दोन हजार नऊ उजाडले!
जुनी सदरे बंद झाली. (वाचक सुटले!) नवी सदरे सुरु झाली. (सदरकारू आनंदले!... मंदीत तेवढीच चांदी!!) काही सदरे जुन्या पानावरून नव्या पानावर आली. (भोग! दुसरे काय?)
नवे साल म्हटले, की पत्रांचे लेऔटही कात टाकतात. सालाबादप्रमाणे तेही झाले.
लोकसत्तेने लेऔटमूर्ती रानडेंच्या भयाने आपले रुपडे किंचित सुटसुटीत करण्याचा प्रयोग केला. (आणखीही काही प्रयोग केले. म्हणजे असे, की बातम्यांची हेडिंगे महत्त्वाची असतात, हे वाचकांस कळावे म्हणून ती कधी अधोरेखीत केली! तर मथळे दिल्यानंतर उपमथळ्यांत जागा का वाया घालवायची, असे म्हणून कधी त्यांच्यावर काट मारली! एकंदर चालू आहे... लोकसत्तेची रानडे इन्स्टिट्युट ऑफ पेज डिझाईनिंग चालू आहे!!) महाराष्ट्र टाइम्सने यंदा किरकोळ डागडुजीवरच निभावून नेले. (हा मंदीचा परिणाम म्हणावा का? एकूणच रिसेशनचे सेशन बेनेट-कोलमनी जरा लौकरच सुरू झाल्याचे दिसतेय!) चालू वर्षात लोकमतचा लेऔटही तसाच, खडाच्या खडाच आहे! (आता नवा लेऔट-मास्तर भरताहेत. तेव्हा होतीलच बदल म्हणा. पण तसा त्याचाही काही भरोसा नाही. मागे मारे रा. रा. प्रदीप म्हापसेकर (पक्षी - गरिबांचे गार्सिया) यांच्याहाती पाने दिली होती. पण त्यांचाही विवेक काही तेथे चालला नाही!) लेऔट म्हटल्यावर सकाळला विसरून कसे चालेल? (सकाळचे पानवालेही विसरत नाहीत! रोजच्या रोज आठवणीने गार्सियाचे श्राद्ध घालतात!) पण यंदा सकाळचा तो पंचकोटी लेऔटही मागील पानावरून पुढे चालू आहे. (बहुधा पाच कोटी पाने लागल्याशिवाय हे कंटिन्युएशन थांबणार नाही!)
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो, वृत्तपत्रांच्या कार्यालयी सालाबादप्रमाणेच सर्व काही सुरू असल्याचे पाहून तुम्हांस वाटेल, की मीडियामंडली क्षेम आहे. परंतु हाय रे कर्मा! तसे काही नाही. मीडीयाच्या पर्णसूची प्रदेशात सध्या मंदीचा शिशिर ऋतू आहे. सध्याची पत्रापत्रांतील पानगळ पाहून तुमच्या ते ध्यानी आले असेलच. (नसेल, तर महिनाअखेरीस रद्दी विकल्यावर येईलच! तेव्हा रद्दीवाल्याने काटा मारला असे म्हणू नका. इकडे पेपरवाल्यांनी पानांना फाटा मारलाय!) परंतु ही मंदी केवळ पानझडीवरच थांबलेली नाही. तिने आता पत्रकारू व नारूंचा घास घेण्यास प्रारंभ केला आहे. तोटा कमी करायचा, म्हणून पाच-दहा हजार रुपये पगारवाले कंत्राटी कर्मचारी कमी केले जात आहेत. किंतु असे दात कोरून कोणाचे पोट भरले आहे? तेव्हा राजे हो, सावध असा. नाईट रिसेसनची आहे!! (सावध असून तरी काय करणार म्हणा? 'जेटमध्ये कर्मचारी कपात' असे वृत्त लिहा म्हटले की लिहायचे व जा म्हटले की जायचे, येवढेच तर आता पत्रकारुंच्या हाती असते!... पत्रकारूंच्या संघटना तर काय?... आता उरल्या निवडणुकीपुरत्या! असो.)
