितैषु!
सर्वेपि सुखिनः सन्तुचा घोष मिरवणारा, जो जे वांछिल तो ते लाहो अशा प्रकारे लिहिलेला!
सौम्य, कुटुंबवत्सल!
कुटुंबातील सर्वांसाठी असणारा!
म्हणजे बालवाडीतील पिंट्यापासून पेन्शनर आजोबांपर्यंत सर्वांना समजेल वा काहीच समजणार नाही असा.... बाळबोध! निर्बोध!!
सकाळमधल्या आजच्या अग्रलेखासारखा!
अहाहा!
सकाळने काय मार्मिक प्रश्न केलाय - लग्नाआधी वरात कशाला?
आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणोनी खाली जे काही पाच-सातशे शब्दांचे आख्यान लावलेय ते तर याहून अहाहा!
अहाहा म्हणजे अगदी अहाहाच!!
अमेरिकेला जावे का? सकाळ म्हणतो - जावे!
"मायमराठीला सातासमुद्रापार म्हणजे थेट अमेरिकेत मिरवण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घईगडबडीत का असेना; पण उचललेल्या पावलाबद्दल धन्यवाद द्यावे लागतील." अशी अभिनंदनाच्या उत्तम स्थानकावरूनी सकाळची पंचवटी एक्स्प्रेस निघते... ती कसारा घाटात येता येता, "महामंडळ कारभा-यांचे असले तरी हा सोहळा जनतेचा व तिच्या मानसिक ओढीतून निर्माण झालेला आहे, हेही समजून घ्यायला हवे. म्हणूनच लग्नाआधी वरात हे थोडे घाईचे ठरणार आहे," अशी कुंथू लागते... आणि मग कल्याण येता येता ती मराठीच्या कल्याणाचा भोंगा वाजवित ट्रॅक बदलून धावू लागते. प्रारंभी अभिनंदनाचे ढोल वाजवणारा हा अग्रलेख मुक्कामी येताच, "स्थलांतराचा विक्रम करून भाषा व संस्कृती रुजत नसते हे महामंडळाला कोण सांगणार?" अशा चापट्या मारू लागतो!
अरे काय चालले काय आहे? आम्ही जायचे की न जायचे अमेरिकेला? आम्हां पामर वाचकांना काही समजावून सांगाल की नाही? एकतर या अमेरिका वारीच्या निर्णयाचे स्वागताध्यक्ष व्हा, नाही तर विरोधात बसा! असे कुंपणावरी बैसोनि सकाळचा वेलु कसा बरे गगनावेरी जाणार?
पण मग आम्ही सोलोल्युकीत म्हटले, की
भाऊ बापूराव, तुमी काहून येवळा त्रागा करता?
कारन की याहीलाच तं आजची उत्तम व अभिजात पत्रकारिता म्हन्तात!
(Posted by बापू अत्रंगे, दि. २४०६०८)
स्टार माझा या वाहिनीने एक वर्ष सुफल, संपूर्ण पूर्ण केले. त्याबद्दल या वाहिनीत काम करणा-या सर्वांचेच आम्ही अभिनंदन करतो व त्या सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देतो.
गतवर्षी ही वाहिनी सुरू झाली, त्यावेळी तेथे काम करणारे तरूण पत्रकार पाहून अनेकांच्या भृकुट्या वक्र झाल्या होत्या. काहींना शंकाही आली होती, की ही वाहिनी या मुलांना घेऊन कशा प्रकारच्या बातम्या देणार. आणि ती शंका रास्तही होती, हे या एका वर्षात अनेकदा सिद्ध झाले आहे. 'भंकस'कार विसोबा खेचर यांना तर ही वाहिनी म्हणजे बालवाडीच वाटली होती. त्यांनी त्यावर मोठी गम्मतही केली होती. विसोबा खेचर यांचीच गम्मत पुढे चालवून आज असे म्हणता येईल, की स्टार माझाची मुले आता बालवाडीतून पहिलीत गेली आहेत!
होय. हे कबूलच करावयास हवे, की या 'नवख्या' मुला-मुलींनी मराठी वाहिन्यांना नवा चेहरा दिला आहे. म्हणजे जरा आठवून पाहा दूरदर्शनवरच्या सातच्या बातम्या. बातम्या ही पाहण्याची चीज असते, याचा पत्ताच अनेक वर्षे दूरदर्शनला नव्हता. वृत्तनिवेदकांनी माश्या वारीत बातम्या वाचायच्या आणि पब्लिकने त्या ऐकायच्या, असा तो सिलसिला! गंमतीची गोष्ट म्हणजे, आम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत सह्याद्रीनेही अद्याप तीच परंपरा कायम ठेवलेली आहे!
दूरदर्शनची मराठी बातम्यांच्या क्षेत्रातील मक्तेदारी प्रथम अल्फा टीव्हीने आणि नंतर ई-टीव्हीने मोडली. अल्फा टीव्हीवरील बातम्या हाही तसा अदखलपात्रच प्रकार होता. त्यातल्या त्यात ई-टीव्हीवरील बातम्या ब-या असत. परंतु त्यातही अतिशय रटाळपणा असे. बातम्यांची निवड, सादरीकरण, त्यांची मांडणी, तंत्रशुद्धता याबाबतीत ई-टीव्ही मराठीला, तांत्रिकदृष्ट्या सर्वात सरस असूनही फार काही दिवे लावता आले नाहीत. एक मात्र खरे, की त्यांचे बातमीदारांचे नेटवर्क सशक्त होते. त्यामुळे दर एक तासाने ते महाराष्ट्राचे किमान बरे चित्र सादर करू शकत आणि करतात. तथापि फौज अशक्त असेल, तर सिकंदरासही माघार घ्यावी लागते, हेच खरे! आज ई-टीव्हीने बातम्यांची विविधता व दर्जा याबाबत जे काही कमावले आहे, त्याचा सेहरा राजेंद्र साठेंसारख्या बातम्यांची जाण असणा-या संपादकांच्या कपाळी बांधावयास हवा.
ज्या काळात राष्ट्रीय स्तरावर एनडीटीव्ही, स्टारची इंग्रजी वृत्तवाहिनी यांसारख्या वाहिन्या बातम्यांची निवड आणि सादरीकरण या योगे देशातील सुसंस्कृत नागरी प्रेक्षकांना बांधून ठेवत होत्या, नेमक्या त्याच काळात झी आणि ई-टीव्ही मराठी अत्यंत सुमार पद्धतीने बातम्या सादर करीत होत्या. सुरूवातीच्या काळात मराठी वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात जे लोक गेले, त्यांच्याच उंचीच्या त्या वाहिन्या होत्या! त्याला कुणाचाही इलाज नव्हता! आज मात्र याबाबतीतील तेथील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे.
वाहिन्या फ्री टू एअर असल्या की त्यांना प्रेक्षकांची फारशी ददात नसते. ई टीव्ही मराठी, झी 24 तास या वाहिन्याच्या लोकप्रियतेचे रहस्य यात दडलेले आहे! या वाहिन्यांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे. (हा आमचा अंदाज. याची अधिकृत आकडेवारी आमच्याकडे नाही.) परंतु तो प्रेक्षक कोणत्या स्तरातील आहे, याचा नीट अभ्यास व्हायला हवा. आमच्या मते, पर्याय कमी असल्याने मराठी - तोही ग्रामीण वा निमशहरी भागातला प्रेक्षक ही किंवा ती वाहिनी यातच घुटमळत राहिला आणि आम्हाला वाटले, की आम्ही किती लोकप्रिय!
स्टार माझा आल्यानंतर प्रथमच या वाहिन्यांचा खुजेपणा मराठी प्रेक्षकांच्या नजरेस पडला! ताज्या हवेची झुळूक यावी, तसे काहीसे स्टार माझाच्या आगमनानंतर मराठीत झाले! मराठीतील पूर्वीचे कृष्णधवल तमाशापट आणि आताचे वळूसारखे चित्रपट यात जो फरक आहे, तोच फरक स्टार माझा आणि अन्य वाहिन्यांत होता! ही अतिशयोक्ती वाटू शकेल, परंतु घडले ते असेच. स्टार माझाने मराठी वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात प्रथमच ग्लमर आणले! आमच्या माधवराव मनोहरांच्या भाषेत बोलायचे, तर स्टार माझामुळे मराठी वृत्तवाहिन्या वयात आल्या!
आयबीएन-लोकमत या वाहिनीचे यंदाच आगमन झाले. तिच्याबद्दल मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या होत्या. कदाचित त्यामुळे असेल, सध्या तरी या वाहिनीबद्दल बोलताना एकच सूर असतो, की 'चांगली आहे! पण खूप काही विशेष नाही!!' या वाहिनीबद्दल सध्या इतकेच. पुढे तिच्याबद्दल आपण बोलणारच आहोत.
यंदा (ताज्या माहितीनुसार) ऑगस्टमध्ये साम मराठी ही सकाळ वृत्तसमुहाची वाहिनीही दाखल होत आहे. ती ई-टीव्ही मराठीच्या मॉडेलवर बेतलेली असल्याचे सांगण्यात येते. अजूनही काही वाहिन्या येत्या एक-दोन वर्षात मराठीमध्ये पदार्पण करतील असे दिसते. खरी स्पर्धा तेव्हाच सुरू होईल.
स्टार माझा वाहिनीला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
(Posted by चांगदेव पाटील, दि. 220608)

बारा मावळापासून अपरान्तांपर्यंत, गोदातटापासून वरदातटापर्यंत अवघा मर्राठी माणूस ज्या एका क्षणाची युगानुयुगे वाट पाहात होता, तो क्षण अखेर (एकदाचा) उगवला आहे...
अरे, कचेरीत कष्टणा-या पांढरपेशांनो, वावरात झुंझणा-या कास्तकरांनो, साखर कारखानदारांनो, दुधडेरी अन् विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या मेंबरांनो, बचत गटांतल्या बाया-बापड्यांनो...
हत्तीवरून साखर वाटा,
शनवारवाड्याच्या बुरुजावरून बत्ताशे उधळा,
गुढ्या उभारा, तोरणे लावा...
कोल्हापूरच्या अंबाबाईने, जेजुरीच्या खंडोबाने, पंढरीच्या विठोबाने अखेर तुमच्या आर्त हाकेला ओ दिली आहे...
बेलापूरच्या सकाळ भवनात सामचा जन्म झाला आहे...
'साम जन्मला गं सखी साम जन्मला...'
ते पाहा... ते पाहा...
ही ब्रेकिंग न्यूज येताच
सगळीकडे कशी हर्षोल्हासाची रिमझिम बारीश होत आहे, उत्साहाचे धुंदगंधीत समशितोष्ण वारे वाहात आहेत,
अवघी कायनात आनंदभुवन झाली आहे....
आणि
त्या झिम्मडखुषीने भान विसरून सामचे सगळे प्रोड्यूसर, अँकर, रिपोर्टर एकतालात गात आहेत...
'साम जन्मला गं सखी साम जन्मला...'
(आणि त्यांचे विदेशी शिक्षक त्यांच्याकडे आ वासून पाहात आहेत... पाळणागीताची रनऑर्डर बहुधा नेहमीप्रमाणेच चुकली असावी! असो.)
तर परवाच्या दिशी एका सुमुहुर्तावर च्यानेल-ए-रुस्तुम साम मराठीने पहिला ट्यांहा केला!
अन् खरे सांगू?... आम्हालाच 'सुटल्या'सारखे झाले! किती दिवस वाट पाहायची? यंदा येईल, निदान यंदा तरी येईल... येरझा-या घालून-घालून मल्टीमीडियाश्री संजीवकुमार लाटकरसुद्धा थकले आणि मग निघोनी गेले... पण तरीही आमोद सुनासी काही येई ना! पण म्हणतात ना, देर आए दुरुस्त आए!
ही दुरुस्ती झाली नसती, तर मात्र काही खरे नव्हते! रिपोर्टर पोरांनी किती दिवस बेलापूरात नुसत्याच माश्या मारत अन् बूम हालवत बसावयाचे? एक महिना ट्रेनिंगात गेला, तो बरा टाइमपास झाला! पण पुढे काय? अँकर भगिनींनी आणलेले मेकपचे सामानसुद्धा सुकून गेले!
बरे बसायला तरी जागा हवी ना सोयिस्कर, पण नाही यांना आथरून दिले बस्कर!
बसा आणि कवितांच्या भेंड्या खेळा -
"झाडाखाली बघुनी सावली बसतो अँकर...
ठाऊक आहे मजला त्याचा सर्व कारभार!"
कारण की - स्टुड्योचे काम सुरू, तुमचा रस्ता बंद!
माणसे बाहेरचा रस्ता बघायला लागली होती...
पण तेवढ्यात सुवार्ता आली...
सामने पहिला ट्यांहा केला....
साम जन्मला गं सखी साम जन्मला!
हा ट्यांहाही कसा?... तर शुद्ध एकतालातला!
एक सारंग रागातला, दुसरा किरवाणीतला...
चक्क शंकर महादेवनच्या आवाजातला!
आम्ही तर ते ट्यांहाचे फ्यूजन ऐकून अगदी ब्रेथलेसच झालो!
म्हटले, आता नक्कीच मनोरंजनाचा दुष्काळ हटणार, माहितीचे भूकबळी थांबणार, स्वराज्यातील द-या-खो-यांत ज्ञानाची सकाळप्रभा फाकणार!
आणि का नाही असे होणार?
