(आजची (वास्तविक रोजचीच) समस्त पत्रे पाहून आम्हांस एक प्राचीन कहाणी आठवली. आपल्या प्राचीन लोककहाण्यांमध्ये जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान भरलेले असते असे आमच्या सरोजिनीआज्जी बाबर म्हणायच्या. ते खरेच आहे. कारण की या कहाणीत आम्हांस आजच्या वृत्तजीवनाचे समग्र सार पाहावयास मिळाले. वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो, सादर आहे हर (पक्षी - प्रत्येक) वारची कहाणी.)
एक होतं नगर. तेथे होता एक पेपर. पेपरला होता संपादक. संपादक मोठा हुशार. रोज हापिसात जाई. धनादेशी सह्या करी. मस्टरे तपासी. बातम्या पाही. बैठका घेई. कार्येक्रमी जाई. भाषणे करी. उद््घाटने करी. कचेरीतल्या प्रजेला मेमो देई. मालकापुढे म्यांऊ करी. संपादक कधी कधी लेखही लिही. रोज रोज ही कामे करी. एकटाच जीव. थकून जाई. एक दिवशी काय झाले, त्याने सगळी कामे केली. कामे करून खूप थकला. तेव्हा त्याने विचार केला. संध्याकाळी सदनिकेस गेला. सदनिकेत होती त्याची बायको. तिला मोठे नवल वाटले. एरवी येतात रात्री आठला. आज सहाला कसे आले. आले घालून चहा केला. संपादकांच्या हाती दिला. काळजीने पुसले, का हो राव, बरे नाही का. संपादक बुद्धिनिष्ठ म्हणाले, निवडणूका लागल्यात. जबाबदारी पडते. सगळ्यांस कामास लावावे लागते जाहिरातींच्या. म्हणून थोडा शिणलो. लवकर घरी आलो. असे म्हणून संपादक सोफ्यावर विसावला. चहा घेतला. नास्ता घेतला. मग रात्री अंमळ भोजन केले. जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या. मग तो पलंगी गेला. पलंगासमोर होता टीव्ही. संपादकाने टीव्ही लावला. त्यावर लावली वृत्तवाहिनी. वृत्तवाहिनीवर होती बातमी. बातमी होती कोंबडीची. चार आण्याची कोंबडी तिला रुपयाचा मसाला. संपादकाने बुद्धिनिष्ठ विचार केला. म्हणाला, ही कसली फालतूची बातमी. मग त्याने लावली दुसरी वृत्तवाहिनी. तिच्यावरपण हीच बातमी. मग त्याने लावली आणखी दुसरी वृत्तवाहिनी. तिच्यावरपण हीच बातमी. सगळ्या वाहिन्या लावून पाहिल्या. सगळीकडे कोंबडीचीच बातमी. चार आण्याची कोंबडी तिला रुपयाचा मसाला. संपादक विचारात पडला. ही मोठीच महत्त्वाची बातमी. मग त्याने काय केले. बुद्धिनिष्ठ निर्णय घेतला. कचेरीला दूरध्वनी केला. कचेरीत होता चिफ्सब. संपादक म्हणाला, चिफ्सब चिफ्सब, आज काय विशेष? चिफ्सब म्हणाला, विशेष असं काही नाही. अमुक अमुक बातमी आहे अन् तमुक तमुक बातमी आहे. संपादक भडकला. कोंबडीची बातमी माहित नाही. कामे करता की हजामत करता. मग तो चिफ्सबला म्हणाला, कोंबडीची बातमी कुठंय. चिफ्सब गडबडला. चिफ्सब गोंधळला. म्हणाला, तशी बातमी आली नाही. संपादक म्हणाला, एवढं समजत नाही साधं. उद्या पहिल्या पानी सगळीकडे येईल. बातमी करून घ्या. पहिल्या पानी मोठी करा. चिफ्सब सटपटला. मग सावरला. टीव्हीवरून बातमी केली. चार आण्याची कोंबडी रुपयाचा मसाला. त्यात पदरचा मसाला घातला. काही कोट घातले. काही बॅक्ग्राउंड घातले. बातमी सजवली-धजवली. पहिल्या पानी छापली. दुस-या दिवशी गंमत झाली. सगळ्या पेपरांत तीच बातमी. संपादक खुश झाला. चिफ्सब खुश झाला. वितरणवाले खुश झाले. सगळ्या वृत्तवाहिन्यासुद्धा खुश झाल्या. त्यांना आज हुश्श वाटले. काल त्यांना वाटले चार आण्याची बातमी तिला रुपयाचा मसाला घातला. आपण हे काय केले. आज त्यांना वाटले, सगळ्यांनीच बातमी लावली. म्हणजे बातमी मेजर होती. तेव्हापासून वृत्तनगरीत हीच रीत झाली. वाहिन्या चार आण्याच्या कोंबडीला कितीही रुपयाचा मसाला घालू लागल्या. पहिल्या पानाच्या बातम्या वाहिन्याच ठरवू लागल्या. प्रजेला मसालेदार बातम्या मिळू लागल्या. वाहिन्यांचा टीआरपी वाढला. पेपरांचा खप वाढला. सगळा आनंदीआनंद झाला. अशी ही हरवारची कहाणी दहा पानी सुफळसंपूर्ण.
