(मित्रांनो,
मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशमुख यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने चांगदेव पाटील यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत. बातमीदार या ब्लॉगच्या प्रवृत्तीशी हा लेख आपणांस विसंगत वाटेल.
प्रारंभी आम्हांसही तसेच वाटले होते.
पण नंतर लक्षात आले, की शैली विनोदी नसली, तरी लेखाचा आशय बातमीदारशी सुसंगत असाच आहे.
प्रकाश देशमुख यांच्यासारख्या मोठ्या बातमीदारास आदरांजली अर्पण करतानाच हा लेख आजच्या बातमीदारीविषयीही काही बोलून जातो.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
- बापू आत्रंगे.)
---------------------------------------------------
लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेना-भाजप युतीचे पानिपत झाले. मनसेमुळे ते झाले. हे असे होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. कोणीही तसे भाकित वर्तविले नव्हते. कोणाही ज्योतिषाचा तसा होरा नव्हता. या निवडणूक निकालाने सट्टेबाज, पोलवाले तोंडघशी पडले. आम्हीच समाजमनाच्या आरशात डोकावू शकतो असा भ्रम अनेक बातमीदारांना असतो. त्याचा तो भोपळाही यावेळी फुटला. अशा वेळी आम्हांला प्रकर्षाने आठवताहेत ते प्रकाश देशमुख. ते असते, तर मुंबईत, महाराष्ट्रात कोणते वारे वाहात आहे, हे नक्कीच आधीच समजू शकले असते!
'बातमीदार' प्रकाश देशमुख नसतानाची ही गेल्या ३५-४० वर्षांतली पहिलीच निवडणूक. देशमुखांचा उल्लेख येथे मुद्दामच पत्रकार वगैरे न करता, साधा सरळ बातमीदार असा केला आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगात पत्रकार या शब्दाबरोबर येणारा बौद्धिक माज कधीही नव्हता. ते हाडाचे बातमीदार होते. बातमी हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता. एरवी विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष, प्रेस क्लबच्या कार्यकारिणीचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. पण त्यापलीकडे त्यांची स्वतःची अशी ओळख होती. राज्यभरातले असंख्य बडे बडे व सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते यांच्याशी त्यांची खांद्यावर हात टाकण्याइतका परिचय होता. त्यांचे हात मंत्री आणि नेत्यांच्या खांद्यावर सहज जाऊ शकत होते, कारण त्या हातांना कुणापुढे पसरण्याची लाचार सवय नव्हती. लाचारीने कधीही बातमी मिळत नाही. मिळते ती बातमी नसते. समाजवादी विचारांतून आलेला साधेपणा, गोरगरीबांप्रती असलेली तळमळ आणि हातातील विकली न जाणारी लेखणी ही देशमुखांच्या भात्यातील शस्त्रे होती. याच जोरावर ते प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही दोन शब्द सुनावू शकत असत. देशमुखांच्या या स्वभावामुळेच आमचे पत्रकार बंधु-भगिनी त्यांना विक्षिप्त, त-हेवाईक, अव्यवहारी असे म्हणत असत. या बंधु-भगिनींचेही बरोबरच होते म्हणा! देशमुख कणा शाबूत ठेऊन बातमीदारी ना करते, तर त्यांना पत्रकारितेतही मोठा गोतावळा जमा करता आला असता!
अखेरच्या काळात देशमुखांची साथ त्यांच्या प्रकृतीनेही सोडली! त्यांना मधुमेह होता, हद्रोगही होता. आयुष्यभर केलेल्या वणवणीची ही फळे होती. हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवण्यासाठीही त्यांना स्वतःलाच वणवण करावी लागली. त्यासाठी त्यांना कर्जही काढावे लागले. याच काळात गरज सरो, वैद्य मरो या उक्तीचाही अनुभव त्यांना आला. ज्या संस्थेचे गुणगान गाताना त्यांची जीभ थकत नसे, त्या संस्थेची, त्या संस्थेतील काही उच्चपदस्थांची त्यांच्या अखेरच्या काळातील वागणूक ही धादांत माणुसकीशून्य होती.