'दाद कोंडके फेम' संजयदादा दाबके (ईटीव्हीवाले), जटाधारी बाबू विश्वासजी देवकर (ईटीव्हीवाले), तंत्रयोगी अशोकजी सुर्वसे (ईटीव्हीवाले), आणखी बरेच सारे ईटीव्हीवाले सामबाळाला जातीने हैदराबादी जडीबुटी खिलवित असताना, का नाही असे होणार?
रामोजी शप्पथ सांगतो, सामबाळ दुडूदुडू धावणार, लुटूलुटू पळणार...!
फक्त जरा स्टुड्यो नीट उभा राहूंदे
मालिका-कार्यक्रमांची जुळवाजुळव होऊंदे
चांगले रिपोर्टर मिळूंदे,
हुशारदेखणे अँकर लाभूंदे
च्यानेल एअरवर जाऊन प्रेक्षक मिळूंदे...
अन् प्रेक्षकांना च्यानेल आवडूंदे!
मग पाहा, कसा सामबाळ दुडूदुडू धावणार, लुटूलुटू पळणार...!
(आमेन!!)
पण सध्या तरी आपण सारे आनंदे बेहोष होऊनी गाऊ या...
साम जन्मला गं सखी साम जन्मला....
(Posted by बापू अत्रंगे, दि. 220608)
काही अपरिहार्य कारणांमुळे आज बातमीदार या साईटवरील नवा लेख प्रसिद्ध होऊ शकला नाही, याची वाचक, (विक्रेते आणि जाहिरातदारांनी!) नोंद घ्यावी.
- साईट व्यवस्थापक,
ए-सिडिक कम्युनिकेशन्स.
(ही अपरिहार्य कारणे नेमकी काय असतात हे एकदा आम्हाला शोधूनच काढायचे आहे! अरे सांगा ना न डरता, की आज नाय डोका चालला तव्हा नाय सदर लिव्हला! म्हणे अपरिहार्य कारणे!! असो. तर आज आमच्या ग्रेसेल्स संपावर गेलेल्या असल्यामुळे लिहायला काही जमलं नाही. तेव्हा आता उद्या वाचा -
सकाळच्या साम मराठीचा पहिला ट्यांह्या!
- बापू अत्रंगे)
आता आम्ही सनई-चौघडे, ढोल-ताशे-नगारे आदीकरून सर्व वाद्ये वाजवून सांगण्यास मोकळे आहोत, की महाराष्ट्र टाइम्सचे रुपडे खरोखरच बदलले आहे! मटाच्या भाषेतच (मटा ऑनलाईनची माफी मागून) सांगायचे, तर बिपाशाचे अंगभूत सौंदर्य नऊवारी पैठणीत कसे सर्वांगाने उठून येईल (विचारानेच अंगावर काटा आला ना?), तस्सा आजचा मट्टा सुरेख दिसतो आहे! अगदी सर्वांगसुंदर!!
मटा बदललाय हे गेल्या काही महिन्यांत जाणवतच होते. (नाही नाही, रा. रा. राऊत गेले, रा. रा. पानवलकर आले या बदलाबद्दल आम्ही बोलत नाहीये... आम्ही मजकूराच्या अंगाने बोलतोय.) मधल्या काळातले मजकुरातले उच्छृंखल इस्टमनकलर उंडारलेपण आता केवढे कमी झालेय! (नाही, नाही, आम्ही मुंटाबद्दल बोलत नाहीये... आम्ही मटाच्या अंगाने बोलतोय!)
आणि त्यात आता तर मटाने स्वतःचा मेकोव्हरही करून घेतलाय! होय, होय, आम्ही मटाच्या बदललेल्या ले-औटबद्दलच बोलतोय!
तसे ले-औट तर अनेक पत्रांनी बदललेत. लोकसत्ता हा त्याला अपवाद! ते फक्त कार्यालये बदलतात! बाकी सर्व जैसे-थे! लोकसत्तेत पाने लावत नाहीत. तेथे पानांत बातम्या कोंबतात! आमचा तर असा संशय आहे, की गादीत कापूस भरावा त्याप्रमाणे तेथील उपसंपादक दोन्ही हाताने दाबून दाबून मजकूर भरीत असतील पानात! पानात व्हाईट स्पेस सुटली, तर हातून 'गोट' निसटल्याइतके दुःख होत असेल त्यांना!
सकाळमध्ये मात्र कार्यालयेही बदलतात आणि दर सहा महिन्यांनी ले-औटही!
काही महिन्यांपूर्वी तेथे गार्सियाकृत पंचकोटी ले-औट वापरत असत! त्याची पानभर जाहिरातही सकाळने केली होती, की आम्ही पानांची मांडणी का बदलली? (पानांच्या मांडणीचे सोडा! बातम्यांची धोरणमांडणी कधी बदलताय ते सांगा म्हणावं, आनंदराव! चकणीला गॉगल लावला म्हणून काय ती सुनयना होते काय? ) मुंबई सकाळने आता पुन्हा एकदा आपला ले-औट बदलला असून, 'गार्सियाच्या ले-औटचे श्राद्ध' असे त्या पेजडिझाईनचे नाव असल्याचे सांगण्यात येते!
लोकमतनेसुद्धा आपला ले-औट बदलला आहे.
पूर्वी तो मराठवाड्यातल्या माळासारखा सपाट-आडवा होता! आता तो मुंबैतल्या खड्या पारश्यासारखा दिसतो! उभाच्या उभा! गिरिधारीच्या करंगळीवरील गोवर्धनासारखा! आता त्यात कधी मधी एखादा सुळका सटकतो, कधी कधी बातमीच्या अंगापेक्षा मांडणीचा बोंगाच मोठा होतो, पण एकूण दिसते ते वेगळे असते, चांगले असते, प्रयोगशील असते.
सामनाची मांडणी म्हणजे एकूणच दहशतवादी! जणू ले-औट बॉम्बच! सामनाचा ले-औट ज्यास आवडतो, तो पत्रकार नक्कीच सनसनी वा त्यासम कार्यक्रमांचा मनःपूर्वक चाहता असावा!!
वस्तुतः ले-औटचे असे काय कौतुक की ज्याविषयी आपण एवढे भाऊक व्हावे, असा किरटा प्रश्न तर हे सर्व वाचल्यानंतर आता कोणासही पडेल. परंतु जर मोठ्या मेंदूनेच विचार केला, तर एक बाब लक्षात येईल, की अखेर ले-औट म्हणजे वाचकांच्या वाचनपथावर रोवलेल्या दिशादर्शक पाट्याच आहेत! पानावरील प्रत्येक बातमीचे महत्त्व अधोरेखीत करणारा तो हायलायटर आहे! प्रथम काय वाचा हे सांगणारा मार्गदर्शक आहे! तो चांगला असेल, तर वाचक वृत्तपत्रात खिळून राहणार. तो राजू गाईड असेल, तर वाचक पंछी बनूं उडते फिरू म्हणत एकतर सुळ्कन निघून जाणार नाही तर, अल्ला खबरे दे, लेख दे म्हणत वाचनीय मजकूर शोधत राहणार!
महाराष्ट्र टाइम्सने ही बाब खुबीने पकडली आहे आपल्या स्मार्ट चिमटीत! त्यामुळे प्रत्येक बातमी अगदी अंगप्रत्यंगाने उठून दिसते आहे! रा. रा. अशोकजी पानवलकर आणि रा. रा. सुदर्शनजी सुर्वे यांच्या चमूची ही महिनाभरची मेहनत अखेर रंग लायी, असेच म्हणावे लागेल! (रंगावरून आठवले.... काळी अक्षरे कोणत्या पार्श्वभूमीवर सु-दर्शन देतात, हे एकदा तपासून पाहावयास काय हरकत आहे म्हणतो मी! असो.)
तर यामुळे आता आम्ही सनई-चौघडे, ढोल-ताशे-नगारे आदीकरून सर्व वाद्ये वाजवून सांगण्यास मोकळे झालो आहोत, की महाराष्ट्र टाइम्सचे रुपडे खरोखरच बदलले आहे!
(जाता जाता - या बदलाकरीता मटाने जर्मन टेक्नॉलॉजी वापरली काय? वापरली असल्यास त्यास किती कोटी खर्च आला, याची माहिती कोठे बरे मिळेल?)
(Posted by बापू अत्रंगे, दि. 200608)
वृत्तपत्रांना विक्रीयोग्य वस्तूची कळा आली, तसे संपादक या पदाचे महत्त्व कमी झाले, मालकाकडे केवळ वृत्तपत्राचा मालकी हक्क ही अर्हता असल्याने त्याचे महत्त्व वाढले आणि त्याचबरोबर मग एक किरटा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला, की अरे कोण वाचतो तुमचे अग्रलेख?
एकंदरच सूर असा, की हल्ली लोकांकडे वाचण्यासाठी वेळ नाही. त्यांना हवी आहे, ती फक्त उपयुक्त माहिती आणि चटपटीत बातम्या. तीही कमी शब्दांत. तेव्हा तुमचे ते पानभर लेख, सदरे आणि अग्रलेख यांची तशी आवश्यकताच राहिलेली नाही.
अशा काळात, गेल्या काही दिवसांत चार अग्रलेखांनी महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवून दिली. वृत्तपत्रांच्या दृष्टीने ही एक फार मोठी घटना असून, अजूनही त्यांनी आपले सामर्थ्य पूर्णतः गमावलेले नाही, याचेच हे द्योतक आहे. अग्रलेख कोण वाचतो, असे वर तोंड करून विचारणा-या मालकांना आणि त्यांच्या संपादकीय विभागातील बुद्धीभ्रष्ट चमच्यांना एवढी चपराक पुरेशी व्हावी! असो.
तर अवतरली शिवशाही (लोकसत्ता), नववधू प्रिया मी सावरते आणि फुसके बॉम्ब फोडून हिंदूंची इज्जत घालवू नका (सामना) आणि औटघटकेची कवचकुंडले (नेकनामदार शरद पवार यांनी महाराष्ट्र टाइम्सचे गेस्ट एडिटर म्हणून लिहिलेला लेख) हे अग्रलेख सध्या चांगलेच गाजत आहेत. नेकनामदार शरद पवार यांच्या अग्रलेखावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया आल्या आहेत. काल दिवसभर विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये तर हाच एकमेव चर्चाविषय होता. सहसा वृत्तपत्रांमध्ये असे घडत नाही. आपल्या सहका-याने जरी अग्रलेख लिहिला, तरी त्याची आरोग्यपूर्ण चर्चा न करणे हा वृत्तपत्रांतील संकेत आहे! परंतु काल मात्र अनेकांना टकळी फुटली होती. त्यात पवारांनी केतकरांना कसे झोडपले, याचेच कौतुक अधिक! केतकरांचा अभ्यास, त्यांचे वाचन, त्यांची आक्रमक शैली, त्यांचे यश यामुळे पत्रसृष्टीत किती मोठी पोटदुखीची साथ पसरलेली आहे, याचा त्यांनाही अंदाज नसावा! हेही असो.
नेकनामदार शरद पवार यांचा तो अग्रलेख निश्चितच वाचनीय आणि चिंतनीय होता. वृत्तपत्रांवरील हल्ल्यांबाबत त्यांनी सुयोग्य आणि सुसंस्कृत भूमिका ठामपणे घेतली. त्याबद्दल त्यांचे मोठे कौतुक होत आहे. परंतु समाजाच्या पुढा-यांनी अशी योग्य भूमिका घेतली, तर त्यांचे कौतुक व्हावे, ही बाब आपली सामाजिक घसरण केवढी मोठी झाली आहे, हेच दाखवित आहे!
या अग्रलेखातून शरद पवार यांचा मराठी वृत्तपत्रांबाबतचा पेटंट तुच्छतावाद सतत डोकावत असला, तरी त्यांनी एकूणच वृत्तपत्रांबाबत काही मुद्देही उपस्थित केले आहेत. ते पाहणे अधिक श्रेयस्कर ठरेल. या लेखात त्यांनी लोकसत्तेवर ते वाचकांची सोयीची पत्रे छापतात, असा आरोप नामोल्लेख न करता केलेला आहे. (म्हणजे रा. रा. पवारसाहेब, येथे तुम्हीही वृत्तपत्रांच्याच वळणावर गेलात की!) त्याशिवाय लोकसत्ताने सामनावरील हल्ल्याची पुणे आवृत्ती वगळता अन्यत्र दखलही न घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. यातील सोयीची पत्रे छापणे हा अगदीच बिनबुडाचा आरोप असून, तो कोणीही कोणावरही करू शकतो. वस्तुस्थिती अशी असते, की वाचकांना कोणत्या वृत्तपत्राकडे कोणत्या प्रकारचा मजकूर पाठवावा म्हणजे तो प्रसिद्ध होईल, याची चांगलीच जाणीव असते. सामनाकडे कोणी धर्मनिरपेक्षतेचे पारायण लावणार नाही. प्रत्येक वृत्तपत्राची एक स्वतंत्र प्रतिमा वाचकांच्या मनात असते, त्यानुसारच ते वृत्तपत्र विकत घेण्यापासून त्यास प्रसंगोपात पत्र पाठविण्यापर्यंतचे निर्णय वाचक घेत असतात. सामनावरील हल्ल्याची बातमी लोकसत्तेने पुणे वगळता अन्य आवृत्त्यांत छापली नसेल, तर ते चूकच आहे. परंतु त्यादिवशी मुंबईतील सकाळमध्येही ती बातमी अगदी आतील पानात दिसेल-न दिसेल अशी छापलेली होती. खरे तर यातही धोरण वगैरे असा काही भाग नसतो, हे वृत्तपत्रांचे काम कसे चालते हे ज्याला माहित आहे, त्याच्या लक्षात येईल. रात्री उशीरा पानात कोणत्या बातम्या घेतलेल्या आहेत, हे संपादकांनाही अन्य वाचकांप्रमाणेच सकाळी वृत्तपत्र हातात आल्यावर समजते! हल्ली तर काही संपादक असे आहेत, की त्यांना बातमीच समजत नाही! पण तो त्यांच्या उंचीचा भाग झाला!
