ढापू बाई ढापू
गं ढापू बाई ढापू
एक बातमी ढापू
गं दोन लेख ढापू
कुणाला कळतंय?
दे ठोकून... छापू
हे पारंपरिक वृत्तपत्रीय लोकगीत असल्याचे सर्वश्रुत आहेच. वृत्तपत्रांचा लेलेकृत इतिहास निव्वळ चाळला, तरी अनेक श्रीयुतांनी हे गीत आळवल्याचे आपणांस दिसून येईल. आणि समस्तांस हे ज्ञातच आहे, की मराठी माणूस म्हटला की तो परंपराप्रिय असतोच. त्या कारणें समकालिन मराठी पत्रविश्वातही हे ढापू गीत ऐकावयास खासच मिळते. ज्याची सुरम्य उदाहरणे नेहमीच आपणांसमोर फडफडत असतात.
त्यातील एक ताजे टवटवीत तरल उदाहरण येथे उद्धृत करण्यायोग्य आहे.
ते वृत्त होते आमदारनिवासातील. एका मंत्र्याच्या पाहुणीस मंत्रीपत्नीने रात्रीच्या समयी चौदावे रत्न दाखविले, अशी ती रा. रा. सुकृत खांडेकरकृत सुरस व चमत्कारिक बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती. (वाचली होती ना तुम्ही ती बातमी... अगदी शेवटच्या पूर्णविरामापर्यंत? चवीचवीने?... तिचे पारायण करताना, भाव दाटले मनी अनामिक असे विचित्रसे काही होऊन आमच्याही नाडीचे ठोके वाढले होते!) तर तीच बातमी दुस-या दिवशी अन्य काही पत्रांमध्येही झळकली. शेमटूशेम. माशीटूमाशी. ते पाहून आम्ही मनोमनी म्हटले, असू देत. ढापू देत. अशी माहिती सर्व पत्रांच्या वाचकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने लोक असे काही वाचून काळजी तरी घेत जातील. तात्पर्य काय, तर ढापणाराने असा विवेक व तारतम्य ठेवून बातमी ढापली, तर कुणाची काही तक्रार असण्याचे कारण नाही.
वस्तुतः वृत्तढापूगिरी ही जशी कला आहे, तसेच ते एक शास्त्र आहे. ते ठाऊक असलेला बातमीदार कधीही लोकप्रिय व स्वस्त इंग्रजी दैनिकांतील बातमी ढापत नाही. तो विचार करतो, की टैम्सॉफिंडिया वा एचटीमधील बातमी ढापणे म्हणजे सीसीटीव्हीक्यामे-यासमोर उभे राहून चोरी करण्यासारखे आहे. ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मराठीच करायचे, तर मग हिंदु, इकॉनॉनिक्स टाइम्स आदी जड पत्रेच का घेऊ नयेत? फ्री प्रेस इंड्या असेल तर अतिउत्तम. (ते मोठे जादुई वृत्तपत्र आहे. असते, पण दिसत नाही!)
ढापूगिरी कलाप्रांतात महामाहिर असलेले बातमीदार कधीही बातमी जशीच्या तशी ढापत नाहीत. ते बातमीचा फॉलोअप देतात! त्यात अर्थातच थोडी जास्त अंगमेहनत असते. पण ती अनेकदा सार्थकीही लागू शकते. कारण की अशा बातमीत बायलाईन मिळण्याची अंगभूत सोय असते.
हे सर्व वाचल्यानंतर आपणांस या कला व शास्त्रात काहीच काठिण्यपातळी नाही, असे वाटू शकेल. पण वाचकांतील पत्रकार हो, येथे फसगत होण्याची शक्यता असते. जशी ती सकाळमधील एका उपसंपादकाची झाली. ती कथाही मोठी मनोरंजक व ज्ञानवर्धक आहे.
ती एप्रिल फूलची गोष्ट आहे.
(माहितीसाठी - दरवर्षी १ एप्रिल रोजी एप्रिल फूल असतो.)
तर त्या दिवशी लोक एकमेकांस एप्रिल फूल करतात. अनेक वृत्तपत्रे त्या दिवशी थोडीशी चंमतग करतात. एखादी भन्नाट बातमी देतात, की वाचकांस क्षणभर भिरभिरल्यासम व्हावे. चाणाक्ष वाचक मात्र अशा बातम्यांना फसत नाहीत. ते अशा बातम्या वाचतात. ओठांच्या कोप-यातल्या कोप-यात कणभर हसतात. आणि मग ती बातमी विसरून जातात. (हे अर्थात सरासरी सगळ्याच बातम्यांबाबत होत असते. शिवाय आता वाचकांस एप्रिलफूल बातम्यांत फारसा रसही राहिलेला नाही. इंड्या टीव्ही व आयबीएनसेव्हन व सामना व पुण्यनगरी असताना त्यात कुणास काय नाविन्य वाटेल? असो.)
