दिवस सुटीचा. वेळ बाराची.
दोन डिशा कांदेपोह्याच्या, वर कोपभर कषायपेय व दोन खारी, ऐसा तुडुंब अल्पोपहार नुक्ताच झाला होता. नियोजनानुसार आता वामकुक्षीची वेळ झाली होती. तेव्हा स्वतःस बा नीज गडे लडिवाळा ऐसे बजावत आम्ही डोळ्यांवर लोकमत ओढला व हाताशी सकाळ ठेवला. हाही आमुचा नित्यक्रम. लोकमतच्या अग्रलेखाने पेंग आली रे आली, की सकाळचे संपादकीय घ्यायचे! विश्वासार्ह निद्रेची शाश्वती शक्य!
एकूणात आमुचे झोपेचे प्रयोग सुरु होते, तोच दाराची कडी अवचट वाजली. हे कोण बरे तडमडले, ऐसा संत्रस्त विचार करीत आम्ही कवाडे खोलली, तर समोर साक्षात् लेले.

यांचा पण बुधवारचा विकली ऑफ झाला की काय? बोंबला! मनीं ऐसा प्रेमळ विचार करीतच आम्ही लेलेंचे स्वागत केले. अखेर काहीही झाले तरी लेले हे आमचे शेजारी आहेत. (शिवाय त्यांचेकडे एटीएम कार्डही आहे!)

नमनाला एक थेंबही तेल न दवडता, हातातील लोकसत्ता फडकावत लेलेंनी भडिमारास सुरुवात केली,
"तुम्हाला काय वाटतं, मराठीतले तुम्हीच एकमेव विनोदी पत्रकार आहात काय?"
"ऑं!?!??" लेलेंच्या या प्रश्नाने आम्ही भुईसपाटच झालो. काय उत्तरावे तेच सुचेना.

वास्तविक आमच्या मते, आम्ही म्हणजे हजरजबाबी! जाबसालात हार जाणार नाही कोणास! कोणताही प्रश्न फेका आमुचे उत्तर तयार! सह्याद्री, साम मराठी या वाहिन्यांवरून कित्ती कित्ती अवघड बहुपर्यायी प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ परवा त्यांनी प्रश्न विचारला होता, की माहेरची साडी या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीने काम केले होते - अलका कुबल, अलका बुकल की अलका कबुल? केवढी काठिण्यपातळी! सर्वसामान्य प्रेक्षकांच्या ज्ञानाची केवढी मोठी ही परीक्षा! पण आम्हांस काय नाय त्याचे! एका फटक्यात सांगून टाकले - अलका कुबल. तथापि लेलेंच्या या प्रश्नाने आमुचे दोन्ही मेंदू आमूलाग्र हलले!