आपल्या कर्तव्याआड मात्र त्यांनी कधीही आजारपण येऊ दिले नाही. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरही ते कचेरीत जात असत. बातम्या देत असत. पण आता त्यांच्या कचेरीला त्यांची गरज राहिलेली नव्हती. बातमीदारीतला ब किंवा ब्रही ज्यांना अजून नीट उच्चारता येत नव्हता, अशा कॉलेजफ्रेश मुलीही आता देशमुखांना बातमी कशी असावी, हे सांगण्यास धजावू लागल्या होत्या. देशमुखांनाही ही नवी बातमीदारी कधीही उमजली नव्हती. मॉलमध्ये या आठवड्यात कोणती नवी स्कीम आली आहे, याच्या रसभरीत बातमीऐवजी देशमुखांना सरकारने कोणती नवी योजना आखली आहे, यात रस होता. बी प्लस आणि ए प्लस वाचक ही काय भानगड आहे, हे त्यांना कळत नव्हते. ज्याला मराठी वाचता येते ते सगळे आपले वाचक, अशी त्यांची काहीशी भाबडी समज होती.
देशमुखांनी बातमीदारी केली ती प्रामुख्याने सर्वसामान्यांसाठीच. तसा आव खरेतर सारेच आणत असतात. पण देशमुखांना हे 'सर्वसामान्य' म्हणजे नेमके कोण, ते कुठे राहतात, ते काय खातात हे सगळे माहित होते. हल्ली बातमीदारांच्या मुंबईची शीव मंत्रालय, विधिमंडळ, पालिका, रेल्वे आणि पोलिस मुख्यालय यापुढे जात नाही. देशमुखांना तळहातांवरील रेषांप्रमाणे मुंबई माहित होती. राजभवन ते भांडुप-मुलुंडच्या झोपडपट्ट्यांपर्यंत सर्वत्र त्यांचे फिरणे होते. देशमुखांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांविषयी एक लेखमाला लिहिली होती. दिवसभर फिरून बातमी देण्यासाठी ते जेव्हा कचेरीत येत, तेव्हा लोक ओरडत त्यांच्यावर - "देशमुख, अंगाचा कसला वास मारतोय!" नरकसदृश झोपडपट्ट्यांतून फिरून आल्यानंतर अंगाला असाच वास येणार. देशमुख झोपडपट्ट्यांची अवस्था समक्ष पाहून येत असत आणि मगच त्यावर लिहित असत. ती लेखमाला अर्थातच गाजली, हे वेगळे सांगायला नको.
अशा प्रकारे थेट जाऊन, पाहून, लोकांशी बोलून बातमीदारी करण्याचा प्रकार आजकाल फारसा आढळत नाही. आणि म्हणूनच मग पत्रकारांचे अंदाज चुकतात. लोकसभेच्या निवडणुकीत हेच झाले. देशमुख असते, तर त्यांनी नक्कीच नेहमीप्रमाणे मुंबईभर पायपीट केली असती. अनेकांशी बोलले असते. नेत्यांच्या मसलतखान्यांपासून गल्ल्यांमधल्या पानटप-यांपर्यंत सगळीकडचे कानोसे त्यांनी घेतले असते. अभ्यासाला वस्तुस्थितीच्या अवलोकनाची जोड दिली असती. आणि मग त्यांनी जे वार्तापत्र लिहिले असते, जे भाकित वर्तविले असते, ते असे चुकले नसते!
असो.
देशमुख गेले. बरोबर वर्षापूर्वी ते गेले.
त्यांच्याबरोबर पायपीट करणा-या बातमीदारांची पिढीही इतिहासजमा झाली!
हेही आता असोच!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. १८ मे २००९)
संबंधित वृत्त - प्रकाश देशमुख यांच्या स्मृत्यर्थ शिष्यवृत्ती
15 comments
धन्यवाद, तुम्हाला तरी प्रकाश देशमुखांची आठवण राहिली. "बातमीदार' या शब्दाला जागलात.
हाडाचा बातमीदार कसा असावा याचे प्रकाश देशमुख मुर्तिमंत उदाहरण होते.
