हे दिवस वस्तुतः हर्षोल्हासाचे वगैरे नाहीत. रोजगाराची शाश्वती नाही. आपल्याच डेस्कावर इतुके दिन काम करणारा सहकारी. एक दिवस अचानक कुजबुज सुरु होते, की तो गेला! ऐसा कठिण समय पातलेला आहे. तशात वास मारणा-या खोबरेल तेलासारखे वेतन गोठलेले आहे. पत्रोपत्री सार्वत्रिक सुतकपर्व सुरु आहे. अशा काळी कोणास बरे भरली अवनी मोदाने असे वाटले?
परंतु तुम्हांस सांगतो, आमच्या मनीचा मोगॅम्बो सध्या अत्यंत खुश आहे! आमच्या बरगड्यांमध्ये आनंद मावेनासा झालेला आहे! गालफडांमध्ये हसूचे मळे फुलले आहेत!
याचे कारण म्हणजे ब्लॉग!
माय मराठीच्या पत्रदरबारात सध्या जी ब्लॉगची बाग फुलेलेली आहे, ती पाहून आमची छाती सहर्ष फुगली आहे.
तसे पाहता मराठी पत्रकारांचे तंत्र ज्ञान अगाध! अनेकांच्या दृष्टीने संगणक आणि गोदरेजचा टैपरायटर यात फरक असा नाहीच. इंटरनेट म्हणजे तो केवळ सुरस आणि चमत्कारिक साईटा पाहण्याचे माध्यम! परवा म्हणे रा. रा. सुरेश्चंद्र पाध्ये, रा. रा. राजीव साबडे, रा. रा. वसंत भोसले, रा. रा. जयंत महाजन आदी करून सकाळपत्राचे पुष्कळ संपादक (आमच्या लेखात ही सकाळ सारखी सारखी का बरे उजाडते? याकारणें लोक आम्हांस हल्ली सकाळवाला ऐसे चिडवू लागले आहेत!) पुनवडीच्या अप्पा बळवंत चौकात वणवणत होते. कुठल्याशा पुस्तकाच्या शोधात साताठ संपादक ऐसे ते मोठे विलोभनीय दृश्य पाहून कोणी चौकशी केली, की संपादकमहोदयहो, आपण ऐशा कोणत्या बुकाच्या शोधात आहात? तेव्हा रा. रा. जयंत महाजन रागेजून बोलले, की काय हे तुमचं पुणं? आमच्या मराठवाड्यात नवनव्या पुस्तकांचा कायम अनुशेष म्हणून इथं पुण्यात आलो, तर इथल्या बुकभांडारातही पुस्तक मिळेना! आणि म्हणे पुणं तिथं काय उणं! तेव्हा पुसणाराने पुसले, की किंतु तुम्हांस कोणते बुक हवे आहे? त्यावर ते सर्वे म्हणाले, फेसबुक!! साक्षात हिंजवडीनजीकच्या पुनवडीत संगणकसाक्षरतेची अशी परिस्थिती! अर्थात चूक त्यांचीही नाही. सकाळपत्राचे तंत्रप्रेमी (तंत्रप्रेमी म्हणजे तंत्रज्ञानाची आवड असलेले. वास्तुशास्त्र, यज्ञयाग आदी तांत्रिक कर्माची आवड असलेले नव्हे!) मालक रा. रा. अभिजीत पवार यांनी मध्यंतरी एक जीआर काढला होता, की सकाळमधील सर्व पत्रकारू-नारूंनी फेसबुकावर यावे. त्याचा हा परिणाम होता! सकाळमध्ये ऐशी स्थिती तो आमुच्या लोकसत्तेत काही वेगळीच गंमत. परवा लोकसत्तेत (अखेर एकदाचा) युनिकोड दाखल झाला. तेव्हा तो युनिकोड असतो कसा, दिसतो कसा, बोलतो कसा हे याचि डोळां पाहण्याकरीता रा. रा. कुमार केतकर यांच्या केबिनीत पत्रकारूंची ही गर्दी झाली होती! त्यांस वाटले, युनिकोड म्हणजे युनिकॉर्न गेंडाच जणू!!
तर मुद्दा असा, समस्त पत्रसृष्टीत ऐशी व्यापक मंदी असतानाही ब्लॉगचे पिक मात्र जोरात आलेले आहे. ज्यांचा कोणास संशयही आला नसता, अशा पत्रपंडितांनीही धादांत ब्लॉग तयार केले आहेत. तुम्हीच सांगा, 'राज'-मान्य राजेश्री राजू परुळेकर यांचा ब्लॉग असेल, असा संशय तरी तुम्हांस आला होता का? किंवा रा. रा. प्रशांत दीक्षित (स्त्रोत - सकाळ) यांनी ब्लॉगस्थळ तयार केले असेल, असे तुम्हांस स्वप्नी तरी दिसले होते काय? किंतु या दोन्ही पत्रमूर्तींचे ब्लॉग आहेत. झालेच तर म्हाराष्ट्रटैम्सच्या संकेतस्थळी ब्लॉग आहेत. अलिकडेच ई-सकाळने लाली-पावडर-नखपॉलिश लावली! (ते पाहून अनेकांनी ईssssसकाळ म्हटले, तर अनेक त्यावर भाळले!) तर या नव्या मेकपातल्या ई-सकाळमध्येही ब्लॉग आहेत.
