आमच्या ब्लॉगएडिटरांचा फोन आला, की बापू आजारी आहेत, तेव्हा तूच एखादा लेख दे बातमीदारसाठी. ते ऐकल्यावर माझ्या पोटात खड्डाच पडला. मागे एकदा नाईन एक्स एम या वाहिनीवर लेख लिहिला होता. तेव्हा वाचकांनी त्याचे जे काही स्वागत केले होते ते माझ्या चांगलेच लक्षात होते. आधी मी नकोच म्हणाले. पण एडिटरसर कसले ऐकतात!
अखेर मी लिहायला बसले. परंतु विषयच सुचेना. तेवढ्यात, मागे एकदा बापू पुण्यात आले असताना त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा आठवल्या. कशावरून तरी वृत्तपत्रांच्या नावांवर आमच्या चर्चेची गाडी घसरली होती. त्यावेळी बापूंनी काही मनोरंजक माहिती दिली होती.

मराठीतली सुरुवातीची वृत्तपत्रे ही एतद्देशियांतील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठीच अवतरली होती. त्यामुळे तेव्हाच्या वर्तमानपत्रांची नावे ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानसिंधु, प्रभाकर, अरुणोदय, सूर्योदय, किरण, तमांतक अशी असत. केसरी, प्रतोद, दीनबंधू, शिवाजी, हिंदू पंच या वर्तमानपत्रांच्या नावांतूनच ती राजकीय वा सामाजिक सुधारणेच्या हेतूंनी प्रेरित असल्याचे स्पष्ट होते.

आजकालच्या जिल्हा किंवा तालुका पातळीवरील वर्तमानपत्रांची नावे पाहिली, की वाटावे ही वर्तमानपत्रे टाइम्स किंवा एक्स्प्रेसचीच भावंडे आहेत. बहुतेक पेपर एकतर वडगाव टाइम्स किंवा येडगाव एक्स्प्रेस असतात! बहुधा पेपर आणि कॉपी यांचे काहीतरी सनातन नाते असावे! टाइम्स या शब्दाचेच पाहा. वृत्तपत्र मालकांचे त्यावर काय प्रेम आहे न कळे! ब्रिटनमधल्या टाइम्सच्या नावाची कॉपी भारतातल्या टाइम्सने मारली. परंतु या भारतीय टाइम्सच्या नावाची मोहिनी आपल्या मराठीतल्या वृत्तपत्रकारांवरही मोठीच पडल्याचे दिसते. मराठीत १८६४ मध्ये शिवरामपंत परांजपे यांनी काळ हे वर्तमानपत्र काढले. त्याचे नाव हे तर टाइम्सचे शब्दशः भाषांतरच होते. केसरीतून बाहेर पडलेल्या नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नवाकाळ हे वर्तमानपत्र सुरू केले. शिवरामपंतांचा काळ, तर कृष्णाजीपंतांचा नवाकाळ! लंडनचा टाइम्स हा खाडिलकरांचा आदर्शच होता. उजव्या बाजूच्या पानावर अग्रलेख छापण्याची पद्धत नवाकाळने टाइम्सवरूनच उचलली होती. नावात काळ असलेले आणखी एक प्रसिद्ध दैनिक आहे. सकाळ.

