स्टार-ए-आझम राजीवजी खांडेकर यांचा लोकसत्तेच्या लोकरंगातील लेखमाझाचे नाव 'न्यूज चॅनेल पाहायला शिका!' असे असल्याने बहुसंख्याकांचा ऐसा समज झाला, की हे काहीतरी अभ्यास माझा वा तत्सम प्रकरण असावे! त्यामुळे अनेकांनी हा लेखमाझा ढॅण्टॅढॅणप्रमाणे नुसताच नजरेखालून घातला!
वास्तविक तो वाचणे गरजेचे होते. कारण की अखेर आपल्या सर्वांच्या (म्हणजे बालबुद्धीची नवशिकी पोरंसोरं, पांडित्याची झूल पांघरलेले विद्वतजन, स्वयंघोषित विचारवंत, रांगणारी बाळे, सतत रेकून आरोप करणारे, अपप्रचारक, बघे प्रेक्षक, अज्ञानमूलक आरोप करणारे, २६-११ चे विषण्ण वातावरण असताना गुटख्याची पाकिटे तोंडात रिकामी करून पचापचा थुंकत खांद्यावरच्या पोराबाळांना वो देखो फायरिंग हो रहा है, वो देखे आग लगा दी असे कौतुकाने दाखविणारे आदीकरून समस्तांच्या) अकलेचा उद्धार करण्यासाठीच तर रा. रा. राजीव खांडेकरांनी हा लेखप्रपंच मांडला होता. अन्यथा त्यांस का अन्य (म्हणजे अँकरमाझांची वटवट ऐकून दिवसातून अनेकदा आपुल्या कपोली आपुला हात मारून घेणे वगैरे) कामे नाहीत? परंतु समाजप्रबोधन हा तर पत्रकाराचा बाणा असे. या बाण्यास स्मरूनच मागे एकदा राजीवश्रींनीच च्यानेलांस कुटकुटकुटणारा लेख लोकसत्तेतच लिहिला होता म्हणे! परंतु तेव्हा त्यांस च्यानेलवाल्यांच्या अकलेच्या उद्धाराची फिकीर होती. आता त्यांस प्रामुख्याने पेपरांतून लिहिणा-यांच्या उद्धाराची काळजी आहे! राजीवश्रींचे हे कसब, ही लेखनहुन्नर वाखाणण्यासारखीच म्हणावी लागेल!
तेव्हा आता वाचकहो, गपगुमान उघडा डोळे आणि पाहा नीट, की राजीवश्रींचे कैसे लिहिणे, कैसे युक्तिवाद करणे, कैसे शहानिशा करणे वगैरे वगैरे...
आपुल्या लेखमाझात राजीवश्री पहिल्याछूट वृत्तवाहिन्यांवरील पहिल्या आक्षेपाचा खमंग समाचार घेतात. ते स्पष्टच सांगतात, की "...न्यूज चॅनेलवर त्याच त्याच बातम्या पुनःपुन्हा दाखविल्या जातात. खरे तर हा आरोप अत्यंत तकलादू आहे. चोवीस तासांचे न्यूज चॅनेल चालवणा-यांनी प्रत्येक मिनिटीला नवी बातमी द्यावी अशी अपेक्षा बाळगणेच मुळात बाळबोधपणाचे आहे." वास्तविक पाहता नव्याने आलेल्या प्रेक्षकालासुद्धा त्यावेळेपर्यंतच्या बातम्या समजल्या पाहिजेत, या निरपेक्ष भावनेनेच न्यूज चॅनेल त्याच त्या बातम्या दाखवित असतात! केवळ त्याच त्या बातम्याच नव्हे, तर एकाच बातमीत एकच दोनपावणेदोन सेकंदी दृश्य पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा दाखवित असतात!