पूर्वी कोणी चुकूनमाकून ब्लॉग लिहिण्याचे अत्यंत धाडशी कृत्य केले, की त्याचे हितचिंतक म्हणत, काय, हल्ली हापिसात काम नसतें वाटतें! ब्लॉगिंग म्हणजे रिकामपणाचे उद्योग ऐसाच बहुतांचा समज! किंतु आता दिवस फिरले आहेत. (ई-सकाळवरील कन्वहर्जन्सवाले आमले (पक्षी - रा. रा. रवी आमले) यांचा सचित्र सटिक ब्लॉग पाहून तर नक्कीच वाटावे, की दिवस फिरले आहेत! ते पाहून कोणासही ऐशी जाणीव व्हावी, की म्हणजे काहीही लिहिले की जे काही होते त्याचे नाव ब्लॉग!! असो.) या फिरलेल्या दिवसांचे श्रेय मराठी पत्रसृष्टीपुरते तरी आमचे गुरुवर्य प. पू. विसोबा खेचर यांस द्यायला हवे! पूर्वीही मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज असत. परंतु प. पू. खेचरांच्या लेटअसभंकसमुळे ब्लॉग्ज ही वाचण्याची, चर्चेची चीज असते हे पत्रसृष्टीत मान्य झाले! तेव्हा मराठी पत्रसृष्टीतील ब्लॉग्जच्या लोकप्रियतेचे मोरपीस खेचरांच्या आयाळीतच खोचले पाहिजे! (याबाबतचे सर्व वाद मुंबई न्यायालयाच्या क्षेत्रात येतील, याची समस्तांनी नोंद घ्यावी.)
तथापि आम्हांस वाटते, की अद्यापही खूप ब्लॉग्ज येणे बाकी आहे. परवा हिंदुस्तानटैम्सची कळते-समजतेमधील बातमी वाचली आणि आम्हांस ऐसे हार्दिक वाटले, की मराठीतील कितीएक थोरथोर पत्रपंडितांचे ब्लॉग्ज येणे अद्याप बाकी आहे. हिंदुस्तानटैम्सचे मोजून १५ (अक्षरी पंधरा फक्त.) संपादक ब्लॉग लिहू लागले आहेत. आता पत्रसृष्टीच्या परंपरेनुसार जे इंग्रेजीत येते ते कालांतराने मराठीत आलेच पाहिजे! जसे की आधी इंग्रेजीने पत्रांतील कॉलम कमी केले. मग ते मराठीत आले. इंग्रेजीने पत्रकागदाची लांबीरुंदी कमी केली. ती मराठीत आली. इंग्रेजीने तृतीयपर्णी पत्रकारीता सुरु केली. मराठीने ती डोईवर घेतली. या रीतीरिवाजानुसार आता इंग्रेजी संपादक ब्लॉग्ज लिहितात म्हटल्यावरी, मराठीतील संपादकांनीही ते काम करावयास हवे. यामुळे किमान संपादकांस बाळबोधीत लिहिता येते हे तरी समस्तांस कळेल.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
लौकरच आम्ही यामिषाने काही मराठी एडिटरांस भेटणार आहोत. त्या भेटीचा वृत्तांत आपणांस ब्लॉगवरून सादर करूच...
तोवर बाय बाय.
हॅपी ब्लॉगिंग!
(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ जाने. २००९)
5 comments
Bapu, je lok blog lihitat te ofice chya velat kiti lihitat, ofc chya computercha vapar kiti jan kartat he kalaayla pahije.
Karan Ya extra curiculum activities ofc vyatirikt karaychya aahet, Hi vyavasayik neetimatta jara smjun sanga sambandhit key board(BORU) bahaddarana.
वा बापू वा एका नवीन पत्रकारितेकडे लक्ष वेधले... सध्या जसा पत्रकार दिन सजरा करतात तसा भविष्यात ल्बाॅगर दिन साजरा होईल. मराठीतील आद्य प्रत्रकार म्हणून बाळशास्त्रींप्रमाणे विसोबा खेचरांचे नाव घेतले जाईल. पहिले ब्लाॅगपत्र म्हणून कळते-समजते चे नाव येईल. आणि ही संकल्पना मांडल्याचे श्रेय अर्थातच अस्मादिकांच्या नावे पडले. असो तो दिन दूर नसावा. तमाम पत्रसृष्टीची ब्लाॅग सृष्टी होऊन जाईल. ब्लाॅगचे मळेच्या मळे फुलतील अशी अपेक्षा करून थांबतो.
भंकस
ब्लॉग लिहित असताना मला तर अनेकदा लोक विचारत, की ऑफिमध्ये हेच काम करता का म्हणून. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पत्रकारांनी ब्लॉगची नोंदणी करून यथावकाश त्याबद्दल विसरून गेलेले पाहिले आहे. शेवटी पत्रकारांचा हात लिहिता पाहिजे, हे खरे. मात्र खरोखर सर्व लिहितात का किंवा लिहू शकतात का, हा कळीचा मुद्दा आहे.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
▼
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
▼
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