सकाळ दैनिकाचे नाव हे त्याच्या मालकांनी, म्हणजे नानासाहेब परुळेकर यांनी ठेवले असले, तरी ते त्यांना सुचलेले नाव नाही. पुण्यात दैनिक सुरु करण्याची तयारी झाल्यावर या दैनिकाचे नाव काय असावे, यासाठी त्यांनी एक वाचकस्पर्धा घेतली होती. त्याची जाहिरात केसरीत प्रसिद्ध केली. हा प्रयोग अभिनव होता. त्यामुळे त्याची टिंगलही झाली, परंतु वाचकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. रा. के. लेलेंच्या इतिहासानुसार १२३२ जणांनी स्पर्धेत भाग घेतला. चार हजार नावे सुचविली. त्यातली काही अगदी मासलेवाईक होती. संजय, ओम, हार्ट ऑफ पूना, शिंग, कोकिळ, चंडोळ, राजहंस अशी काही नावे होती. काशिनाथ लक्ष्मण भिडे या विद्यार्थ्याने सकाळ हे नवा सुचविले होते. त्याला दीडशे रुपयांचे बक्षीस मिळाले. धुळ्याचे वकील भास्कर विनायक परांजपे यांच्या उद्या या नावाला ५० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. येथे प्रश्न असा पडतो, की सकाळ हेच नाव का निवडण्यात आले? बापू आत्रंगेंच्या मते, नावात काळ असल्यानेच हे नाव स्वीकारण्यात आले. याशिवाय त्याला दुसरे उत्तर व कारण नाही. टाइम्स हे वृत्तपत्र तेव्हाही गाजत होते, शिवाय पुणेकरांच्या मनात शिवरामपंतांच्या काळची स्मृती अजून जागृत होती. म्हणूनच सकाळ हे नाव परुळेकरांनी नक्की केले असावे. सकाळनंतर पुण्यात त्रिकाळ नावाचे वर्तमानपत्रही निघाले होते. सकाळमधून बाहेर पडलेल्या शिवराम लक्ष्मण करंदीकर यांनी ते काढले होते. तेव्हाच्या सकाळपेक्षा ते अधिक भारदस्त होते, परंतु सरकारी रोषाला बळी पडून ते बंद पडले. आज सकाळ, नवाकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स ही 'टाइम्स-दर्शक' नावाची वर्तमानपत्रे सुरु आहेत.

नावाची अशीच गंमत तरुण भारत या पत्राबाबत आहे. तरुण भारत हे संघविचाराचे वर्तमानपत्र. म्हणजे महात्मा गांधींचे विचार त्यांना मान्य नाहीत. परंतु या वर्तमानपत्राचे नाव मात्र गांधीजींच्या यंग इंडियाचे सरळसरळ भाषांतर आहे! आज यात विरोधाभासातून निर्माण होणारी गंमत दिसत असली, तरी तरुण भारतचा जन्म मुळी कॉंग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्यासाठीच झाला होता. कट्टर स्वराज्य पक्षातर्फे हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु करण्यात आले होते. १९४४ मध्ये ते दैनिक झाले आणि १९४९ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेले.

गांधीजींच्या यंग इंडियाचा आदर्श घेऊन जसे तरूण भारत निघाले, तशीच मराठीत तरुण महाराष्ट्र, तरुण मराठा, तरुण गोवा ही वर्तमानपत्रेही निघाली होती.

टाइम्स हे नाव धारण केलेले अगदी अलीकडचे वर्तमानपत्र म्हणजे सकाळ टाइम्स. हे नावच मोठे गमतीदार आहे. कारण त्यात काळ आहे आणि टाइम्सही!
यावर बापूंनी मोठी मार्मिक टिपण्णी केली होती. त्यांनी विचारले होते, की याचे मराठी भाषांतर सकाळचा काळ असे होऊ शकते काय?
भाषातज्ञ आणि पत्रकारांनी (कारण ते सगळ्याच विषयांतील तज्ञ असतात म्हणे!) याबाबत खुलासा करावा.

(Posted by अरुंधती पुणेकर, दि. १० जाने. २००९)

This entry was posted on 10.1.09 at 13:16 . You can follow any responses to this entry through the comments feed .

