वठलेल्या बाभळीवर हिरवट काटे उगवावेत, गुलमोहराच्या तुकतुकीत फासळ्या हिर्व्या पानांनी लगडून जाव्यात, सामनाची गच्चकाळी पाने प्रहारसारखी सुटसुटीतसुंदर दिसावीत, असे काहीसे आज वृत्तपत्रांच्या कचे-या-कचे-यांतून दिसत आहे. बघा बघा, कितीएकांचे चेहरे आज कसे टवटवीत दिसत आहेत.
प्रत्येक मराठी पत्रात किमान एक तरी 'स्वानंद किरकिरे' (पक्षी - सतत किरकिर करून आनंद मिळविणारा) असतोच! कुंथता हृदय हे, ही त्यांची जन्मखूण! पण आज ते सुद्धा हासताना दिसत आहेत. अनेकांच्या मांड्या-पोट-या दुखत आहेत. कुणी स्वतःबरोबर कचेरीत डोके आणलेले आहे. ते किंचित ठणकत आहे. (मध्यंतरी कुठल्याशा पत्राने हॅंगोव्हरवरील कौटुंबिक उपाय छापले होते. ते वाचले नाहीत, दुसरे काय?)
पण तरीही सगळे छान व मस्त मनोवस्थेत आहेत. मोद विहरला चोहिकडे असेच तंतोतंत वातावरण आहे.

हे देवदुर्लभ दृश्य पाहून आम्ही तर अपार चक्रावून गेलो.
चौकशीअंती समजले, की हा दोन दिवसांच्या सुटीचा परिणाम आहे.
तसे पाहता आमच्या लोकसत्तेत, मटा ऑनलाईनीत एरवीही सप्ताहातून दोन दिवस सुटी असते. फायडेविक! तेव्हा त्यांना या सुटीचे काय कौतिक, असे कोणा संशयात्म्यास वाटेल. तथापि ही सुटी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याची दोन कारणे आहेत. अ) त्यातील एक दिवस समस्त पत्रकारांस सुटी होती. ब) वाचकांसाठी ही सुटी नव्हे, सुटका होती!

बातमीदाराचे बायलाईनकडे, उपसंपादकाचे आपल्याच पानात अधिक जाहिराती पडाव्यात, याकडे जसे लक्ष लागलेले असते, अगदी तसेच समस्त पत्रकारू-नारूंचे या सुटीकडे गत काही महिन्यांपासून ध्यान लागलेले होते. नोव्हेंबर-डिसेंबरात ठाण्याचे सोमणशास्त्री परंपरेनुसार समस्त पत्रांस पुढील सालातील सुट्यांचे पंचांग धाडतात. तेव्हाच अनेकांनी ही ऐतवारास जोडून आलेली गणतंत्रदिनाची सुटी मार्क करून ठेवली होती. कितीएकांनी तेव्हापासूनच या सुटीतील वेवस्थेचे नियोजन सुरु केले होते. विशेष म्हणजे प्रत्येक पत्राची अशा प्रकारच्या नियोजनाची एक पिढीजात पद्धत असते. लोकसत्तेत 'गोट'शोधमोहिम सुरु होते. सामनात उच्च पातळीवरून रिसॉर्टादींची वेवस्था केली जाते. मटा-सकाळादी पत्रांतून वर्गणीची चर्चा सुरू होते. अगदीच कडेलोट म्हणजे माथेरान, अलिबाग, वसई आदीकरूनच्या तीर्थस्थानांतील बातमीदारांशी संपर्क प्रस्थापित केला जातो. गत काही दिवस सर्वत्र हे सुरु होते.

आणि पाहता पाहता कालनिर्णयानुसार ऐतवारीच हा ऐतवार उजाडला
आणि काय सांगू महाराजा, समग्र शहर पत्रकारमुक्त झाले!
ऐतवारी सकाळीच कितीएकांनी इष्ट मित्रमैत्रिणींसह शहराबाहेर प्रस्थान ठेवले. कोणी पाणथळ प्रदेश गाठले, कुणी रानेवने गाठली, कुणी विश्रामस्थळे जवळ केली. आम्हांस आमच्या जन्मजात भोचकणातून नेमके कोण नेमके कोठे गेले याची जी गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून प्रहार, सकाळादीकरून पत्रांचे पत्रकार घोळक्याने गेले. कर्नाळा येथे रा. रा. नीलेश राणे यांची शेतीवाडी आहे. तेथे जाऊन प्रहारकरांनी कास्तकारी केली. सकाळचे बातमीदार बंधुभगिनी बदलापुर मुक्कामी गेले होते. तेथे त्यांनी जलक्रीडा केली. त्यांतील जे लिटिल च्याम्प होते, त्यांनी यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता वगैरे गीते म्हणत कंठाची साफसफाई केली. गंमत म्हणजे अगदी शनिवारपर्येंत मटाकरांचेही बारवी-बदलापुरी जाण्याचे घाटत होते. परंतु ते तिकडे गेलेच नाहीत. सकाळकर तिकडे जाणार हे बहुधा त्यांना समजले असावे! मटा, लोकसत्तादीकरून पत्रांतील पत्रकारू एरवीही स्वयंभू स्वतंत्र बाण्याचे असल्याने त्यांतील कितीएकांनी एकेकट्यानेच संचलन केले. यातही आमच्यासारखे काही जण होते, की ज्यांनी ही समस्त सुटी आपल्या गोधडीतच लपेटली. ती मंडळी खरी थोर!