संपादकांनी कुणाच्या तरी चरणी निष्ठा वाहिल्याशिवाय त्यांना पद्मश्री वा राज्यसभेची जागा मिळत नाही, हा रा. रा. पवारांचा टोला मात्र कमरेखाली केलेला वारच आहे! आणि अशा प्रकारे जर राज्यसभेच्या जागा वा पद्म पुरस्कार मिळत असतील, तर त्यावर 'काही निर्णय घेण्यासंबंधीने विचार करणे' हे तर रा. रा. पवार यांच्यासारख्या नेत्यांच्याच अखत्यारीत येते! परंतु ते त्यासंबंधीने निर्णय घेणार नाहीत.
असे असले, तरी पवारांच्या लेखाने दोन दिवस वृत्तपत्रांची मोठी करमणूक केली, हे - त्यातील तुच्छतावाद बाजूस ठेऊन - मान्यच करावयास हवे!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. १९०६०८)
माननीय केंद्रीय कृशीमंत्री नेकनामदार श्री शरश्चंद्ररावजी पवारसाहेब
यांसी स. न. वि. वि.
पत्रास कारन की, आजच महाराष्ट्र टाईमचा पेपर वाचला कारन की आमच्याकडे हा पेपर एक दिवसानी उशीराच येतो. या पेपराचे गेस्ट एडिटर म्हनून तुमची निवड झाल्याचे वाचून आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला. त्याप्रित्यर्थ आज सकाळी कारखान्याच्या गेटावर दोन पोती लावून दिलेली आहेत. तेथे सर्वांना साखर वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात येत आहे. त्याचे फोटोसुद्धा काढलेत. ते लौकरच आपनाकडे पाठवून देऊ. तसेच कारखान्याच्या सगळ्या संचालकांनी तुमच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे. कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधीच सभा लावली होती. तेथे तुमच्या लेखाचे सामुहिक वाचनही करण्यात आले व त्या लेखास एकमताने पाठिंबा असल्याचा ठरावही सेप्रेट मंजूर केलेला आहे. काळजी नसावी. तुम्ही मेटेसाहेबांना नावे ठेवली ते आवडले नाही, असा अडथळा काही कार्यकर्त्यांना आणला होता. वास्तविक पाहता आम्हाला स्वतालासुद्धा ते आवडलेले नाही. पण आम्ही पक्षाचे एकनिष्ठ सेवक आहोत. पहिल्यांदा पक्षशिस्त महत्वाची. म्हणून आम्ही सगळ्यांना उगी केले.
तुम्ही सगळ्या पेपरांच्या संपादकावर चांगलीच टिका केली ते बरे झाले. हल्ली पेपरवाले जास्तीच तास सोडूनी चालायला लागले आहेत. तुम्ही मराठी वाचित नसल्याने तुम्हाला त्याचा त्रास नाही, पण कार्यकर्त्यांना तोंड काडायला जागा राहात नाही. तुमच्या मुंबई-पुन्यात हे जरा जास्तीच चालते व त्याचा परिनाम गाववस्तीकडे होतो. तुम्ही स्वताकडे या लेखात लईच कमीपना घेऊन लिहिलेले आहे. ते आम्ही खरे मानायचे का? खुलासा झाला तर त्याप्रमाने धोरन ठेवन्यास बरे होईल. पण आमच्या साहेबरावांच्या, म्हणजे आमचे धाकटे सुपुत्र बीए पास झालेत यंदा, सद्या डेरीचं काम पाहत आसतात, त्यांच्या मतानुसार ही तुमची सहानुभूती क्याश करायची चाल आहे. मग काय हरकत नाही.
पेपराला उत्तर द्यायचं नाही, हे आपले धोरन आम्हीसुद्धा येथे चालवतो. जाह्यराती बंद केल्या की आपसूक जाग्यावर येत असतात. सऊ सुनारकी एक लुहारकी असे म्हणत्यात ते खरेच आहे. अर्थात तुमचा दाब वेगळ्या प्रकारचा असेल, हे आम्हाला माहितच आहे. म्हनून काळजीचे काही कारन नाही.
तुम्ही आजून किती दिवस गेस्ट एडिटर आसाल, ते कळविने. टीव्हीवरून जाहिर केले तरी चालेल. आमच्या साहेबरावांचे मन गावाकडे रमत नाही. त्यांना पेपर काडण्याची हौस आहे. तुम्ही परवानगी दिली, तर तुमच्याकडे पाठवावे म्हणतो. महाराष्ट्र टाइममध्ये नसेल जागा, तर सकाळमध्ये लावला तरी चालेल. उद्या त्यांनी पेपर काडला तर पार्टीलाच फायदा होईल.
केंद्रातलं दिल्ली सरकार टर्म भरवनार नाही असा आवाज आहे. तेव्हा काळजी नसावी. आम्ही तयारीला लागलो आहोत. या टायमाला तरी शिट आपलीच काडनार. साहेबरावांनी तशी मतदारसंघाची बांधनी केली आहे. मा. श्री आरूनभाई गुजरातींकडे त्याचा कार्यहवाल पाठविलेलाच आहे. गेस्ट एडिटरपनातून सवड मिळाल्यास ती फाईल नजरेखालून घालन्याची कृपा करावी, ही विनंती. बाकी काळजी करू नये. तब्येतीची काळजी घ्यावी. कळावे.
आपला विश्वासू
सही
श्रीपतराव खांडके पाटील,
चेरमन, श्रीपत सहकारी साखर कारखाना व शरदश्चंद्र पवार शिक्षण संस्था, खांडकेवाडी.
(Posted by बापू अत्रंगे, दि. 190608)
म्हाराष्ट्राच समकालिन इतिहास आणि महामहीम केंद्रिय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 'जिवेत शरदः शतम्' पुर्वण्या यांनुसार मा. साहेब हे महाविद्यालात शिक्षणच घेत असताना त्यांच्या बाकावर बसण्याचे सौभाग्य म्हाराष्ट्रातील किमान एक्केचाळीस जणांना लाभलेले आहे! (तो मा. साहेबांचाच बाक! लांबी-रुंदीने तेवढा थोर असणारच!) तैसे सौभाग्यवान होणे काही आमुच्या दैवात नव्हते. परंतु आमुचे अहोभाग्यम् ऐसे की, पुढे प्रतेक्ष मा. साहेबच आमुचे सहकारी जाहले!
जनतेस हे असत्य वाटू शकते. परंतु त्यास नाईलाज असे. कारण की जनतेस तर आता कृषिक्षेत्रात आपुल्या देशाने आयपीएल इतुकी प्रगती केलेली आहे, हे त्रिकालाबाधीत साहेबवचनही असत्यच वाटते! (लोकांचा अडाणीपणा! दुसरे काय! परवा तर एक कास्तकार आम्हांस पुसत होता, की आयपीएल म्हणजे मा. साहेबांनी शोधलेली लाल गव्हाची जात आहे काय?)
परंतु प्रतेक्ष मा. साहेबांनीच हे सांगूनी टाकिले आहे, की त्यांनी (पक्षी - मा. साहेबांनी) सकाळ या दैनिकात काही काळ क्रीडा बातमीदारी (की बातमीदारीची क्रीडा!) केलेली आहे. आम्हीही मा. साहेबांप्रमाणेच सकाळमध्ये, व पुनवडीतच बातमीदारी केलेली आहे. त्या कारणे, काळाचा किरकोळ फरक सोडिल्यास आम्ही आणि साहेब हे साक्षात कलिगच ठरतो!
मा. साहेबांनीच खुद्द आपुल्या हस्ते आपुल्या महाआयुष्यातील या महारहस्याचे उद्घाटन केले! तेही महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीत, समस्त एडिटरांच्या साक्षीने!!
तैसे तेथे ते आणिकही खूप काही बोलले. उदाहरणार्थ तेथे त्यांनी सकाळचा वर्धापनदिन म्हणजे काय थोर प्रकर्ण असते यावरी थोर मार्मिक व सविस्तर व विनोदी भाष्य केले. (आपुली गृहछिद्रे अशी चव्हाट्यावर मांडणे शोभले का साहेबांना?) म्हणाले, सकाळचा वर्धापनदिन म्हणजे पानसुपारी व कॉफीपान व नंतर दुस-या दिवशीच्या अंकात सर्वांचे हजेरीपत्रक! हा सकाळकारांच्या नशिबाचाच भाग, की त्यांना (पक्षी - मा. साहेबांना) मुंबै सकाळमध्ये वर्धापनदिनी जे काही लावण्यांचे ऑर्केस्ट्रे ठेवतात व जादूचे प्रयोग चालतात व फुगे फुगवितात ते ठावे नव्हते! अन्यथा टाचण्यांची कमतरता मा. साहेबांकडे मुळीच नसते!! असो.
आता तुम्ही जर आजचा मटा वाचिला नसेल, तर तुमच्या काळजाच्या कुहरात ऐसी उत्सुकता दाटूनच आली असेल, की बोवा मा. साहेबांनी कोणत्या कारणे महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीचा उंबरा लांघला असेल बरें? तेथे तर हल्ली तयांचे परमसल्लागार रा. रा. गोविंदरावही (आणि तयांचि पत्रधर्मशिस्त, परंप्रा आणि वारसाही) नाहीत! मग एरवी अवघ्या म-हाटी पत्रकारांकडे (व वाहिन्यांच्या सुकन्यांकडे) सुबुद्ध तुच्छतेने पाहणारा, तयांचे प्रश्न मुखातील माणिकचंदचा कण जिव्हाग्राने उडवून लावावा ऐसे उडवून लावणारा आमुचा हा जाण्ता राजा काय मिषे एका मराठी पत्राच्या कार्यालयी गेला असेल बरें?
तर त्याचे कारण ऐसे, की प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता अशी जयाची कीर्ती ते साक्षात् मा. साहेब साक्षात् संपादक-शिराळशेट जाहले होते मटाचे! शिराळशेटास जैसे एकदिवसाचे राज्य मिळाले, तैसे एक दिवसाचे मटासाम्राज्य मा. साहेबांच्या शुभकरकमलात देणेत आले होते. मा. साहेब मटाच्या एनिव्हर्सरी विशेषांकाचे अतिथी संपादक झाले होते. (एरवी ते सकाळचे महासंपादक असतात.... असे लोक म्हणाले नाहीत, तरी सकाळकार त्याचा हरमिटिंगी इन्कार करतात!!)
आता तुम्ही जर आजचा मटा वाचिला नसेल, तर तुमच्या काळजाच्या कुहरात पुन्हा ऐसी उत्सुकता दाटूनच आली असेल, की हे अतिथी संपादक म्हणजे काय प्रकर्ण असते व ते काय करतात व तें दिशी बाकीची एडिटरे काय शिवसेना शाखेत जावोनी बस्तात की काय?
तर तैसे काही नस्ते! अतिथी संपादक म्हणजे तैसा फक्त एका लेखापुरता मामला असतो! त्या बिचा-यास वाटते, की आपण बोवा संपादक! टिळक-आगरकरांच्या गादीवर आपण बसणार! परंतु त्या गादीचा कापूस आता एवढा तेलकट-चप्पट झालाय, की माणसे तिथून सुळकन् सुटकतात अन् एक्दम खास्दारबिस्दारच होतात राज्यसभेचे!! तेव्हा ते काही तैसे नस्ते. त्यांस (पक्षी - अतिथी संपादक, जैसे की मा. साहेब) कार्यालयी पाचारतात. चार एडिटरे त्यास घेवोनि बिस्किटे देतात व गप्पा मारतात व आपण कैसे चौसष्टकलाचिंतामणी हे दावत त्यास विचारतात, की मग तुमचे वृत्तपत्र कैसे काढावे याबाबत काय बरें मत? (आता त्या बिचा-याचा वृत्तपत्रांचा दैनंदिन संबंध आपले काय छापून आले ते वाचण्यापुरता! तो काय सांगणार बरें डोंबलाचे! तो एडिटरांपेक्षा चार अधिक गावांचे जलप्राशन केलेला असेल, तर देतो ठोकून काही ऐसे जी!!) तद्नंतर पाय मोकळे करण्याकरीता त्यास कार्यालयी फिरवतात व दावितात, की रोजचा पेपर कैसा काढितात. (तोही ते मन लावोनी सर्वे ऐकतो-पाहतो. जणू उदईक त्यास स्वतःचे वृत्तपत्रच लॉंच करावयाचे आहे.) तद्नंतर सर्व कर्मचारी मिळोनी त्यास काहीबाही विचारतात. कारण की त्यांना दुसरे दिवशी ते छापावयाचे अस्ते. तद्नंतर त्यास निरोपाचा विडा देतात... ऐसे परिपूर्ण जाहले की त्यास म्हणतात, गेस्ट एडिटर! जैसे की आज मा. साहेब जाहले...