बरे या बातम्या तरी कशा असतात राजे हो! तर "हजारो बातम्यांमधल्या निवडक"! या निवडकपणाची व्याख्याही राजीवश्रींनी तेथेच कंसात करून टाकलेली आहे. ते सांगतात, की "ज्या आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत किंवा ज्या बातम्या पाहायला आपल्याला आवडतील अशा मोजक्याच बातम्या टीव्हीवरून दाखविल्या जातात." म्हणजे उदाहरणार्थ श्रीयुत मिकाजी यांनी श्रीमती राखीताई सावंत यांचे चुंबन घेतल्याची ब्रेकिंग न्यूज. टीव्हीवरून ती दाखविली जाते की नाही? बरे दाखवायची, तर ती एकदाच दाखवून कसे बरे चालेल? बघे प्रेक्षक काही वेळ ठरवून येत नाहीत. तेव्हा आल्याक्षणी त्यांना ते दृश्य दिसले पाहिजे. बरे फक्त एकदाच ते दृश्य दिसून कसे चालेल? तेव्हा ते पुन्हा पुन्हा दिसले पाहिजे. त्याशिवाय का वाचकांचा माहितीचा अधिकार पूर्ण होईल? व "प्रेक्षकाला चॅनेल लावल्या क्षणी खिळवून ठेवण्याची चॅनेलांची कर्तबगारी" सिद्ध होईल?
आता तुम्ही बालबुद्धीचे बघे प्रेक्षक वा रांगणारी बाळे असाल, तर तुम्हांस हा युक्तिवाद पटणारच नाही. तुम्ही म्हणाल, की एकच बातमी पुन्हा पुन्हा दाखविणे आणि एका बातमीत तीच ती क्लिप सतत दाखविणे आणि सांगण्यासारखे काहीही उरलेले नसतानाही तीच ती बातमी ताणताण ताणणे व प्रवाचकांनी शिरा ताण ताण ताणून बोलणे यांस तुमचा आक्षेप आहे. परंतु मित्र हो, तुम्ही स्वयंघोषित विचारवंत वगैरे असल्याने मुळातच तुम्हांस न्यूज चॅनेल कसा पहावयाचा, हेच ठावके नाही. तेव्हा मिलॉर्ड, राजीवश्रींनी उपस्थित केलेले तमाम मुद्दे मद्देनजर रखते हुए हे सर्व आक्षेप तद्दन भंपक व अज्ञानमूलक आहे, असेच आम्ही मानतो!
यानंतरचा दुसरा आक्षेप आहे, तो थिल्लरपणाचा. या आक्षेपारोपावर लिहिताना जणू राजीवश्रींच्या हाती लेखणी नसून केरसुणीच होती. "२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर तर रांगणारी बाळेसुद्धा चॅनेलवाल्यांना शहाणपणाचे डोस देत फिरु लागली आहेत," असा संतापमाझा व्यक्त करीत त्यांनी या रांगणा-या बाळांना चॅनेलविद्येचा पोलिओ डोसच दिला आहे. "धादांत खोटी विधाने आणि तद्दन भंपक आरोप" केल्यावर कोणीही संतापणारच! आपण नाही का, वृत्तवाहिन्यांवरील धादांत खोट्या बातम्या आणि तद्दन भंपक कार्यक्रम पाहून संतापतो! तसेच हे!!
पुढे पुढे तर राजीवश्रींना या संतापाचा ताप एवढा चढला, की त्या भरात ते चक्क "आपल्या मीडियाचे सगळेच बरोबर असते किंवा आहे, असे नाही. अजूनही उत्साहाच्या भरात काही चुका होऊन जातात," अशी कबुली देते झाले! त्यांचा संतप्तसवाल एवढाच, की चुका होतात, "पण म्हणून त्यांना किती बदडून काढायचे, याला काही मर्यादा?" हे बरीक बरोबर आहे! आम्हांस तर असे सुचते, की कोणत्या चुकीला किती बदडावे याचे काही तरी कोष्टक वा इंडियन च्यानेल कोड तयार करावयास हवे! दुसरी गोष्ट म्हणजे, च्यानेलांवर कोणी टिका करावी, याचेही काही मापदंड बनविले पाहिजेत. राजीवश्री लिहितात, की "त्या तीन दिवसांच्या काळात किंवा नंतरही सुरक्षा यंत्रणांनी मीडियाच्या भूमिकेविषयी कसलीही प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेली नाही. टीकेचा खळखळाट सुरू होता, तो या सगळ्याशी ज्यांचा कसलाच संबंध नव्हता, अशी काही बघ्या प्रेक्षकांचा." हे अगदी व एकदम योग्य आहे! बघ्या प्रेक्षकांनी फक्त पाहावे! तुमचा काही संबंध असतो का बातम्यांशी? मग टीकेचा खळखळाट का बरे करता? राजीवश्रींनी येथे जो वैश्विक सत्याला हात घातला आहे, त्याने तर आम्हांस साक्षात् देवमाझाच आठवला! सामान्य जन्ता व आजकालचा मीडिया यांचा तसा काही जैविक संबंध राहिलेला नाही, हे आजकालचे सत्य संपादकाच्या केबिनीतून राष्ट्रापुढे मांडावयाचे म्हणजे काही टीव्हीवर फोनो द्यायचे काम नाही! त्यास हिम्मतच पाहिजे!!