तर गेल्या एक एप्रिलला महाराष्ट्र टाइम्सच्या पोटातील मुंबई टाइम्स पुरवणीने अशीच एक गंमत केली. त्यांनी चक्क भार्गवी चिरमुले ही आपली मराठी अभिनेत्री थेट बॉण्डपटात झळकणार अशी बातमी प्रसिद्ध केली. या वृत्तातच 'सविस्तर बातमी वाचा पान तीनवर' अशी जोडणीही देण्यात आली होती. पान तीनवर स्वच्छपणे 'एप्रिल फूल बनाया' असे छापले होते. थोडीशी गंमत. दुसरे काय!
पण ही गंमत पुणे सकाळच्या त्या कुण्या ढापूकलाशास्त्रात प्रवीण नसलेल्या उपसंपादकाच्या डोक्यावरून गेली. अगदी तीनताड गेली.
त्यास बिचा-यास खरेच वाटले, की आपल्या भार्गवीताई खरोखरीच बॉण्डपटात काम करणार आहेत. (जेम्स बॉण्डला एक धाकटी बहिण असते. ती लहानपणीच बिछ़डलेली असते. मग एकदा अतिरेक्यांचा माग काढत बॉण्ड ऐन गणपतीत पुण्यात येतो. आणि सिटी पोस्टाजवळ नेमकी त्याला ही धाकटी बहिण सापडते. तीच आपली भार्गवीताई, असा काहीसा त्या उपसंपादकाचा समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
ही गुडन्यूज आपल्याही, म्हणजे सकाळच्या लक्षलक्ष वाचकांना कळावी म्हणून त्याने हळूच मटाची ती एक एप्रिलची बातमी उचलली व सरळ सकाळच्या पुणे (ग्रामीण) आवृत्तीत नऊ एप्रिलला प्रसिद्ध करून टाकली. (नऊ एप्रिलला प्रसिद्ध केल्यामुळे ती बातमी आपोआपच एप्रिल फूलची होत नाही, असाही त्या उपसंपादकाचा समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुण्यात कसल्याच शक्यता नाकारता येत नाहीत!)
तात्पर्य काय, तर माणूस ढापूकलेत किमान मॅट्रिकपास तरी पाहिजे! नाही तर बिचा-या त्या सकाळच्या उपसंपादकासारखे होते. आपण तर एप्रिल फूल बनतोच, पण वाचकांनाही शेंडी लावून जातो. (खोटे नाही हे. पुराव्यादाखल सकाळच्या संकेतस्थळावर त्या बातमीखाली प्रसिद्ध झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पाहा. काही जणांनी तर आपल्या मराठी बाण्यास जागून भार्गवीचे खूप खूप अभिनंदन केले आहे!)
आता यावर सकाळ काही खुलासा-बिलासा करणार का? असा प्रश्न मात्र तुम्ही विचारू नये.
असे प्रश्न अग्रलेखांसारखेच असतात. भाकड!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २७ एप्रिल २००९)
10 comments
Bapu,
Tumcha blog pharach apratim. Congrats.
Batmya kaay khup jana detat, pan tyaa magchi baatmi deun, amchyasarkyaa 'non-patrakar' lokanna tumhi barach kahi sangun jataa.
Amche pitashri tumchya vyasayatle bujurg (pan tyaani chukun dekhil amhala ikde phirku dila nahi :)). Tyaanna ha blog vachun khupach anand hoil.
Keep it up.
Star Maza ne aamdar niwasatil batmi dusrya divshi jashichya tashi dakhavli sukhrup khandekaranchya katranasaha. kaal nitin raut yancha khulasa aala. to bakichyani dakahavla nahi.
Pan manora madhe sukhrup daru pinyachi soy evdhya ushiraparyant ahe kay ?
Sakaalmadhe bazarbungech jasta bharale ahet. Abhijeet pawar yekada mhanale hote, maza driverhi sakalcha sampadak hou sakato ani charach naukar director hou sakato. Kharach ki...
Sakal ne sanket sthalavarun batmi kadhun takli aahe...
Baapu, Tumche lekhan te vachtat bara ka...
बापूशेठ, तुमच्या ब्लॉगची दखल इंग्रजीवालेसुद्धा घेऊ लागलेत बरे का. आजच एका इंग्रजी ब्लॉगवर या लेखाबद्दल लिहिलेले दिसले. त्याची लिंक येथे देत आहे.
http://otherbird.blogspot.com/2009/04/bhargavi-bond-and-sakal.html
बापू,
ढापूकलेबद्दल तुम्ही हातभर लांब लेख लिहिलात. पण फक्त पीटीआय, युएनआयवर विसंबून राहिले तर अंक भरायचा कसा. आता तर अगदी न्यूयॉर्क टाइम्स ते दैनिक जागरण असा पत्रकारांचा ढापूगिरीसाठी संचार सुरू असतो. पाहिजे तर सर्व पेपरचे सर्व अंक चेक करा.
