बोला पुंडलिकावरदा हारि विट्टल
श्रीज्ञानदेवतुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!

तर मंडळी, तुकोबारायांचा एक द्रिष्टांत आहे. महाराज म्हन्तात -
बोल बोलता सोपे वाटे...
पण करणी करता....?
अगदी बरोबर.
महाराज सांगतात - करणी करता टीर कापे!

मंडळी तुम्ही म्हणाल, की बुवांनी मधूनच कुठून हा अभंग उचलला आहे. पन त्याला येक कारन आहे. ते कारन म्हंजे आमची पेपरवाली मंडळी.
या पेपरवाल्या मंडळींनी आज आमच्या आनंदराव यादवबुवांबद्दल अग्रलेख छापले आहेत.
आता आपल्यासारखी मंडळी आणि ही पेपरवाली मंडळी यांच्यात हा मोठाच फरक आहे मंडळी. आपण म्हंजे काला आक्षर भैस बराबर. दोन शब्द लिहायचे म्हटले तरी आपल्याला केवढा कंटाळा! तुकोबा म्हंतात -
काय करू मज नागविले आळसे
बहुत या सोसे पीडा केली...
पन या पेपरवाल्या मंडळींनी असा आळस करून चालत नाही. रोजच्या रोज अग्रलेख लिहावाच लागतो. म्हनून मंडळी, ते अग्रलेख लिहितात!
तर हे अग्रलेख म्हंजे कसे?
कागदी लिहिली नावाची साकर
चाटिता मधुर केवी लागे
बोलाचीच कढी बोलाचाची भात
जेऊनियां तृप्त कोण जाला

बोला पुंडलिकावरदा हारिविट्टल श्री ज्ञानदेवतुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!

तर मंडळी, आजच्या या अग्रलेखांचा विषय आहे आनंदबुवा यादवांचा राजीनामा. या मान्सानं तुकोबामावलींबद्दल पुस्तक लिहिलं. त्याच्यात महाराजांबद्दल काहीच्याबाही लिहिलं. म्हटल्यावर वारकरी मंडळी काय गप्प बसतात? आमचे सामनावाले साहेब लिहितात -
"कादंबरीला आकर्षक नाव द्यायचे आणि तुकोबारायांसारख्या सच्छील चारित्र्याच्या परोपकारी संतावर संशोधनाच्या नावाखाली लक्षात येतील न येतील असे शिंतोडे उडवायचे. पुन्हा सारे काही आपल्या साहित्यिक कर्तृत्वामुळे खपून जाईल या भ्रमात वावरायचे. या वृत्तीला वारकरी मंडळींनी एक सणसणीत तडाखा दिला आहे."

आता आपन वारकरी म्हंजे कसे? तर मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास. पण कुठवर, तर भले असू तिथवर. तुकोबा मावली म्हंतात -
भले तरि देऊं गांडीची लंगोटी
नाठ्याळा चि गांठी देऊं माथा....
मायबापाहूनी बहु मायावंत
करू घातपात शत्रुहूनि

सामनावाल्या साहेबांना हे असेच वारकरी पायजेल हायेत. पण तरीसुद्धा सामनावाले म्हणतात - "मुळात वारकरी मंडळींनी विषय तुटेपर्यंत ताणण्याची गरज नव्हती. एखादा आपली चूक कबूल करून शरण आल्यास त्याला अभय द्यावे हीसुद्धा संतांचीच शिकवणूक."
हे बाकी सोळा आने बरोबरहे. आमच्या नारायणरावांचा प्रहारसुद्धा हेच म्हणतो. "या प्रकरणाने वारक-यांच्या सहिष्णुतेचे पितळही उघडे पडले आहे. तुकाराम महाराजांना छळणा-यांनाही त्यांनी माफ केले होते, याचा विचार वारक-यांनी करणे गरजेचे होते."
अगदी सत्यवचन. भागवत संप्रदाय सांगतो - दयाक्षमाशांती तेथे देवाची वसती!