परंतु मा. साहेब अतिथोर हुश्शार. त्यांनी आपुली ही औट घटकेची कवचकुंडले घालोनी जी काय तरवारबाजी केली त्यास गेस्ट एडिटरांच्या इतिहासात तोड नाही! वर बोलणे ते किती विनयशील! जैसे तोंडात 'अरूणभाई गुजराती' ठेवलेत!! "मी एक सामान्य वाचक, मला जांभेकर, टिळक, आगरकरांची निस्पृह, सडेतोड आणि निर्भिड परंपरा फारशी कळत नाही, तेव्हा मी काय बोलणार?" ऐसे बोलत-बोलत त्यांनी रा. रा. कुमार केतकरांपासोनी खुद्द टाइम्सचे सल्लागार संपादक खास्दार भारतकुमार राऊतां पर्येंत अवघ्यांची टोपीच की हो उडविली!(कोणाच्या तरी चरणी आपली लेखणी निष्ठेने वाहण्याचे कसब अंगी असल्यास पद्मश्री वा राज्यसभेची एखादी जागा मिळते, हे जे मा. साहेबांनी लिहिले आहे, तो त्यांचा सल्ला म्हणावा की आदेश, यावर म्हणे सकाळ-पासोनी जोर्दार खल सुरू आहे...!!!)
रा. रा. केतकरांचे जाऊ द्या!... म्हणजे पयल्यांदा तर आमुच्या हे ध्यानीच आले नाही, की मा. साहेबांचा वार कोणदिशी चालला आहे! ते म्हणाले, की दिल्लीत त्यांना एकमेव मराठी वृत्तपत्र मिळते, की ज्यास त्यांच्याविषयी खास 'ममता' व 'विशेष प्रेम' आहे! हे वाचोनी आम्हांस ऐसे गमले, की मा. साहेब सकाळबद्दलच बोलत आहेत. परंतु मग आम्ही विचार केला, की दिल्लीत सकाळ वाचला जातो तो फक्त आमुचे परममित्र, दौराधिपती महामहीम विजयश्री नाईक यांचे घरीच! मग मा. साहेबांकडे हा दुसरा अंक कोठूनी बरे जातो? तेव्हा आमुच्या बालबुद्धीस समजले, की त्यांचा नेम लोकसत्तेवरी आहे! तेव्हा त्यांचे (पक्षी - रा. रा. केतकरांचे) जाऊ द्या... शिवाय ते काही सद्यकाली टाइम्सातही नाहीत. परंतु रा. रा. राऊतांचे काय? त्यांना तो हा खंजिरप्रहारच गमला असावा! आज सकाळपासोनी ते पाठीस सोप्रामायशीन फाशीत असल्याची बोलवा आहे....!
बरे जाहले, मा. साहेबांना फुल्लटाईम्स संपादक केले नाही! अन्यथा म्हाराष्ट्रात सोप्रामायसीनची प्रचंडच टंचाई जाहली अस्ती व मग आस्ट्रेलियातून लाल मलमाची आयात करावी लागली अस्ती!
दुसरे एक बरे जाहले, की मा. साहेबांना फुल्लटाईम्स संपादक केले नाही! अन्यथा महाराष्ट्र टाइम्सचे समस्त बातमीदार रस्त्यावर आले असते... त्यांसी रेशनवरील लाल गहू खावा लागला असता...!
अंकात एकपण बातमी छापोनी येणार नसेल, तर बेनेट-कोलमनांनी काय त्यांचा मक्ता घेतला आहे? त्या समस्त बातमीदारांस गेस्ट रिपोर्टर म्हणून सुद्धा टाईम्स बिल्डिंगीत येऊ देणार नाहीत!
आजचा मटाचा अंकच पाहा ना...
मा. साहेबांखेरीज एक चिटोर वृत्तसुद्धा नाही अंकात!
(Posted by बापू अत्रंगे, दि. 180608)
जैसा मुंबैचा लोकसत्ता वा मटा, जैसा नागपुराचा लोकमत, जैसा करवीरचा पुढारी अन् नाशकाचा गावकरी, तैसा आमुच्या पुनवडीचा सकाळ! पुण्यात सकाळ न आला तर लोकांचा सकाळ झाली यावर विश्वासही न बैसे ऐसी स्थिती! ऐसी बोलवा असे, की मागे कधीतरी सकाळने छापिले, की अमुक तमुक जोशी यांचे देहावसान जाहले, तो ते अमुक तमुक जोशी मानावयासच तैयार नव्हते की आपण धादांत जिवंत आहोत! अखेरीस म्हणे मुन्सिपाल्टीच्या लोकांनी त्यांस जिवंत असल्याचे सर्टिफिकेट दिले तेव्हा त्यांचा कोठे विश्वास बैसला! तर ऐसा विश्वास कमाविणे हे काही 'पुढार'पण करण्याइतुके सोपे नाही!
ऐसाच (म्हणजे याचि नावाचा, परंतु यासम नव्हे!) एक सकाळ हल्ली ठाणे-रायगडाकडेही निघतो. खोटे नाही सांगत! पूर्वी तो मुंबई सकाळ या नावे निघावयाचा. (आमुच्या कै. माधवराव गडक-यांनी तो ल्हानाचा मोठा केला. रा. रा. राधाकृष्ण नार्वेकरांनी त्यास निजविला! मग त्यास कधी जाग ऐसी आलीच नाही!)
या सकाळची एक पुर्वणी टुडे नावें सकाळमध्ये मशहूर आहे! परवा तीस दोन वरिसे जाहली! तेव्हा मग सकाळकारांनी सवयीने मिटिंग केली, की "आधुनिक बाज घेतलेल्या बेलापूर कार्यालयाची घडी नुकतीच बसायला लागलेली... व मे महिन्यात सुटीवर गेलेले कर्मचारी नुकतेच यायला लागलेले..." तेणे कारणे टुडेचा वाढदिवस साजरा करावा की न करावा? प्रश्न थोरला गहन होता. यक्ष हाच प्रश्न युद्धिष्ठिरास विचारितो, तर पांडव अद्याप शिळावस्थेतच असते व इंडिया टीव्हीला त्येंच्यावरी एक कार्येक्रम करता आला असता!
परंतु अखेरी ब-याच मिटिंगांती या प्रश्नास उत्तर गावले. ते ऐसे, की वाढदिनाचा बार उडवून देऊ या च्यामारी! आता सकाळ हे एक कौटुंबिक पत्र असल्या कारणे तेथील सर्वेच कार्येक्रम घरगुती स्वरुपात सार्जे करणे ऐसी परंप्रा वेदकालापासून चालत आलेली आहे. त्या परंप्रेस स्मरोनी हा कार्येक्रम साज्रा जाहला. तयाची 'चित्रमय झलक' टुडेच्या मलपृष्ठी आपण पाहू शकता. (आजच आपल्या विक्रेत्यास सांगून कालचा अंक बुक करा!)
या चित्रमय झलकीवरूनी ऐसे दिसते, की कार्येक्रम घरगुती असला, तरी सकाळकारांनी त्यात खर्चाची काही कसर सोडलेली नव्हती! सर्वीकडे सप्तरंगी फुगे होते, कागदी झिरमळ्या होत्या, फुले होती, मुले होती... वाढदिवसाच्या त्रिकोणी टोप्या मात्र कुणाच्या शीरी दिसल्या नाहीत! पुण्यातूनी सँक्शन नाही दिले वाटते!! असू दे, असू दे!! पण केक तर होता ना... घर्गुती!! द्वितीय वाढदिन म्हणजे कमाल दोन हजार ग्रामचा तरी असणार! पुरे झाला तितका!!
हा हॅप्पी बर्थडे टु यू घर्गुती असला, तरी ते ठिकाणी सेलेब्रिटींची मांदियाळी बहुतच जमली होती! सर्वात मोठी सेलेब्रिटी म्हणजे आमचा सदाफुलीचे वृक्ष रा. रा. प्रवीण दवणे हे सदरकविसुद्धा सादर आले होते. तयांसी बौधा सकाळची मोल्डेड फर्निचरयुक्त आधुनिक कचेरी पाहोनी कवितेचा मोल्डेड हुंदका आला असावा! त्या शिवाय का तयांनी सकाळच्या टुडेला चक्क गुणवत्ता यादीत ढकलून दिले? ते ऐकोनी तेथील बरेच जण म्हणे हसले!! असो. आपणांसी काय त्याचे? हसणाराचेच दंत दिसतील!
आता घर्गुती हॅप्पी बर्थ डे टू यू असल्यावरी तेथे मनोरंजनाचा सदाबहार कार्येक्रम हवाच! आम्हीसुद्धा आमच्या चाळीत कुणाचा हॅप्पी बर्थ डे टू यू साजरा करतो... अर्ध्या किलोचा केक आणून, तेव्हा ल्हान-ल्हान मुलांसाठी किमानपक्षी हौजी ठेवतोच ठेवतो! हा तो सकाळसारख्या प्रतिष्ठित, निःपक्षपाती व विश्वासार्ह वृत्तपत्राचा कार्येक्रम! तेव्हा तेथेही कार्यालयातील ल्हान-ल्हान पत्रकारांसाठी जादूगाराचा मनोरंजनाचा कार्येक्रम ठेवण्यात आला होता!
जादूगार रा. रा. दत्ता मोरे यांच्या जादूगरीची कमाल ऐकोनी आम्हांस ऐसे वाटले, की हे तर सकाळचे प्रोफेसर डंबलडोरच! त्यांनी तेथे सकाळच्या कागदातूनी शंभराची की हजाराची नोटच काढून की दाविली!! रा. रा. मोरे यांना आता सहयोगी संपादक - अकाऊंट या पदावर घ्यावे की काय अशी मिटिंग तेथे सुरू असणे शक्य आहे!!
येणेप्रकारे सकाळच्या टुडे पुर्वणीचा कार्येक्रम सुफळ-संपन्न झाला आणि मंडळी टुडेचा टुमारो करण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊनच बाहेर पडली...
त्यांच्या खांद्यांना आमुच्या शुभेच्छा!!
इकडे टुडेच्या पुर्वणीचा हा वैभवशाली मंगल सोहळा सुरू असताना, तिकडे महाराष्ट्र टाइम्सलाही आपल्या एनिव्हर्सरीचे (त्येंच्यामध्ये वर्धापनदिन ऐसे संबोधीत नाहीत! तैसे म्हणणे वंगाळ वाटते!!) वेध लागले होते. बुधवारी त्यांच्यायेथे श्रीकृपेकरून हा सोहळा आहे. पाहू या तो कैसा होतो...
सध्या तरी या स्पर्धेमध्ये सकाळनेच बाजी मारीली असल्याचे गमते.
कारण की सकाळमध्ये सर्वश्री प्रवीण दवणे आदी सेलेब्रिटी आल्या होत्या व तेथे फुगेही लाविले होते!
मटामध्ये कोणी तरी मंत्री आहे म्हणे केंद्रात शरद पवार म्हणोनी, ते येणार आहेत!
छ्छा! त्यात काय मझा न येणे!
वृत्तपत्राचा वर्धापनदिन कैसा घर्गुती साजरा झाला पाहिजे!!
(टुडेच्या वाढदिवसाचे सकाळमधील वृत्त वाचण्यासाठी येथे टिचकी करा.)
लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अखेर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विनायक मेटे यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. गेले काही दिवस लोकसत्तासह जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी (सकाळ नव्हे!) हा विषय लावून धरला होता. पत्रकारांच्या विविध संघटना, विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांशिवाय समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी केतकरांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध केला होता. नवी दिल्लीतही याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे साहजिकच असे वाटण्याची शक्यता आहे, की या सर्व दबावाची दखल घेऊन मेटेंच्या हकालपट्टीचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला असावा.
वस्तुतः ते तेवढे साधे आणि सरळ नाही! एकंदरच हे सर्व प्रकरण वाटते तेवढे सरळ आणि सोपे नाही!
एकूण घटनाक्रम पाहा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी शिवस्मारकासाठी जागेची पाहणी करण्यासाठी अरबी समुद्रात बोटीने चक्कर मारली. जागा निश्चित केली व तशी घोषणा त्यांनी मंत्रालयात केली. ही आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील घोषणा असून, आम्ही तिची केवळ पूर्ती करून जनतेला दिलेले आश्वासन पाळत आहोत, अशी मखलाशी करीत ही घोषणा करण्यात आली. त्यावर दुस-या दिवशी कुमार केतकर यांनी 'अवतरली शिवशाही' हा अग्रलेख लिहिला आणि त्यात शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणा-या सर्वांचीच सालटी काढली. केतकर यांचा रोख शिवसेना किंवा हिंदुत्ववाद्यांपेक्षा सत्ताधारी पक्षावर अधिक होता. त्यातही आर. आर. पाटील यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली होती. अग्रलेख कडकच होता. हा अग्रलेख आल्याच्या दुस-या दिवशी सकाळी विनायकराव मेटे हे पालक असलेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुमार केतकर यांच्या ठाण्यातील निवासस्थानावर हल्ला चढविला. या मेटकरी हल्लेखोरांचा आरोप असा होता, की या अग्रलेखातून केतकर यांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे.
(विशेष म्हणजे, या हल्ल्याची बातमी देताना काही मराठी वाहिन्या या अग्रलेखातील काही भाग हायलाईट करून दाखवित होत्या. त्यातून ज्यांनी तो वाचलाच नव्हता त्यांच्याकडे कोणता संदेश जाणार होता? की त्या अग्रलेखाच्या त्या हायलायटेड भागात खरोखरच तसा बदनामीकारक मजकूर असावा! वाहिन्यांचा तोल सुटतो तो असा. असो.)