खबरीलाल
बापू, अनेक पत्रकारे आपल्या जुन्याच बातम्या कॉपी करतात. जय हो...
राज्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यातील ढापूगिरीचे हे एक उदाहरण.
या जिल्ह्यातून बरीच सायंदैनिके प्रकाशित होतात. इतर दैनिकांतून बातम्या ढापणे हाच त्यांचा मुख्य स्रोत. त्यातील एका सायंदैनिकांचे पत्रकार तसे हुशार. त्यांनी वृत्तपत्रांतून बातम्या ढापण्यापेक्षा एका मोठ्या दैनिकाच्या ई-आवृत्तीतून बातम्या ढापण्याची पद्धत सुरू केली. या मोठ्या दैनिकात प्रकाशित न झालेल्या पण त्याच्या वेबसाईटवरदिसणाऱ्या बातम्या ते सायंदैनिक ढापत होते. त्या मोठ्या दैनिकाच्या तांत्रिक अडचणीचा फायदा हे सायंदैनिक उठवत होते. ते मोठे दैनिक तंत्रज्ञानात आघाडीवर व प्रत्यक्षात जागा कमी. त्यामुळे बऱ्याच बातम्या तयार होऊनही अंकात जात नव्हत्या. मात्र, त्यांच्याच वेबसाइटवर त्या प्रकाशित होत होत्या. तयार झालेल्या बातम्या सरळ उचलून वेबसाइटवर टाकण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळे बऱ्याच बातम्या अशा असत की, त्या दैनिकात नसत पण वेबसाइटवर असत. नेमक्या त्याच बातम्या ते सायंदैनिक उचलत असत. वेबसाइट पाहणाऱ्यांची संख्या ती किती असणार? त्यामुळे ती बातमी सायंदैनिकातच ताजी वाटत असे.
मोठ्या दैनिकातील लोकांनाही बराच काळ हा प्रकार काय आहे, हे कळत नव्हते. आपली अंकात न लागलेली बातमी सायंदैनिकात कशी? कोणी फोडली की काय? असा प्रश्न त्यांना पडू लागला. त्यामुळे तेथील पत्रकारे एकमेकांकडे संशयाने पाहू लागली. काही काळानंतर ढापूगिरीचे हे प्रकरण उघडकीस आले. त्या सायंदैनिकाचा स्रोत आपलीच वेबसाइट आहे, हे लक्षात आले. त्यानंतर संबंधित सायंदैनिकाच्या लोकांना खासगीत याची जाणीव करून देण्यात आली. मात्र, त्यांची ढापूगिरी सुरूच होती.
एकदा काय झाले, त्या शहरातील एका सायबर कॅफेवर पोलिसांचा छापा पडला. मराठवाड्यातील एका जिल्ह्यात एका गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे तेथून पाठविण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी तेथे तपासणी केली. मात्र, प्राथमिक माहितीनुसार तेथून आक्षेपार्ह ई मेल पाठविण्यात आल्याने पोलिसांचा छापा पडल्याचे समजले होते. त्यासाठी पोलिसांनी कॅफेला सील केले, चालकाला अटक केली, अशी माहिती पुढे आली होती. मोठ्या दैनिकाच्या पत्रकाराने ही बातमी देऊन टाकली. मात्र, रात्री उशिरा हे प्रकरण वेगळेच असल्याचे व बातमी देण्याएवढेही महत्त्वाचे नसल्याचे लक्षात आल्यावर त्या मोठ्या दैनिकाने ही बातमी प्रत्यक्ष अंकात घेतलीच नाही. मात्र, त्यांच्या वेबसाईटवाल्यांना ती दिसली अन् त्यांनी ती उचलली. दुसऱ्या दिवशी मोठ्या दैनिकाच्या अंकात ही बातमी नव्हती. पण वेबसाइटवर झळकली. नेहमीप्रमाणे सायंदैनिकाच्या पत्रकारांनी ती चोरली अन् पहिल्यात पानावर लावून टाकली. जेव्हा सायंकाळी सायंदैनिक प्रसिद्ध झाले तेव्हा सायबर कॅफेवाल्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. हा प्रकार लक्षात आल्यावर संबंधित सायबर कॅफेचालक त्या सायंदैनिकात जाऊन भांडला. एवढेच नव्हे तर कारवाईची धमकी देऊन खुलासाही छापण्यास भाग पाडले. यात सायंदैनिकाची मोठी गोची झाली. त्यांना या बातमीचा स्रोतही सांगणे अवघड बनले होते. तर दुसऱ्या बाजूला त्या मोठ्या दैनिकांच्या पत्रकारांमध्ये आनंदच्या उकळ्या फुटल्या होत्या. ढापूगिरीला अशी परस्पर अद्दल घडली होती. तेव्हापासून त्या सायंदैनिकाने ढापूगिरी बंद केल्याचे समजते.
भंकस
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

