कोणत्या वृत्तपत्राने कोणत्या विषयावर कधी व कसा अग्रलेख लिहावा, हे सांगणारे आपण कोण?
अखेर अग्रलेख हा संपादकांचा विशेषाधिकार आहे. आणि तो तसा असला पाहिजे. परंतु अंकातील जाहिरातीप्रमाणेच अलीकडे बातम्यांवरही संपादकांचे फारसे नियंत्रण नसते. अनेक दडपणे, अनेक नाईलाज, अनेक गणिते असतात. संपादक ही संस्था हतबल असते. अंकातील ही अशी ९९ टक्के जागा मालक, मुद्रक, प्रकाशक, जाहिरातदार आणि वाचक यांच्या नियंत्रणाखाली आणि उरलेला अग्रलेखाचा टक्का तेवढा संपादकाचा, अशीच एक सर्वसाधारण विभागणी ठरून गेलेली आहे. वस्तुतः हा टक्काही पूर्णांशाने संपादकाचा नसतो. मालक कधीही त्यास विचारू शकतो, की संपादक, कोण म्हणतो तुम्हांला टक्का दिला?

अशा परिस्थितीत आपल्यासारख्या वाचकांनीही एडिटरबुवांना अग्रलेखाचा विषय डिक्टेट करणे हा म्हणजे संपादक या संस्थेवरील अन्यायच झाला. पण तरीही कधीकधी वाटते, की या या विषयावर अग्रलेख छापून यावा. म्हणजे त्या विषयावर त्या दैनिकाचे मत काय आहे, धोरण काय आहे हे आपणांस समजेल व आपल्या ज्ञानात काही भर पडून लोकशिक्षणाचे पवित्र कार्य केल्याचे समाधान संपादकास मिळेल. याच भावनेतून पद्मसिंह पाटील अटकप्रकरणी संपादकीय मतप्रदर्शन व्हावे असे आम्हांस वाटत होते. कारण अखेर हा प्रश्न राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी निगडित आहे. माजी गृहमंत्र्याला व आजी खासदाराला खूनप्रकरणी अटक होणे, अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक नेत्याच्या हत्येचे कटकारस्थान रचले जाणे हा आम्हांस अग्रलेखाचा विषय वाटत होता. अजूनही वाटत आहे. आमचे वाटणे अगदीच गैर नव्हते, हे अटकेनंतर लगेचच महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी यांसारख्या दैनिकांनी या विषयावर अग्रलेख लिहिला यावरून स्पष्ट झाले.

पद्मसिंह पाटील हे ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला कालपर्यंत आदरणीय होते, त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घरातले वृत्तपत्र म्हणजे सकाळ. (सकाळ या वृत्तपत्राचा शरद पवार वा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी काहीही संबंध नाही, असे जे सांगितले जाते, ते खरेच असल्याचा आमचा समज आहे, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. तेवढे बावळट आम्ही नक्कीच आहोत.) तेव्हा सकाळचे या प्रकरणी काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यास आम्ही खूप उत्सुक होतो. अशीच उत्सुकता आम्हांस लोकमान्य लोकशक्ती काय म्हणते याविषयीही आहे. आज ना उद्या या विषयास लोकसत्ताकार हात घालतीलच. आणि नाहीच घातला, तर आणखी पन्नासेक वर्षांनी त्याचा त्रिकालवेध घेतील. असो.

तर अखेर पद्मसिंह प्रकरणावरील अग्रलेखाची सकाळ आज, १२ जूनला जेष्ठातल्या चतुर्थीच्या मुहूर्तावर उजाडली. 'पद्मसिंहांचे निलंबन' असे या अग्रलेखाचे शीर्षक आहे. शीर्षकावर जाऊ नका. मथळा बातमीसारखा असला, तरी मजकूर अग्रलेखासारखाच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पद्मसिंह यांना निलंबित केल्यानंतर, 'उशीरा सुचलेले शहाणपण' अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली होती. सकाळच्या या अग्रलेखाबाबत तसे म्हणता येणार नाही. अगदी योग्यवेळीच अग्रलेखाचा निर्णय झालेला आहे. पद्मसिंह आता पक्षात नाहीत, त्यांना गचांडी देण्यात आलेली आहे, पक्षाने नैतिकतेच्या मुद्दयाची गुढी उभारून हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. तेव्हा तीच गुढी आता नाचविण्यास कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. एकदम योग्यवेळीच सकाळने अग्रलेख लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सकाळचा कोणताही संबंध नसल्याचे आपण वर पाहिलेच आहे. त्यामुळे या अग्रलेखात सकाळकारांनी राष्ट्रवादीवर अत्यंत कडक शब्दात टीकाही केलेली आहे. उदाहरणार्थ - "विविध राजकीय पक्ष वेळोवेळी स्वपक्षीयांवर आरोप झाल्यानंतर कायदा त्याचे काम करील. तोपर्यंत आम्ही संबंधिताला निर्दोषच मानतो, अशी भूमिका घेताना दिसतात. अर्थातच सर्वच पक्षांनी राजकीय नैतिकतेचे धडे नव्हे, तर मुळाक्षरेच गिरविण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे, असे हे प्रकरण सांगते," असे सकाळकारांनी लिहिले आहे. हे वाक्य म्हणजे खासकरून शरद पवार यांच्यावर टाकण्यात आलेला शाब्दिक हातगोळाच आहे. सकाळने येथे जे धाडस दाखविले त्याबद्दल सकाळकारांचे खास अभिनंदन.