वास्तविक त्यात महाराजांची बदनामी करणारे असा शब्दही नव्हता. ते न कळण्याएवढे हे मेटकरी निर्बुद्ध होते, असे केवळ निरागस पत्रकार आणि भाबडी पत्रेच म्हणू शकतील. आपण तसे मानण्याचे कारण नाही. तथाकथित 'बदनामी' असेलच, तर ती सरकारची होती, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची होती.
हे असे असेल, तर काही सवाल निर्माण होतात.
हा हल्ला का झाला?
सगळी माध्यमे या हल्ल्याचे सूत्रधार विनायक मेटे आहेत, असे सांगत असताना विरोधी पक्षातील गडकरी-मुंडे आदी मंडळी या हल्ल्याचा खरा सूत्रधार शोधून त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे का म्हणत होती?
विनायक मेटे यांच्यावर कारवाई करण्यास, त्यांना अटक करण्यास पोलिस यंत्रणा का धजावत नव्हती?
सरकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कोणाचा मेटे यांच्यावर वरदहस्त होता?
आर. आर. पाटील या सगळ्या प्रकरणात शासकीय भाषेतच का बोलत होते?
या प्रश्नांच्या उत्तरातच मेटेंवरील आजच्या कारवाईचे उत्तर दडलेले आहे. गेल्या काही महिन्यांत केतकरांनी आपल्या अग्रलेखांतून ओढलेल्या कोरड्यांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही बडे नेते नाराज होते. फक्त आपली नाराजी ते करड्या आवाजात व्यक्त करीत नव्हते एवढेच. पण त्या मौनाचा संदेश अट्टल राजकारण्यांना बरोबर कळतो! केतकरांच्या लेखणीला लगाम लावण्यासाठीच फक्त हा हल्ला करण्यात आला. शिवरायांच्या बदनामीचा यात काडीचाही संबंध नव्हता!
पण या हल्ल्यानंतरही राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आपल्या भुजांतील बळ दाखविण्यास सुरुवात केली. त्यांनी जेव्हा इंद्राय स्वाहा-तक्षकाय स्वाहा अशी भूमिका घेण्याचे संकेत दिले, तेव्हा सगळीच धावपळ झाली. दुसरीकडे आबांचे गृहमंत्रालयही त्यात बदनाम होऊ लागले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वादळ पक्षाला नडू शकेल, हे पाहून मेटेंच्या हकालपट्टीचा निर्णय दिल्लीतून झाला. हा सर्वस्वी राजकीय हेतूंनी प्रेरीत असलेला निर्णय होता.
आता हवे तर पत्रकारांनी आपली पाठ थोपटून घ्यावी! पण यात त्यांचा विजय वगैरे काही आम्हांस दिसत नाही. असलाच तर हा पक्षातील गटा-तटाच्या राजकारणाचा विजय आहे! या कारवाईनंतर काही जणांची प्रतिक्रिया - आरारा, हकालपट्टी झाली - अशी मानभावीपणाची असेल. पण त्यातील ध्वनीचा अर्थ वृत्तपत्रांनी समजून घेतला पाहिजे.
अजून मेटेंवर पोलिसी कारवाई बाकीच आहे.
आरार आबा ती कधी करतात हे पाहायचे...
एकंदर या सर्व प्रकरणात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुद्दा गौणच राहिलाय, हे ध्यानी असलेले बरे.
(Posted by चांगदेव पाटील, दि. 140608)
(आजपासून बातमीदार परिवारात चांगदेव पाटील हे नवीन लेखक सामील झाले आहेत. ते स्वतः एका साखळी वृत्तपत्रात वरीष्ठ पत्रकार असून, राजकारण हा त्यांचा कुतुहलाचा विषय आहे.
- Blogeditor, A-Cidic Communications.)

कॉलेजला दांडी मारून आम्ही किती तरी मॅटिन्या टाकल्यात! वडिलांच्या पाकिटातले, आईच्या पर्समधले पैसे उडवून आम्ही किती तरी फर्स्ट डे फर्स्ट शो पाह्यलेत! मुकद्दर का सिकंदरमधल्या बाईकवरच्या अमिताबच्चनने आम्हांला वेड लावले होते. पायाचा अंगठा मोडला तो त्या वेडातूनच! पह्यल्यांदा आम्ही खजुरा बीरची (व्हिस्की घेण्याचं धाडस तेव्हा उगवलं नव्हतं आमच्यात!) चव घेतली ती अमरप्रेममधल्या राजेश खन्नाला श्रद्धांजली म्हणूनच! हिम्मतवालानंतर तर आम्ही चक्क पांढरे शूजसुद्धा घेतले होते. आणि कुणापाशी बोलू नका, पण आमच्या तेव्हाच्या डायरीतला श्रीदेवीचा फोटो आम्ही अजूनही तस्साच ठेवलाय!
आता इतक्या क्वालिफिकेशनवर कोणीही चित्रपट समीक्षक होऊ शकतो!
म्हणजे वृत्तपत्रांत चित्रपट समीक्षा लिहिण्यासाठी अखेर लागते तरी काय?
फार फार हिंदमाता, प्लाझा, मराठा मंदिर इथं डिप्लोमा केला, की मग फोर्टातल्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन इंग्रजी चित्रपटांच्या डिग्री कोर्सला प्रवेश घ्यायचा! येवढ्या अर्हतेनंतर तुम्ही वृत्तपत्रांत चित्रपट समीक्षक झाला नाहीत, तर मात्र तुमच्यासमोर एकच पर्याय राहतो - डोअरकिपर होण्याचा! सुदैवाने आम्हांस वृत्तपत्रात नोकरी मिळाली आणि आम्ही डोअरकिपर होण्याच्या बहुमानापासून वंचित राहिलो!
सुरवातीला आम्हांस वाटले की समीक्षा हे फारच औघड प्रकर्ण असेल. पण तसे काय नसते! एकदा तुमचा हात बसला ना, की मग हाय काय अन् नाय काय!
पह्यल्यांदा नमनाला जरासं तेल घालायचं, की ह्या पिच्चरची मध्यवर्ती कल्पना कशी आहे नि तो कसा चागला वा वाईट आहे. मग पिच्चरची स्टोरी सांगायची. मग या कलाकाराचा अभिनय जमला आणि त्याचा फसला. याचा रोल बारीक होता नि त्याचा मोठा असं सागायचं. मग गाण्यावर लिहायचं. मग पुन्हा नमनातलं उरलेलं तेल घालायचं. आणि शेवटी पिच्चर बघणेबल आहे की तद्दन फालतू आहे, असं भारदस्त लिहायचं. खाली मनात येईल ते स्टार टाकायचे की झाली समीक्षा तय्यार!
हाय काय अन् नाय काय!!
----------------------------------------------------
वास्तविक अशी क्रिया आम्हीच करतो असं नाही, तर सगळेच (काही सन्माननीय अपवाद वगळता!) करतात. वाटल्यास आमचे परममित्र रा. रा. राम गोपाल वर्मा यांना विचारा! किंवा त्यांचा ब्लॉगच वाचा ना! त्यात त्यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत, की -
या समीक्षकांना अक्कल काय?
त्यांना सिनेमातलं कळतं काय?
त्यांची पात्रता काय? कुजकेनासके लिहिण्याची क्षमता, र ला र आणि ट ला ट जुळविण्याची कला की सिनेमाचं ज्ञान?
रामूजींचा अँगल असा, की केवळ त्यांना (पक्षी - समीक्षकांना) वृत्तपत्र/चॅनेलने समीक्षेसाठी नेमले आहे या एकाच पात्रतेच्या आधारावर (ते) सिनेमाबद्दल काय वाट्टेल ते लिहू शकतात! हे वाचल्यानंतर वाटले, हा राम गोपाल वर्माचा ब्लॉग आहे की राम गोपाल वर्मा की आग? जरा अतिच - अगदी रंगीलातल्या उर्मिलाइतकं - कडक लिहिलंय रा. रा. रामूने!
वास्तविक रामूने इतके काही कडक लिहिण्याची आवश्यकता नव्हती. काही काही सिक्रेट ओपनच असतात! ती ओरडून सांगितली, तर सांगणाराचंच हसं होतं!
शिवाय सगळेच समीक्षक काय आमच्यासारखे - चित्रपट आवडणे हीच अर्हतावाले नसतात! आता मराठीतच वानगीदाखल बघू जाल, तर महामहीम श्रीकांतजी बोजेवार आहेत. महामहीम अशोकजी राणे आहेत. महामहीम गणेशजी मतकरी आहेत! झालंच तर रा. रा. मुकेशजी माचकर आहेत. त्यांनी कधी चित्रपट समीक्षा लिहिलीच नाही! चवीचवीने रत्नांग्रीचा हापूस खावा, बोटं चाटून चितळ्यांचं श्रीखंड खावं, आईच्या हातचा मटणाचा रस्सा मस्त भुर्रकावा त्या तन्मयतेने ते सिनेमा पाहात आणि त्याचं रसग्रहण करीत! (पण गेले ते दिन गेले!!) (रा. रा. मुकेशजींनी रा. रा. रामूजींच्या लेखाचेही रसग्रहण केलेय मॉस पुरवणीत! आणि त्यात पुन्हा रामूचे वचन सत्यच असा निकालही दिलाय! अलीकडे एवढी दर्यादिली नाय हो दिसत कुठे!!)
अर्थात रा. रा. रामूंजींना गोविंदा-गोविंदापुरतीच मराठी येत असल्याने त्यांस मराठी पत्रांतील समीक्षकांची (त्यात आमच्यासारखे थोर समीक्षक अर्थातच आले!) माहिती कोठून समजणार म्हणा!!
मराठीच्या या मुद्द्यावर आम्ही रा. रा. रामूजींना केव्हाच माफ करून टाकलेय!
(रामूची ती ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी इथं टिचकी मारा.)
(मुकेश माचकरांचा लेख वाचण्यासाठी इथं टिचकी मारा.)
(Posted by - बापू आत्रंगे, दि. १४०६०८)
आज एक मोठ्ठीच गंमत घडली!
मोठ्ठी म्हणजे भली मोठ्ठी!
गेल्या किमान दहा हजार वर्षांत झाली नाही एवढी मोठ्ठी!
आज सामनाने अग्रलेख लिहिला!
अग्रलेख ते रोजच लिहितात, पण आज लिहिला तो काही औरच! अगदी अग्रलेखासारखा!! प्रचारी, कंठाळी, सक्काळी (मॉर्निंग या अर्थाने नव्हे, तर सकाळसारखा तो सक्काळी) असा नव्हे!
तो वाचूनी आम्हांस तर असा मोह जाहला, की वाटले... वाटले समक्ष जाऊनी त्या अग्रलेखकाच्या लेखणीचा धादांत मुका घ्यावा!
पण आम्ही तो मोह आवरला. म्हटले, हे सामनाच्या संस्कृतीत-बिंस्कृतीत-हिंदुत्त्वात-बिंदुत्वात नाही बसले, तर उगाच राडा व्हायचा.
अहाहा! काय त्याचा मथळा -
नववधू प्रिया ही सावरते!
ही नववधू कोण, तर कोकणहृदयसम्राट रा. रा. नारायणराव राणेसाहेब.
(परवा कोणीतरी आम्हांस सांगत होते, की नारायणराव राणेसाहेबांचे खरे नाव नारायण राणे असेच आहे. त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असेच लिहिलेले आहे. पण आमुचा विश्वास नाही बसला. आता कार्यकर्त्यांना काय साहेबांचे खरे नाव ठावे नसेल काय? काय तरीच काय!)
तर त्याचे ऎसे जाहले, की आमुचे हा हा हा सुहास्यसम्राट रा. रा. विलासराव द्येसमुख म्हणजे एक नंबरचे कॉमेडी! मान्साला हसवून हसवून मारतील ऎसी तयांची ख्याती! तर त्यांनी काय केले, की नारायेनराव कैसे नववधूसारखे हळूहळू कॉंग्रेसी सौंसारात रूळू लागले आहेत, ऎसा चिमुकचिमटा काढला आमुच्या नारायेनरावांना. आता सारे कसे आलबेल असताना नारायेनरावांना टुकटुक करायची विलासरावांना काही आवश्यकता होती का? पन माणूसच मोठा कॉमेडी! बोलले ते!
झाले! आमच्या सामनाकारांचे नारायेनरावांवर मोठ्ठेच प्रेम! तशामध्ये द्येसमुखांची ही कॉमेडी म्हंजे भुकेल्याच्या हाती शिववडा ऎसे जाहले! सामनाकारांनी आव न देखिता व ताव न देखिता सामन्यात नारायेनरावांचे नववधुच्या वेशातील छायाचित्र छापुनी टाकिले!
द्येसमुखांची ही कॉमेडी आणि सामन्यातील कोणा संगणक आर्टिस्टाच्या हातची ही कमाल पाहूनी संपादकांच्या लेखणीच्या मुखासही पाणी न सुटते तर नवल! आणि मग त्यांनीही एक झक्कपैकी काव्यबाज अग्रलेखच लिहून टाकला. तोच हा - नववधू प्रिया ही सावरते!
पण खरी जम्माडी गम्मत तर दुसरीच आहे.
नारायेनराव कॉंग्रेसात रुळले असले, तरी त्यांचा फौजफाटा मात्र अजूनही उभा गंध लावणाराच आहे ना!
त्यांनी दिवसभर प्लानिंग केले. संध्याकाळी फिल्डिंग लावली आणि रात्री बार काढला.
वडगाव-धायरीतल्या सामन्याच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या. (शिशेके घरोमे रहनेवाले ऎसे फोटो नही छापा करते जानी!!) मुबै, ठाण्यात सामन्याचे अंक जाळले. वगैरे वगैरे
पण गम्मत आहे ती हीसुद्धा नाही!
