रा. रा. अरूण साधू यांनी विजय तेंडुलकर यांच्यावरील श्रद्धांजलीपर लेखांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. लोकसत्तेच्या पुरवणीतील आपल्या लेखात त्यांनी असे नमूद केले आहे, की तेंडुलकरांच्या मृत्युनंतर निदान माध्यमांनी तरी त्यांना पुरेसा न्याय दिला.

म्हणजे काय झाले, तर तेंडुलकर गेल्यानंतर - १९ व २० रोजी आणि नंतर २५ मे रोजी मराठी वृत्तपत्रांनी त्यांच्याबद्दल भरपूर लेख प्रसिद्ध केले!

त्यातले काहीच लेख खरोखर वाचनीय होते.
मृत्युनंतरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया (त्याला प्रतिक्रियाच म्हणायचे! श्रद्धांजली हा शब्द इथे मिसफिटच! ) कोण वाचते कोण जाणे? पण त्या वाचवत नाहीत. वृत्तपत्रांनी जोपासलेली ही रूदाली संस्कृती आता स्वतःहून हद्दपार करायला हवी!

एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या मृत्युनंतर सार्वजनिक जीवनातील जीवंत व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेण्याची वृत्तपत्रीय क्रिया कशी चालते याची माहिती असणारांना ही रूदाली संस्कृती म्हणजे काय याचा अर्थ समजेल. पण ते असो!

तर तेंडुलकरांचे असे वृत्तपत्रीय श्राद्ध जोरदारपणे घालण्यात आले याचे रा. रा. अरूण साधू यांना समाधान वाटते. तर त्यांना तसे समाधान वाटू दे. पण त्या लेखांमधून तेंडुलकर हाती लागले का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आमच्या नजरेचा आत्रंगपणाही असू शकेल, परंतु आम्हाला भावला, आवडला तो एकच लेख. त्याचा मथळा होता - 'विचार-कलहांचा अग्रनायक'. लेखक होते रा. रा. अरूण टिकेकर आणि हा लेख प्रसिद्ध झाला होता चक्क सप्तरंग या सकाळच्या रविवार पुरवणीत! (सप्तरंग पुन्हा 'मोठा' झाला व रंगात आला हे पाहून खरेच बरे वाटले! )

रा. रा. अरूण टिकेकर म्हटले की त्यांची ती सुप्रसिद्ध बिकट भाषा आठवते! या लेखातही त्यांची तीच भाषा आहे, तीच शैली आहे. पण त्या भाषेची व शैलीचीही खास खुमारी असते! (रा. रा. टिकेकरांच्या टीकाकारांना अर्थातच ती समजलीच नाही. सुमारांची सद्दी असलेल्या काळात असेच होत असते. त्याला नाईलाज असतो.)

पण केवळ भाषा वा शैलीमुळे रा. रा. टिकेकरांचा सदरहू लेख चांगला झाला असे म्हणणे त्या लेखातील आशयावर अन्याय केल्यासारखे होईल. 'तेंडुलकर' समजून घ्यायचे असतील तर पंडिती गांभिर्याने लिहिलेला हा लेख टाळताच येणार नाही.

आजकाल वाचनाचे समाधान देणारे लेखन वृत्तपत्रांतून अभावानेच येते. रा. रा. केतकर, रा. रा. टिकेकर असे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील असे पत्रनायक सोडल्यास तेथे अवघीच सुमारांची सद्दी! अशा काळात आलेला हा लेख म्हणूनच मनाला भावून जातो...

रा. रा. डॉ. अरूण टिकेकर व सप्तरंग पुरवणीचे आम्ही, बापू आत्रंगे या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन करतो!

This entry was posted on 27.5.08 at 11:56 and is filed under , , , , . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

Post a Comment