(Posted by बापू आत्रंगे, दि. ०७ मार्च २००९)
14 comments
Khalaass! Bhatti Jamli Bapu.
वा बापू लई झकास..
खरं सांगायचं तर कोंबड आधी का अंड? असा हा मामला आहे. आधी पेपरवाल्यांनी सणसणाटी दिली म्हणून चॅनलवाले सुरू झाले. आता चॅनलवाले देतात, म्हणून पोपरवाल देऊ लागले... बरं झालं सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं.
बाबूराव
वा बापू लई झकास..
खरं सांगायचं तर कोंबड आधी का अंड? असा हा मामला आहे. आधी पेपरवाल्यांनी सणसणाटी दिली म्हणून चॅनलवाले सुरू झाले. आता चॅनलवाले देतात, म्हणून पोपरवाल देऊ लागले... बरं झालं सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं.
बाबूराव
वा बापू लई झकास..
खरं सांगायचं तर कोंबड आधी का अंड? असा हा मामला आहे. आधी पेपरवाल्यांनी सणसणाटी दिली म्हणून चॅनलवाले सुरू झाले. आता चॅनलवाले देतात, म्हणून पोपरवाल देऊ लागले... बरं झालं सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं.
बाबूराव
वा बापू लई झकास..
खरं सांगायचं तर कोंबड आधी का अंड? असा हा मामला आहे. आधी पेपरवाल्यांनी सणसणाटी दिली म्हणून चॅनलवाले सुरू झाले. आता चॅनलवाले देतात, म्हणून पोपरवाल देऊ लागले... बरं झालं सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं.
बाबूराव
काय बापू, कुठला विषय घेतलात. अशी टीका करायला लागलात, तर पेपर काढणे बंद होईल. बरं जाऊ द्या, आयबीएन वागळेंच्या गमतीजमती कोणीच सांगत नाही हल्ली, त्यांच्या च्यानेलवर ट्रेनी विमान कोसळते बरं का, आणि त्याला प्रतिवाद करायचा नाही. नाहीतर ग्रेट भेट मध्ये बोलावतात.
वा...बापू.. खूप दिवसांनी इतक्या झकास लेखनाचा आनंद मिळाला. वृत्तवाहिन्यांवर टीका करताना आपण प्रिंटमध्ये काय करतो आहोत आणि कुठे जातो आहोत, याची जाण आणि भान जपणे मालकाच्या नव्हे तर काम करणाऱ्या पत्रकारांच्या हाती आहे. त्यांची जाणीव जागृत ठेवणे, अत्यावश्यक आहे. वाहिन्यांच्या मागे पत्रकारिता भरकटत जाता कामा नये, कारण वाहिन्यांचा उद्देश प्रेक्षकरंजन असतो तर वृत्तपत्रे वाचली जातात ज्ञानवर्धनासाठी. मनोरंजन हे ज्ञान कधीच होऊ शकत नाही. मुद्रित माध्यमांनी आपली ही ओळख जपायलाच हवी.
छानशा शैलीत ही कहाणी सांगितलीत. ती सफल संपन्न व्हावी, ही इच्छा.
- केशव कुंथलगिरीकर
त्यापुढची कथा अशी. मसालेदार कोंबडी लोकांना रोज मिळू लागली. सगळीकडे तीच कोंबडी आणि तोच मसाला. खाऊन खाऊन लोकांची पोट आणि डोकी बिघडली. काही दिवसातच धंदा पार चौपाट होऊन गेला. मोठे हॉटेल वाले काशेबशे तगळे कारण ते "Breaking" कोंबडी तरी देत होते. शिळ्या कोंबडिवाळ्या ट प्रया मात्र पार आइतिहासिक होऊन गेल्या ! ईश्वर मृता कोंबड्यना शांती देवो.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
-
►
January
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