देशमुखांनी केलेली पत्रकारीता "सकाळ'लाच काय पण महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्तेला देखील आता नको आहे. अशा परिस्थितीत "जमीन से जुडा' बातमीदार कसा तयार होणार? मागणी तसा पुरवठा करावा असेच टार्गेट वार्ताहरांसमोर ठेवले असेल तर यातून नवीन काय घडणार? भविष्यात देशमुखांची पत्रकारिता हा केवळ अभ्यासाचा आणि औत्सुक्याचा विषय असू नये यासाठी मराठी पत्रसृष्टीने वेळीच जागे व्हायला हवे.
देशमुखांची पत्रकारिता राहीलच कशी? ती राहती तर प्रकाश देशमुख यांच्या नावामागं संपादक हे पद नसतं लागलं? बरं झालं, ते संपादक नाही झाले. एक जिल्हा सांभाळणाऱ्या एखाद्या आवृत्तीचा संपादक हा त्यांचा भयंकर कोंडमारा झाला असता.
प्रकाश देशमुखांनी मुंबईतल्या झोपडपट्ट्यावर लिहिलेली मालिका जर मराठी ऐवजी इंग्रजी पेपरात छापून आली असती तर त्यांना त्या वर्षाचे सारे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले असते.
चंदन चंबुगबाळे
Kay Bapu, Kaslya itihasatlya goshti sangtay rao aajchya jamanyat.Anna hajare uposhanala baslyavar tumche mitra press clubmadhe daru peet bastat aani moth motyane danga kartat.mhanun prakash deshmukhanche jast manavar ghevu naka, aajcha program sanga, kitila bhetayche ?
बरं झालं तुम्ही देशमुखांची आठवण ठेवलीत.बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा आठवलेले देशमुख नव्या पत्रकारांना समण्यासाठी काहीतरी ठोस करायला हवं. नाही तर पुढच्या वर्षी ते किंवा त्यांचे काम कोणाला आठवेल याची शक्यता तशी धुसरच...!!
talagalatlyanch awaj jyachya lekhanitun umataycha te deshmukh kadhi akherparyant garibache garib batmidar rahile. tyanchi shrimanti hoti ti tyanchya lekhanit. tumhi tari tyanchya athavani jagavilyat dhanyavad!
बापू, प्रकाश देशमुख इतके मोठे होते की, आमच्या उमेदीच्या काळात अगदी लोकलच्या गर्दीत भेटले तरी ओळख दाखवून दोन चांगले शब्द सांगायचे. ते सांगताना खूप मोठा पत्रकार असल्याचा भास कधीही झाला नाही. ग्रेट माणसे आता राहिली नाहीत आजचा जमाना बाजारबुणग्यांचा आहे, हेच खरे.
प्रकाश देशमुख यांना निवडणुकीतल्या हवेचा अंदाज आला असता की नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण आजकाल कोणत्याही वृत्तपत्रातून ही हवा कळू शकत नाही. मी एक सामान्य विद्यार्थी आहे. पण मला माहित आहे की आजचे सगळे पेपर निवडणुकीतील उमेदवाराकडून पैसे घेऊन बातम्या छापतात. पूर्वी बातमीदार पैसे घेत असत. तेव्हा त्यांना भ्रष्टाचारी म्हटले जात असे. काही पेपरवाले त्यांच्यावर कारवाईही करीत. परंतु आता तर पेपरचे मालकच पैसे घेत आहेत. पॅकेज म्हणून डील करीत आहेत. पूर्वी सांडपाण्याची डबकी असत. आता समुद्रच सांडपाण्याचा झाला आहे. मला वाटते, की हल्ली पेपर निःपक्ष असतो, म्हणजे तो सर्वांकडून सारखेच पैसे घेतो. हल्ली पेपर निर्भिड असतो, म्हणजे तो पैसे मागताना भीड, लाज ठेवत नाही. हल्ली पेपर विश्वासार्ह असतो, म्हणजे पैसे दिले तरच त्यात बातमी छापून येणार असा सर्वांना विश्वास असतो. तेव्हा आता कोणीही तोंड वर करून भ्रष्टाचाराच्या बातम्या छापू नयेत. नीतिमत्तेच्या गोष्टी करू नयेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांबद्दल अग्रलेख लिहिताना संपादकांनी आपल्या पेपराने पैसे घेऊन छापलेल्या बातम्या आधी आठवाव्यात. सगळे एकाच माळेचे मणी. टीव्ही चानेलवालेसुद्धा असेच. बापू, तुम्ही तरी कोणाकडून पैसे घेऊन लेख लिहित नाही ना?
