राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतातला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला. आणि म्हणाला, राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटते. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. ऐक...
आर्यावर्तात पत्रनगर नामक एक विशाल नगरी होती. तेथे सम्राट पत्रवणिक राज्य करीत असत. सम्राट पत्रवणिक हे महान पराक्रमी होते. परंतु मनुष्य कितीही पराक्रमी असला, तरी युद्धात त्याचेही नुकसान होतेच. शत्रुपत्रांच्या नित्य स्वा-यांमुळे पत्रनगर साम्राज्याच्या वर्धापन व रिटेन कार्यात खूपच खर्च होत होता. त्या कारणें पत्रनगरच्या खजिन्यावर ताण येत होता. सम्राट पत्रवणिक यांना त्याचीच मोठी चिंता असे. त्या चिंतेने त्यांच्या जिव्हेस अस्थीभ्रंश विकार झाला होता. या विकारात मनुष्यप्राण्याचा जिव्हेवरील ताबा सुटतो व ती अद्वातद्वा चालते.
सम्राट पत्रवणिक यांच्या दरबारात का.सं.दत्त नामक प्रधान होते. का.सं.दत्त हे चौदा कला व चौसष्ट विद्यांमध्ये पारंगत होते, असे त्यांचे स्वमत होते! परंतु ते वस्तुतः व्यवस्थापनकलाकुशल होते. त्या कारणें पत्रनगरच्या कारभाराचा रथ ते उत्तमरीत्या हाकत होते. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे पत्रनगरचे प्रजाजन व पत्रश्रेष्ठी मनोमन कुढत दिनक्रमण करीत होते. का.सं.दत्त यांना एकच दुःख होते. ते म्हणजे सम्राट मीडियादत्त यांचा जिव्हाविकार. त्या विकाराचा फटका कासंदत्त यांना नित्य बसे. त्या कारणे ते मनोमन दुःखी असत. परंतु मासाखेरीस मिळणारे द्रव्य पाहून ते आपले दुःख प्राशन करून घेत असत. असा एकूण काळ चालला होता. ऋतुंमागून ऋतू चालले होते.
एकदा वसंत ऋतु सरता सरता सर्व मासांमध्ये उत्तम असा निवडणूक मास दाखल झाला. पत्रनगरच नव्हे तर अन्य राज्ये व साम्राज्ये यांतही हा मास हर्षोल्हासाने साजरा करतात. कोणी त्यास रणांगण नामे साजरे करते, तर कोणी त्यास कुरुक्षेत्र म्हणते, तर कोणी त्यास पॉवरप्ले म्हणते. एका पत्रराज्यात तर त्यास आयपीएल नामेही संबोधिले जाते. याच मासारंभी एके दिवशी प्रातःकाली का.सं.दत्त आपल्या कचेरीमहालातील अंतःपुरात बसले होते. एकाग्रचित्ताने ते साम्राज्यातून आलेले अहवालपठण करीत होते. अचानक त्यांच्या भालप्रदेशावर आठ्यांचे जाळे पसरले. भृकुटी वक्र झाली. त्यांनी तत्त्काल मेजावरील दूरध्वनीसंयंत्र हाती घेतले व त्यावरील कळफलकावरून काही क्रमांक दाबले.
दूरध्वनीसंचातून काही काळ होले होले हवा चालती है ऐसे हवामानगीत ऐकू येऊ लागले. किंचित कालाने त्यातून हॅलो असा भित्रट ध्वनी आला. तो ऐकताच कासंदत्त आपल्या व्यवस्थापनकुशल स्वरात म्हणाले, "वृत्तदास, मी का.सं.दत्त बोलतोय."
"हां सर?"
"अहो वृत्तदास, अमुक मतदारसंघातून किती वीर द्वंद्वास उतरले आहेत?"
"द्वादश, सर. परंतु खरे द्वंद्व दोनच योद्ध्यांमध्ये आहे. सत्तामित्र व अर्थकेतू अशी त्यांची नावे आहेत."
"होय ना? परंतु आपल्या पत्री केवल सत्तामित्र यांचेच वृत्त दिसते आहे." का.सं.दत्त संतापून विचारते झाले.
त्यावर वृत्तदास म्हणाला, "होय सर. सत्तामित्र यांच्याशी आपण संधी केली आहे. तसे मला सूचित करण्यात आले होते."
सत्तामित्र यांच्याशी सदरील संधीकरार का.सं.दत्त यांच्याच व्यवस्थापनकौशल्यामुळे जाहला होता. त्या करारामुळे साम्राज्याच्या खजिन्यात पंचदश लक्ष सुवर्णमुद्रांची भर पडणार होती.
"होय, परंतु वृत्तदास, याचा अर्थ असा नाही, की अर्थकेतू यांची वृत्ते देणे नाही. त्यांचीही वृत्ते दिसली पाहिजेत."
"होय सर," वृत्तदास म्हणाला, "आजपासून तसे करतो."
"हे पाहा, एकदम तसे करू नका. प्रथम त्यांच्यासमवेत संधीकरार करा. त्यांची पॅकेजक्षमता समजून घ्या. पत्रनगरची सेवा करण्याची ही संधी तुम्हांस मिळते आहे, हे तुमचे केवढे सौभाग्य आहे वृत्तदास!"
का.सं.दत्त यांच्या या विधानाने वृत्तदास यांच्या उदरी विशाल खड्डा पडला. परंतु मासाखेरीस मिळणारे द्रव्य पाहून त्यांनीही तो खड्डा भरून काढला.