गम्मत वेगळीच आहे.
सामनाच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर सामनाकारांना चक्क वृत्तपत्रस्वातंत्र्याची सणसणून याद आली!! म्हणाले - या फोटोत गैर ते काय? महाराष्ट्रात तर स्त्रीपार्टीची मोठीच परंप्रा आहे. ते वाचोनी आम्हांस उगाचच शंका आली, की म्हंजे उद्या नारायेनरावांच्या युवा पेप्रात उद्धवरावांचे ऎसे बालगंधर्वी छायाचित्र छापोनी आले, तर सामनाकारांना आठवेल काय ही परंप्रा? परंतु ते असो.
अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला ही गर्हणीयच गोष्ट. तिचा धिक्कार असो.
पण हा धिक्कार सेनेतून, सामन्यातून होऊ लागला, की आम्हांस मोठीच गम्मत वाटते!!
जशी आज आम्हांस वाटली... गम्मत! भली मोठ्ठी गम्मत!!
(तो अग्रलेख वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.)
(Posted by बापू आत्रंगे, दि. 130608)
"ड्याडी, माला की नै एक सिझर पायजे आनि एक स्टिकबुक पायजे," आमच्या बरखाने आमुच्या पुढ्यात रिक्विझिशन फॉर्म ठेवला.
"व्वा... कशासाठी हवीय आमच्या शोनीला शिझल?" आम्ही विचारणा केली.
"अहो, मीच सांगितलंय तिला..." आतून आमचा एफेम चिरकला.
"हो. पण कशासाठी?"
"क्यशासाटी क्याय क्यशासाटी? आता स्पर्धा नाय का चालू होनार पेपरांच्या... कात्रनं चिकटायच्या.... यावेळेला आपल्याला किमान इस्तरी तरी मिळायलाच पायजे..."
"अरे हो!.... आणू आणू... नक्की आणू..." आम्ही आम्च्या एफेमच्या दूरदृष्टी व अक्कलहुशारीचे मनोमन कौतुक करीत म्हणालो.
कौतुक न करणार तर काय? आता दिसावयास लोकसत्तेच्या लेआऊटसारखी असली म्हणोनी काय जाहले? व्येवहारात तिचा हस्त तर आमुचे लोकमतचे रा. रा. केलाबाबूसुद्धा धरणार नाहीत!
हे आमच्या ध्यानीही आले नव्हते, परंतु तिला बर्रोबर स्मरले की आता लौकरच विविध पत्रांच्या नाना स्किमा सुरू होणार! - इथे कापा आणि तिथे चिकटवा, या प्रश्नाची उत्तरे द्या आणि दक्षिण भारतात जा, सुवर्णाचा कलश जिंका आणि निर्लेपचे तवे घ्या...! एक ना दोन, नाना योजना....
अंकवाढ हे उद्दिष्ट!
योजना हे आमिष!!
एकूणच शाळांच्या परीक्षा आटोपल्या, की मुंबैतील वृत्तपत्रांचा खप घटण्यास सुरवात होते. हा घटता सेन्सेक्स मग पानकळाभर कायम राहतो. अशावेळी आपल्या पत्रांचा खप निदान आहे तेवढा तरी राहावा या अतिशुद्ध हेतूने अवघीच पत्रे अशा काही योजना जाहीर करीतात.
अलीकडे तर असे जाहले, की अनेक पत्रांची कोणती ना कोणती योजना बारोमास आपुली चालूच असते! यास 'मार्केटिंग' असे विद्वान जन संबोधतात. यामुळे वृत्तपत्रांना किती अर्थलाभ होतो, हे आम्हांस ज्ञात नाही, परंतु त्या-त्या पत्रांतील संपादकीय विभागास मात्र याचा अतिच लाभ होतो!
योजनांमुळे खप वाढत वा टिकत असल्याने संपादकीय विभागाची व संपादकांची झाकली मूठ सव्वा लक्षाचीच राहते व ते असे म्हणावयास मुक्त होतात, की हा खप हे संपादकीय विभागाचे (म्हणजेच अकेल्या संपादकाचेच) सुयश आहे!
टीआरपी वृद्धीसाठी वाहिन्या कोणत्याही स्तरास जातात, अशी टीका आमुची पत्रे करतात. अलीकडे तर संकेतस्थळांनीही सर्व संकेतांना हरताळ फासोनी दिंगबरवृत्ती स्वीकारली आहे! (संदर्भासह स्पष्टीकरणाकरीता वाचा व पाहा - मटा ऑनलाईन>यंग झोन>सेक्स टॉक) पण मग आमुचा असा सवाल बापुडा आहे, की वृत्तपत्रांच्या या योजना व वाहिन्यांचे चाळे यांत फरक तो काय राहिला? मान्य की तपशील धादांत वेगळा आहे. पण आशयाचे काय मित्रा? तो तर सारखाच आहे ना!
आम्हांस ऐसे वाटते - की समजा आमुचे दुग्धालय आहे. तर आम्ही दूग्धविक्री करताना काय सांगावे, की आमुचे दूध छान मलईदार, विनाजल, सत्वशील आहे! त्याऐवजी आम्ही जर ऐसे सांगू लागलो, की बंधु, आमची महिषी अतिदेखणी, राजबिंडी आहे! आम्ही तिस रोज लक्सने सुस्नान घालतो आणि तिच्या खुरांना नेलपेन्ट लावतो, तेव्हा आमुचे दूध घ्या, तर तुम्हांस कैसे वाटेल? किंवा एक लिटर दुधावर चारशे मिली गोमूत्र फ्री ऐशा योजनेची पॅम्प्लेटे आम्ही वाटू लागलो, तर तुम्ही काय कराल? आमुच्या मुखात गोमय नाही घालणार?
बंधु-भगिनींनो, वृत्तपत्र विकावयाचे, तर ते त्यातील वृत्त, लेख यांच्या आधारे विकावे.
जेव्हा त्यात काही दम नसतो, तेव्हा मग ऐशा स्पर्धा वा स्किमा जाहीर कराव्या लागतात, असे कोणी वदले व संपादकांच्या संपादकीय कौशल्यावर संपादकांच्या अहंइतुके मोठे प्रश्नचिन्ह लावले, तर त्यास आपल्याकडे काय बरे उत्तर आहे?
तुम्हास काय वाटते, स्पर्धा आहे म्हणोनी पत्रांनी आपुला धर्मही सोडावा व एका साबणावर एक फ्री अशाप्रकारे स्वतःस बाजारात मांडावे?
(Posted by बापू आत्रंगे, दि. १२०६०८)
१.
"आपला विनू हल्ली किती शहाण्यासारखा वागतोय नाही!" विनूची आई विनूच्या बाबांना म्हणाली.
"हो का?... कसं?"
"अहो, बघा ना पूर्वी नेटवर सारखा गेम खेळायचा, नाही तर ऑर्कुटिंग करायचा..."
"मग?"
"आता पाहावं तेव्हा महाराष्ट्र टाइम्सची साईट वाचत असतो..."
"आं!!!" बाबांच्या चेह-याचा रंगच उडाला.
२.
"अरे... सगळे येताहेत... बंड्या, पक्या, चम्या... तूसुद्धा ये ना.... धमाल करू," लोकलच्या दारातील दांडीला धरून फंकी मन्या एन-७८वरून बोलत होता, "....मग सांगतो काय, मॉम-डॅड कुणीच नाहीये घरी... मस्तपैकी नेटवर मटा वाचत बसू...."
त्याचे हे बोलणे ऐकून बाजूचे दोन प्रवासी तरी चांगलेच दचकले!
३.
"काय देशपांडे, अहो कितीवेळ मटा वाचणार? तो कंप्युटर तापलाय बघा... आता जरा कामाचं पाहा..."
बँकेतल्या किरकोळ जोश्याने देशपांडेला आवाज टाकला... त्याबरोबर बाजूच्या टेबलवरच्या महिला सहकारी इवल्याशा रूमालात ओठ लपवत खुसूखुसू हसू लागल्या. त्यांच्याकडे लक्षच नाही असे दाखवित देशपांडेने शरमून मटाची साईट बंद केली...
------------------------------------------------
हे सर्व याचि डोळां देखल्यानंतर आम्हांस घोर प्रश्न पडला, की बुवा हे असे आक्रीत कश्याने बरे जाहले? जळीस्थळीकाष्ठीपाषाणी मटा ऑनलाईनच का बरे दिसत आहे? ही कोणती जादू? ही कशाची ओढ? कशाने उभ्या म्हाराष्ट्रात महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळाची जनप्रियता एवढी वृद्धिंगत जाहली?
येबाबत आम्ही आमुच्या अंगभूत भोचकपणाने सर्वप्रथम लोकसत्तेत संपर्क साधला. तेथे वृत्तांताधिपती, सकलमतीसंपन्न विनायकजींचे दर्शन जाहले. ते एकसमयी एका हाताने लष्करासंबंधीचा माहितीलेख आणि दुज्या हाताने जहांगिरातील चित्रांविषयीचा समीक्षालेख लिहित होते. तयांसी येबाबत पुसले असता, ते म्हणाले, कायाचे महाराष्ट्र टाइम्स आणि कायाचे संकेतस्थळ? आम्ही काही ओळखत नाही!
तेव्हा तेथूनी चिंचपोकळीत लोकमताच्या कचेरीत आम्ही गमन केले. तर तेथे सारीच मंडळी म्हणाली, बातम्याही आम्हीच आणा व पानेही आम्हीच लावा अशाने आमच्यातील कुंवार-कुंवार लोकांना साधी स्थळे पाहण्यासही वेळ गावत नाही, तर ते संकेतस्थळे कोठूनी पाहतील? तुम्ही नव्या मुंबैस जावे हे उत्तम!
असे म्हटल्यावर आम्ही सकाळच्या परळातील कचेरीत जिने चढोनी गेलो. तर तेथे एक कुटुंब दूरचित्रवाणी पाहात भोजनानंद घेत होते! तयांसी विचारता, ते म्हणाले, की सकाळची कचेरी ही नव्हे. ती वरच्या मजल्यावरील फ्लॅटमधे असते! पुन्हा जिना चढणे आले. तेथे एका इसमास विचारले, ईसकाळ? तर तयाने आम्हांस खालचा रस्ता दावला. जिने उतरोनी खाली आलो, तर तेथे इ-रवी आमले (इ फॉर इवलेसे!) लॅपटॉपमध्ये डोके घालोनी बसोनी होते. ते वदले, महाराष्ट्र टाइम्सची जनप्रियता हे मिथक असोनी खरे लोकप्रिय ई-सकाळच आहे कारण की त्यात इ-टीव्ही व इ-रोडिओसुद्धा आहे! (पुन्हा इ फॉर इवलासा). व ई-सकाळची वाचकसंख्या सव्वीस लक्ष आहे! त्यावर आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणे पुसले, की ही संख्या मासिक, वार्षिक की पंचवार्षिक? ते ऐकोनी बाबू रवी आमले तांबूलसेवन केल्यामिषे मौनात गेल्यासारखे जाहले!!
येणेप्रकारे अवघे उपाय थकले, परंतु कोडे आमचे काही उलगडले नाही!
अखेर मनी श्रेष्ठ धारिष्टय धरोनी आम्ही स्वतःच मटाच्या संकेतस्थळावर गेलो आणि आर्किमिडीजास युरेका जाहले तैसे आम्हांस जाहले!
हारी पॉटरास चेंबर ऑफ सिक्रेट्स सापडावे तैसे आम्हांस मटाच्या जनप्रियतेचे गूढ गावले! ते रहस्य दडले होते मटाच्या नवोन्मेषशाली नव्या सेग्मेंटात!
या नव्या सेग्मेंटाचे अर्थात विभागाचे नाव होते - सेक्स टॉक!
सेक्स हा शब्द नुसता मनी येताच आमची जिव्हा टाळ्यास लॉक होते आणि येथे तर चक्क सेक्स टॉक! उत्सुकता चाळवून आम्ही त्या सेग्मेंटात गेलो आणि पाहतो तो काय! आमुच्या समोर चक्क वात्सायनाची गुहाच खुली झाली...
आजूबाजूस कोणी नाही, हे पाहात आम्ही तेथील ते 'सकाळच्या पारी सेक्सची बारी', 'सुहागरात्री होते नववधूंच्या कौमार्याची परीक्षा', 'सेक्स करा फीट राहा' आदी कामाचे लेख मटामटा वाचले व हॉट हंड्रेड हे 'ललनांच्या हॉट फोटोंचे ऑनलाईन प्रदर्शन' मटामटा पाहिले.
पूर्वी वृत्तलेखन करताना गर्भगळीत, हतवीर्य, गलथान, कुतरओढ ऐसे म-हाटी शब्द वापरले, तर आमुचे संपादक आम्हांस कैसे 'चाप लावीत' असत ती अश्लील आठवण नेमकी हे वाचताना आली आणि आम्हांस आम्ही किती मागासलेले होतो याची शर्मनाक जाणीव जाहली!
पण आता अवघे मागासलेपण संपलेले आहे!
परबसे सूर्य उगा फैला उजियारा असे जाहले आहे!
म्हाराष्ट्र शासन व पुर्के गुर्जी शाळेत लैंगिक शिक्षण कधी देतील तेव्हा देतील, पण मटा ऑनलाईनने थेट पदवी शिक्षणच देण्यास प्रारंभ केलेला आहे!