पण हे सामनावाले एकीकडे वारक-यांनी अतिरेक केला असंही म्हणतात, "संत तुकारामांचे मन आकाशाएवढे मोठे होते. कुणाच्या लिहिण्याने, बोलण्याने संत तुकारामांना किंवा त्यांच्या विचारांना खुजेपणा येत नाही", असंही म्हणतात आणि तिथंच म्हणतात, की "संतांवर, हिंदू देवदेवतांवर, श्रद्धास्थानांवर ज्यावेळी आघात होतात त्यावेळी उसळून उठाल तर तुम्ही खरे धर्मरक्षक. निदान यापुढे तरी ही काळजी घ्या."
सामनावाल्यांची ही अशी वैचारिक डबलढोलकी कशामुळं झाली असेल मंडळी?

तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय
कारण कमाईविण नाही....

पण मंडळी आमच्या लोकमतवाल्यांनी याला चांगलं उत्तर दिलं आहे.
लोकमतवाले म्हंतात - "तुमच्या श्रद्धास्थानांची चिकित्सा होऊ दे, आमची दैवते मात्र तिच्यापासून दूर राहू दे, ही राजकारणातली वृत्ती याही क्षेत्रात अवतरली आहे काय? की रामदासाची चिकित्सा करा, जमले तर त्याच्यावर टीकाही करा, आमच्या संतांना मात्र हात लावू नका असे एकारलेपण साहित्यानेही आता अंगिकारले आहे?"

मंडळी, या राजकारणाने आपल्या वारक-यांच्या फडातसुद्धा शिरकाव केला आहे. वारक-यांमध्येसुद्धा आता पुढारी घुसले आहेत. परंतु मंडळी, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने.
महाराष्ट्र टाइम्सवाल्या साहेबांनीसुदिक हीच शंका घेतलेली आहे. मंडळी, ते काय सांगतात ऐका - "ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेखाचा वाद ज्या टोकापर्यंत ताणला गेला, त्यावरून वारकरी संप्रदायावर प्रभाव असलेल्या वारकरी पुढा-यांच्या भावनांचा अन्य हेतूंसाठी वापर करण्यात आला काय, अशी शंका येते."
मटावाले साहेब पुढं काय म्हंतात - "यादव यांनी हे पुस्तक मागे घेतले, वारकऱ्यांची देहूला जाऊन माफीही मागितली. तेथे यादव यांनी धक्काबुक्कीला तोंड दिले. वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेला धक्का लावणारीच ही घटना होती. यानंतर वास्तविक वादाचा मूळ मुद्दाच संपला होता. या कादंबरीशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला त्यानंतरही लक्ष्य करणे अनाकलनीयच होते. त्यामुळेच त्यामागील 'बोलविते धनी' कोणी वेगळे आहेत काय या चर्चेला वाव मिळाला आहे."

मटाचा हा अग्रलेख, मंडळी तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घालनारा आहे. मटावाले साहेब म्हंतात - "आविष्कार स्वातंत्र्य अनिर्बंध नाही हे खरेच आहे. एखादे लेखन हे भावना दुखावण्याच्याच हेतूने बेदरकारपणे केले गेले असेल, तर कायद्याच्या मार्गाने अशा लेखनाला आळा घालणे हा सुसंस्कृत समाजापुढील पर्याय आहे. दुसरा पर्याय, असे लेखन अनुल्लेखाने मारणे हा आहे. दुदैैर्वाने आज या पर्यायांपेक्षा, समाजगटाला चिथावून दडपण आणण्याचा मार्ग रूढ झाला आहे. त्यामुळे बेजबाबदार लेखकांना जरब बसेलही, पण त्याबरोबर सर्जनशीलताही कुंठित होईल."
सकाळवाल्या साहेबांनीसुद्धा असाच मुद्दा मांडलाय. "त्यांच्यातर्फे (वारक-यांतर्फे) सेन्सॉरशीपची कल्पनाही पुढे येऊ लागली. अमुक माणसाला तमुक लिहायचे असेल, तर त्याने अमुकाची परवानगी घेतली पाहिजे, असे काही उतावीळवीर बोलू लागले. त्यातूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वाट लागत होती."
पण आता त्यांचं ऐकनार कोन?
तुकोबांचंसुद्धा ऐकलं नाही या मंडळींनी. महाराज म्हंतात -
किती सांगो तरी नाईकती बटकीचे
पुढे सिंदळीचे रडतील...
तेव्हा त्यांच्याबद्दल आपन काय म्हणणार?

बोला - पुंडलिकावरदा हारिविट्टल.....