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, की हे राजा, सत्तामित्र व अर्थकेतू यांच्यात द्वंद्वयुद्ध होणार असताना व सत्तामित्र यांची वृत्ते आपल्या पत्री प्रसिद्ध होत असतानाही का.सं.दत्त यांनी अर्थकेतू यांचीही वृत्ते प्रसिद्ध करण्याचा आग्रह का धरला? त्या मुळे सत्तामित्र यांच्यावर अन्याय होणार नाही का? तसेच अर्थकेतू यांच्याशीही संधीकरार करण्याची आज्ञा ऐकताच वृत्तदास यांच्या उदरात खड्डा कशामुळे पडला? या प्रश्नांची उत्तरे ठावूक असूनही दिले नाहीस, तर हे राजा, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावरती लोळू लागतील!
ते ऐकताच विक्रमादित्याने आपले मौन सोडले व तो सांगू लागला, हे वेताळा, का.सं.दत्त हे पत्रसंपादक असून, त्यांचे पत्र हे मोठे विश्वासार्ह असल्याचे या कथेतून प्रतित होते. विश्वासार्हता हा मोठा सद्गुण आहे. तो कमावण्यास खूप काळ लागतो. गमावण्यास क्षणही पुरेसा असतो. ही विश्वासार्हता निष्पक्षपातीपणातून येत असते. सत्तामित्र याच्याशी पत्राची संधी होती. त्या कारणे त्याची वृत्ते छापून येत होती. व त्या बदल्यात पत्रनगरीच्या खजिन्यात पंचदश लक्ष सुवर्णमुद्रा जमा झाल्या होत्या. परंतु त्यामुळे अर्थकेतू याच्यावर अन्याय होत होता. तो दूर करण्याकरीता व निष्पक्षपातीपणा टिकविण्यासाठीच का.सं.दत्त यांनी अर्थकेतू याच्याशीही संधी करण्याची आज्ञा वृत्तदासास दिली. त्यामुळे दोघांस समान न्याय मिळून, पत्रनगरची विश्वासार्हता टिकून त्याचबरोबर खजिन्यात भरही पडणार होती. म्हणून का.सं.दत्त यांचा आग्रह रास्तच आहे. मात्र पत्रनगरच्या खजिन्यात भर पडली तरच आपणांस मासाखेरीस द्रव्यलाभ होईल हे वृत्तदासास त्याच्या अविद्येमुळे समजले नाही. शिवाय तो -हस्वदृष्टीचा होता. पत्रनगरच्या लाभाऐवजी त्यास आपला स्वार्थ दिसत होता. त्याच्या उदरी खड्डा पडला यातून, वृत्तदास आधीच अर्थकेतू यांस जाऊन भेटला होता, हे स्पष्ट होते.
राजाच्या या उत्तराने वेताळ खुश झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
त्याच्या बाजूलाच वृत्तपत्रांची विश्वासार्हता व निष्पक्षपातीपणाही लोंबकळत होता!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २९ एप्रिल २००९)
17 comments
बापू, एकदम झकास आहे पोस्ट!!! एकदम झकास!!! सध्या पत्रकारनगरी च्या मानगुटीवर निवडणूकीचे भुत बसले आहे.
सही बापू, पोस्ट फार भारी जमली आहे! पात्राचीं नावं अप्रतिमच आणि लावलेला टोला एकदम झकास.
बापू एक गोष्ट राहिलीच.
सुरुवातीला भले मोठे टायटल साँग यावयाचे ते येथे असते, तर लय भारी मज्जा आली असती.
वाचकांनो ही कमेंट वाचताना
विक्रम..... विक्रम..... विक्रम... विक्रम...
वेताल..... ताल.... ताल..... ताल.....
विक्रम..... विक्रम..... विक्रम... विक्रम...
वेताल..... ताल.... ताल..... ताल.....
विक्रम आैर वेताल...........
विक्रम आैर वेताल..........
ही टायटल साँगची ट्यून वाचावी मग मालिका सुरू झाली असं समजून वाचायला घ्यावं.
-टोच्या बोबडे
वो त्यो कोन म्हंन्तोय हा लेख सकाळवरला हाय म्हनून. नीट डोळं उघड ठेवून वाचा की राव. सम्राट पत्रवणिक तर आवरंगाबादेतला हाय.
हाहाहा
बापूमहाराजांचा विजय असो.
Bapu, paid news cha dhandaa gele deed dashak khuleaam suru aahe. Kuthlyahi babujina vichara. Te hisheb sangtil.aani tumi matra scoop sangitlyapramane sangtay. Pan lihiley Zyaak baki..
Ashane lavkarch tumachya navane konitari supari de-eel bapu. Dhamal post.
रा. रा. कपिल, भित्री भागू, वाचक, टोच्या, खबरीलाल आणि अनामवीरहो,
तुमच्या प्रोत्साहनपर व उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
येथे एक गोष्ट आम्हांस तुमच्या विचारार्थ ठेवावीशी वाटते, की एखाद्या वृत्तपत्र कंपनीने बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी पैसे घेतले, की तो व्यवसायाचा भाग गणला जातो. आणि एखाद्या बातमीदाराने पैसे घेतले, की तो भ्रष्टाचार होतो.
ही जी जम्माडीगंमत आहे आपल्या नैतिकतेची, तिला काय म्हणावे हे काही आम्हांस सुचत नाही. आमच्या कवटीतील इंटेल इन्साईड पुराने झालेय का?
लई भारी
bapu jindabad,
Kharech ha prakar media la lombkalayla lawnara aahe, pan tarihi hi mandali naak unchaun boltat na tevha ek lagaun dyavishi vatte. XXXXXXX sale
bapu tumi evadhe cha lihita, pan ajun tumala ek hi purskar kasa mailala nahi. tyashivay tumchya lekanala manyata kashi milanar? tumi khare patrkar disat nahit. ekahdyane ataparyant 100 purskar ghetale aste.
bapu chan jamalay barka, aurangabadchya vikramavar (?) vetal basalay tar?
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