तेव्हा मुलांनो, मुलींनो, अन्यांनो, सगळे या,
लवकर भरभर सारे या
सेक्स टॉक करा रे सेक्स करा...
मटा ऑनलाईन तुमचा समजा!
(Posted by बापू आत्रंगे, दि. 110608)
एक दुःखद वृत्त आहे.
विख्यात अभिनेते विहंग नायक यांचे आज पहाटे कळंबोली येथे अपघाती निधन झाले.
साधारणतः दहा-साडेदहाच्या सुमारास या दुर्घटनेची माहिती माध्यमप्रतिनिधींना समजली. त्यानंतर लगेचच मराठी वृत्तवाहिन्यांवर ही बातमी दाखविण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांनंतर लगेचच विहंग नायक यांना त्यांच्या सहकलाकारांनी वाहिलेली श्रद्धांजली, सहकलाकारांनी सांगितलेल्या आठवणी वाहिन्यांवरून ऐकविण्यात येऊ लागल्या.
सहसा कोणाचेही निधन झाले की माध्यमे जी कर्मकांडे करतात ती यावेळीही करण्यात आली.
निधन कोणाचेही असो, ते दुःखदच असते. माध्यमप्रतिनिधींना त्याचे दुःख नसते असे नाही. अखेर तीही माणसेच असतात, त्यांनाही भावना असतात. पण जेव्हा अशी एखादी बातमी येते, तेव्हा त्यांच्या भावनेपेक्षा कर्तव्य मोठे ठरते. किंबहुना ते तसे ठरलेच पाहिजे.
स्टार माझा, झी 24 तास, आयबीएन-लोकमत या वाहिन्यांनी आज आपले कर्तव्य व्यवस्थित बजावले. ई-सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन या संकेतस्थळांनीही ही बातमी लगेचच प्रसृत केली.
पण...
पण आज लोकांकडून शोकसंदेश घेताना ज्याप्रकारची भाषा काही वाहिन्यांचे वृत्तनिवेदक वापरत होते, ती मात्र अत्यंत वेदनादायी होती.
मराठी भाषेतील प्रत्येक शब्दास आपला असा खास चेहरा असतो. एखादा शब्द कुठे आणि कसा, कशाच्या संदर्भात वापरावा याचे काही संकेत रुढ झालेले असतात. परंतु याची जाणीव आजच्या अनेक पत्रकारांना नाही, असे खेदाने म्हणावे लागते. आज एक वृत्तनिवेदक कलाकारांना - विहंग नायक यांच्या निधनाबद्दलची 'प्रतिक्रिया' विचारीत होता. निधनाबद्दलची प्रतिक्रिया?
मराठी बोलताना वा लिहिताना आवश्यक तेथे इंग्रजी शब्द वापरण्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण आपण जेव्हा इंग्रजी संकेतही मराठीत जसेच्या तसे आणू पाहतो, तेव्हा मात्र ती मोठीच आक्षेपार्ह बाब ठरते. याचे भान माध्यमांनी ठेवले नाही, तर किती अनर्थ होतात, याची उदाहरणे द्यावी तेवढी थोडीच आहेत.
मराठी माध्यमे किती करूणाजनक चुका करतात, याचे एक ताजे उदाहरण म्हणून मुंबई सकाळमधील क्रीडा पानावरील हा मथळा पाहा...
'क गटातील चांडाळ चौकडी'.jpg)
युरो फुटबॉल स्पर्धेतील विविध गटांतील संघांची माहिती देण्याचा चांगला उपक्रम या वृत्तपत्राने सुरू केला आहे. पण त्याचे शीर्षक देताना मात्र आपले भाषा अज्ञान लख्खपणे पाजळले आहे. विशेष म्हणजे असा मथळा तीन दिवस छापून येत असताना, त्यात काही चूक आहे हे त्या वृत्तपत्रातील कोणासही वाटले नाही.
खरेतर चटपटीत मधळे देण्याच्या हव्यासातून अशा, कधी गंभीर, तर कधी हास्यास्पद चुका घडत आहेत. आणि चटपटीत मथळे म्हणजे तरी काय इंग्रजी शब्दांचा वापर. आज लोकसत्ता आणि सकाळच्या मुख्य बातमीचे शीर्षक आहे - रेन डे.
त्याखाली बातमी आहे ती पावसाने मुंबईकरांची कशी दैना उडविली त्याची. बातमीचा जो रोख असेल, त्या अनुषंगाने तिचा मथळा असावा, या संकेतालाच येथे हरताळ फासला गेला. गंमत म्हणजे, गेल्या वर्षीचे अंक चाळले, तर त्यातही हेच शीर्षक कोठेतरी दिसेल. म्हणजे तुम्हाला आता नवेसुद्धा काही सुचत नाही काय?
(रेन डे वरून एक गंमत आठवली. कुठल्याशा क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने खूप धावा काढल्या होत्या. तेव्हा एका मराठी पत्राने शीर्षक दिले होते - रन डे. आता हा शब्द मराठीत उच्चारण्यासारखा आहे का? पण इंग्रजीचा हव्यास! याच हव्यासातून काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका पत्राने लँडलाईन हा शब्द तर छापला, पण त्यात अर्धचंद्र असतो, हेच ते विसरले! 'उपसंपादकाच्या डुलक्या' म्हणतात त्या याच... मराठीला झोपवणा-या डुलक्या!)
एकंदरच मराठी भाषेबाबत मराठी माध्यमांमध्ये काळजीची परिस्थिती आहे, असे आम्हांस वाटते.
तुमचे काय मत आहे?
(Posted by बापू आत्रंगे, दि. ०९०६०८)
-
नवा संपादक मिटिंगमध्ये
जसा बोलबोल बोलत असतो,
तसा कोसळतोय पहिला पाऊस
कुलाब्यात अमुक इतका मिलीमीटर
सांताक्रुझला अमुक इतका मिलीमीटर
रस्ते पे पानीच पानी
तुंबलेत नाले, तुंबलेय गटर
अख्ख्या मुंबईचा मीटर डाऊन झालाय
अशावेळी आम्ही निवांत आपल्या घरात सुस्त
लोळतोय खाटेवर पेपर-बिपर वाचत दुपारच्या जेवणानंतर
नाचतेय नटी कामुक बरसातीत
कुटुंब रमलेय केबलमध्ये
अशावेळी... अशावेळी
तिकडे सखल भागात साचलेल्या पाण्यात
सांभाळीत हातातले प्लास्टिकने झाकलेले बूम
रेनकोटातली च्यानेलवाली बाई देतेय भीजबातम्या
सकाळपासून... पोटातली भूक आवरत
तिला आता हवाय चहा...
जसा तुमच्या पुढ्यात आहे ना तस्साच...
गर्रमगर्रम वाफाळता
तो फोटोग्राफर तिकडे कधीपासून लावून बसलाय क्यामेरा
गळ लावावा तसा गुडघाभर सांडपाण्यात
पकडायचीय त्याला आठ कॉलमी रंगीत दैना
उद्याच्या पहिल्या पानासाठी
आणि अजूनही नवा संपादक मिटिंगमध्ये
जसा बोलबोल बोलत असतो,
तसा पहिला पाऊस कोसळतोय
अर्थात तुम्ही पाहातच असाल म्हणा ते
तुमच्या दिवाणखान्यात
कोचावर लोळत असताना..
(Posted by बापू आत्रंगे, दि. ०८०६०८)
"कुमार केतकर हे एक ज्येष्ठ व प्रतिष्ठित पत्रकार आहेत."
"आहेत."
"ते जानेमाने राजकीय विश्लेषक आहेत."
"आहेत."
"ते एका प्रतिष्ठित दैनिकाचे संपादक आहेत."
"वादच नाही."
"मग त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध तुम्ही एक वृत्तपत्र म्हणून का केला नाही?" सकाळमधील आमुच्या एका जुन्या पत्रकारमित्रास आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणाने विचारले.
"अद्याप केला नाही. कदाचित उद्या वगैरे करू वगैरे." मित्र म्हणाला.
"की ते तुमच्या पंधरा महिन्याच्या नियोजनात नव्हते का?" तो उगाच हसला. "पण तुम्ही केतकरांवरील हल्ल्याची बातमीही अगदी तळात, दोन कॉलमात दिली आहे! त्याहून राखी सावंतसुद्धा बरी ट्रिटमेन्ट मिळते तुमच्याकडे! तुम्हाला असे नाही वाटले, की हे संपूर्ण वृत्तपत्रसृष्टीली दिलेले आव्हान आहे. उद्या तुमच्यावरही ही वेळ येऊ शकते..."
त्यावर तो म्हणाला, "ती भीती आम्हांला नाही! आमच्या अग्रलेखांमुळे असे हल्ले वगैरे होतील याची सूतराम शक्यता नाही. मुळात आम्ही तशी खबरदारीच घेतलेली असते. टीका करायचीच झाल्यास आम्ही सहसा लादेन, बुश, देवेगौडा, डावे यांसारख्यांवरच करतो. एतद्देशीय मातब्बर राजकारणी टीकेस घेतच नाही वगैरे. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही वगैरे... शिवाय आमचे कसे - हेही शक्य आहे असे म्हणायचे आणि तेही अशक्य आहे अशातला भाग नाही असे सांगायचे! - बच्चा खूश, बच्चे का बाप भी खूश!! वगैरे..."
हे ऐकून आम्ही खूपच मोदित झालो.
म्हटले, वृत्तपत्र असावे तर असे - निर्भय!!
------------------------------
सकाळ हे निर्भय पत्र, तर आमचा सामना नितांत प्रेमळ!
आजच्या सामनाच्या अग्रलेखाचे नाव आहे -
'केतकरांच्या जखमांवर प्रेमाची फुंकर'
सामनात छापून येते ते सारेच रोखठोक असते. रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आहे हे सुद्धा ते रोखठोकच छापतात! त्यांना दोनच प्रकारे बोलता येते - १. कानाखाली आवाज काढून व २. रोखठोक.... असे ते म्हणतात! तर त्यानुसार सामनातील हा अग्रलेखही रोखठोकच असून, त्याचे सार पुढीलप्रमाणे -
केतकर हे मोठे पत्रकार. त्यांना हल्ले नवे नाहीत. ते सोनियाचे भक्त आहेत. सोनियांवर टीका झाल्यास ते चिडतात. शिवाजी महाराजांवर कोणी उलट-सुलट बोलल्यास तशी चीड निर्माण होऊ शकते. त्यांनी शिवस्मारकास विरोध केला म्हणून हल्ला झाला. तसे होणे गैर आहे. पुतळे उभारून काही होत नाही, असे केतकरांचे विचार आहेत. देशात गांधी-नेहरू घराण्याचे खूप पुतळे आहेत. पुतळे पाडायचे तर त्याची सुरूवात या खानदानाच्या पुतळ्यांपासून व्हावी. पण केतकरांवरील हल्ला गैर आहे. केतकर हे एका शेठजींच्या दैनिकाचे संपादक आहेत. ते स्वतंत्र बाण्याचे आहेत. शिवस्मारकाला विरोधाची भूमिका त्यांची स्वतःची की त्यांच्या धनदांडग्या मालकांची? केतकरांना मागे ब्राह्मणांनी मारले होते आता मराठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे कसे घडले? हा प्रश्न विचारून आम्ही त्यांच्या जखमांवर प्रेमाची फुंकर घालतो.
हवेत उलट्या-पालट्या उड्या मारून अलगद दोन्ही पायांवर उभ्या राहणा-या सर्कशीतील विदुषकाच्या कौशल्याने अग्रलेख लिहिणे ही काय शिववडा खायची गोष्ट आहे?
पण सामनाने ते कसे छान साधले आहे!
एकंदर येथेसुद्धा तसेच - बच्चा भी खूश और बच्चे का बाप भी खूश! खुशी थोडी रोखठोक इतकेच!!
---------------------------
तर वाचकहो, असे सर्व असल्यावर कोणाची औकात आहे वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला घालण्याची?
झालेला कोणताही हल्ला वृत्तपत्रस्वातंत्र्यावरील हल्ला आहे असे मानलेच नाही की प्रश्न मिटला!
कालचा हल्ला केतकर नावाच्या व्यक्तीवरचा होता...
उद्याचा हल्ला आणखी दुस-या कुणावरचा असेल...
आणि आमचे विचार-उच्चार-अविष्कार स्वातंत्र्य असेच चिरायु असेल...
दगड कुठून येतोय हे कावरेबावरे पाहात बसलेले...
तुम्हांला काय वाटते? चाललेय ते चांगभले आहे?
वाहव्वा! रा. रा. विनायकजी मेटे, आपण जे काम केलेत त्यास उभ्या स्वराज्यात तोड नाही!
आमचा दिल खुश करून टाकिला तुम्ही तुमच्या पराक्रमाने.
आमच्या हाती राज्य असते, तर तुम्हांजैश्या शूरवीरास तत्काल दसहजारी मनसबदारी दिली असती, एखादा मतदारसंघ इनाम दिला असता, किमान एखाद्या पक्षाचे उपाध्येक्षपद तरी दिले असते.
विनायकराव, तुम्ही आणि तुमच्या संग्रामशील मावळ्यांनी केतकरांच्या गढीवर गनिमी काव्याने हल्ला चढविला. गढी उद्ध्वस्त केलीत. बरे जाहले. परंतु गनीम सुटला. अशा दुश्मनांच्या लेखण्या ताब्यात घेऊन त्या ठेचायच्या असतात. पुढच्या हल्ल्यात अशी चूक होणार नाही, यास खबरदार असावे.