8 comments

टोकेकर आजारी पडले आहेत, अशी माहिती आधीच्या पोस्टमधील कॉमेन्टात कोणीतरी दिलेली आहे. ती खरी आहे काय? खरी असेल, तर हा योगायोग खूप काही सांगून जातो, असे मला वाटते. माझ्या मते बातमीदार हा ब्लॉग चालविणारी एखादी चांडाळचौकडीच आहे. त्यातले काही सदस्य मुंबईत आहेत आणि कोल्हापूर आणि पुण्यात आहेत. बहुतेक सकाळमधले जण आहेत. मुंबईच्या लोकसत्तातही आहेत. कारण की लोकसत्तेतील आतली माहिती यात असते. त्यामानाने मटाची माहिती फार नसते. कोल्हापूरची व्यक्ती यात असावी. किमानपक्षी कोल्हापूरकर तरी असावी, अशी माझी दाट शंका आहे. कळते समजते मधील अनेक बातम्या सातारा-कोल्हापूरमधून आलेल्या दिसतात. बातमीदारमध्ेय मात्र आमचे कोल्हापूर तेवढे येत नाही. ते आले पाहिजे. चांगदेव पाटील २.० ही व्यक्ती नव्याने या चांडाळचौकडीत आली आहे. किंवा जुनाच चांगदेव पाटील नव्या नावाने लिहित असणार. पण तो पुण्याचा आहे हे डेटलाईनवरून दिसते. अरुंधती पुणेकर ही बाई आहे की बाबा (की अन्य हे कळत नाही. या ब्लॉगचा संपादक यापैकीच एक जण असावा, असे मला वाटते. जो कोणी आहे तो कॉंपुटरमधला हुशार माणूस असणार कारण की साधा पत्रकार अशी साईट तयार करू शकणार नाही. या साइटमधे मोफत एसएमएससुद्धा आहे. जाहिरातीतून चांगले पैसे मिळत असणार. कोण आहे ही चांडाळचौकडी? यावर चौकशी समिती बसविली पाहिजे. काहीही असो पण त्यांचे उद्योग चांगले आहेत. ते जे कोणी असतील ते चांगले काम करीत आहेत. कलतेसमजते ही साइट उपयोगी आहे. बातमीदारचा दर्जा कधी कधी चांगला नसतो. त्यात सुधारणा व्हावी.

January 10, 2009 1:37 PM
भंकस  

रा. रा. धोबी साहेब,
तुम्ही नसत्या चाैकशी कशाला करता राव. तुमच्या नावाला ते शोभत नाही. कोल्हापूरचे काही येत नाही म्हणता तर करा की, धोबी पच्छाड सुरू, नसत्या चाैकशा कशाला करता राव.

भंकस

January 10, 2009 3:36 PM
सच्चा पुणेकर  

सकाळ मध्ये वातार्हरला बातमीदार असा शब्द आहे. तो केवळ सकाळमध्येच वापरतात.... त्यामुळे या ब्लाॅगचे नाव बातमीदार ही त्यांचीच काॅपी नाही का होत अरुंधतीताई (की, बाई किंवा अन्य).. हा हा हा हा

सच्चा पुणेकर

January 10, 2009 4:16 PM
Anonymous  

batmidar ha kay sakal cha copyright ahe kay?

January 10, 2009 5:07 PM
kallu kolhapure  

are kon tyo kolhapurcha nav ghetoy....nuste nav nako kahitari lihva ki rao, kolhapurcha masala jau dya ki baher....

January 10, 2009 5:54 PM
Anonymous  

...सकाळ टाइम्स... हे नावच मोठे गमतीदार आहे. कारण त्यात काळ आहे आणि टाइम्सही!
... त्याचे मराठी भाषांतर सकाळचा काळ असे होऊ शकते काय?
ha ha ha ha..

best comment!
please add saam marathi to this, and you will get the exact picture...

January 10, 2009 7:13 PM
Anonymous  

मग महाराष्ट्र टाईम्स म्हणजे महाराष्ट्राचा काळ का? हा हा हा हा
पुढारी म्हणजे नेता का ? की राजकारणी?
लोकमत मध्ये खरेच लोकांचे मत असते का?
लोकसत्ता केतकर सोडून इतर लोकांची तरी सत्ता चालते का?

January 10, 2009 8:54 PM
राजू कोरडा  

लोकमत टाईम्स, लोकमत समाचार आदी वृत्तपत्र नामक पत्रावळ्या अरुंधतीतांईच्या अन बापूंच्याही पहाण्यात आल्या नाहीत की काय?

राजू कोरडा
आैरंगाबादकर

January 11, 2009 2:58 PM

Post a Comment