एकीकडे मंदीच्या अशा घनघनमाला नभी दाटलेल्या असतानाच, दुसरीकडे मीडियावर, त्यातही प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडियावर सगळीकडून टीकेची गारपिट होत आहे. बिचा-यांना बूम्बाबोम्ब करायचीही चोरी! आमच्या रा. रा. रवींद्र आंबेकरांनी (पक्षी - अध्यक्ष महाराज, च्यानेलवाल्यांची संघटना) लोकसत्तेत लोकमानस व्यक्त केले. ते म्हणाले, की पेपरवाल्यांना च्यानेलवाल्यांबद्दल आकस आहे. झाले! वाचकांनीच त्यांचा परस्पर बाईट घेतला! रा. रा. निखिल वागळे (पक्षी - मी-खिल वागळे, संपादक, आयबीएन-लोकमत) यांनी तर तमाम पत्रसंपादकांवर दुगाण्या झाडल्या. (सतत आयबीएन-लोकमत पाहिल्याचा हा परिणाम! भाषा केवढी सुधारलीय आमची!!) त्यांचा समाचार सर्वांनी अनुल्लेखाने व आम्ही उल्लेख करून घेतला! हे कोठे होत नाही, तोच पत्रांतून च्यानेलांवर लेख-कडाबिनींचा मारा सुरु झाला. आम्हांस अजूनही स्मरते, की मुंबई सकाळमध्ये याच विषयावर रा. रा. डॉ. समीरण वाळवेकर, रवी आमले आणि वैशाली चिटणीस मजकूरांचे टीकालेख एकाच पानात छापून आले होते. वाळवेकर, चिटणीस प्रभृतींचे समजू शकते. त्यांनी कधीकाळी बूम हाती धरलेला आहे. परंतु रा. रा. आमले यांचे काय? आमच्या माहितीनुसार टीव्ही दिसतो कसा आननी, हेही त्यांनी पाहिले नसावे! परंतु आपण ज्या गावी गेलोही नाही, त्या गावाचा नकाशा काढणे, यालाच तर पत्रकारिता म्हणतात!!) बहुधा या टीकास्वयंवरामुळेच च्यानेलांचे कारभारी गावोगावी टीकाहरण यात्रा काढताना दिसत आहेत. परवा कोल्हापुरात रा. रा. साठे, खांडेकरादी कारभारी एकाच मंचावर परिसंवादून आले. मुंबैत मॅजेस्टिक गप्पांमध्येही च्यानेलांवरील टीकाखंडणाचा कार्यक्रम होत आहे. त्यात पुन्हा खांडेकर, आंबेकरादी कारभारी आहेतच. त्यांच्या या खंडण-खोरीस आमच्या शुभेच्छा!
तर अशा झाकोळलेल्या पर्यावरणात पत्रकार दिन, की ज्यास अवघ्या मीडियामंडलात पत्रपोळा म्हणून ओळखले जाते, तो आपल्यासमोर मान खाली घालून उभा ठाकला आहे. या दिवसाचे श्राद्धही पत्रांपत्रांत नियोजनानुसार घातले जाईलच. पत्रपोळ्यानिमित्ताचे कार्येक्रमही होतील. बेगडे, हिंगोळ वगैरेंनी सजावटही केली जाईल. सरकारी जीआरनुसार दर्पण पुरस्कारांचे वितरण केले जाईल किंवा ते प्रदान केले जातील. (म्हणजे दिले जातील!) राजधानी दिल्लीत तर समस्त मराठी पत्रकारांस महाराष्ट्र सदनी सरकारी खर्चाने पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जाणार आहे!
अशावेळी वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
एक पत्रकार म्हणून आम्ही एवढेच करणार आहोत, की
बातमी लागली नाही वा कापली म्हणून चिडचिड करणा-या बातमीदारांना,
पानात जाहिराती जास्त, आता एवढ्या बातम्या कशा लावू म्हणणा-या उपसंपादकांना,
हल्ली दुर्मिळ झालेले तेल डोळ्यांत घालून शब्दांमाजी काळेगोरे निवडणा-या मुद्रितशोधकांच्या एन्डेजर्ड जमातीला,
ऊन-वारा-पाऊस-पाणी-खाणे-पिणे-जाग-झोप कश्शाचीही पर्वा न करता बूमचकाट पळणा-या च्यानेलांच्या बातमीदारांना,
स्टुड्योच्या खोलखोल एकांतात बोलबोलबोल बोलत वेळेची बावडी भरणा-या तमाम अँकरांना,
कॅमेरामनांना, फोटोग्राफरांना, सगळ्यांनाच,
आम्ही मनातल्या मनात एक कडक सॅल्यूट ठोकणार आहोत!!
