हल्ली जुलै महिन्याची २६ तारीख जवळ येऊ लागली की इथं मुंबईत आम्हांला धडकीच भरू लागते! पावसाची भीती नाही हो. पाऊस काय त्याला हवा तसा पडतो. आणि दरवेळी असा सणकून पडायला तो काय ठाण्यातला कॉंग्रेसचा उमेदवार आहे? तेव्हा भीती त्याची नाही. आम्हांला भय वाटते ते एकाच गोष्टीचे, की २६ जुलै आली रे आली की आमचे पेपरवाले आणि च्यानेलवाले गटारं, नाले आणि खड्ड्यांशिवाय काही बोलतच नाहीत! बोला रे! बोलण्याला आमची ना नाही. पण त्याला काही मर्यादा? आणि इथं पावसाचा पत्ता नसतो अन् यांचं आपलं चाललेलं - मुंबई पुन्हा जलमय होणार! (त्या सहाराच्या आरकेबीला आवरा रे कुणीतरी! बोलेन तर तोंडातल्या तोंडातच असा काय नवस केलाय काय त्याने?) असो.

ही वृत्तपत्रे आणि च्यानेलवाले यांच्यामुळे अलीकडे आम्हांला तर असंच वाटू लागलं होतं, की या उभ्या महाराष्ट्रात मिठी नदीशिवाय अन्य कोणती नदीच नसून, त्या नदीची नोंद रा. रा. किरीटजी सोमय्या यांच्या सातबारा आणि आठ-अ वर आहे!

पण अलीकडेच लोकसत्ताने आमचा हा गैरसमज दूर करण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे. लोकसत्ताने महाराष्ट्रातील नद्यांच्या सद्य(दुः)स्थितीबद्दलची एक मालिका नुकतीच प्रसिद्ध केली - 'मरणासन्न नद्या' नावाची. बातम्यांचे किरकोळीकरण झाल्याच्या आजच्या या जमान्यात अशी - नद्या वगैरे विषयांवरील मालिका प्रसिद्ध करायची म्हणजे धाडसच म्हणायचं! (ही मालिका सुरू झाली, तेव्हा आम्हांला तर अशीही शंका येऊन गेली, की हा काही तरी 'ध चा मा'चा प्रकार असावा! म्हणजे कोणीतरी 'ट्या' चे 'द्या' केले असावे! आणि तसेही मालिका म्हटल्यावर डोक्यात पह्यल्यांदा नट्याच येणार नाही का?)

परंतु लोकसत्ता अशी धाडसं नेहमीच करीत असते.
संपादकाला स्पॉंडिलायटीस नसला आणि मालकाची सत्ता व आर्थिक सोयरीक मर्यादीत असली, की अशी धाडसी वृत्ती येते पेपरात वा च्यानेलमध्ये.
लोकसत्तामध्ये ती आहे. त्या जोरावर त्यांनी नद्यांची मालिका लावून येथील सत्ताधीशांच्या भ्रष्टगंगेचा तळ उघडा पाडला!

लोकसत्ताचे हे करणे अन्यांनाही जमो!

(स्वाध्याय - वाचा लोकसत्ताचा अग्रलेख 'नद्या झाल्या विषवाहिन्या')

This entry was posted on 30.5.08 at 13:56 and is filed under , , , , . You can follow any responses to this entry through the comments feed .

2 comments

Anonymous  

सर्वान पासून लपवलेल्या बातम्या येथे वाचायला मिळतील.

दैनिक सनातन प्रभात

May 31, 2008 12:10 AM
Anonymous  

आरं तिच्या बायलीच्या, हे सनातन प्रभातवाले तर आता कुटंबी घुसायला लागले... म्हनं सर्वांपासून लपवलेल्या बातम्या त्यांच्या पेपरात वाचायला मिळत्याल. खरं का काय बुवांनो हे? त्येंच्या संपादक आन बातमीदारास्नी काय आकाशवानी आयकू येती का काय म्हनायचं! धरमाच्या नावानं थापा तं मारत्यातच, आता हे लोकास्नी भुलवायचं धंदेबी सुरू केले या लोकांनी. ही अशी लोकंबी लई तिरपागडी आसत्यात. वापरत्यात २१व्या शतकातली साधनं आनि ईचार मात्र १६व्या शतकातलं. या लोकांपासून हिंदु धर्माला वाचवा रे वाचवा..!

June 1, 2008 9:12 PM

Post a Comment