बरें, ही कशाशीही संबंध नसलेली, बघे प्रेक्षक वगैरे रांगणारी बाळे नेहमीच इलेक्ट्रॉनिक मीडियाशी प्रिंट मीडियाची तुलना करतात. असा बाऊंसरमाझा आला, की आमुचे टीव्ही पत्रकार ब-याचदा बचावात्मक पवित्रा घेतात. अशा समरप्रसंगी टीव्ही पत्रकारांस गाण्डीवं संस्त्रते हस्तात् अशी स्थिती येते! परंतु या लेखोपनिषदातून राजीवश्रींनी जो गीतोपदेश केला आहे, त्यामुळे आता कोणत्याही टीव्ही पत्रकारास बूम टाकून पळण्याची वेळ येणार नाही! शिवाय "हल्लीचा प्रिंट मीडिया हा फार जबाबदारीने वागतो, असे म्हणण्याची सध्या तरी सोय नाही," असा पांचजन्य फुंकून राजीवश्रींनी या "पळपुट्या युक्तिवादा"तील हवाच काढून टाकली आहे, हे मान्यच करावयास हवे! कारण की इकडे जर इंड्या टीव्ही असेल, तर तिकडे वार्ताहर-पुण्यनगरी असतो व इकडे आयबीएन-वागळे असेल तर तिकडे सामना-प्रहार असतो, हे तर आपण पाहतोच!!
आपुल्या लेखमाझाच्या शेवटाकडे जाता जाता राजीवश्रींनी एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात, "ही (पक्षी - चॅनेलची) गुणवत्ता आणखी वाढली पाहिजे, हे नक्कीच. आपली चॅनेल्स आणखी प्रगल्भ झाली पाहिजेत, हे खरं." आता एवढं सगळं खरंखरं सांगितल्यावर ते पुढे म्हणतात, "पण त्यासाठी आपल्या प्रेक्षकांनीही टीव्ही चॅनेल्स कशी बघावी, हेही शिकलं पाहिजे."
या संपूर्ण च्यानेलबचाव-लेखातील, आमच्या कुपोषित मेंदूस न पचलेला मुद्दा आहे तो हाच. विचार करून करून आमुच्या मेंदूतील तमाम करड्या पेशी खतम झाल्या, किंतु आम्हांस हे समजले नाही, की प्रेक्षकांनी च्यानेल कसा पाहावा यावर च्यानेलांची प्रगल्भता कशी बरे अवलंबून आहे?
हे म्हणजे असे झाले, की प्रेक्षक गुटखा खावून पचापचा थुंकत काहीही बघतात म्हणून च्यानेले त्यांना तेच दाखविणार! किंतु मग च्यानेलांच्या जबाबदारीचे काय?
आणि प्रेक्षकांनी च्यानेल कसा पाहावयाचा याचे ज्ञानग्रहण करण्यासाठी कोणत्या विद्यापीठी जावे, अशी राजीवश्रींची अपेक्षा आहे?
स्टारमाझा 'च्यानेल पाहण्याची शाळा' वगैरे काढणार असेल, तर मात्र आमुचे काहीच म्हणणे नाही.
या विद्यालयात एक वर्ग 'च्यानेल कसा काढावा' याचाही असला म्हणजे झाले!