आजकाल आम्ही पाहतो आहोत, की काही पत्रगनीम अजूनही या महाराष्ट्रात खुलेआम लिहित आहेत. ही मोठीच काळजीची गोष्ट आहे. त्यातही आनंद येवढाच, की असे देशाचे दुश्मन फारच कमी उरले आहेत. पूर्वी ते फार होते पत्रव्यवसायात. पण आपल्या सारख्या अनेक रथी-महारथींनी आपल्या सेना आणि ब्रिगेड्या उभारून कित्येकांना गारद केले! कित्येकांना आपल्या छावणीत वळवून घेतले! कित्येकांना सरदारक्या दिल्या! कित्येकांना तर थेट दिल्लीस धाडून दिले राज्यसभेत! पण तरीही केतकरांसारखे काही निसटलेच. त्यांना आपण धडा शिकविलात हे आपले म्हाराष्ट्र देशावरील उपकारच म्हणावयाचे!
आम्ही तो पुसतो केतकरांची हिम्मतच कशी होते थोरल्या म्हाराजांचे नाव घेण्याची? म्हाराज आमचे आहेत. आम्ही त्यांचे नावाचा कॉपीराईट घेतला आहे. तेव्हा आम्ही त्यांच्या नावावर काहीही करू! म्हाराजांच्या नावे वडे काढू, टोळ्या काढू, समुद्रात त्यांचे स्मारक उभारू... हे कोण तयास हरकत घेणारे उपटसुंभ? दिल्ली दरबाराने पद्मपुरस्कार दिलेले हे ज्येष्ठ पत्रकार. विद्वान लेखक. विचारवंत. पण म्हणोनि काय त्यांनी असा असा सगळ्यांची धोतरे फेडणारा अग्रलेख लिहायचा? म्हणे - अवतरली शिवशाही! आता त्या अग्रलेखात त्यांना नेमके काय म्हणावयाचे आहे, हे जरा आमच्याही डोक्यावरोनीच गेले, विनायकराव! हे लोक मुद्दामच ऐसे अवजड लिहित असतात! म्हणे उपहास हा अलंकार वापरून त्यांनी तो अग्रलेख लिहिला होता. अरे अलंकार वापरायची एवढीच हौस असेल, तर आमच्याप्रमाणे पाची बोटात पाच जाडजूड अंगठ्या घाला सोन्याच्या! गळ्यात बोटाएवढी जाड सोन्याची चैन घाला! पण नाही! मग खा मार!
झाले शिवस्मारक समुद्रात, तर काय तुमच्या अकौंटातला पैसा जाणार आहे काय, केतकर? उलट चार लोकांना कंत्राटे मिळोनि त्यांच्या पोटाचा प्रश्न तरी सुटेल! पण नाही, यांना चिंता म्हाराष्ट्रातल्या कुपोषणाची, जन्तेच्या आरोग्याची, कल्याणाची. अरे धुडूत! ऐश्या चिंता करोनि काय राज्ये चालवता येतात?
बरे झाले, हल्ला झाला!
विनायकजी, तुमचा संग्राम असाच चालत राहो. न जाणो कधी तरी म्हाराष्ट्रात तुमचीही संग्रामशाही येईल. या देशाची पावले तर त्याच वाटेवर हल्ली पडू लागलेली आहेत....
(कुमार केतकर यांचा तो अग्रलेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
जैसा अंग धुण्याचा साबुन तैसेचि वृत्तपत्र. कारण की वृत्तपत्र हेही एक प्रॉडक्ट आहे.
ऐसे प्रतिपादन टैम्सॉफिंडियाचे मालक रा. रा. जैन यांनी केले, त्यास आता बहुत काळ लोटला.
महामहीम जैन यांच्या उद्गारांवरती आमुच्या अनेकानेक पत्रबांधवांनी कडवी...
(मराठीहृदयसम्राट रा. रा. राजसाहेबजी ठाकरे, कृपया नोंद घ्यावी. कडवट नव्हे, कडवी! मराठी ही महाराष्ट्राची मायबोली असून, तिच्यात कडवटचा अर्थ कडू असा काहीसा आहे. तेव्हा मराठी माणसाने कडवट व्हावे हा आपुला उप्देश कसा काय बरे फळास आणावयाचा? रा. रा. राजू परुळेकरांशी संवाद करूनी व महामहीम बाबासाहेब पुरंदरेसाहेबांचे आशीर्वचन घेवूनी आपण याबाबतचा काही खुलासा करू शकाल का? हवे तर पोलिसांना विचारूनी सांगावे!)
...तर येथे सांगत होतो, की महामहीम जैन यांच्या उद्गारांवरती आमुच्या अनेकानेक पत्रबांधवांनी कडवी टीका केली. आता टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेचे होणार काय, ऐसे गळेही पानोपानी काढिले. कोणी-कोणी तर मॅरेथॉन अग्रलेखही लिहिले.
पण येवढी धादांत टीकाटिपणी करूनी पुढे काय जाहले?
मी नाय त्यातली अन् कडी लावा आतली, हेच खरे व तैसेची जाहले!आता तर सकाळ जैश्या कुंपणवासी पत्रानेही 'महा'जैन' येन गताः स पंथः' (चु.भु.द्या.घ्या. कारण की आमचे संस्कृत नव्या पिढीतल्या कोणत्याही संपादकाच्या मराठीइतुकेच मातब्बर!) या उक्तीनुसार शतपावली करीत 'पत्र नव्हे प्रोडक्टं' याचा स्वीकार केला आहे!
आता येकदा पत्र नव्हे प्रोडक्ट असे म्हटले, की मग त्याचेसह आणखीही काही वाक्प्रचार आपसूक येतात.
ते खालीलप्रमाणे -
१. ग्राहको देवो भव!
२. तुमची खुशी हाच माझा सौदा!
3. बाय वन गेट वन फ्री!
आणि
४. ना बाप बडा ना भैया, ना बिवी बडी ना मैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रूपैया!!
तर सुजनहो, उपरोक्त चार सुविचारांनी आजच्या आपुल्या थोर पत्रकारितेला खांदा दिलेला आहे.
तो कैसा हे काय पुसणे जाहले?
पत्रे रंगीबेरंगी झाली!
(जैसे की मराठी चित्रपटही फुजीकलर अन् इस्टमनकलर जाहले. पण व्हाट अबौट क्वालिटी भावोजी?)
पत्रांची पृष्ठसंख्या वाढली.
(वाचनानंद व महिना अखेरीस प्रतिकिलो ३० ते ३५ रू.! बाय वन गेट वन फ्री!!)
वाढत्या पृष्ठसंख्येबरोबर नानाविध विषय पत्रांमध्ये येऊ लागले.
(जैसे की स्मार्ट टीप्स! परवाच सकाळच्या 'दहा मिनिटांत'च्या पानावर एक टीप वाचली आणि आमच्या डोळ्यांतून आनंदाने टीपे गळू लागली! आपल्या वाचक-ग्राहकास सकाळकारांनी असा सल्ला दिला होता - आपणांस आवश्यक असलेली वस्तू एका दुकानात न मिळाल्यास दुस-या दुकांनात जाण्याचा पर्याय अवलंबावा. अहाहा! सामान्य वाचकाला अधिकाधिक अद्ययावत व उपयुक्त ज्ञान देण्यासाठी सकाळकारांची ही जी धडपड चालू आहे तिला सलाम म्हणून आम्ही आजच दोन निर्लेप तवे - की ज्यावर वर्षभराचा साप्तासकाळ व तनिष्का फुकट मिळतो - विकत घेणार आहोत!)
पत्रांबरोबर भरपूर पूलऔट मिळू लागले.
(जैशी मुंबैत जागा नसल्याने नव्या मुंबैची स्थापना करणेत आली, तद्वत अंकात जाहिरातींना जागा कमी पडू लागल्याने पुरवण्यांची सोय करणेत आली व बातम्या व लेखांच्या परमार्थाबरोबरच जाहिरातींचा स्वार्थही साधणेत आला. मटाने तर आता मासिकांचा शेप्रेट धंदाच सुरू केलाय!)
तर येणेप्रकारे पत्रव्यवसायाची खूपच भरभराट झाली. इतकी की अखेरीस तो केवळ धंद्याच्याच (पन इंटेन्टेड!)पातळीवर आला.
जैसा की साबणाचा कारखाना तैसा वृत्तपत्राचा कारखाना!
मग पुढे जाऊन ऎसे जाहले, की
संपादकाचा बाहुला जाहला आणि बातमीदाराचा कामगार!
कामगार आहे मी मालकाच्या हातातली तलवार आहे
वाचकहो, रोजच पेपर काढण्याचा गुन्हा पुन्हापुन्हा करणार आहे...
आम्ही बोलतो ते लटिके वाटते का तुम्हां?
पण राजेहो, हातच्या पेपरला आरसा तरी कशाला म्हणतो मी!
जून.
या महिन्यात आपण वाचणार आहात खालील ठळक बातम्या -
१. नैऋत्य मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन.
२. महाराष्ट्रात पाऊस अमूक तारखेला येणार किंवा
३. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या.
४. यंदा सरासरीच्या अमूक-तमूक टक्के पाऊस - हवामानखात्याचा अंदाज.
हे झाले पावसाचे.
या महिन्यात शैक्षणिक बातम्याही आपण वाचणार आहात. त्या खालीलप्रमाणे -
१. बारावी परीक्षेचा निकाल.
२. दहावीचा निकाल. (या दोन निकालांबरोबरच गुणवत्ता यादी, मुलींचे यश, पॅटर्न याविषयीचे लेखही हाणले जातील. ही दोनावर एक फ्री अशी योजना नसून, तो रिच्युअलचा भाग आहे.)
३. शाळा प्रवेश.
४. कॉलेज प्रवेश.
५. पाठ्यपुस्तकांची उपलब्धता.
६. शाळेत जाणारी लहान मुले, कॉलेज प्रवेशासाठी लागलेली रांग अशी छायाचित्रेही देण्यात येतील. (ही छायाचित्रे यंदाचीच असतील, याची खात्री तर प्रतेक्ष छायाचित्रकारही देवू शकणार नाही!)
हे सर्व झाले की जूनचा शेवटचा आठवडा उजाडेल.
तोवर पाऊस झालेला असेल, तर
१. पावसाने केलेल्या हानीच्या वा लाभाच्या बातम्या,
२. रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेले नाले वगैरेंच्या बातम्या दिल्या जातील.
पाऊस झालेला नसेल, तर
१. शेतीची दुर्दशा, पेरण्या लांबल्याने होणारी हानी,
२. शहरांतील पाणीप्रश्न
याबाबतच्या बातम्या आपणांस वाचाव्या लागतील.
तर वाचकहो, असा असतो पेपर.
प्री-डिफाईन्ड!
आशय तोच - तपशील वेगळा!
तोच खेळ पुन्हा-पुन्हा!
Lots of journalists are suffering from AIDS!
Thus says my dear brother and Bhankaskar Mr. Visoba Khechar.
(Can anybody please shade some light on his real identity?)
You must be shocked! But this is the proven fact. In our very own Marathi media this has become an epidemic. If you read the editorials, the articles, the news reports carefully you could see for yourself the gravity of this situation!
Don’t you believe me?
Then look at those news stories regarding a higher secondary student hailing from the remote village near Kolhapur, who made a sensational announcement that he got the scholarship from a American University and a fellowship from none other than NASA for his research.
And what was the subject of his research?
The birth of the universe!
The small boy, from a small village, from a poor family, from a simple school, doing a research for which you must have some advanced knowledge, some advanced equipments and if you haven’t got them then you must be someone like Mr. Harry Potter, at least!
And here our journalist friends, who are trained to be skeptical, believed him.
But it is not their fault.
No sir, it is not their fault at all.
Those who filed that story, those who carried that story, those who edited that story, without checking and cross-checking the facts, must have that virus called AIDS in their brain!
And what is this AIDS?
It is, Acquired Intelligence Deficiency Syndrome!
In Marathi it is called as –
Ban-Chuke!!
मागील लेख
-
►
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
-
▼
2008
(87)
-
▼
June
(25)
- मटा व लोकसत्तातील शीतयुद्धाची पर्सेंटाईल कथा
- सकाळच्या छिद्रान्वेषाचा छिद्रान्वेष!
- तुहा पॅटर्न कंचा?
- कोरडे राहण्याची इंग्रजी कला!
- आमच्या अमेरिकावारीचा वर्तमानपत्री इस्कोट!
- स्टार माझा वर्षाचा झाला!
- साम जन्मला गं सखी...
- अपरिहार्य निवेदन!
- अस्सा मट्टा सुरेख बाई!
- पाहुणा अग्रलेख आणि पवारांचा तुच्छतावाद
- मा.साहेबांस गोपनीय पत्र
- बरे जाहले, साहेब गेस्ट एडिटरच होते...!
- टुडेच्या कुशीत टुमारो आला त्या सोहळ्याचा वृत्तांत....
- आरारा, मेंटेंची हकालपट्टी झाली!
- राम गोपाल वर्मा की आगाग!
- भली मोठ्ठी गम्मत!
- योजकः तत्र मुबलकः!
- सेक्स टॉक करा रे, सेक्स करा...
- माध्यमांची मराठी
- पाऊसचित्रे
- वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या नावाने चांगभले!
- बरे झाले, हल्ला झाला!
- हातच्या पेपराला आरसा कशाला?
- तोच खेळ पुन्हा पुन्हा...
- Hum to Ban-Chuke Sanam!
-
▼
June
(25)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