या अग्रलेखाबद्दल आमचा एकच आक्षेप आहे. तो म्हणजे - "सीबीआयने ताब्यात घेतल्याबरोबर त्यांनी (पक्षी - पद्मसिंह यांनी) तातडीने पक्षाचा त्याग केला असता आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असता, तर त्यांची नैतिकता शाबूत आहे, असेही म्हणता आले असते (म्हणजे पद्मसिंहांनी आधी राजीनामा दिला असता, तर सकाळने त्यांना खरोखरच नैतिकता शाबूत असल्याचे सर्टिफिकेट दिले असते की काय? बापरे!) आणि पक्षालाही नामुष्कीला सामोरे जावे लागले नसते..." ".... निर्णयाला जो उशीर झाला त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेचे निश्चितच नुकसान झाले आहे..." हे जे सकाळकारांनी आज म्हटले आहे, ते जरा आधीच म्हटले असते, तर राष्ट्रवादीचा केवढा तरी फायदा झाला असता. नामुष्की टळली असती, प्रतिमेचे नुकसान टळले असते, राजकारणातील नैतिकता शाबूत राहिली असती, शाबित झाली असती व सकाळकारांच्या दूरदृष्टीचे व निर्भिडतेचे पवाडे युगानुयुगे गायिले गेले असते. असो.

या अग्रलेखातून सकाळकारांनी राजकारण आणि नैतिकता यांतील द्वैत संपविण्याची आवश्यकताही प्रतिपादन केली आहे. "राजकारण आणि नैतिकता यांतील विरोधाभास संपेल तेव्हाच असे (पक्षी - हत्या, सुपारी आदी) प्रकार थांबतील," असे सोल्युशनही सकाळकारांनी येथे दिले आहे. हा विरोधाभास संपेल तेव्हा संपेल, परंतु "तोपर्यंत जनतेनेच अशा घटनांच्या संदर्भातील जागरूकता दाखवून विवेक केला पाहिजे," असे सकाळकारांनी सुचविले आहे. ही छानच व अत्यंत व्यवहार्य व नैतिक अशी सूचना आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. फक्त 'जनतेने अशा घटनांच्या संदर्भातील जागरूकता दाखवून विवेक करायचा', म्हणजे नेमके काय करायचे हे एकदा सकाळकारांनी सांगावे म्हणजे झाले!

(Posted by चांगदेव पाटील, दि. १२ जून २००९)

This entry was posted on 12.6.09 at 13:18 . You can follow any responses to this entry through the comments feed .

5 comments

Vachak  

too good!

June 15, 2009 2:22 PM
Anonymous  

chandevaaaaaaaaaaaa.........

June 15, 2009 8:10 PM
Anonymous  

सकाळ या वृत्तपत्रसमुहाचे एग्रोवन हे कृषिविषयक दैनिक आहे. या वृत्तपत्राला सध्या अग्रलेख लिहिण्याचा कंटाळा आलेला दिसतोय. १६ जूनच्या अंकात त्यांनी ग्रामीण पोलिसांबद्दलही जागरूकता हवी या शिर्षकाचा एक अग्रलेख प्रसिध्द केला आहे. गंमत म्हणजे सकाळ दैनिकाने १५ जूनच्या अंकात बदल्यांचे कवित्व या शिर्षकाचा जो अग्रलेख प्रसिध्द केला आहे, त्यातील मजकूर एग्रोवनने ढापला आहे. एग्रोवनच्या अग्रलेखातील पहिला परिच्छेद वेगळा आहे आणि उर्वरीत मजूकर मात्र सकाळच्या अग्रलेखातून चक्क उचलला आहे. याला आता काय म्हणावे. संपूर्ण अग्रलेख जसाच्या तसा रिपीट केला तर एक धोरण म्हणून ते समजून घेता येईल पण मजकूर कट पेस्ट करून अग्रलेख लिहिण्याचा नवीन पायंडा एग्रोवनने पाडलेला दिसतोय.

June 16, 2009 10:53 PM
Anonymous  

ऍग्रोवन मध्ये नेहमीचीच कट पेस्ट ची परंपरा आहे.
केवळ अग्रलेख नाही तर शेवटचे पान, अधल्या मधल्या बातम्या अशा अनेक गोष्टी सकाळ मधून घेतलेल्या असतात.
त्याही दुस-या दिवशी प्रकाशित होतात.
हे धोरण म्हणूनच स्वीकारलेले असावे ... दुसरे काय....

June 17, 2009 12:51 PM

LOkmat too didn't publish the news of a corporator's suicide... as its owner was named in the suicide note

October 27, 2009 12:35 PM

Post a Comment