प्रकाश देशमुख असते तर त्यांना निवडणुकीचा अचूक अंदाज आला असता की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण, मुळात त्यांना मनासारखी बातमीदारी करता आली असती का हा प्रश्न मला छळतोय. खाली वॉल स्ट्रीट जर्नलमधल्या एका लेखाची लिंक दिली आहे. तो लेख वाचला आणि लगेचच प्रकाश देशमुखांवरचा हा लेख वाचला. पत्रकार असल्याची लाज वाटतेय...
http://online.wsj.com/article/SB124158152250690795.html
Laj kaschyala vatun gheta XXXX. Himmat asel tar yek vha and ladha na? Asa palputepana karun kay sadhya karnar ahat XXXXXXX. Yavar Ghar chalatay mhanun XXXXXX sheput ghalnar ka?
Tumhi lok swatache hakka gheu sakat nahi malakakadun. Kaschala mothyamothay bata marata XXXXXX.
haaat.. kalali tumachi layaki...xxxxxxxxxxxx
xxxxxx XXXX XXXXX XXXXX (hya Shivya ahet)
दिवंगत देशमुख सरांना भेटण्याचा एक-दोनदा योग आला. हा इतका मोठा माणूस,
रहायचा, बोलायचा मात्र अगदी साधा. हे मात्र आता लक्षात आलं.
पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या परवडीविषयी कुठेही वाच्यता झाली नाही.
नाहीतर, जगातल्या अनेकांच्या जीवनाविषयी बातम्या लिहीणाऱ्यांच्या
जीवनाविषयी कुठे जगाला काय माहित असते. पण एक खरे,
पत्रकारिता बदनाम करण्यात मालक लोकांचा सत्तर टक्के वाटा आहे.
पण त्याचबरोबर तीस टक्के वाटा या क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्तीच्या
मंडळींचाही आहे, (यांना बातमीदार-पत्रकार म्हणावेसेही वाटत नाही...!)
हे मान्य करावे लागेल. पण हे सगळं धुवून कोण काढणार..!
मध्यंतरी एकदा एम. व्ही. कामत यांना भेटण्याचा योग आला होता.
स्वतःतेही अशा कमर्शिअल चक्रात अडकल्यामुळे उद्वीग्न होते.
त्यांनीही आशा व्यक्त केली की, एक चक्र असते. पुन्हा चांगल्या
गोष्टींना चांगले दिवस येतील. वाईटांचे वाईट होईल. पण पुन्हा वाईटांना चांगले,
आणि चांगल्यांना वाईट दिवस येतील.. पण हे चक्र वेगाने फिरवण्याचे उपाय
मात्र कुणाकडे नाहीत. पण वाईटातल्या वाईटांना हाकलण्याची एकजूट दाखवायला
हवी, तेवढी नैतिक उंची गाठायला हवी...
प्रकाश देशमुखसरांना सलाम...!
बातमीदार ब्लॉग वाचणा-यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रकाश देशमुख यांचे सहकारीही आहेत. त्यांनी मात्र देशमुखांबद्दल काहीच कसे लिहिले नाही, याचे आश्चर्य वाटते. प्रकाश देशमुख हाडाचे पत्रकार होते असा उल्लेख चांगदेव पाटील यांनी केला, तो अगदी योग्य आहे. हल्ली हाडाचा पत्रकार ही संकल्पनाच लोप पावली आहे. अलिकडे उथळपणाच फार असतो. पेज थ्री पत्रकारिता वाढली आहे. देशमुखांना मी जवळून ओळखत होतो. सकाळमध्ये त्या काळी दोन पत्रकार खरे पत्रकार होते. एक वरुणराज भिडे आणि दुसरे देशमुख. देशमुखांना मुंबईच्याच काय पण महाराष्ट्राच्या राजकारणाची खडानखडा माहिती होती. मात्र त्यांनी अवहेलनाच जास्त झाली. नव्यासमोर जुने टिकत नाही हेच खरे.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
-
►
January
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