मंडळी सकाळवाल्या साहेबांनी वारक-यांच्या कपाळी विचारांचा टाळ घातला. पण त्यांनी आमच्या यादवबुवांनाही सोडलं नाही. ते म्हणतात - "ज्यांनी ते (म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य) टिकवून ठेवायचे ते डॉ. यादवही क्षमायाचनेचा मार्ग शोधत होते." प्रहारवाले साहेबसुद्दा लिहून जातात - "यादवही दोषास पात्र आहेत. ते कोणत्याच मुद्दयावर ठाम राहिले नाहीत." लोकमतवाल्या साहेबांनी तर यादवबुवांना सडकूनच काढलंय. मटावाले म्हंतात - "आनंद यादव यांना ज्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे मराठी साहित्यिकांचीच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेचीही मान लाजेने खाली गेली आहे." पण आमच्या लोकमतवाल्या साहेबांचा काहीतरी वेगळाच राग आहे. ते म्हंतात - "आपले पुस्तक मागे घेण्याची घोषणा करून त्यांनी (यादवबुवांनी) आपल्या आयुष्यभराच्या वाङ्मयीन मिळकतीवरच पाणी सोडले.... त्यांच्यावर विश्वास ठेवणा-या सगळ्या लेखक-कवींना आणि चाहत्या भक्तांना त्यांनी निराधार केले.... आपला शब्द आणि त्यातील सत्य याविषयीची खात्री नसणा-यांनी लिहायचे तरी कशाला?..."
सवाल मोठा रोकडा आहे.
पण आमच्या ऐक्यवाल्या साहेबांनी परस्परच त्याचं उत्तर दिलं आहे. ऐक्यातले साहेब म्हंतात - "मेणबत्त्या घेऊन विचार स्वातंत्र्याचा प्रकाश पाडणारे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी सुध्दा अंधारात गुडूप झाले होते. कुणी काही म्हटले तरी, यादव यांच्या पाठीशी एकही साहित्य संस्था, महामंडळ उभे राहिले नाही. यादव एकाकी पडले. महाराष्ट्र आणि मराठी साहित्य संमेलनाच्या भवितव्याचा, मराठी रसिकांचा विचार करून त्यांनी अत्यंत शांतपणे आपल्या अध्यक्षपदाचा रा जीनामा दिला. त्यांनी राजीनामा देऊन पलायनवादी मार्गाचा स्वीकार केल्याची टीका करणाऱ्या, उपटसुंभ साहित्यिकांची दातखिळी गेले दोन महिने का बसली होती?"

उपटसुंभ साहित्यिकांचीच कशाला? सगळ्या पेपरवाल्या साहेबांची दातखिळसुद्धा दोन महिने अशीच बसली होती. या पेपरवाल्या मंडळींची एवढी गोची झाली होती, मंडळी की त्यांना कोणाची बाजू घ्यावी हेच उमगत नव्हतं. म्हणून ते गप्प होते. आणि आता सगळे मिळून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने पुंडलिकावरदा करीत आहेत. आनंदबुवा तुम्हाराच चुक्या असं म्हनत आहेत. अशा लोकांसाठीच तर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेलेत -
बोल बोलता सोपे वाटे
करणी करता टीर कापे....

आमच्या लोकसत्ताचं बघा. त्या साहेबांनी काही बोललंच नाही!
एकंदर या वादंगाच्या डोहात आमच्या पेपरवाल्यांचाही थोडा बुका सांडलाच मंडळी.

बोल पुंडलिकावरदा हारिविट्टल श्री ज्ञानदेवतुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!

(Posted by बापू आत्रंगे, दि. १९ मार्च २००९)

This entry was posted on 19.3.09 at 15:17 . You can follow any responses to this entry through the comments feed .

10 comments

संतोष देशपांडे  

वादंगाचे डोही
आनंद तरंगे;
दंग सारे सगे
चित्र न्यारे..

नाठाळाचा माथा
काठीने रंगला;
छंद बिघडला
अभंगाचा...


तुकोबा उरले
गाथा-पारायणी;
अन् इंद्रायणी
आत आटे..

- संतोष देशपांडे

March 19, 2009 5:35 PM

Great.

March 19, 2009 6:39 PM
KHABRILAL  

Bapu,
Papervalyacnya navane kokaltay, tumhi kuthe hotat, itke divas, ka indrayanit budi marli hoti?