शेवटी काम करणा-या श्रमिकांना देण्यासारखे आपल्या हाती दुसरे असते तरी काय?
कसें?
(Posted by बापू आत्रंगे, दि. ५ जाने. २००९)
15 comments
बापू बापू... रा.रा. आमले दादांना (कॉर्न्व्हजन्स विभाग, सकाळ)
असे शब्द फटके मारू नका हो...
आहो, सकाळमधील कोणी हे वाचले आणि हाच नियम त्यांच्या सप्तरंग मधील
पान एक वर (चक्क चक्क) प्रसिद्ध झालेल्या लेखाला लावायचा ठरवला,
तर आमले दादा अडचणीत येतील ना...
रा. रा. आमले दादा
तुम्ही ते देश नकाशावर तरी पाहिले आहेत का?
आपला नम्र
बंडूनाना शिंगरे
बापू लई भारी झालं बघा. तुम्हालाही पत्रपोळ्याच्या (पक्षी ब्लाॅग पोळ्याच्या) शुभेच्छा. ब्लाॅगचे वाचक आणि कामेंटविरांचा तुम्हालाही कडक सॅल्युट.....
सांग सांग भोलानाथ....
सांग सांग भोलानाथ
बातमी लागेल काय.
बातमीभोवची जाहिरात येऊन
मजकूर कापेल काय.
भोलानाथ भोलानाथ
खंर सांग एकदा
महिन्यातून पगार
होईल का रे दोनदा
धोरणांची बेगड आणि कामाच्या (केआरए) झुल पांघरलेल्या तमाम पत्रकार मित्रांना पत्रपोळ्याच्या शुभेच्छा.........
तुमच्यातीलच एक
भोलानाथ
Kahi bail astat and kahi valu astat. Amle dada ha Ketkari Sampradayatil valu ahe. Tyala polyachya divashi tari chabuk naka re maru...
(Update - Hanale te barech zale. Ketkari samajvadi valu thokalech pahijet. Tyacha lekhan kamathi ki lekhan kamathipura ha blog paha mhanje mi kay mhantoy te kalel. - ThanThanPal
पुण्यातील एका मीडीया ग्रूपच्या मालकानी लॉस वाढत असल्याने स्वताची केमिकल कंपनी विकली अशी जोरदार कुजबुज आहे...बापू, बातमीदारांचे सोर्स झोपले काय? शहानिशा करा की राव....
सहयोगी बातमीदार वरील सखाराम पाटलांना कोल्हापूरहून तुकाराम गेणू पाटलांचा नमस्कार.... तुमी पत्रकारांना दिलेल्या शुभेच्छा आक्षी आवडल्या बघा. पण तुम्ही शेतकरी असला तरी नांगरधारी नाय तर पेनधारी असावेत असं आमाला वाटतं. मंग हे नांगराच नाटक कशापायी करताय. तसं अासंल तर तुमाचाही आज पोळा हाये. तवा तुमाला बी शुभेच्छा.....
तुकाराम पाटील
अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले आणि स्वतःला ज्येष्ठ पत्रकार म्हणवून घेणारे काही संपादक अभिरुचिहीन आणि असंसदीय भाषेचा वापरही आपल्या प्रसारणात करताना दिसत होते. मुळात टीव्ही माध्यमाचा सात-आठ महिन्यांचा अनुभव असलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रमुख बनलेल्या संपादकांनीसुद्धा सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करताना "लाज नसलेले', "नालायक' असे शब्द वापरलेले दिसत होते. या प्रसंगाची दखल घेऊन (तत्कालीन) मुख्यमंत्र्यांनी त्या वाहिनीच्या मालकांकडे तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केल्याचं नंतर समजलं. टीका असावी; पण ज्यांना माध्यमाची जाण नाही, त्यांच्याकडून इतक्या बेमुर्वत पद्धतीनं ती व्हावी, हे सर्वसामान्यांनाही खटकणारं होतं. ज्या वाहिन्यांकडे जास्त कॅमेरे, जास्त वार्ताहर आणि जास्त ओ.बी. व्हॅन्स ती वाहिनी श्रेष्ठ, असंच काहीसं चित्र मागच्या दहा दिवसांत होतं. मागे दिसणारं "जळणारं ताज' आणि निष्प्राण होऊन पडलेले करकरे, कामटे, साळसकरांचे देह, ही प्रतिमा प्रत्येक बातमीपत्रात दाखवताना, राज्यकर्त्या उपटसुंभांच्या घटनास्थळांच्या भेटींना अवास्तव महत्त्व का दिलं जात होतं, हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचं होतं. जणू या ६० तासांत देशात दुसरं काही घडतच नव्हतं.