"लेले, अहो असं कसं म्हणता! केवढे बडेबडे विनोदी पत्रकार-लेखक आहेत मराठीत..."
"नाव घेऊन बोला. हवे तर त्यांच्या पेपरचे नाव नाही घेतले तरी चालेल. दुस-या पेपरातले असतील, तर नुसते ज्येष्ठ पत्रकार म्हटले तरी पुरेसे! पण नाव घेऊन बोला..," लेलेंनी बोलता बोलता मराठी पत्ररुढीच्या कासोट्यालाच हात घातला!
"अहो, मटातले चकोर आहेत. छान, ओल्या नारळाच्या करंजीसारखं लिहितात... खुसखुशीत! आमचे लोकसत्तेतले तंबी दुराई आहेत. भाषा बघा त्यांची आणि विनोदाची खोली! झालेच तर महागुरु प्रवीणभाई टोकेकर आहेत... भंकसकार विसोबा खेचर आहेत... कुणाचे नाव घ्यायला आपण डरतो की काय!!"
(बोलता बोलता जठरातील ऍसिडिटी एकदम घशातच आली! हा चहाखारीचा परिणाम की कुणाबद्दल बरे बोलल्याचा? डॉक्टरला दाखविले पाहिजे!)
"हेच ते... हेच ते... तुम्ही म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांचीच नावं घेणार! बाकीच्या पत्रकारांमध्ये विनोदबुद्धीच नाही, असं वाटतं ना तुम्हाला!!" लेले खवळून बोलले.
(हे आमचे जवळचे लोक? मनःपूर्वक व सविनय सांगतो, त्यांच्या सावलीशी जाण्याचीही आमची पात्रता नाही!)
"नाही नाही, असं कधी म्हटलो मी? बाकीच्या पत्रकारांमध्ये विनोदबुद्धी नसती, तर एवढे विनोदी पेपर निघाले असते का?"
"करा, करा, टीका करा... कोणत्या पेपराबद्दल तुम्ही कधी चांगलं म्हटलंय का?"
"लेले, अहो विनोदाला विनोदी म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं? आता परवाची सकाळमधली बातमी बघा.. संपादक विशेष प्रकल्प म्हणून नियुक्ती! संपादक... विशेष प्रकल्प!?" (खीखीखी!!!)
"मग त्यात हसण्यासारखं काय आहे? उलट अशी अभिनव पदनामे निर्माण करण्याच्या हातोटीबद्दल सकाळकारांना शाल व श्रीफल द्यायला पाहिजे!!"
"आणि हा पुढारी..."
"त्याचे काय? तो आला ना?"
"आला ना! पण येण्यापूर्वी किती छान वाटत होता!!"
"मग?"
"अंधारात कोणीतरी आपल्याला भॉ करतं. आपण एकदम दचकतो. आणि मग कशाला घाबरलो, म्हणून हसायला लागतो!" आम्ही किंचित फिलॉसॉफीत शिरलो.
"त्याचा पुढारीशी काय संबंध?"
"आहे ना! लोकमत आणि सकाळमध्ये लोक हल्ली असेच हसताहेत!.... हे सगळं विनोदी नाही काय लेले?" आम्ही इनोसण्टली विचारले.
"पण हे पेपरांबद्दल झालं. मी पत्रकारांबद्दल बोलतोय," लेले मुद्दा काही सोडत नव्हते.
शेवटी आम्हीच हार पत्करली, "असतील ना.. पत्रकारही विनोदी असतील..."
"असतील नव्हे, आहेतच. मी पुराव्याने बोलत असतो!"
पुरावा? पत्रकार विनोदी असल्याचा चक्क पुरावा आहे लेलेंकडे? आमचे दोन्ही मेंदू तिनशेसाठ अंशात चक्रावले.
"हा बघा आजचा लोकसत्ता. वाचा ही बातमी. बघा यात काय म्हटलंय..."
"अहो, ही कसाबच्या खटल्याच्या सुनावणीची बातमी आहे."
"पुढे वाचा ना... काय म्हटलंय? 'न्या. टहलियानी यांनी, तू ओंबळेंचे नाव उच्चारताच का हसतोस अशी विचारणा कसाबकडे केली. त्यावर कसाबने आपण जाणूनबुजून हसत नाही, तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्याला हसायला भाग पाडतात, असा दावा केला.' आलं ना लक्षात? अहो भर कोर्टात एका क्रूर कसाबाला हसायला लावणे म्हणजे काही सोपे काम नाही! पण आपल्या न्यायालयीन प्रतिनिधींनी ते केले आहे. म्हणजे कसाबचा तसा दावा आहे. आणि तो खरा असेल, तर बापू, आपले सर्व पत्रकार हे अत्यंत विनोदी आहेत, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल."
आता एवढे सगळे वाचल्यानंतर, आम्ही तरी ते कुठल्या तोंडाने अमान्य करणार होतो?

आम्ही मग सगळेच हसण्यावारी मान्य केले
व मग हसण्यावारीच समस्त पेपरे वाचू लागलो...

(Posted by बापू आत्रंगे, दि. १३ मे २००९)

This entry was posted on 13.5.09 at 12:38 . You can follow any responses to this entry through the comments feed .

9 comments

Anonymous  

bapu tume atrangic ahate......

May 13, 2009 3:50 PM
Anonymous  

jamale baraka nehamisarkhe! pan tyat hasnyasarkhe kay? ha prsna ahe...kiman ibn lokmat niyamit pahanaryana tari yat vinod vatnar nahi... mahanunch mazya sarkhya tadny vachakala ha prsan padat asun vagale chya madyamatun ajcha sawal madhe to upstit karava ase vatate... patrkarani ase kaonala hasnayas bahg padave kay? paha aaj tatri 9.30 vajta. tumcha avaj... (khikhikhi)

May 13, 2009 4:09 PM
Anonymous  

Comment taknarya anamveerala vinodatli vedna kalaleli nahi...hehi ankhi ek hasnyasarkhech...arthat swathalahi..

May 13, 2009 9:05 PM
Anonymous  

Vartanmanpatrat chaturvarna padhati ahe he khare ahe ka?

Lekhakanchi dukane kothe jasta chaltat?

Navlekhakh

May 14, 2009 1:07 PM
Anonymous  

khare sangayche tar tumhi lihita chaan.
pan Gan-Goulanit ji JAN hoti tee ya lekhat nahi..
chane-phutane mhanun bare aahe etech.
raag manu naye..! vatale te kalavale..
yawar aaple mat samjale tar bare vatel..

May 14, 2009 1:48 PM
Anonymous  

Sagle media wale Toma takayla gelew vatate..?

May 17, 2009 7:44 PM
Anonymous  

Sharad Pawarachi dandi gul zali. Ata Sakal Kay Karnar?

May 18, 2009 11:13 AM

wow. nice one

May 20, 2009 3:56 AM
Anonymous  

या अशा विंग्रजी प्रतीक्रिया वाचायला लई जड जाता बगा. मराठीत लिवा की.

May 21, 2009 9:25 PM

Post a Comment