तर अशाप्रकारे ओली व सुकी क्रीडा करून समस्तजन सोमवारी सायंकाळी वा रात्री स्वगेही परतले. सध्या या पौषसहलीचा आनंद पोटात त्यांच्या माईना अशी अवस्था आहे. तोच मोद समस्तांच्या चेह-यावर दिसत आहे.
आता आणखी काही दिवस त्याचेच कवित्व ठिकठिकाणी ऐकावयास मिळेल.
लोकांनी ते सांगण्यास आमची काही हरकत नाही. सांगावेच. निदान आम्हांस तरी सांगावे!
फक्त या पौषसहलीवर कोणी लेखबिख लिहू नयेत, एवढीच प्रार्थना.
ही पुरवण्यांच्या मलपृष्ठावरील प्रवासवर्णने आम्हांस मनःपूर्वक वात आणतात!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २७ जाने. २००९)

This entry was posted on 27.1.09 at 14:08 . You can follow any responses to this entry through the comments feed .

12 comments

Anonymous  

अरे काय हे.. पत्रकारू-नारु दमले की काय

January 27, 2009 8:11 PM
शाहीबाबा  

सहलीबरोबरच तीर्थस्थळी यात्रा करणारे पत्रकारही कमी नाहीत बापू... जरा शिर्डी, शिंगणापूर, त्र्यंबक मध्येही बरेच हाैसे येऊन गेले म्हणतात. शिरडीत तर व्हीआयपी आपससाठीही पत्रकारांची रांग लागली होती म्हणे.. त्यात सवर्च बाॅस लोक आल्याने स्थानिक पत्रकारांची सोय करण्यात मोठी धावपळ उडाली म्हणतात. विशेष म्हणजे अनेकांनी नियम मोडून असे पास देण्यास संस्थाला भाग पाडले म्हणतात. जनसंपर्क कार्यालयात तीन दिवस हीच धावपळ सुरू होती. त्याच्य बऱयाच सुरस कथा आता एेकू येऊ लागल्या आहेत.

शाहीबाबा

January 27, 2009 9:02 PM
shaibaba  

aapasasathi chya jagi v.i.p. pass sathi ase vacahev

shaibaba

January 27, 2009 9:04 PM
Anonymous  

नाही तरी पतरकार नियम पाळायसाठी कधी प्रसिद्ध होते? फुकट्या पासवर तर तुटून पजतात हे लोकं.

January 27, 2009 11:32 PM
Anonymous  

है बापू क्लायमेक्सला लय भारी बोल्लात.

मलपृष्टावरील प्रवासवर्णने ही वात आणणारीच असतात.लय म्हणजे लय...

आम्ही (म्हणजे मीच) लहानपणी ते पान फाडून ठेवायचो आणि घरी आईने बनविलेल्या पोळ्या गुंडाळून डब्यात भरताना जेव्हा ती पेपर शोधायची तेव्हा ते पान पुढे करायचो.

मला तरी आजवर त्या प्रवास वर्णनाच्या पानाचा

यापेक्षा चांगला उपयोग सापडला नाही.

-टोच्या बोबडे
(नुकताच प्रदीर्घ सहलीतून रिटर्न)

January 28, 2009 12:55 AM
Anonymous  

che he kahi tumhasi jamle nahi..
he far vachaniy zale nahi ase nahi ka bare vatat...(nahi ka bare vatTat aajkal tumahala).. tumhihi jaun ya ekda

sahal return....

January 28, 2009 8:30 PM
Anonymous  

हे म.टा. ऑनलाईन् वाले फ़ार इंग्रजी शब्द वापरतात बातम्यांत. आणि ब्राह्मण अधिवेशनाची टवाळी करून उगाच कुरापती काढणारे लेख लिहायचं सुरू केलंय त्यांनी गेल्या २ वर्षांपासून. ह्या दोन आगळीकींवर जरा त्यांचे कान टोचा तुम्ही बापू.

बाकी तुमचे लेख नेहेमीप्रमाणे लय् भारी!

January 29, 2009 5:03 AM

रा. रा. अनामवीरहो आणि शाहीबाबा,
कॉमेन्टांबद्दल मनापासून धन्यवाद.

रा. रा. शाहीबाबा,
नगर जिल्ह्यातील पत्रकारिता नावाच्या धंद्याची माहिती करून घेणे आता आम्हांस क्रमप्राप्तच झाले आहे. तुम्ही देताय ती माहिती मोठीच सुरस आणि चमत्कारिक आहे. धन्यवाद.

आमचे अनामवीर मित्र लिहितात - che he kahi tumhasi jamle nahi..
आम्हांसही हा लेख नंतर वाचताना तितकिशी मजा आली नाही. या लेखात आम्ही अ-सूर झालो हे खरे. ही चूक सुधारण्याचा प्रयत्न पुढच्या पोस्टी नक्की करू.
- बापू.

January 29, 2009 11:01 AM
Anonymous  

Bapu, ha kon baamangadi dukhavlay, mataa online walyani?

January 29, 2009 2:38 PM
Anonymous  

Bapu gadya, potarthi patrakar kantalale baba pratikriya dyayala..ase zale tar vichar manthan kase honar ?

January 30, 2009 9:24 PM
Anonymous  

EK VISHAY DETO. MHADA CHYA SANDARBHANE EKA RASHTRIYA DAINIKAMADHE SERIES SURU AAHE. TAR 10 % MADHU GHARE GHETANA KHOTE DAST KELELYA PATRAKARANCHI CAHUKASHI LAVTA YEYIL KAY ?
BOLA MITRAHO BOLA...

January 30, 2009 9:28 PM
Anonymous  

अहो जेथे काही संपादकांनीच दोनदोन फ्लॅट घेतले आहेत टेनपरसेंटमधून तेथे बिचारे पत्रकार काय बोलणार

January 31, 2009 1:19 PM

Post a Comment