(Posted by बापू आत्रंगे, दि. ७ फेब्रु. २००९)
12 comments
रा.रा. रा. खांडेकरजी,
आपल्या लेखमाझेबद्दल धन्यवाद. आता आम्ही खरंच च्यानेल कसा पाहावा हे शिकलो आहोत. स्टार माझा हे एक न्यूज च्यानेल आहे, असं आम्ही समजत होतो. पण आता तुमच्या शिकवणीनंतर आम्ही त्याकडे एक निखळ मनोरंजनात्मक च्यानेल म्हणून पाहतो. एकवेळ आम्ही सारेगमप लिटल चॅम्प्स चुकवू, पण भान हरपायला लावणाऱ्या तुमच्या ‘दहा’च्या बातम्या मात्र चुकवत नाही. तुमच्या लेखानंतर आम्ही साम मराठीही नव्याने पाहायला शिकलो आहोत. आता आम्ही त्याकडे ‘आस्था’च्यानेलची आत्मसंतुलित मराठी आवृत्ती म्हणून पाहतो.
अज्ञानमूलक आणि बघ्या प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल आपले शतशः आभार.
खांडेकर मास्तरांनी आम्हास्नि चॅनल पाह्या शिकवण्यास सुर्वात केली..बरं वाटलं. आता त्यांच्या चॅनलात मराठीचा होत असलेल्या बट्ट्याबोळाबद्दल कुणास्नी इचारणा करावी, असा आमाला सवाल पडतो. - ना. ना. ढंगे
चॅनल माझा पाहाल तर
अशी दावीन बाईट;
झटक्यामध्ये विरुन जाईन
सारी तुमची आईट...
कशी वाटली कविता माझी ?
- कवी दूषण
राजुभौ, च्यानेल पाहण्याचा क्लास काढायचा असेल तर आम्ही पार्ट्नरशिपसाठी तयार आहोत. आपण महाराष्ट्रात सर्वत्र शाखा काढू. आणि दहावी-बारावीचे गुणवन्त जसे विकत घेतो, तसे चॅनेल पाहणारे विकत घेऊ. कसा जबरा धंदा आहे? लै चालेल.
हे भंकसराव कोण हो. पठ्य्ा मुंबईतला दिसत नाही... पण लिहितो चांगले बर का? बापूंचा शिष्य की काय? वा बापू लगे रहो......
उ. चा. पती
बरे झाले आपण राजश्रींचा बरा समाचार घेतला. हा लेख वाचल्यानंतर मी वैतागलेलोच होतो
बापू... आपके सामने कैसा वाकू? नमस्कार करने के लिए...आपने बडा अच्छा काम किया. किसी ना किसी को तो ये काम करनाही था. द्रौपदीरूपी प्रिंट का वस्त्रहरण खुले आम किया जा रहा था और सारे देखते रह गये थे... बापू तुम तो किसन कन्हैया निकले. और हम सब नकुल और सहदेव... लानत है ऐसी जिंदगानी पर. लड बप्पू! बढिया. आपने लाज बचायी.
Bapu!
Mast! Pan SAAMNA ani VAGALE yanchyashi 'Prahaar'chi tulanaa kashaasaathi! Tumhi 'Prahaar' vachat asaal tar to yaa marathi patrkaaritya-ratnanpeksha vegala ahe, hey lakshaat yeil.
प्रहार माझा, शहाणा राजा! वेडा रे वेडा, अशी तुलना मनावर घ्यायची नाही. सगळे जण आपल्या पगारावर जळतात. आपण चॅनेल पाहायला शिकवण्याचे क्लासेस आल्हादजींना घ्यायला सांगू या. आल्हाद गोडबोले - वर्गशिक्षक, माचकर मास्तर - सुपरिटेंडंट आणि नारायणराव राणे - हेडमास्तर
हार्ट टू हार्ट कोचिंग क्लासेस
संचालक - आजीव मान्डेकर
(आशाकुना - अर्थात आमची शाखा कुठेही नाही)
कारपोरेट कचेरी - फेमस स्टुडिओ
शी ! क्षक - बालवाडीतील नेहमीचे यशस्वी.
अतिथी प्रोफेसर - सुमार केतकर, ड्रिंकर रायकर, परत कुमार राऊत, ठोकठोक राऊत, मल्टी कुमार लाटकर, खिळखिळवागळे,
ये माजी गार्सियावाले व इतर...
मी पण एक न्युज चॅनलचा सो कॉल्ड पत्रकार आहे .एक गोष्ट मनातली सांगतो .....आम्ही धंदा करतोय..कधी कोणाच्या आनंदाचा ,कधी दुखाचा तर कधी धंदा शहीदांचा...लाज वाटते मला भारतीय चॅनेल्सची....सगळ्या जाणीवा मेल्यात..
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