March 19, 2009 6:39 PM
Anonymous  

खबरीलाल आमच्या खबरीनुसार बापूने पेगमध्ये बुडी मारली असावी. तो पेग भांगेचा असावा. म्हणून बापूला अशा कल्पना सुचतात. च्यायला, मुकाट पेपर वाचायचा आणि त्यातल्या चुकांकडे कानाडोळा करायला बापूचं काय जातं? आम्हांला तो का कानकोंडं करतोय? तेव्हा बापूने अन्य बोरुपाटलांप्रमाणे खाली मान घालून बोरूपाटीलकी करावी. नसत्या फंदात पडू नये. म्हणजे मग खबरीलाल यांस समाधान होईल. बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल...

March 19, 2009 7:38 PM
sudharak  

bapu chan! aani aekywalehi chhan!

loksatteche maun dhakkadayak aahe.

March 20, 2009 12:34 AM
Anonymous  

sandarbh tapasun lihinyachi savay tumhala disat nahi..
aapan tukaramche abhng chukeche lihitoy
yache bhaan aahe ka?
te nasel mag etarana shahanpana ka shikvata?
ya lekhat kuthlya oli chuklya aahet
he tapasaychi tasadi ghya..

March 20, 2009 5:41 PM

रा. रा. अनामवीर,
तुकोबांच्या अभंगांची देहू प्रत आमच्या पारायणात असते.
लेखातील कोणत्या अभंगाची कोणती ओळ चुकली हे आपण सांगितले तर आम्ही आपले शतशः ऋणी राहू.
आपणांस हा लेख वाचून झालेल्या तसदी व त्रासाबद्दल क्षमस्व.
- बापू.

March 20, 2009 6:37 PM

"तुका म्हणे क्षमा सर्वाचे स्वाहीत" असे सांगणार्‍या तुकोबांच्या अनुयायनि आता आपणही तुकोबांच्या विचरांपासून फरकात घेतली असल्याचे दाखवून दिले आहे. प्रश्ना असा आहे की, तुकोबांचा अपमान ज़ला म्हणून यादवांचा राजीनामा घेणारे तुकोबांच्या विचारांचा दररोज खून पाडणार्या राजकारण्यानविरोधात रान का उठवीत नाहीत ? दहशतवाड्यानविरोधात आंदोलन का करीत नाहीत ?
"डाउ" ला विरोध करण्यासाठी जर सत्ताधार्यांवर दबाव आणला जऔ शकतो तर वैचारिक आणि सामाजिक प्रदूषण करणार्यांच्या विरोधात काहीचा का केले जात नाही ? दुर्बालांचा आन्या य दूर करण्या साठी भ्रष्टा व्यवस्थेला ताकद का दाखवली जात नाही ?
या भक्तानी कधी बाबा आमटेंच्या वा इतर काही सामाजिक कार्यात मोठ्या हिरारीने भाग घेतल्याचे ऐकिवात नाही किंवा हिंदू देवतांच्या विटंबणेचे प्रकार झाले की हे लोक गप्प का बसून असतात ? स्वराज्या स्थापने ला आशीर्वाद देणार्‍या तुकोबांचे भक्त आज स्वकियांकडून स्वराज्याचे होणारे वस्त्र हरण निष्क्रियपणे बघत आहेत ही नवीच शोकांतिका आहे !
वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आणि ताकद आहे. समाजाला दिशा देण्याचे करण्याचे काम या संप्रदायाने करावे ही अपेक्षा चुक आहे काय ? वारकर्‍याननी आपले रूपांतर येशुला क्रुऊसवर लटकवणार्या जेरुसेलमच्या नेत्यांमधे किंवा तालीबान्यांमधे होऊ देऊ नये ही मनापासून हात जोडुन विनंती.
तुकोबांच्या शब्दात सांगायचे झाले तर " अभिमानाचे तोंड काळे, दावी अंधार बळे" हे सगळयनी लक्षात घेतले पाहेजे.

March 21, 2009 11:02 AM

रा. रा. अवेन्स्डे,
अत्यंत योग्य मत मांडलेत.
धन्यवाद.

रा. रा. संतोषजी,
काव्य झकास जमलेय...
मस्त.

रा. रा. कपील, खबरीलाल, सुधारकजी आणि अनामवीर,
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
- बापू

March 21, 2009 12:08 PM

यादवांचा 'आदिताल' कुणी वाचलाय? तोल गेलाय त्यांचा त्यात!

March 21, 2009 10:34 PM

Post a Comment