बापू, हा निखिलच ना
याला पत्रपोळ्यानिमित्त पुरणपोळी भरवायलाच हवी
लय झॅक,
हे अकेरचं अनानिमस लय मोलाचं बोलून बोल्लं बगा. आमी तुमाला सांगून सोडतो बापूशेट तुमचं हे ब्लाग म्हंजी एक्दम भिन्न. कुनाची लाज काडतंय हे काय सांगून सोडता येनार नाय बगा. असं कान टोचून सोडनारं कोन तरी पायजेच पायजे.
- कानडा विट्टलू
Amle dada ha Ketkari Sampradayatil valu ahe. ... Ketkari samajvadi valu thokalech pahijet.
हे लिहिणारा हा कोण हाफ पॅन्टीवाला रे?
बापू, हे असे कॉमेन्ट डिलिट करीत जाणे. आम्ही या अशा ओका-या वाचण्यासाठी येथे येत नाही. नवे पत्रकारही हा ब्लॉग वाचतात हे लक्षात घेऊन तरी जुन्यांनी आपली इज्जत राखून लिहावे.
सुहानी काकू एकदम पर्फेक्ट म्हणालात, या हाफ पँटवाल्यांचं काही खरं नाही. इकडे निखळ गंमत म्हणून आम्ही वाचतो.
सुहानी आन्टींचा शब्दप्रयोगावरील राग समजू शकतो. मात्र, स्वतः हाफ-पॅंटवाले वगैरे असा उल्लेख करतात, तो योग्य आहे? ऐन पोळ्याच्या वक्ताला `तू वळू-मी बैल` असा वाद करुन कोण कुणाशी शोभा करतोय, हे दिसतंच आहे. समाजवाद्यांवर एवढा राग का, हे ही समजत नाही. बेडगेपणा जपण्यासाठी कथित पत्रकारीतेपेक्षा दुसरे कोणता आश्रय त्यांना आहे...जरा समजून घ्या राव...उगाच आपले समाजवाद्यांना ठोकतात...
आयबीएन-लोकमतला देवकर यांचा रामराम
मुंबई - आयबीएन-लोकमतच्या आऊटपुट विभागात काम करणारे वरिष्ठ पत्रकार गणेश देवकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते.
श्री. देवकर यांनी लोकमत, सकाळ या दैनिकांत उपसंपादक म्हणून काम केले आहे. आयबीएन-लोकमत वाहिनीच्या स्थापनेपासून ते तेथे कार्यरत होते. प्रारंभी ते आयबीएन-लोकमतच्या संशोधन विभागात काम करीत होते. संपादक निखिल वागळे यांच्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमासाठी ते संशोधन साह्य करीत असत. अलीकडे त्यांनी आऊटपुट विभागात आपली बदली करून घेतली होती असे समजते. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र त्यांनी 'आत्मसन्मान राखण्यासाठी' राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येते.
या आधी काही महिन्यांपूर्वी वरिष्ठ पत्रकार वैशाली चिटणीस यांनी आयबीएन-लोकमतचा राजीनामा दिला होता, तर या वाहिनीचे ड्राय रन सुरु असतानाच्या काळातच श्री. दिनेश दुखंडे यांनी वार्ताहरपदास रामराम ठोकला होता.
we are waiting Nikhil Wagle's (the great) resignation.
hahahahahahahahahahahaha
it is good for marathi journalism.
ka jalta re nikhil wagale var... jar tayni resine kela tar mag blogvar gappa konachya maraycha... patrkarani news ghadvaychi aste, marayachi nahi. sonayache andi denari kombadi kapun khanyasarkhe ahe he.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
▼
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
▼
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
The Economic Times and ET NOW Code of Conduct - *Introduction:* What We Stand For As a brand, The Economic Times / ET Now (hereinafter referred to as ET) draws its power and influence from two things: 1...4 months ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

